श्रीगणेशाय नमः ॥
विस्तीर्ण मेळवूनि पारडें । पृथ्वीचें वचन होईल कोडें ।
परी भगवद्भक्तांचे पंवाडे । वर्णिले कोरडे न जाती ॥१॥
समुद्राची गर्जना मोठी । तयासही सांगवतील गोष्टी ।
परी भगवज्जनांची कीर्ति मोठी । वर्णितां हिंपुटी कवि होती ॥२॥
समोर चंचळ असे बहुत । तो ही कोंडवेल पिंजरियात ।
परि विष्णुदासांची अनुपम स्थित । वर्णितां कुंठित होय वाणी ॥३॥
आकाशासि देववेल आधार । अस्तासि जातां धरवेल भास्कर ।
परी भगवद्भक्तांचें सारें चरित्र । ग्रंथीं साचारे लेहवेना ॥४॥
पृथ्वीवरील तृणांकुर जाणा । याचीही टीप देववेल कोणा ।
परी देवभक्तांची चरित्रें नाना । यांची गणना न होय ॥५॥
ऐसी अपार ज्याची कीर्ती । तेथें महाकवीची कुंठित मती ।
तेथें वल्गना करीं मी मूढमती । हा अपराध संतां क्षमा कीजे ॥६॥
जैसें माते पुढें लाडकें डिंगर । भलतीचें बोले अवाक्षर ।
तयासि कौतुक वाटे फार । लोभा पर मग होय ती ॥७॥
सांगीतलें काम करी चाकर । तोचि स्वामीसि आवडतो फार ।
शहाणा वाद घालितो थोर । तो दृष्टी समोर आवडेना ॥८॥
तैसें माझें अज्ञानपण । जाणोन तुष्टला रुक्मिणी रमण ।
संत चरित्रें गुप्त ठेवण । ते दीधलें धन मज हातीं ॥९॥
तो हृदयस्थ राहोनि निरंतर । जितका करी बुद्धीचा प्रसर ।
तोचि ग्रंथीं लिहितों अक्षर । आणिक विचार असेना ॥१०॥
मागिले अध्यायीं कथा कोण । प्रतिष्ठान क्षेत्रांचा जो ब्राह्मण ।
ज्ञानदेवाचें चरित्र बोलेन । केलें निवेदन चांगदेवा ॥११॥
वेद बोलविले रेडया हातीं । आणि पितृलोक उतरविला क्षितीं ।
ऐसी ऐकूनि सत्कीर्त्ती । मग विस्मित चित्तीं मरुद्गण ॥१२॥
सत्य असत्य म्हणवोनि । ऐसा संशय वाढला मनीं ।
मग प्राणायाम करुनि त्यांनीं । एकाग्र मनीं बैसले ॥१३॥
ब्रह्मांड भुवनीं झालें काय । हें योगेश्वर विचारुनि पाहे ।
तों तिन्ही देवाचे अवतार होय । आला प्रत्यय मनासीं ॥१४॥
रेडिया हातीं प्रतिष्ठानीं । वेद बोलविले ज्ञानेश्वरांनीं ।
आणि पितर साक्षात् आणिलें मेदिनी । हेही करणी साच दिसे ॥१५॥
ऐसा विश्वीं विश्वरुप होऊनि सत्वर । ध्यानांत पाहे योगेश्वर ।
अंतरीं प्रत्यय येतांचि सत्वर । स्वदेहावर मग आले ॥१६॥
शिष्यसंप्रदायी योगेश्वर । आणिक यात्रा मिळाली अपार ।
चांगदेव टाकूनि अहंकार । तयांसी उत्तर बोलतसे ॥१७॥
म्हणे ऐका सकळ लावूनि प्रीती । आमुची मागील कर्मगती ।
इंद्रें शापिलें आम्हांप्रती । अपराध चित्तीं जाणोनियां ॥१८॥
पुढती तुष्टोनि पुरंदर । उश्शाप दीधला मज सत्वर ।
तिन्हीं देवाचें अवतार । होतील साचार क्षितीवरी ॥१९॥
तूं त्यांसि शरण जातां देख । मग मुक्त होशील तात्काळिक ।
आपुला पावोनि स्वर्गलोक । पूर्ववत सुख भोगिसी ॥२०॥
ऐसें बोले पुरंदर । मग आम्ही उतरलों क्षितीवर ।
येथें योगसाधन करोनि थोर । सिद्धाई फार दाखविली ॥२१॥
ज्ञानदेवाचे पहावया पाय । चौदाशें वर्षे वांचविला देह ।
तयाचा अवतार जाहला आहे । तरी जावें लवलाहें भेटीसी ॥२२॥
ऐकोनि चांगयाचें उत्तर । शिष्य जाहले चिंतातुर ।
म्हणती स्वामीसी भेटतां ज्ञानेश्वर । जातील सत्वर मोक्षपदा ॥२३॥
यांचें पंक्तीस येतसे मुक्ती । नानापरीचे पदार्थ मिळती ।
म्हणोनि चांगदेवासी बोलती प्रीतीं । अडखळा घालिती जावया ॥२४॥
जैसा बळी वामनासि रिघतां शरण । तों शुक चिंताक्रांत मनें ।
म्हणे मोक्षपदा नेल्या याजकारणें । मग कुटुंब पोषण कोण करी ॥२५॥
म्हणोनि संकल्प घालितां त्याजला । कवि घालीतसे अडखळा ।
तैसा सेवकांनी चांगयाला । उपाय रचिला तो ऐका ॥२६॥
म्हणती दुसर्याची कीर्ति ऐकोनि पाहे । स्थान भ्रष्ट सर्वथा होऊं नये ।
तेणें महत्वासि हानि होये । हीनत्व येता हे आपणासी ॥२७॥
सिद्धाईच्या प्रकार रीती । अनेक योग्यांच्या भिन्न असती ।
याजकरितां सांगतों युक्ती । ती स्वामी ऐकती तरी बरें ॥२८॥
आधीं ज्ञानदेवासि सत्वर । आपल्या हातें लिहावें पत्र ।
त्याचें उत्तर आलियावर । मग सत्वर बीजें कीजे ॥२९॥
ऐशा ऐकूनि वचनोक्ति । योगेश्वरासि मानलें चित्तीं ।
मग दौत लेखणी आणोनि प्रीती । विचार करीती मनांत ॥३०॥
हातीं घेवोनियां पत्र । लेखनार्थ करी विचार ।
म्हणे श्रेष्ठत्वें यासि ल्याहावे जर । तरी बाळत्वें साचार वय त्याचें ॥३१॥
कनिष्ठ लेखावें आपणाहुनि । तरी असाध्य करणी दाखविली जनी ।
लहान म्हणों नये अग्नी । लाधतां इंधनी थोर होय ॥३२॥
आवरोंनि वसुंधरा धरिली पाहे । त्या वासुकीस किरडू म्हणो नये ।
इतर गाई समान पाहे । तैसी नव्हे कामधेनु ॥३३॥
उगमीं गंगेचें लहान पात्र । परी तिच्या उदकें समुद्र ।
पक्षिया ऐसा दिसे खगेंद्र । तरी वागवी पाठीवर विष्णूतें ॥३४॥
दशरथाचा बाळ रामराणा । त्यानें शिक्षा केली दशानना ।
श्रीकृष्ण यशोदेचा तान्हा । परी नखीं गोवर्धना उचलिलें ॥३५॥
परब्रह्म अणुरेणू हूनि सान । परी तयाचे रोमंरध्रीं त्रिभुवन ।
तैसें ज्ञानदेवाचें वय लहान । परी अघटित विंदान दाखविलें ॥३६॥
म्हणोनि विचार पडला चित्तीं । पत्र ल्याहावें कैशा रीतीं ।
मग दोघां शिष्यांहातीं । कोराची पाठविती कागद ॥३७॥
म्हणे ज्ञानदेवासि ल्याहावया पत्र । बुद्धि न सुचे अनुमात्र ।
तटस्थ राहिले घटका चार । मग कोरेंच पत्र दिधलें ॥३८॥
स्वमुखें सांगतसे शिष्यांसी । तुम्हीं जावें आळंदीसीं ।
त्या चौघा जणांची स्थिती कैसी । तेही ध्यानासी आणावी ॥३९॥
कोण उपासना कैसी भक्ती । स्नान संध्या कैसी करिती ।
कैसा साक्षात्कार तयांप्रती । ऐसें चित्तीं ओळखावें ॥४०॥
कोणते शास्त्र केलें पठण । कैसें करिती अध्ययन ।
कोणतें पुराण श्रवण मनन । हेंही संपूर्ण पहावें ॥४१॥
कैशा रींतीं भूतदया । कैसी पाहाती वैष्णवी माया ।
कोणत्या योगें दमिती इंद्रियां । तपश्चर्या ते कोणती ॥४२॥
कैसी जनांत दाखविती स्थिती । योगक्षेम चालले कोणे रीतीं ।
कोणत्या त्याणीं साधिल्या युक्ती । ऐसें चित्तीं समजावें ॥४३॥
कोणत्या विद्या कोणत्या कळा । कैसी त्यांची दिसती लीला ।
कोणत्या सिद्धीचा सोहळा । जनांच्या डोळां दाखविती ॥४४॥
ऐसें सांगोनी नानापरी । पत्र दीधलें त्यांचे करी ।
म्हणे सत्वर जाऊनि अळंकापुरी । उत्तर माघारीं घेऊनि या ॥४५॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान । अवतारी पुरुष तिघे जण ।
मुक्ताबाई समवेत पूर्ण । आमुचें नमन त्यांसि सांगा ॥४६॥
ऐसे सांगोनि योगेश्वर । त्याचे मस्तकीं ठेविला करा ।
करुनि साष्टांग नमस्कार । निघाले सत्वर उभयतां ॥४७॥
चित्तीं धरुनियां प्रेम । स्मरती चांगयाचे नाम ।
तेणें पूर्ण होती सकळ काम । जीवासि आराम वाटतसे ॥४८॥
आसनी शयनीं आणि भोजनीं । जागृतीं आणि सुषुप्तीं स्वप्नीं ।
या अवस्था विसर न पडोनि । सद्गुरु वांचोनि सर्वथा ॥४९॥
प्रयाणासि घटका एक झाली । तों चांगदेवें कांहीं कळा केली ।
एकाएकींच आळंदी लागली । परी नाहीं वोळखिली सर्वथा ॥५०॥
गांवींच्या लोकांसि पुसती ब्राह्मण । काय क्षेत्राचें नामाभिधान ।
पुढें नदी वाहतसे कोण । हें आम्हां कारणें सांगिजे ॥५१॥
मग ग्रामवासी देती उत्तर । याचें नाम अळंकापुर ।
पुढें इंद्रायणी तीर्थ थोर । महिमा अपार येथिंचा ॥५२॥
मग विस्मत होवोनियां चित्तीं । ग्रामवासी लोकांस पुसती ।
तपती चांगदेव येथोनि किती । हें आम्हांप्रती सांगावें ॥५३॥
ग्रामवासी बोलती जन । तपती चांगदेव अडतीस योजन ।
आम्हींही गेलों होतो जाण । चांगदेव दर्शन घ्यावया ॥५४॥
घटिकेंत दीडशें कोस पंथ क्रमिला । याचा विस्मयो कासयाला ।
स्वामींचे आंगी ऐसीच कळा । आम्हीं प्रत्यक्ष डोळां देखिली ॥५५॥
ऐसें क्षेत्रवासी जन । सांप्रदायांसी बोलती वचन ।
मग ते दोघे ब्राह्मण । करिती स्नान इंद्रायणीं ॥५६॥
नित्यनेम सारोनि बरवा । गांवांत प्रवेश करिती तेव्हां ।
ज्ञानदेवाचें दर्शन होईल केव्हां । आवडी जीवा हे बहु ॥५७॥
तो एक विष्णुस्वरुपी द्विजवर । भेटला तयांसि वाटेवर ।
तयासि पुसती ज्ञानेश्वर । राहती तें घर सांगावें ॥५८॥
खाणाखुणा पुसोनि चोहटा । सत्वर चालिले त्यांच्या मठा ।
तों तेथे चमत्कार देखिला मोठा । तो कर्ण संपुटा ऐकिजे ॥५९॥
चांगयाचे शिष्य दृष्टीसीं । देखतांचि कळलें ज्ञानियासीं ।
मग सहज बोलती निवृत्तिसीं । द्यावें मजसीं अवधान ॥६०॥
मृत्युलोकीं अवतार पूर्ण । जया लागीं घरिला आपण ।
त्या चांगदेवाचें दर्शन । होईल दिसोन येतसे ॥६१॥
वटेश्वर सिद्ध महापुरुष । त्यानें पाठविले दोघे शिष्य ।
पत्रही धाडिलें आपणास । परी कोरेंचि असे अद्यापि ॥६२॥
ऐसें बोलतां ज्ञानेश्वर । तों तेही आलें सन्निध सत्वर ।
जवळ ठाकोनि दोघे विप्र । साष्टांग नमस्कार घालिती ॥६३॥
ज्ञानराज म्हणती त्याजकारणें । तुम्ही आलेती तपतीहून ।
कोरेंच पत्र आम्हां कारण । चांगदेवानीं पाठविलें ॥६४॥
ऐसें म्हणताचि ते वेळे । ब्राह्मण तेव्हां विस्मित झाले ।
म्हणती तुम्ही परब्रह्म पुतळे । जीवींचें सकळ जाणतसां ॥६५॥
आम्हीं न सांगता आणुमात्र । तुम्हांसि कळला समाचार ।
तिन्ही देवांचे अवतार । जगदुद्धार करावया ॥६६॥
जैसी ऐकिली सत्कीर्ति । त्याहूनि विशेष तुमची स्थिती ।
मग कोरा कागद घेऊनि प्रीतीं । पुढें ठेविती तेधवां ॥६७॥
तो ज्ञानदेवें घेऊन सत्वरा । मागें पुढें दिसतसे कोरा ।
मग निवृत्ति राजासी बोलती उत्तरा । यावरी अक्षर एक नाहीं ॥६८॥
हा पाठवावयासि कारण काय । स्वामी सांगि जे लवलाहें ।
ऐसें ऐकूनि निवृत्तिराय । उत्तर काय ते देती ॥६९॥
म्हणती मरुद्गुणाचा अवतार । तो हा चांगा वटेश्वर ।
उतरला कर्मभूमीवर । ऐका चरित्र तयाचें ॥७०॥
चौदा विद्या अभ्यासून । चौसष्टी कळेंत झाला प्रवीण ।
अष्टांग योग साधिले त्याणें । सिद्धि पूर्ण वश केल्या ॥७१॥
काळाचीच पेट लागतां त्यांसी । आत्मा नेतसे ब्रह्मांडासी ।
चौदाशें वर्षें वंचना ऐसी । स्वदेहासी रक्षिलें ॥७२॥
ऐसा चांगदेव सिद्ध थोर । त्याचा ब्रह्मादिकां नकळे पार ।
जाणे जीव मात्राचे अंतर । स्वर्गींचे उत्तर तें ऐके ॥७३॥
चौदाशें वर्षें श्रम केला । काळापासून नरदेह रक्षिला ।
आंगी सिद्धाईचा ताठा भरला । सबाह्य वेष्टिला अहंकारे ॥७४॥
परंतु ब्रह्मज्ञानाची कळा । स्वप्नींहीं नये त्याच्या डोळा ।
ये विषयीं तो असे आंधळा । म्हणोनि अवकळा अवध्याची ॥७५॥
जैसी विधवा कुंकुमें विण । अलंकार लेत संपूर्ण ।
परी कंठीं गळसरी नसतां जाण । ते अश्लाध्य वाणें जगांत ॥७६॥
सकळ नक्षत्रें गगनी असती । परी उगवला नाहीं निशापती ।
तरी शोभा न दिसे राती । तैसीच गती चांगयाची ॥७७॥
हत्ती घोडे रहंवर । सेना शिपाई असती फार ।
परी एकला नाहीं नृपवर । तरी शोभा अणुमात्र असेना ॥७८॥
कमळ पत्रा ऐसे नेत्र । दृष्टीसी पाहती सर्वत्र ।
परी तयासि न दिसे अणुमात्र । तैसा विचार चांगयाचा ॥७९॥
शरीर गोरें आणि तरुण । आंगीं संपूर्ण बत्तीस लक्षण ।
परी एकला आंत नसतां प्राण । तरी ठेवील कोण त्या लागीं ॥८०॥
तैसाचि वटेश्वर योगिया । सकळ सिद्धी अनुकूळ तया ।
परी एक आत्मज्ञानें वीण वायां । व्यर्थचि काया वांचविली ॥८१॥
बाह्यज्ञान असे वरवर । त्यासही लागला असे अहंकार ।
जैसी गाई दुग्धे भरली घागर । त्यांत लवण अणुमात्र पडियेलें ॥८२॥
कां पक्वान्न जेवितांना नारसीं । तो त्यांत नकळतां पडली माशी ।
तरी ते सर्वथा न जिरे त्यासी । तैसा ज्ञानासीं अहंकार ॥८३॥
चांगदेव मोठा योगेश्वर । परी त्यासि सिद्धाईचा फुंद थोर ।
मग तुमची कीर्ति ऐकूनि साचार । चटपट थोर लागली त्या ॥८४॥
मग पत्र ल्याहावया तुम्हांप्रती । चांगयानें लेखणी धरिली हातीं ।
षरी श्रेष्ठ कनिष्ठ भाव चित्तीं । या लागीं मती न चाले ॥८५॥
ऐसा संदेह पडिला थोर । मग तेणें कोरे दिधलें पत्र ।
ये अर्थीचा विचार । ऐका साचार सांगतों ॥८६॥
सर्व सिद्धांईत असे पुरा । परी ब्रह्मज्ञाना विषयीं असे कोरा ।
तैसेंच पत्र दीधलें असे सत्वरा । आमुच्या विचारा हें आलें ॥८७॥
तरी ज्ञानसागरा ऐक सत्वर । तूं तरी सिद्धांत वक्ता चतुर ।
चांगदेवासि ऐसें ल्याहावें पत्र । जेणें बोधेल अंतर तयाचें ॥८८॥
ऐकूनि सद्गुरुचें उत्तर । ज्ञानदेवें केला नमस्कार ।
मग लिखित पांसष्टी ग्रंथ सत्वर । आपुल्या निजकरें लिहिला ॥८९॥
त्याचा अर्थ सखोल गहन । सिद्धांत ज्ञानाची वोळखण ।
ते संकळित सांगतों यथा मतीनें । ऐका सज्जन निजप्रीतीं ॥९०॥
स्वस्ति श्रीवटेश्वर चांगया अवधारी । परब्रह्म असे चराचरीं ।
त्याज वांचूनि दुसरी परी । द्वैताची वारी स्वप्नी नसे ॥९१॥
शरीर हें कवणाचें पाहीं । कवण नांदतसे देहीं ।
तूं आपणातें विचारुनि पाहीं । सकळ जीवीं एक चित्तें ॥९२॥
साधलिया योग साधन । याचे तों बहुत कष्ट जाण ।
ऋद्धिसिद्धि प्राप्त तेणें । परी सच्चिद्घन न पविजे ॥९३॥
इंद्रियांत मन चंचळ बहुत । तें धांवून जाय जेथ जेथ ।
तेथें पाहिजे आपणांत । चित्तीं द्वैत न धरितां ॥९४॥
लिखित पांसष्टी ओव्यासार । वाचोनि पाहीजे सविस्तर ।
अर्थ अन्वयीं विवरावें अंतर । ओव्या प्रकारें करुनियां ॥९५॥
हें वेदशास्त्रांचे मथन । सूक्ष्मदृष्टी विचारुन ।
अनुभवासि आणूनि वचन । जीवी ठेवणे उपपत्ती ह्या ॥९६॥
ऐसें पत्र ज्ञानेश्वरें । लिहिलें तेव्हां आपुल्या करें ।
तें शिष्यापासीं दीधलें त्वरें । म्हणे सांगा नमस्कार ज्ञानदेवाचा ॥९७॥
सांगा चौदाशें वर्षेंवर । तुम्हीं रक्षिलें कलेवर ।
त्याचें सार्थक तेव्हांच खरें । अनुभवासि उत्तर आणावें ॥९८॥
ऐसें सांगतां ज्ञानेश्वर । मग तें करिती नमस्कार ।
सवें घेऊनि लिखित पत्र । मग ते सत्वर निघाले ॥९९॥
मग तपती संगमीं येऊनि सत्वर । सद्गुरुसि घालिती नमस्कार ।
ज्ञानराजें दिधले पत्र । तें पुढें सत्वर ठेविलें ॥१००॥
स्वमुखें निरोप सांगितला । तोही सविस्तर निवेदन केला ।
चौदाशें वर्षें देह रक्षिला । योग साधिला अष्टांग ॥१॥
त्याचें सार्थक तेव्हांचि खरें । पाहिजे पत्राचें अर्थांतर ।
अनुभवोनि आपुले अंतर । साक्षात्कार जाणावा ॥२॥
ऐसें मुखवचन उत्तर । सांगूनि दिधलें तुम्हांसि पत्र ।
त्याची स्थिती आर्ष फार । दांभिक अनुमात्र असेना ॥३॥
चार्ही मुलें असती लहान । सारिखेचि मान अपमान ।
सातावर्षाचें निवृत्ति निधान । सावर्षांचा पूर्ण ज्ञानदेव ॥४॥
पांच वर्षाचा सोपान विदेही । आणि चौवर्षाची मुक्ताबायी ।
सामर्थ्य असोनि अभिमान नाहीं । हेचि नवायी अगाध ॥५॥
जैसें परब्रह्मीचे कोंभ निश्चितीं । तैसींच दिसें त्यांची स्थिती ।
आणि भक्ति प्रेमा बहुत चित्तीं । उपासना मूर्ती पांडुरंग ॥६॥
त्याणीं सद्भावें साचार । तुम्हांसि सांगीतला नमस्कार ।
तों चांगदेवें घेऊनि पत्र । मस्तकावर वंदिले ॥७॥
पहिली ओवी वाचूनि पाहात । चित्तीं कल्पना योजिल्या बहुत ।
तों त्यामाजी लागतीं नाना अर्थ । मति कूंठित जाहली ॥८॥
बहुत प्रकारीं शोधून पाहातां । परी अर्थ ध्यानांत नये सर्वथा ।
म्हणती काय करावे आतां । लज्जा चित्ता वाटतसे ॥९॥
चांगदेवासि वाटले विषम । म्हणती याचें नकळेंचि वर्म ।
सकळ कळा साधिल्या परम । जीवासि श्रम करोनियां ॥११०॥
परी ज्ञानदेवाचें वचन प्राकृत । त्याचा अनुमात्र कळेना अर्थ ।
सकळ ग्रंथांत मुकुट वेदांत । त्याहूनि बहुत अवघड हें ॥११॥
तरी आपण समारंभें करुन जाऊन । घ्यावें त्याचें दर्शन ।
अर्थ पत्राचा विचारुन । निश्चय पूर्ण दृढ केला ॥१२॥
मग शिष्य संप्रदायी मेळवूनि फार । तयांसि म्हणे योगेश्वर ।
तिन्ही देवांचे अवतार । जाहले साचार भूमंडळीं ॥१३॥
तरी आपण आतां समुदायेंसी । जाऊं तयांचे भेटीसी ।
त्याची चर्या आहे कैसी । तेही ध्यानासि येईल ॥१४॥
मोहन स्तंभन वशीकरण । या विद्येचें केलें स्मरण ।
शिष्यांसहित मरुद्गण । व्याघ्रारुढ होऊन चालिले ॥१५॥
व्याघ्राचे वहनीं सकळिक । तयांसि सर्पाचे केले चाबुक ।
ऐसें देखोनि कवतुक । आश्चर्य लोक करितातीं ॥१६॥
सभोंवते संप्रदायी समस्त । मध्यें चांगदेव विराजित ।
जैसा सैन्यामाजी नृपनाथ । आश्चर्यें शोभत आगळा ॥१७॥
नाना शास्त्रें आहेत बहुत । त्या माजी मुख्य वेदांत ।
तैसा चांगदेव विराजित । सामर्थ्य अद्भुत ज्यापाशीं ॥१८॥
कां अठरा भार वनस्पती । मध्यें कल्पतरु जया रीतीं ।
तैसाचि दिसे सिद्धमूर्ती । संप्रदायी असती सभोंवते ॥१९॥
नातरी नक्षत्रांमाजी रोहिणी कांत । पूर्ण कळेनें सुशोभित ।
तैसा चांगदेव जनासि भासत । सिद्धि समस्त जयापासी ॥१२०॥
मार्गीं ज्या ज्या गांवावरुन । सहज जातसे मरुद्गण ।
क्षेत्रवासी जे संपूर्ण । पूजा घेऊन येती ॥२१॥
जे जे कामना नवस कल्पिती । त्यांची तत्काळ पुरतसे आर्ती ।
जनांत वाढली सत्कीर्ती । सर्वत्र जाणती चांगदेवा ॥२२॥
देखोनि सिद्धीचा चमत्कार । लोक दर्शना येती फार ।
जाणोनि तयाचें अंतर । घटिका चार स्थिर होती ॥२३॥
ऐशा संभ्रमें योगेश्वर । दक्षिण पंथें चालिले सत्वर ।
तों समीप उरलें अळंकापुर । भीमा तीर पंचक्रोशी ॥२४॥
पिंपळगांव नामाभिधान । तेथें भीमा तीर पुण्यवान ।
तेथूनि अळंकावती एक योजन । सभाग्यसधन ते लोक ॥२५॥
पुराण प्रसिद्ध भीमरथी । हें चांगदेवें जाणोनि निश्चितीं ।
चार घटिका स्थित राहती । नित्य नेम सारिती सकळिक ॥२६॥
मग शिष्यासी बोलावूनी । आज्ञा करिती त्या लागुनी ।
तुवां सत्वर पुढें जावोनी । वृत्तांत श्रवणीं सांग त्याच्या ॥२७॥
निवृत्तिराज ज्ञानदेव पाहीं । सोपान आणि मुक्ताबायी ।
नमस्कार करोनि त्यांचे पायीं । वृत्तांत सर्वही सांगावा ॥२८॥
आमुचाही नमस्कार सांग त्यांसी । सत्वर येतसे भेटीसी ।
चांगदेवें आज्ञा करितां ऐसी । शिष्य त्वरेसी निघाला ॥२९॥
व्याघ्रारुढ होऊनि सत्वर । मग तो पावला अळंकापुर ।
तों तिन्ही देवांचे अवतार । भिंतीवर बैसती ॥१३०॥
तंव ज्ञानदेवासि म्हणे निवृत्ती । तुम्हींच चांगदेवासि लिखित पाठविलें प्रीतीं ।
त्याचा अर्थ न समजे चित्तीं । म्हणोनि येती भेटावया ॥३१॥
आपुली सिद्धाई दाखवणें । यास्तव व्याघ्राचें केलें वहन ।
ऐसी परस्पर बोलतां खूण । तों आला ब्राह्मण सन्निध ॥३२॥
व्याघ्राखालीं उतरोनि सत्वर । घातला साष्टांग नमस्कार ।
कांहीं सांगावें जों उत्तर । तों सोपानेश्वर बोलती ॥३३॥
चौदाशें वर्षांचे भले । स्वर्गींचे मरुद्गण वांचलें ।
योगाभ्यासें काळा तें वंचिलें । ते भेटीसी आले आपुलिया ॥३४॥
तंव निवृत्ति म्हणे ज्ञानेश्वरा । संत आले आपुल्या घरा ।
तरी तयांसि जावें सामोरा । आमुच्या विचारा आलें हें ॥३५॥
ऐसें आज्ञापितां निवृत्तिराया । ज्ञानदेवें अघटित मांडिली चर्या ।
भिंतीसि म्हणती लवलाह्या । चाल चांगया सामोरीं ॥३६॥
ऐसीं मुखांतूनि अक्षरें । वदतांचि श्रीज्ञानेश्वरें ।
तों अघटित चरित्र वर्तलें खरें । तें ऐका सादरें भाविक हो ॥३७॥
तुरंग धांवे जैशा रीतीं । तैसीच सत्वर चालिली भिंती ।
आंत पाहतां दगड माती । आश्चर्य करिती जनलोक ॥३८॥
ज्ञानदेव सोपान निवृत्ती । वरी बैसल्या तिन्ही मूर्ती ।
नाव चालतसे जैशा रीती । तैसीच भिंती चालतसे ॥३९॥
क्षेत्रवासी नारीनर । तयांसि कौतुक वाटे फार ।
अवघे मिळोनि लहान थोर । मागें सत्वर धांवती ॥१४०॥
तों इकडे चांगा वटेश्वर । चौदाशें शिष्य बरोबर ।
बैसोनि येती व्याघ्रावर । धांवत समीर ज्या रीतीं ॥४१॥
जैसे गरुड आणि मारुती भक्त । उभयतांची मिळणी होत ।
कीं मित्र आणि रोहिणीकांत । गगनीं भेटत अवचित ॥४२॥
कां भूत पिशाच कूश्मांडगण । या वेष्टित येतसे त्रिलोचन ।
तों षड्गुण ऐश्वर्य संपन्न । आले धांवोन महाविष्णु ॥४३॥
जैसें ऋद्धि सिद्धीचें वैभव । शिष्य संप्रदायी गौरव ।
व्याघ्रावरी बैसोनि सर्व । भेटीस चांगदेव पातले ॥४४॥
इकडे भक्ति ज्ञान वैराग्य कळा । घेऊनि येतसे परब्रह्म पुतळा ।
निर्जीव भिंतीस जीव आणिला । नवल चांगयाला वाटलें ॥४५॥
म्हणे याचें कर्तृत्व अघटित जाणा । निश्चित कळलें आमुच्या मना ।
निर्जीवासिं आणिली चेतना । सामर्थ्य कोणा हें नव्हे ॥४६॥
आणि सजीव व्याघ्राचे बैसोनि पाठीं । आम्हीं काय जातो तयाचे भेटी ।
ऐसा निराभिमान होऊनि पोटीं । मग तळवटी उतरला ॥४७॥
चांगदेवाची देखोनि स्थिती । सकळ शिष्य वहनें त्यागिती ।
सर्पाचे चाबूक सोडूनि देती । मग ते प्रवेशती वारुळीं ॥४८॥
सिद्धीचा खेळ मायिक समस्त । व्याघ्रही गेले काननांत ।
जैसे मेघ दिसती गगनांत । ते नाहींसे होत क्षणमात्रें ॥२९॥
असो शिष्यां समवेत तयें क्षणीं । चांगदेव चालिले लोटांगणीं ।
सिद्धाईचा अभिमान होता मनीं । गेला निरसोनी सर्व तो ॥१५०॥
जैसा वासरमणी उदयास येत । प्रभायमान बिंब आरक्त ।
मग चंद्राच्या कळा लोपून जात । तेज अद्भुत म्हणवोनि ॥५१॥
का पराक्रम दाखविता मारुती । मग शक्तिहीन जाहला खगपती ।
तैशीच चांगदेवाची अहंता होती । चालता भिंती ते नासे ॥५२॥
चतुर्दश विद्याभ्यास केला । चौसष्टी संपूर्ण साधिल्या कळा ।
चौदाशें वर्षे देह रक्षिला । जिंकिलें काळा प्रतापें ॥५३॥
हें अवघेचि सामर्थ्य पूर्ण । लोपलें ज्ञानदेवाच्या दर्शनें ।
अरुणोदय होतांचि जाण । आकाशीं उडुगण न दिसती ॥५४॥
कां धीट पाठ कविता असतां । तो आपुलें चित्तीं मानी श्लाघ्यता ।
मग देखूनि प्रसादिक संतां । लज्जित चित्ता होतसे ॥५५॥
नातरी महासिद्धांता पासीं निश्चितीं । शब्देसि मौन धरितां श्रुती ।
दृष्टीसी देखूनि अगस्ती । मग आपांपती न गर्जे ॥५६॥
अमृतसिद्धि भेटतां सहज । मग लज्जित होतसे वैद्यराज ।
तेथें औषधाचे काय काज । चमत्कार चोज देखतां ॥५७॥
तैसें ज्ञानदेवाचें कर्तृत्व निश्चिती । निर्जीव दगडाची चाले भिंती ।
आळंदी पासोन अर्ध कोस येती । मग चांगदेव चित्तीं लज्जित ॥५८॥
व्याघ्राखालीं उतरोनि देख । सोडिले सर्पाचे चाबूक ।
सप्रेम भावाचें कौतुक । लोटांगण हरिखें घालिती ॥५९॥
निवृत्ती ज्ञानदेव सोपान । मुक्ताबाई गुण निधान ।
यांनींही चांगदेव देखोन । मग खालीं आपण उतरले ॥१६०॥
सन्निध येतां योगेश्वर । चौघेंही घालिती नमस्कार ।
चांगदेव उठविती निजकरें । मग चरणांवर लोटले ॥६१॥
परस्परें होतां भेटी । मग अलिंगनें पडली मिठी ।
सप्रेम सुखाची होतसे वृष्टी । पाहताती दृष्टीं सुरवर ॥६२॥
विमानीं बैसोनि वृंदारक । पुष्प वर्षाव करिती देख ।
म्हणती ज्ञानदेवाच्या दर्शनें अनेक । तरती लोक भूमंडळी ॥६३॥
ऐसे म्हणोनि इंद्रादिगण । पावले आपुलें स्वर्ग स्थान ।
श्रीविठ्ठल नाम संकीर्तन । लोक संपूर्ण गर्जती ॥६४॥
परस्परें बोलती त्या अवसरा । चांगदेव भेटले ज्ञानेश्वरा ।
जैसा शुक्र अभिमानाचा पुरा । तो बृहस्पतीच्या घरां आला की ॥६५॥
कां क्षीरसागराचें ऐश्वर्य थोर । त्या माजी पहुडला लक्ष्मीवर ।
म्हणोनि तयासि रत्नाकर । सप्रेम आदरें भेटेतसे ॥६६॥
नातरी वसिष्ठाचें सामर्थ्य देखोनी । मग तयासि भेटे विश्वामित्र मुनी ।
की हरिहरांची जाहली मिळणी । मज लागोनी तेविं वाटे ॥६७॥
परस्परें झालिया भेटी । तेथें आनंद सुखाची होतसे वृष्टी ।
ज्ञानदेव चांगयासि धरोनि मनगटीं । मग विश्रांत वटीं ते आले ॥६८॥
तया वृक्ष छायेचे तळीं । बैसली सकळ संत मंडळीं ।
विठ्ठल नामें तये वेळीं । घोष निराळीं कोंदला ॥६९॥
ज्ञानदेव निवृत्ति सोपान । मुक्ताबाई गुण निधान ।
यांसि परिपूर्ण असोनि आत्मज्ञान । परी सगुण भजन करिताती ॥१७०॥
एकीं घालूनि वज्रासन । आत्मा ब्रह्मांडासि नेला जाण ।
ते स्वरुपीं समरस होऊन । गेले विरोन देहभान ॥७१॥
जो का निर्गुण निराकार । त्यासीच पाहती निरंतर ।
ते सायुज्य मुक्ति पावोनि साचार । तदाकार जाहले कीं ॥७२॥
हे योगियांची स्थिति जाण । विराट स्वरुपीं जाहले लीन ।
परीं भक्तिसुख अंतरलें तेणें । ब्रह्मादि सुरगण इच्छिती ॥७३॥
निवृत्ति सोपान ज्ञानेश्वर । तैसे नव्हेती साचार ।
करावया विश्वोद्धार । आले साचार मृत्युलोका ॥७४॥
हे अंतरी ब्रह्मनिष्ठि पूर्णज्ञानी । असोनि तत्पर भगवद्भजनीं ।
मग सगुण स्वरुपें चक्रपाणी । तयां लागोनी भेटती ॥७५॥
अद्वैत वोळखोनी अंतरी । जो साकार मूर्तीसीं प्रेम धरी ।
तरी ते दुर्लभ चराचरीं । धुंडितां धरित्री नाढळती ॥७६॥
स्वरुपें सुंदर लावण्य सरिता । त्याही वरी महा पतिव्रता ।
तरी विरळा दृष्टीसीं धुंडूनि पाहातां । नसती बहुता या रीतीं ॥७७॥
जैसे सोज्ज्वळ सोनें बावनकस । आणि सुगंध जोडला तयास ।
दृष्टीस पडतां सावकास । तरी मोलचि नसे तया ॥७८॥
श्रुतिशास्त्रीं निपुण पाहीं । आणि शांति क्षमा आली हृदयीं ।
मी एक सर्वत्र अहंता नाहीं । तो धुंडितां ठायीं दुर्लभ ॥७९॥
उत्तम व्यवहारीं जोडिले धन । आणि निष्काम सत्पात्रीं करितां दान ।
शोधूनि पाहतां विचक्षण । तरी बहुत जन नाढळती ॥१८०॥
यथा विधि करी सत्कर्म । महा यज्ञादिक हवन ।
आणि निष्कामें करी कृष्णार्पण । हे बहुत जन नसती कीं ॥८१॥
सागर गंभीर आहे जनीं । परी क्षार लागे तयाचे पाणी ।
तैसेच योगी आत्मज्ञानी । परी विमुख सगुणीं प्रेमसुखा ॥८२॥
निवृत्ति सोपान ज्ञानेश्वर । तैसे नव्हती साचार ।
ब्रह्मनिष्ठ योगेश्वर । आणि सगुणीं तत्पर भजनासी ॥८३॥
विठ्ठल नामाचा करुनि घोष । बैसले विश्रांति वटच्छायेस ।
तंव चांगदेवें पुसिलें त्यांस । कैसे निर्जींवासि चालविलें ॥८४॥
आम्ही आपुले सिद्धीईचेनी बळें । व्याघ्र सर्प प्रांजळ केले ।
परी आपण निर्जीवासी चालविलें । हे तों अकळकळा दिसों आली ॥८५॥
ऐसें चांगदेव पुसतांचि देख । ज्ञानदेवचरणीं ठेवी मस्तक ।
मग स्वमुखें अभंग बोलीला एक । तो सकळिक जाणतसां ॥८६॥
परी त्याचा अर्थ सांगतों किंचित् । तो श्रवण करा भाविक भक्त ।
संतांची वचनें असती प्राकृत । परी गर्भ बहुत त्यां माजी ॥८७॥
देव करी तरी एक नव्हे । सागरीं तारली दगडाची नाव ।
त्यावरी चालोनि वानर सर्व । लंका वैभव पाहिलें ॥८८॥
सूर्य किरणांचियावरी । राहतील मुंगिया निरंतरी ।
पीक होय अग्नि पाठारीं । एक श्रीहरी सत्तेनें ॥८९॥
तो चराचर नटला श्रीपती । पदार्थ मात्र त्याची प्रकृती ।
त्यानें आपुल्या प्रतापें निश्चिती । चालविली भिंती कौतुकें ॥१९०॥
महाभूतें पांच सार । परस्परें यांमाजी असें वैर ।
परी सख्यत्वें नांदवी श्रीधर । त्यांमाजी संचार करोनियां ॥९१॥
शून्याचें मनीं हाचि भावो । आकाशाचा पुसी न ठावो ।
निराळ म्हणतसे हा वायो । भक्षीन पहा हो क्षणमात्रें ॥९२॥
समीर म्हणतसे हा अग्न । मीं विझवीन नलगतां क्षण ।
तंव वन्ही म्हणे हें जीवन । निजांगें शोषीन मी आतां ॥९३॥
तंव पाणी म्हणतसे ही मही । मी निजांगे नासीन सर्वही ।
हें पंच भूतांत वैर सर्वदाही । मग शेषशायी करी काय ॥९४॥
पंचतत्वांत लक्ष्मीवर । निजागें करोनि संचार ।
त्यांसीं सख्यत्व करोनि फार । मित्रत्वे साचार नांदवी ॥९५॥
त्याणेंचि तुमची पुरवावया आर्ती । आपुल्या सत्तेनें चालविली भिंती ।
हें आमुचें सामर्थ्य नसे निश्चित्ती । श्रीरुक्मिणीपती तो जाणें ॥९६॥
ऐसी ज्ञानदेवाची वाणी । ऐकोनि चांगदेव लागे चरणीं ।
पुढिल अध्यायीं रसाळ बोलणीं । तरी सादर सज्जनीं परिसावीं ॥९७॥
तो दीनदयाळ कैवल्य दानी । आठवण देतसे मजलागुनी ।
महीपती त्याच्या आश्रयें करोनी । संत स्तवनी सादर ॥९८॥
स्वस्ति श्रीभक्तलीलामृतग्रंथ । श्रवणेंचि पुरवी मनोरथ ।
चतुर्थांध्याय प्रेमळ परिसोत भाविक भक्त । चतुर्थाध्याय रसाळ हा ॥१९९॥अ० ४॥