मंगलाचरण
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यैनमः ॥ श्रीगुरुभ्योनमः ॥ श्रीकुलदेवतायैनमः ॥ श्रीमातापितृभ्यांनमः ॥
जय जय पांडुरंग रुक्मिणीवरा । अचळ अढळ निर्विकारा ।
लीलाविग्रही करुणाकरा । सर्वेश्वरा आदिपुरुषा ॥१॥
जयजयाजी करुणामूर्ती । अनंत अपार तुझी कीर्ती ।
अनंतलीला नाना रीतीं । वर्णितां श्रुती कुंठित ॥२॥
तुवां निज भक्तांच्या कैवारें । घेतले दहा अवतार ।
दुष्टदैत्त्य मारुनि दुर्धर । रक्षिलें साचार निज दासां ॥३॥
आतां कलियुगामाजी साचार । वसविलें पुंडलीकाचें द्वार ।
जघनीं ठेवूनि दोन्ही कर । उभा इटेवर अससी ॥४॥
नासाग्रीं ठेवूनियां दृष्टी । भक्तांसि पाहसी कृपादृष्टीं ।
भाविक जनांसि देऊनि भेटी । भवसंकटीं रक्षिसी ॥५॥
तूंचि झालासि लंबोदर । चौदा विद्यांचा गुणसागर ।
तूंचि चतुर्भुज परशुधर । सर्वांगीं सिंदूर चर्चिला ॥६॥
स्वानंद रसाचे मोदक । निज भक्तांसि देशी भातुकें ।
त्या महाप्रसादाचेनि हरिखें । सप्रेम सुखें डुल्लती ॥७॥
तुझें नृत्य पाहूनि गणपती । आनंदें डोले कैलासपती ।
चौसष्ट कळा उभ्या राहती । घेऊनि हातीं टाळ-विणे ॥८॥
तूं कीर्तनीं उभा जये वेळ । विबुध एकाग्र बैसती सकळ ।
मान तुकावी आखंडळ । घागर्या मंजुळ ऐकुनी ॥९॥
ऐसा तूं गौरीकुमार । सकळ विद्यांचा गुणसागर ।
आतां मज देऊनि अभयवर । संतचरित्रें वदवावीं ॥१०॥
आतां नमूं हंसवाहिनी । जे कां सरस्वती ब्रह्मनंदिनी ।
सकळ चातुर्य जियेपासुनी । होय स्वामिनी नांवरुपां ॥११॥
शुभ्रवस्त्र नेसली सोज्ज्वळ । आरक्त कुंकुमें शोभे निढंळ ।
मस्तकीं केश असती कुरळ । कंचुकीवर पुष्पमाळ शोभती ॥१२॥
हातीं घेउनि ब्रह्मविणा । सदा वर्णीत भगवद्गुणां ।
जिच्या कृपेनें कवि नाना । काव्य रचना बोलती ॥१३॥
आतां सद्गुरु तुकाराम समर्थ । तयासि माझा प्रणिपात ।
ज्याणें अवतार घेऊनि मृत्युलोकांत । दाविला भक्तिपंथ साधका ॥१४॥
योगयाग आणि व्रत । कलियुगीं नव्हेचि यथास्थित ।
नाम संकीर्तनीं तरतील बहुत । वचन व्यासोक्तं भागवती ॥१५॥
त्याचा अर्थ सखोल परम । जड मूढांसि नकळेचि वर्म ।
यास्तव अवतार तुकाराम । साधकांसि नेम लावावया ॥१६॥
ज्याणें नामसंकीर्तन करुनियां । निरसिली सकळ प्रपंचमाया ।
सद्भावें आळवूनि पंढरीराया । केली काया ब्रह्मरुप ॥१७॥
मग प्रसन्न होऊनि रुक्मिणीकांत । चुकविला काळाचा आघात ।
वैकुंठभुवनीं देहासहित । नेलें तुकयातें कलियुगीं ॥१८॥
ज्यांचे अभंग निषेधूनि समस्त । द्विजांनी बुडविले उदंकांत ।
परी तेरा दिवस पंढरीनाथें । कोरडे ग्रंथ रक्षिले ॥१९॥
जो भक्तिज्ञान-वैराग्य पुतळा । ज्यांचे अंगीं अनंत कळा ।
तो सद्गुरु आम्हांसि जोडला । स्वप्नीं दीधला उपदेश ॥२०॥
मी तरी सर्वांविषयीं हीन । ऐसें साक्ष देतसें मन ।
परी कृपा केली कवण्यागुणें । त्याचें कारण तो जाणे ॥२१॥
आंधारानें कोंदलें अंबर । त्यासि प्रकाशमान करी दिनकर ।
कां परीस लोहासि लागतां सत्वर । काळिमा अणुमात्र न राहे ॥२२॥
कां अमंगळ पाणी एकवट । त्यावरी आला गंगेचा लोट ।
तें पवित्रपणें होय गोमटें । मग महामुनि श्रेष्ठ वंदिती ॥२३॥
तेवीं सद्गुरुकृपेचेनि वैभव । ज्ञान अज्ञान गेलें सर्व ।
मग जाणपणाचा अहंभाव । त्याचाही ठाव पूसिला ॥२४॥
जैसें समुद्रासि मिळतां गंगेचें आप । तत्काळ निरसे नांवरुप ।
कां अग्नि इंधन जाळीतसे कोपें । मग आपुल्या स्वरुपें विझे जैसा ॥२५॥
तैसेंचि केलें सद्गुरुनाथें । अज्ञान ज्ञान निरसिलें समस्त ।
सर्वदा राहोनि हृदयस्थ । स्वयें वदवीत भक्तकथा ॥२६॥
आतां महा कवि पुरातन । ग्रंथारंभीं तयासि नमन ।
ज्यांची काव्यरचना गीर्वाण । संस्कृत पुराणें निर्मिलीं ॥२७॥
भवाब्धि हा दुस्तरं सहज । त्यांत श्रीरामकथा निर्मिलें जाहाज ।
तो वाल्मीकि मुनिमहाराजे । साधिलें काज बहुतांचें ॥२८॥
नसतां श्रीराम अवतार पूर्ण । आधींच भविष्य कथिलें तेणें ।
शतकोटि ग्रंथ केला जेणें । त्याचे चरण वंदिले ॥२९॥
वेदशास्त्राचें करोनि मंथन । महाभारत निर्मिलें जाण ।
तो सत्यवतीहृदयरत्न । द्वैपायन नमस्कारुं ॥३०॥
उपजलों जयाचे गोत्रीं जाण । तया वसिष्ठासि साष्टांग नमन ।
तिहीं आपुले कृपें करुन । ग्रंथ संपूर्ण सिद्धि न्यावा ॥३१॥
आतां प्राकृत कवि महासंत । जे ईश्वरी अवतार साक्षात ।
जग विख्यात ज्यांचे ग्रंथ । तयांसि प्रणिपात करितसें ॥३२॥
साक्षात विष्णूचा अवतार । ज्ञानदेव योगेश्वरा ।
गीतेचा अर्थ सखोल थोर । प्राकृत साचार तो केला ॥३३॥
प्रतिष्ठानीं ब्राह्मणीं छळितां निश्चिती । वेद बोलविले रेडया हातीं ।
आणि चांगदेव व्याघ्रावरी बैसोनि येती । मग चालविली भिंती प्रतापें ॥३४॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपानेश्वर । जीवनमुक्त मुक्ताबाई सुंदर ।
ग्रंथारंभीं नमस्कार । वारंवार तयांसी ॥३५॥
जो उद्धवाचा अवतार साक्षात । नामदेव कलियुगांत ।
शतकोटि अभंग वदला प्राकृत । तयांसि दंडवत सद्भावें ॥३६॥
एकनाथ पूर्णज्ञानी । अवतार जाहला प्रतिष्ठानीं ।
ज्याणें विष्णुअर्चन ब्राह्मणपूजनीं । सेवा करुनि ऋणी देव केला ॥३७॥
ज्याची भक्ति देखोनि चोखडी । श्रीकृष्णें खांदा घेतली कावडी ।
पाणी वाहत लवडसवडी । सप्रेम गोडी भक्तीची ॥३८॥
विवेकसिंधु अध्यात्मग्रंथ । श्रीमुकुंदराज विरचित ।
दत्त अनुग्रही दासोपंत । सद्भावें प्रणिपात तयासी ॥३९॥
जो मारुति अवतार साक्षात । रामदास मूर्तिमंत ।
ज्यांनीं दासबोध रचोनि ग्रंथ । संप्रदाय बहुत वाढविला ॥४०॥
जो सकळ चातुर्यांची खाणी । मुक्तेश्वर कवि प्रसिद्ध जनीं ।
भारतीं टीका केली त्यांणीं । ऐकतां श्रवणीं सुख वाटे ॥४१॥
वामनस्वामी चतुर पंडित । ज्याची श्लोकरचना अनुपम दिसत ।
त्यांणीं दशमस्कंध भागवत । केले प्राकृत निजप्रीतीं ॥४२॥
हरिविजय रामविजय अद्भुत । पांडवप्रताप केले ग्रंथ ।
ते नाझरेकर श्रीधरसमर्थ । राहिले पंढरींत निजप्रीतीं ॥४३॥
ऐसे संत प्रसिद्ध जनीं । वरदी ग्रंथ स्थापिले ज्यांणीं ।
वारंवार लोटांगनी । तयांचे चरणीं मी असें ॥४४॥
इहीं साह्य होऊनि मातें । सिद्धीसि न्यावा संपूर्ण ग्रंथ ।
जैसे दुर्बळा गृहीं मांडिलें कृत्य । साहित्य श्रीमंत पुरविती ॥४५॥
तैसाचि मी मतिहीन । नेणें कवित्वकळालक्षण ।
ग्रंथ प्रारंभ केला जाण । भरंवसा धरुन संतांचा ॥४६॥
एक एक अक्षराची भीक । कृपा करुनि द्याल सकळिक ।
तरीच वाढेल माझा लौकिक । सप्रेम सुख श्रोतयां ॥४७॥
जैसी पाकसिद्धीची खटपटी । अज्ञान बाळक न पाहे दृष्टीं ।
परी माता लोभ धरोनि पोटीं । कवळ होंटीं लावी त्याच्या ॥४८॥
तैशाचि परी केलें संतीं । आयतीच ओवी आठवूनि देती ।
मज मूढाहातीं लिहविती । माझी प्रचीती मी जाणें ॥४९॥
आतां नमूं श्रोते सज्जन । जे कां श्रवणार्थी बहुत निपुण ।
तिहीं एकाग्र करुनि मन । अनुसंधान परिसिजे ॥५०॥
जरी श्रोतयांचें चित्त चंचळ । श्रवणार्थीं न बैसे निश्चळ ।
तरी कवीचें लाघव सकळ । सप्रेम वितळते ठायीं ॥५१॥
षंढापासी सुंदर कामिन । कां ज्वरितासि वाढविलें मिष्टान्न ।
बधिरापुढें करितां गायन । सुखसंपन्न नव्हे वक्ता ॥५२॥
आंधळ्यास आरसा दाखविला कोडें । तरी तो न पाहेचि तयाकडे ।
ज्यासि श्रवणाची नाहीं चाड । पाषाणहृदय तैसा तो ॥५३॥
तैसे न व्हां तुम्ही सज्जन । जाणा वक्त्याचें अंतःकरण ।
अर्थान्वयीं असोनि निपुण । नेणतपण धरीतसां ॥५४॥
माझी योग्यता पाहाल जरी । तरी मूढमति सर्वप्रकारीं ।
अक्षरवटिका बरोबरी । नेणें साचार मेळवूं ॥५५॥
सद्भावें महाकवीचे चरण । धुवोनि केलें तीर्थप्राशन ।
तयांचिया कृपागुणें । प्रसादवचन बोलतों ॥५६॥
जैसी भवति भिक्षा करोनि नगरीं । विद्यार्थी मागत माधूकरी ।
त्याची क्षुधां हरण होय परी । चूल घरीं न पेटे ॥५७॥
तैसें माझें वक्तृत्व बरें । पदरींचें नाहीं एक अक्षर ।
हिंडूनि संतांच्या दारोदार । पोटभर जेवीतसें ॥५८॥
परी भिक्षेचें अन्न परमपवित्र । शास्त्रीं निर्णय केला थोर ।
साधक जनीं सेविलें जर । तरी बुद्धि विस्तारे तयाची ॥५९॥
ज्यांसि श्रीहरीची प्राप्ति व्हावी । ऐसी आस्था असेल कांहीं ।
तिहीं होऊनि जीवीं । चरित्रें ऐकावी संतांचीं ॥६०॥
ज्यांसि श्रीहरीची गीत । एकादशांत वदले श्रीकृष्णनाथ ।
तया लक्षणाचें पुरत । अवतरले संत कलियुगीं ॥६१॥
कीं गीतेमाजी द्वादशांत निश्चितीं । श्रीभक्तांचीं लक्षणें सांगें श्रीपती ।
तैसीच करोनि दावावया स्थिती । अवतार संतीं घेतला ॥६२॥
जनांमध्येंचि असती संत । विश्वमात्रासही दिसत ।
परी विकल्पें करुनि नाडि बहुत । अवगुण लक्षिती दृष्टीसीं ॥६३॥
संतांपासीं अवगुण । दिसावया काय कारण ।
येविषयीं आशंकित मन । तरीं तेंही कारण अवधारा ॥६४॥
मातेसि आवडी बाळकांची मोठी । वस्त्रें भूषणें लेववी गोमटीं ।
परी झणी कोणाची होईल दृष्टी । मग मैस बोटीं लावीत मुखा ॥६५॥
तेवीं भक्ति ज्ञान वैराग्य निश्चित । भक्तां श्रृंगारी वैकुंठनाथ ।
परी लोकनिंदा व्हावया निश्चित । अवगुण ठेवीत एक तयां ॥६६॥
बाळकाच्या मुखास दिसतें काळें । परी माता म्हणे म्यांच लाविलें ।
तेवीं आपुल्या दासांचे दीनदयाळें । गुणदोष सर्वकाळ न पाहे ॥६७॥
येचिविषयीं तुम्हीं समस्त । पुराणप्रसिद्ध ऐका भक्त ।
नारदमुनि वैष्णवसंत । परी कळिलावा म्हणत तयालागीं ॥६८॥
श्रीरामभक्त परम मारुती । त्यासि क्षणभरी न विसंबे रघुपती ।
परी वानरचेष्टा त्या असती । त्या न जातीच सर्वथा ॥६९॥
गरुड विष्णूंचे वाहन । सर्वदा सन्निध असे जाण ।
परी सर्प भक्षितो म्हणवून । त्यासि जगज्जीवन नुपेक्षी ॥७०॥
निंदक सद्गुण नाठवूनि कांहीं । स्वाभाविक अवगुण धरिती जीवीं ।
जैसी चाळणी पीठ गाळूनि सर्वही । फुलकट ठेवी आपणांत ॥७१॥
असो आतां हें भाषण । वाग्देवीस होईल शीण ।
जनांत अवतरले संतसज्जन । ते इतरांसमान न म्हणावे ॥७२॥
सरिता नव्हे भागीरथी । श्रीविष्णुचरणीं तिची वस्ती ।
दर्शनें पापताप नासती । तैशाचि मूर्ती संतांच्या ॥७३॥
पाषाणं म्हणों नये परिसा । विष्णु अवतार नव्हे मासा ।
वराह इतर डुकरा ऐसा । लेखों सहसा नयेची ॥७४॥
स्तंभांत प्रगटला हरी । तयासि म्हणों नये केसरी ।
जरी तो ब्राह्मणाचा वेषधारी । परी वामन भिकारी न म्हणावा ॥७५॥
इतर ब्राह्मण रागीट बहुत । तैसा नव्हे रेणुकासुत ।
भूपति म्हणों नये रघुनाथ । नामेंचि तारित विश्वातें ॥७६॥
श्रीकृष्ण परब्रह्म अवतार लीला । तयासि म्हणों नये गोवळा ।
तैसे संत दिसती डोळां । परी मनुष्य त्यांजला म्हणों नये ॥७७॥
धनवरी गावे श्रीहरीचे गुण । आणि जगदुद्धार करावा पूर्ण ।
यास्तव अवतरले संतसज्जन । आणिक कारण नसे कीं ॥७८॥
त्यांचीं चरित्रें व्हावया प्रख्यात । युक्ति केली पंढरीनाथें ।
मज पुढें करुनि निमित्त । श्रीभक्तविजय ग्रंथ वदविला ॥७९॥
दुसरा संतलीलामृतसार । त्यांतही चरित्रें वर्णिलीं फार ।
परी आणिक कथा राहिल्या अपार । मग रुक्मिणीवरें आज्ञापिलें ॥८०॥
म्हणोनि भक्तलीलामृत जाण । ग्रंथ आरंभिला दुसर्यानें ।
तंव श्रोते आशंकित होऊनि मनें । करिती प्रश्न वक्तया ॥८१॥
संतचरित्रें तीं ठायीं । वर्णावयासि कारण कायी ।
हाचि संशय आमुच्या जीवीं । एकचि ग्रंथ का न केला ॥८२॥
तरी येचिविषयीं ऐका सादर । देवभक्तांचीं चरित्रें फार ।
जैसा का अफाट समीर । नायके उत्तर कोणाचें ॥८३॥
ऐसा जो का प्रभंजन । कैसा होय आपुल्या स्वाधीन ।
मग विंझणा करोनि निर्माण । हालवि त्या आधीन होय वारा ॥८४॥
तैसीं श्रीहरीचीं चरित्रें बहुत । बहुतां ऋषीचें बहुमत ।
मग श्रीव्यासें करुनि युक्त । पुराणें निर्मित अठरा ॥८५॥
तरी धन नपुरेचि जाण । नाकळती अनंताचे गुण ।
मग आणिकही उपपुराणें । द्वैपायन करीतसे ॥८६॥
एकचि वेद असता थोर । तरी ब्राह्मण पढते कोठवर ।
म्हणोनि शाखापरत्वें सार । केले भाग चार तयाचे ॥८७॥
कां एकचि असतें रामायण । तरी संपूर्ण ग्रंथ न होता श्रवण ।
म्हणोनि सप्त कांडें पूर्ण । वाल्मीकि मुनिनें विभागिलीं ॥८८॥
कां अवघ्या भारतीं तत्वता । वर्णिल्या कौरव पांडवांच्या कथा ।
इतुका ग्रंथ एकचि असता । तरी तो नाकळता कोणाहि ॥८९॥
मग व्यास नारायणें निजांगें । त्याचे केले अठरा भाग ।
एकचि पर्व ऐकतां चांग । तरी सकळ जग उद्धरे ॥९०॥
कलियुगीं भक्त शिरोमणी । बहुत झाले सत्वगुणी ।
ज्यांनीं सत्त्वासि न करोनि हानी । चक्रपाणी वश्य केला ॥९१॥
त्यांची चरित्रें संपूर्ण । एकदाचि बुद्धी नाकळती जाण ।
जेव्हां जी झाली आठवण । तीं चरित्रें लिहून ठेविलीं ॥९२॥
यास्तव संतचरित्रें पाहीं । विभागिली तिहीं ठायीं ।
ऐसा दृष्टांत देतांचि कवि । श्रोते सर्वही संतोषलें ॥९३॥
म्हणती मागील महाकवीचें मत । आम्हांसि निवेदिलें समस्त ।
तेणेंचि निःसंशय जाहलें चित्त । प्रेमभरित जाहलों ॥९४॥
आतां सोडूनि सकळ स्तवन । अनुसंधानीं लाविजे मन ।
ऐसी आज्ञा करितां सज्जन । महीपति चरण वंदितसे ॥९५॥
म्हणे ऐकावें देवोनि चित्त । कलियुगीं घर्म लोपले समस्त ।
तरणोपाय नसे किंचित । मग आज्ञा करीत जगदात्मा ॥९६॥
निजभक्तांसि वैकुंठपती । म्हणे तुम्हीं अवतार घ्यावें क्षितीं ।
गावोनि माझी सद्गुणकीर्ति । सगुणभक्ति स्थापिजे ॥९७॥
नामस्मरणाविण कांहीं । कलियुगीं तरणोपाय नाहीं ।
ऐसें सांगतांचि शेषशायी । निजभक्त पायीं लागले ॥९८॥
म्हणती तुवां जगज्जीवनें । मागें दश अवतार घेऊनि ।
दुष्ट दैत्यांसि मारोनी । धर्मस्थापन पैं केलें ॥९९॥
आतां आम्हां आधीन हेंचि कृत्य । षड्वैरी जिंकोनि समस्त ।
जनासि दाखवूनि भक्तिपंथ । सेवूं नामामृत धरणीवरी ॥१००॥
ऐसें बोलोनियां उत्तर । मग नमस्कारिला इंदिरावर ।
संतीं घेतले अवतार । विश्वोद्धार करावया ॥१॥
त्यांची चरित्रें श्रीव्यासमुनी । बोलिले भविष्योत्तरपुराणीं ।
परी तो ग्रंथ पिनाकपाणी । कैलास भुवनीं ठेवितसे ॥२॥
जैसें श्रीरामचरित्र वाल्मीकीनें । आधींच भविष्य कथिलें जाण ।
शतकोटि ग्रंथ ठेविला लिहून । पुढें आलें घडोन तैशाच रीतीं ॥३॥
तैसें भविष्योत्तर पुराणांत । कलियुगींचे वर्णिले भक्त ।
परी तो कैलासीं राहिला ग्रंथ । नाहीं समस्त या लोकीं ॥४॥
तरी संतचरित्रें अति गहन । प्रख्यात जाहलीं कोठून ।
ऐसी आशंका धराल मनें । तेही कारण अवधारा ॥५॥
तो हिंदुस्थान देशांत पूर्ण । नाभाजी नामें वैष्णव जन ।
संतचरित्रे वर्णिलीं त्यानें । ग्वाल्हेर भाषेनें निश्चित ॥६॥
तयाच्या आधारें निश्चित । वदतसें भक्तलीलामृत ।
तंव श्रोते होऊनि आशंकित । प्रश्न करीत वक्तया ॥७॥
म्हणती नाभाजी यातील कोण । काय आचरला अनुष्ठान ।
संतलीला वर्णिली तेणें । कोणाच्या कृपेनें सांग पां ॥८॥
तरी त्याची गुरुपरंपरा ऐसी । रामानंदस्वामी संन्यासी ॥
त्यांचें वास्तव्य वाराणसीं । महासमर्थ तापसी जे ॥९॥
भक्तिज्ञान वैराग्य निश्चित । हें त्याचे देही मूर्तिमंत ।
आनंदानंदस्वामी निश्चित । शरण येत त्या लागीं ॥११०॥
तया आनंदानंदाचा शिष्य जाण । पोहरीदास नामाभिधान ।
अग्रजी किलजी दोघेजण । शिष्य निपुण तयाचे ॥११॥
वडील अग्रजी ज्याची स्थित । सदा सर्वदा असे विरक्त ।
श्रीविष्णु भजनीं सावचित्त । सप्रेम गात गुणनामां ॥१२॥
जो शांतिक्षभेचें निजबीज । अध्यात्मज्ञानीं तेजःपुंज ।
ज्याणें भक्तिभावें करुनि सहज । गरुडध्वज आराधिला ॥१३॥
ज्याच्या वक्तृत्वाची मती । उपमेसि जैसा बृहस्पति ।
लीनता तरी सर्वाभूतीं । अंगीं महंति असेना ॥१४॥
आत्मत्वें सर्वत्र जाणें जीव । चित्तीं नसेचि द्वैतभाव ।
मान्यत्वें तरी थोरथोर राव । चरण सद्भावें वंदिती ॥१५॥
शिष्य प्रबोधिनी पद्महस्ती । बहुतां जनांसि लाविलें भक्तीं ।
स्नानसंध्या शुचिर्भूत चित्तीं । सबाह्य स्थितीं सारखा ॥१६॥
श्रवण कीर्तन आणि स्मरण । पादसेवन अर्चन वंदन ।
दास्य सख्य आत्मनिवेदन । हें नवविध भजन हरीचें ॥१७॥
एक एक भक्ती केली बहुती । परी सर्वत्र कोणासि न घडतीं ।
ते मागील ग्रंथीं बोलिजेती । पुराणी गर्जती पवाडे ॥१८॥
परी स्मरणेंकरुनि कलियुगांत । जडजीव तरले असंख्यात ।
यास्तव अग्रजी भजन करीत । अहोरात्र निजप्रेमें ॥१९॥
त्याचा प्रेमा देखोनि थोर । देवें दीधला साक्षात्कार ।
मग सगुणरुपें रुक्मिणीवर । निरंतर भेटती ॥१२०॥
अग्रदास जेव्हां गमन करिती । मागें येतसे कृष्णमूर्ती ।
भावाचा भुकेला वैकुंठपती । आणिक चित्तीं नावडेचि त्यां ॥२१॥
जप तप व्रतें अनुष्ठान । येथें भावचि मुख्य कारण ।
भावावांचूनि केलें अर्चन । तें दांभिक जाण व्यर्थची ॥२२॥
भक्ती वांचूनि योगसाधन । करीतां सिद्धि न पावे जाण ।
तयासि इंद्रादिक गण । सिद्धीची विघ्ने पाठविती ॥२३॥
वेदशास्त्रें पुराणें सकळ । भक्तीवांचूनि अवघें निष्फळ ।
तो तीर्थें हिंडला जरी सकळ । तरी भक्तिविण फळ नयेचि ॥२४॥
भक्तीवांचूनि केलें कीर्तन । तें जैसें गोरियाचें गायन ।
कवित्वकळा भक्तीवीण । तरी प्रख्यात होणे अघटित ॥२५॥
जरी निपुण झाला सिद्धांतग्रंथीं । अध्यात्मज्ञान उदंड कथी ।
चित्तीं नसे प्रेमळ भक्ती । तरी व्यर्थ व्युत्पत्ती ते गेली ॥२६॥
असोत हीं भाषणें सकळ । अग्रदास वैष्णव प्रेमळ ।
ज्याणें भक्तीभावें करुनि सकळ । वैकुंठपाळ वश केला ॥२७॥
भक्तीज्ञानवैराग्य लक्षण । हें त्याचें अंगीं झालें भूषण ।
म्हणोनि साक्षात दर्शन । जगज्जीवन दे तया ॥२८॥
तंव कोणे एके अवसरीं । तद्देशीं दुष्काळ पडिला भारी ।
अन्न न मिळेचि पोटभरी । माता अव्हेरी बाळकातें ॥२९॥
भाकर मागतें म्हणवून । गंगातीरासि आली त्वरेनें ।
खेळावयासि गुंतलें तान्हें । मग चुकावून ते गेली ॥१३०॥
हरिणी गेली टाकूनि पाडसा । मग तें विलोकित दाही दिशा ।
तैसीच तया पातली दशा । क्षुघेनें वळसा मांडिला ॥३१॥
मातेच्या नांवें नानापरी । रुदनं करीत ते अवसरीं ।
तों अग्रदास स्नानासि सत्त्वरी । गंगातीरीं पातले ॥३२॥
तों तेथें क्षुधित अन्नावीण । बालक रडतसे किलवाणें ।
वैष्णवदास कळवळिला मनें । तयासि वर्तमान पुसतसे ॥३३॥
तया समीप जाऊनि निश्चित । म्हणे कशास्तव रडसी येथें ।
हें मज सांगावें त्वरित । ऐसें पुसत तयासी ॥३४॥
तो म्हणे मी अन्न मागतां । मज चुकावूनि गेली माता ।
ऐसी देखोनि त्याची अवस्था । कृपा चित्ता उपजली ॥३५॥
म्हणे सर्वथा भय न घरीं मनें । म्हणोनि दीधलें आश्वासन ।
यास्तव नाभाजी नामाभिधान । वैष्णवजन ठेविती ॥३६॥
मग स्नान करोनि गंगातीरीं । नित्य नेम सारिला सत्वरी ।
मुलासि घेऊनि बरोबरी । मठाभीतरीं प्रवेशले ॥३७॥
अग्रजी वैष्णव महंत थोर । अन्नशांति करितसे फार ।
कोणी प्राणी क्षुधातुर । येऊनि पोटभर जेवितसे ॥३८॥
वैष्णव वैरागी महापुरुष । नित्य जेविती पंक्तीस ।
त्यांचें उच्छिष्टं उरतसे । तें अग्रजी मुलास देववीतसे ॥३९॥
म्हणती दुष्काळी मरतां उपवासी । माता टाकूनि गेली यासी ।
तें आम्हीं आणिलें मठासीं । संरक्षण जीवासी व्हावया ॥१४०॥
रांडकीचा मूल म्हणवितो जाण । नेणो यातीचा आहे कोण ।
मठांत आणिता त्याजकारण । संकोच मन होतसे ॥४१॥
यास्तव कोपट अंगणांत । बांधूनि दीधलें असे त्यातें ।
संतांचे उछिष्ट प्रसाद उरत । तो नेऊनि देत त्यालागीं ॥४२॥
श्रीविष्णुमूर्तीचें अर्चन । षोडशोपचारें होतसे जाण ।
नाभाजी बाहेर उभा राहून । रुपगुण पाहतसे ॥४३॥
घरासि येतां वैष्णवजन । तयांसि करी साष्टांग नमन ।
उच्छिष्ट प्रसाद सेवितसे जाण । याविण साधन श्रेष्ठ नसे ॥४४॥
सत्समागमाचेनि गुणें । नित्य होतसें भागवतश्रवण ।
तेणे महादुरितांचें जाहलें दहन । अद्भुत ज्ञान प्रगटलें ॥४५॥
जीवमात्राचें मनोगत । तें न सांगतां सर्व कळत ।
जाणे भूतभविष्य वृत्तांत । परी सर्वथा मात न बोले ॥४६॥
समुद्रापलीकडे होतें काय । तेंही नाभाजीसि श्रुत होय ।
स्वर्गीचा शब्द ऐकत आहे । परी कोणासि नये प्रत्ययां ॥४७॥
तंव कोणे एके दिवसीं जाण । अग्रजी करुनि गंगास्नान ।
करीत बैसले देवतार्चन । एकाग्रमन होऊनी ॥४८॥
विष्णु अर्चन झालिया निश्चित । मग वोंवाळिला लक्ष्मीकांत ।
साष्टांग घालोनि दंडवत । केला प्रणिपात सद्भावें ॥४९॥
मग धाबळीचा घुंगुट घेऊनि वोजा । अग्रजी करीत मानस पूजा ।
ध्यानासि आणितां गरुडध्वजा । एकाग्र वोजा बैसले ॥१५०॥
कवाड आडकोनि ते अवसरीं । नाभाजीस बैसविलें द्वारीं ।
म्हणे कोणासि येऊं न द्यावें भीतरीं । आज्ञां करी त्याजला ॥५१॥
ऐसें सांगतां सद्गुरुनाथ । नाभाजी द्वारीं बैसे त्वरित ।
अग्रजी एकाग्र करोनि चित्त । श्रीकृष्णनाथ आठवित ॥५२॥
परी ध्यानासि नये जगज्जीवन । म्हणे कोठें गुंतला रुक्मिणीरमण ।
कैसें करावें मानूसपूजन । विचार मनीं करीतसें ॥५३॥
नाभाजी होता बाहेर द्वारीं । तो अग्रजीस म्हणे ते अवसरीं ।
एक जाहाज बुडताहे समुद्रीं । सौदागर अंतरीं चिंतावला ॥५४॥
त्याणें नवसिला द्वारकापती । जरी मज पावसी सत्वर गती ।
तरी पांचवा वांटा अग्रजीप्रती । देईन निश्चिती जाणपां ॥५५॥
त्याचे जाहाज काढावया निश्चित । समुद्रीं गुंतले वैकुंठनाथ ।
त्यास्तव नयेचि ध्यानांत । क्षण एक निवांत बैसावें ॥५६॥
जाहाज काढिलें तत्काळ । आतां येतील दीनदयाळ ।
तुम्ही मागुतीं होऊनि निश्चळ । रुप सांवळे विलोका ॥५७॥
ऐकोनि नाभाजीचें उत्तर । अग्रजीस आश्चर्य वाटलें थोर ।
घ्यानीं पाहतां सारंगधर । तों उदकें पीतांबर भिजलासे ॥५८॥
सर्वोपचारें पूजोनि तेव्हां । अग्रजी म्हणे रे माधवा ।
कोठे गुंतला होतासि देवा । वृत्तांत सांगावा मजपासीं ॥५९॥
ऐसे पुसतां भक्त प्रेमळ । हांसोनि बोले दीनदयाळ ।
जाहाजा बुडवितां समुद्र जळ । आम्हीं तत्काळ काढिले ॥१६०॥
सावकारे नवस केला सहज । कीं पांचवा विभाग देईन तुज ।
मग मी जाऊनि गरुडध्वज । साधिलें काज तयाचें ॥६१॥
तुझे पदरीं खर्च बहुत । अखंड जेविता साधुसंत ।
सावकार हुंडी पाठवील येथ । ऐसें बोलत जगदात्मा ॥६२॥
मानसपूजा होतां निश्चित । मग नाभाजीस बोलाविलें आंत ।
म्हणे तुज देवाजीचें मनोगत । कैसा वृत्तांत श्रुत झाला ॥६३॥
त्याणें चित्तीं धरुनि प्रेमा । म्हणे हा संतांचा प्रसाद महिमा ।
तुम्हीं सद्गुरु जोडलेती आम्हां । सोडवा भवभ्रमा पासूनी ॥६४॥
सच्छिष्य सांगतां ऐशारीतीं । अग्रजी तयासि आज्ञा करिती ।
भव तरावया उपाव निश्चिती । वर्णावी कीर्ती श्रीहरीची ॥६५॥
भगवद्गुण तों वर्णिलें बहुतीं । महाऋषीं आणि सभाग्य संतीं ।
तरी आतां वर्णावी संतांची कीर्तीं । तरणोपाय निश्चिती अन्य नसे ॥६६॥
दोहरा ॥ गुरु अगर देव आगे कोनही ।
भवतरनेकूं नहि उपाव । नाभा हरि भक्तनके जस गावे मनभाव ॥१॥
तेचि आज्ञा वंदोनि निश्चित । नाभाजी ग्रंथासि प्रारंभ करिती ।
चहूं युगांत झाले भक्त । ते वर्णिले निश्चित तयानें ॥६७॥
ग्वालेर देश भाषा जाण । छपया केल्या असती त्यानें ।
तयाच्या आधारें करुन । प्राकृत भाषण वदतसें ॥६८॥
आणिक स्वदेशामाजी निश्चित । प्रख्यात जाहले महासंत ।
त्यांच्या वंशी सज्ञान महंत । त्यांचे वचनार्थ पाहिले ॥६९॥
आपुल्याची मतें वदलों जर । तरी सर्वज्ञ न मानिती उत्तर ।
यासी साक्ष रुक्मिणीवर । जाणें अंतर सकळांचें ॥१७०॥
ज्यांणीं संतांसि वर्णिलें तत्त्वतां । प्रथम लागली त्याची कथा ।
ऐसी आशंका धराल चित्ता । तरी पुरातन वार्ता ऐकावी ॥७१॥
आधीं वाल्मीकीची उत्पत्ति जाण । त्यावरी जाहले रामायण ।
द्वैपायना वांचूनि पूर्ण । भारत निर्माण कोण करी ॥७२॥
म्हणोनि संतांच्या दासाचें । आधींच वर्णिलें साचें ।
ऐसें मत ऐकूनि कवीचें । प्रेम श्रोतयाचें दुणावलें ॥७३॥
म्हणती तुझीं दृष्टांत उत्तरें । ऐकोनि तोषलों साचार ।
आतां पाल्हाळ टाकोनि सत्वर । संत चरित्रें वदावीं ॥७४॥
देखोनि श्रोतयांचें आर्ती । चरण नमस्कारी महीपती ।
म्हणे ग्रंथ वदविता रुक्मिणीपती । मी तों मंदमती अज्ञान ॥७५॥
तो दीनदयाळ कैवल्यदानी । जैसी वदवील प्राकृत वाणी ।
ते सादर होऊनि संतसज्जनीं । ऐकिजे कर्णी निजप्रेमें ॥७६॥
अन्नापरिस क्षुधाचि गोड । म्हणवोनि आर्ताचें पुरे कोड ।
आणि आकर्णनीं नसली जरी चाड । तरी न लगती गोड भक्तकथा ॥७७॥
एक प्रेमाचें आर्त्त असतां मनीं । आणि उदंड कथा ऐकिल्या श्रवणीं ।
परी एकही स्मरण न धरे मनीं । ते संसार कर्दमीं गुंतलें ॥७८॥
तैसे नव्हां तुम्ही सज्जन । ग्रंथशोधक अति निपुण ।
न्यून तें पूर्ण करोनि घेणें । सात्विक लक्षण हें अंगीं ॥७९॥
पुढिले अध्यायीं रस अद्भुत । वदविता श्रीरुक्मिणीकांत ।
महीपति त्याचा मुद्रांकित । बोल बोलत शिकविले ॥१८०॥
स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।
प्रेमळ परिसोत भाविक भक्त । प्रथम अध्याय रसाळ हा ॥
अध्याय॥१॥ओव्या॥१८१॥दोहरा॥१॥एवंसंख्या॥१८२॥