श्रीगणेशायनमः ।
याचकासि आधार दातयाचा । कां अंधास आश्रय डोळसाचा ।
तेवी पांडुरंग प्रकाशबुद्धीचा । आश्रय आणिकांचा मज नाहीं ॥१॥
त्यासि भक्त चरित्रें लागती गोड । यास्तव निमित्त दाखविलें पुढें ।
आपण हृदयस्थ राहूनि कोडें । बुद्धीसि सांकडे पडों नेदी ॥२॥
निद्रित होतां जागृत करी । आठव देतसे स्वप्नांतरीं ।
संतचरित्रें आवडती श्रीहरी । निश्चय अंतरीं बाणला ॥३॥
जगदुद्धारक करावया निश्चित । आपणचि जाहला देवभक्त ।
जेणें सत्कीर्ति प्रगटे जनांत । पंढरीनाथ तेंचि करी ॥४॥
तो मायालाघवी जगज्जीवन । होय भयकृत भयनाशन ।
विष्णु सहस्त्र नामांत जाण । द्वैपायन बोलिले ॥५॥
मागिले अध्यायीं कथारसिक । नाथें आपंगिला अनामिक ।
त्याचें दयालुत्व वाणिती लोक । निष्काम भाविक प्रेमळजे ॥६॥
थोर थोर पंडित ब्राह्मण । धर्माधिकारी शास्त्री निपुण ।
मागें पुढें बोलती वचन । अनुचित नाथानें पैं केलें ॥७॥
अनामिक तस्कर वाडियांत । ठेविला असे दिवस बहुत ।
येणेंचि भ्रष्टाकार होत । विटाळ निश्चित कालविला ॥८॥
परोपकाराचें कारण आहे । तरी आनायाती नसती काय ।
तस्करासि पोसूनि काय । दुरितलाहे अधिकची ॥९॥
विंचुवाचें कुरवाळिलें आंग । तरी तो न टाकी आपुला रंग ।
सर्पासि दुध पाजिलें आंगें । तरी डंखिता मग न राहे ॥१०॥
तैसाचि तस्कर पोसिला घरीं । तरी पुढें अधिकचि करील चोरी ।
मागें पुढें धर्माधिकारी । ऐशा परी बोलती ॥११॥
मागील चरित्र आठवोनि मनी । सन्निध येवोनि बोलती कोणी ।
तों अद्भुत चरित्र वर्तलें जनीं । तें सज्जनीं परिसावें ॥१२॥
श्रीनाथ एकदां स्नानासि जातां । मार्गावरी अश्वत्थ वृक्ष होता ।
त्यांतूनि ब्रह्म राक्षस तत्त्वतां । निघे अवचिता ते समयीं ॥१३॥
श्रीनाथ स्नानासि होते जात । तों संमुख ठाकला जोडोनि हात ।
म्हणे तुझ्या दर्शनेची निश्चित । उद्धरलो पतित मी आतां ॥१४॥
ब्रह्मद्वेष करुनि सहज । हे योनी प्राप्त झाली मज ।
आणिक नसे मजला काज । तरी मागणे तुज एक आहे ॥१५॥
बहुत दिवस ब्राह्मण भोजन । घडलें आहे तुज कारणें ।
आणि बंदिवानासि रात्रीं घातलें भोजन । हीं दोन पुण्यें तुझे पदरीं ॥१६॥
या दोहींतूनि एके साचार । माझें हातीं घालिसील नीर ।
तरी तत्काळ होईल उद्धार । ऐसें उत्तर बोलिला ॥१७॥
जगदुद्धारार्थ निश्चित । तुवा अवतार घेतला येथ ।
ऐसी ग्लांती ऐकोनि नाथ । काय बोलत ते समयीं ॥१८॥
पाप पुण्य सर्वथा न दिसे मज । जें तुज आवडेल तें माग आज ।
ब्रह्मराक्षस धरोनि उमज । मागतसे सहज निजप्रीतीं ॥१९॥
बंदीवानाचे संरक्षण । केलें तें मज अर्पी पुण्य ।
श्रीनाथें हातीं उदक घेऊन । करितसे अर्पण त्या लागीं ॥२०॥
उदक हातीं पडतांचि निश्चिती । पिशाच पावला उद्धारगती ।
क्षेत्रवासी ब्राह्मण पाहती । आश्चर्य चित्तीं त्यां झालें ॥२१॥
दिव्य देह पावोन त्वरित । पिशाच गेला स्वर्ग पंथ ।
हरिनामे अवघे लोक गर्जत । महिमा वर्णित नाथाचा ॥२२॥
मागें पुढें जल्पत होते । तेही मनीं झालें कुंठित ।
धन्य धन्य तेव्हां लोक म्हणत । चरित्र अद्भुत देखोनी ॥२३॥
परोपकाराचें अद्भुत पुण्य । अनुभव आलां सकळां कारणें ।
अनामिकांचे केलें पाळण । तो करितसे भजन निजप्रीतीं ॥२४॥
शरीरीं शक्ति आलियावरी । मग तो गेला आपुलें घरीं ।
ऐसा नाथ परोपकारी । विश्वोद्धारी अवतरला ॥२५॥
आषाढ मासीं पंढरीसी । जात असती यात्रेसी ।
स्नान करोनि चंद्रभागेसी । श्रीपांडुरंगासी भेटावें ॥२६॥
श्रीनाथाच्या संगतीनें । यात्रा बहुत निघतसे जाण ।
प्रेमें ऐकती हरिकीर्तन । निजप्रीतीनें आपुल्या ॥२७॥
पंढरीची वारी निश्चिती । भानुदासानीं लाविली रीती ।
त्यांचा नेम तो चालविती । अंतर निश्चिती पडेना ॥२८॥
प्रतिष्ठान क्षेत्रींचे जे जन । नित्य ऐकती हरिकीर्तन ।
प्रासादिक नाथाचें वचन । दृष्टांत देणें अश्रुत ॥२९॥
संस्कृतावरी टीका जाण । श्रीनाथें ग्रंथ केलें कोण ।
परि तयांची नामाभिधानें । सभाग्य जन निजप्रीतीं ॥३०॥
चतुःश्लोकी जें भागवत । त्याचाही परम गुह्यार्थ ।
तें प्रथम प्रांजळ केलें बहुत । श्रीसद्गुरुनाथ आज्ञेनें ॥३१॥
आणखी पद पदांतरें फार । अभंगी लीला वर्णिली थोर ।
आणि हस्तामलकाची टीका थोर । प्राकृत साचार तें केलें ॥३२॥
आणि शुकाष्टक असे एक । त्यावरी केलें स्वात्मसुख ।
अनुभवाचे उद्गार कौतुकें । ऐकतां भाविक संतोषती ॥३३॥
यावरी संतसज्जन भाविक निश्चिती । नाथासि सद्भावें विनविती ।
भक्तिरहस्य बहुत भागवतीं । त्यावरी टीका निरुती करावी ॥३४॥
पुराणीं श्रेष्ठ भागवत । याही वरी उद्धवगीत ।
जरी तुमच्या मुखें प्राकृत होत । तरी उपयोगीं पडते बहुतांच्या ॥३५॥
ऐसें श्रोतयाचें आर्त देखा । देखोनि संतोष वाटला निका ।
मग एकाद्शावरी अनाथ सखा । प्राकृत टीका आरंभित ॥३६॥
थोडक्याच दिवसांत साचार । दोन अध्याय झाले सत्वर ।
तेथें एक गृहस्थ द्विजवर । पाहतांचि थोर सुखावला ॥३७॥
त्याचा उतार करुनि जाण । नित्य नेमें वाचित ब्राह्मण ।
मग महायात्रेसि जावया कारणें । इच्छा तेणें धरियेली ॥३८॥
सुमुहुर्त पाहुनियां त्याणें । कुटुंब सहित निघे आपण ।
श्रीनाथाची आज्ञा घेऊन । सत्वर गमन करीतसे ॥३९॥
यात्रेसहित क्रमिता पंथ । पावला महाक्षेत्रांत ।
स्नान करुनि भागीरथींत । विश्वेश्वरांतें पूजिलें ॥४०॥
तीर्थविधि यथास्थित । करोनि चतुर्मास राहिला तेथ ।
दोन अध्याय भागवत नाथकृत । तें असे वाचित निज प्रेमें ॥४१॥
मणिकर्णिकेचें तीरीं जाण । स्नान करुनि घातलें आसन ।
द्वादश टिळे गोपीचंदन । तुळसी भूषणें ल्याला असे ॥४२॥
दोन अध्याय जवळीं भागवत । तें निजप्रीतींनें असे वाचित ।
तों विक्षेप व्हावयाचें कारण तेथ। आलें अकस्मात ते ऐका ॥४३॥
तये धाटीं थोर संन्यासी । शास्त्रीं अध्ययन असे त्यासी ।
त्याचे दोघे विद्यार्थी स्नानासि । त्या समयासीं पातले ॥४४॥
तो प्रतिष्ठानकर गृहस्थ । जाण । बैसला असे घालोनि आसन ।
त्याणीं भव्य पुरुष दृष्टीं देखोन । म्हणती पंडित ब्राह्मण हा असे ॥४५॥
कोण शास्त्र कोण ग्रंथ । वाचितसे पाहावें त्वरित ।
ऐसें म्हणोनि चित्तांत । समीप बैसतीं येवोनी ॥४६॥
गीर्वाण शब्द करोनि जाण । तयासि करिती संभाषण ।
कोणतें शास्त्र करितां पठण । आम्हां कारणें सांगिजे ॥४७॥
गृहस्थ तयांसि प्रत्युत्तर देत । हें एकादश स्कंध भागवत ।
त्यावरी टीका केली प्राकृत । तें पठण नित्य करितसें ॥४८॥
मग पंडित म्हणती तयातें । स्पष्ट वाचोनि दावा आमुतें ।
ऐकोनि गृहस्थ हर्षयुक्त । प्रेमभरित वाचितसे ॥४९॥
आधींच नाथाचें बोलणें रसिक । आणि कंठही तयाचा अमोलिक ।
अर्थ अन्वयीं न्यून अधिक । नसेच देख ते ठायीं ॥५०॥
पंडित म्हणती ये क्षणीं । धन्य त्या सत्पुरुषाची वाणी ।
हा ग्रंथ प्रख्यात झालिया जनीं । मग संस्कृत कोणी न वाचिती ॥५१॥
गीर्वाण भाषणें तत्वतां । ऐसें बोलती ते उभयतां ।
तरी स्वामीपाशीं सांगोनि आतां । निषेध परता करावा ॥५२॥
एकमेकासि खुणावून । एक बैसला तेथें संरक्षण ।
एक मठांत सत्वर जाऊन । स्वामीस वर्तमान सांगत ॥५३॥
म्हणे मणिकर्णिकेचे घाटीं निश्चित । एक ब्राह्मण बैसला गृहस्थ ।
भागवतावरी टीका प्राकृत । असे वाचित निज प्रीतीं ॥५४॥
स्वामी समर्थ क्षेत्रवासी । तरी आपण शिक्षा करावी त्यासी ।
प्राकृत मानले सकळासि । मग पुराणिकासी कोण पुसे ॥५५॥
विद्यार्थियाचें ऐकोनि वचन । संन्यासि होय क्रोधायमान ।
म्हणे तयासि येथें घेवोनि येणें। मग शिक्षा करणें तें करुं ॥५६॥
ऐसी आज्ञा होतांचि त्वरित । विद्यार्थी धांवले पांच सात ।
पुस्तक वाचित बैसला गृहस्थ । सक्रोध बोलत त्या लागी ॥५७॥
म्हणती पुस्तक घेऊनि सांगातें । स्वामीच्या मठासि चला त्वरित ।
गृहस्थ जाहला भयभीत । मग चरण आठवीत नाथाचे ॥५८॥
पुस्तक गुंडाळोनि आसनीं । लगबगा चाले तये क्षणीं ।
मग स्वामीच्या मठांत प्रवेशोनी । नमन करोनि उभा ठाके ॥५९॥
नेत्र संकेतें संन्यासी । बैसा म्हणतसे तयासी ।
पंडित गीर्वाण बोलती त्यासी । परी कांहीं चित्तांसी समजेना ॥६०॥
हा मूर्ख जाणोनि साचार । मग बोलती प्राकृत उत्तर ।
या ग्रंथींचा टीकाकार । कोठें कवीश्वर तो आहे ॥६१॥
किंवा तुवाच स्वमतीनें । केलें असे प्राकृत लेणें ।
हें यथार्थ सांग आम्हांकारणें । संकोच मनीं न धरितां ॥६२॥
गृहस्थ देतसे प्रत्युत्तर । प्रतिष्ठान क्षेत्र गंगातीर ।
तेथें एकनाथ नामें साचार । सत्पुरुष थोर एक असे ॥६३॥
विष्णु अर्चन हरि कीर्तन । नित्य करीत संतर्पण ।
ब्राह्मण पूजित निज प्रीतीनें । तीर्थ प्राशन करीतसे ॥६४॥
श्रीगुरुवरदें करोनि निश्चिती । तयासि जाहली कवित्व स्फूर्ती ।
प्राकृत टीका एकाद्शावरती । त्यानी निज प्रीतीनें आरंभिली ॥६५॥
दोन अध्याय सिद्ध झाले होते । ते म्यां लिहूनि घेतले त्वरित ।
अज्ञान गृहस्थ मीं भावार्थे । तेंचि वाचितो पडताळोनी ॥६६॥
संन्यासी स्वमुखें म्हणतसे । याजकडे हा नसेचि दोष ।
तरी येथें बोलावोनि एकनाथास । शिक्षा तयास करावी ॥६७॥
प्रतिष्ठान क्षेत्र गोदातीरी । तेथें पंडित असतील धर्माधिकारी ।
त्यांणीं प्राकृत टीका भागवतावरी । कैशा परी होऊं दिली ॥६८॥
ऐसें म्हणवोनि संन्यासी । आज्ञा करितसे विद्यार्थियासी ।
प्रतिष्ठानी ब्राह्मणांसी । पत्र तयासी ल्याहावें ॥६९॥
कीं वेदशास्त्राचें निज मथित । व्यासें काढिलें श्रीभागवत ।
त्याही वरी उद्धव गीत । उपनिषदर्थ केवळ हा ॥७०॥
एकनाथ नामें साचार । तुमचें गांवीं कवीश्वर ।
त्याणें प्राकृत टीका मांडिली वर । अनुचित फार हें दिसे ॥७१॥
तुम्ही सर्वज्ञ श्रेष्ठ ब्राह्मण । एकचित् अवघे होऊन ।
तयासि शिक्षा करोनि जाण । येथें पाठवणें सत्वर ॥७२॥
आम्ही विद्यार्थी पाठविले दोन । यांचे पाठिसी तुम्ही असणें ।
वाद प्रतिवाद करुन । तयासि जिंकणें सत्वर ॥७३॥
धर्माधिकारी यांसि साचार । ऐशा रीतीं लिहिलें पत्र ।
तुमचे गांवींचा टीकाकार । येथें सत्वर पाठवावा ॥७४॥
आणिक नाथासि पत्र एक । कीं येथें यावें तात्काळिक ।
भागतावरी प्राकृत लेख । घेऊनि सम्यक ये आतां ॥७५॥
दोन पत्रें लिहोनि ऐसी । आज्ञा करीत विद्यार्थियांसी ।
तुम्हीं जावोनि दक्षिणेसी । घेऊनि तयासि या आतां ॥७६॥
दोन अध्याय गृहस्था जवळीं । ते हिरोनि घेतले तत्काळीं ।
विद्यार्थि चालत खेळी मेळीं । पैठणा जवळी मग आले ॥७७॥
स्नान संध्या करोनि सांग । धर्माधिकारियासि भेटलें मग ।
ब्राह्मण मेळवोनि सवेग । वृत्तांत सांग निवेदिला ॥७८॥
धर्माधिकारी यांचे हातीं । विद्यार्थी तेव्हां पत्र देती ।
वाचितां तेव्हां अवघे ब्राह्मण ऐकती । मग बोलती परस्परें ॥७९॥
म्हणती क्षेत्रांत राहोनि भ्रष्ट । कर्मे करितसे अचाट ।
येथील अधिकारी जो वरिष्ट । वंदितसे स्पष्ट तयासि ॥८०॥
आणि क्षेत्रींचे गृहस्थ सावकार । आणिकही भाविकयाती इतर ।
एकनाथें मोहन घातलें सत्वर । आज्ञाधार ते केले ॥८१॥
यास्तव आमुचे नच कांहीं । तरी तुम्ही जिंकावा लवलाहीं ।
आम्ही क्षेत्रवासी सर्वही । साह्य येसमयीं असों तुम्हां ॥८२॥
एक म्हणती बोलावुनि नाथा । वादप्रतिवादी जिंकिजे आतां ।
एक म्हणती तीर्थासि न जातां । मुंडन सर्वथा न होय ॥८३॥
आपुली प्रतिष्ठा व्हावया निश्चित । प्राकृत आरंभिले भागवत ।
आतां महाक्षेत्रांत होईल फजित । हा निश्चितार्थ पै असे ॥८४॥
वाराणसीचे विद्यार्थी । हांव धरुनि बहुत रीतीं ।
म्हणती आम्हींच जिंतूं तयाप्रती । कैसा दुर्मती तो आहे ॥८५॥
गांवींच्या ब्राह्मणां समवेत । आले नाथाच्या वाडियांत ।
तयांसि देखतां अभ्युत्थान देत । नमस्कार करित तेधवां ॥८६॥
परस्परें भेटती निश्चिती । आसन देवोनि बैसविलें प्रीतीं ।
म्हणती कवण क्षेत्रीं तुम्हां वस्ती । कृपामूर्ती सांगावें ॥८७॥
संन्यासियाचें विद्यार्थीं । पत्र देत नाथाचिया हातीं ।
मस्तकीं वंदोनि निजप्रीती । स्पष्ट वाचिती तेधवां ॥८८॥
श्रीनाथ तेव्हां आनंदयुक्त । विप्रांकडे पाहोनि बोलत ।
स्मरण जाहले विश्वेश्वरातें । यास्तव भेटींत पाचारिलें ॥८९॥
वाराणसीसि जावें त्वरित । ऐसा निश्चय केला तेथ ।
उद्धवासि बोलावूनि सांगत । हें अधिष्ठान समस्त आवरावें ॥९०॥
विष्णु अर्चन आणि पुराण । सदावर्त ब्राह्मण पूजन ।
रात्रीं करावें हरिकीर्तन । तुम्हा स्वाधीन हे गोष्टी ॥९१॥
अवश्य म्हणोनियां त्वरित । उद्धवें केला प्रणिपात ।
श्रीनाथातें आनंद बहुत । महायात्रेंतें जावया ॥९२॥
संन्यासियाचे विद्यार्थी । तयांसि नाथ करितसे ग्लाती ।
भोजन करावें सत्वर गतीं । मार्गीं श्रमलेती बहुत दिवस ॥९३॥
आमुच्या निमित्त साचार । येथवरी घडली येरझार ।
ऐसें ऐकोनि द्विजवर । प्रतिउत्तर काय देती ॥९४॥
धर्माधिकारीयांचे घरीं जाण । आतांचि जाहली असतीं भोजनें ।
तृप्त जाहलों तुमच्या दर्शनें । ऐसे वचन बोलिले ॥९५॥
उद्धट बोलावे म्हणवूनी। आधीं जी हांव धरिली मनीं ।
नाथ दर्शन होतां ते क्षणीं । दुर्बुद्धि निघोनि गेली तेव्हां ॥९६॥
धन्य धन्य याची भक्ती । धन्य धन्य याची स्थिती ।
एकमेकांत विद्यार्थीं । हळूच बोलती तेधवां ॥९७॥
धर्माधिकारियांचे गुप्त हेर । तें स्थळीं होते साचार ।
मग ते जावोनि सत्वर । वृत्तांत समग्र सांगती ॥९८॥
म्हणतीं एकनाथाच्या दर्शनें । काशीकर ब्राह्मण जाहले लीन ।
देखत देखत जाहले दीन । घातलें मोहन तयांसी ॥९९॥
ऐकोनि तयांची वचनोक्ती । धर्माधिकारी विस्मित होती ।
म्हणती आदरें वैरी मारावा निश्चिती। ही सांपडली युक्ती एकनाथा ॥१००॥
भृगुची लत्ता साहोनि सबळ । विष्णुनें ऐश्वर्य घेतले सकळ ।
तीच नाथासि सापडली कळ । लीनता सर्वकाळ धरितसे ॥१॥
जो जो येतसे छळावया । त्याच्या लागतो वारंवार पायां ।
मग क्रोध जातसे निघोनियां । करी दया तयावरी ॥२॥
कांहीं अपाय रचितां पाहे । तोचि त्यासि होतो उपाय ।
अपकीर्ति करितां सत्कीर्ति होय । ईश्वरी साह्य आहे यासी ॥३॥
ऐसें क्षेत्रवासी तयेक्षणी । कुसुमुसिती आपुलें मनीं ।
पुढें चरित्र वर्तलें जनीं । तें सज्जनीं परिसावें ॥४॥
विद्यार्थी विप्र पाठविले होते । त्यां सवेंचि निघे एकनाथ ।
पंचाध्यायाचे टिपण होतें । तितुकें सांगतें घेतलें ॥५॥
अश्व पडताल नसेचि जाण । एकाएकीं केलें प्रयाण ।
मागूनि उद्धवें दोघे ब्राह्मण । सेवे लागून पाठविले ॥६॥
काशीकरांच्या सवें निश्चित । स्वइच्छेनें क्रमिती पंथ ।
तों एके दिवसीं अकस्मात । आनंदवनाते पावले ॥७॥
स्नान करुनि भागीरथीं । श्रीनाथ बैसले सहज स्थिती ।
विद्यार्थी संन्यासि यापासीं जाती । नमस्कार घालिती सद्भावें ॥८॥
म्हणती आपुल्या प्रतापें साचार । प्रतिष्टानासि जावोनि सत्वर ।
घेवोनि आलों टीकाकार । पुढें विचार कोणता ॥९॥
स्वामी म्हणती ते अवसरीं । आम्ही भिक्षेसि जातो सत्वरी ।
त्यासि बैसवा मठाभीतरीं । आज्ञा करिती स्वमुखें ॥११०॥
ऐसें सांगोनि त्यांजकारणें । मग भिक्षेसि गेले आपण ।
सवें तीनशत शिष्य घेऊन । केलें गमन सत्वर ॥११॥
विद्यार्थी गंगातीरासि जाती । एकनाथासि घेऊन येती ।
मठांत बैसावें म्हणती । स्वामी येती तोंवर ॥१२॥
अवश्य म्हणोनि तयांप्रती । श्रीनाथ बैसले सहज स्थिती ।
ज्याचे आंगीं हर्ष खंती । नये कल्पांतीं सर्वथा ॥१३॥
इकडे मठ भिक्षा झालियावरी । महंत शिष्यांसि आज्ञा करी ।
तुम्ही जावोनि मठाभीतरीं । सांगतों निर्द्धारीं तें ऐका ॥१४॥
कवीश्वर होता पैठणांत । प्राकृत करितो भागवत ।
तो विद्यार्थीयांनीं आणिला येथ । तरी शिक्षा तयातें करावी ॥१५॥
तुम्ही शिष्य तीन शतें । पांच पांच दंड मारा त्यातें ।
इतुकियावरी वांचला निश्चित । तरी आणूं ध्यानांत आपुल्या ॥१६॥
सद्गुरु आज्ञा वंदोनि शिरीं । शिष्य चालिले सत्वरी ।
वाटेसि चालतां मार्गावरी । विचार अंतरीं आठवला ॥१७॥
स्वामी तों समर्थ पूज्यमान । आपणासि आज्ञा केली जाण ।
दंड मारितां मेला ब्राह्मण । तरी प्रायश्चित्त दारुण होईल ॥१८॥
कोणती रीती कोणती स्थिती । कोण उपासना कोणती भक्ती ।
कैसी झालीसे ज्ञानप्राप्ती । हें ध्यानासि निश्चित आणावें ॥१९॥
ऐसें म्हणवोनि त्या अवसरीं । उभे राहिले मठाचें द्वारीं ।
म्हणती एक एक जाऊनि निर्द्धारीं । तयासि सत्वरी विलोका ॥१२०॥
ऐसा विचार करोनि निश्चित । एक एक संन्यासी मठांत जात ।
तों सहज स्थिती बैसले नाथ । ते कृष्णमूर्ति दिसती त्यांलागीं ॥२१॥
सद्भावें करिती नमन । उभे तिष्ठती कर जोडून ।
म्हणती सच्चिदानंद घनपूर्न । तो हा सगुण अवतार ॥२२॥
संन्यासी होते तीनशत । तितुके प्रगटले मठा आंत ।
म्हणती हे नारायण मूर्ति साक्षात । विश्वोद्धारार्थ प्रगटली ॥२३॥
जनीं जनार्दन भरला जाण । तो हृदयस्थ झाला आम्हां कारणें ।
जरी स्वामींचें ऐकिलें असतें वचन । तरी अनर्थ पूर्ण पैं होता ॥२४॥
ऐसें म्हणवोनियां ते यती । अवघेचि प्रणिपात नाथासि करिती ।
मग कर जोडोनि उभे राहतीं । म्हणती वैकुंठपती हा साक्षात ॥२५॥
तंव एक विद्यार्थीं जाऊन । स्वामीसि सांगे वर्तमान ।
तुम्हीं संन्यासी पाठविलें त्वरेनें । कीं दंड मारणें एकनाथा ॥२६॥
त्याणीं आज्ञाभंग केला निश्चित । नाथासि करिती प्रणिपात ।
अवघेचि कर जोडोनि तिष्ठत । हें अपूर्व वाटत मजलागीं ॥२७॥
ऐसी ऐकतांचि मात । क्रोधें तप्त जाहला महंत ।
जेवीं श्रीहरीसि शरण प्रल्हाद होत । हिरण्यकशिपु जल्पत मानसीं ॥२८॥
कीं रघुनाथाचा प्रताप देखोन । शरणागत जाहला बिभीषण ।
क्रोधें कांपत दशानन । करकरा दंशन चावितसे ॥२९॥
स्वामीस अवस्था तैशाच रीतीं । कीं आपुले संप्रदायी असतां यती ।
आज्ञा भंग करोनि निश्चिती । नाथाप्रती शरण गेले ॥१३०॥
कोणतें कौटाळ शिकला पूर्ण । दृष्टीसि पडतां घालितो मोहन ।
मग विद्यार्थियांसि आज्ञा केली त्यानें । सांगतों कारण तें ऐका ॥३१॥
आमुचें आसन असे जेथें । पडदे टाकोनि देइजे तेथें ।
त्याची दृश्टी न पडो मातें । जो प्राकृत ग्रंथातें योजितो ॥३२॥
स्वामीची आज्ञा होतांचि ऐसी । विद्यार्थी धांवला त्वरेंसी ।
पडदा लावीत आसनासी । दुसर्या द्वारेंसी मग आले ॥३३॥
कडासन मांडोनि ते अवसरीं । येवोनि बैसले आसनावरी ।
शिष्य तैसेचि उभे द्वारीं । स्वरुप नेत्रीं पाहताती ॥३४॥
दृष्टीसीं देखतां चतुर्भुज मूर्ती । तयांची उडाली देहभ्रांती ।
मी तूंपण नाठवे चित्तीं । तटस्थ पाहती सकळिक ॥३५॥
एकनाथ म्हणवोनी प्रीतीं । अवघे स्वमुखें करिती स्तुती ।
जयालागीं की जे तप संपत्ती । तो हा वैकुंठपती साक्षात ॥३६॥
स्वामींचा अनुग्रह घेतला जाण । यास्तव जाहलें सगुण दर्शन ।
जैसे शिशुपाळ वक्रदंत पूर्ण । द्वेष बुद्धीनें उद्धरिलें ॥३७॥
ऐकोनि शिष्यांची वचनोक्ती । स्वामी विस्मित होतसें चित्तीं ।
म्हणें मोहन घातलें समस्तांप्रती । कैशारीतीं कळेना ॥३८॥
मग निकट आसन मांडिलें सत्वर । आडवा पडदा असेचि मात्र ।
मग संन्याश्यांचा महंत थोर । नाथासि उत्तर बोलतसे ॥३९॥
सकळ वादकांमाजी श्रेष्ठ । तो मी यती पातलों वरिष्ठ ।
तुझे ठायीं पाडोनि कपट । दंडीन स्पष्ट ये काळीं ॥१४०॥
अभिमान युक्त ऐकोनि उत्तर । श्रीनाथ शांती दयेचा सागर ।
विषम न वाटेचि अणुमात्र । मग मधुरोत्तर काय बोले ॥४१॥
अहो स्वामीश्रेष्ठ समर्था । सद्भावें चरणी ठेवीतसें माथा ।
कृपा करोनि मज अनाथा । दर्शन आतां देइजे ॥४२॥
मज बाळकाचा धरोनि हेत । दर्शनासि बोलाविलें येथ ।
क्रमोनि आलों दूर पंथ । पडदा किमर्थ टाकिला ॥४३॥
अपराध घडला असेल कांहीं । तो क्षमा करावा ये समयीं ।
माझी प्रज्ञा पाहाल कांहीं । तरी गम्य नाहीं संस्कृती ॥४४॥
भावहीन भक्तीहीन । ज्ञानहीन वैराग्यहीन ।
नाहीं केलें शास्त्र पठण । वेदाध्ययन तेंही नसे ॥४५॥
तुमच्या सेवेच्या गुणें निश्चिती । किंचित जाहली कवीत्व स्फूर्ती ।
यास्तव वदला नाथ यथामती । प्रारंभ भागवतीं मांडिला ॥४६॥
पंचाध्यायी एकादशांत । इतुकाच सिद्ध जाहला ग्रंथ ।
स्वामिनी पाहुनिया यथास्थित । अर्थ ध्यानांत आणीजे ॥४७॥
जितुकें जाहलें ग्रंथलेखन । यासि व्याख्यानीं लागतां दुषण ।
तरी मणिकर्णीकेंत बुडविजे आपण । नसेच कारण मग याचें ॥४८॥
तुम्ही साक्षात नारायण । महाक्षेत्रीं ज्ञान संपन्न ।
तुम्हांसि युक्ती जरी न माने । तरी मानील जन कैशा रीतीं ॥४९॥
आतां कृपा करुनि मजवर । कोप बुद्धी करावी दूर ।
अनाथासि मज साचार । दर्शन मात्रें उद्धरिजे ॥१५०॥
ऐसी नाथाची अमृतवाणी । संन्यासियानें ऐकोनि कानीं ।
तत्काळ क्रोध गेला निघोनी । सत्व गुण मनीं प्रगटला ॥५१॥
अविद्या रात्रीचा अंधार । तमें दाटलें होतें अंतर ।
ज्ञानार्थ भटकतां भास्कर । गेलें तिमिर निरसोनि ॥५२॥
ऐसी अवस्था बाणिली चित्तीं । मग संन्यासी विनविती ।
श्रीनाथ मानवी नव्हें म्हणतीं । परब्रह्ममूर्ती साक्षात् ॥५३॥
वेदांतगर्भ जो परिपूर्ण । तो हा सच्चिदानंद घन ।
जो कां निर्गुण निर्विकार पूर्ण । प्रत्यक्ष नारायण दिसतसे ॥५४॥
जगदुद्धार करावयासी । तो हा अवतरला वैकुंठवासी ।
तो प्रत्यक्ष येवोनि मठासी । दर्शन अनायासी देतसे ॥५५॥
हा मानवी नव्हेचि साचार । लीलाविग्रही अवतार ।
आतां पडदा काढोनि सत्वर । पहावें चरित्र दृष्टीसीं ॥५६॥
ऐकोनि सच्छिष्याची वाणी । संन्यासी द्रवला अंतःकरणी ।
मग पडदा काढी तयेक्षणीं । तों श्रीकृष्ण नयनीं दिसतसे ॥५७॥
जें ध्यान वर्णिलें भागवतीं । महाकवि प्रेमळ भक्तीं ।
तैसी सगुण देखतांचि मूर्ती । अनुताप चित्तीं जाहला ॥५८॥
त्राहि त्राहि म्हणवोनि तेथें । अष्टही भावें वेसंडत ।
देहभाव नाठवितां किंचिंत । साष्टांग दंडवत घातलें ॥५९॥
तेव्हां मनुष्यरुप धरोनि मागुती । श्रीनाथ तयासि उठविती ।
जय जय शब्दें संन्यासी गर्जती । उद्धरलों म्हणती आजि आम्ही ॥१६०॥
ओं नमो नारायण म्हणोनि तेथ । तयासि नमस्कार करीतसे नाथ ।
म्हणे स्वामी हें दिसतें अनुचित । सकळ आश्रमांत श्रेष्ठ तुम्ही ॥६१॥
ऐकोनि एकनाथाची वाणी । संन्यासी विस्मीत अंतःकरणीं ।
म्हणे लीला विचित्र दाखवोनि नयनी । शास्त्र प्रतिपादनीं सादर ॥६२॥
परम अवस्था जिरवोनि अंतरीं । स्वामी बैसले आसनावरी ।
मग नाथांसि समीप बैसवोनि सत्वरीं । ग्रंथ निर्धारे सोडविला ॥६३॥
एका श्लोकाचें व्याख्यान । पंचाध्यायांत वाचिले जाण ।
म्हणती याचें अबाधित ज्ञान । जाहलें समाधान ऐकतां ॥६४॥
सद्गुरुसमवेत तये क्षणीं । विचार केला समस्तांनीं ।
नाथासि विनंती तये क्षणीं । कर जोडोनी करिताती ॥६५॥
पंचाध्याय भागवत । प्रारंभी वर्णिलें तुम्ही समस्त ।
एकादश स्कंध निश्चित । संपूर्ण येथ करावा ॥६६॥
टीका समस्त होय तोपर्यंत । आनंदयुक्त असावें येथ ।
ऐसें आमुचें मनोगत । संन्यासी विनवीत नाथासि ॥६७॥
अवश्य म्हणवोनि ते अवसरीं । श्रीनाथें आज्ञा वंदिली शिरीं ।
मागुती ग्रंथासी प्रारंभ करी । उल्हास अंतरीं धरोनियां ॥६८॥
जितुकी टीका नित्य होत । तितुकी संन्यासी वाचोनि पाहत ।
संस्कृत व्याख्यानें ध्यानासि आणित । परी न्यून किंचित असेना ॥६९॥
षण्मास लोटितां निश्चित । तेव्हां समाप्तीसि पावला ग्रंथ ।
परी भक्ति रहस्य अधिकोत्तर त्यांत । श्रोते समस्त सुखावती ॥१७०॥
अवघे बैसोनि मठपती । नित्य नित्य श्रवण करिती ।
सुख संतोष लोटतसे रातीं । स्वानंद चित्तीं सकळांच्या ॥७१॥
ऐसा ग्रंथ होतांचि समाप्त । मग चित्तीं विचार करिती महंत ।
आतां महा उत्साह करोनि मठांत । सरस्वतीते पूजावें ॥७२॥
ऐसें उल्हास धरोनि अंतरीं । साहित्य करविलें ते अवसरीं ।
आणिक पंडित होते क्षेत्रीं । त्यांसि सांगोनि सत्वरी धाडितसे ॥७३॥
एकनाथें एकादशावरी देखा । स्वमुखें केली प्राकृत टीका ।
त्याचा अर्थ पाहोनि निका । सप्रेम सुखा पावलों ॥७४॥
ग्रंथ समाप्त जाहला शेवटीं । उदयीक उत्साह होतसे मठीं ।
तुम्ही ब्राह्मण श्रेष्ठा श्रेष्ठीं । उठा उठी येइजे ॥७५॥
निरोप ऐकतां धरामर । निंदेसी प्रवर्तले समग्र ।
प्राकृत टीका भागवतावर । अघटित विचार हा झाला ॥७६॥
कलियुगा प्रारंभ निश्चित । पाखंड माजलेसे अद्भुत ।
स्वामिसि कैसी पडलीसे भ्रांत । उच्छेद त्वरित केला ॥७७॥
महाक्षेत्रीं प्रतिपाद्य पूर्ण । तेंचि मानिती प्राकृत वचन ।
हें वैष्णव मायेचें निदान । स्वामीसी मोहन पडियेलें ॥७८॥
तरी आपण जावोनि सत्वरगती । तयासि सांगाव्या शास्त्रनीती ।
ग्रंथ बुडवावा निश्चित । विचार पंडितीं दृढ केला ॥७९॥
वैदिक शास्त्रज्ञ पंडित ब्राह्मण । वेदांत वक्ते अवघे जन ।
स्वामीच्या मठासि येऊन जाण । साष्टांग नमन पैं केलें ॥१८०॥
मग एकांता नेऊनि यती । म्हणती स्वामी तुम्ही सर्व प्रभूर्ती ।
आम्ही सकळ ब्राह्मण निश्चिती । तुमचे विद्यार्थी सर्वस्वें ॥८१॥
सकळ विद्येचें मूळपीठ । तुम्ही सद्गुरु पूज्य वरिष्ठ ।
त्याही वरी चतुर्थाश्रम उत्कृष्ट । पूज्यत्वें श्रेष्ठ सर्वांसी ॥८२॥
आणि प्रतिष्ठानकर एकनाथ । त्यानें प्राकृत केलें भागवत ।
स्वामी मान्य करिताति त्यातें । तरी विपरीतार्थ हा दिसे ॥८३॥
जें वेदशास्त्रांचें निजमथित । तो ग्रंथ महाभागवत ।
त्याणें वरी टीका केली प्राकृत । तरी मणिकर्णिकेंत बुडविजे ॥८४॥
जेवीं कां मागें जैमिनीनें । भारत केलेसें निर्माण ।
मग तें बुडविलें द्वैपायनें । सत्कीर्ति तेणें मग झाली ॥८५॥
कीं जैन मताचे महाग्रंथ । आचार्ये निक्षेपिले उदकांत ।
तैसेंच प्राकृत हें भागवत । मणिकर्णिकेंत बुडवावें ॥८६॥
तेणें सकळ ब्राह्मणांसि होय सुख । वाढेल क्षेत्राचा लौकिक ।
ऐसें पंडित सकळिक । स्वामींसि देख विनविती ॥८७॥
मग संन्यासी देत प्रत्युत्तर । आम्ही यासि छळिलें फार ।
परी हा नव्हेचि मानवीनर । साक्षात अवतार विष्णूचा ॥८८॥
याचा ग्रंथ तुम्हीं समस्तीं । मंत्र विधानें पूजावा निश्चिती ।
ऐसें शिकविलें नाना रीतीं । परी पंडित नायकती सर्वथा ॥८९॥
श्रीनाथा पासोनि निश्चित । मागोनि घेतलें भागवत ।
पंडित उठोनि त्वरित । मणिकर्णिकेंत झोंकिती ॥१९०॥
तों अद्भुत चरित्र वर्तलें निश्चिती । तें परिसिजे सभाग्य श्रोतीं ।
उभय हस्त काढूनि भागीरथी । हातीं धरीती पुस्तकातें ॥९१॥
करीं रत्नजडित असती कंकण । दिव्य मुद्रिका शोभायमान ।
हातीं पुस्तक घेऊनि तिणें । पाहतांचि जन विस्मित ॥९२॥
जयजयकारें पिटोनि टाळी । आनंदली भक्त मंडळी ।
संन्यासी म्हणे तये वेळीं । मज चंद्रमौळी पावला ॥९३॥
मग सकळ संन्यासियांचा नाथ । उडी टाकीत मणिकर्णिकेंत ।
पुस्तक घेऊनि आपुल्या हातें । मस्तकीं धरित निजप्रीतीं ॥९४॥
पंडितांपासीं ठेविती आणून । तंव ते पाहती अधोवदन ।
संन्यासी म्हणे सावध होऊन । नाथासि शरण जा आतां ॥९५॥
ऐसें ऐकोनि ते समयीं । मस्तक ठेविती स्वामीचें पायीं ।
म्हणती आम्ही सर्वस्वें अन्यायी । ऐकिलें नाहीं आपुलें ॥९६॥
एकनाथ हा ईश्वर साक्षात । ऐसें आम्हांसि कळलें सत्य ।
मग मठांत येऊनि पंडित समस्त । सद्भावें भेटत एकनाथा ॥९७॥
त्या पुढें ग्रंथ ठेवोनि त्यांणीं । म्हणती हे तुझी प्रसाद वाणी ।
श्रीभागीरथी हात काढोनी । प्रीती करोनी रक्षिते ॥९८॥
श्रीनाथें पंडित संन्यासी । देखोनि नमस्कार घातला त्यांसी ।
मग स्वामी आज्ञापिती ब्राह्मणांसी । पूजावें नाथासी प्रीतीनें ॥९९॥
भवसागर तरावया पाहीं । साधुसेवन घडों द्यावें कांहीं ।
श्रीनाथ पंडितांचें लागे पायीं । म्हणे अनुचित कांहीं न करावें ॥२००॥
पुढिले अध्यायीं कथा रसिक । श्रवणेंचि विरक्त होती भाविक ।
महीपतीहि तेणें हरिखें । चरित्र कौतुकें निरोपी ॥१॥
स्वस्ति श्रीभक्तिलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।
प्रेमळ परिसोत भाविक भक्त । एकविंश अध्याय रसाळ हा ॥२०२॥अध्याय ॥२१॥ओ०॥२०२॥