श्रीपांडुरंगाय नमः ॥
प्रेमळ श्रोता असलिया सादर । तेणें वक्तयासि उल्हास थोर ।
विकल्पसंशय राहोनि दूर । निघती उद्गार कथेचे ॥१॥
जैसा उगवतां वासरमणी । सरोवरीं विकासती कमळिणी ।
तेवीं श्रोतया सन्मुख होऊनी । प्रेम मनीं उचंबळे ॥२॥
नातरी ऐकता मेघगर्जना । मयूरें नृत्य करिती नाना ।
कां मातेसि सन्मुख देखोनि तान्हा । खेळतसे जाणा समोर ॥३॥
कां सन्मुख असतां मृडानीपती । नृत्यकळा दाखवितसे गणपती ।
कां विरंचि जनकास देखोनि प्रीती । गायन सरस्वती करितसे ॥४॥
तैसेंच तुम्हां संतांसमोर । मी सलगीनें बोलतों आर्ष उत्तर ।
यामाजी उणें अथवा पुरें । श्रीरुक्मिणीवर तो जाणे ॥५॥
मागिले अध्यायाच्या शेवटीं निश्चित । विप्रवेष धरोनि पंढरीनाथ ।
एकनाथाचें धरिलें ध्रुपद । सप्रेमभरित होऊनियां ॥६॥
ऐसीं बारा वर्षें लोटतां पूर्ण । तों पंढरीहूनि आला ब्राह्मण ।
त्याणें वोळखिला रुक्मिणीरमण । मग सगुणदर्शन त्यासि दीधलें ॥७॥
जनविजन ओळखती नयनीं । उपाधि वाढेल प्रतिष्ठानीं ।
यास्तव अदृश्य कैवल्यदानी । तेंच क्षणीं जाहले ॥८॥
एकदा उद्धव सद्गुरुभक्त । श्रीनाथासि स्वमुखें विनवित ।
कीं तुमच्या मुखें ऐकावें भागवत । उपजला हेत निजमनीं ॥९॥
देखोनि तयाची सप्रेम आर्ती । महापुराणासि प्रारंभ करिती ।
भाविक श्रोते श्रवणासि येती । संसार गुंती उरकोनिया ॥१०॥
भोळे भोळे नारीनर । स्त्रिया शूद्र उदमी इतर ।
गृहस्थ नामांकितही थोर । येती सादर ऐकावया ॥११॥
यथा पद्धति बैसोनि जवळ । पुराण ऐकती भक्तप्रेमळ ।
अर्थ करोनि सांगता प्रांजळ । संशय जाळ तुटे जेणें ॥१२॥
तों विप्र वेष धरोनि त्वरित । तेथें पातले पंढरीनाथ ।
एकनाथें देखोनि तयांतें । नमस्कारित सद्भावें ॥१३॥
म्हणती कोठूनि केलेंजी आगमन । काय तुमचें नामाभिधान ।
ऐसा नाथाचा ऐकोनि प्रश्न । तो जगज्जीवन काय वदे ॥१४॥
केशव माझें नामाभिधान । निस्पृह एकटा असे जाण ।
तुमच्या मुखें भागवत श्रवण । करावें म्हणोनि पातलों ॥१५॥
स्वमुखें आश्वासन द्याल जर । तरी येथेंचि राहेन निरंतर ।
तुझी सत्कीर्ती ऐकूनि थोर । आलों सत्वर या ठायां ॥१६॥
ऐकोनि म्हणती एकनाथ । आमुचाही ऐसाचि आहे हेत ।
कीं सर्वदा असावी तुमची संगत । तरी मनींचें आर्त पुरवावें ॥१७॥
मजला भासे ऐशा रीतीं । बहुरुपी हा वैकुंठपती ।
रुपें नटतसे नानारीतीं । परी लाघव श्रीपती कळों नेदी ॥१८॥
विप्रवेष करोनि सत्वरा । धृपद धरिलें वर्षें बारा ।
तोचि केशवरुपें पातला घरा । परी कोणाच्या अंतरा न चोजवें ॥१९॥
अभेद भक्ताचे निज संगतीं । काळ क्रमीतसे रुक्मिणीपती ।
भागवत श्रवणीं बहुत आर्ती । सन्मुख बैसती ऐकावया ॥२०॥
पद संधीं कांहीं राहतां अर्थ । आशंका घेऊनि मग पुसत ।
नाथ स्वमुखें संशय निवारित । रंग अद्भुत ये तेथें ॥२१॥
उद्धव सखा भाविक पूर्ण । सन्मुख बैसोनि करी श्रवण ।
हें मुख्य श्रोते दोघेजण । इतर जन सभोंवते ॥२२॥
क्षेत्रवासी जे श्रवणासि येती । तयांसि लागली श्रीविष्णुभक्ती ।
क्षमा दया शांति विरक्ती । देहीं वसती तयांच्या ॥२३॥
एकनाथाच्या वचनें करोनी । असत्य व्यवहार टाकिला त्याणीं ।
धर्म वासना धरिली मनीं । नामस्मरणीं प्रीत बहु ॥२४॥
जैसा मैलागिरीचा वृक्ष थोर । त्याज शेजारीं बाभुळ खैर ।
त्यांच्याही काष्टीं सुगंध संचरे । भिन्न भेद नुरे सर्वथा ॥२५॥
तेवीं सत्समागमाचेनि गुणें । अज्ञान दशेचें पालटें चिन्ह ।
तत्काळ होय सिद्धांत ज्ञान । अनुभवें करुन आपल्या ॥२६॥
जेवीं द्वापारयुगांत निश्चित । लीला विग्रही श्रीकृष्णनाथ ।
त्यासि उद्धव प्रिय बहुत । तोच योग येथें घडला असे ॥२७॥
नित्य नूतन प्रेमा निश्चिती । चढती वाढती या नांव भक्ती ।
श्रोतयांची वेधली वृत्ती । प्रपंच भ्रांति निरसली ॥२८॥
तृतीय प्रहरी नित्यनित्य । श्रवणासि भाविक लोक येत ।
दाटी होतसे वाडियांत । प्रेमा अद्भुत वाढला ॥२९॥
एकनाथाची स्थिती देखोनि । प्रेमळांसि संतोष वाटे मनीं ।
परी वैदिक पंडित विप्रांलागुनी । द्वेष निजमनीं उपजला ॥३०॥
रिकामटेंकडीस बैसोनि बहूत । स्वमुखें नाथासि अवघे निंदित ।
म्हणती दुकान मांडोनि क्षेत्रांत । भाविक समस्त भोंदिले ॥३१॥
वक्तृत्वें तरी नसेचि थोर । परी कीर्तनी जनाचें मोहीत अंतर ।
अक्षरें मेळवूनि वरिच्यावर । प्राकृत उत्तर बोलतसे ॥३२॥
आणिक पुराणें सोडूनि बहुत । निवडूनि काढिलें भागवत ।
त्याचा अर्थ प्रांजळ सांगत । तेणें वेधिसेंलें चित्त सर्वांचें ॥३३॥
भागवतधर्म ऐकोनि श्रवणीं । अवघेचि निष्काम जाहले मनीं ।
कामनिक व्रतें नाचरती कोणी । सिद्धांत ज्ञानी निमग्न ॥३४॥
आमुचे यजमान समस्त । प्रपंच उपजीविका चालवीत होते ।
तितुकेही मोहिले एकनाथें । ग्रंथ प्राकृत वाचोनी ॥३५॥
श्रीधरी टीका कोणी सत्वरी । नित्य वाचितो ज्ञानेश्वरी ।
भक्तीचा उत्कर्ष अर्थांतरीं । मधुरोत्तरी बोलतसे ॥३६॥
एकनाथाच्या ऐकूनि गोष्टी । स्वरुपीं मिळेल सकळ सृष्टी ।
मग काय करील परमेष्ठी । हे चिंता मोठी वाटतसे ॥३७॥
आम्ही वैदिक पंडित ब्राह्मण । चहूं शास्त्रीं अध्ययन ।
कोणी न पुसेचि आम्हां कारणें । वेधले जन एकनाथें ॥३८॥
याची विद्या तों केवळ प्राकृत । परी धनधान्य घरी येतसे बहुत ।
शतानुशत ब्राह्मण जेवित । परी उणें किंचित पडेना ॥३९॥
आम्हीं सर्व शास्त्रीं निपुण बहुत । परी बैसल्या न चले सत्य ।
यजमानाची खुशामत । करणें लागत सर्वदा ॥४०॥
लोक बोलती साचार । एकनाथ हा विष्णु अवतार ।
परी आम्हांसी वाटे दावेदार । कामनिक व्यवहार बुडविला ॥४१॥
आपले यजमान बहुत । संसार कृत्य चालवीत होते ।
नाथाची धरोनि संगत । प्राकृत ग्रंथ ऐकती ॥४२॥
ऐसे क्षेत्रवासी वैदिक पंडित । स्वमुखें नाथाची निंदा करित ।
म्हणती यानें सत्कर्म बुडवोनि समस्त । एक भक्तीपंथ स्थापिला ॥४३॥
इतर जनांची कायसी चर्चा । परी आम्हां भिक्षुक ब्राह्मणांच्या स्त्रिया ।
जाणोनि प्रपंच मिथ्या माया । श्रीनाथपायां लागती ॥४४॥
जैसें द्वापरीं कृष्णाकारणें । ऋषिपत्न्यांनीं नेलें अन्न ।
तैशाचि ह्या आम्हंसि चोरुन । जाती कीर्तन ऐकावया ॥४५॥
भागवतधर्म सांगतो त्यांतें । यास्तव यजमान निष्काम होत ।
कोणी नाचरती सकाम व्रतें । आमुची मिळकळत बुडविली ॥४६॥
क्षेत्रवासी ब्राह्मण सदा । यापरी समस्त जल्पती निंदा ।
परी चित्तीं आठवूनिया गोविंदा । सप्रेम स्वानंदा न घेती ॥४७॥
परी ब्रह्मनिष्ठ श्रीएकनाथ । ब्रह्म भावना धरोनि मनांत ।
ब्राह्मणांची सेवा करित । सप्रेम भावार्थ धरोनिया ॥४८॥
निंदिती अथवा वंदिती कोणी । परी जनार्दनरुप सर्वांसि मानीं ।
मानापमान योजितां जनीं । परी सुखदुःख न मानी तयाचें ॥४९॥
जनीं भरलासे जनार्दन । तोचि करवी निंदा स्तवन ।
ऐशा निश्चयें बोधले मन । वृत्ति संपूर्ण मुराल्या ॥५०॥
क्षेत्रवासी ब्राह्मण समस्त । नानापरीची छळणा करित ।
देखिली वस्तु तेचि मागत । परी न वंची नाथ तयांसी ॥५१॥
वस्त्र पात्र अपूर्व दिसत । ब्राह्मण मागतांचि उचलोनि देत ।
आगंतुक येतां तयासि सांगत । दाता एकनाथ येथें असे ॥५२॥
सहस्त्रावधी येतां अतिथी । तरी अन्न देऊनियां करितसे तृप्ती ।
तयासि सिद्धि अनुकूल असती । तरी सत्वर गतीं जा तेथें ॥५३॥
आपुले घरीं उदंड धन । परी कदा न करिती अन्नदान ।
दाखवोनि देती नाथाचें सदन । द्वेष बुद्धीनें सर्वदा ॥५४॥
तंव एके दिवशीं साचार । पर्जन्य लागला असे थोर ।
सात दिवस अहोरात्र । शिळंधार वर्षतसे ॥५५॥
मंदिरें भिजोनि सर्व गळती । कोरडी कोठे न दिसे क्षिती ।
इंधन न मिळेचि कोणाप्रती । पाकनिष्पत्ती न होय ॥५६॥
घरीं धन धान्य असोनि फार । परी इंधन न मिळे अणुमात्र ।
तों रात्र लोटतां दोन प्रहर । ब्राह्मण चार पातले ॥५७॥
ते अन्न इच्छिती पोटभर । यास्तव हिंडती घरोघर ।
तों सांगतीं गांवींचे द्विजवर । एक सत्वधीर येथें असे ॥५८॥
तयाचें नांव एकनाथ । दुरोनि मंदिर दाखवित ।
वाटसरु जाउनि तेथ । काय बोलत नाथासी ॥५९॥
आम्ही क्षुधातुर चौघेजण । आलो ऐकोनि नामाभिधान ।
तरी आतां करावें क्षुधाहरण । पाक करुन निज मंदिरीं ॥६०॥
ऐकूनि त्यांची वचनोक्ती । नाथासि कळवळा आला चित्तीं ।
मग गिरजाबाईसी आज्ञापिती । पाकनिष्पत्ती करावी ॥६१॥
ते म्हणे इंधन किंचितही नाहीं । मग नाथ उत्तर देतसे कायी ।
काष्ठें वेष्टित मंदिर सर्वही । उद्धवासि तिही आज्ञा केली ॥६२॥
एक खण उखळोनि सत्वर । किलचा काढोनि द्यावा फार ।
उद्धव देतसे प्रतिउत्तर । उशीर फार होईल कीं ॥६३॥
मग नाथें उकलोनि नवार । माच वेगातें फोडोनि सत्वर ।
इंधन निर्मिलें याप्रकारें । स्वयंपाक साचार सिद्ध झाला ॥६४॥
ब्राह्मणांसि स्नानाकारणें । पाणी तापोनि दिधलें उष्ण ।
शीत वाजतें म्हणवून । संगडी पेटवून ठेविली ॥६५॥
गिरिजाबाई त्याज कारणें । स्वहतें पात्रीं वाढीत अन्न ।
तृप्त जाहली यति ब्राह्मण । आशीर्वचन बोलती ॥६६॥
श्रीपांडुरंग कृपेनें निश्चिती । तुझी सुशीळ असो वृत्ती ।
मग मुखशुद्धि देऊनियां तीतीं । म्हणती आतां विश्रांती करावी ॥६७॥
ऐसें कांहीं दिवस लोटले । तों वडिलांचें श्राद्ध आलें ।
ब्राह्मण भोजनासि सांगितले । पाक करविला निज मंदिरीं ॥६८॥
दिवस येताचि दीड प्रहर । स्नानासि पाठविले द्विजवर ।
स्वयंपाक सिद्ध झाला पर । तयांसि उशीर लागला ॥६९॥
नित्यनेम सारोनि साचा । एकनाथ मार्ग लक्षिती त्यांचा ।
तों हेत झाला तिहीं देवांचा । म्हणती सद्भाव याचा पहावा ॥७०॥
ब्रह्मा विष्णु महेश्वर । होऊनि आले मंगल फकीर ।
जमाल दाढी आरक्त नेत्र । चरणीं तोडर गारमणी ॥७१॥
हातीं तसबीं घेऊनि तिघे । चर्मे वेष्टिलें सर्वांग ।
मस्तकीं जटाभार सोंग । दाखवोनि मग काय म्हणती ॥७२॥
एकनाथासि बोलती वचन । आम्हीं क्षुधित तिघेजण ।
पोट भरोनि इच्छितों अन्न । इतुकें वचन बोलिले ॥७३॥
श्रीनाथें शब्द ऐकोनि श्रवणीं । अवश्य म्हणती तये क्षणीं ।
अन्न निपजलें होतें सदनीं । तें पात्रीं वाढोनी आणिलें ॥७४॥
आपण सन्निध बैसोनि जाण । मलंगासि घातलें भोजन ।
करशुद्धि होतांचि त्याज कारणें । मग विडे आणूनि दीधले ॥७५॥
सर्व भूतीं भगवद्भाव प्रीती । निश्चय कळला तयां प्रती ।
मग तिन्ही देव प्रगट होती । दर्शन देती एकनाथा ॥७६॥
दृष्टीसि देखोनि सगुण मूर्ती । म्हणे सनाथ केलें मज प्रती ।
मलंग वेष धरोनि पुढती । फकीर निघती तेथूनियां ॥७७॥
तों स्नानें करोनि धरामर । वाडियांत पातले सत्वर ।
तयासि देखोनि फकीर । तृप्तीचे ढेकर देताती ॥७८॥
यवन भाषे करोनि जाण । नाथासि देती आशीर्वचन ।
आम्हांसि पोटभर घातलें अन्न । ईश्वर कल्याण करील तुझे ॥७९॥
इतुकें बोलोनियां उत्तर । बाहेर गेले मलंग फकीर ।
ब्राह्मण बोलती परस्परें । वर्णसंकर माजला ॥८०॥
एकनाथासि बोलती वचन । आजि तुझ्या वडिलांचे श्राद्ध जाण ।
आम्हां आधीं अनसुट अन्न । यवनांसि भोजन घातलें ॥८१॥
तंव एक म्हणती द्विजवर । यांच्या वडिलांचे सकृत फार ।
यास्तव मध्यान्ही आले । फकीर क्षुधातुर होऊनियां ॥८२॥
श्राद्ध तो सांग जाहलें पाहीं । आता आपुलें काम येथें नाहीं ।
ऐसें बोलोनि ते समयीं । परतोनि सर्वही चालिले ॥८३॥
एकनाथ पुढें होऊनि सत्वर । तयांसि घालिती नमस्कार ।
म्हणे ते क्षुधातुर होते फकीर । यास्तव साचार जेवविले ॥८४॥
आणिक उदक अनसुट आणोनी । दुसरा स्वयंपाक करविला सदनीं ।
तरी अपराध क्षमा करोनि । श्राद्ध स्वामींनी करावें ॥८५॥
ऐसी ग्लांती करोनि फार । प्रार्थितसे वारंवार ।
परी ते नायकतीच द्विजवर । म्हणती भ्रष्टकार तूं करिसी ॥८६॥
मग धर्माधिकारी क्षेत्रवासी । जावोनि वृत्तांत सांगती त्यासी ।
कीं आधीं न करितां श्राद्धासी । त्याणें फकिरासी जेवविले ॥८७॥
तेव्हां धर्माधिकारी येतसे सत्वर । सवें ब्राह्मण थोर थोर ।
तो उपाध्याय नाथासि बोले उत्तर । हे आले बहिष्कार टाकावया ॥८८॥
तो विप्र बोलती नाथा कारणें । आजि तुझ्या वडिलांचीं तीथ जाण ।
ते काय जातीचे मुसलमान । यास्तव यवन जेवविले ॥८९॥
ऐसें नाना दुरुत्तर । बोलतां तेव्हां धरामर ।
परी श्रीनाथ शांतीचा पयोब्धि थोर । राग अणुमात्र नयेची ॥९०॥
जव निंदेचे येतां लोट । शांति सागरी भरीतसे घोंट ।
काम क्रोधाची मोडली वाट । करणीं अचाट निरुपम ॥९१॥
जनार्दन स्वरुप मानोनि विप्र । घातला साष्टांग नमस्कार ।
म्हणे कृपा करोनि नाथावर । श्राद्ध सत्वर करा स्वामी ॥९२॥
धर्माधिकारीं बोलती उत्तर । तुझें सुकृत दिसतें फार ।
आतां स्वर्गीचे येऊनि । पितर भोजन साचार करितील ॥९३॥
श्रीनाथ म्हणती नवल रोकडे । तुमचें वचन खालीं न पडे ।
अघटित गोष्टी तेहीं घटे । नव्हे सांकडे सर्वथा ॥९४॥
स्वामीच्या वचनें करोनि निश्चित । स्वाहा स्वधाकार जै होत ।
तेणेचि देव होतीं तृप्त । इंद्रासहित महायागीं ॥९५॥
विप्रवचनाचा नवलाव । पाषाणमूर्तीत प्रगटे देव ।
श्रीवत्स हृदयीं धरी माधव । तेथें रंक मानव ते किती ॥९६॥
यावरी म्हणती धरामर । श्रपणिका लावूं नको फार ।
येथें साक्षात न येतां पितर । तरी वाळीत आम्हीं घालूं ॥९७॥
ऐसें बोलोनि तये क्षणीं । तीन पाट मांडिले धरणीं ।
आगतनाथ बोलतां वाणी । तों पितर वरोनी उतरले ॥९८॥
परम तेजस्वी देदीप्यमान मूर्ती । ब्रह्मसूत्रें कंठीं विराजती ।
सुवर्ण पवित्रें हातीं असती । दृष्टीसीं पाहती धरामर ॥९९॥
पितर येऊनि बैसले आसनीं । वेदघोष मांडिला तये क्षणीं ।
हें सकळ ब्राह्मण देखोनि नयनीं । आश्चर्य मनीं ते करिती ॥१००॥
नाथाचें आश्चर्य जाण । लज्जा उत्पन्न जाहली ब्राह्मणां ।
मग खालीं करोनियां माना । घातल्या घोणा सकळिकीं ॥१॥
मग धर्माधिकारी त्याजसहित । मौनेंचि विप्र उठोनि जात ।
आंवतिले ब्राह्मण सोवळ्यांत होते । तितुकेचि तेथें राहिले ॥२॥
श्राद्धसंकल्प यथास्थित । सांगोनि जेविले पितरांसहित ।
विडेदक्षिणा घेऊनि त्वरित । पितर जात स्वर्गपंथा ॥३॥
ऐसें कौतुक देखोनि नयनीं । परम विस्मित जाहले मनीं ।
मग धर्माधिकार्यापासीं येऊनी । मागील करणी सांगीतली ॥४॥
म्हणती पितर जेवूनि आम्हां देखत । स्वर्गासि गेले ऊर्ध्वपंथे ।
धर्माधिकारी जाहले लज्जित । म्हणती व्यर्थ जीवित आपुलें ॥५॥
छळणेचा प्रकार केला फार । परी एकनाथासि साह्य ईश्वर ।
अपयश आलें आम्हांवर । कैसा विचार करावा ॥६॥
दुर्वासें अंबरीष करितां कष्टी । तों चक्र लागलें त्याचे पाठीं ।
तैसीच आजिची चरित्र राहटी । लज्जा मोठी वाटतसे ॥७॥
ऐसें ब्राह्मण ते समयीं । परस्परें बोलती पाहीं ।
इकडे एकनाथाचे जीवीं । हर्ष शोक कांहीं उपजेना ॥८॥
ब्राह्मणीं बहुत केली छळणा । याचा खेद न करीच मना ।
स्वर्गस्थ पितर आले भोजना । हे आश्चर्य परिपूर्ण नाठवे ॥९॥
जनार्दनचि भरिला जनीं । ऐसा निश्चय बाणला मनीं ।
निंदास्तुती ऐकतां कानीं । समान मानी दोन्हीं तें ॥११०॥
तृतीय प्रहरीं पुराण श्रवण । रात्रीं होतसे हरिकीर्तन ।
पैठणींचे भाविक जन । वेधलें मन तयांचें ॥११॥
नित्य दिवस आणि यामिनी । यात्रा भरतसे याचें सदनीं ।
ब्राह्मण ऐश्वर्य देखोनी । जळती मनीं सर्वदा ॥१२॥
म्हणती एकनाथाचें ऐकूनि कीर्तन । पैठणींचे वेधले जन ।
सकळ करिती श्रीराम भजन । वैष्णव संपूर्ण लोक झाले ॥१३॥
काम निकव्रतें कोणी ना-चरती । उपजीविकेची बुडाली प्राप्ती ।
भागवत धर्मे लोक वर्तती । ऐसें बोलती परस्परें ॥१४॥
चंद्राचा प्रकाश पडतां बरा । देखोनि संताप वाटे तस्करां ।
तेंवीं नाथाचा ऐश्वर्य पसारा । धरामरां तेविं झालें ॥१५॥
उणें पाहतां दिवस यामिनीं । तों एक क्षुद्र देखिलें त्यांणीं ।
एक कृष्णदास ब्राह्मण तें ठिकाणीं । त्याणें भवानी उपासिली ॥१६॥
अनुष्ठान देखोनियां तीव्र । देवी देतसे साक्षात्कार ।
मग कवित्वशक्तीचा मागोनि वर । ग्रंथ थोर आरंभीला ॥१७॥
युद्धकांड जें रामायण । त्यावरी केलें प्राकृत लेखन ।
दृष्टांत रसिक बोलणें । देखोनि ब्राह्मण तोषिले ॥१८॥
म्हणती एकनाथ कविता करितो फार । परी त्याचीं सावडीं आर्ष उत्तरें ।
स्त्रिया शूद्र भाविक इतर । बोलणें सरे त्यापासी ॥१९॥
शब्द बोलोनि ऐशा रीतीं । नाथा समीप येऊनि बैसती ।
मग कृष्णदासें लोळ्याची करिती स्तुती । कैशा रीतीं ते ऐका ॥२०॥
म्हणती एकनाथा ऐक वचन । कवित्व करिती उदंड जन ।
परी कृष्णदासें मांडिलें रामायण । रसिक बोलणें तें दिसे ॥२१॥
तयासि प्रसन्न असे देवी। कडसणी वांचोनि नसे ओवी ।
भूतभविष्यीं ऐसा कवी । होणेंचि नाहीं सर्वथा ॥२२॥
ऐकोनि कृष्णदासाची स्तुती । नाथासि आल्हाद वाटला चित्तीं ।
म्हणती ईश्वराच्या असंख्य विभूती । पार निश्चितीं कळेना ॥२३॥
ब्राह्मणीं उपक्रम केला खरा । परी द्वेषभाव नयेचि अंतरा ।
विस्मयो जाहला धरामरां । मग आपुल्या घरां ते गेले ॥२४॥
असो इकडे अनुसंधान । कृणदास लिहीत रामायण ।
युद्धकांड संपूर्ण न होताचि जाण । तों दृष्टांत देवीनें दाखविला ॥२५॥
उदईक तृतीय प्रहरीं निश्चित । तुझा देहांत होईल सत्य ।
सावध असावें मनांत । ऐसें सांगत भवानी ॥२६॥
मग पावोनि जागृत अवस्था । परम उद्वेग वाटला चित्ता ।
म्हणे ग्रंथ नाहीं झाला पुरता । तरी आतां कैसें करावें ॥२७॥
मग लिहिला ग्रंथ बरोबरी । घेऊनि पातलें एकनाथाचें घरीं ।
श्रीनाथे देखोनि नेत्रद्वारीं । उठोनि सामोरी येत पुढें ॥२८॥
कृष्णदासें धरोनि विनीतता । चरणकमळीं ठेविला माथां।
आसनीं बैसवूनि तत्त्वतां । म्हणे कृपा समर्था आजि केली॥२९॥
कृष्णदासें प्रीती करुन । सांगितलें आद्यंत वर्तमान ।
म्हणे उदईक आमुच्या देहासि मरण । तें न चुकेचि जाण सर्वथा ॥१३०॥
युद्धकांड रामायण । त्या वरी प्राकृत केलें टिपण ।
कांहीं शेष राहिलें जाण । ते आपण संपूर्ण करावें ॥३१॥
ऐसें बोलोनि वाडेकोडे । पुस्तक ठेविलें तयापुढें ।
श्रीनाथें चित्तीं धरोनि चाड । निज निवाडें लक्षिती ॥३२॥
एक अध्याय तेव्हां वाचोनि । परम संतोष पावलें मनीं ।
म्हणती या शब्दाचीं पुरवणीं । नव्हे आमुचेनि सर्वथा ॥३३॥
तुम्हीं ग्रंथ आरंभिला बरा । हा आपुल्याच मुखें समाप्त करा ।
कृष्णदास म्हणती त्या अवसरा । काळाचा दरारा उदईक ॥३४॥
यावरी श्रीनाथ पुसती त्यास । ग्रंथासि लागती किती दिवस ।
तोवरी काळ तुम्हां संतांस । न करी स्पर्श सर्वथा ॥३५॥
ऐकोनि नाथाच्या वचनास । चित्तीं वाटला विश्वास ।
म्हणे येथेंचि बैसतां रात्रंदिवस । ग्रंथ सिद्धीस तरी जाय ॥३६॥
एकनाथ म्हणती त्या अवसरा । तुम्हीं जावे आपुल्या घरां ।
कांहीं काळाचा येतां वारा । भेटी सत्वरा आम्हीं येऊं ॥३७॥
ऐसें ऐकूनिया उत्तर । चित्तीं संतोष वाटला फार ।
मग सद्भावें करोनिया नमस्कार । निज मंदिरीं पावलें ॥३८॥
श्रीनाथें दीधलें आश्वासन । तें स्वमुखें सांगे लोकांकारणें ।
एक रात्र लोटतांचि पूर्ण । तों उदयासि दिनकर पावला ॥३९॥
मग कृष्णदासे करोनि स्नान । नित्य नेम सारिला पूर्ण ।
अंत समय येतांचि त्वरेनें । होताति प्राण कासाविस ॥१४०॥
ते समयीं येऊनि श्रीनाथ । कृष्णदासासि आश्वासित ।
आंगावरुनि फिरविला हात । मग आज्ञा करीत काळासी ॥४१॥
आजिपासून अकरा दिवस । याच्या देहासि न करीं स्पर्श ।
ऐकोनि ऐसिया वचनास । आश्चर्य लोकांस वाटलें ॥४२॥
नाथाच्या वचनासि देऊनि मान । काळ फिरोन गेला त्वरेनें ।
कृष्णदास तेव्हां सावध होऊनि । लिहित रामायण बैसले ॥४३॥
ऐसी अघटित देखोनि करणी । लोक विस्मित जाहले मनीं ।
श्रेष्ठ ब्राह्मण प्रतिष्ठानीं । वार्ता त्यांनीं ऐकिली ॥४४॥
मग परस्परें बोलती उत्तर । अकरावे दिवशीं कृष्णदास मरे ।
तरी उत्तर मानूं खरें । नाहीं तरीं हें मिथ्या ॥४५॥
ऐसें म्हणोनि दुर्मती । चित्तीं क्षुद्र सर्वदा लक्षिती ।
तों दहावे दिवशीं निश्चिती । ग्रंथ समाप्त पावला ॥४६॥
युद्धाकांड समाप्त होतांचि पूर्ण । केलें ब्राह्मण संतर्पण ।
सरस्वतीचे करोनि पूजन । वर्णी महिमान नाथाचें ॥४७॥
अकरावे दिवशीं करोनि स्नान । श्रीकृष्णदासें नित्य नेम सारिला पूर्ण ।
तों प्रयाण समय जाणोन । केलें आगमन श्रीनाथें ॥४८॥
बुका सुमनें पुष्पहार । पूजोनि केला नमस्कार ।
कष्ट न होताचि अणुमात्र । कृष्णदास परत्र पावले ॥४९॥
ब्राह्मण बोलती परस्परें । आम्हीं लोळ्यासि वर्णिलें फार ।
परी शेवटीं अपयश आलें खरें । कैसा विचार करावा ॥१५०॥
जों जों अपाय योजिता मनीं । तों त्याची सत्कीर्ति प्रगटे जनीं ।
अघटित नाथाची करणी । द्वेष म्हणवोनी चालविती ॥५१॥
एक बोलती परस्परें त्याचें जन्मांतर असे थोर । यास्तव साह्य होऊनि ईश्वर ।
सत्कीर्ति फार वाढविली ॥५२॥
भोळा भाविके पडती पायां । परी आम्हांसि नावडे त्याची क्रिया ।
ऐसी वैष्णवी योगमाया । उमज तयां पडों नेदी ॥५३॥
तो करनाटक प्रांतीं साचार । धनवंत गृहस्थ सावकार ।
श्रीपांडुरंग भक्ती असे तत्पर । धर्मिष्ठ उदार नामांकित पैं ॥५४॥
त्याणें चित्तीं धरोनि आर्ती । धातूची निर्मिली विठ्ठलमूर्ती ।
ठाव मान सुहास्य आकृती । देखोनि विश्रांती होय जीवीं ॥५५॥
समचरण कटिकर । सुप्रसन्न मनोहर ।
जो पुंडलीकवरद रुक्मिणीवर । दावी चरित्र काय तेव्हां ॥५६॥
प्राणप्रतिष्ठा ब्राह्मणभोजन । व्हावया लागीं गृहस्थानें ।
सर्व साहित्य करुन । सुमुहूर्त सुदिन पाहिला ॥५७॥
रात्रीं निद्रित होतांचि पूर्ण । तों दृष्टांती सांगत जगज्जीवन ।
गंगातीरीं क्षेत्र प्रतिष्ठान । तेथें एक जनार्दन राहतसे ॥५८॥
भक्तिज्ञान वैराग्यलक्षण । हें त्यांचें आंगीं बाणले लेणें ।
तुवां मूर्ति निर्मिली सगुण । ते स्थळीं नेऊन हे द्यावी ॥५९॥
आज्ञा नायकोनि साचार । येथें स्थापना करिसील जर ।
तरी उपद्रव पावसील फार । भवरोग दुस्तर निरसेना ॥१६०॥
ऐसें स्वप्न देखतां रातीं । चटपट लागली बहु चित्तीं ।
निद्रा न लागे तयाप्रती । तो उदया गभस्ती पावला ॥६१॥
मग पंडित ब्राह्मण साधुसंत । तयांपाशी दृष्टांत सांगत ।
सर्वज्ञ अर्थ ध्यानासि आणित । संशय पडत मग तेव्हां ॥६२॥
पुराणिक उपाध्ये देत उत्तर । आणिक दोन दिवस धरावा धीर ।
दुसरा दृष्टांत जाहला जर । तरी मूर्ति सत्वर तेथें न्यावी ॥६३॥
ऐसें सर्वज्ञ सांगतांचि पूर्ण । मान्य केलें गृहस्थान ।
तीन दिवस ऐसेचि । स्वप्न देखिलें तेणें निश्चित ॥६४॥
मग पांडुरंग मूर्ति घेऊन । प्रतिष्ठानासि आला ब्राह्मण ।
गंगातीरीं स्नानालागुन । उतरले आपण ते वेळीं ॥६५॥
वस्त्रें भुषणें आंगावर । अश्व मनुष्यें असती फार ।
देखोनि क्षेत्रवासी द्विजवर । आल्हाद थोर पावले ॥६६॥
आमुचा यजमान असेल निश्चिती । यास्तव वह्या घेऊनि येती ।
तुमचें उपाध्ये कोण म्हणती । मग गृहस्थ त्याप्रती काय बोले ॥६७॥
ये स्थळीं एकाजनार्दन । वैष्णवभक्त असे कोण ।
देवे आम्हांसि सांगितलें स्वप्न । मग भेटीलागोन पातलों ॥६८॥
ऐसी ऐकोनिया गोष्टी । परमचिंता उद्भवें पोटीं ।
म्हणतीं एकनाथें मोहिली सृष्टी । होताति कष्टी यास्तव ॥६९॥
गावींच्या लोकांसि घातलें मोहन । बाहेरल्यांसि दाखवितो स्वप्न ।
मग हस्तासि येईल दक्षिणा धन । तैसेंचि वचन बोलती ॥१७०॥
तुम्हांसि नाथाच्या भेटीची आर्ती । तरी तूं आमचा यजमान निश्चिती ।
स्नानाकरितां प्रयोग सांगती । आशावंत चित्ती म्हणोनियां ॥७१॥
गृहस्थ देखोनि धनवंत । लुडबुड करिती सभोंवतें ।
कांहीं दक्षिणा देऊनि त्यातें । मग गांवांत तो प्रवेशला ॥७२॥
लोकांसि ठिकाण पुसोनि सत्वरीं । पातला गृहस्थ त्याचें घरीं ।
तों श्रीनाथ बैसले आसनावरी । उद्धव समोरी पै असे ॥७३॥
सद्भावें साष्टांग नमस्कार । घातला तेव्हां प्रेमादरें ।
एकनाथ उठोनि सत्वर । भेटले साचार तयासि ॥७४॥
कोठोनि झालें जी आगमन । साकल्य सांगिजे वर्तमान ।
कोणे देशीं ठावठिकाण । तरी ते निवेदन करावें ॥७५॥
गृहस्थ बोले स्वामीप्रती । आम्हीं निर्मिली श्रीविठ्ठलमूर्ती ।
प्राणप्रतिष्ठा करावी निगुती । तों स्वप्न रातीं देखिलें ॥७६॥
प्रतिष्ठान क्षेत्रामाजी जाण । राहतसे एकाजनार्दन ।
ते स्थळी मूर्ति द्यावी नेऊन । देखिलें स्वप्न तीन दिवस ॥७७॥
यास्तव आर्त धरोनि पोटीं । येथें पातलों स्वामीचे भेटीं ।
पदरीं पुण्याच्या होत्या गांठीं । घडोनि शेवटीं तें आलें ॥७८॥
गृहस्थें बोलोनि ऐशा रीतीं । पुढें ठेविली पांडुरंग मूर्ती ।
सहास्य वदन सौम्याकृती । देखतां विश्रांति पावला ॥७९॥
एकनाथमूर्ती उचलोनी । हृदयीं धरिली तेच क्षणीं ।
म्हणे विश्वचालक कैवल्यदानी । अघटित करणीं हें तुझी ॥१८०॥
मग उद्धवें पाहूनी मूर्तीचें ध्यान । चित्तीं वाटलें समाधान ।
नाथ आज्ञापित त्याजकारणें । साहित्यासी लागणें सत्वर ॥८१॥
ज्योतिषी बोलावूनी त्वरित । प्राणप्रतिष्ठेसि नेमिला मुहूर्त ।
उद्धव निजांगें साहित्य करित । क्षेत्रांत मात जाणवली ॥८२॥
क्षेत्रवासी लोक बोलती । श्रीनाथाची देखोनि भक्ती ।
कर्नाटक देशांतून निश्चिती । विठ्ठल मूर्ती पातली ॥८३॥
तृतीय प्रहरीं पुराण श्रवण । रात्रीं होतसे हरिकीर्तन ।
गृहस्थ ऐकोनि निजप्रीतीनें । समाधान पावला ॥८४॥
म्हणे याच्या वक्तृत्वें निश्चित । वेधूनि गेलें सर्व चित्त ।
हाचि पांडुरंग साक्षात । विश्वोद्धारार्थ अवतरला ॥८५॥
साहित्य जाहलिया सकळिक । सुदिन सुमुहूर्त उदईक ।
प्रहर रात्र उरली एक । तों समुदायासि पाक करविला ॥८६॥
सुगरणी सुवासिनी भाविक । त्याचि निजांगें करिती पाक ।
नानापरीचे पदार्थ अनेक । निर्मिले देख ते समयीं ॥८७॥
प्रातःकाळ होतांचि जाण । मांडिलें मूर्तीचें अर्चन ।
वैदिक उपाध्ये येऊन । विधिविधान सांग करिती ॥८८॥
पंचामृतें न्हाणूनि मूर्ती । प्राणप्रतिष्ठा मंत्र बोलती ।
अभिषेक करोनि यथास्थिती । वस्त्रें लेवविती भरजरी ॥८९॥
मुक्ताफळें रत्नें माणिक । यांचें अळंकार घातलें देख ।
पुष्पें सुमनें तुळसी अनेक। जगन्नायक पूजिला ॥१९०॥
धूप दीप पंचारती । मंगळ वाद्यें द्वारीं वाजती ।
नाम घोषें वैष्णव गर्जती । मंगळ आरती मांडिली ॥९१॥
घृत पक्कें आणि मिष्टान्नें । नैवेद्य दाखविला निजप्रीतीनें ।
वेदोक्त मंत्रें करुन । केलीं अर्पण पुष्पांजळी ॥९२॥
मग एकनाथें नवनीताचा गोळा । आपुल्या तळहातावरी घेतला ।
श्रीमूर्तीच्या मुखासि लाविला । म्हणे भक्षी विठ्ठला ये समयीं ॥९३॥
तुवां कृष्णाअवतारीं साचार । लोणी चोरुनी भक्षीले फार ।
तें देखावया आमुचे नेत्र । क्षुधातुर ये समयीं ॥९४॥
अघटित कौतुक दाखवसील जर । तरी ये स्थळीं महिमा वाढेल फार ।
ऐकूनि एकनाथाचें उत्तर । मूर्ति सत्वर हांसिली ॥९५॥
जिव्हां बाहेर काढोनि त्वरित । हातिचें चाटिले नवनीत ।
दृष्टीसी पाहतां वैष्णवभक्त । जयजयकार बहुत ते करिती ॥९६॥
मग प्रदक्षिणा करोनि निश्चितीं । साष्टांग नमस्कार घातलें प्रीतीं ।
तों दोन प्रहर येतां गभस्ती । ब्राह्मणपंक्ती बैसल्या ॥९७॥
तयांचें पूजन यथास्थित । श्रीनाथ निजांगें पाय धूत ।
चंदनादिक उपचार करोनि समस्त । धूप दीप दाखवित ब्राह्मणां ॥९८॥
नानापरींचीं मिष्टान्नें सत्वरीं । समसमान वाढिली पात्रीं ।
भोक्ता जनार्दन सर्वांतरी । संकल्प निर्धारी सोडिला ॥९९॥
यापरी क्षेत्रवासी ब्राह्मण । तृप्त जाहले सकळ जन ।
विडे दक्षिणा सकळ घेऊन । समाधान पावले ॥२००॥
गृहस्थें उत्सव पाहोनि बरा । संतोष जाहला त्याच्या अंतरां ।
म्हणे श्रीनाथ येतील आपुल्या घरां । ते युक्ती सत्वरा योजित ॥१॥
मग नाथासि प्रणाम करोनि । स्वमुखें बोले तये क्षणीं ।
आतां आम्ही स्वदेशा जाऊनी । निर्मितों रुक्मिणी मूर्ती सुंदर ॥२॥
स्वामींनीं सहपरिवारें करुनि जाणा । श्रीपांडुरंगाचें लावावे लग्ना ।
ऐसी करितांचि प्रार्थना । नाथाच्या मना संतोष ॥३॥
उद्धवासि पुसोनि आपण । तयाचें वचन केलें मान्य ।
गृहस्थें बहुत अर्पूनि धन । आज्ञा मागोन तो गेला ॥४॥
मग मंदिरां जाऊनि सत्वर गती । निर्मिली श्रीरुक्मिणीची मूर्ती ।
सर्व साहित्य करोनि प्रीतीं । लग्नतिथी नेमिली ॥५॥
कुंकुममंडित पत्रिका लेहुनी । श्रीनाथासि धाडिली पैठणीं ।
कीं नोवरा वरमाय वर्हाडी घेउनी । यावें स्वामींनीं सत्वर ॥६॥
यांसही अगोदर सूचना होती । सर्व साहित्यें केलीं आयतीं ।
मग आंधळीं पांगळीं दुबळीं असती । लग्नासि त्यांप्रती प्रार्थिलें ॥७॥
तयांसि देउनि नूतन वस्त्रें । प्रार्थूनि घेतले बरोबर ।
मंगळ वाद्यें होताति गजर । वर्हाड सत्वर चालिलें ॥८॥
शिबिकेंत नोवरा विठ्ठलमूर्ती ।गिरिजाबाई बैसली रथीं ।
अश्ववहनीं वरकड असती । यश वर्णितीं नाथाचें ॥९॥
बोल बोलती गांवींचे नारीनर । देवभक्ताचा जाहला पुत्र ।
आतां नोवरा होऊनि साचार । जातसे दूर लग्नासि ॥२१०॥
असो यापरी एकनाथ । स्वइच्छेनें क्रमीत पंथ ।
मार्गीचे लोक दर्शनासि येत । महिमा अद्भुत देखोनी ॥११॥
गृहस्थाच्या गांवाबाहेर । वर्हाड येऊनि उतरलें समग्र ।
तयासि कळतां समाचार । सामोरा सत्वर येत पुढें ॥१२॥
नगरवासी लोक समस्त । घेऊनि सत्वर भेटीस येत ।
श्रीनाथचरणीं भावार्थ । मस्तक ठेवित निजप्रीतीं ॥१३॥
उद्धवासहित सर्व लोकां । वर्हाडी भेटती एकमेकां ।
वस्त्रें भूषणें वरासि देखा । लेववितां हरिखा मानितसे ॥१४॥
उपाध्यासि वस्त्रें देऊनि प्रीतीं । मग पूजिली श्रीपांडुरंगमूर्ती ।
संभ्रमेसि मिरवत निश्चिती । जानवशाप्रती ते नेले ॥१५॥
देवक प्रतिष्ठा ब्राह्मण-भोजन । विठ्ठल-रुक्मिणींचें होतसे लग्न ।
अंतःपट धरोनि ब्राह्मण । सावधान म्हणताती ॥१६॥
ओं पुण्याह म्हणतां सत्वर । मंगळ वाद्यांचा लागला गजर ।
भक्त गर्जती जयजयकार । सोहळा थोर ते दिवसीं ॥१७॥
वरमायेचा मान पाहीं । तो सर्व घेतसे गिरिजाबायी ।
मग गृहस्थें माथा ठेवूनि पायीं । प्रार्थना कायी करितसे ॥१८॥
आपुलें मुखींचें कीर्तन । आतां धनवरी करावें श्रवण ।
श्रीनाथें गोष्ट केली मान्य । साहित्य संपूर्ण असे कीं ॥१९॥
टाळ विणा मृदंग घोष । नादब्रह्मचि आलें मुसे ।
कीर्तनीं वोळंगला प्रेमरस । वेधलें मानस श्रोतयांचें ॥२२०॥
सगुण चरित्रें निजप्रीतीनें । गावोनि लावीत अनुसंधान ।
वेळोवेळां नामस्मरण । निजप्रीतीनें करवित ॥२१॥
एक मास राहोनि निश्चिती । सकळासि लाविली विष्णुभक्ती ।
मग आज्ञा मागोनि गृहस्थाप्रती । स्वदेशा जाती सत्वर ॥२२॥
गृहस्थ होऊनि संतोष युक्त । वरासि आंदण दीधलें बहुत ।
वर्हाडियांसि वस्त्रें वांटित । खर्च बहुत तो केला ॥२३॥
यापरी चरित्र करोनि जाणा । श्रीनाथ आले प्रतिष्ठाना ।
क्षेत्रवासी देखोनि नयना । सद्भावें चरणा लागती ॥२४॥
रात्रि समय होतांचि निश्चिती । मिरवत नेला रुक्मिणीपती ।
तेथें दासानुदास महीपती । सद्गुणकीर्ती वर्णीतसे ॥२५॥
स्वस्ति श्रीभक्तलीलामृतग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।
प्रेमळ परिसोत भाविक भक्त । सप्तदशाध्याय रसाळ हा ॥२२६॥ अध्याय १७॥ओव्या॥२२६॥६॥