श्रीगणेशाय नमः ।
जय जय अनंत कल्याणदायका । जगद्गुरु श्रीवैकुंठनायका ।
दीनबंधु अनाथरक्षका । सौख्यकारका श्रीपांडुरंगा ॥१॥
अनंत जड जीव विठाबायी । तुवां मागे तारिले पाही ।
माझी चिंता असोदे कांहीं । आठव जीवीं धरोनिया ॥२॥
सकळ दुरितांचा करोनि मेळा । त्याचा मी निर्माण जाहलों पुतळा ।
पतित पावन भक्तवत्सला । निवेदन तुजला असों दे ॥३॥
मी जन्मासि येऊनि श्रीहरी । दुरितें आचरलों नानापरी ।
हे साक्ष येत असे निज अंतरीं । भवसागरीं बुडतसें ॥४॥
प्रारब्ध संचित क्रियमाण । उत्तम दिसोनि नयेचि जाण ।
म्हणोनि करुणा तुजकारणें । निज प्रीतीनें भाकितसे ॥५॥
कल्पनेच्या वोढी नाना । सर्वथा नावरती जगज्जीवना ।
जागृतीं सुषुप्तीं आणि स्वप्ना । निश्चळत्व मना नयेची ॥६॥
तूं कृपा करिशील जरी श्रीहरी । तरी तरेन भवसागरीं ।
इतर उपाय नानापरी । ते फळात्कारीं न येती ॥७॥
जैसें सखोल भूमींत पेरिले कण । परि त्यावरी वर्षला नाहीं धन ।
तैसें तुझें कृपेविण । व्यर्थ साधनें दिसताती ॥८॥
तुवा ज्याचा अंगीकार रुक्मिणीपती । केला असेल सहजस्थिती ।
त्याची प्रख्यात जाहली कीर्ती । पुराणीं गर्जती पंवाडे ॥९॥
त्या संताचीं चरित्रें सविस्तर । आठवण द्यावी राजीव नेत्र ।
मी तो मंदमति अपवित्र । निमित्तमात्र दिसतसे ॥१०॥
मागिल अध्यायीं निरुपण । भात लवंडितां पुरलें अन्न ।
मग वरदपुत्राचें करोनि लग्न । चांगदेव तेथूनि निघाले ॥११॥
बहुत हेत उपजला चित्तीं । द्वारकेसि जावें सत्वर गतीं ।
स्नान करोनि तीर्थ गोमती । श्रीकृष्ण मूर्ती पाहावी ॥१२॥
ऐसें बोलतां योगेश्वर । सवें यात्रा निघाली फार ।
सत्समागमाचा महिमा थोर । ऐसें सर्वत्र बोलती ॥१३॥
तों धारुरचा देशपांडया जाण । यादवपंत नामें ब्राह्मण ।
चांगदेवाच्या संगतीनें । यात्रेस गमन करीतसे ॥१४॥
गरोदर पत्नी ते अवसरीं । तेही सर्वथा न राहेचि घरीं ।
बहुती वर्जिले नानापरी । परी नायकेचि निर्द्धारीं कवणाचें ॥१५॥
म्हणती चांगयाच्या संगतीनें । इसीं रक्षील श्रीकृष्ण ।
ऐसा निश्चय करोनि मन । उभयतां जाण निघालीं ॥१६॥
एक विकल्प घालिती ऐसा । भ्रतार इचा देवपिसा ।
पुढें प्रांत होईल कैसा । हें तों सहसा कळेना ॥१७॥
पोरसवदा हे सुकुमार । असें पहिल्यानें गरोदर ।
द्वारकेचा पंथ दूर । उत्तम विचार दिसेना ॥१८॥
एक म्हणती साहवा मास । भरला इच्या गर्भांस ।
आतां पायीं चालावयास । शक्ति नसे सर्वथा ॥१९॥
तिचे आप्तविषयी होते कोणी । ते म्हणती आणावी परतोनी ।
ऐसें म्हणोनि तये क्षणीं । येती धांवोनी सन्निध ॥२०॥
नानापरी तये वेळ । घालूं पाहती मायाजाळ ।
परी तिची वृत्ति वेधली सकळ । करील घननीळ तें करो ॥२१॥
भ्रतार आधींच देवलसी । जरी मी सोडोनि राहिलें त्यासी ।
अवचट जाहलिया संन्यासि । तरी गति कैसी मग होय ॥२२॥
ब्राह्मण जन्म कठिण फार । कैसा करुं मग संसार ।
ऐकूनि कन्येचा विचार । मानलें उत्तर वडिलांसी ॥२३॥
चांगदेवाच्या समुदायांत । यादवराव गेले त्वरित ।
मागून कांता हळुहळू येत । चालत पंथ सर्वथा ॥२४॥
कोणी रोड दुर्बळ म्हातारीं । मागूनि निघालीं ते अवसरीं ।
यादवाची पत्नी सत्वरी । जात बरोबरी तयांच्या ॥२५॥
अस्तमानासि जातां तरणी । यात्रा उरली ज्या ठिकाणीं ।
प्रहर रात्रीं ते भामिनी । गेली चालोनी ते ठायीं ॥२६॥
भ्रताराच्या सन्निध जात । तो म्हणे कासया आलीस येथ ।
आम्हांस उपाधि नाहीं लागत । परतोन त्वरीत जाय आतां ॥२७॥
टाकली सांड देतांचि पती । रुदन करी ते गुणवती ।
यात्रेकरी तिजला शिकविती । याची संगती सोडूं नको ॥२८॥
चांगदेवासि अनन्य शरण । यादव जात निजप्रीतीनें ।
त्याचा अनुग्रह घेऊन । समाधान पावला ॥२९॥
मिथ्या प्रपंच लटकी माया । ऐसा निश्चय बाणला तया ।
आगीं ब्रह्मींची पडली छाया । विदेही काया दिसतसे ॥३०॥
निद्रा आणि जागृती । दिसे चांगदेव सद्गुरुमूर्ती ।
स्वप्नीं आणि सुषुप्तीं । सहज स्थिती बाणली असे ॥३१॥
असो यादवाची ऐशी स्थिती । निरसिली सकळ प्रपंच भ्रांती ।
कांता आली की नाहीं निश्चितीं । हा भाव चित्तीं असेना ॥३२॥
नाना चराचरीं सर्व भूतें । एक आत्मवत जग भासतें ।
आपणही समरस जाहला त्यातें । कल्पना द्वैत असेना ॥३३॥
गात नाचत प्रेमभरित । क्रमीतसे द्वारकेचा पंथ ।
मागें कांता वोढत येत । पायीं चालत गर्भिणी ॥३४॥
दिवस तों भरले नवमास । कोणी मायबहीण जवळीं नसे ।
ऐसी पातली महीतीरास । वोसाड असे अरण्य तें ॥३५॥
चांगदेव महा योगेश्वर । संप्रदायांसहित गेला दूर ।
यादवही त्याच्या बरोबर । न पाहे माघारे सर्वथा ॥३६॥
एकली प्रकट नसे कोणी । निढळ पडली असे वनीं ।
पोट दुखतें म्हणऊनी । ठिकाणींहुनी न चालवे ॥३७॥
म्हणे मायबापें तों राहिलीं दुरीं । भ्रतार टाकूनि मला निर्द्धारीं ।
हे गति नाहीं झाली बरी । काय श्रीहरी करुं आतां ॥३८॥
पोटाच्या कळा जाहल्या फार । यात्राही सांडूनि गेली दूर ।
सन्निध कोणीच नसे नर । उत्तम विचार दिसेना ॥३९॥
ऐसें संकट जाणोनि तेव्हां । मग चांगदेवाचा करीतसे धांवा ।
म्हणे सद्गुरु तूं अवतार बरवा । देई विसांवा जीवासी ॥४०॥
चौदाशें वर्षे साचार । तुवां काळ जिंकिला दुर्धर ।
विधवेसि दीधला वरदपुत्र । ते कीर्ति साचार ऐकिली म्यां ॥४१॥
म्हणोनियां तुज सांगातें । मी द्वारकेसि चालिलें निश्चित ।
भ्रताराची तों विदेह स्थित । टाकिलें अरण्यांत मजलागीं ॥४२॥
मी परदेशीं अज्ञान बाळ । कैसा नेणवे प्रसूतिकाळ ।
कोणी मायबहीण नाहीं जवळ । म्हणवोनि तळमळ करीतसें ॥४३॥
भक्तवत्सल कैवल्यदानी । मजलागीं पावावें ये निदानीं ।
ऐसा धांवा करितां भामिनी । देवाचे कानीं शब्द पडियेला ॥४४॥
अनाथ बंधु करुणाकर । भक्तवत्सल कृपासागर ।
घ्यावया भक्तांचा कैवार । नाना अवतार धरितसे ॥४५॥
मत्स्य कच्छ वराह होणें । नृसिंह वामन भार्गव पूर्ण ।
श्रीराम दाशरथी कृष्ण । बौद्ध कल्की होणें तयास ॥४६॥
एकाच्या कैवारें वोढणें भिंती । एकीं जेवविली पाषाण मूर्ती ।
एकाच्या कैवारें निश्चितीं । पाडेवार श्रीपती जाहला ॥४७॥
एकाच्या घरीं श्रीखंडया कृष्ण । पाणी वाहतसे आवडीनें ।
दासी जनीचें सारितां दळण । संकोच मन नव्हेची ॥४८॥
चोखियाच्या संगें रुक्मिणीवर । निजांगें वोढूं लागतसे ढोर ।
गौळणी उखळासि बांधितां दोर । तें शार्ङगधर सोशीतसे ॥४९॥
सेनियाचे भक्तीसाठीं । नापीत होतसे जगजेठी ।
भक्तांसि पडतां महासंकटीं । मग उठाउठी पावतसे ॥५०॥
ना विचारीच काळ वेळ । सगुण होतसे दीनदयाळ ।
त्याणें माहेरवणीचा धांवा ते वेळें । श्रवणीं तत्काळ ऐकिला ॥५१॥
लगबग जाहली जगज्जीवना । सर्वथा धीर न धरवेचि मना ।
दयेनें द्रवला यादव राणा । कौतुकें नाना दाखवी ॥५२॥
यादवाच्या स्त्रीचे ठायीं । तेथें प्रकटले शेषशायी ।
स्त्रीचें रुप लवलाहीं । घेतसे ते समयीं जगदात्मा ॥५३॥
पांढरें पातळ शुभ्र चोळी । निजांगें लेतसे वनमाळी ।
कर्णीं ताटंके झळाळी । कुंकुम भाळीं लाविलें ॥५४॥
जो वैकुंठवासी इंदिरावर । ज्यासि हृदयीं धरीतसे पिनाकघर ।
तो कां कणेल्याला हातभर । नवल साचार मज वाटे ॥५५॥
ऐसें रुप तें माहेरवणी । देखोनि विस्मित जाहली मनीं ।
म्हणे कोठून आलीस वो साजणी । मज लागोनी सांगावें ॥५६॥
ऐसें पुसतां ते समयीं । काय म्हणतसे शेषशायी ।
मज चांगदेवें पाठविलें पाहीं । कृष्णाबाई नाम माझें ॥५७॥
तुज पातला प्रसूति समय । यास्तव पातलें लवलाहें ।
आतां चित्तीं न धरीं भय । तुझी सोय करितें मी ॥५८॥
ऐसें म्हणोनि रुक्मिणीरमण । योगमायेचें केलें चिंतन ।
मायेचें नगर निर्माण । स्वइच्छेनें करीतसे ॥५९॥
तिजला धरुनि मणगटीं । मंदिरांत नेली उठाउठी ।
म्हणे मज सांगतां जीवींची गोष्टी । संकोच पोटीं न धरावा ॥६०॥
परदेशीं एकट तूं निढळ । कोणी माय बहिण नसे जवळ ।
समीप जाणोनि प्रसूति काळ । आलें तत्काळ मी धांवोनी ॥६१॥
ऐसें बोलतां कृष्णाबाई । संतोष वाटला तिचें जीवीं ।
म्हणे तुझें उत्तीर्ण व्हावें कायी । तरी पदार्थ नाहीं मजपासी ॥६२॥
ऐसें बोलनियां उत्तर । मस्तक टेकिला पायांवर ।
तो प्रसूति समय येतां सत्वर । जाहला पुत्र सुलक्षणी ॥६३॥
संतोष मानी घनसांवळा । म्हणोनि निजांगें वाजवी थाळा ।
आपुल्या दासाचा पुरवितां लळा । आळस गोपाळा न ये कीं ॥६४॥
ज्याची मूर्ति हृदयसंपुटीं । एकांती पूजितसे धूर्जटी ।
तो नाळ खांडित आपुले मुठीं । उल्हास पोटीं धरुनियां ॥६५॥
बाळंतीण म्हणे कृष्णाबायी । एकलीच कष्ट करितेसि कायी ।
दुसरी सुईण घातली नाहीं । मग उत्तर कायी बोलतसे ॥६६॥
तुझा दों जीवे निवाडा झाला । इतुकेंनी संतोष वाटे मजला ।
कष्टाचा उबग नाहीं आला । निश्चित बोला या मानी ॥६७॥
ज्याच्या चरणांगुष्ठापासून । पवित्र गंगा निघाली जाण ।
तो पाणी तावोनि जगज्जीवन । न्हाणी तान्हें बाळंतिणी ॥६८॥
निज प्रीतीनें ते अवसरीं । कातबोळ वाटिला घरोघरीं ।
औषधें वाटोनि नानापरी । देत सत्वरी जगदात्मा ॥६९॥
शेगडी बाज ते समयीं । निजांगें घालीत कृष्णाबायी ।
पथ्य करोनि लवलाहीं । बाळंतिणीस जेववी ॥७०॥
विडा करोनि आपुले हातीं । तिसीं देत रुक्मिणीकांत ।
दीपक लावोनि अहोरात । बैसे जागत तिज पाशीं ॥७१॥
पाकशासनासहित सकळ सुर । जयासि अर्चिती निरंतर ।
तो सटवीस पूजोनि आपुल्या करें । साहित्य समग्र मेळवूनियां ॥७२॥
नाडापुडी आण शेंदूर । ऊदफुलें नानाप्रकार ।
मुरड कानवल्या पाट्यावर । ठेवीत निजकरें आपुल्या ॥७३॥
पांववी पूजोनि ऐशा रीतीं । अहोरात्र करी जागृती ।
दाहावे दिवसीं तिजप्रती । न्हाणी श्रीपती निजांगें ॥७४॥
ऐशा रीतीं बाळंतपण । एक मास केलें जगज्जीवनें ।
सर्वथा उबग न धरी मनीं । लाघवी श्रीकृष्ण कृपाळु ॥७५॥
जो पदार्थ लागे बाळंतिणी । तितुकेही पुरवीत चक्रपाणी ।
औषध पथ्य सर्व करोनि । बैसवीत भोजनीं निज लोभें ॥७६॥
कांतेचा करोनियां त्याग । यादव गेला चांगया संगे ।
मागें तो सांभाळ निजांगें । करीतसे श्रीरंग कृपाळु ॥७७॥
परी हें चरित्र ते समयी । कोणासि सर्वथा विदित नाहीं ।
श्रीहरीची अघटित लीला पाहीं । ब्रह्मादि कांहीं नेणवे ॥७८॥
एक मास लोटतां सत्वर । चांगदेव गेले द्वारकापुरा ।
स्नान करोनि गोमती तीरा । राउळांत प्रवेशला ॥७९॥
महाद्वारीं दंडवत । घातलें तेव्हां प्रेमयुक्त ।
मग श्रीकृष्ण मूर्ति ध्यानास आणित । रुक्मिणि सहित ते वेळीं ॥८०॥
तों मूर्तींत नसे श्रीकरधर । विस्मित जाहलें निज अंतर ।
मग विश्वी विलोकीत योगेश्वर । तों अद्भुत चरित्र देखिलें ॥८१॥
यादवाची पत्नी साचार । महीतीरी राहिली दूर ।
प्रसूति समयीं इंदिरावर । गेला सत्वर त्या ठायां ॥८२॥
कृष्णाबाईचें रुप धरुन । तिचे करितसे बाळंतपण ।
ऐसें ध्यानांत चांगयानें । चरित्र संपूर्ण पाहिले ॥८३॥
तंव रुक्मिणी म्हणे केशवदासा । तुवां कष्टविलें द्वारकाधीशा ।
बाळंतपणा धाडिला कैसा । केली निराशा आमुची ॥८४॥
एक मास लोटला पाहीं । येथें न येती शेषशायी ।
निजांगें जाहले कृष्णाबायी । आम्ही तळमळ जिवीं करीतसों ॥८५॥
आम्हासहित अहर्निशीं । अष्टसिद्धि तिष्ठती दासी ।
जरी आज्ञा करिती हृषीकेषी । तरी महाकार्यासी संपादितो ॥८६॥
इतुके ऐश्वर्य अंगीं असोन । आणि निजांगें करितों बाळंतपण ।
ऐसें देवाचें कुलक्षण । मज कारणें नावडे ॥८७॥
ऐसें बोलता रुक्मिणीस । काय म्हणतसें केशवदास ।
निजांगें करावें भक्त कार्यास । हा स्वभावचि असे तयाचा ॥८८॥
मागील चरित्रें पाहिली सर्वही । माते तुज काय विदित नाहीं ।
धर्माचे घरीं शेषशायी । उच्छिष्ट सर्वही सावडीतसे ॥८९॥
यादव सैन्य छपन्न कोटी । सेवेसि तिष्ठती घडीघडी ।
तो अर्जुनाची निजांगे धूतसे घोडी । सत्कीर्ती चोखडी हे त्याची ॥९०॥
महर्षिस सद्भावें करिती हवन । तेथेंचि न घे जो अवदान ।
तो गोपाळांचे उच्छिष्ट श्रीकृष्ण । निज प्रीतीनें खातसे ॥९१॥
हटयोगी ब्रह्मज्ञानी । जो सर्वथा नये त्यांचें ध्यानीं ।
त्यासि दांव्यानें बांधिती गौळणी । विचित्र करणी मज दिसे ॥९२॥
अष्टसिद्धि असोनि दासी । परी सर्वथा कार्य न सांगे त्यांसी ।
तो दळूं लागतसे जनीसी । सप्रेम भक्तीसी भुलोनियां ॥९३॥
तैशाच रीती जगज्जीवन । करीत बैसले बाळंतपण ।
हें त्याच्या स्वभावाचें लक्षण । उपाय कोण करावा ॥९४॥
ऐसी चांगयाची वचनोक्ती । ऐकोनि रुक्मिणी विस्मित चित्तीं ।
म्हणे आतां कळेल तैसी युक्ती । करुनि वैकुंठपती आणावा ॥९५॥
मीही तीरासि लवलाहीं । परतोन जाय ये समयीं ।
श्रीहरि झाला असे कृष्णाबायी । घेऊन येयी त्याजला ॥९६॥
ऐकोनि रुक्मिणीचें वचन । चांगदेव अवश्य म्हणे ।
विश्वमातेसि करुनि नमन । निघे तेथून सत्वर ॥९७॥
ब्रह्यारण्य महीतीर । तेथें पातले योगेश्वर ।
तों तेथून नूतन मायेचें नगर । देखिलें साचार दृष्टीसीं ॥९८॥
चांगया विस्मित ते वेळां । म्हणे श्रीहरीची अघटित लीला ।
नाना चरित्रें दाखवी डोळां । सप्रेम कळा देखोनियां ॥९९॥
लोकांसि पुसोनि ते समयीं । कोठें राहतसे कृष्णाबायी ।
दुरुनि मंदिर दाखविल्या पाहीं । मग ते गृहीं प्रवेशत ॥१००॥
तों कृष्णाबाई आंगणांत । चांगयासि देखोनि नमस्कारित ।
जो माया लाघवी श्रीभगवंत । वोळखून देत आपणांसी ॥१॥
चांगया ऐसा योगी भला । चौदाशे वर्षें जिंकिलें काळां ।
तयासि न कळे श्रीहरीची लीला । ते प्राकृतासि डोळां केविं दिसे ॥२॥
रुपें नटोनि नाना रीतीं । देव उघडाचि वर्तें क्षितीं ।
परि मायेची पडळें डोळ्यांवरती । म्हणूनि श्रीपती दिसेना ॥३॥
इतर जीवांची कायसी परी । जन्म घेतला यशोदे उदरीं ।
तिसीं विश्वरुप दाखविलें परी । लेकरुं श्रीहरी म्हणे माझें ॥४॥
असो आतां ते समयीं । चांगदेवें देखिली कृष्णाबायी ।
परी होय न होय संशय जीवीं । नमस्कार तोहि न केला ॥५॥
तों माया लाघवी श्रीकृष्णनाथ । अदृश्य होय तेथील तेथें ।
चांगदेव मंदिरीं प्रवेशत । तों बाळंतीण येत उठोनियां ॥६॥
योगेश्वराच्या पायांवर । स्वहस्तें घाली आपुला कुमर ।
वृत्तांत सांगितला सविस्तर । आद्यंत चरित्र जें झालें ॥७॥
म्हणे भ्रतार टाकुनि गेले या वनीं । मी एकटी राहिलें ये स्थानीं ।
प्रसुति समय तये क्षणीं । निढळ वाणी बैसलें ॥८॥
तंव स्वामिनी कृपा करोनि पाहीं । येथें पाठविली कृष्णाबायी ।
तिणें बाळंतपण करुनि सर्वही । मज ये ठायीं रक्षिलें ॥९॥
चांगदेव पुसे पाहीं । कोठें दाखवी कृष्णाबाई ।
ते म्हणे आतांचि ये समयीं । बाहेर लवलाहीं ते गेली ॥११०॥
तुम्ही आलां मंदिराप्रती । तेव्हां बाहेर उभी होती ।
चांगदेव समजलें आपुलें चित्तीं । म्हणे श्रीपती कष्टविला ॥११॥
आम्ही यादव सवें आणिला नसता । तरी श्रीहरी बाळंतपण कासया करिता ।
ऐसी क्षीत मानीत चित्ता । म्हणे द्वारकानाथ कष्टविलें ॥१२॥
योगयाग तपेंव्रतें । ज्याच्या प्राप्तीस्तव करिताति बहुतें ।
तो भक्तकार्यासि वैकुंठनाथ । थोरपण नाठवीत सर्वदा ॥१३॥
तव बाळंतिणीनें जोडूनि कर । लेकरुं घातलें पायांवर ।
म्हणे हा शिष्य तुमचा निर्द्धार । सेवेसि निरंतर लाविजे ॥१४॥
ऐसें ऐकोनि विनीत वचन । सद्गुरु तिजला अवश्य म्हणे ।
मातेसहित घेउनि तान्हे । आले परतोन द्वारकेसी ॥१५॥
मग जाऊनि राउळाप्रती । दृष्टीसीं देखिली श्रीकृष्णमूर्ती ।
म्हणे देवाधिदेवा रुक्मिणीपती । विचित्र गती पैं तुझी ॥१६॥
निजांगें स्त्रीचें रुप धरुन । तुवां सारिलें बाळंतपण ।
अनाथ बंधु करुणाघन । हें नामाभिधान तुज साजे ॥१७॥
ऐशापरी करोनि स्तुती । मग पूजिली श्रीकृष्णमूर्ती ।
उजळूनियां मंगल आरती । दंडवत प्रीतीं घातलें ॥१८॥
मग यादवासि बोलावूनि सत्वर । त्यासि भेटविलीं पत्नी कुमर ।
म्हणती इचा त्याग न करीं साचार । देतसें वर तुजलागीं ॥१९॥
या पुत्राच्या वंशीं परात्पर । हरिभक्त निर्माण होतील थोर ।
तेणें सकळ कुळाचा उद्धार । यासि अंतर असेना ॥१२०॥
ऐसें सांगतां सद्गुरुमूर्ती । यादवें नमस्कार घातले प्रीतीं ।
हातीं धरुनि कांतेप्रती । बिर्हाडासि निश्चितीं तो गेला ॥२१॥
चांगदेवें करुनि मिष्टान्न । वैष्णव मंडळीस घातलें भोजन ।
चतुर्मास तेथें राहून । मग स्वदेशासि जाण परतले ॥२२॥
देवासि पुसोनि ते अवसरीं । चांगदेव निघती सहपरिवारीं ।
यात्रेचा समुदाय घेऊनि भारी । गोदातीरीं मग आले ॥२३॥
येऊनि पुणतांबे क्षेत्रांत । भेटती इष्टमित्र सर्वांतें ।
चरित्र वर्तलें जें अद्भुत । तें जाहलें श्रुत सकळांसी ॥२४॥
चांगदेव होते द्वारकापुरीं । तें कीर्ति प्रगटली देशांतरीं ।
म्हणती हा अवतार पृथ्वीवरी । विश्वोद्धारी जन्मला ॥२५॥
जया समागमे असतां गभस्ती । तों नभमंडळीं फांके किरणदीप्ती ।
कां चंपके सुमनें दूर असती । तों येतसें घ्राणातें सुवास ॥२६॥
कां रोहिणीकांत उदयाचळीं । तों शीतलत्व धांवें नभमंडळीं ।
कां श्रीराम न येतां कौसल्या उदरीं । तो चरित्र सत्वरीं प्रगटलें ॥२७॥
तैसी भगवद्भक्ताची कीर्ती । विश्वमुखीं होय वाचती ।
धन्य योगेश्वर चांगया म्हणती । रुक्मिणीपती साह्य जया ॥२८॥
गोदातीरासि आलिया निश्चित । दिवस लोटले असतां सात ।
तों पंढरीचा विपरीत वृत्तांत । वार्तिक सांगती येऊनियां ॥२९॥
बेदरीं राजा अविंध कुमती । क्षेत्रांसि आला सत्वर गती ।
ब्राह्मणांसि छळिलें नाना रीतीं । केली विपत्ती बहुत तयां ॥१३०॥
हिंदुधर्म वर्जिला सकळ । वैष्णवांसि घालूं न देतीच माळ ।
कीर्तन कथा वर्जुनि सकळ । दंडिले सुशीळ विप्र त्याणें ॥३१॥
पंढरी क्षेत्र लुटूनि त्याणें । मागुतीं यवनाचें बैसविलें ठाणें ।
बडव्यांनीं समापत्र करुन । विठोबा लपवून ठेविला ॥३२॥
तळघरीं आच्छादून पांडूरंग मूर्ती । तयाचें नाम कोणी न घेती ।
जरी हरिकीर्तन वैष्णव करिती । तयांसि दंडिति तत्काळ ॥३३॥
देवाचें महाघर मोडूनि सकळ । मसीद केली त्या महा खळें ।
भले लोक पळाले तत्काळ । यवनाचें बळ देखूनियां ॥३४॥
ऐसि या गोष्टीसी निश्चित । महिने लोटून गेले सात ।
चांगदेव ऐकूनि मात । नेत्रीं अश्रुपात वाहती ॥३५॥
अंग जाहलें रोमांचित । कंठी बाष्प पैं दाटत ।
म्हणे कलीच्या भयानें रुक्मिणीकांत । पळोनि बैसत तळघरीं ॥३६॥
परी पुंडलीकासि दीधला वर । कीं जड मूढ उद्धरीन दर्शनमात्र ।
तें असत्य केलें काय उत्तर । ऐसें साचार दिसतसे ॥३७॥
मग म्हणे जी करुणाकरा । महाप्रताप धीर गंभीरा ।
तुझी सत्कीर्ति माझ्या अंतरां । रुक्मिणीवरा आठवतसे ॥३८॥
शिव ब्रह्मा इंद्रादि गण । शंखासुरें जिंतिले संपूर्ण ।
तों तुवां मत्स्यावतार धरुन । टाकिला निवटून क्षणमात्रें ॥३९॥
कच्छरुप धरुनि एक वेळ । पृष्टीवरी धरिला मंदराचळ ।
रत्नें काढूनि तत्काळ । विबुध सकळ तोषविले ॥१४०॥
हिरण्याक्ष पृथ्वीची करितां घडी । तुवां वराह वेष घेतला तांतडी ।
दैत्य मारिला लवड सवडी । हे सत्कीर्ति चोखडी पुराणीं ॥४१॥
हिरण्यकशिपें प्रल्हाद भक्त । गांजितां प्रगटलासि स्तंभांत ।
नखावरी विदारुनि त्यातें । आपुल्या दासातें रक्षिसी ॥४२॥
दानाभिमाने फुगला बळी । तयासि घातलें पाताळी ।
ऐसा प्रतापी तूं वनमाळी । सामर्थ्य ये काळीं लोपलें ॥४३॥
रेणुकेसि गांजिले सहस्त्रार्जुनें । तेव्हां परशु हातीं घेतला त्वरेनें ।
एकलेनि पृथ्वी निःक्षत्रिय करुन । राज्यीं ब्राह्मण बैसविलें ॥४४॥
कपटी रावणें सकळ सुर । बंदिखानीं रक्षिले समग्र ।
तुवां अवतार घेऊनि रघुवीर । दशानन सत्वर मारिला ॥४५॥
मग वसुदेव देवकीचें उदरीं । अवतार घेतला श्रीहरी ।
कंस चाणूर निवटूनियां अरी । सुखी धरित्री केली असे ॥४६॥
ऐसा तुझा प्रताप असतां । अवघाची हरपोनि गेला आतां ।
आतां आम्हांसि कोण रक्षिता । न दिसे तत्त्वतां भू-मंडळीं ॥४७॥
ऐसा धांवा ते क्षणीं । चांगदेव करितसे आपुलें मनीं ।
म्हणे देवाधिदेवा कैवल्यदानी । सत्वर येऊनी भेट मज ॥४८॥
तुझा प्रताप वर्णितां जाण । चक्षुःश्रवा शीणला पूर्ण ।
तो तूं कळिकाळासि देऊनि मान । लपलासि भयानें यवनाच्या ॥४९॥
ऐसें चांगयाचें करुणाउत्तर । ऐकूनि द्रवला रुक्मिणीवर ।
मग ध्यानांत होऊनि प्रगट सत्वर । अभय कर देतसे ॥१५०॥
म्हणे प्रेमळ भक्ता ऐक वचन । मी अचळ अढळ अविनाश पूर्ण ।
परी तुमचे इच्छेस्तव जाण । साकार सगुण रुप धरिलें ॥५१॥
माझे इच्छेने निश्चिती । अनंत रुपें होती जाती ।
तेथें यवन बापुडे ते किति । कासया खंती करितोसी ॥५२॥
कृत त्रेता द्वापारांत । तेव्हां म्यां पराक्रम केले बहुत ।
कलियुगीं आपुलें यश समस्त । तुम्हां भक्तांतें दीधलें ॥५३॥
तुम्ही जरी अघटित कराल गोष्टीं । तरी मीं सिद्धीस नेईन उठाउठी ।
मी साह्य असतां जगजेठी । चिंताक्रांत पोटीं न व्हावें ॥५४॥
आतां सोडूनि गोदातीर । बेदर नगरास जाय सत्वर ।
तेथें अघटित होईल चरित्र । तें लोक समग्र पाहती ॥५५॥
ऐसें सांगोनि रुक्मिणीकांत । राहिले चांगयाच्या हृदयांत ।
मग केशवदास नेत्र उघडित । होय विस्मित मानसीं ॥५६॥
म्हणे माझी पुरवावया आर्ती । साक्षात् भेटली पांडुरंग मूर्ती ।
स्वयें आज्ञा करीत श्रीपती । कीं बेदराप्रती तूं जाई ॥५७॥
आपुलें शिरीं असतां घननीळ । काय करील अविंधखळ ।
कळिकाळीचें न चले बल । दीन दयाळ साह्य असतां ॥५८॥
दैत्य दानव निवटीत श्रीहरी । आपण जिंतावे षड्वैरी ।
वोस पाडूनि वैवस्वतपुरी । वैकुंठ पुरी वसवावी ॥५९॥
रावण आणि कुंभकर्ण । मारुनि विजयी रघुनंदन ।
संतीं काम क्रोध दोघेजण । शूरत्वें परि पूर्ण जिंतिंले ॥१६०॥
कृष्णें मारिले कंस चाणर । संतीं त्रासिले मदमत्सर ।
तेणेंचि विजयी वैष्णव वीर । सत्कीर्ति अपार तयांची ॥६१॥
वक्रदंत शिशुपाळां कारणें । मारुनि यशस्वी जाहला कृष्ण ।
संतीं दंभ अहंकार निवटून । शांति भूषण ते ल्याले ॥६२॥
श्रीरामें ताटिका मारिली पाहीं । संतीं त्रासिली निंदा देवी ।
तत्समान पुरुषार्थ दोहींचाही । भिन्न भेद नाहीं सर्वथा ॥६३॥
असोत आतां दृष्टांत निके । देव भक्त समान सारिखे ।
एकमेकांचें आंगें देख । सप्रेम सुख भोगिती ॥६४॥
क्षेत्र क्षेत्रज्ञ जया रीतीं । एकमेकांत समरसें असती ।
गभस्ती आणि तेज निश्चिती । वेगळीं न होती सर्वथा ॥६५॥
जैसें कर्ण आणि अवधान । कां नेत्र आणि देखण ।
तैसे देव भक्त दोघेजण । एकत्रपण दोहीचें ॥६६॥
नातरी नाक आणि सुगंध घेता । रसना आणि चवी जाणता ।
तेवीं भक्तासीं नाहीं भिन्नता । एकात्मता दोहींची ॥६७॥
तेवीं चांगदेव आणि रुक्मिणीपती । एकमेकांचें अंतर जाणती ।
जड मूढ उद्धरावया निश्चिती । अवतार क्षितीं घेतले ॥६८॥
पुढिले अध्यायी कथा रसाळ । देवें भक्ताचे पुरविले लळे ।
महीपती त्यांची चरित्रें रसाळें । ओव्या प्रांजळ गातसे ॥६९॥
स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेचि पुरती मनोरथ ।
प्रेमळ परिसोत भाविक भक्त । अष्टमाध्याय रसाळ हा ॥१७०॥अ० ८॥ओव्या॥१७०॥६॥