श्रीगणेशाय नमः ॥
अपराचीं अनंत कीर्ती ॥ थोरथोरांच्या खुंटल्या युक्ती ।
तेथें आपली प्राकृतमती । कैसी सरती होईल ॥१॥
जैसा समुद्र जीवनीं बहुत सांठ । जाहाजें फिरती ऐलकोट ।
तयामाजी फुटकें पट । जाईल कोठें पैलतीरा ॥२॥
नातरी उदयासि येतां दिनकर । नक्षत्रासहित लोपे चंद्र ।
तयापुढे खद्योत तेज थोर । हा तों विचार घडेना ॥३॥
पृथ्वीचे वजन करावें कोडे । ऐसे विस्तीर्ण नाहीं पारडें ।
आकाशासि स्वहस्तें गवसणीं पडे । हे तों रोकडें घडेना ॥४॥
वासरमणीचे अवयव संपूर्ण । पहावें ऐसे तेज कोण ।
तेवी महाविष्णूचे वर्णिता गुण । बुद्धि सहित मन वेडावे ॥५॥
जेवीं मातेस देखोनि तान्हे बाळ । अवाच्य शब्द भलतेचि बरळे ।
परी तें आपुले मोहाचेनि बळे । कौतुक लळे पुरवीतसे ॥६॥
तैसे कौतुक मानूनि संतीं । आर्ष वचनें करावीं सरतीं ।
अज्ञान बाळक महीपती । ऐसें चित्तीं समजोनियां ॥७॥
मागिले अध्यायीं कथा अद्भुत । तीर्थासि गेलिया एकनाथ ।
मागे जनार्दनासी वाटतसे खंत । गुण आठवत सर्वदा ॥८॥
असो इकडे प्रतिष्ठान क्षेत्रीं । आजाआजी होती घरीं ।
तयांसि न पुसत सत्वरी । आले देवगिरीं एकनाथ ॥९॥
सद्गुगुरु सेवेसि गुंतोनि पाहीं । मागील परत केली नाहीं ।
तेणें वृद्धांसि चिंता जीवीं । घरोघरीं तिहीं धुंडीलें ॥१०॥
जयातया पुसती मात । दृष्टी देखिला एकनाथ ।
ते म्हणती आम्हांसि नाहीं विदित । मग रुदन करित उभयतां ॥११॥
दोघे क्षेत्रामाजी फिरती । घरोघरीं लोकांसि पुसती ।
चैन न पडेचि दिवसराती । वेधली वृत्ती श्रीनाथें ॥१२॥
गोड न लागेचि अन्नपाणी । वर्षा येव्हडी वाटे यामिनी ।
बाळकाचे गुण आठवोनि मनीं । परी शुद्धि कोणीं सांगेना ॥१३॥
बाळपणीं मेलीं मातापिता । येव्हडाचि झीड वांचला होता ।
त्याच्या आश्रयें तत्त्वता । आम्ही उभयतां काळ कंठू ॥१४॥
आतां आंधळ्याची काठी । ते अडकलीसे कवण बेटी ।
आतां तो कधी पडेल दृष्टीं । म्हणवोनि कष्टी होताती ॥१५॥
गावींचे त्रिविध लोक पाहीं । नाना कुतर्क करिती जीवीं ।
लेंकुरासि निष्ठुर बोलिलें कांहीं । यास्तव लवलाहीं तें गेलें ॥१६॥
आजाआजी आहेत तत्पर । त्यांसि मायबापांची नये सर ।
ज्याचा जार त्यासीच भार । आणिकांसि जो जार तयाचा ॥१७॥
एक म्हणती मिथ्या विचार । यांनीं चळला पाळिला फार ।
पोर पोरटें निष्ठुर । गेले दूर टाकोनियां ॥१८॥
लहानपणापासोंनि जाण । त्याचा पाहतों पायगुण ।
मातापिता गेलीं निमोन । दरिद्र त्वरेनें त्यांसि आले ॥१९॥
आजा आजी आहेत दोन्हीं । त्यांच्या जीवासि लाविली कांचणी ।
आतां तयांसि वृद्धपणीं । द्यावयासि पाणी कोणीच नसे ॥२०॥
असो यावरी त्रिविध जन । नानापरींची बोलती वचनें ।
परी त्या उभयांसि न पडे चैन । करिती प्रयत्न बहुसाल ॥२१॥
तीर्थवासी जे पांथस्थ । व्यवसायी आणि कापडीं हिंडत ।
तयांसि जावोनि पुसती मात । देखिला एकनाथ दृष्टीसी ॥२२॥
कागरावे साळोंखियांसि पुसत । तुम्हीं पाहिला एकनाथ।
मग वाळवंटीसी जावोनि त्वरित । गंगेसि दंडवत घातले ॥२३॥
म्हणती आमुचें वाळवंट दिसे नयनीं । तरी तुवा बुडविले आपुले जीवनीं ।
ते शुद्ध सांगा त्वरें करुनी । गंगेसि विनवणी नित्य करिती ॥२४॥
एकनाथ सद्गुरु भेटीसी जातां । चिंतार्णवात ते उभयतां ।
नेत्रासि आली निझुरता । शोक करितां दिवस निशीं ॥२५॥
आप्त विषयी सोयरे पिशुन । इष्ट मित्र आणि सज्जन ।
घरीं येवोनि सकळ जन । समाधान मग करिती ॥२६॥
म्हणती वय लहान । परी लक्षणें आहेत सगुण ।
ईश्वर भजनीं सर्वदा मन । पुराण श्रवण नित्य करी ॥२७॥
साधुसंत वैष्णववीर । यांचे ठायीं आस्था थोर ।
श्रीराम भजन निरंतर । स्वमुखें साचार करितसे ॥२८॥
त्याची प्रज्ञा देखोनि सुख । आम्हांस वाटे परम कौतुक ।
तयासि रक्षिता वैकुंठनायक । आतां सर्वथा शोक न करावा ॥२९॥
अध्यात्म ग्रंथ श्रवणार्थी । तयासि बहुत आस्था होतीं ।
कोठें धरोनि सत्संगती । बैसला निश्चिती वाटतें ॥३०॥
एक म्हणती पुराण ऐकावयासी । एकनाथ बैसे पंडितापासी ।
त्याणें चाळवोनि मुलासी । स्वयें कटकासी तो गेला ॥३१॥
ऐसा तर्क करितां कोणी । समस्तांसि मानलें तये क्षणीं ।
कीं लेंकुरासी विद्यार्थी करोनी । गेला घेउनी पुराणिक ॥३२॥
मग त्या वडिला दोघांप्रती । हर्ष शोक उपजे चित्तीं ।
त्याच्या घरासि जावोनि पुसती। कैशारीतीं तें ऐका ॥३३॥
कटकासि गेले पुराणिक । सवें चाळवोनि नेलें बाळक ।
आम्हांसि बहुत जाहलें दुःख । करितों शोक निशिदिनीं ॥३४॥
घरिचीं म्हणती ते समयीं । सैन्यास गेले घरगोसांवीं ।
परी मुलास नेलें किंवा नाहीं । हें विदित कांहीं असेना ॥३५॥
परी लोक तर्क करिती सत्य । त्या सवेचि गेला एकनाथ ।
आजा आजी चिंताक्रांत । वाट पाहात राहिलीं ॥३६॥
पुराणिक आलिया सत्वर । मुलासि आणीला बरोबर ।
वाट पाहतां दिवस रात्र । वर्षे चार लोटली ॥३७॥
तो कटक परतलें सत्वरा । ऐकोनि गेलीं त्याच्या घरां ।
म्हणती फिताऊनि नेलें आमुच्या कुमरा । धीट हा खरा पुराणिक ॥३८॥
लेंकुरासि चाळवोनि नानापरी । विद्यार्थी करोनि नेला दुरीं ।
तयासि सांभाळोनि न आणिलें जरी । तरी प्राण दारीं आम्हीं देऊं ॥३९॥
हें घरच्या मनुष्यांनीं ऐकोनि देखा । पत्र पाठविलें पुराणिका ।
कीं तुम्हीं चाळवोनि नेला एका । कीं अभिशाप लटिका हा आला ॥४०॥
घरच्या मनुष्याचें येतां पत्र । ब्राह्मण जाहला चिंतातुर ।
म्हणे अन्याय न करितां साचार । अभिशाप मजवर आला कीं ॥४१॥
मग यजमानासि सांगोनि वृत्तांत । वेतन घेवोनि निघाला पंडित ।
म्हणे कोठें गेला एकनाथ । मजवरी निमित हें आलें ॥४२॥
मागें श्रीनाथें त्याज कारण । सांगीतली होती जीवींचीं खूण ।
कीं देवगिरी समज आहे जाणें । श्रीगुरु जनार्दन भेटीसी ॥४३॥
तें अवचित स्मरण जाहले मनीं । म्हणे शोध घ्यावा तेथें जाऊनी ।
जरी एकनाथ असेल त्या ठिकाणीं । तरी जावें घेउनी तयासी ॥४४॥
ऐसा विचार करोनि मानसीं । पुराणीक आला देवगिरीसी ।
मग भेटोनि जनार्दनपंतांसी । वृत्तांत तयासी सांगीतला ॥४५॥
सद्गुरु म्हणती तये क्षणीं । ते आजवर होता या ठिकाणीं ।
बहुतचि सेवा करोनि । आम्हां लागोनि तोषविलें ॥४६॥
आतां मज आज्ञेने साचार । तीर्थाटणासि गेला दूर ।
तयासि चिंता नसेचि अणुमात्र । वडिलांसि पत्र पाठविलें ॥४७॥
मग पुराणीक जावोनि प्रतिष्टानीं । गेले एकनाथाचें सदनीं ।
वृद्धें बैसली होती दोन्हीं । तया लागोनि सांगितलें ॥४८॥
कीं तुमचा नाथ देवगिरीसी । गेला जनार्दनाचे भेटीसी ।
त्यांचें हातची पत्रिका ऐसी । तेही तयांसी दाखविली ॥४९॥
चुकल्या पुत्राचि शुद्धिवार्ता । एकोनि संतोष वाटला चित्तां ।
म्हणती प्राण परतले जात जातां । आम्हां अनाथा कोणी नसे ॥५०॥
उत्तर पुसती पडताळोनी । ऐकतां श्रवणासि न पुरे धनी ।
साकर आणोनि तये क्षणीं । घातली वदनीं तयाचें ॥५१॥
पुराणीक पुढती उत्तर देत । माझा विश्वास नसेल तुम्हांप्रत ।
तरी देवगिरीसी जावोनि त्वरित । जनार्दनातें पुसा की ॥५२॥
इतुकें बोलोनि ते अवसरी । ब्राह्मण गेला तेव्हां घरीं ।
वृद्धें चिंता करिताति अंतरीं । कैसी परी करावी ॥५३॥
जरी मनुष्य पाठवावें देवगिरीसी । तरी द्रव्य नाहीं द्यावयासी ।
तरी आपणचि जावोनि त्या स्थळासी । जनार्दनासी भेटावें ॥५४॥
ऐसा विचार करोनि चित्तांत । शनैः शनैः उरकीत पंथ ।
देवगिरीसि जावोनि त्वरीत । जनार्दनातें भेटले ॥५५॥
सांगितले आद्यंत वर्तमान । आश्रुपाते भरिलें लोचनी ।
म्हणती आम्हांसि नाथें दिधलें टाकून । न ये परतोनि घरासि ॥५६॥
जनार्दनें देवोनि अभ्युत्थान । उभयतांसि भेटले प्रीतीनें।
स्वमुखें सांगे नाथाचे गुण । निज प्रीतीनें त्यासी ॥५७॥
करावया विश्वोद्धार । श्रीविष्णुनें धरिला अवतार ।
धन्य तुमचें कुळ पवित्र । जाहला उद्धार वंशाचा ॥५८॥
तो तुम्हांसि बाळ भासतो चित्तीं । परी तो साक्षात पांडुरंग मूर्ती ।
त्याचें चरित्रें देखाल पुढतीं । मग संशय निवृत्ती होईल ॥५९॥
ऐकोनि जनार्दनाचें वचन । तयासी वाटलें समाधान ।
म्हणती आणिक षण्मास लोटतां पूर्ण । नाथ परतोनि येईल घरां ॥६०॥
मग एक महिना पाहीं । जनार्दनें त्यांसि राहविलें गृहीं ।
पक्कानें करोनि नित्य नवीं । तयांसि जेववी प्रीतीनें ॥६१॥
वस्त्रें भूषणें अलंकार। द्रव्य खर्चीस दिधलें फार ।
मग स्वहस्तें लेहून पत्र । नाथासि सत्वर दीधलें ॥६२॥
त्यामाजि इतुकाचि भाव पूर्ण । तुजला होताचि पत्र दर्शन ।
तेव्हां सांडोनि तीर्थ भ्रमण । वसतीस्थान तेचि कीजे ॥६३॥
ऐसीं स्वहस्तें लेहूनि अक्षरें । सद्गुरुनें दीधलें पत्र ।
अश्व मनुष्य बरोबर । देऊनि सत्वर बोळविले ॥६४॥
जनार्दन सांगतीं त्याजकारण । उत्तम मानस तीर्थे करोन ।
नाथ पैठणासि येईल जाण। तुम्हीं शोधार्थ असणें सावध ॥६५॥
आमुचें पत्र दीधल्या पाहीं । मग सर्वथा पुढें जाणार नाहीं ।
तुम्हीं चितां न करावी जीवीं । ऐसें शिकवी तयांसी ॥६६॥
ऐसें जनार्दनें सांगतां । संतोष उभयतांच्या चित्ता ।
मग पैठणासि येऊनि तत्वत्तां । वृत्तांत समस्तां सांगती ॥६७॥
जनार्दन पंताचें भलेपण । सकळांसि करिती निवेदन ।
पत्र ठेविती करोनि जतन । मग समस्तां कारणें सांगती ॥६८॥
साहा महिन्यांत साचार । येथें नाथ अकस्मात आला जर ।
तरी तुम्हीं ओळखोनि सत्वर । राहे तो विचार करावा ॥६९॥
इकडे सद्गुरुच्या आज्ञेकरोनी । एकनाथ गेले तीर्थाटणीं ।
जनार्दन भरला ध्यानीं मनीं । चराचर त्रिभुवनीं तोचि दिसे ॥७०॥
लोकसंग्रह साचार । तीर्थे दैवतें पाहती फार ।
जेथें चित्त होतसें स्थिर । ते ठायीं त्रिरात्र राहती ॥७१॥
कोठे देखोनि सत्संगती । तेथे क्रमिता पंच रात्री ।
कोठें वंदन कोठें स्नान करिती । मग स्वइच्छा चालतो तेथुनी ॥७२॥
पूर्ण पयोष्णी साचार । तपती नर्मदा तीर्थ थोर ।
अवंतीसि महाकाळेश्वर । पहातांचि अंतर निवालें ॥७३॥
मथुरा गोकुळ वृंदावन । ये स्थलीं येती प्रीतीं करोन ।
जेथें वैष्णव प्रेमळ जन । नाम स्मरणें डुल्लती ॥७४॥
तें स्थळीं असती भाविक भक्त । अर्चन विष्णुचें यथास्थित ।
दृष्टीसी देखोनि एकनाथ । रमलें चित्त तें ठायीं ॥७५॥
म्हणे धन्य धन्य हे पुण्यधरणी । ये स्थळीं क्रिडले चक्रपाणी ।
क्षेत्रवासी वैष्णव पाहोनी । संतोष मनीं वाटला ॥७६॥
रास उत्साह हरिकीर्तन । भजनशीळ अवघे जन ।
ध्यानीं मनीं तयांच्या कृष्ण । वेधले मन सर्वदा ॥७७॥
त्या विष्णुक्षेत्रामाजी साचार । श्रीनाथे दिवस क्रमिले फार ।
मग देवासि करोनि नमस्कार । तेथोनि सत्वर चालिले ॥७८॥
महाक्षेत्र वाराणसी । ते स्थळीं पातले वेगेसी ।
स्नान करोनि मणिकर्णिकेसी । श्रीविश्वेश्वरासी भेटले ॥७९॥
पंचरात्र राहोनि तेथ । पुढें गमन केलें त्वरित ।
पुन्हा आगमन होईल तेथ । श्रीजनार्दन सत्ते करोनियां ॥८०॥
मग प्रयाग तीर्थासी येऊन । त्रिवेणी संगमी केलें स्नान ।
घेऊनियां माधव दर्शन । समाधान पावले ॥८१॥
पुढें जावोनि गयेप्रती । श्रीविष्णुपदासि वंदिलें प्रीती ।
सद्भावें पूजन करोनि निश्चिती । संतोष चित्ती मानित ॥८२॥
काया वाचा आणि मन । जे विष्णु चरणीं अनन्य शरण ।
तरी तयांसि घडले गया वर्जन । अगणित पुण्य कोण गणी ॥८३॥
जे श्रीहरि चरणीं जाहले रत । तयांसि सत्कर्में घडलीं समस्त ।
तयांचे पाय लागतां निश्चित । तीर्थें पुनीत पैं होती ॥८४॥
यमुना गोदा भागीरथी । कृष्णा वेण्या सरस्वती ।
नर्मदा तापी भीमरथी । आगमन इच्छिती संतांचें ॥८५॥
जाणोनि तयांचें मनोगत । जनार्दनाचें द्रवलें चित्त ।
मग एकनाथासि आज्ञापित । कीं तीर्थे समस्त पहावीं ॥८६॥
जनीं भरलासे जनार्दन । ऐसा निश्चय बाणला पूर्ण ।
श्रीनाथ हिंडती तीर्थाटण । तीं मुख्य स्थानें सांगितली ॥८७॥
गया प्रयाग आणि काशी । करोनि चालिले अयोध्येसी ।
तेथिचे लोक क्षेत्रवासी । श्रीराम नामासी निवटले ॥८८॥
श्रीराम सीता लक्ष्मण । भरत आणि शत्रुघ्न ।
या मूर्तीचे घेवोनि दर्शन । समाधान पावले ॥८९॥
विष्णु क्षेत्राचे ठायीं निश्चिती । नाथासि परम वाटतसे आर्ती ।
तेथें प्रेमळ वैष्णव राहतीं । कीर्तनीं डुल्लती निजप्रेमें ॥९०॥
अयोध्या क्षेत्र पाहोनि जाण । मग बदरीनाथासि केलें गमन ।
आदि पुष्कर तीर्थ पाहोन । केलें स्नान ते ठायीं ॥९१॥
पुष्कर तीर्थाचें दर्शनें । तत्काळ होय कलिमल नाशन ।
तेंहीं स्थान जाहलें पावन । होतां आगमन नाथाचें ॥९२॥
मग हिमाचल पर्वतीं साचार । भागीरथीचें वाहे नीर ।
तेथें कडा तुटलासे थोर । दृष्टांत न ठरे पाहतां ॥९३॥
शिंक्यांत बैसोनि साचार । ते स्थळीं व्हावें पैलपार ।
नाथासि अभय अणुमात्र । न ठावे साचार ते ठायीं ॥९४॥
परम उल्हास धरोनि मनें । दृष्टीसी पाहिलें तें स्थान ।
देखोनि बदरीनारायण । साष्टांग नमन करीतसे ॥९५॥
जैसे कां नरनारायण । सर्वथा नसे भेदभान ।
तैसे देवभक्त होऊनि आपण । आपुलें महिमान वाढविती ॥९६॥
तेथील क्षेत्रवासी जे समस्त । सप्रेम श्रीहरीची लीला वर्णित ।
उद्धव धाडिला बदरिकाश्रमांत । त्याणे हे रीत लाविली ॥९७॥
जैसी देख दाखविती संत । भाविकजन तैसेचि वर्तत।
तेणेंचि ते होती जीवनन्मुक्त । कल्पना समस्त निरसोनी ॥९८॥
मग बदरीनाथासि पुसोनि त्वरित । द्वारकेसि तेव्हां गमन करित ।
अरण्यामाजी पाहोनि एकांत । भजन करित श्रीहरीचें ॥९९॥
नामरुपी जडलें चित्त । यास्तव देहभान नसे किंचित ।
जनार्दनरुप विश्व भासत । आपणही तयांत समावे ॥१००॥
ऐशा स्थितीनें ते अवसरी । सत्वर गेले द्वारकापुरी ।
स्नान करोनी गोमती तीरीं । संतोष अंतरीं वाटला ॥१॥
मग देउळासि जावोनि सत्वर गती । साष्टांग नमस्कार घातला प्रीतीं ।
दृष्टीसीं देखोनि श्रीकृष्ण मूर्ती । संतोष चित्तीं जाहला ॥२॥
ते स्थळीं एकमास पर्यंत । वास्तव्य करितसें नाथ ।
अर्चनपूजा त्रिकाळ पाहत । श्रवणीं ऐकत सत्कीर्ती ॥३॥
आतां दक्षिणतीर्थे पाहावी नयनीं । यास्तव परतले तेथूनी ।
मग नरसी मेहेताचें येवोनि स्थानीं । जुनागड नयनीं पाहिला ॥४॥
निज भक्ताची देखोनि प्रीती । द्वारकेची पुरातन मूर्ती ।
डांकुरासि आले निजप्रीती । तें स्थान निश्चिती अवलोकिलें ॥५॥
ऐसी उत्तरतीर्थें करोनि सांग । पाहिली पृथ्वीची जोतिर्लिगें ।
सप्तपुर्या देखोनि अंगें। सप्रेम रंगें डुल्लती ॥६॥
ऐसा पंथ क्रमिता सत्वर । पातले तेव्हां प्रतिष्ठान क्षेत्रा ।
स्नान करोनि गोदातीरा । मग पिंपळेश्वरा नमस्कारिलें ॥७॥
गांवीचे लोक ओळखोनि कोणी । गोळा करितील ये ठिकाणीं ।
यास्तव प्रातःकाळापासोनी । राहिले लपोनी देवळांत ॥८॥
मध्यान्ह समयी पाहिजे अन्न । यास्तव क्षेत्रांत चालिले आपण ।
जैसें जे समयीं मिळेल भोजन । ते समाधानें भक्षिती ॥९॥
रसनां जिंतोनि इंद्रियदमन । धडगोड हे तों सर्वथा नेण ।
सारिखेचि तया मानापमान । शत्रु मित्र जनार्दन भासती ॥११०॥
ऐशा स्थितीनें एकनाथ । तीर्थें करीत पातले तेथें ।
गांवांत प्रवेशतांचि तयातें । तों वडिलीं अकस्मात देखिलें ॥११॥
श्रीनाथे वोळखोनि ते अवसरीं । मग मनोमयचि नमस्कार करी ।
म्हणती वोळख द्यावी यांसि जरी । तरी गोवितील संसारीं मज आतां ॥१२॥
परम दुर्घट हा संसार । सद्गुरु आज्ञेंत पडेल अंतर ।
दक्षिण मानस राहिलें समग्र । तरी गमन सत्वर करावें ॥१३॥
ऐसें कल्पोनि चित्तांत । वोळखी न देच तयातें ।
आजाआजी न्याहाळोनि पाहत । तों चिन्हें समस्त दिसती॥१४॥
बाळपणीं टाकोनि गेला असे । तयासि जाहले फार दिवस ।
प्रौढपण आलें शरीरास । संदेह चित्तास वाटतो ॥१५॥
तर्केचि उभयतां बोलती वचन । बापा त्वां टाकिलें आम्हां कारणें ।
कैसें निष्ठुर केलें मन । भरले लोचन अश्रुपातें ॥१६॥
आजा आजी ते अवसरी । बुझावित असती नानापरी ।
बहुत मिळाल्या नरनारी । म्हणती निर्धारी हाचि नाथ ॥१७॥
एक म्हणती हाचि स्पष्ट । एक म्हणती संदेह वाटे ।
वृद्धांचें प्राक्तन दिसतें खोटें । कैसें अदृष्ट कळेना ॥१८॥
मीच होय अथवा नाहीं । ऐसें उत्तर न करीच कांहीं ।
उठोनि जातां ते समयी । धांवोनि वडिलांही धरियेला ॥१९॥
श्रीजनार्दनाचें हस्ताक्षर । लेहोन घेतलें आज्ञापत्र ।
तें आणोनियां मग सत्वर । नाथासमोर दाखविती ॥१२०॥
श्रीनाथें वोळखोनि तये क्षणीं । मस्तकी वंदीत प्रीती करोनी ।
त्याचा अर्थ ध्यानासि आणुनी । मग त्याच स्थानीं बैसले ॥२१॥
अगस्तीची आज्ञा वंदोनि शिरी । विंद्याचळ पडे पृथ्वीवरी ।
तेवी जनार्दनाचें देखतां नेत्रीं । मग तोचि धरित्रीवरी बैसले ॥२२॥
वस्तीही नसेचि ते ठायीं । लोक म्हणती चलावें गृहीं ।
परी कोणाचें नायकेचि विदेही । मौनेंच कांहीं न बोले ॥२३॥
चराचर दिसतें माया । तें जनार्दनचि भासे तया ।
म्हणवोनि शीत उष्ण नेणेचि काया । देहींच या विदेह ते ॥२४॥
कोणी होते भाविक नर । ते स्वमुखें सांगती विचार ।
तेणेंचि आणोनि उपहार । द्यावा सत्वर यालागीं ॥२५॥
सर्वज्ञ सांगतां ऐशा रीतीं । तैसीच वडिली ऐकिली युक्ती ।
ते स्थळीं अन्न वाढोनि आणिती । तें श्रीनाथें प्रीती भक्षिलें ॥२६॥
तीन दिवस पर्यंत । तेथूनि न उठेचि निश्चित ।
आजा आजीही आलीं तेथ । निग्रह बहुत देखोनिया ॥२७॥
शीत उष्ण आणि वारें । यांसि कांहींच नसे आधार ।
कोणी गांवींचे भाविक नर । त्यांनीं बांधोनि छप्पर एक दिलें ॥२८॥
तये स्थळीं एकनाथ । भजन करीत प्रेमयुक्त ।
सात्विक लक्षणें अळंकृत । देखोनि विस्मित लोक होती ॥२९॥
म्हणती तारुण्य वयांत साचार । इतुका आंगीं वैराग्यभर ।
यासि न म्हणावें मानवी नर । ईश्वरी अवतार दिसतसे ॥१३०॥
ऐशा परी करोनि स्तुती । त्रिकाळ कोणी दर्शनासि येती ।
देखोनि तयांची सप्रेम भक्ती । कीर्तन करिती श्रीनाथ ॥३१॥
मागील नसतां पाठांतर । प्रासादिक बोलती उत्तर ।
पदें रचोनि वरच्यावर । श्रीहरीचीं चरित्रें वर्णीतसे ॥३२॥
मागें धृपदी नसे कोणी । पांडुरंगासि चिंता उपजली मनीं ।
मग आपण ब्राह्मणाचें रुप धरोनी । साहित्य कीर्तनीं करितसे ॥३३॥
मुखांतूनि निघती अक्षरें । मागून झेलीत वरच्यावर ।
टाळ धरोनिया निजकरें । मंजूळ स्वर देत मागें ॥३४॥
सकळ रंगाचें दैवत । जो देवाधिदेव रुक्मिणीकांत ।
तोचि एकनाथाच्या हृदयांत । बैसोन देत आठवण ॥३५॥
आणि बाह्यात्कारें श्रीहरी । निजांगें आपण ध्रुपद धरी ।
परी कोणासि न कळेचि निर्धारी । प्रत्यक्ष नेत्री देखतां ॥३६॥
एकनाथाचें कीर्तन ऐकतां । श्रोतयांसि होतसे विदेह अवस्था ।
जरी खळाचे कानी शब्द पडतां । तरी येत सात्विकता तयासी ॥३७॥
क्षेत्रवासी नारीनर । परस्परें बोलती उत्तर ।
म्हणती श्रीनाथ जाहला अवतार । जगदुद्धार करावया ॥३८॥
याज ऐसें प्रेमळ गायन । कीर्तन नयेची कोणाकारणें ।
श्रवणेंचि वेधें सकळाचें मन । यापरी स्तवन लोक करितां साचार ।
गावांत मानिती थोर थोर । मग बांधोनि देती थोर मंदिर ।
द्रव्य फार खर्चोनिया ॥१४०॥
आवार घर चौक साधूनी । एकनाथासि दीधलें त्याणी ।
तृप्ति ब्राह्मण संतर्पणीं । घर निघवणी ते झाली ॥४१॥
आजा आजी दोघेजण । चित्तीं पावलीं समाधान ।
मग घेऊनि आपलें देवार्चन । तें स्थळ येवोन राहती ॥४२॥
अन्नवस्त्राची निश्चिती । स्व इच्छेनें भाविक करिती ।
ज्याचा सखा वैकुंठपती । तेथें सिद्धी राबती सर्वत्र ॥४३॥
एकादशीस हरिजागर । कीर्तन होतसे चार प्रहर ।
श्रवणासि लोक येती फार । नाम उच्चार करावया ॥४४॥
तों श्रीनाथ एकदां काय बोलती । श्रावण मासीं कृष्ण जयंती ।
आपण उत्सव करावा प्रीती । समस्तांसि वचनोक्ती मानली ॥४५॥
कोणी धनवंत सावकार । त्याणीं साहित्य आणिलें फार ।
सारवोनि श्रृंगारिलें मंदिर । देवासि मखर निर्मिलें ॥४६॥
कोणी ब्राह्मण देवगिरी प्रती । जावोनि जनार्दनासि भेटती ।
नाथाचा वृत्तांत सकळ सांगती । ऐकोनि चित्तीं संतोषले ॥४७॥
जैसा पुत्राचा विजय ऐकोनि कानीं । पिता संतोंषे आपुलें मनीं ।
कीं बाळकाचे कोड देखोनि नयनी । मातेसि निजमनी उल्हास ॥४८॥
तैशाच रीती सद्गुरुसी । ब्रह्मानंद न माये मानसी ।
मग भेटावया एकनाथासी । परिवारेसी चालिले ॥४९॥
कृष्णजयंतीस साहित्य । घरीं केलें होतें बहुत ।
तितुकें सवें घेऊनि त्वरित । जनार्दनपंत निघाले ॥१५०॥
दिंड्या पताका बरोबर । गरुड टकियांचे भार ।
वाद्यें वाजती अतिगजरे । चालिले थोर संभ्रमे ॥५१॥
संतर्पण करावया थोर । सामग्री घेतली बरोबर ।
गोण्या घालोनि बैलावर । पुढें सत्वर पाठविल्या ॥५२॥
मग जनार्दन येवोनि प्रतिष्ठानीं । चालिले एकनाथाचें सदनीं ।
द्वारापासी येतांचि त्यांणीं । तो कौतुक नयनीं देखिले ॥५३॥
द्वारपाळाचे रुपें निर्धारीं । श्रीदत्तात्रेय उभे महाद्वारीं ।
त्रिशुल घेतलासे निजकरी । जैसा त्रिपुरारी दिसत ॥५४॥
हें जनार्दने देखोनि नयनी । त्या जगद्गुरुसि ओळखिले तये क्षणी ।
मग साष्टांग नमस्कार घालोनी । प्रीती करोनी भेटले ॥५५॥
मग श्रीदत्त जनार्दनासि बोलती । एकनाथ साक्षात पांडुरंग मुर्ति ।
यास्तव आम्हीम निजप्रीती । धरिली वस्ती महाद्वारीं ॥५६॥
ऐसी बोलोनी त्यासी मात । काय लाघव करितसे दत्त ।
मनुष्यरुप धरोनि त्वरीत । नाथासि सांगत काय तेव्हां ॥५७॥
सहपरिवारे जनार्दन । भेटिसि आले देवगिरीहून ।
ऐसें ऐकताची वचन । उल्हास मना वाटला ॥५८॥
सद्गुरु आगमन ऐकतांच श्रवणीं । एकनाथ चालिले लोटांगणीं ।
आलिंगन देत प्रीती करोनी । मग मिठी चरणी घातली ॥५९॥
तेव्हां जनार्दनासि धरोनि हातीं । एकनाथ सदनी प्रवेशती ।
आसनी बैसवोनि सद्गुरु मूर्ती । मग चरण प्रक्षाळिती स्वहस्तें ॥१६०॥
तें तीर्थ प्राशन करितां । ब्रह्मानंद वाटला चित्तां ।
पूजेचें साहित्य आणोनी तत्त्वतां । सद्गुरुनाथा अर्चिले ॥६१॥
चंदन चर्चोनि निगुती । पुष्पहार गळा घालिती ।
धूपदीप पंचारती । सद्गुरुमूर्ति ओवाळिली ॥६२॥
ऐशा रीतीं करोनि पूजन । सांगितलें आद्यंत वर्तमान ।
अंतर साक्ष तो जनार्दन । परी प्रीतीचें लक्षण दाखवी ॥६३॥
श्रीकृष्णजयंती उत्साह घरीं । वाद्यें वाजती मंगळतुरी ।
अभिषेक पूजा करोनी सत्वरी । मूर्ति मखरी स्थापिल्या ॥६४॥
क्षेत्रवासी लोक समग्र । दर्शनासि येती निरन्तर ।
पक्वान्नें निर्मूनि प्रकार । घालिती उपाहार ब्राह्मणांसी ॥६५॥
श्रीजनार्दन संमुख असनावरी । एकनाथ त्यांजपुढे कीर्तन करी ।
त्या आनंदाची वर्णिता थोरी । कुंठित वैखरी होतसे ॥६६॥
रुप धरोनि ब्राह्मणाचें । पांडुरंग धृपद धरीतसे त्यांचें ।
पायां घागर्या बांधोनि नाचे । प्रेम भक्ताचे बहू देवा ॥६७॥
एकनाथाची प्रसाद उत्तरें । मुखांतूनि निघतांचि अक्षरें ।
मागून झेलित वरच्यावर । पाठांतर जैशा रीती ॥६८॥
क्षेत्रवासी नारी नर । ऐकोनि आश्चर्य करिती फार ।
म्हणती मागील धृपदी द्विजवर । तो कथा समग्र ओढितसे ॥६९॥
एकचि पिंड दोघांचा । ऋणानुबंध जन्मांतरीचा ।
परम भाग्योदय आमुचा । संयोग दोघांचा यासाठी ॥१७०॥
दिवसां ब्राह्मण संतर्पण । रात्री होतसे हरिकीर्तन ।
पैठणीचें भाविक जन । वेधलें मन तयाचें ॥७१॥
नवमीसि मिष्टान्न करोनि फार । समुदाय केला असे थोर ।
मग पारणें सोडित वैष्णववीर । सप्रेम अंतर सर्वदा ॥७२॥
बाळक्रीडा वर्णोनि समस्त । गोपाळकाला आरंभीला तेथें ।
वडजें वांकुडे पेंधे होते । सोंग दावि नानापरी ॥७३॥
झोंबी लावी हा मामा हुंबरी । लपंडाव खेळती नानापरी ।
श्रीनाथ यशोदा होवोनि घुसळण करी । लोणी श्रीहरी भक्षितसे ॥७४॥
चेंडू फुगडी पिंगा खेळती । हाव भाव नानारिती ।
जे लिला वर्णिली श्रीभागवती । तैशाच रीती ते होय ॥७५॥
मग लळित करिती एकनाथ । नानापरिची सोगें आणित ।
प्रासादिक कविता तेथें बोलत । रंग अद्भुत वोढवे ॥७६॥
ध्रुपदी होवोनी चक्रपाणी । स्वमुखें करित संपादणीं ।
श्रोतयासी आश्चर्य वाटत मनीं । गदगदोनी हांसती ॥७७॥
सहा दर्शनें बहुवस । आणि छत्तीस पाखंडे विशेष ।
सिद्धांत अर्थ लावोनि त्यांस । संपादणी बोलिले ॥७८॥
धादांत अर्थ बाहेरी दीसे । अज्ञान जन तेणें रिझतसे ।
सज्ञानासी सिद्धांत भासे । प्रासादिक रस बोलती ॥७९॥
लळित करोनि ऐशा रीतीं । मंचकी निजविल्या श्रीकृष्ण मूर्ती ।
मग करोनि मंगळ आरती । खिरापती वांटिल्या ॥१८०॥
मग नाथासि पुसती जनार्दन । मागें ध्रुपद धरीत ब्राह्मण ।
तो तरी कोठील असे कवण । नामाभिधान पुसावे ॥८१॥
कीर्तनीं ध्रुपद धरितो अपूर्व । सोंग संपादणी नानागौरव ।
तुह्मां उभयतांचा एक जीव । आम्हांसि द्वैतभाव दिसेना ॥८२॥
तुझ्यापदरी पुण्य संपत्ती । यास्तव लाधली याची संगति ।
कीर्तनी रंग आणितसे प्रीति । ऐकतां विश्रांती श्रोतया ॥८३॥
तुझा याचा संयोग साचार । ऐसाचि असावा जन्मभर ।
तरी बहुत होईल जगद्गुद्धार । कीर्तन गजर ऐकता ॥८४॥
मग एकनाथ पुसती त्याजकारणें । तुम्हीं कोण कोठील असा ब्राह्मण ।
ठाव ठिकाण नामाभिधान । आम्हां कारणें सांगिजे ॥८५॥
ऐकोनि म्हणे रुक्मिणीपती । ठाव ठिकाण न धरीच वस्ती ।
प्रेमळ भाविक देखोनि निश्चिती । त्यांचे संगति काळ कंठीं ॥८६॥
विठोबा नांव या देहास । दारापुत्र नाहीं पाश ।
कीर्तनीं ध्रुपदें धरितसे । आणिक अभ्यास तोही नाहीं ॥८७॥
मूठभर अन्न खावोनि निश्चिती । निरंतर असावें तुझे संगति ।
आणिक आशा नसे चित्तीं । खुण इतुकीं सांगितली ॥८८॥
हें जनार्दन ऐकोनि उत्तर । चित्तीं संतोष जाहला थोर ।
परी हा साक्षात इंदिरावर । ऐसा विचार कळेना ॥८९॥
असो चवदा दिवसपर्यंत जाण । होतसे ब्राह्मण संतर्पण ।
सर्व सामग्री तेथें वेंचून । मग सद्गुरु जनार्दन काय म्हणती ॥१९०॥
देवगिरीसि जातो आतां । वृद्धांप्रती स्वमुखे पुसतां ।
त्याणीं चरणीं ठेवोनि माथा । म्हणती विनवणी समर्था एक असे ॥९१॥
श्रीभानुदासाचे वंशी निश्चित । इतुका मात्र वांचला नाथ ।
तुमच्या आज्ञेनें थांबला येथ । परी चित्तीं विरक्त सर्वदा ॥९२॥
गृहस्थाश्रम करावया पाहीं । हे तों इच्छा यासि नाहीं ।
तरी स्वामिनी आज्ञापिजे ये समयीं । म्हणवोनि पायीं लागती ॥९३॥
यांचे लग्न कराल सांचे । तरी समाधान होईल आमूचें ।
पारणें फिटेल डोळींयांचे । नांव स्वामीचें होईल ॥९४॥
ऐसें वृद्धाचें करुणावचन । ऐकोनि द्रवला जनार्दन ।
मग एकनाथासि बोलावून । अमृत वचन बोलती ॥९५॥
जरी स्वईच्छेनें येतां वधू । तरी सुखें करावा लग्नसंबंधू ।
गृहस्थाश्रमें नसेचि बाधू । जन अपवाद चुकवावा ॥९६॥
सकळ आश्रमांमाजी परम । गृहस्थाश्रम अति उत्तम ।
येथें इंद्रियासि लावोनि नेम । सुखरुप स्वधर्म चालवी ॥९७॥
सर्वभूतीं दया पूर्ण । परोपकारी काया झिजवणें ।
ब्राह्मण अतिथि क्षुधितां लागोन । अन्नदान करावें ॥९८॥
यथा विधी विष्णूअर्चन । प्रेमयुक्त करावें कीर्तन ।
सर्वकाळ नामस्मरण । निजप्रीतीनें करावें ॥९९॥
ऐसी सद्गुरु आज्ञा करितां । चित्तीं मानली एकनाथा ।
मौनेंचि चरणीं ठेवी माथां । म्हणे प्रारब्धीं असतां तरी घडे ॥२००॥
मग जनार्दन आपूले परिवारेंसी । चालिलें तेव्हां देवगिरीसि ।
स्वये आज्ञापी एकनाथासी । सौख्य वडिलांसी त्वां द्यावें ॥१॥
सद्गुरुसि बोळवोनि ते अवसरीं । ध्यान ठेविलें हृदयमंदिरीं ।
वियोग नसेचि क्षणभरी । सबाह्य अभ्यंतरीं गुरुरुप ॥२॥
स्नेह लोभ निजप्रीतीसीं । सद्गुरु ठेविती नाथापासीं ।
मग आपण आपले परिवारेंसी । देवगिरीसी पावले ॥३॥
पुढिले अध्यायीं रस उत्पत्ती । वदविता श्रीरुक्मिणीपती ।
निमित्तासि आधार महीपती । सज्ञान जाणती अनुभवें ॥४॥
इति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।
प्रेमळ परिसोत भाविक भक्त । पंचदशाध्याय रसाळ हा ॥२०५॥ अध्याय १५ ॥ ओव्या २०५॥