मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ३

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशायनमः ।

निजभक्त कथा करितां श्रवण । तरी सकळ तीर्थांचें घड स्नान ।

तेथें पर्वकाळही संपूर्ण । कर जोडून तिष्ठति ॥१॥

सत्पात्रीं दानें बोललीं पाहीं । श्रवणमात्रें घडती तींही ।

नाना उपचारें शेषशायी । सर्व वैभवीं पूजिला ॥२॥

जे भक्त कथा ऐकती भावें । तयांसि सत्कर्मे घडलीं सवें ।

योग तपें यांचेचि नांवें । श्रवणीं बैसावें एकनिष्ठ ॥३॥

श्रवण झालिया होय मनन । मनना पाठीं निदिध्यासन ।

मग साक्षात्कारासि येऊन । होय विज्ञान साधकां ॥४॥

नवविधा श्रीहरीची भक्‍ती । परी श्रवण वरिष्ठ सर्वांत म्हणती ।

शुकमुखें भागवत ऐकतां प्रीतीं । तरला परीक्षिती नृपराज ॥५॥

मागिले अध्यायीं कथा गोमटी । चांगदेवाचे शिष्य कपटी ।

त्यांनीं वाळूवर पालथी घातली वाटी । झाला धूर्जटी साक्षात ॥६॥

चांगयाचे भक्‍तीस्तव पाहे । वाटीचा ईश्वर जाहला आहे ।

मग चांगावटेश्वर नांव पावलाहे । दर्शनेंचि होय मुक्‍त प्राणी ॥७॥

आसनीं शयनीं साचार । ध्यानीं मनी वटेश्वर ।

स्वप्न सुषुप्ति जागर । विसर क्षणभर असेना ॥८॥

विधियुक्त अर्चन निश्चित । त्रिकाळ करी यथास्थित ।

यात्रा येतसे नित्यानित्य । दर्शन घेती शिवाचें ॥९॥

यावरी चांगदेवाचें मनीं । हेत उपजला तयेक्षणीं ।

चौदा विद्या अभ्यास करुनी । चमत्कार नयनीं पाहावा ॥१०॥

जो का योगभ्रष्ट स्वर्गवासी । शापें उतरला भूलोकासी ।

तयासि अभ्यास करावयासी । कष्ट सायासीं न लागती ॥११॥

निमित्तमात्र व्हावया कारण । जो ग्रंथ पाहे विलोकून ।

तो मुखोद्गत होय संपूर्ण । वरदें करुन शिवाच्या ॥१२॥

त्या चौदा विद्या कोणकोण । ऐसें आशंकित होईल मन ।

तरीं हें ऐकावया संपूर्ण । गजानन मूळ ज्याचें ॥१३॥

प्रथम विद्या सुभाष्ययुक्‍त । श्रुति अभ्यास केला समस्त ।

चार्‍ही वेद मुखोद्गत । अंगिरा सुत ज्या परी ॥१४॥

दुसरी सारविद्या ते कवण । न्याय आणि व्याकरण ।

षट्‌शास्त्रेंही चांगयानें । निज प्रीतिनें अभ्यासिलीं ॥१५॥

तिसरी विद्या म्हणजे गणक । भूगोळ उतरावा तात्काळिक ।

भूत भविष्य सांगतां कवतुक । तें ज्योतिष लटिकें न होय ॥१६॥

चौथी विद्या रसक्रिया थोर । ज्यालागीं धन्वंतरि अवतार ।

महारोग परिहार । चिकित्सासर त्यातें म्हणती ॥१७॥

पांचवें म्हणजे नाडी ज्ञान । रोगाची परीक्षा कळे त्याणें ।

धातुपुष्ट किंवा क्षीण । पाहोनि देणें औषध ॥१८॥

साहावी धनुर्विद्या निर्धारीं । बोलिली असे शास्त्राधारीं ।

अस्त्रें अस्त्रनिवारण करी । निवडोनि वैरी मारावे ॥१९॥

आठवें तें कामशास्त्र जाण । अवलोकिलें चांगयानें ।

त्याचा अनुभव सकळां कारणें । नलगे सांगणें सर्वथा ॥२०॥

नृत्य कला संगीत सकळ । अवसान दावितां न चुकेचि ताल ।

घागर्‍या वजवोनि दावणें मंजुळ । तेंही सकळ अभ्यासी ॥२१॥

साहा राग छत्तीस भार्या । एकवीस मूर्छनांचिया क्रिया ।

ही दाहावी विद्या अभ्यासुनियां । गायन चांगया करीतसे ॥२२॥

जैसे क्षितीवर चालती नर । तैसेंचि वागावें उदकावर ।

हेदमविद्या अकरावी थोर । तीही सत्वर अभ्यासिली ॥२३॥

परकाया प्रवेश करणें । त्याचाही अभ्यास केला पूर्ण ।

वस्तु मात्राची परीक्षा घेणें । मनींची खूण जाणावी ॥२४॥

ह्या तेरा विद्या अभ्यासोनि थोर । निजांगे पाहिला चमत्कार ।

तेणें जनांत प्रशंसा वाढली फार । परोपकार दाखवितां ॥२५॥

चौदा विद्या दाविते वज्रासन । योग अभ्यासीं लाविजे मन ।

त्याचाही अभ्यास करुन । षटचक्रें जाण भेदिलीं ॥२६॥

योग संपूर्ण झालिया त्यासी । मग अष्टसिद्धि वोळंगल्या दासी ।

जे जे इच्छा धरितां मानसी । ते ते अनायासीं होऊनि ये ॥२७॥

ह्या चौदा विद्या चौसष्ट कळा । अवगत असल्या जरी सकळा ।

परी चित्तीं नसली एक प्रेम कळा । तरी त्या विकळा अवघ्याची ॥२८॥

सकळ औषधी परिकर । अभ्यासें जोडतील सत्वर ।

परी दुर्लभ अमृत तुषार । प्रेतासि साचार जीववीजो ॥२९॥

तैशाचि कळा चौसष्ट । अभ्यासितां जोडती स्पष्ट ।

परी भक्ति प्रेमायां वरिष्ठ । जेणें वैकुंठपीठ वश्य होय ॥३०॥

त्या सकळ विद्या चांगयानें । अभ्यासिल्या नीज प्रीतीनें ।

परी एकल्या आत्मज्ञानेंविण । निष्फळ शून्य अवघेंची ॥३१॥

पुढें ज्ञानदेवाची होतां भेटी । ते कळा साधेल गोमटी ।

परी प्रस्तुत आतां जी वर्तली गोष्टी । तो कर्णपुटीं ऐकावी ॥३२॥

सिद्धाई प्रख्यात होतां जाण । यात्रेस येती बहुत जन ।

म्हणती शिवाचा अवतार पूर्ण । चांगदेव निधान मृत्युलोकीं ॥३३॥

ज्याचे भक्‍तीस्तव साचार । वाटींत प्रगटला ईश्वर ।

छप्पन्न देशी साचार । कीर्ति सत्वर प्रगटली ॥३४॥

तपती चांगदेवाची क्षिती । लोक दुरुन यात्रेस येती ।

जो जे कामना धरी चित्तीं । ती पूर्ण होई तात्काळ ॥३५॥

ज्याची जैसी भावना चित्तीं । ते दर्शनें मनोरथ पूर्ण होती ।

अंधास नेत्र तत्काळ येती । बधिर ऐकती कर्णद्वारें ॥३६॥

गलित कुष्ट कोणाप्रती । त्याचीही होय सुंदर कांती ।

वांझ स्त्रिया दर्शनासि येती । त्या पुत्र लाधती तत्काळ ॥३७॥

वटेश्वराच्या दर्शनें साचार । दुर्बळ होती सावकार ।

म्हणती ऐसा सिद्धपुरुष थोर । नाही साचार मृत्युलोकी ॥३८॥

भाविक लोक असती कोणी । चांगदेव जपताती निशिदिनीं ।

महादोषाची होतसे धुणी । सबंध पळोनि जाय मग ॥३९॥

चांगा वाटेश्वर प्रगटला सिद्ध । यात्रा भरतसे नानाविध ।

देव ऋषिमुनि प्रसिद्ध । येती स्वछंदें दर्शना ॥४०॥

ब्राह्मण शूद्र नाना याति । वैश्य क्षत्रिय दर्शना येती ।

अठरा वर्ण तेही मिळती । विस्तारें किती सांगावें ॥४१॥

आणि पृथ्वीपती मांडलिक । सर्व साहित्य घेऊनि देख ।

येऊनि वटेश्वरा सम्यक । पाहती कौतुक दृष्टीसी ॥४२॥

पहा सिद्धीचा कामनिक महिमा । आणि द्यावया नाहीं उपमा ।

विषयी जनांचा लागला प्रेमा । आपुलाल्या प्रेमा एक येती ॥४३॥

टाळ विणे मृदंग घोष । दिंडया पताका बहुवस ।

कीर्तन करिती हरीचे दास । नाद ब्रह्ममुखें आणूनिया ॥४४॥

शतएक वर्षे पाही । ऐसी वाढली सिद्धायी ।

तों देहास काळ आलिया पाही । ज्ञान दृष्टी तिही जाणीतले ॥४५॥

मग चांगदेवें मांडिली युक्त । आत्मा ब्रह्मांडासि नेला त्वरित ।

शरीर दिसतसे काष्टवत । हें लोक समस्त पाहती ॥४६॥

दशमद्वारीं नेऊनि समीर । ते ठायीं केला स्थिर ।

अचेतन देह सर्वत्र । श्वास अणुमात्र तो नये ॥४७॥

नव दिवस ऐशारीती । लोटूनि गेल्या तितुक्याच राती ।

काळाची घंडी निघूनि जाती । तो काळ मागुती फिरविला ॥४८॥

शिष्य संप्रदायिक बहुवंस । शरीर रक्षितां रात्रंदिवस ।

तो अकस्मात श्वासोछ्‌वास । येताच उल्हास तयासी ॥४९॥

निद्रिस्त जैसा होय जागृत । तैसाचि चांगल्या देहावर येत ।

ऐसें कौतुक देखोनि तेथ । आश्चर्य करीत लोक तेव्हां ॥५०॥

मग पूर्ववत जैशा रीतीं । सिद्धायीची वर्ते स्थिती ।

तैसाच दाखवीतसे पुढती । आश्चर्य करिती लोक तेव्हां ॥५१॥

शतायुष्य पुरुषाकारणें । कलियुगामाजी असे जाण ।

ऐसें वेदवचन प्रमाण । तें असत्य जाण होऊं नेदी ॥५२॥

शत वर्षे होतांचि निश्चित । चांगदेव दुसरे स्थळी राहत ।

तेथेंही यात्रा असे भरत । दर्शना येत जनलोक ॥५३॥

एक संवत्सर लोटल्यावरी । मागुतीं येतसे तापींतीरीं ।

तेथें वटेश्वराची सर्वोपचारीं । पूजा करी एकनिष्ठ ॥५४॥

शतवर्षे भरतां जाणा । पुढती करी काळवंचना ।

पुनरपि आणूनि देहभाना । कौतुकें नाना दाखवी ॥५५॥

एकसहस्त्र चारशतेंवरी । चांगदेव वाचले याचपरी ।

कीर्ति प्रगटली देशांतरीं । उपमा दुसरी असेना ॥५६॥

चौदाशें वर्षांत साचार । एक एक संवत्सर ।

चौदा स्थळीं योगेश्वर । सहपरिवारें राहतसे ॥५७॥

मागुतीं परतोनि सत्वरीं । येत असे तापीतीरी ।

वटेश्वराची पूजा करी । नानाउपचारें करोनिया ॥५८॥

चौदाशे वर्षांत साचार । चौदाशें वर्षे क्रमिलीं बाहेर ।

तितुकीं हीं स्थळें भिन्नाकार । पृथ्वीवर असती ॥५९॥

नव्याण्णव वर्षेवरि । चांगदेव राहती वटेश्वरी ।

सकळ सिद्धि राबती घरीं । हें चराचरीं विख्यात ॥६०॥

तों प्रतिष्ठानींचा द्विजवर । पंथ क्रमीत जात सत्वर ।

तों यात्रा भरली वाटेवर । पुसतसे द्विजवर त्यांलागीं ॥६१॥

कोठूनि झालें जी आगमन । कोठपर्यंत असे जाणें ।

यात्रेकरी सांगती वर्तमान । ऐकतसे ब्राह्मण निजप्रीतीं ॥६२॥

तापीं संगमीं साचार । चांगदेव सिद्ध पुरुष थोर ।

याणें चौदाशें वर्षेवर । कलेवर रक्षिलें ॥६३॥

त्याचें दर्शन घेतांचि जाणा । पुरतसे चित्ताची कामना ।

ऐकूनि यात्रेकरीयांच्या वचना । उल्हास ब्राह्मणा वाटला ॥६४॥

म्हणे ऐसा जो कां योगेश्वर । त्याचें दर्शन घ्यावें सत्वर ।

याहूनि लाभ नसे थोर । केला विचार मानसीं ॥६५॥

सद्भाव धरुनि अंतरीं । ब्राह्मण येतसे वटेश्वरीं ।

तों असंख्यात यात्रा तापीतीरीं । मग नवल करी देखोनियां ॥६६॥

चांगयापासी येऊनि सत्वर । घातला साष्टांग नमस्कार ।

स्वरुप पाहे दृष्टीभर । तों शिवाकार दिसतसे ॥६७॥

सर्वांगीं विभूति लेपन । आणि रुद्राक्ष माळांची भूषणें ।

व्याघ्रांबर केलें परिधान । जैसा कैलासरमण दूसरा ॥६८॥

ज्या दैवतांची करितां भक्ती । तरी तदाकार होतसे वृत्ती ।

ध्यानींमनीं स्वप्नीं जागृती । वटेश्वर चित्ती बैसला ॥६९॥

ऐसी देखोनि त्याची स्थित । ब्राह्मण जाहला संतोषयुक्त ।

पुढती घालूनि दंडवत । सन्निध बैसत तेधवा ॥७०॥

म्हणे धन्य आजिचा सुदिन । जाहले स्वामींचें दर्शन ।

पाप तापाचें निरसन । दुःख दैन्य तें गेलें ॥७१॥

आजि पूर्व उदयासि आलें । कीं सकळ तीर्थांसि स्नान घडलें ।

कीं योगयोग सुफळ जाहलें । देखिलीं पाउलें संताची ॥७२॥

ऐसी ऐकूनि स्तुती । चांगदेव संतुष्ट होती ।

मग स्वमुखें करुनि पुसती । ब्राह्मणाप्रती तेधवां ॥७३॥

कोण तुमचा असे देश । कोणते क्षेत्रीं करितां वास ।

चाललां कोणत्या व्यासंगास । हें साकल्य आम्हांस सांगावें ॥७४॥

तुमचे देशींचा भूपती । प्रजा पाळितों कवणें रीती ।

कांहीं अपूर्व देखिलें असेल क्षिती । तें आम्हांप्रती सांगावें ॥७५॥

ऐसें पुसतांचि योगेश्वर । उत्तर देतसे द्विजवर ।

प्रतिष्ठान गंगातीर । ब्रह्मक्षेत्र म्हणती जें ॥७६॥

तये ठायीं वास्तव्य पूर्ण । आणिक व्यासंग नेणेंचि जाण ॥

गांवांत करुनि भिक्षाटण । कुटुंब रक्षण करीतसे ॥७७॥

तेथें या संवत्सरी निश्चित । एक अपूर्व वर्तली मात ।

जें मागें झालेंच नाही सत्य । पुढेंही न होत सर्वथा ॥७८॥

संन्याशाच्या पोटिचीं जाण । चार मुलें जाहली लहान ।

त्यांनीं रेडियाच्या मुखें करुन । ऋग्वेद संपूर्ण बोलविला ॥७९॥

हें आपुल्या दृष्टीं देखिलें जाण । तें स्वामीस केलें निवेदन ।

चांगदेवें ऐकूनि वचन । आश्चर्य मनीं करीतसे ॥८०॥

स्वमुखें पुसतसे ब्राह्मणासी । कांता त्यागी तो संन्यासी ॥

तयासि मुलें जाहलीं कैसी । हें साकल्य आम्हांसी निवेदी ॥८१॥

ऐसें पुसतां योगेश्वर । उत्तर देतसे द्विजवर ।

म्यां चरित्र ऐकिलें होतें समग्र । तें ऐका साचार स्वामिया ॥८२॥

एक आपेगांव गंगातीर । तेथील वृत्तिवंत द्विजवर ।

पुण्यशील परमपवित्र । असे साचार त्याठायीं ॥८३॥

गोविंदपंत नाम निश्चिती । निरुबाई त्याची शक्‍ती ।

परम सुशीळ पुण्यमूर्ती । असतसे प्रीती उभयतां ॥८४॥

गैनीनाथ जो सिद्ध पुरुष । घेतला तयाचा उपदेश ।

तो मूर्तिमंत वैराग्य डोळस । आले उदरास तयाच्या ॥८५॥

नवमास भरतांच पाही । प्रसूत जाहली निरुबाई ।

पुत्रमुख पाहतां ते समयी । उल्हास जीवी उभयतां ॥८६॥

बारा दिवस लोटतांचि जाण । विठोबा ठेविलें नामाभिधान ।

निजपुत्राचे सद्गुण । सुखी देखोनि संपन्न उभयतां ॥८७॥

तो दिवसें दिवस थोर झाला । आठवे वर्षीं व्रतबंध केला ।

अध्ययन सांगताचि त्याला । वेदशास्त्रीं जाहला निपुण ॥८८॥

मग माता पितयांसि पुसोनि जाणा । विठोबा चालिला तीर्थाटणा ॥

अनुताप धरुनियां मना । सचैल स्नान करीतसे ॥८९॥

रामकृष्ण नारायण । अच्युत अनंत जनार्दन ।

जिव्हेसि अखंड नामस्मरण । सप्रेम मन सर्वदा ॥९०॥

मग प्रथम द्वारकेसि जाऊन । गोमती तीरीं केलें स्नान ।

घेऊनि श्रीविष्णु दर्शन । तेथुनि गमन करितसे ॥९१॥

पश्चिम तीर्थे जीं समस्त । पुराण प्रसिद्ध नामांकित ।

तीहीं पाहुनि विधियुक्त । भीमाशंकरी त्वरीत पावला ॥९२॥

यावरी इंद्रायणीचें तीरीं । विठोबा आला अळंकापुरीं ।

स्नान करुनि सत्वरीं । अर्चन करी विष्णूचें ॥९३॥

तों तेथील कुळकर्णी सिदोपंत । स्नानासि आले होते त्वरित ।

त्यांणीं मंदिरासि नेऊनि विठोबातें । भोजन घालीत निज प्रीतीं ॥९४॥

साकल्य वर्तमान पुसोनि । निद्रा करविली वृंदावनीं ।

तों पांडुरंग मुर्ती येऊनि स्वप्नीं । तया लागुनी बोलतसे ॥९५॥

तुझी कन्या उपवर । ती या ब्राह्मणासि दे सत्वर ।

मूर्तीमंत चार अवतार । उदरीं येणार ययाच्या ॥९६॥

ऐसें सांगतां पंढरीनाथ । सिदोपंत झाले जागृत ।

मग ज्योतिषी बोलावूनि त्वरित । पुसतां घटितार्थ येतसे ॥९७॥

उभयपक्षीं साहित्य करुन । सिदोपंती केलें कन्यादान ।

चारी दिवस यथा विधीनें । सोहळे पूर्ण सारिले ॥९८॥

मग कुटुंबासहित त्या अवसरा । सिदोपंत चालिले पंढरपुरा ।

कन्या जामात घेऊनि वोहरा । श्रीरुक्मिणीवरा भेटवीत ॥९९॥

उत्साह झालिया दिवस चार । सिदोपंत चालिले सत्वर ।

परी जामाताचें ऐसें अंतर । कीं रामेश्वर पहावा ॥१००॥

तयांचें अंतर जाणोनिया । आज्ञा दिधली तीर्था जावया ।

सिदोपंत कन्येसि घेऊनियां । आपुल्या ठायांते आले ॥१॥

विठोबा गमन करुनि त्वरित । दक्षिण तीर्थे पाहिलीं समस्त ।

पूर्ण करुनि आपुला हेत । अळंकापुरींत पावला ॥२॥

सिदोपंतासि भेटता जाण । चित्तास वाटलें समाधान ।

म्हणे माता पितयांचें घ्यावें दर्शन । आज्ञा देणें मज आतां ॥३॥

जाणोनि तयांचें अंतर । सिदोपंत चालिले सत्वर ।

कन्येस घेऊनि बरोबर । गंगातीर पावले ॥४॥

गोविंदपंताची घेऊनि भेटी । वस्त्रें भूषणें दीधलीं गोमटीं ।

आद्यंत सांगतांचि गोष्टी । आनंद पोटीं त्यासि झाला ॥५॥

पुत्र सून देखूनि नयनीं । निरुबाई संतोषली मनीं ।

मग सिदोपंत आज्ञा घेऊनी । आपुले स्थानीं तो गेला ॥६॥

कांहीं दिवस लोटतां जाण । मातापिता मेलीं दोन ।

हें सिदोपंतासि वर्तमान । कोणी येऊन सांगितलें ॥७॥

त्याचा परामर्श घ्यावया पाहीं । सिदोपंत आले आपेगांवीं ।

तों विठोबासि संसार चिंता नाहीं । वैराग्य देहीं सर्वदा ॥८॥

मग म्हणे जामातासी । तुम्हीं चलावें आम्हांपासीं ।

नानापरीं प्रार्थूनि त्यासी । अलंकावतीसी पातले ॥९॥

म्हणे पुत्र संतती होय जोंवर । तों पर्यंत असावें स्थिर ।

मग चित्तासि येईल साचार । तैसा विचार करावा ॥११०॥

मानूनि तयाच्या वचनासी । विठोबा राहिला क्षेत्रवासी ।

आषाढी कार्तिकी पंढरीसी । वारी नेमेंसीं चालवी ॥११॥

विष्णु अर्चन हरीकीर्तन । सर्वदा करी नामस्मरण ।

ऐसें लोटता बहु दिन । परी पोटीं संतान न होय ॥१२॥

मग एकदां पुसे कांतेप्रती । उदास झाली माझी वृत्ती ।

तरी संन्यास घ्यावया निश्चितीं । आज्ञा मज प्रती देई कां ॥१३॥

रखुमाबाई न बोलेचि वचन । पितयासि सांगे वर्तमान ।

म्हणती पुत्र जाहल्यावीण । आज्ञा न देणें सर्वथा ॥१४॥

तों रखुमाबाई दुश्चित असतां अंतरा । विठोबा पुसे त्या अवसरा ।

मी स्नानासि जातों गंगातीरा । जावें सत्वरा म्हणतसे ॥१५॥

निरोप लाहोनिया निमित्त । वाराणसीस गेला त्वरित ।

स्नान करुनि अनुताप युक्त । पुराण ऐकत बैसला ॥१६॥

तेथें गीता व्याख्यान करितां थोर । संन्यास महिमा ऐकिला फार ।

मग म्हणे पुरे हा संसार । अनंत अपार दुःख राशी ॥१७॥

श्रीपादाश्रमी संन्यासी । सद्भावें शरण गेला त्यांसी ।

म्हणे दीक्षा अनुग्रह देऊनि मजसी । आपुले सेवेसी लावावें ॥१८॥

पूर्व अनुसंधान पुसतां त्यास । म्हणे मी एकला एकट असें ।

दारा पुत्र नाहीं पाश । मग अनुग्रह तयास दीधला ॥१९॥

विठ्ठले संन्यास घेतल्यावरी । देशींचे आले यात्रेकरी ।

त्याणी वृत्तांत सांगता सत्वरी । सिदोपंत अंतरीं उद्विग्न ॥१२०॥

रखुमाबाई चिंतातुर तेव्हां । म्हणे आतां कोणता उपाय करावा ।

मग अश्वत्याची मांडिली सेवा । सप्रेम भाव धरुनी ॥२१॥

उग्र अनुष्ठान करिता थोर । तिसीं पावला लक्ष्मीवर ।

श्रीपाद संन्यासी पारावर । बैसले सत्वर येऊनी ॥२२॥

रखुमाई दैखोनि यतीश्वर । सद्भावें केला नमस्कार ।

पुत्रवती होई सत्वर । इतुकें उत्तर बोलिले ॥२३॥

रखुमाई हांसे तयेक्षणीं । श्रीपाद पुसती तिज लागुनी ।

माते कां हांसलीस ये क्षणीं । हें मज लागोन सांगावें ॥२४॥

म्हणे भ्रतार जावोनि वाराणसी । तो तंव जाहला संन्यासी ।

तुम्ही आशिर्वाद दीधला मजसी । सत्य वचनासी केविं होय ॥२५॥

तरुण स्त्री संतानहीन । ऐसियासि संन्यास दीधला ज्याणें ।

तरी गुरुशिष्य उभयतां कारणें । दंड करणें शास्त्ररीतीं ॥२६॥

खाणाखुण पुसतां निवाडे । तो शब्द येतसे आपणाकडे ।

म्हणे पुसावयासी गेलों कोडें । तों वेहरण मजकडे आलें कीं ॥२७॥

रखुमाईस पुसिलें ते क्षणी । तुझीं आप्ते आहेत कोणी ।

ते म्हणे सर्व आहेत याठिकाणीं । मग पितयासि घेउनी ती आली ॥२८॥

सिदोपंती करुनि नमस्कार । घरासि नेला यतीश्वर ।

अर्ध्य पाद्य करुनि उपचार । भोजन सत्वर सारिलें ॥२९॥

श्रीपाद म्हणती ते अवसरी । आमुचा मठ काशीपुरीं ।

हेत धरुनि रामेश्वरीं । अळंकापुरीं पातलों ॥१३०॥

तों तुमचे आत्मजेनें येथ । साकल्य सांगीतला वृत्तांत ।

आतां वाराणसीसं फिरोनि त्वरित । जाणें लागत आम्हांसी ॥३१॥

तुम्ही रखुमाईस बरोबर । घेऊनि चलावें सत्वर ।

इच्या दोषें साचार । सुकृत हरे आमुचें ॥३२॥

ऐसें बोलितां संन्यासी । सिदोपंत संतोषे मानसीं ।

सवें घेऊनि निज कन्येसी । आनंद वनासीं पातले ॥३३॥

विठोबास दीधला संन्यास । तेव्हां चैतन्य नाम ठेविलें त्यास ।

बाहेर बैसवोनि सिदोपंतास । सद्गुरु पुसतसे त्या लागीं ॥३४॥

तुझीं कोणी होतीं घरीं । हें सत्यचि सांग ये अवसरी ।

चैतन्य भयभीत अंतरीं । मधुरोत्तरीं बोलत ॥३५॥

चरणीं ठेवूनियां माथा । म्हणे स्वामी त्यागूनि आलों कांता ।

मग रखुमाईस बोलावूनि तत्वता । म्हणे अंगीकार आतां करी इचा ॥३६॥

अविधि कर्माचें भय मानसीं । सर्वथा न धरी चित्तासी ।

आमुची आज्ञा प्रमाण तुजसी । हृषीकेशी साह्य असे ॥३७॥

ऐसें सद्गुरुंनीं सांगतां । चैतन्यें चरणीं ठेविला माथा ।

मग हातीं धरुनि निजकांता । जाहला निघता तेथुनी ॥३८॥

मग येऊनि अळंकापुरीं । गृहस्थाश्रम अंगीकारी ।

स्वयाती निंदिती नाना परी । वाळीत सत्वरीं घातलें ॥३९॥

जन निंदेचे येतां लोट । शांति सागरीं भरितसे घोंट ।

काम क्रोधांची मोडली वाट । करणी अचाट निरुपम ॥१४०॥

भिक्षा मागोनि नगरांत । अन्न मेळवी पोटा पुरतें ॥

कोपट बांधूनि अरण्यांत । कांतेसहित राहिला ॥४१॥

बारा वर्षें लोटतां ऐसीं । तिघे पुत्र जाहले त्यासी ।

एक कन्या गुणराशी । तिच्या उपमेसी असेना ॥४२॥

प्रथम अवतार मृडानी पती । त्याचें नाम ठेविलें निवृत्ति ।

विष्णु अवतार जन्मला क्षितीं । तयासि म्हणती ज्ञानदेव ॥४३॥

विरंचि अवतार सोपान । आदिमाय मुक्ताई जाण ।

ऐसें होतांचि संतान । संतोष मन रखुमाईचें ॥४४॥

मग भ्रतारासी बोले उत्तर । मुलें तों जाहलीं उपवर ।

तरी ब्राह्मण मेळवूनियां थोर । व्रतबंध विचार पुसावा ॥४५॥

मग ब्रह्मसभा करुनिया थोर । तयांसि केला नमस्कार ।

म्हणे धर्मशास्त्र पाहूनि सत्वर । आम्हांसि विचार सांगावा ॥४६॥

सांगाल जैसें प्रायश्चित्त । तें साहीजण करुं निश्चित ।

ऐसी ऐकूनियां मात । शास्त्र पंडित बोलती ॥४७॥

तुवां संन्यास घेतल्यावर । केला कांतेचा अंगीकार ।

तरी देहांत प्रायश्चित बोलिलें थोर । आणखी विचार असेना ॥४८॥

ऐसी ऐकूनियां वाणी । अनुताप जाहला तये क्षणीं ।

दारापुत्र सर्व टाकूनी । आनंद वनीं चालिला ॥४९॥

मग एकमेकासीं विप्र बोलत । अनुताप हेंचि प्रायश्चित्त ।

गुरुकृपेनें अकस्मात । शुचिर्भूत झाला कीं ॥१५०॥

मग ब्राह्मणांसि म्हणतसे निवृत्ती । माता पिता गेलीं निश्चिती ।

आम्हां चौघां कोण गती । ते समस्तीं सांगिजे ॥५१॥

ऐकोनि म्हणती द्विजवर । तुह्मी प्रतिष्ठानासि जावे सत्वर ।

तेथील न्याय करितील विप्र । तें प्रमाणपत्र आम्ही मानूं ॥५२॥

ब्राह्मण श्रेष्ठ होते थोर । त्यांणीं पैठणकरांसि दीधलें पत्र ।

हें संन्यासि याचें पोटिचे पुत्र । प्रायश्चित्त साचार सांगावें ॥५३॥

पत्र घेऊनि आपुलें हातीं । ब्राह्मणासि नमस्कार केला प्रीती ।

गोदातीरासि सत्वर येती । चार्‍ही मूर्ती निजभावें ॥५४॥

गंगा उतरुनियां त्वरित । स्नान करिती अनुतापयुक्त ।

म्हणती दीन पतित अनाथ । उद्धरी माते आम्हांसी ॥५५॥

स्नान करुनि ऐशा रीतीं । क्षेत्रामाजी प्रवेशती ।

मग ब्राह्मणांसि नमस्कार करुनि प्रीती । वृत्तांत सांगती तेधवां ॥५६॥

पत्र वाचोंनियां सत्वर । समस्तांसि कळला विचार ।

हे तो संन्यासियाचे पुत्र । शास्त्रीं विचार पाहती ॥५७॥

निवृत्ति ज्ञानदेव सोपान । मुक्‍ताबाई गुणनिधान ।

चोघे उभे कर जोडून । बैसले ब्राह्मण त्यांपुढें ॥५८॥

ग्रंथाभाष्या पाहोनि त्वरित । ब्राह्मण तयांसि उत्तर देत ।

शास्त्र पाहतां प्रायश्चित्त । नाहीं दीसत तुह्मांसी ॥५९॥

परी तरणोपाय व्हावया जाण । एक आहे सिद्धांत खूण ।

तुह्मी श्रीहरीसि जाऊनि शरण । अनुतापें भजन करावें ॥१६०॥

ब्रह्मभाव धरुनि चित्तीं । भावें वंदाव्या सकळ याती ।

अंत्यजही देखिल्या क्षितीं । दंडवत प्रीतीं घालावें ॥६१॥

गोखर अजा आणि श्वान । ये स्थळीं सारिखें चैतन्य घन ।

म्हणोनि वंदावे निज प्रीतीनें । अभेदपणें मानसी ॥६२॥

आणिक श्रीहरीचे गुणानुवाद । गावे ऐकावे सप्रेम छंद ।

तेणें चित्तासि होऊनि बोध । निर्वाणपद पावती ॥६३॥

ऐसी ऐकूनि विप्रवाणी । निवृत्तिराज संतोषे मनीं ।

ज्ञानदेव सोपान तये क्षणीं । म्हणती उत्तम स्वामीनीं सांगीतलें ॥६४॥

ऐसें ऐकूनि नामाभिधान । काय म्हणती ब्राह्मण ।

ज्ञानदेव तुमचें नामाभिधान । काय पाहोन ठेविलें ॥६५॥

श्रुतीचा अभ्यास केला प्रीतीं । किंवा शिकला पुराण व्युत्पत्ती ।

म्हणूनि ज्ञानदेव तुह्मांसि म्हणती । ऐसें बोलती धरामर ॥६६॥

मग परस्परें बोलती उत्तर । काय प्रमाण नामावर ।

अमुचा रेडा येतसे थोर । पखाल त्यावर घातली ॥६७॥

त्याचेंही ज्ञान नामाभिधान । ऐसें बोलतांचि ब्राह्मण ।

मग ज्ञानदेव बोलती वचन । आत्मा परिपूर्ण तो माझा ॥६८॥

रेडिया आणि अम्हांत कांहीं । भेद पाहतां किंचित् नाहीं ।

तों विप्र बोलती ते समयीं । तरी चमत्कार कांहीं दाखवा ॥६९॥

रेडिया तुम्हांत नाहीं भेद । तरी याच्या मुखें बोलवा वेद ।

ऐकोनि द्विजवरांचे शब्द । भक्‍त अभेद काय करिती ॥१७०॥

रेडियाचे मस्तकीं ठेऊनि हात । म्हणती वेद बोलावे त्वरित ।

तों कौतुक वर्तलें अद्भुत । ब्राह्मण समस्त ऐकती ॥७१॥

वेदाचा आरंभ ते अवसरीं । स्वमुखें पशु करितसे सत्वरीं ।

विधि उपन्यास वदे वैखरी । आश्चर्य अंतरीं करिताती ॥७२॥

चार्‍ही वेद बोलोनि मुखीं । सकळ द्विजां केलें सुखी ।

ऐसें कौतुक मृत्युलोकीं । न देखों शेखीं सर्वथा ॥७३॥

आम्ही उपनिषद्भाग समस्त । पढिंनलों असें वेदांत ।

परी आंगी ऐसें सामर्थ्य । नाहीं किंचित सर्वथा ॥७४॥

हे परलोकींचे तारु सत्य । देवत्रय मूर्तिमंत ।

यांसि कासया प्रायश्चित्त । जगदुद्धारार्थ अवतरले ॥७५॥

आम्ही आणिकासी सांगो फार । परी आपण नाचरों अणुमात्र ।

प्रतिष्ठा मानसीं साचार । इच्छितां समग्र जन्म गेला ॥७६॥

ऐसा अनुताप धरुनि मनीं । विप्र येती लोटांगणीं ।

मग ज्ञानदेव उठवी तयांलागुनी । मिठी चरणीं घालीतसे ॥७७॥

सप्रेम भाव धरोनि प्रेमा । म्हणे स्वामींच्या पायांचा महिमा ।

सामर्थ्य सर्वथा नसेचि आम्हां । श्रीआत्मारामा विदित ॥७८॥

ऐका सभाग्य श्रोतेजन । आठवा मागील अनुसंधान ।

प्रतिष्ठानीचा जो ब्राह्मण । चांगदेवासि निरुपण सांगतसे ॥७९॥

विप्र म्हणतसे तये वेळां । ऐसी तयाची अगाध लीला ।

म्यां साक्षात कौतुक पाहिलें डोळां । तें तुम्हां जवळां सांगीतलें ॥१८०॥

ऐसी ऐकोनियां कथनी । चांगदेव आश्चर्य करिती मनीं ।

सप्रेम अश्रु लोटती नयनीं । अघटित करणी ऐकोनियां ॥८१॥

म्हणे आम्हींही अभ्यास केला बहुत । चौदा विद्या मुखोद्गत ।

चौसष्ट कळा ही अवगत । परी हें सामर्थ्य असेना ॥८२॥

काळ वंचना करोनि निश्चित । वांचलों वर्षे चौदा शत ।

सिद्धाई दाखविली बहुत । परी हें सामर्थ्य असेना ॥८३॥

ब्राह्मण म्हणे चांगया कारणें । आणिक चरित्र वर्तलें गहन ।

तें यथार्थ सांगतों तुम्हा कारणें । सादर श्रवण करावें ॥८४॥

निवृत्ति ज्ञानदेव पाही । सोपान आणि मुक्‍ताबाई ।

एक्या ब्राह्मणाचे गृहीं । राहिले सर्वही सुखरुप ॥८५॥

तो गृहस्थ भाविक होता थोर । उदार आणि सत्ववीर ।

जाणोनि ईश्वरी अवतार । करीतसे आदर तयांचा ॥८६॥

भोजन आणि उपहार । घालीतसे नाना प्रकार ।

रात्रीं होतसे कीर्तन गजर । लोक समग्र ऐकती ॥८७॥

एक मास लोटतां त्याचे घरीं । तों पितृतीथ आली सत्वरीं ।

साहित्य करुनि बरव्या परी । गेला घरीं ब्राह्मणाच्या ॥८८॥

म्हणे आजि वडिलांची पुण्यतीथ । तुम्ही भोजनासि यावें निश्चित ।

ऐसें विनवितांचि गृहस्थ । उपाध्ये बोलत काय त्यासीं ॥८९॥

संन्यासियाचीं मुलें पाहीं । तुवां ठेविलीं आपुले गृहीं ।

कर्म मार्ग बुडविला तिहीं । ऐकतां सर्वही हरि कथा ॥१९०॥

यास्तव तुझिया गृहासीं । आम्ही न येवों आजि भोजनासीं ।

ऐसें बोलतां ब्राह्मणासीं । गृहस्थ मानसीं चिंतातुर ॥९१॥

मग येऊनि आपुलें सदनीं । उगाचि निवांत बैसला शंकोनी ।

ज्ञानराज पुसती त्या लागोनी । चिंता मनीं किमर्थ ॥९२॥

म्हणे आजि वडिलांचीं पुण्यतीथ । ब्राह्मण भोजनासि नाही येत ।

यास्तव होऊनि चिंताक्रांत । उगाचि निवांत बैसलों ॥९३॥

ज्ञानदेव विष्णूची साक्षात । जाणती सर्वांचें मनोगत ।

म्हणती आमुचें वास्तव्य आहे येथें । घातलें वाळी तयासाठीं ॥९४॥

तुम्ही उद्वेग न धरोनि चित्तीं । घरीं करावी पाकनिष्पत्ती ।

साक्षात् पितर भोजनासि येती । श्रीसद्गुरु निवृत्ती प्रसादें ॥९५॥

ऐसी ऐकोनि वचनोक्ती । गृहस्थ हर्षयुक्त चित्तीं ।

स्वयंपाक करोनि नाना रीतीं । पूजा आयती सिद्ध केली ॥९६॥

तिळदर्भ तुळसी सुमन । यव अक्षता गोपीचंदन ।

धोत्रजोडे दक्षिणा सुवर्ण । साहित्य संपूर्ण आणिलें ॥९७॥

घरधनी करोनि स्नान । पितरासि मांडिले आसन ।

कुतुपकाल होतांचि पूर्ण । जाहलें विंदान अघटित ॥९८॥

आगत म्हणतां ज्ञानदेव । कौतुक वर्तलें अभिनव ।

साक्षात पितर उतरले सर्व । सप्रेम भाव तयांचा ॥९९॥

पितर स्वरुपी जनार्दन । आसनावरी बैसती येऊन ।

विधियुक्त मंत्र म्हणोन । गृहस्थ पूजन करीतसे ॥२००॥

वेदघोषाची उमटतां ध्वनी । गांवींचे ब्राह्मण विस्मित मनीं ।

माडया माळवदीं उभे राहोनी । मग विलोकूनी पाहती ॥१॥

तो देह धरोनि साक्षात । पितर जेवीत बैसले तेथ ।

म्हणती ज्ञानदेव परब्रह्म मूर्तिमंत । करणी विचित्र पैं त्याची ॥२॥

पशुमुखें वदविल्या श्रुती । साक्षात्‌ पितर आणिले क्षीतीं ।

विश्वोद्धार करावया प्रांती । अवतार संतीं घेतला ॥३॥

आपण धरोनि कर्माभिमान । वायांचि टाकिलें आमंत्रण ।

तों आंगेंचि येऊनि पितृगण । दक्षिणा घेऊन गेले की ॥४॥

असो इकडे गृहस्थानें । पितर पूजिले यथाविधीनें ।

जें जें रुचे तें तें सेविती अन्न । ऐसें महिमान संतांचें ॥५॥

सकळांसी तृप्ति झालिया जाणा । दीधली कर शुद्धि तांबूल दक्षिणा ।

स्वस्थाने वास बोलतां वचना । आपुल्या स्थाना ते गेले ॥६॥

सकळ पैठणीचे द्विजवर । स्तव करीती वारंवार ।

म्हणती ज्ञानदेवा तुझा पार । विरंचि हर नेणती ॥७॥

दोन मास पैठणीं राहून । करिती वेदांत व्याख्याने ।

रात्रीं करिती हरि कीर्तन । सप्रेम जन वेधले ॥८॥

रेडा स्वमुखें वदला श्रुती । तो मागून घेतला ब्राह्मणां प्रती ।

मग सकळांसि पुसो निश्चितीं । आळंदीसि जाती चौघेजण ॥९॥

ब्राह्मण म्हणे चांगयास । या गोष्टीस लोटला एक मास ।

मी साक्षात पाहूनी दृष्टीस । तुमचे भेटीस पातलो ॥२१०॥

ऐसी ऐकूनि विप्रवाणी । चांगदेव विस्मित झाले मनीं ।

म्हणती अघटित ईश्वराची करणी । एकाहूनी एक विशेष ॥११॥

माझें गायन रसाळ पूर्ण । हा नारदासि चढला अभिमान ।

मग अस्वला मुखें श्रीकृष्ण । राग संपूर्ण आळविले ॥१२॥

कां माझें पात्र बहु थोर । ऐसें बोलिला रत्‍नाकर ।

मग त्याचे अगस्ति मुनविरें । आचमन सत्वर केलें कीं ॥१३॥

मीच एक सृष्टीचा कर्ता । ऐसें बोलिला विधाता ।

मग विश्वामित्रें आपुल्या सत्ता । सकळ पदार्थ निर्मिलें ॥१४॥

माझें रुप सुंदर म्हणोनी । सत्यभामेंसि अहंता मनीं ।

मग जानकीचें रुप धरितां रुक्मिणी । बैसली होउनी गर्व रहित ॥१५॥

तेवीं आम्हीं सिद्धाई केली बहुत । वर्षे वांचलों चौदा शत ।

परी ज्ञानदेवाची करणी अघटित । ऐकोनि चित्त मुरालें ॥१६॥

अहो भक्तलीलामृत ग्रंथ पूर्ण । वदवित श्रीरुक्मिणी रमण ।

महीपति त्याचा बंदिजन । गातसे सद्गुण कीर्तनीं ॥२१७॥

स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविक भक्त । तृतीयाध्याय गोड हा ॥२१८॥

अध्याय तृतीय संपूर्ण ॥अ०॥३॥ओ०॥२१८॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP