मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ४७

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

जय अनाथबंधु करुणाकरा । भक्तवत्सला कृपासागरा ।

लीलावतारी परमेश्वरा । विश्वोध्दारा पांडुरंगा ॥१॥

भक्तवत्सला रुक्मिणीपती । अनंत अपार तुझी कीर्ती ।

लेखा नव्हेचि कोणाप्रती । कुंठित मती सकळांच्या ॥२॥

तूं तरी निर्गुण निराकार । निष्कर्मी निरुपचार ।

परी घ्यावय भक्तांचा कैवार । सगुण साकार रूप धरिसी ॥३॥

आधीं अभक्तांसि दुर्बुध्दि देऊन । निज भक्तांचें करविसी छळण ।

भाविकीं तुझें करितां चिंतन । संकट दारुण निवारिसी ॥४॥

ते कानीं एकतांचि सत्कीर्ती । तेणें खळाची तत्काळ पालटे वृत्ती ।

अनुतापें करोनि दुरितें नासती । सात्विक वृत्ती मग होय ॥५॥

मागिले अध्यायीं कथा सुंदर । अश्व मेलें वाटेवर ।

तें नारायणस्वामीनीं उठविलें सत्वर । आश्चर्य द्विजवर मग करिती ॥६॥

साधूची तों अघटित चर्या । ओडंबर दाखविती वैष्णवीमाया ।

मनुष्य रूप दिसती काया । परी परब्रह्म तया म्हणावें ॥७॥

एक रामकृष्ण ब्राह्मण म्हणोनी । साधुपुरुष परमज्ञानी ।

षड्वैरी जिंतोनि त्यानी । सेवा ऋणी देव केला ॥८॥

विष्णुपूजन हरिकीर्तन । वाचेसि अखंड नामस्मरण ।

सर्वाभूतीं दयापुर्ण । आत्मवत जन मानितसे ॥९॥

सांडोनियां आशापाश । जनास देतसे उपदेश ।

विश्वोध्दार करावयास । अवतार असे कलियुगीं ॥१०॥

बडोदें नगरांत येऊन । शिष्य संप्रदायी केले त्याणें ।

तों उपदेश घेतला एक्या स्त्रीनें । भ्रतारा चोरून आपुल्या ॥११॥

तों तिच्या पतीसी वृत्तांत । परस्परें जाहला श्रुत ।

मग त्याणें कृत्रिमें केली युक्त । कांतेसि बोलत आपुल्या ॥१२॥

मी गांवास जातों सत्वर । तिकडे दिवस लागतील चार ।

मंदिरांत होतें तळघर । तेथें लपोन बैसला ॥१३॥

कृत्रिमभाव धरिला मनीं । म्हणे हे आपुल्या गुरुसि आणील सदनीं ।

उभयतांची चर्या नयनीं । दृष्टीसीं पाहूनी शिक्षा करूं ॥१४॥

याची कांता परम भाविक । तिसीं चित्तीं वाटला हरिख ।

म्हणे घरासि आणोनि भवतारक । सेवा सुखें करीन मी ॥१५॥

मग शेजारीं होती मैत्रिण । तीस सांगितलें वर्तमान ।

उभयतां स्वामीसि जाऊन । आमंत्रण त्या देती ॥१६॥

सद्गुरु म्हणतीं त्या अवसरीं । तुझा भ्रतार नाहीं घरी ।

त्यासि अकस्मात कळलें जरी । तरी नानापरी गांजील ॥१७॥

आम्हीं तुझेंचि जेवितों माते । कासया उगीच श्रमसी व्यर्थ ।

ऎसी ऎकतांचि मात । नेत्रीं अश्रुपात वाहती ॥१८॥

म्हणे आम्हां स्त्रियांचें पराधीन जिणें । कधीं घडावें स्वामींचें सेवन ।

माझा आश्रम पवित्र करणें । म्हणोनि चरण धरियेलें ॥१९॥

तिचा सद्भाव देखोनि प्रीतीं । सद्गुरु तेव्हां अवश्य म्हणती ।

मग तिणें करोनि पाकनिष्पत्ती । पूजेची आयती सिध्द केली ॥२०॥

मग सद्गुरुसि आणूनि मंदिरात । आसनावरी बैसवी त्यातें ।

भ्रतार होता तळघरांत । तो आला अवचित बाहेरी ॥२१॥

क्रोधें शस्त्र घेवोनि करीं । त्याणे उगारिलें कांतेवरी ।

सद्गुरुसि पाहे नेत्रद्वारीं । तों स्त्रीरुप निर्धारीं दिसती ते ॥२२॥

ऎसा चमत्कार देखोनि नयनीं । पश्चाताप जाहला त्याचें मनीं ।

मग द्वेषवार्ता सर्व टाकुनी । सद्भावें चरणीं लागला ॥२३॥

त्याचा निग्रह देखोनि समस्त । रूप धरिलें पूर्ववत ।

त्यानेंही स्वामीसि होऊनि विनीत । अनुग्रह निश्चित घेतला ॥२४॥

स्त्री पुरुष दोघेजण । सद्भावें करिती संतसेवन ।

परम खळं तोही जाहला लीन । ऎसें महिमान संतांचे ॥२५॥

आणिक रामचंद्र भट्ट । म्हणवोन महापंडित होता ब्राह्मण ।

वेद वेदांतीं असे निपुण । परी किंचित अभिमान असेना ॥२६॥

सर्वशास्त्रीं निपुण असे । परी प्रवृत्ती वाद न करीच कोणता ।

करोनि अहंतेचा नाश । श्रीहरिभजनास लागला ॥२७॥

न करी कोणाचें उपार्जन । राव रंक समसमान ।

अयाचित वृत्ती करून । कुटुंबरक्षण करीतसे ॥२८॥

स्नानसंध्या करोनि नित्य । पंचमहायज्ञ करीत ।

समयीं आलिया अभ्यागत । विमुख त्यातें न होय ॥२९॥

त्याचा निश्चय देखोनि थोर । देव देतसे साक्षात्कार ।

दिल्लींत राहातसे वैष्णववीर । तों काय चरित्र वर्तलें ॥३०॥

अविंध राजा ते अवसरीं । विस्तीर्ण वाडा बांधितसे नगरीं ।

दुर्बळाची मंदिरें मोडोनि सत्वरी । द्रव्य त्यांकरी देतसे ॥३१॥

दुसरी जागा धरावयासि । दुप्पट द्रव्य देतसे त्यासी ।

तों रामचंद्रभटाच्या घरासी । भिंत अनायासी पातली ॥३२॥

रायाचा कारभारी दिवाण । सांगोनि पाठवी त्याजकारणें ।

तुम्हांसि दुसरें मंदिर देतों बांधोन । त्यामाजी राहणें सत्वर ॥३३॥

रामचंद्रभट्ट त्रासुनि अंतरीं । जाऊनि राहिले काशीपुरीं ।

तों काजीच्या रूपें स्वप्नांतरीं । अविंधासि श्रीहरि काय सांगे ॥३४॥

रामचंद्रभट्ट माझा प्राण । तयासि आणावें समजावून ।

तरीच तुझें कल्याण । अन्यथा वचन नव्हें हें ॥३५॥

ऎसें स्वप्न देखतां निश्चित । बादशाह जाहला भयभीत ।

मग दिवानासि सांगूनि पाठवित । शीघ्र तयातें घेउनि या ॥३६॥

मग तो जाऊनि काशीपुरीं । विष्णुभक्तासि नमस्कारी ।

म्हणे कृपा करोनि मजवरी । आपुलें मंदिरीं तुम्हीं चला ॥३७॥

ग्लांती करोनि बहुतारीतीं । दिल्लीस नेलें तयाप्रती ।

त्याचें मंदिर राहविलें निश्चिती । म्हणती साह्य श्रीपती यासि असे ॥३८॥

सत्समागमाचेनिगुणें निश्चिती । सकळ लोकांसि लागली भक्ती ।

दर्शनासि येऊनि अविंध भूपती । नमस्कार प्रीती करितसे ॥३९॥

आपुल्या दासाची सत्कीर्ती । स्वयें वाढवितसे रुक्मिणीपती ।

आणिक चरित्र रसाळ पुढती । सादर श्रोतीं परिसिजे ॥४०॥

एक काजी महंमद म्हणवोन । होता जातीचा यवन ।

तो अखंड करी नामस्मरण । आणि असत्य वचन न बोले ॥४१॥

पादशाह द्रव्य देतां निश्चिती । परीं तें न घेचि आपुले हातीं ।

कष्टार्जित अन्न भक्षिती । कैशारीतीं तें ऎका ॥४२॥

त्याचीं कांता चतुर बहुत । कशिदा काढीत आपुले हातीं ।

तें स्वस्त विकोनि बाजारांत । अन्न भक्षित तयांचे ॥४३॥

न्याय इनसाफ तयापासी । पादशाह धाडीत अहर्निशीं ।

ते यथार्थ आणोनि ध्यानासे । पंचाइतीसी मग करी ॥४४॥

हिंदु अथवा यवनाचा । पक्ष न धरीच कोणाचा ।

अभिलाष नाहीं द्रव्याचा । लेश असत्याचा स्पर्शेना ॥४५॥

जयासि सोनें आणि माती । सम समान सारिखीं दिसती ।

द्रव्य आशा धरितां चित्तीं । पातकें वसती ते ठायीं ॥४६॥

आशा तृष्णा धरितां सहज । तरी हें अपमानाचें बीज ।

हें चित्तापासोनि टाकितां सहज । तरी तो पूज्य तिहीं लोकीं ॥४७॥

काजी महंमदें हें जाणोनी । शेण सोनें सारिखेंचि मानी ।

यथास्थित न्याय करोनी । उभयतां लागोनी समजावी ॥४८॥

परी पोटीं नसेचि पुत्रसंतती । एकचि कन्या तयासि होती ।

तिचे घरीं धनसंपत्ती । क्षत्रवृत्ती जामाता ॥४९॥

हस्ती घोडे शिबिका रथ । सैन्य वागवीत पांच शत ।

रायापासी त्याचा जामात । सेवेसि असे सर्वदा ॥५०॥

ऎसे लोटतां बहुत दिवस । एक पुत्र होता कन्येस ।

तों जामाताचें सरलें आयुष्य । मृत्युसदनास तो गेला ॥५१॥

हिंदू दिवाण त्याचा जाण । कृत्रिम भाव रचिला त्याणें ।

अवघें द्रव्य आच्छादून । कर्ज लेहोन ठेविलें ॥५२॥

कांता पुत्रांसि तये संधीं । काय म्हणतसे दुर्बुध्दी ।

कर्जाची वाट करावी आधीं । मग त्रिशुध्दीयासि पुरा ॥५३॥

ते म्हणती जिवंत होता धनी । तेव्हां कर्ज ऎकिले नाहीं कानीं ।

तरी आतां कर्ज निघालें कोठोनी । असत्य करणी हे दिसे ॥५४॥

तों पादशहा म्हणे ते अवसरीं । काजी महंमद त्याय करी ।

मग प्रेताचीं आंतडीं काढोनी सत्वरी । केशर कस्तुरी आंत भरले ॥५५॥

जामाताचें उचलोनि प्रेत । श्वसुरापासी आणिलें त्वरित ।

कन्या आणि तिचा सुत । रुदन करींत अट्टहासें ॥५६॥

दिवाण नष्ट जो दुर्बुध्दी । काय म्हणतसे तये संधी ।

कर्जाची वाट करा आधीं । मग त्रिशुध्दीयासि पुरा ॥५७॥

इतर सैनिकें त्याजकारणें । लांच दीधला त्या दुर्जनें ।

त्याज ऎसें सर्वत्र जन । असत्य वनच बोलती ॥५८॥

काजी महंमदासीं तेव्हां म्हणत । आतां याची करावी पंचाईत ।

गवगवा केला त्याणीं बहुत । कन्या रडत अट्टाहासें ॥५९॥

सत्य असत्य कळलें मनीं । परी बोलतां नये प्रगट वाणीं ।

म्हणतील पक्षपात केला याणीं । कन्या म्हणवोनी आपुली ॥६०॥

परम संकट पडिलें पाहे । मग श्रीहरीचे आठविलें पाय ।

म्हणे जन अपवाद मजला नये । तैसा उपाय करीं देवा ॥६१॥

मग काजी महंमद ते समयीं । प्रेतासि म्हणे ऊठ लवलाहीं ।

दिवाणासि हिशोब समजावी । मग तूं जाई मृत्युपरा ॥६२॥

ऎसीं अक्षरें मुखांतून । निघतांचि चरित्र वर्तलें गहन ।

अद्भुत संतांचें महिमान । ऎकताम श्रवण सुखावती ॥६३॥

जैसा प्राणी असतां निद्रित । जागृतीस येतां उठोनि बैसत ।

तैशाच रीतीं उठोनि प्रेत । वस्त्रें आणवित आपुलीं ॥६४॥

श्मश्रु पिळोनियां करीं । नेत्र आरक्त वटारी ।

शस्त्र उगारी दिवाणावरी । म्हणे हिशोब सत्वरीं दे माझा ॥६५॥

ऎसें कौतुके देखोन । थरथरां कांपे तो दुर्जन ।

कांजी महंमदाचे धरिलें चरण । म्हणे वांचवी प्राण तूं माझा ॥६६॥

म्यां पहिले कागद लपवोनी सत्वर । कर्ज काढिलें धन्यावर ।

लेहोनि दीधलें खोटें पत्र । आपुल्या निजकरें तेधवां ॥६७॥

ठेवरेव जे होती कांहीं । तेही सांगीतली लवलाही ।

मग श्वशुरासि आज्ञा मागोनि पाहीं । प्राण जांवयीं सोडितसे ॥६८॥

ऎसें कौतुक देखोन । आश्चर्य करिती अवघे जन ।

काजी महंमदाचे वंदिती चरण । म्हणती न कळे महिमान संतांचें ॥६९॥

तंव कन्या म्हणे पित्याप्रती । माझा भ्रतार वांचवावा पुढती ।

नातूहीं पायीं लागला प्रीतीं । मग उत्तर देती काय तयां ॥७०॥

यासि आम्हीं वांचविलें आज । तरी आणिकही संकट घालतील मज ।

मग लोभ दिसोन येईल सहज । तो कलंक मज न साहे ॥७१॥

ऎसें बोलोनि कन्येप्रती । जामातासि दीधली मूठमाती ।

जनांत प्रगटली सत्कीर्ती । दर्शनासि येती लोक तेव्हां ॥७२॥

या चरित्रास षण्मास होतां । निजधाम पावली त्याची कांता ।

काजी महंमद म्हणती सर्वथा । मृत्युलोकीं आतां न रहावें ॥७३॥

बडा सोमोरी माजी जाण । समाधिस्थ झाले आपण ।

अद्यापि पुण्यवंताकारणें । साक्षात दर्शन होय त्याचें ॥७४॥

महा व्याघ्र येवोनि नित्य । पुच्छें करोनि कबर झाडित ।

सुगंध पुष्पें समाधीवरी पडत । नित्य नित्य ते ठायीं ॥७५॥

तों तरी जातीचा यवन जाणा । परी हिंसा करूं नेदीच कोणा ।

सर्वभूतीं जयासि करुणा । आत्मवत जना मानितसे ॥७६॥

आणिक राजा जातीचा यवन । बलखबुखारी नामाभिधान ।

राज्य करीतसे धर्मनीतीनें । आणि प्रजेकारणे सुख दे ॥७७॥

त्याच्या राज्यामाजी पाहीं । दुर्बळ याचक सर्वथा नाहीं ।

उपद्रव न करी कोणासही । परी असे विषयीं निमग्न ॥७८॥

आपुले पुर्वसुकृताचेनि बळें । भोगीत नाना विलास सोहळे ।

ऎसा लोटतां कांहीं काळ । तों प्राप्तीची वेळ पातली ॥७९॥

मग अष्टप्रधन बोलावुन । विचार पुसे त्यांजकारण ।

आतां कोणत्या सद्गुरुसि जाऊं शरण । हें मजकारणें सांगिजे ॥८०॥

ऎसें पुसतांचि तयांसि । वजीर उत्तर देतसे त्यासि ।

कबीर भक्त वाराणसीं । जो भक्तीज्ञानासि आगर ॥८१॥

हिंदु आणि मुसलमान । या दोहीं मार्गात असे निपुण ।

त्याची सत्कीर्ती ऎकिली गहन । तरी जावें शरण त्यालागीं ॥८२॥

मग बलखबुखार एके दिवसीं । स्वयें जावोनि वाराणसीं ।

नमस्कार करोनि कबीरासी । अनुग्रहासी घेतलें ॥८३॥

कबीरें तया रायाकारणें । सांगीतलें श्रीराम उपासन ।

पुढें वैराग्य व्हावयासि जाण । तेंही कारण अवधारा ॥८४॥

सोळाशें राण्या लावण्यखाणी । त्यां विरहित एक पट्टराणी ।

विषयीं लंपट होऊनि । राज्यासनीं निमग्न तो ॥८५॥

तंव एके दिवसीं नृपनाथ । बैसला होता सभे आंत ।

सुमन शेज मंदिरांत । दासी रचित स्वहस्तें ॥८६॥

एकांती बोलतां प्रधानातें । रायासि उशीर लागला बहुत ।

मंदिरीं दासी वाट पाहत । निद्रा बहुत तिसीं आली ॥८७॥

बैसोनि मंचकाशेजारीं । मस्तक ठेविला पलंगावरी ।

तों निद्रा आली ते अवसरीं । देहभान अंतरीं असेना ॥८८॥

तों बलखबुखारी मंदिरांत । येतसे तेव्हां अकस्मात ।

दासी निद्रित देखोनि तेथ । क्रोधयुक्त तो झाला ॥८९॥

मग सेवका हातीं सत्वर । तिसीं कमच्या मारिल्या चार ।

परी गदगदा हांसे ते सुंदर । खेद अणुमात्र असेना ॥९०॥

राजा विस्मित जाहला अंतरीं । दासीस पुसे ते अवसरीं ।

तूं कशास्तव हांससी सुंदरी । सांग सत्वरीं मजपासी ॥९१॥

दासी निर्भीड बोले उत्तर । म्यां मस्तक ठेविला पलंगावर ।

त्यास्तव इतुका बैसला मार । वाहतसे रुधिर अंगांतुनी ॥९२॥

सुमने अंथरलीं सवामण । त्याजवरी नित्य करितसां शयन ।

पुढें दंड कोणता होईल जाण । मी हांसलें म्हणवोन यासाठीं ॥९३॥

निर्जीव पिठाची उंडी जाण । गिळितांचि मासा पावला मरण ।

सजीव मारूनि करिती उदरपोषण । तरी गती कोण तयांची ॥९४॥

ऎकोनि दासीचें उत्तर । अनुतापें द्रवला नृपवर ।

राज्यभार टाकोनि समग्र । नगरा बाहेर निघाला ॥९५॥

तरूण शरीर अरोग्य कांती । सोळाशें राण्या तयासि असती ।

अठरा लक्ष घोडे निश्चिती । टाकोनि भूपती निघाला ॥९६॥

म्हणे तारुण्य शरीर राज्य अशाश्वत पाहीं । म्यातरी सार्थक न केलें कांहीं ।

आतां श्रीहरीची प्राप्ति व्हावी । तो उपाय कांहीं योजावा ॥९७॥

॥ साखी ॥

सोलासो सहेली और तुरंग आठरा लाख । सोहीतेरे कारण छोडो बडो शहर बलाख ॥१॥

ऎसें म्हणोनि बलखबुखारी । अनुतापें निघे ते अवसरीं ।

कोणासि येऊं नेदीच बरोबरी । म्हणें परतूनि माघारीं जावें तुम्हीं ॥९८॥

जेवीं पृथ्वींवलयांकित राज्य टाकूनी । भरत राजा चालिला वनीं ।

तैसीच याची दिसती करणी । मजलागोनि वाटतें ॥९९॥

कां ऎकोनि कांतेचा व्यभिचार । भर्तुहरीसि वैराग्य संचरे ।

तेवीं दासीचा उपदेश होतांचि थोर । बलखबुखार निघाला ॥१००॥

क्षुधा तृषा शीत उष्ण । सर्वथा न बाधी त्याजकारणें ।

नैराश्य होऊनि सर्वगुणें । श्रीरामभजन करीतसे ॥१०१॥

वैष्णवभक्त कबीर जाणा । त्याणें सांगीतली उपासना ।

तेंचि रूप आणोनि ध्याना । मानसपुजना नित्य करी ॥२॥

ऎसें लोटतां दिवस चार । देवें दिधला साक्षात्कार ।

सगूणरूपें लक्ष्मीवर । भेटले साचार तयासि ॥३॥

कोणी सत्पुरुष पडतां दृष्टीसी । रात्रीं राहे तयापासीं ।

तों एक फकीर देखिला उदासी । तयाच्या स्थळासी राहिले ॥४॥

तो भिक्षा न मागेचि साचार । आणि कोणासि न घाली जोजार ।

देवासि संकट पडिलें थोर । मग तयासि भाकर पाठवी ॥५॥

ऎसी स्थितीं असतां पाहीं । बलखबुखार आले ते ठायीं ।

फकीर म्हणतसे ते समयीं । येथें स्थळ नाहीं तुजलागीं ॥६॥

तुवां वैराग्य घेतल्यास । जाहले असती किती दिवस ।

येरू उत्तर देतसे त्यास । नूतनचि असे जोग झाला ॥७॥

सद्गुरुकृपेनें निश्चिती । उगविली सर्व प्रपंचगुंती ।

आठ दिवस लोटले निश्चितीं । सत्य वचनोक्ती हे जाण ॥८॥

मठपतीस भय अंतरीं । म्हणे मज देव पाठवितो दोन भाकरी ।

हा त्यांसि होईल वांटेकरी । तरी सत्वर बाहेरीं घालावा ॥९॥

बलखबुखार म्हणताहे । तुवां नूतन जोग घेतला आहे ।

तरी मठाबाहेत जावोनि राहे । तोचि ठाय तुजलागीं ॥१०॥

अवश्य म्हणवोनि वैराग्यशीळ । बाहेर राहतसे ते वेळ ।

तो कौतुक केलें घननीळें । ते ऎका सकळ भाविकहो ॥११॥

तेथील स्थायिक जो फकीर । तयासि पाठविली भाजीभाकर ।

बलखबुखार क्षुधातुर । परी इच्छा अणुमात्र त्यास नाहीं ॥१२॥

ऎसें जाणोनी लक्ष्मीपती । सांभाळ करीतसे कवणें रीतीं ।

रत्नजडित ताट उतरलें क्षितीं । त्यांत पदार्थ असती मिष्टान्नें ॥१३॥

कांचनाची सुंदर झारी । लक्ष्मीनें घेतलीं करीं ।

लोभ करोनि तयावरी । भोजन सत्वरीं घातलें ॥१४॥

हें मठपती दृष्टीं भरीं । दुरोनि पाहिले ते अवसरीं ।

म्हणे याची आठ दिवसां फकीरी । आणि मी जन्मवरी कष्टतों ॥१५॥

न्याय नाहीं ईश्वरा घरीं । म्हणवोनि न खायी भाकरी ।

उपवासी निजे ते अवसरीं । तंव स्वप्न रात्रीं देखिलें ॥१६॥

फकिराच्या रूपें साचार । तयासि म्हणे विश्वंभर ।

बाहेर उतरला बलखबुखार । त्याणें राज्य समग्र टाकिले ॥१७॥

निष्काम होऊनियां मनी । विनटला असे भजनीं ।

यास्तव सांभाळ प्रतिदिनी । मी चक्रपाणी करीतसें ॥१८॥

आणि तूं पुढें राज्य इच्छितोसि थोर । यास्तव पाठवितों भाजीभाकर ।

आपुलें नाठवोनि जन्मांतर । कोणावर रुसतोसि ॥१९॥

जैसें बिज पेरावें भोईचे पोटीं । तैसेंच येतसे शेवटी ।

ज्याची जैसी सत्कर्म राहटी । मी होय जगजेठी त्यासारिखा ॥१२०॥

ऎसा दृष्टांत देखतां राती । विस्मित जाहला तो मठपती ।

मग येऊनि बलखबुखार प्रती । नमन निश्चिती करीतसे ॥२१॥

पुढें चालिला बलखबुखार । तों एक नगर देखिलें दृष्टीस थोर ।

तेथे मठांत असती बहुत फकीर । तयां समोर पातला ॥२२॥

सैली तसबी कंथा पाहीं । मणका बाणा जवळ नाहीं ।

म्हणवोनि जवळ येऊन देती कोणीही । बाहेर तिहीं भवंडिला ॥२३॥

मग सकळ फकीरांचा होऊनि महंत । तेथें प्रगटलें वैकुंठनाथ ।

म्हणे आज ऎसा निष्ठावंत । नाहीं दिसत त्रिभुवनी ॥२४॥

सैली तसबी कंथा पाहीं । याचे अंतरी असती सर्वही ।

ऎसें सांगोनि ते समयीं । अदृश्य ते ठायी जाहले ॥२५॥

फकीर विस्मित जाहले अंतरीं । म्हणती हा परम साक्षात्करी ।

मग सन्मान करोनि ते अवसरीं । मठा भीतरी आणिला ॥२६॥

जयासि साह्य असतां श्रीहरी । तरी विश्व त्यावरी कृपा करी ।

सुदर्शन घेवोनियां करी । नानापरी रक्षितसे ॥२७॥

न विचारीच याती कुळ । सप्रेम भक्तीचें पाहिजे बळ ।

बलखबुखारासि सर्वकाळ दिनदयाळ भेटती ॥२८॥

आणिक भक्त नैष्ठिक थोर । त्याचे चरित्र ऎका सादर ।

तयासि कासवटीं लावोनि फार । सारंगधर भेटले ॥२९॥

शेख फरीद जातीचा यवन । रांडकीचा मूल होता जाण ।

तो आपुले मातेसि काय म्हणे । देवाचे दर्शन मज करी ॥१३०॥

माता म्हणतसे ते अवसरी । देव काय पडिला वाटेवरी ।

त्याची प्राप्ति व्हावया निर्धारीं । नानापरी कष्टती ॥३१॥

व्हावया श्रीहरी प्राप्त । सकळ विषय टाकिती संत ।

एक ते होवोनि विरक्त । फिरती वनात सर्वदा ॥३२॥

एक ते ब्रह्मचर्य साचार । एक तपें आचरती मुनीश्वर ।

एक शोधोनि आपुलें अंतर । साक्षात्कार पाहती ॥३३॥

एक टाकोनि संसारासी । अरण्यांत बैसती उपवासी ।

एक ते वर्णिती सत्कीर्तीसी । एक श्रवणासी बैसले ॥३४॥

एक सत्कर्म आचरती फार । परी फळाशा न धरिती अणुमात्र ।

एक विष्णुव्रतें आचरती थोर । हरिजागर ते करिती ॥३५॥

मग आत्मवत दुसर्‍यासि मानुनी । क्षुधितासी देती अन्नपाणी ।

एक ते तरले साधुसेवनीं । सत्वासि हानी न करिती ॥३६॥

एक वाचा तप आचरती जाण । असत्य कदा न बोलती वचन ।

वाचेसि करिती हरिस्मरण । एकहीं क्षण न विसंबती ॥३७॥

एक परोपकारी पुत्र राया । आपुली झिजविती सर्व काया ।

एक वज्रासनीं बैसोनियां । योगक्रिया आरंभिती ॥३८॥

एक मिळवूनि कष्टार्जित धन । एक सत्पात्रीं करिती दान ।

एक करिती सद्गुरुसेवन । तन मन धन आर्पोनियां ॥३९॥

श्रीहरी प्राप्तीलागीं पाहें । असती इतुके साधन उपाय ।

यांत तुज कोणतें अनुकुळ होय । तेंचि लवलाहे करी कां ॥१४०॥

सेखफरीद म्हणे वो जननी । मी अन्न त्याजुनि फिरतों वनीं ।

तरीच भेटेल चक्रपाणी । परी भाकर आणोनि एक देई ॥४१॥

माता म्हणे त्यजितोसि अन्न । तरी भाकर कासया मागतोसि जाण ।

येरू म्हणे आश्रय मनें । समाधान व्हावया ॥४२॥

मातेपासोनि घेवोनि भाकरी । पोटीं बांधीन आपुलें करीं ।

मग जावोनि अरण्याभीतरीं । पर्वतावरी बैसला ॥४३॥

मातेनें दीधलें होतें अन्न । तें सर्वथा सोडोनि न पाहेच जाण ।

झाडपाला बरबडून । क्षुधाहरण मग करी ॥४४॥

सगुणरूपें भेटावा हरी । हेचि इच्छा असे अंतरीं ।

परी साक्षात्कार नव्हेचि सत्वरीं । उद्विग्न अंतरीं सर्वदा ॥४५॥

गुप्तरुपें करोनि जाण । तयासि रक्षित जगज्जीवन ।

असत्य होऊन नेदी वचन । तों वर्तलें विंदान अघटित ॥४६॥

गोण्यांत भरोनियां साखर । वाणी घालिती वृषावर।

मार्गी चालता त्यासि सत्वर । पुसिलें उत्तर काय नेता ॥४७॥

सेखफरीद पुसतां ऎशा रीतीं । उर्मत वाणी उत्तर देती ।

गोण्यांत भरली असे माती । ऎसी वचनोक्तीं बोलिलें ॥४८॥

उत्तम म्हणवोनि बोलिला त्यांसीं । तैसीच कल्पना फळे त्यासी ।

व्यवसायी गेले शहरासीं । तों मृत्तिके ऎसी साखर दिसे ॥४९॥

देखोनि घर बुडालें म्हणती । नेणो कर्माची विचित्र गती ।

असत्य बोललों सत्पुरुषाप्रती । यास्तव गती हे झाली ॥१५०॥

ऎसा पश्चाताप येतां मनीं । मग परतोनि आले त्या ठिकाणी ।

विष्णु भक्त पुढतीं बोले वचनीं । काय घेऊनि जातसां ॥५१॥

वाणी बोलती प्रत्युत्तर । बैलावरी भरिली साखर ।

ऎसें ऎकोनि तपस्वी नर । उत्तम बरें म्हणे तेव्हां ॥५२॥

व्यवसायी उसवोनि पाहती गोणी । तों पूर्ववत शर्करा देखिली नयनीं ।

ऎसा चमत्कार देखोनि । मग सद्भावे चरणी लागले ॥५३॥

साखर घेऊनी परातभर । पुढें आणोनि ठेविली सत्वर ।

तें देखोनियां वैष्णववीर । जातसे दूर पळॊनी ॥५४॥

म्हणे माझी भ्रंशावया बुध्दी । देव पुढें दाखवितो सिध्दी ।

परी मज नलगे हे त्रिशुध्दी । दांभिक उपाधी कासया ॥५५॥

मातेनें भाकर दीधली जाण । ते पोटीं तैशीच बांधिली त्याणें ।

क्षुधेनें व्याकुळ होतां प्राण । पाला तोडुन खातसे ॥५६॥

ऎशा रीतीं त्या अवसरा । वर्षे लोटोनि गेलीं बारा ।

तरी भेट नव्हेचि विश्वोध्दारा । मग परतोनि घरा येतसे ॥५७॥

घरासि येऊनियां सत्वरी । आपुले मातेसि नमस्कारी ।

म्हणे माझेनि न भेटेचि श्रीहरी । उपाय लौकरी मज सांग ॥५८॥

भाकर नेली बरोबर । तेही मातेसि दाखवीत सत्वर ।

काष्ठवत जाहलें शरीर । जटाभार मस्तकीं ॥५९॥

म्हणे इतुके कष्ट केले जननी । परी अजून न भेटे चक्रपाणी ।

मग केंसाची बट हातीं धरोनी । माता ते क्षणीं उपडीत ॥१६०॥

तों किंचित अंग चोरिलें त्याणें । माता हांसोनि बोले वचन ।

ऎसेंच दुःख तरुवरांकारणें । दीधले जाण निजपुत्रा ॥६१॥

त्या दोषास्तव श्रीहरी । भेटला नाहीं ये अवसरीं ।

मग पुढती मातेसि नमस्कारी । म्हणे आतां हिंसा न करीं सर्वथा ॥६२॥

मग महारण्यांत जाऊन । भक्षितसे गळित पानें ।

एके दिवसीम वृक्षाकारणें । शरीर टांगोनी घेतसे ॥६३॥

एकाग्र करोनियां चित्त । महाविष्णूचा धांवा करित ।

म्हणे पतितपावना कृपावंत । मज दीनातें सांभाळी ॥६४॥

महावृक्षाचे खांदीवर । काष्ठवत लोंबतसे शरीर ।

तों कावळा येवोनि टोंचित सत्वर । तयासि उत्तर काय वदे ॥६५॥

बापा सर्वांग तोडोनि खायी । परी दोन्ही नेत्र तैसेचि ठेवि ।

श्रीहरि दर्शनाची पाहीं । आस जीवीं धरिली असे ॥६६॥

ऎसें म्हणवोनि ते वेळां । टपटपा आसवें आलीं डोळां ।

प्रेमें सद्गदित जाहला गळा । घनसावळा पहातसे ॥६७॥

गुप्तरुपें सन्निध होते हरी । ते प्रकट जाहले ते अवसरीं ।

आपुल्या हातें सोडोनि दोरी । म्हणे श्रमलासि भारी निजभक्ता ॥६८॥

माझीं प्राप्ति व्हावयाकारणें । दोन तपें केली अनुष्ठानें ।

ऎसे म्हणवोनि जगज्जीवन । देत आलिंगन तयासि ॥६९॥

कृपेनें पाहतांचि विश्वंभर । त्याचें जाहलें दिव्य शरीर ।

शेखफरीद पाहे उघडोनि नेत्र । तो वैकुंठविहार पुढें असती ॥१७०॥

चतुर्भुज घनसावळा । दिव्य पीतांबर कांसे पिवळा ।

मुकुट कुंडलें वनमाळा । पाहतांचि डोळां विश्रांती ॥७१॥

साजिरें श्रीमुख मनोहर । कंठीं कौस्तुभ झळके सुंदर ।

गळां वैजयंती हार । पायीं तोडर मिरवतसे ॥७२॥

ऎसें रुप देखतां नयनीं । सद्भावे मिठी घातली चरणीं ।

मग भावाच्या उपचारें करोनि । चक्रपाणीं पूजिला ॥७३॥

साक्षात रूप देखिलें नयनीं । मग तेंच सांठविलें हृदय भुवनीं ।

शेखफरीद अरण्यांतूनि । आला परतोनि मंदिरां ॥७४॥

आपुले मातेसि नमस्कारी । म्हणे तुझ्या प्रसादे भेटला हरी ।

जननीसि संतोष झाला अंतरीं । म्हणे चिन्ह निर्धारी पालटलें ॥७५॥

तैपासोनि तो वैष्णवभक्त । जनांत जाहला प्रख्यात ।

आपुल्या दासाची भगवंत । सत्कीर्ती वाढवित भूमंडळी ॥७६॥

आणिक चरित्र रसाळ गहन । सादर ऎका भाविक जन ।

श्रवणमात्रें तत्काळ जाण । दुरितें संपूर्ण नासती ॥७७॥

तापी तीरीं थारनेर जाण । तेथें नारायणभट्ट राहे ब्राह्मण ।

परम सुशील भाविक पूर्ण । श्रीहरी चिंतन करीतसे ॥७८॥

निराश होवोनि सर्वोपरी । स्नानसंध्या अनुष्ठान करी ।

अन्नवस्त्रांची वाण घरीं । परीं संतोष अंतरीं सर्वदा ॥७९॥

न करी कोणाचें उपार्जन । रावरंक सारिखें त्याजकारणें ।

जयासि मृत्तिका आणि धन । समसमान सारिखीं ॥१८०॥

नामरूपीं जडलें चित्त । सर्वकाळ विदेही स्थित ।

जो जो पदार्थ नाशवंत । विषतुल्य मानित तयासी ॥८१॥

सर्वकाळ श्रीहरीभजन । स्नानसंध्या अनुष्ठान ।

समयीं अतिथी आलिया जाण । तरी विष्णुसमान त्यासि मानी ॥८२॥

अन्नवस्त्रांची अडचण घरीं । परी सत्वासि हानि कदा न करी ।

त्याचें चित्त पाहावया निर्धारीं । द्विजरूपें श्रीहरी पातले ॥८३॥

नारायणभट्ट तापीतीरीं । स्नानसंध्येसि गेला सत्वरी ।

घरीं कांता धंदा सारी । तों भक्तकैवारी पातले ॥८४॥

ब्राह्मणाच्या रूपें जगज्जीवन । घरीम बैसले येऊन ।

त्याच्या कांतेसि काय म्हणे । आम्हांसि जाणें महायात्रे ॥८५॥

एक परीस आहे मजजवळ । तो ठेवावयासि नाहीं स्थळ ।

तुम्ही निरपेक्ष सर्वकाळ । यास्तव जवळ पातलों ॥८६॥

ऎसें म्हणवोनि वैकुंठपती । लोखंड आणवीत तिज हातीं ।

तें परिसासि घांसितांचि निश्चितीं । कांचन अवचिती तें झालें ॥८७॥

इतुका चमत्कार दाखवोनि श्रीहरी । काय बोलती ते अवसरीं ।

तुम्ही सुवर्णसांठा करोनि घरीं । दरिद्र दुरी दवडावें ॥८८॥

नारायणभट्ट आलियावर । आमुचा सांगावा नमस्कार ।

परतोनि यावया साचार । दोन संवत्सर लागती ॥८९॥

यात्रा करोनि आलियावर । परीस मागेन मी साचार ।

जतन ठेवावा तोंवर । बोभाटा बाहेर न करावी ॥१९०॥

इतुकें सांगोनि रुक्मिणीपती । आपण गेले सत्वरगती ।

घरस्वामीण संतोषे चित्तीं । म्हणे देवें निश्चिती केली माझी ॥९१॥

भ्रतार विदेही देवळासी । भजन करीत अहर्निशीं ।

पदार्थ पाहिजे संसारासी । तरी देव मजसी पावला ॥९२॥

ऎसे म्हणवोनि ते समयीं । परिसासि लाविलीं दाभणसुयी ।

सुवर्ण होतांचि लवलाहीं । सामग्री सर्वही आणितसे ॥९३॥

दोन प्रहर होतांचि सत्वर । नारायणभट्ट पातले घरीं ।

कांता हर्षयुक्त अंतरीं । करी पक्वान्ने ॥९४॥

मग कांतेसि पुसे तयेक्षणीं । सामग्री आणिली कोठुनी ।

पतीचा प्रश्न ऎकोनि कानीं । यथार्थ कामिनी ते सांगे ॥९५॥

म्हणे एक ब्राह्मण आजिचें दिवसीं । येथोनि गेला वाराणसीं ।

तो घरीं येऊनि सांगे मजपासी । तुम्ही एक विश्वासी दिसतां ॥९६॥

त्याजवळ परीस होता जाण । लोखंड लावूनि केलें कांचन ।

ऎसा चमत्कार देखवोन । म्हणे जतन करणे निजवस्तू ॥९७॥

तुम्हीं सुवर्णसांठा करोनि घरीं । दैन्य दुःख दवडावें दुरी ।

दोन संवत्सर लोटलियावर । परतोनि माघारीं आम्ही येऊं ॥९८॥

तुम्हीं साधोनि आपुलें काज । परतोनि परीस द्यावा मज ।

ऎसें बोलोनि गेला आज । हें नवलचीच मज वाटे ॥९९॥

किंचित सुवर्ण करोनि घरीं । मग घेऊनि गेलें बाजारीं ।

उत्तम आणोनि सामग्री । स्वयंपाक मंदिरीं केला असे ॥२००॥

तुम्हीं आजपासोनि तत्वतां । न करावी कांहीं संसारचिंता ।

हृदयीं आठवोनि भगवंता । भजन आतां करावें ॥२०१॥

ऎकोनि कांतेचें उत्तर । अनुतापें द्रवला वैष्णववीर ।

म्हणे उपाधींत पडतां साचार । तरी रुक्मिणीवर अंतरला ॥२॥

ऎसें म्हणवोनि ते समयीं । परीस मागीतला लवलाहीं ।

कांचन केलें होतें तेंही । तापींत लवलाही टाकिलें ॥३॥

उपाधिरहित होवोनि त्वरित । घरासि आला विष्णुभक्त ।

मग पंक्तिसि घेऊनि अभ्यागत । भोजन सारित निजप्रीती ॥४॥

कांता म्हणतसे तयास । गृहस्थ परतोनि येईल घरास ।

तो मज मागेल आपुला परीस । मग मी तयास काय देऊं ॥५॥

नारायणभट्ट बोलती उत्तर । त्यासि आम्हापाशीं पाठवीं सत्वर ।

एकाचे परतोनि देईन चार । चिंतातुर तुवां न व्हावें ॥६॥

ऎसें करोनि समाधान । भजन करीत निजप्रीतीनें ।

नामरूपीं लाविलें मन । प्रपंच भान असेना ॥७॥

विष्णुपूजन हरीकीर्तन । वांचोनि भागवत करी मनन ।

दोन संवत्सर लोटतां जाण । परतोनि ब्राह्मण तो आला ॥८॥

नारायणभटाचें मंदिरीं । घरस्वामिनीसि भेटे सत्वरीं ।

म्हणे आमुची वस्तु ठेविलीं घरीं । परतोनि माघारी तें द्यावी ॥९॥

कांता तयासि उत्तर देती । स्नानासि गेले आमुचे पती ।

त्यांजपाशीं परीस निश्चितीं । घरासि येती मग मागा ॥२१०॥

ऎकोनि म्हणे जगज्जीवन । परीस दीधला तुजलागून ।

त्यासि कां सांगीतली जीवींची खुण । कांहीं कारण नसतांचि ॥११॥

जैसा पांढरा स्फटिक मणी । तैसीच दिसती त्याची करणीं ।

ऎकोनि ब्राह्मणाची वाणी । घरस्वामिनी काय बोले ॥१२॥

प्राणनाथासि गोष्ट वंचितां । तरी तिसीं न म्हणावें पतिव्रता ।

म्हणवोनि त्यांसि सांगितली वार्ता । येतील आतां घरासी ॥१३॥

ब्राह्मण ते अवसरी । माझी संगत गेली दुरी ।

आतां चलावे तापीतीरीं । परीस सत्वरीं दे माझा ॥१४॥

ऎसें बोलतांहि द्विजवर । कांता जाहली चिंतातुर ।

म्हणे उत्तम न दिसे विचार । मग तापीतीर पावली ॥१५॥

तों नारायणभट्ट एकांतस्थानीं । जप करीत बैसले आसनीं ।

तों कांता येऊनि सुलक्षणी । मृदुवचनीं बोलत ॥१६॥

गृहस्थ ठेवोनि गेला परीस । तो परतोनि आला मागावयास ।

तरी काय उत्तर द्यावें तयास । पहा दृष्टीस याजकडे ॥१७॥

नारायणभट्ट मानसपूजनीं । ध्यानास आणि चक्रपाणी ।

तों ब्राह्मणरूपें दिसे नयनी । विस्मित मनीं होतसे ॥१८॥

नेत्र उघडोनि जंव पाहे । तो द्विजवर पुढें उभा आहे ।

म्हणे परीस द्यावा लवलाहें । ध्यानस्थ काय बैसला ॥१९॥

ऎकोनि म्हणे वैष्णवभक्त । परीस टाकिला जळांत ।

आम्हांसि उपाधि कासया व्यर्थ । अंतरे भगवंत त्या साठीं ॥२२०॥

देव म्हणती ते समयीं । आम्ही तुज ऎसे उदास नाहीं ।

परीस घेतल्यावीण पाहीं । जाणार नाहीं सर्वथा ॥२१॥

ऎसा देखोनि त्याचा निकर । उदकांत जाय भक्त चतुर ।

हातीं गोटे घेऊनि चार । नदीबाहेर पातले ॥२२॥

म्हणें यातून आपुला घ्या ओळखून । लोखंड लावीत जगज्जीवन ।

तों अवघेचि परीस असती जाण । लावितां कांचन होतसे ॥२३॥

मग प्रसन्न होऊनि श्रीहरी । ब्राह्मण वेष टकिला सत्वरी ।

चतुर्भुज पितांबरधारी । दृष्टी समोरि दिसतसे ॥२४॥

श्रीमुखसाजिरें मनोहर । कानीं कुंडलें मकराकार ।

समपदीं उभा रुक्मिणीवर । देखतांचि अंतर निवालें ॥२५॥

कांता भ्रतार दोघे जण । नमस्कार करिती निजप्रीतीनें ।

सप्रेमभावें करोनि पूजन । जगज्जीवन आलिंगिला ॥२६॥

सगुणरूप देखिलें दृष्टी । तें ठेविलें हृदयसंपुटीं ।

देवें पाहतांचि कृपादृष्टीं । तुटे फांसटी भवबंधाची ॥२७॥

पुढिले अध्यायीं कथासुंदर । वदविता श्रीरुक्मिणीवर ।

महीपती त्याच्या अभयवरें । आर्ष उत्तर बोलतसे ॥२८॥

स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविक भक्त । सत्तेचाळिसावा अध्याय रसाळ हा ॥२२९॥ ॥अ०॥ ॥४७॥ ॥ओ०॥॥२२९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP