श्रीगणेशाय नमः ।
जय देवाधिदेवा रुक्मिणीरमणा । अनाथबंधु करुणाघना ।
मी मूढमती नारायणा । सकळ अज्ञानां माजि श्रेष्ठ ॥१॥
भावहीन भक्तिहीन । ज्ञानहीन वैराग्यहीन ।
अर्चन पूजन न घडेचि जाण । पतित संपूर्ण सर्वांगीं ॥२॥
शास्त्रश्रवण न कळेचि कांही । गीर्वाण भाषेंत गम्य नाहीं ।
अंतरसाक्ष तूं विठाबाई । जीवींचें सर्वही जाणसी ॥३॥
ऐसें असतां चक्रपाणी । वायांचि धिंवसा उपजला मनीं ।
मांडिली ग्रंथाची उभारणी । आश्रय मानूनी एक तुझा ॥४॥
एकवीस स्वर्ग मेरुवर । कीं नक्षत्रांसी आधार वायुचक्र ।
तेवी माझे बुद्धींसी निरंतर । आश्रय साचार तूं देवा ॥५॥
कीं चक्षुश्रव्यावरीं साचार । उर्वीचा संपूर्ण असे भार ।
कीं जहाजें फिरती सागरावर । दुसरा थार नसेचि त्यां ॥६॥
वेद वचनाच्या आधारें । सत्कर्म आचरती ऋषीश्वर ।
तेवी मी वदतों संतचरित्र । तुझ्या आधारें पांडुरंगा ॥७॥
जैसें तृणाचें बुझावणें । हालत असे वायुगुणें ।
त्याचें अंगीं कर्तेपण । स्वतंत्र कोठोन असेल ॥८॥
तेवीं तूं अंतरसाक्ष चैतन्यघन । बुद्धिप्रेरक जगज्जीवन ।
हृदयीं निरंतर बैसोन । देई आठवण मज देवा ॥९॥
जैसें वाजविणारा फुंकितां वारें । तैसेंच वाजे वाजंतरें ।
तेवीं मी बोलिलो उणेंपुरें । तें निमित्त सारें तुजवरी ॥१०॥
मी तो मंदमती निश्चितीं । ऐसी साक्ष येतसे चित्तीं ।
परी तुझा वरदायक महीपती । लोक बोलती प्रख्यात ॥११॥
हा अभिमान धरोनि चित्तांत । हृदयी बैसावें सदोदित ।
श्रीभक्तलीलामृत आरंभिला ग्रंथ । तरी शेवटाशी त्वरीत पाववी ॥१२॥
आतां ऐका संतसज्जन । स्वर्गी असतां पाकशासन ।
सन्निध होता मरुद्गण । तयासी कारण सांगितले ॥१३॥
स्वामीनें कार्य आज्ञापितां । परी तो गण असावध होता ।
इंद्रें मग कोप धरोनि चित्ता । होय शापिता तयाशी ॥१४॥
म्हणेरे तूं उन्मत्त थोर । स्वामीसेवेसि नससी तत्पर ।
तरी पतन पावून सत्वर । होशील नर मृत्युलोकीं ॥१५॥
ऐसें शापितां आखंडळ । अनुतापें द्रवला तत्काळ ॥
मरुद्गण जोडोनि करकमळ । स्तुति रसाळ मांडिली ॥१६॥
म्हणे जय जय शचीवरा । तूं मुगुटमणी सकळ सुरां ॥
तुझे आज्ञेने सत्वरा । मेघ वसुंधरा निववीतसे ॥१७॥
तुमच्या संकटास्तव जाण । महाविष्णु जाहला वामन ।
बळी पाताळी घालून । निजपद निर्विघ्न रक्षिले ॥१८॥
आतां कृपादृष्टीं विलोकून मातें । उःशाप द्यावाजी त्वरित ।
जेणें जीव पावे उद्धारगत । तो उपाय त्वरित सांग देवा ॥१९॥
ऐसी स्तुति ऐकोनि कानीं । संतुष्ट जाहले वज्रपाणी ।
जैसी बाळकावरी आधी कोपे जननी । मग बुझाओनी संबोधित ॥२०॥
की कुळगुरुपासी असतां पोर । चुकतां शिक्षा करी सत्वर ।
मागुती आपुल्या कृपावरें । शिकवीत अक्षरें पडताळोनी ॥२१॥
तैशाच परी अमरपती । आधीं कोप धरिला चितीं ॥
मग मरुद्गण करितां ग्लांती । उःशाप बोलती तेधवां ॥२२॥
म्हणे करावया जगदुद्धार । ब्रह्मा विष्णु आणि हर ।
कलियुगामाजी साचार । घेतील अवतार अंशरुपें ॥२३॥
योगमाया जे आदिशक्ती । मुक्तारुपें अवतरेल क्षितीं ।
निवृत्ति राज तो मृडानीपती । ज्ञानदेव होती महाविष्णु ॥२४॥
ब्रह्मयाचा अवतार पूर्ण । त्यासि नांव ठेविलें सोपान ।
तूं अनन्य भावें करुन । जासील शरण त्यालागीं ॥२५॥
सत्समागमाचेनि गुणें । अध्यात्मविद्येंत होशील प्रवीण ।
विश्वरुप भासतील अवघे जन । होईल निरसन द्वैताचें ॥२६॥
सद्गुरुचें कृपेनें साचार । तुज होईल साक्षात्कार ।
अवघें विश्व चराचर । ब्रह्मरुपपर भासेल कीं ॥२७॥
साक्षात् परब्रह्म विटेवरी । श्रीपांडुरंग मूर्ति भीमातीरीं ।
त्याची उपासना धरितां अंतरीं । मग संकटी श्रीहरी तुज पावेल ॥२८॥
गृहस्थाश्रम करुनि जाण । संतति करिशील उत्पन्न ।
मृत्युलोकीं वंश ठेवून । मग समाधिधन पावसी ॥२९॥
तेव्हां पूर्ववत् स्वर्गस्थान । प्राप्त होईल तुज कारण ।
सर्वथा असत्य नव्हें वचन । सत्य प्रमाण हे वाचा ॥३०॥
ऐसें बोलतां पुरंदर । मरुद्गणाचें संतोषें अंतर ।
शापविमोचन ऐकूनि सत्वर । करी नमस्कार इंद्रातें ॥३१॥
स्वर्गीहून देदीप्य मूर्ती । उतरत तेव्हां सहज स्थिती ।
नभांत पडे प्रकाशदीप्ती । तेणें निशापती लोपला ॥३२॥
उपदेव मरुद्गण अवतार । येतसे कर्म भूमीवर ।
तेज न माय अंगावर । सुकृत थोर म्हणोनियां ॥३३॥
कोणीही प्राविण्याचे पदरीं । सात्विक पुण्य असेल जरी ।
तरी उत्तम शरीर लाधेल सत्वरीं । चौर्यांसी फेरी हिंडतां ॥३४॥
नानापरीचे विषयभोग । लाधती सुकृताचेनि योगें ।
कधीं न होय मनोभंग । सकळ जग मानी त्या ॥३५॥
निजपुण्यें करुनि सत्वरी । सुकृत अधिक वाढेल पदरीं ।
बुद्धि सर्वथा नव्हे अधुरी । निश्चय अंतरीं ठसावें ॥३६॥
पुण्यवंत जें जें करुं म्हणे । तें तें तत्काळ होऊनि येतसे जाण ।
सर्वथा अडथळा नकरी कोण । श्रीनारायण साह्य ज्यासी ॥३७॥
मृत्युलोकीं पुण्यवंत नर । तयासी सर्वत्र म्हणती बरें।
मोक्षपदाही गेलियावर । परी सत्कीर्ति उरे माघारी ॥३८॥
असो आतां बहुत भाषण । पुरंदर शापाचेनि गुणें ।
क्षितीं उतरला मरुद्गण । परी स्वरुपलावण्य तयाचें ॥३९॥
तपती पयोष्णी संगमीं जाण । दाट लागलें कर्दळीवन ।
आणिकही वृक्ष असती सघन । रमतसे मन ते ठायीं ॥४०॥
जाईजुई पारिजातक पाडळी । चांपे सेवती फुलत्या सकळी ।
बटमोगरे आणि बकुळी । भ्रमर निराळीं गुंजती ॥४१॥
खानदेशांत तये वेळ । तपती संगमीं रमणीय स्थळ ।
मरुद्गण उतरोनि त्या जवळ । स्नान तत्काळ सारितसे ॥४२॥
मग चर्मचक्षु झांकूनियां प्रीतीं । अनुष्ठान करीत तयेक्षितीं ।
सर्वथा न बोले कोणाप्रती । अंध दिसती जनलोकां ॥४३॥
परस्परें बोलती जन । तपती संगमीं कर्दळी वन ।
तेथें अंधऋषि करीत अनुष्ठान । आला कोठून कळेना ॥४४॥
परम सुंदर त्याचें शरीर । तेज न मायेचि मुखावर ।
मृत्युलोकींचा ऐसा नर । नाहीं साचार देखिला ॥४५॥
स्वरुप चांगलें संपूर्ण । म्हणोनि चांगदेव नामाभिधान ।
आपुलें मतीनें ठेवूनि जन । येती दर्शन घ्यावया ॥४६॥
तों वरुण गांवींचे दोघे विप्र । उभयतां बंधु सहोदर ।
चांगदेवाची कीर्ती ऐकूनि थोर । आले सत्वर त्या ठायीं ॥४७॥
चित्तीं धरुनि कामानिक भक्ती । एकमेकासीं विचार करिती ।
तापसी अनुष्ठान करितो प्रीतीं । तरी भेटूं निश्चिती तयासी ॥४८॥
तुळसी मंजुर्या सुमनहार । बुका खजूर घेऊनि सत्वर ।
चांगदेव अनुष्ठान करितो तीव्र । तयासि नमस्कार घातला ॥४९॥
लावण्य रुप देखोनि दृष्टीं । परम आश्चर्य वाटलें पोटीं ।
म्हणती धन्य धन्य त्वां परमेष्टी । निर्मिला सृष्टीं नर ऐसा ॥५०॥
दृष्टीसीं पाहतां तयाप्रती । उभयतां बंधु तटस्थ होती ।
म्हणती मनुष्य न म्हणावें याजप्रती । उतरली मूर्ति स्वर्गींहुनी ॥५१॥
लोक म्हणती चांगदेव । तो प्रत्यय आला पाहतां अनुभव ।
बत्तीस लक्षणें असती सर्व । पाहतांचि जीव निवाला ॥५२॥
हात जोडोनियां जाण । सन्मुख राहिले दोघेजण ।
म्हणती धन्य धन्य आजिचा सुदिन । जाहलें दर्शन संतांचें ॥५३॥
विश्वोद्धार करावया निश्चितीं । यास्तव अवतार धरिला क्षितीं ।
दर्शन स्पर्शन उद्धारगती । पुण्यसंपत्ती विस्तारे ॥५४॥
संतभाषण यथार्थ। जरी सद्भावें घडे अकस्मात ।
तरी नष्ट संदेह जो मनांत । तो दूर होत तेच क्षणीं ॥५५॥
ऐसी करुनियां स्तुती । उभयतां बंधु तेथें राहती ।
चांगदेवाची सेवा करिती । मनोरथ चित्तीं धरुनियां ॥५७॥
भक्ष्य भोज्य इच्छितां कांहीं । तत्काळ आणोनि घालिती ठायीं ।
अर्चन पूजा साहित्य सर्वही । आणूनि लवलाही ते देती ॥५८॥
शौचास जातां ते वेळें । ठेविती मृत्तिका जवळ ।
घरीं जावयाची नाहीं तळमळ । राहिले निश्चळ ते ठायीं ॥५९॥
चांगदेव निद्रित होतांचि ते रातीं । उभयता बंधु चरण चोळिती ।
एक मास लोटतां ऐशा रीतीं । मग विनविती स्वामीतें ॥६०॥
आतां कृपा करोनि आम्हांवर । अनुग्रह द्यावा जी साचार ।
तेणेंचि सफळ हा संसार । होईल उद्धार जीवाचा ॥६१॥
ऐसी ऐकुनियां ग्लांती । चांगदेव तयांसि उत्तर देती ।
अनुग्रहाची कैसी रीती । ते मजप्रती कळेना ॥६२॥
आंधळा ब्राह्मण एकटा वनीं । पडिलों असे ये ठिकाणीं ।
मंत्र तंत्र उभारणी । ते मज लागोनि कळेना ॥६३॥
ठाव ठिकाण माता पिता । तें मी न जाणेचि सर्वथा ॥
नाहीं पुत्र कलत्र तत्त्वता । जगीं मान्यता तेही नसे ॥६४॥
तुम्हीं सत्पुरुष पाहोनि थोर । तयासि शरण जावें सत्वर ।
आम्हांसि नावडे जो जार । ऐसें उत्तर बोलिले ॥६५॥
शिष्य म्हणती तये समयीं । आमुचा निश्चय तुमचे पायीं ।
अनुग्रह घेतल्यावीण कांहीं । जाणेंचि नाहीं सर्वथा ॥६६॥
स्वामींची व्हावी कृपादृष्टी । ऐसा हेत धरिला पोटीं ।
केली असे जीवाची साटी । बोलती गोष्टी वरवर ॥६७॥
चित्तीं कामना धरुनि थोर । जे सद्गुरुसेवा करिती नर ।
त्यांचें वैराग्य लटिके तोंवर । धन धान्य जोंवर ये हातां ॥६८॥
अज्ञानी करिती भक्ती । चित्तीं धरोनि धनसंपत्ती ।
तरी देव नावडे तयांच्या मती । पुढें ठाकती मनकामना ॥६९॥
अज्ञानी भक्ताची जे पूजा । ते सर्वथा नावडे गुरुडध्वजा ।
निष्काम भक्ताचिया काजा । वैकुंठ राजा धांवतसें ॥७०॥
कामनिकाची व्यर्थ भक्ति । कामनिकाची व्यर्थ कीर्ती ।
कामनिकाची पुण्य संपत्ती । सरोनि जाती काळांतरें ॥७१॥
वस्त्रें भूषणें टाकोनि समग्र । कामनिक हिंडे दिगंबर ।
तरीं तयापासून देव दूर । श्रम थोर व्यर्थ गेले ॥७२॥
निष्काम भक्त घराचारी । सप्रेमभावें भजन करी ।
त्याच्या मागें पुढें राहूनि श्रीहरी । नाना परी रक्षितसे ॥७३॥
असोत हीं भाषणें बहुत रीतीं । धनकामना धरुनि चित्तीं ।
दोघे ब्राह्मण करोनि ग्लांती । अनुग्रह मागती चांगदेवा ॥७४॥
सद्भाव देखोनियां वर । ग्लांती करिती वारंवार ।
आह्मांसि अनुग्रह द्यावा जी सत्वर । निज कृपावर आपुला ॥७५॥
ऐसें म्हणोनि लवलाहे । मग स्वामीचे धरिले पाय ।
जाणोनि तयांचा अतिभाव । सग्दुरु अभय देतसे ॥७६॥
मस्तकीं ठेवूनियां पाणी । अनुग्रह दीधला तये क्षणीं ।
उपासना मंत्र सांगोनि कानीं । नामस्मरणीं लाविले ॥७७॥
आवडी धरुनि चित्तास । सेवेसि तिष्ठती रात्रंदिवस ।
ऐसे लोटतां सात मास । मग एकांतीं स्वामीस बोलती ॥७८॥
आम्हीं संसारीं आलिया सदा । जन्मवरी भोगितों आपदां ।
पोटभरी अन्न न मिळेचि कदा । करितों धंदा बहुसाल ॥७९॥
खोटें आमुचें प्राक्तन । निवडूनि आलें असे संपूर्ण ।
उदीम करितां न फिटेंचि ऋण । मनुष्यांसि अन्न मिळेना ॥८०॥
यास्तव संसारीं त्रासलें मन । धरोनि बैसलों स्वामींचें चरण ।
ऐसें वर्तमान सांगतां ब्राह्मण । द्रवलें मन सद्गुरुचें ॥८१॥
चांगदेव पुसती त्यांज कारण । संसारीं उदीम करीतसां कवण ।
ते म्हणती भांडवल काढोनि ऋण । चाटेपण करीतसों ॥८२॥
ऐसें सांगतां तयातें । प्रसन्न जाहलें सद्गुरुनाथ ।
म्हणती तुम्हीं बाजारासि जाल जेथें । आम्हांसि सांगातें घेऊनि जा ॥८३॥
ऐकूनि चांगदेवाची मात । शिष्य पुढती पायीं लागत ।
म्हणती कुटुंब आहे बहुत । उपवासी मरत सर्वदा ॥८४॥
आठा दिवसां सोमवार । संगमी भरतसे बाजार ।
तेथें जातसें निरंतर । परी कांहींच नुरे भक्षावया ॥८५॥
ऐसे बोलतां उत्तर । तों सवेंचि पातला सोमवार ।
स्वामीसि बैसवूनि अश्वावर । खांद्यावर दिंड घेती ॥८६॥
पाल देऊनियां सत्वरीं । स्वामीस बैसविती आसनावरी ।
ऋद्धिसिद्धि बरोबरी । निरंतरी सर्वदा ॥८७॥
संत जाती जयाचे घरीं । दुःख दारिद्रय पळतसे दुरी ।
आपदा न होय संसारीं । धरितां अंतरीं विश्वास ॥८८॥
चांगदेव सन्निध बैसतांचि देख । तेथेंचि पातलें गिर्हाइक ।
सांगितलें मोल देती लोक । वाटे कौतुक शिष्यास ॥८९॥
जितुकें कापड आणिलें त्यांनीं । तितुकेंही विकिलें त्या ठिकाणीं ।
हिशोब पहातां तयेक्षणीं । तो नफा द्विगुणीं देखिला ॥९०॥
ऐसा चित्तास येतां प्रत्यय । विस्मित मन तयांचें होय ।
म्हणती ऊर्जितकाळ आला आहे । धरिती पाय सद्गुरुचे ॥९१॥
ऐसें बोलोनि परस्पर । करिती चांगदेवासि नमस्कार ॥
म्हणती आपुला लाधतां कृपावर । द्रव्य फार मिळाले ॥९२॥
सद्गुरु देती प्रत्युत्तर । तुमची भक्ती देखूनि फार ।
प्रसन्न जाहला गिरिजावर । अन्य विचार नसेची ॥९३॥
सामर्थ्य असोनि आपुल्यांत । परी अहंता न धरी चित्तांत ।
देवावरी घाली निमित्त । तरी तोचि संत जाणावा ॥९४॥
सर्वसिद्धि असती पायीं । परी आपुल्या आंगीं कर्तृत्व नाहीं ।
अहंब्रह्म हें नयेचि जीवी । तरी तोचि सर्वीं सर्वात्मक ॥९५॥
योगबळें आसन उडविती । नाना सिद्धींचे सोहळे दाविती ।
विषयासाठी लोलुप स्थिती । तयासी विश्रांती असेना ॥९६॥
स्वमुखें सांगे लोकां करणें । आम्हीं ब्रह्मनिष्ठ परिपूर्ण ।
चित्तीं आठविती दोषगुण । तेचि अज्ञान म्हणावें ॥९७॥
उदंड आत्मज्ञानी जाहला आहे । परी उत्पत्ति स्थिति आणि प्रळय ।
याचे इच्छेने सर्वथा नव्हे । तें सत्ता आहे वेगळीच ॥९८॥
तैसी चांगयाची नव्हे स्थिती । सर्वसिद्धि अनुकूल असती ।
परी स्वमुखे सांगे शिष्यांप्रती । कैलासपती तुष्टला ॥९९॥
असो ते संप्रदायी दोघेजण । पाकसिद्धि करिती जाण ।
मग चांगदेव मृत्तिकेचे लिंग करुन । करीतसे अर्चन शिवाचें ॥१००॥
धूप दीप प्रदक्षिणा । महानैवेद्य अर्पिला जाणा ।
स्तुतिस्तोत्रें करुनि नाना । कैलासराणा तोषविला ॥१॥
मग चांगदेवाचिये पंक्ती । उभयतां बंधु भोजन करितां ।
स्वानंदरसीं जाहलिया तृप्ती । मग तांबुल देती सद्गुरुतें ॥२॥
मृदु आंथरुण घालूनि सहज । त्यावरी निजविला योगिराज ।
उभयतां सेवक करिती द्विज । संसार काज साधावया ॥३॥
असो यापरी क्रर्मिली रात । तों उदयासि पावला आदित्य ।
चांगदेव उठोनि त्वरीत । गेले वनांत कर्दळीच्या ॥४॥
सद्गुरुसि स्वस्थानीं बैसवूनि पाहीं । घरासि नेले व्यवसायी ।
सेवेसि येती लवलाहीं । अंतर कांहीं पडेना ॥५॥
तो दुसरा हाट येतां निश्चिती । सद्गुरुसि बाजारा घेऊनि जाती ।
आणिक कापड घेऊनि विकिती । लाभ पावती चौगुणा ॥६॥
सद्गुरुसेवा करितांचि जाण । जाहलें दारिद्रय विछिन्न ।
फिटलें सावकाराचें ऋण । सुखसंपन्न संसारीं ॥७॥
एक संवसत्सर साचार । चांगयासि नेती बरोबर ।
लक्षाधिपती सावकार । जाहले द्विजवर ते दोघे ॥८॥
द्रव्य खर्चोनिया बहुत । मंदिर बांधिले नगरांत ।
अलंकार भूषणे कुटुंबांत । रमले चित्त संसारीं ॥९॥
जगीं प्रशंसा जाहली फार । सोयरे केले थोर थोर ।
संपत्ति येता इष्टमित्र । करिती आदर तयांचा ॥११०॥
तेणें बुद्धिभ्रंश होऊनि समस्त । संसाराकडे रमलें चित्त ।
स्वामिसेवेसि अंतर पडत । पाहिलें आर्त राहिलें ॥११॥
दोघांतून एक निश्चितीं । एक वेळ समाचार घेती ।
ऐशी त्यांची पालटतां चित्तवृत्ती । समजले चित्तीं चांगदेवा ॥१२॥
कनक आणि कांता जाण । साधकासि दोन महा विघ्न ।
अवचित प्राप्त होतांचि पूर्ण । मग परधर्म साधन घडेना ॥१३॥
जैसें मातेपासूनि शरीर निश्चित । परी कुपूत नायकेचि मात ।
कांतेचिया वचनें वर्तत । विषयासक्त होऊनी ॥१४॥
तेवीं सद्गुरु निश्चितीं । शिष्यासि आली धनसंपत्ती ।
मग स्वामीस विसरोनि दुर्मती । जाहले रत संसारीं ॥१५॥
अग्नीपासूनि होय जीवन । तें पाणीच विझवीतसे कृशान ।
ज्याचे मंत्र त्याजकरण । फिरती संपूर्ण या रीतीं ॥१६॥
दरिद्री ब्राह्मण होतें आधीं । मग सद्गुरुनें दिधली महासिद्धी ।
तेव्हां संपत्ति येतांचि त्रिशुद्धी । त्यासि मंदबुद्धी विसरले ॥१७॥
पूजेचें साहित्य न देतीच कोणी । क्षणक्षणां संताप वाटे मनीं ।
याकरितां साधु निस्पृह होउनी । एकटे वनीं बैसती ॥१८॥
बहुतांच्या प्रकृति बहुत । सर्वथा न मिळे एकचित्त ।
यालागीं कोणासी नसावें आसक्त । साधणें परमार्थ ज्यालागीं ॥१९॥
मनीं असतां विषयासक्ती । कुसंगाची होय प्राप्ती ।
कामना पूर्ण न होतां निश्चितीं । क्रोध चित्तीं येतसे ॥१२०॥
क्रोध गेलिया निघोनी । मग मोह संचरे अंतःकरणी ।
स्मृतिभ्रंश तेव्हां प्राणी । चौर्यांशी योनी भोगिती ॥२१॥
तंव कोणे एके दिवशीं । चांगदेव बैसले अर्चनासी ।
मृत्तिका आणविली पार्थिवासी । तों संसारकार्यासी गुंतले ॥२२॥
सद्गुरु म्हणती आणा माती । मळून द्यावी सत्वरगती ।
शिष्य भयभीत जाहले चित्तीं । मग कृत्रिमयुक्ती करिताती ॥२३॥
संगमासि जाऊनि सत्वरगती । मग सिकतेची साळोंखा करिती ।
त्यावरी वाटी घातली पालथी । मग हांसोन बोलती परस्परें ॥२४॥
स्वामी तों आहेत नेत्रहीन । सर्वथा न दिसे त्यांजकारण ।
हें स्थावरलिंग असें जाण । ऐसें सांगणें तयांसी ॥२५॥
अर्चन झालिया उठाउठी । आपण काढून घेऊं वाटी ।
ऐसा कृत्रिम भाव पोटीं । मग सद्गुरुसी गोष्टी बोलती ॥२६॥
पार्थिवासि मृत्तिका नाहीं स्वामी । आयतेंच लिंग आहे संगमीं ।
आतांचि पाहोनि आलों आम्हीं । तरी तें नित्यनेमीं पूजावें ॥२७॥
जाणोनि तयांचा अंतर्भाव । मग उत्तर देती चांगदेव ।
लिंगाकार पृथ्वी सर्व । न दिसे ठाव एकरिता ॥२८॥
निजभक्तांचें जाणोनि अंतर । लहान थोर होतसे पार्वतीवर ।
येर्हवीं तो विराटस्वरुप ईश्वर । अंतपार नसे त्याचा ॥२९॥
पिंडीब्रह्मांडी सकळ सृष्टी । अवघा एकचि धूर्जटी ।
पार्थिव आणि स्थावर पोटी । त्याजवीण दृष्टीं दिसेना ॥१३०॥
स्थावरलिंग कोठें आहे । तें मज दाखवा लवलाहें ।
ऐसें बोलतो सद्गुरुराय । करिती काय शिष्य तेव्हां ॥३१॥
अग्रोदक पूजा घेऊनि हाती । संगमी चांगयासी घेऊनि जाती ।
वाळूवर वाटी घातली पालथी । ते होतें दाखविती तयासी ॥३२॥
हरहर शब्दें घेऊनिं नांव । तेथेंचि सप्रेम धरिला भाव ।
पूजेसि बैसला चांगदेव । तो कौतुक पहा हो एक झालें ॥३३॥
ॐ हर म्हणतां सत्वर गती । साक्षात् पातले कैलासपती ।
वाटी घातली होती पालथी । ते अक्षयी स्थापिती मंत्रोक्तें ॥३४॥
अर्चनासि बैसती सद्गुरुप्रीतीं । शिष्य सत्वर आश्रमा जाती ।
स्वामीसाठी पाक निष्पत्तीं । स्वहस्ते करिती उभयतां ॥३५॥
इकडे तपती संगमीं चांगयानें । अक्षयलिंग स्थापिलें जाण ।
एकादशिनी अभिषेक करुन । निजप्रीतीनें सारिलें ॥३६॥
गंधाक्षता सुमनहार । तीळ तांदूळ बिल्वपत्र ।
धूपदीप नीरांजन कर्पूर । सर्वोपचार अर्पिलें ॥३७॥
तों नैवेद्य वाढोनि पात्रावर । शिष्य घेऊनि आले सत्वर ।
तो शिष्यासि दावूनि निजकारें । भावें नमस्कार घातला ॥३८॥
म्हणे मी मंत्रहीन क्रियाहीन । भावहीन भक्तिहीन ।
अर्चापूजा करुं नेणें । तूं पार्वती रमण जाणसी ॥३९॥
ऐसें बोलती करुणा वचन । संतोषला पार्वती रमण ।
म्हणे यथासांग केले पूजन । संतोष मनी मी झालों ॥१४०॥
मग सेवकाचा धरुनियां कर । चांगदेव आश्रमासि आले सत्वर ।
तों अन्न वाढिलें पात्रावर । मग शिष्यासी उत्तर बोलती ॥४१॥
आज्य करावया निश्चित । आमुची वाटी आणा त्वरित ।
शिष्य धांवोनि संगमीं जात । कौतुक अद्भुत देखिले ॥४२॥
वाटी उचलोनि घेतां बळे । तंव ते न हाले तयेवेळें ।
म्हणती हें तों अघटित झाले । बळ वेंचले सर्वही ॥४३॥
परी वाटी न निघेचि निश्चित । सिकता मिळाली पाषाणवत ।
उकरोनि पाहतांचि न कळे अंत । चिंताक्रांत जाहले ॥४४॥
म्हणता आपुली कृत्रिमबुद्धी । जरी सद्गुरुसि कळली ये संधी ।
तरी शाप देऊनि आधी । वंशत्रिशुद्धि बुडवील ॥४५॥
देऊनि पाय शेंपटावर । भुजंग जागविला साचार ।
तैसाचि जाहला प्रकार । कैसा विचार करावा ॥४६॥
जाणतां केलें विष भक्षण । महा व्याघ्रासी संघटण ।
तापसियाचें केले छळण । दैवहीन म्हणोनियां ॥४७॥
वंशमुळी वाढतां सत्वर । कृशानु पेटविला तिजवर ।
तैसाचि दिसतसे प्रकार । कोणता विचार योजावा ॥४८॥
ज्याच्या वचनें करोनि पाहे । वाटीचा ईश्वर तत्काळ होय ।
तरी तो कोपल्या बरें नव्हे । म्हणोनि भय उपजलें ॥४९॥
ऐशा रीतीं बोलोनि मात । थरथरां दोघे बंधु कांपत ।
चांगयापासीं येऊनि त्वरित । साष्टांग दंडवत घातलें ॥१५०॥
मग जोडोनियां दोन्ही कर । उभे ठाकले समोर ।
म्हणती अपराध घडला थोर । सांगतों सादर ऐकिजे ॥५१॥
माती न मिळे म्हणोनि देखा । सिकतेची केली साळोंखा ।
भुललों या प्रपंचसुखा । परमार्थ निका दवडिला ॥५२॥
आळस धरोनियां चित्तीं । वाळुची साळूंखा केली निगुती ।
त्यावरी वाटी घालोनि पालथी । तुम्हांप्रती दाखविलें ॥५३॥
स्वमींनीं त्याचें पूजन केलें । तें अक्षयीलिंग तत्काळ जाहलें ।
सर्वथा न हाले कांहीं केलें । बळ वेंचलें सर्वही ॥५४॥
वाळू विरजोनि एके ठायी । पाषाणवत झाली पाही ।
वाटी न निघे सर्वथाही । अंत नाहीं उकरितां ॥५५॥
ऐसी ऐकतांचि मात । चांगदेव जाहले सद्गदित ।
नेत्रीं वाहती अश्रुपात । रोमांचित अंग झालें ॥५६॥
म्हणे मी पतित आहे साचा । हें तो सत्यसत्य त्रीवाचा ।
कवण्या गुणें करोनि साचा । स्वामी गौरीचा प्रगटला ॥५७॥
नेणें भक्ति नेणें भाव । नेणें मंत्रविद्या गौरव ।
स्वयें प्रगटला महादेव । वटेश्वर नांव तयाचें ॥५८॥
ऐशा रीतीं वदोनि तेव्हां । हर हर शब्द म्हणे देवा ।
आतां मज घडो तुझी सेवा । मागणें शिवा हेंचि असे ॥५९॥
अनंत लिंगें तुझीं निश्चितीं । पृथ्वीवर बहुत असती ।
परी माझी वाढवावया सत्कीर्ती । वटेश्वर प्रीतीं जाहलासी ॥१६०॥
ऐशा रीतीं करोनि स्तवन । नेत्र उघडिले चांगयानें ।
तों दिव्यचक्षु देखोन । विस्मित मन तयाचें ॥६१॥
मग आज्ञा देतसे शिष्यांसी । आतां जा आपुल्या गृहासी ।
त्यांचा अपराध नेणोनि मानसीं । शांति सुखासी भोगितसे ॥६२॥
आणिक तापसी योगेश्वर । तामसगुणी असती फार ।
अपराध होता अणुमात्र । शापोत्तर बोलती ॥६३॥
त्यांचेंही वचन यथार्थ होत । पदरींचें नासोनि जाय सुकृंत ।
तैसे नव्हेति साधुसंत । शांति भरित सागर जे ॥६४॥
अकस्मात भेटतां शिष्यासी । परी देवासमान मानिजे त्यासी।
पूज्यपूजक भावना ऐसी । नये दृष्टीसी सर्वथा ॥६५॥
ऐसा सद्गुरु तोचि थोर । जो साक्षात जाणावा ईश्वर ।
त्याचा अनुग्रह घेता साचार । साक्षात्कार येतसे ॥६६॥
चांगदेवाचे शिश्य आळसी । ऐसें कळतांही चित्तासी ।
सर्वथा शाप नेदीच त्यांसी । क्षमा मानसीं सर्वदा ॥६७॥
शिष्यांसि सांगे त्या अवसरा । तुम्ही जावें आपुल्या घरां ।
आम्हांसि राहणें तापीतीरा । श्रीवटेश्वरा पूजावया ॥६८॥
मग नमस्कार करुनि योगेश्वरा । शिष्य गेले आपुल्या घरा ।
चित्तीं संतोष वाटला बरा । म्हणती चुकला बरा अनर्थ ॥६९॥
चित्तीं भय होतें बहुत । कीं अन्याय आचरलों यथार्थ ।
शाप देतील सद्गुरुनाथ । तोही अपघात चूकला ॥१७०॥
ऐसा संतोष मानूनि सदा । करिती आपला संसार धंदा ।
सत्य मानूनि विषयस्वादा । प्रपंच वादा निमग्न ॥७१॥
असो इकडे चांगदेवासाठीं । वाटींत प्रगटले धूर्जटी ।
जगीं सत्कीर्ति प्रगटली मोठी । येतसे भेटी जनयात्रा ॥७२॥
देशोदेशींचे सावकार । दुर्बल भाविक अज्ञान नर ।
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । येती समग्र यात्रेकरु ॥७३॥
नानापरीचे नवस करिती । त्यांचे मनोरथ पूर्ण होती ।
कोणी सावकार वेंचूनि संपत्ति । मठ बांधिती ते ठायीं ॥७४॥
जये ठायीं देवभक्त । वसती तेथें सिद्धि राबत ।
अन्न शांतीसी नाहीं गणित । महिमा अद्भुत वाढला ॥७५॥
पुढिले अध्यायीं कथा लाघव । चौदा विद्या अति अपूर्व ।
अभ्यास करितील चांगदेव । ते ऐका सर्व भाविकहो ॥७६॥
अहो भक्तलीलामृत ग्रंथ संपूर्ण । हेंचि कोमळ तुळसीचें वन ।
येथें लीलाविग्रही रुक्मिणीरमण । निज प्रीतीनें क्रीडतसे ॥७७॥
जेथें आला वैकुंठपती । तेथें वैष्णव भक्त सहजचि येती ।
जैसा वनस्थळीं बैसतां नृपती । तरी मंत्रीही राहती त्या ठायां ॥७८॥
म्हणोनि भक्तलीलामृत ग्रंथ प्रेमळ । हें देवभक्ताचें आवडतें स्थळ ।
महीपति त्याचा लडिवाळ । ओव्या प्रांजल गातसे ॥७९॥
स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पूरती मनोरथ ।
प्रेमळ परिसोत भाविक भक्त । द्वितीयाध्याय रसाळ हा ॥१८०॥