श्रीगोपाळकृष्णाय नमः ।
जय जय जगद्गुरु पंढरीनाथा । चराचरीं एक तुझी सत्ता ।
जयाची कां जैसी आस्था । ते तूं अनंता पुरविसी ॥१॥
बैसोनि सुरतरु तळवटीं । जैसी कल्पना आणिजे पोटीं ।
मग विलंब न लागतां उठाउठी । तेंचि फळ दृष्टीं दिसतसे ॥२॥
कां पुरुष नटोनि साचार । दर्पणांत पाहे मुखचंद्र ।
रुप दिसतें तदाकार । आणखी विचार असेना ॥३॥
कां आरोळी मारितां पर्वता वरुनी । दरीं कंदरीं तैसीच उमटे ध्वनी ।
का पाषाणाच्या देउळांतुनी । पडसाद परतोनी तैसाचि ये ॥४॥
तैशाच रीतीं करुणाधना । तुज जो जैसी धरी भावना ।
तैसींच फळें जगज्जीवना । दीनोद्धारणा त्यां देसी ॥५॥
अभक्त तुज नाहीच भाविती । तरी त्यांच्या दृष्टीं न पडसी श्रीपती ।
भाविकांची देखूनि अनन्यप्रीती । सगुनरुपें निश्चितीं भेटसी त्यां ॥६॥
घ्यावया भक्तांचा कैवार । घेतले नाना अवतार ।
असुर दैत्य मारुनि दुर्धर । चरित्रें अपार दाखविलीं ॥७॥
आतां बौद्धरुपहृषीकेश । सर्वथा बोलसी कवणास ।
परी निज भक्तांसि देशील यश । सत्कीर्ति घोष वाढविसी ॥८॥
मागिले अध्यायीं कथा गहन । कृष्णाबाई होऊनि श्रीकृष्ण ।
यात्रेकरिणीचे बाळंतपण । निजप्रीतीनें सारिलें ॥९॥
तें चांगदेवें देखोनि दृष्टीं । विस्मित जाहले आपुलें पोटीं ।
तिच्या भ्रताराची करोनि भेटी । मग उठाउठी परतले ॥१०॥
पुण्यस्तंभासि येतां जाण । तों ऐकिलें पंढरीचें वर्तमान ।
कीं अविंध राजा क्षेत्रासि येऊन । ब्राह्मण संपूर्ण नागविले ॥११॥
बडवे मिळोनि एकांती । लपविली श्रीपांडुरंग मूर्ती ।
देउळाची मसीद निश्चितीं । अविंध करिती दुरात्मे ॥१२॥
ऐसा वृत्तांत ऐकोनि कानीं । सद्गदित जाहले तये क्षणीं ।
म्हणे आम्ही मृत्युलोकासि येऊनी । सत्कीर्ति जनीं न केली ॥१३॥
अविंधें देऊळ मोडिलें जाण । तरी जीर्णोद्धार करावा आपण ।
इतुका हव्यास धरुनि मनें । म्हणे सत्वर गमन करावें ॥१४॥
ऐसें म्हणवोनि ते समयीं । बोलाविले शिष्य संप्रदायी ।
म्हणे बेदरासि चलावें लवलाहीं । चरित्र कांहीं पाहावया ॥१५॥
आज्ञा करितांचि तये वेळे । सिद्ध जाहले साधक सकळ ।
आणिकही इतर लोकपाल । चालती तत्काळ समागमे ॥१६॥
गरुड टके निशाण भेरी । माहिमोर्तब पताका भरजरी ।
टाळ मृदंगांचे गजरीं । नाद अंबरीं कोंदला ॥१७॥
विठ्ठलनामाचा करोनि घोष । कीर्तन करिती वैष्णवदास ।
नादब्रह्मचि आलें मुसे । त्या सुखास पार नाहीं ॥१८॥
जयजयकारें पिटोनि टाळी । आनंदली भक्त मंडळी ।
चांगदेव निघाले तत्काळीं । खेळीमेळीं वैष्णवांच्या ॥१९॥
मार्गीं चालतां निजप्रितीं । ब्रह्मानंदें कीर्तन करिती ।
गांवोगांवींचे लोक ऐकती । तरी उद्धरगती त्यां होय ॥२०॥
चांगदेव सिद्धयोगी पूर्ण । ऐसें जाणती सर्वत्र जन ।
सन्निध आलिया ऐकून । सामोरे धांवून लोक येती ॥२१॥
पूजा पुरस्कार नानारीतीं । शिधा साहित्य समर्पिती ।
जे जे मनीं नवस कल्पिती । तरी मनोरथ पुरती तयांचें ॥२२॥
जैसी गंगा समुद्रासि जाती । तीरींचे गांव ते उद्धरती ।
स्नानें दानें जीवन सेविती । तरी पावन होती अनासायें ॥२२॥
तेवीं अविंधासि दाखवावया प्रचीत । बेदरासि चालिले वैष्णव भक्त ।
मार्गींचे लोक दर्शनासि येत । भुक्ति मुक्ति लाधत त्यांलागीं ॥२४॥
संतीं वसविले जे गांव । त्या क्षेत्रासि वैकुंठ नांव ।
तेथिंचे पाषाण गोटे सर्व । तेही देव म्हणावे ॥२५॥
श्रोतयांसि विनवी महीपती । सादर असोत श्रवणार्थी ।
जे गांवीं वस्ती केली भक्तीं । विख्यात त्रिजगतीं ते झाले ॥२६॥
लोहदंड क्षेत्रामाजी जाण । पुंडलीक नसता जरी निर्माण ।
तरी पंढरीस वैकुंठ म्हणते कोण । विचारोन पहा पां ॥२७॥
कुग्राम वस्ती अळंकापूर । तेथें अवतरलें श्रीज्ञानेश्वर ।
म्हणवोनि कार्तिक मासीं साचार । यात्रा फार भरते तेथें ॥२८॥
पुण्यस्तंभ गोदातीर निश्चित । चांगदेवें वस्ती धरिली तेथें ।
म्हणवोनि आषाढ शुद्ध एकदशीतें । समुदाय मिळते ते ठायीं ॥२९॥
देहुग्राम दिसतें लहान । ते स्थळीं तुकयाचा अवतार जाण ।
म्हणवोनि पंधरा दिवसां हरिदिनी कारणें । वैष्णव जन तेथें येती ॥३०॥
बोधला कुणबी वैष्णव निर्द्धारीं । अवतरला जो धरणीवरी ।
त्याणें धामणगांवाची केली पंढरी । चराचरीं हे वार्ता ॥३१॥
म्हणवोनि संतीं वसविले जे गांव । तयांसीच वैकुंठ ऐसें नांव ।
हें भाविक जाणती अनुभव । इतरांसि ठाव पडेना ॥३२॥
कलियुगीं महा तीर्थे सर्वही । लोकांच्या दुरितें भयभीत जीवीं ।
मागुती वैष्णवाचें गांवीं । वस्ती बरवी केली असे ॥३३॥
सरिता वोहळ वापीजीवनीं । कूप अथवा टांक्याचें पाणी ।
संत राहतील ज्या ठिकाणीं । तीर्थांसि अनुदिनीं तो ठाव ॥३४॥
संतांपासी विघ्न नये । आलें तरी निरसोनि जाय ।
सुदर्शन घेऊनि लवलाहें । रक्षी तो ठाय श्रीहरी ॥३५॥
ऐसा अनुपम त्यांचा महिमा । निरुपमासि कैंची उपमा ।
जिहीं चित्तीं धरोनि भक्ति प्रेमा । पुरुषोत्तमा वश्य केलें ॥३६॥
भक्तासि संकट पडतांचि जाण । निर्गुण देव तो होतसे सगुण ।
तत्काळ अरिष्ट निरसोन । रक्षी निर्विघ्न दासासी ॥३७॥
यास्तव देव भक्त एकचित्तें । समरस असती आपुल्या मतें ।
या देवाच्या आज्ञेनें निश्चित । चांगदेव जात बेदरा ॥३८॥
कानीं ऐकूनियां सत्कीर्ती । दर्शनासि मार्गींचे लोक येती ।
नमस्कार करोनियां प्रीती । पूजा समर्पिती सद्भावें ॥३९॥
शिधा साहित्य संतोष मनें । देऊनि ऐकती हरि कीर्तनें ।
भक्तीसी लाविले सकळ जन । खळ तेही लीन होताती ॥४०॥
जो जे कामना धरींत चित्तीं । त्याचे मनोरथ पूर्ण होती ।
पंथ क्रमितां ऐशा रीती । तों चरित्र ख्याती काय झाली ॥४१॥
मार्गीं चालतां साचार । वाटेसि होते एक नगर ।
सकळ जंगमांचा महंत थोर । वसे निरंतर ते ठायीं ॥४२॥
तो नाना साबरी मंत्र शिकोन । कपट विद्येंत जाहला निपुण ।
ज्याच्या गुरुनें आसन भारुन । त्या कारणें दीधलें ॥४३॥
कोणी सत्पुरुष घरासि आलिया । बैसावयासि देतसे तया ।
आसन अवचित उलटूनियां । उपरांडूनियां पाडीतसे ॥४४॥
शिष्यां सहित आपण ते वेंळीं । हांसोनि करीत एकदा आरोळी ।
ऐसी बहुतांची छळणा केली । मग चंद्रमौळी कोपला ॥४५॥
जैसा शिववरें मातला रावण । मग उन्मत्तपणें करी सीताहरण ।
मग मारुतीच्या रुपें कैलास रमण । दशानन विटंबिला ॥४६॥
मल्लिकार्जुन जंगम देख । असे शिवाचा उपासक ।
परी कपट विद्येचेनि मुखें । छळिले अनेक संत साधु ॥४७॥
हें चांगदेवें जाणोनि साचार । त्याच मार्गे चालिले सत्वर ।
म्हणती त्याचा गर्वाचा परिहार । श्रीविश्वंभर करील कीं ॥४८॥
चांगदेवाची सत्कीर्ति श्रवणीं । जंगमासि येऊनि सांगती कोणीं ।
म्हणती साधूनि अमृत संजवनी । विष्णुदास जनीं फिरतसे ॥४९॥
शिष्य संप्रदायी घेऊनि बहुत । बेदर नगरासि जाती त्वरीत ।
जंगमानें ऐकूनि हे मात । मग संतापत मानसीं ॥५०॥
उदयासि येतां रोहिणीकांत । तस्कर जळती मनांत ।
कां धर्माची कीर्ति ऐकूनि बहुत । कपट योजित दुर्योधन ॥५१॥
तेवीं चांगयाची सत्कीर्ति ऐकोन । चित्ती संतापला तो दुर्जन ।
तयाचे मठीं होता श्वान । त्याचें नामाभिधान पालटी ॥५२॥
चांगदेव म्हणवोनि कुतर्याप्रती । बोलावितसे दुर्मती ।
हें योगेश्वर जाणोनि चित्तीं । येत मठाप्रती तयाच्या ॥५३॥
टाळ मृदंग विणे सुस्वर । दिंड्या पताकांचें भार ।
कीर्तन करित वैष्णव वीर । नादें अंबरं कोंदलें ॥५४॥
तो घोष कानीं ऐकूनियां । चित्तीं संतापत असे अय्या ।
जेवीं विष्णुस्मरण कानीं पडिलिया । पिशाच भयाभीत होती ॥५५॥
गारुडियाची विद्या नाहीं बहुत । परी बिरुदें सर्वांगीं वागवित ।
विंचवाचे आंगीं विष किंचित । परी नांगी धरित खांद्यावरि ॥५६॥
तेवीं साबरी मंत्रांचेनि बळें । जंगम फुगला तये वेळे ।
चांगदेव आलियाही जवळ । नमन खळ तो करीना ॥५७॥
आदरें मारावा तो दुर्जन । ऐसे जाणती वैष्णव जन ।
चांगदेव अय्यासि म्हणे शरण । अहंता दुर्गुण टाकुनियां ॥५८॥
ऐसें जाणोनि दुराचारी । आसन देतसे निज करी ।
स्वमुखें म्हणे ते अवसरीं । बैसा यावरी सत्वर ॥५९॥
चांगदेव उमजले मानसीं । म्हणती याणें अपमानिलें बहुतांसी ।
आसन देऊनि बैसावयासी । तोंडघसीं पाडीतसे ॥६०॥
आम्ही पांडुरंगाचे म्हणवितों भक्त । कळिकाळ तेही झाले अंकीत ।
कांहीं चमत्कार दाखऊनि यातें । गर्वरहित करावा ॥६१॥
ऐसें कल्पोनि ते अवसरी । विभूति फुंकिली आसनावरी ।
तंव तें आकाशामाजी अधांत्री। वरिच्या वरी जळतसे ॥६२॥
हें जंगमा देखूनि नयनीं । गडबडां लोळों लागला धरणीं ।
म्हणे आसनाचेनि बळें करुनी । महत्त्व जनीं भोगीतसे ॥६३॥
तें जळोनि जातां ये अवसरीं । पोट भरेल कैशापरी ।
मग चांगदेवासि नमस्कारी। मधुरोत्तरीं बोलतसे ॥६४॥
म्हणे हें गुरुप्रसादाचे आसन । दैवें लाधलें मजकारणें ।
सर्वथा यासि न लावी अग्न । म्हणवोनि चरण धरियेले ॥६५॥
जैसा खदिरांगार निर्धारीं । आरक्त दिसतसे आंधारीं ।
सूर्यकिरण पडतांचि वरी । कोळशाचेपरी होतसे ॥६६॥
तेवीं कृत्रिम विद्येचा अभिमान । जल्पत होता मल्लिकार्जुन ।
चांगयाचें सामर्थ्य देखोन । झालासे लीन तत्काळ ॥६७॥
योगेश्वराचे धरोनि चरण । म्हणे सर्वंथा जाळूं नको आसन ।
ऐसी त्याची ग्लानी ऐकोन । करिती विंदान काय तेव्हां ॥६८॥
विभूति फुंकोनि ते वेळीं । आसन पाडिलें भूमंडळीं ।
अग्नि विझविला तत्काळीं । हेचि नव्हाळी अनुपम ॥६९॥
तंव अय्या म्हणतसे योगेश्वरा । माझा आश्रम पवित्र करा ।
स्वयंपाक करुनि ये अवसरा । भोजन सारा मठांत ॥७०॥
जाणोनि पुढिला कार्यार्थ । अवश्य म्हणे विष्णुभक्त ।
जंगमें संप्रदायासि सांगोनि तेथ । शिधा साहित्य देवविलें ॥७१॥
चांगदेव म्हणोनि नामाभिधान । ज्या श्वानासि वाहत होता दुर्जन ।
मग शिष्यांसि लवलाही सांगोन । ठेवीत लपवोन तळघरीं ॥७२॥
म्हणे यासि कळता लवलाहीं । आणिक विंदान करील कांहीं ।
ऐसे भय पावोनि जीवीं । श्वान ते समयीं लपविले ॥७३॥
चांगदेव म्हणती आय्यातें । तुम्हीही स्वयंपाक करावा त्वरित ।
एका पंक्तीस यावें येथें । अवश्य म्हणता मल्लिकार्जुन ॥७४॥
दोहोंकडील पाक निष्पत्ती । सिद्ध होतां यथास्थिती ।
चांगदेव नैवेद्य वैश्वदेव करिती । पात्रें वाढिती आचारी ॥७५॥
पंच शत जंगम लिंगाईत । अय्याचे पंक्तीस भोजना येत ।
चांगयाच्या समागमे सहस्त्रावर । यात्रा निश्चित पैं असे ॥७६॥
स्वयंपाक होतांचि दोहींकडे । पंक्ती बैसल्या निज निवाडे ।
जीव मात्रासि वाढितील कोडें । पशुपक्ष्यांसि ठेविलें अन्न तेव्हां ॥७७॥
चांगदेव अय्यासि बोलत वाचा । नैवेद्य वैश्वदेव जाहला आमुचा ।
आतां शिव सोडूनि दंडींचा । प्रारंभ पूजेचा तुम्ही करा ॥७८॥
अवश्य म्हणोनि लिंगाईत । वस्त्रें सोडूनि पाहती समस्त ।
तों एकाचेंही लिंग नाहीं तेथें । आश्चर्य करिती मग तेव्हां ॥७९॥
मग मल्लिकार्जुन गुरुसि त्वरित । येऊनि सांगती वृत्तांत।
म्हणती आम्हांवर क्षोभोनि निश्चित । कैलासनाथ पळाला ॥८०॥
मूर्ति बैसल्या पांच शत । परी लिंग नसेचि कोणांत ।
हा तों अघटित वृत्तांत । सद्गुरु समर्थ सांगिजे ॥८१॥
मल्लिकार्जुन म्हणे गेलिया शिव । तुम्हीं कासया ठेवीला जीव ।
शास्त्री ऐसाचि असे भाव । तरी प्राण सर्वीं द्यावा आतां ॥८२॥
शिष्य म्हणती सद्गुरुनाथा । आम्हांसि शास्त्र निर्णय सांगतां ।
तुम्हीं आपुलें लिंग पाहा आतां । वल्गना वृथा न करावी ॥८३॥
दुसर्यासि सांगोनि ब्रह्मज्ञान । जो आड मार्ग चाले आपण ।
तो ऐहिक परत्रांसि मुकोन । रौरव पूर्ण भोगीतसे ॥८४॥
मल्लिकार्जुन वस्त्र सोडून पहात । तों लिंग दिसे रुमालांत ।
मग मनीं होऊनि परम लज्जित । विनंती करीत चांगदेव ॥८५॥
त्या मंडळी सहित आपण । सत्वर करावें भोजन ।
आम्हांवरी क्षोभोनि पार्वतीरमण । कैलासभुवन पावला ॥८६॥
ऐकोनि म्हणती योगेश्वर । तुम्हां पासूनि पडिलें अंतर ।
मठांतील कोणी जीव मात्र । क्षुधातुर ठेऊं नये ॥८७॥
चांगया श्वान तुमचें घरीं । अखंड बैसत होता द्वारीं ।
तयासि लपविलें तळघरीं । यास्तव स्मरारी कोपला ॥८८॥
लिंग रुप धरित्री हे समस्त । शिव रुप हें विश्व दिसत ।
तरी लपवोनि ठेवितां श्वानातें। कारण कोणतें मज सांगावें ॥८९॥
चांगया श्वान चोरटा थोर । त्याणेंचि गिळिलीं लिंगें समग्र ।
तयासी काढावें बाहेर । इतुकें उत्तर बोलिले ॥९०॥
ऐकोनि चांगदेवाचि वाणी । लिंगाईंत विस्मित झाले मनीं ।
म्हणती अंतरसाक्ष हा वैष्णवमुनी । चक्रपाणी अवतरला ॥९१॥
मग तळघरांतून सत्वर । श्वानासि आणिती बाहेर ।
केशवदास येऊनि सत्वर । त्यासी उत्तर बोलती ॥९२॥
शिष्यासहित हा महंत । जाहला असे लिंगारहित ।
तीं तुवां गिळलीं असती निश्चित । चांगया त्वरित ती देई ॥९३॥
ऐसी ऐकतांचि मात । कौतुक वर्तलें अद्भुत ।
श्वानानें मुख करुनि वरुतें । लिंगें समस्त वोकिला ॥९४॥
हें कौतुक देखोनि अत्यद्भुत । लिंगाईत अवघे झाले लज्जित ।
मग ते आपुलालीं लिंगें ओळखुनि घेत । नमस्कारित चांगदेवा ॥९५॥
म्हणती लीला अवतारी तूं वैष्णव पूर्ण । आमुचें केलें गर्वहरण ।
लिंगें गिळोनि वोकिली श्वानें । अत्यद्भुत विंदान दाखविलें ॥९६॥
ऐशापरी करोनि स्तुती । मग शिवपूजा जंगम करिती ।
आधीच पात्रें वाढिली होतीं । मग नैवेद्य दाखविती सकळिक ॥९७॥
ध्यानांत आणूनि पाडुंरंग मूर्ती । चांगदेव संकल्प सोडती ।
भोक्ता विश्वंभर वैकुंठपती । प्राणाहुती घेतलिया ॥९८॥
जें जें जयासि रुचे जैसें । पात्रीं वाढून आणिती तैसें ।
पशु पक्षि पिपीलिकांस । अन्न सर्वास वाढिलें ॥९९॥
उभयतां महंत एके पंक्तीं । मंडळी सहित तृप्त होती ।
कर शुद्धी घेतां समस्तीं । आसनीं बैसती चांगदेव ॥१००॥
जंगमें विडे आणूनि सत्वर । सकळांसि देतसे आपुल्या करें ।
बुका तुळसी घालूनि हार । योगेश्वर पूजिला ॥१॥
चांगदेव म्हणती मल्लिकार्जुना । आम्हांसि जाणें बेदर पट्टणा ।
आतां सावध होऊनि आपुल्या मना । कोणाची छळणा न करावी ॥२॥
आपुले आंगीं महंतपण । आलिया सर्वासि लीन होणें ।
एकात्मता भूतीं पाहणें । तरीच धन्य संसारीं ॥३॥
भूत मात्रीं अन्नदान । देऊनि करावें क्षुधाहरण ।
मी दाता हा गर्व वाहणें । तरीच धन्य संसारीं ॥४॥
शिष्य करिती आपुलें सेवन । परी तयांसि मानिजे देवा समान ।
पूज्य पूजक नसावी आठवण । तरीच धन्य संसारीं ॥५॥
संसारिक पाळिती आपुलें वचन । तरी आशीर्वाद द्यावें त्यां लागुन ।
सर्वथा शापोत्तर न बोलणें । तरीच धन्य संसारीं ॥६॥
ऐसी चांगयाची वचनोक्ती । ऐकोनि अय्या संतोष चित्तीं ।
म्हणे स्वामींनीं सांगीतली जैसी रीती । तैसेची स्थितीं वर्तेन मी ॥७॥
परी मजवर असावा कृपाकर । ऐसेंच इच्छितों निरंतर ।
ऐसें बोलोनियां उत्तर । मग चरणांवर लोटला ॥८॥
चांगदेव उठोनि लवलाहीं । उचलूनि मल्लिकार्जुन धरिला हृदयीं ।
निरोप मागोनि ते समयीं । बेदरासि सर्वही चालिले ॥९॥
सत्समागमाचा महिमा । खळासि तत्काळ येतसे प्रेमा ।
निरुपमासि कैचीं उपमा । जिहीं पुरुषोत्तमा वश केले ॥११०॥
संत तेचि देव जाण । दोघांत नाहीं भेदभाव ।
सावध करावयासि जन । झाले सगुण अवतारी ॥११॥
राज्यमदें अविंध खळ । उन्मत्त जाहला अज्ञान बाळ ।
विध्वंसिलें पंढरींचें देउळ । मसीद तत्काळ ते केली ॥१२॥
त्याचा गर्ग हरावयासि पाहीं । चांगदेव चालिले तये ठायीं ।
बेदरासि आले मध्यान्ह समयीं । तेथें सरोवराचे ठायीं उतरले ॥१३॥
स्नान संध्या करोनि तेथें । नित्य नेम सारिले समस्त ।
उपहार करोनि किंचित । मग प्रारंभ करीत कीर्तनासी ॥१४॥
दिंडया पताका उभारोनि सत्वरी । टाळ विणे मृदंग मेळविती सुस्वरी ।
कीर्तन मांडिलें ते अवसरीं । सप्रेम गजरीं नामाच्या ॥१५॥
कृष्ण विष्णु हरि गोविंदा । अच्युतानंत आनंदकंदा ।
परम पुरुष सच्चिदानंदा । श्रीमुकुंदा जगद्गुरु ॥१६॥
ऐशा रीतीं करोनि स्तुति । गुण चरित्रें वैष्णव गातीं ।
ब्रह्मानंद सोहाळा ते क्षितीं । लोक मिळती ऐकावया ॥१७॥
चांगयाच्या समागमें फार । यात्रा असे सहस्त्रावर ।
आणिक नगरवासी भाविक नर । मिळाले समग्र ते ठायीं ॥१८॥
टाळ विणे मृदंग घोष । नादब्रह्म कोंदला रस ।
कीर्तन ऐकतां श्रोतयांस । प्रेम उल्हास अंतरीं ॥१९॥
तों राजद्वारींचा जोशी सज्ञान । परम भाविक वैष्णव जन ।
अकस्मात तेथें येऊन । केलें नमन चांगदेवा ॥१२०॥
कीर्तन जाहलें एक प्रहर । तोंवरी तेथें बैसला स्थिर ।
मग आरती म्हणोनि वैष्णवीरें । रुक्मिणीरमण वोवाळिला ॥२१॥
प्रसाद वाटोनि खिरापति । चांगदेव आसनीं स्वस्थ बैसती ।
तंव जोशी म्हणतसे तयाप्रती । माझी विनंति अवधारा ॥२२॥
अविंध राजा बेदर पट्टणीं । अति उन्मत्त कुलक्षणी ।
त्याणें देवस्थानें बहुत मोडूनी । मसीदी रचोनी ठेविल्या ॥२३॥
श्रीहरि कथा पुराण श्रवण । देखोनि वैष्णवासी करी दंडण ।
हिंदुधर्म सकळ मोडून । अपसव्य तेणें स्थापिला ॥२४॥
श्रीपांडुरंगाचेंही देऊळ । मोडूनि मसीद बांधिली खळें ।
तेथें कोणाचेंचि न चले बळ । मग देव तत्काळ लपविला ॥२५॥
हा तुम्हांसि वृत्तांत असेल विदित । तरी या स्थळीं यावयाचें नाहीं उचित ।
राजयासि कळतां वृत्तांत । विटंबना बहुत करील तो ॥२६॥
यवनाचें आज्ञेनें ये ठिकाणीं । मृदंग ढोल न वाजविती कोणी ।
आणि तुमचें दंभ देखता नयनीं । संताप मनीं वाटेल ॥२७॥
बेदराचिया सन्निध येतां । तुम्हांसि उपद्रव केला असतां ।
परी रायासि दुःख जाहलें तत्वता । यास्तव चिंताक्रांत मनीं ॥२८॥
वार्ता ऐकोनि ऐसी । चांगदेव पुसती जोशियासी ।
काय दुःख जाहलें रायासी । तें साकल्य आम्हांसी सांगावें ॥२९॥
ब्राह्मण म्हणे ते अवसरीं । रायाची आवडती कांता सुंदरी ।
तीस सर्प डसलियावरी । उदंड धन्वंतरी आणिले ॥१३०॥
परी कोणाचा उपाय नचले निश्चित । प्राण जाऊन पडलें प्रेत ।
मग पोट चिरोनि त्वरित । सुगंध द्रव्यें आंत भरियेली ॥३१॥
डोलींत प्रेत घालूनि सत्वर । उदईक रोजास पाठविणार ।
यास्तव राजा चिंतातुर । गेलें प्रीतिपात्र तयाचें ॥३२॥
ऐसा वृत्तांत ऐकोनि श्रवणीं । चांगदेव म्हणती तये क्षणीं ।
तुम्ही रायासि सांगा जाऊनि । प्रेत उठवून मी देतों ॥३३॥
जो पाडुंरंग कैवल्यदानी । षड्गुण ऐश्वर्याची खाणी ।
त्याणें मज प्रसन्न होऊनी । संजीवनी मंत्र दीधला ॥३४॥
त्याच्या सामर्थ्ये करुनि निश्चित । मृत प्रेतही होईल जिवंत ।
तुम्हीं रायासि सांगीजे वृत्तांत । कीं आला विष्णुभक्त ये ठायीं ॥३५॥
ऐसें वदतांचि योगेश्वर । संतोषला तो द्विजवर ।
मग राजद्वारासि जाऊनि सत्वर । सकळ समाचार सांगतसे ॥३६॥
म्हणे भाग्य तुझें अति विशेष । म्हणोनि पातला सिद्ध पुरुष ।
चौदाशें वर्षे जाहली त्यास । परी तो काळास नागवे ॥३७॥
आजि दैवयोग अकस्मात जाण । ये स्थळीं तयासि झालें येणें ।
मृत प्रेत उठवितों म्हणोन । मजसी वचन बोलला ॥३८॥
राजा म्हणे ब्राह्मणासी । त्याजला आणावें आम्हांपासीं ।
जरी माझी स्त्री उठवितां त्यांसी । तरी मागेल तें त्यासी देऊं ॥३९॥
ऐसें सांगताचि नृपवर । तेथूनि निघाला द्विजवर ।
चांगयापासीं येऊनि सत्वर । करीत नमस्कार सद्भावें ॥१४०॥
वृत्तांत सांगोनि सत्वरी । म्हणे स्वामी चलावें तेथवरी ।
चांगदेव निघाले सहपरिवारीं । कीर्तन गजरीं डुल्लती ॥४१॥
टाळ विणे मृदंग सुस्वरें । वैष्णव गाती विष्णु चरित्रें ।
नाद घोषें कोंदलें अंबर । जयजयकार करिताती ॥४२॥
ऐशा रीतीं ते अवसरीं । चांगदेव पातले राजद्वारीं ।
रायें सन्मान केला नानापरी । नमस्कार न करी सर्वथा ॥४३॥
म्हणे हा तों हिंदु फकीर निश्चित । दांभिक ढोंग दिसतें बहुत ।
कैसें उठवील मृत प्रेत । संशय वाटत मानसीं ॥४४॥
ऐसें जाणोनि चांगदेव । म्हणे आम्ही निधडे भक्त वैष्णव ।
आणि नमस्कार न करितां राव । तरी कैसा देव यासि पावे ॥४५॥
सर्वोपचारे पुजिला ईश्वर । आणि शेवटीं न केला नमस्कार ।
तरी संतुष्ट न होय रुक्मिणीवर । शास्त्री विचार हा असे ॥४६॥
योगयाग पूजा अर्चन । कांहींच न घडे ज्या कारणें ।
आणि एक सद्भावें केलें नमन । तरीं अवधींच पुण्यें त्यांत आलीं ॥४७॥
स्नान संध्या आणि तर्पण । वेदाध्ययन पुराण श्रवण ।
न घडतां करी देवासि नमन । तरी अवधींच पुण्यें त्यांत आलीं ॥४९॥
नमन हेंचि साधन अपूर्व । नमनें कळो येतसे भाव ।
नमन हाचि सुगम उपाय । देवाधिदेव प्राप्तीसी ॥१५०॥
नमनासी कांहींच खर्च नसे । दुर्बळा अनाथा अनुकूळ असे ।
नमना येव्हडें पुण्यचि नसे । करितसे नाश अहंतेचा ॥५१॥
सद्गुरु उपदेश घेतां जाण । अर्पिजें तनु मन आणि धन ।
शेवटीं न करितां साष्टांग नमन । तरी व्यर्थचि साधन तें जाय ॥५२॥
नमनावीण न जोडे भक्तीं । नमनावीण न घडेचि मुक्ती ।
ऐसें असतां यवन दुर्मती । अहंता चित्तीं धरीतसे ॥५३॥
तरी याचा भाव बैसेल जेणें । आणि वैष्णव मंडळीस करील नमन ।
ऐसें दाखवावे विंदान । तरीच कल्याण होय यासी ॥५४॥
ऐसें म्हणोनि योगिनाथ । अधांत्रींच घातला हात ।
मूठभर घेऊनि विभूत । आपले मंडळींस लावितसें ॥५५॥
तों कौतुक वर्तले ते अवसरीं । तें सादर ऐकिजे भक्त चतुरीं ।
भस्म उधळितां सर्वांवरी । तों रुप सत्वरीं पालटलें ॥५६॥
चांगदेव मंडळीसह परिवार । हिंदुसि दिसती वैष्णव वीर ।
आणि यवन राजाच्या दृष्टी समोर । पीर पैगंबर भासती ॥५७॥
जैसा लीलावतारी श्रीकृष्ण । यशोदेसि वाटे बालक तान्हे ।
आनी राधेंसि दिसें पुरुष तरुण । जैसा कां मदन या रीतीं ॥५८॥
नातरीं परब्रह्म म्हणितले वेदांतीं । ते भक्तासि दिसे सगुण मूर्ती ।
ज्ञानियांसि निर्गुण भासे चित्तीं । द्विविध आकृती होतसे ॥५९॥
तैशाच रीतीं चांगदेव । हिंदूंसि भासती वैष्णव ।
आणि यवनासि दिसती पैगंबर सर्व । हेंचि अपूर्व मज वाटे ॥१६०॥
मग राजा अनुतापोनि चित्तांत । म्हणे हें आमुचें कुळदैवत ।
म्हणोनि साष्टांग दंडवत । चांगयासि घालित निजप्रीतीं ॥६१॥
मग रायासि म्हणती तये क्षणीं । प्रसन्न जाहलों लागुनी ।
काय इच्छा असेल मनीं । ते याच क्षणीं सांगावी ॥६२॥
परोकारार्थ निश्चितीं । मी विष्णुभक्त अवतरलों क्षिती ।
काय कामना असेल चित्तीं । ते सत्वरगती सांग पा ॥६३॥
ऐसें पुसतां योगेश्वर । राजा विनवीत जोडूनि कर ।
माझी कांता पावली परत्र । ते उठवीं सत्वर स्वामिया ॥६४॥
आवडती ज्येष्ठ पत्नी निश्चित । सर्प डसतां पावली मृत्य ।
आंतडी काढोनि झांकिलें प्रेत । सुगंध पोटांत भरोनियां ॥६५॥
तेव्हडी जिववाल ये अवसरीं । तरी मी सुखसंपन्न संसारीं ।
ऐसे म्हणोनि चरण धरी । ग्लांती करी नृपनाथा ॥६६॥
मागें प्रसन्न होऊनि रुक्मिणीवर । संजीवनी दीधला मंत्र ।
तो उच्चारुनि योगेश्वर । विभूति सत्वर दे राया ॥६७॥
म्हणे हें भस्म प्रेताचें भाळीं । लावोनि सर्वांगासि चोळी ।
श्रीहरि कृपेनें ये वेळीं । उठोनि तत्काळीं बैसेल ॥६८॥
राजा उठोनि लवलाहीं । सत्वर गेला अंतर गृहीं ।
प्रेताच्या सर्वांगासि लावी । तों अपूर्व कांहीं वर्तलें ॥६९॥
एकाएकीं हाक देऊनी । उठोनि बैसे राजपत्नी ।
यवन बुझावीत तिज लागुनी । परी भ्रमिष्ट मनीं न बोले ॥१७०॥
जिवंत जाहली हें समाधान । भ्रमिष्ट म्हणोनि उद्विग्न मन ।
ऐसा दुश्चित्त तो यवन । चांगयासि येवोन सांगतसे ॥७१॥
म्हणे प्रेतांत संचारला प्राण । परी सर्वथा नसे देहभान ।
यासि उपाय करावा कवण । कृपा करुन मज सांगा ॥७२॥
मग चांगदेव रायासि बोंलती वचन । तिजला पुसा ऐसें जाऊन ।
कीं इच्छित मागावें वरदान । तें मी पुरवीन निश्चित ॥७३॥
ऐसें सांगतां योगेश्वर । राजा पुढती जाय मंदिरां ।
मंचकावरी बैसली दारा । तिसी सत्वर पुसतसे ॥७४॥
म्हणे काय इच्छा असेल मनीं । ते मी पुरवीन येच क्षणीं ।
भ्रताराचें वचन ऐकूनि कानीं । सावध होऊनी बोलतसे ॥७५॥
म्हणे माझे जेणें परतविले प्राण । त्यासी अनन्यभावें जाईन शरण ।
ते जें मागतील तें सत्वर देणें । तरी वाचेन मी आतां ॥७६॥
कांतेचें वचन ऐकून देख । रायें तत्काळ दीधली भाक ।
मग येवोनि चांगदेवा सम्यक । नमस्कार सुखें घालीतसे ॥७७॥
म्हणें पूर्ववत सावध झाली कांता । जे इच्छा असेल तें मागिजे आतां ।
तुम्हीं ईश्वरी अंश तत्वता । ऐसें समर्था मज कळले ॥७८॥
हिरे मुक्ताफळ रत्नें कांहीं । द्रव्य राशीही पुढें ठेवी ।
तव चांगदेव हांसोनि ते समयी । रायासि कायी बोलत ॥७९॥
आम्ही निरपेक्ष वैष्णव जन । द्रव्यराशी मृत्तिके समान ।
सर्व सिद्धी अनुकूळ पूर्ण । कांहींच उणें असेना ॥१८०॥
राजा म्हणे ये समयीं । आणिक आज्ञा करावी कांहीं ।
ऐकूनि वटेश्वर ते समयीं । उत्तर कायी करीतसे ॥८१॥
पुरातन क्षेत्र पंढरपूर । तेथें साक्षात असे इंदिरावर ।
बडवे तयाचे भुजावर । त्यांसी नानाप्रकारें छळिलें त्वां ॥८२॥
देवालय मोडोनि सत्वरी । मसीद बांधली महाद्वारी ।
हिंदु धर्म वर्जूनि सत्वरी । अधर्म भारी वाढविला ॥८३॥
तुमचा तिकडील ठाणेदार । त्यासि आमुच्या हातें लिहावें पत्र ।
कीं मशीद मोडूनियां सत्वर । बांधिजे शिखर देवाचें ॥८४॥
ऐसें सांगतां विष्णु भक्त । लेखका हातीं पत्र लिहवित ।
आपुल्या मुद्रा करित । घालूनि शपत तया माजी ॥८५॥
आणिक पुढें यवन दुर्मती । क्षेत्रासि उपद्रव न करिती ।
ऐसें पत्रीं आपण लिहितां दुर्मती । लखोटा घेती चांगदेव ॥८६॥
बेदरींचे कारेगार चार शत । घेऊनि अघटित केली युक्त ।
सर्वांचे कपाळीं लावूनि विभूत । मग विहंगम पंथें चालिले ॥८७॥
दोन प्रहरां येतांचि दिनकर । पावले क्षेत्र पंढरपुर ।
विठ्ठल नामें गर्जोनि सत्वर । जयजयकार करिताती ॥८८॥
क्षेत्रींचे लोक ठायींठायीं । चिंतातुर होते आपुले जीवीं ।
तों अकस्मात भक्तविजयी । आला सर्वांही ऐकिलें ॥८९॥
म्हणती चांगदेवें दाखवूनि चमत्कार । यवना पासोनि आणिलें पत्र ।
कीं मसीद मोडोनि साचार । देवालय सत्वर करावें ॥१९०॥
ऐसीं मात ऐकूनि कानीं । क्षेत्रवासी आनंदले मनीं ।
चांगयासि भेटती येऊनी । आनंद मनीं न समाय ॥९१॥
जयजयकारें पिटोनि टाळी । आनंदली भक्त मंडळी ।
म्हणती चांगदेव महापुरुषार्थी बळी । जिंकिला कळिकाळ येणें ॥९२॥
पुढिले अध्यायीं कथासार । वदविता श्रीरुक्मिणीवर ।
महीपति ग्रंथाधारें । प्रसाद उत्तर लिहितसे ॥९३॥
स्वस्ति श्रीभक्तलीलामृतग्रंथ । श्रवणेचि पुरती मनोरथ ।
प्रेमळ परिसोत भाविक भक्त । नवमोध्याय रसाळ हा ॥१९४॥अ० ॥९॥ओव्या॥१९४॥६॥