मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ६

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ।

मनुष्यदेह लाधतां पूर्ण । न ऐके जरी श्रीहरीचे गुण ।

जे संसारांत जाहले निमग्न । तरी पशु समान ते नर ॥१॥

आहार निद्रा मैथुन पाहीं । हे जीवासि प्राप्त सकळ देहीं ।

तेथेंचि रमतां मनुष्यांहीं । तरी सद्भक्‍ति कांहीं घडेना ॥२॥

दैवें नरदेह लाधला पाहीं । त्याचें सार्थक करावें सर्वांहीं ।

तीर्थयात्रा कराव्या कांहीं । अनुताप जीवीं धरोनियां ॥३॥

आर्ते अर्चावी विष्णुमूर्ती । देहें दंडवत घालावें प्रीतीं ।

नेत्रांनीं पहाव्या संतमूर्ती । श्रवणी सत्कीर्ती ऐकावी ॥४॥

सुखें करावा संसार । त्यांत घडो द्यावा परोपकार ।

तृषाक्रांतासि पाजावें नीर । आणि अन्न व्यवहार क्षुधितासी ॥५॥

प्राणांत वोडवल्याही जाण । असत्य न बोलावें वचन ।

जिव्हेसि सर्वदा नामस्मरण । श्रीरामकृष्ण गोविंद ॥६॥

या वेगळे माझीया जीवीं । आणिक साधन नावडे कांहीं ।

महीपति लागतसे पायीं । तरी उचित देयी पांडुरंगा ॥७॥

मागिले अध्यायीं कथा सुरस । चांगदेवासि जाहला उपदेश ।

मग आज्ञा मागोनि ज्ञानदेवास । वटेश्वरास पातले ॥८॥

मुक्‍ताबाईची आज्ञा शिरीं । कीं दुसरा देह सत्वर धरीं ।

श्रीपांडुरंगाची उपासना करी । तो आठव अंतरीं जडलासे ॥९॥

मग चांगदेवें येवोनि वटेश्वरीं । कर्पूरगौरासि नमस्कारी ।

पूजाकरोनि सर्वोपचारी । तेथोनि सत्वर निघतसे ॥१०॥

मग तपती तीराहूनि निघत । तोरण माळासि गेले त्वरीत ।

तेथें विष्णु अवतार साक्षात । श्रीगोरक्षनाथ असती ॥११॥

ज्याणी जगदुद्धार करावया लागीं । अवतार घेतला कलियुगीं ।

सर्व सामर्थ्य असोनि अंगीं । फिरे वीतरागी उदास ॥१२॥

आदेश करोनि ते अवसरीं । चांगदेव गोरक्षासि नमस्कारी ।

पूजा केली सर्वोपचारीं । निजप्रीति अंतरीं धरोनियां ॥१३॥

गोरक्ष गुरुची परंपरा । म्हणोनि पूजित त्या अवसरा ।

त्यांनींही आदर केला बरा । म्हणती पातले घरां सिद्धपुरुष ॥१४॥

ऐसा उल्हास धरुनि चित्तीं । चांगदेवाची मांडिली स्तुती ।

म्हणे तुमची देखोनि सप्रेम भक्ती । कैलासपती प्रगटला ॥१५॥

वाटीचा जाहला वटेश्वर । ही सत्कीर्ति कांनीं ऐकिली थोर ।

आणिकहि सिद्धीचा प्रकार । दाविला साचार मृत्युलोकीं ॥१६॥

ऐशापरी करोनि स्तुती । चांगदेवासी गोरक्ष म्हणती ।

काय अपेक्षा असे चित्तीं । ते मजप्रती सांगावी ॥१७॥

कवण्या कार्यालागी येथें । बिजें केलें असे त्वरित ।

तें मज सांगा यथास्थित । चित्तीं द्वैत न धरितां ॥१८॥

गोरक्षनाथें ऐसें पुसतां । चांगदेवें चरणीं ठेविला माथा ।

म्हणे विज्ञापना एक समर्था । सांगतों आतां ऐकावी ॥१९॥

मागें वटेश्वरी साचार । होता सिद्धाईचा भर ।

यात्रा दर्शनासि येतसे फार । कामनि संसार करती जे ॥२०॥

तेथें स्त्री पुरुष दोघे जण । पुत्रकामना मनीं धरुन ।

तीव्र मांडिलें अनुष्ठान । सर्वथा अन्न न सेविती ॥२१॥

त्यांचा निग्रह देखोनि फार । संतुष्ट जाहला वटेश्वर ।

मग मज सांगीतलें श्रीशंकरें । यांचें आर्त्त पुरतें करीं ॥२२॥

ऐसा दृष्टांत देखोनि स्वप्नीं । मग मी बोलिलों त्यांज लागोनी ।

काय इच्छा तुमचें मनीं । ते सत्वर ये क्षणीं सांगीजे ॥२३॥

आजि आज्ञा केली वृषभध्वजें । म्हणोनि संकट पडिलें मज ।

चित्तीं चिंता असेल सहज । तरी ते मज सांगावी ॥२४॥

कोणते स्थळीं तुमची वस्ती । काय व्यवसाय कोणती वृत्ती ।

इच्छितां संतति किंवा संपत्ती । हें मजप्रती सांगावें ॥२५॥

ऐसें ऐकोनि आमुचें उत्तर । मग बोलता झाला द्विजवर ।

म्हणे माझ भाव निरंतर । चरणावर स्वामीच्या ॥२६॥

बाळक अघटित घेतसे अळ । जननी पुरवी तयाचे लळे ।

तैसेचि तुम्ही संत कृपाळ । दीन दयाळ सर्वदा ॥२७॥

आम्हां उभयतांचा हेतु थोर । कीं तुम्हां ऐसा असावा पुत्र ।

मग कुळाचा सकळ उद्धार । होईल साचार तेणेंची ॥२८॥

ऐसी ग्लांती करोनियां फार । उभयतां करिती नमस्कार ।

मग मी प्रसन्न होऊनि सत्वर । दीधला वर त्यांलागीं ॥२९॥

साक्षात विष्णूचा अवतार । गोरक्षनाथ योगेश्वर ।

विचरत असती पृथ्वीवर । जगदुद्धार करावया ॥३०॥

कोणी एके अवसरीं । ते भिक्षेसि येतील तुमचे घरीं ।

पुंगी वाजवितां सत्वरीं । नादा भीतरी प्रगटेना ॥३१॥

तों पर्यंत सावध चित्तीं । कोणी विमुख दवडूं नये अतिथी ।

ऐसें सांगता त्यांजप्रती । ब्राह्मण विनंती करितसे ॥३२॥

म्हणे मज दीधलें अभयदान । त्याचा नियम असे कोण ।

बारा वर्षांनीं येईन लहान होऊन । म्हणून वचन त्यास दीधलें ॥३३॥

ऐसा घेऊनि आमुचा वर । मग घरासि गेला तो द्विजवर ।

तैं पासून निदिध्यास थोर । लागला साचार आमुचा ॥३४॥

नियम केला असे त्यासी । अकरा वर्षे लोटली ऐसी ।

षण्मास उरले अवधीसी । यास्तव स्वामीसी निवेदिलें ॥३५॥

श्रावणमास उत्तम पूर्ण । नागपंचमी बहुत सुदिन ।

स्वामीनीं अगत्य तेथें जाणें । मग प्रगटेन नादीं तेथें ॥३६॥

ऐसें ऐकोनि गोरक्षनाथें । अवश्य म्हणे चांगदेवातें ।

आम्ही येऊनि त्या ठायातें । त्याचे मनोरथ पूर्ण करुं ॥३७॥

ऐसें बोलिले योगेश्वर । तयांसि पुसोनि निघे सत्वर ।

मग पावोनि तापी तीर । श्रीवटेश्वर नमियेला ॥३८॥

मग तेथूनि षण्मासपर्यंत । चांगदेवें देह केला गुप्त ।

योगेश्वराची अघटित स्थित । लीला दाखवित जनातें ॥३९॥

नगरापासूनि समीप देख । नारायण डोहो क्षेत्र एक ।

तेथील मुधोपंत गृहस्थ देख । ग्राम लेखक वृत्ति असे ॥४०॥

यजुर्वेद शाखा निश्चित । ब्राह्मण सुशील असे बहुत ।

पंच महायज्ञ नित्य होत । अन्नदान देत भूतमात्रीं ॥४१॥

धर्मपत्‍नी पतिव्रता जाण । नामाभिधान असे रुक्मिण ।

चांगदेवाचें लागलें ध्यान । दोघा कारणे सर्वदा ॥४२॥

धंदा करितां दिवसनिशीं । जागृति स्वप्न सुषुप्तीसी ।

चांगदेव दिसे मानसीं । विसर दोघांसी पडेना ॥४३॥

म्हणती आम्हांसी दीधलें वचन । कीं तुमचा पुत्र मी होईन ।

तें कदापि असत्य नव्हेचि जाण । भरंवसा पूर्ण मानसीं ॥४४॥

नियम केला जो आम्हांप्रती । ते सन्निध दिवस आले निश्चितीं ।

कान फडियाची वाट पाहती । म्हणती भिक्षेसी येती कधीं ॥४५॥

ऐसा लोटतां बहुतकाळ । तों नागपंचमी आली जवळ ।

म्हणवोनि जपती सर्वकाळ । तयाचें फळ पाहावया ॥४६॥

चार दिवस लोटतां त्यासीं । तों गोरक्ष पातले भिक्षेसी ।

अलख म्हणवोनि द्वारापासीं । साद अनायासीं घातला ॥४७॥

सुवर्णा ऐसी सुंदर कांती । त्यावरी चर्चिली शुभ्र विभूती ।

दिव्य मुद्रा कानीं तळपती । नयन शोभती आकर्ण ॥४८॥

ऐसें रुप देखोनियां नयनीं । गृह स्वामीण विस्मित मनीं ।

गृहांत जाऊनि ते क्षणीं । भिक्षा आणोनी घालितसे ॥४९॥

तों पूर्वील आठव झाला सत्वर । जो चांगदेवें दीधला वर ।

मग शुद्ध करोनि अंतर । केला नमस्कार गोरक्षा ॥५०॥

मग संतुष्ट होऊनि योगेश्वर । म्हणे तुझा मनोरथ तत्काळ पुरे ।

मग पुंगी घेऊनि आपुल्या करें । नाद सत्वर फुंकिला ॥५१॥

नादब्रह्म मंजुळ ध्वनी । रखुमाई ऐके प्रीती करोनी ।

तों नवल वर्तलें तये क्षणीं । तें सादर श्रवणीं ऐकिजे ॥५२॥

नादासरीसां बाळक । अंगणीं प्रगट जाहला देख ।

बत्तीस लक्षणी सुलक्षणिक । वाटे कौतुक देखतां ॥५३॥

क्षण एक पातली विदेह स्थिती । तों अदृश्य झाले गोरक्षनाथ ।

मुधोपंत बाहेरुन येत । कळला वृत्तांत तयासी ॥५४॥

रखुमाई सांगे त्याज लागुनी । एक अतीत आला होता अंगणीं ।

पुंगी नाद ऐकिला श्रवणीं । तों बाळक नयनीं देखिले ॥५५॥

मागील आठव झाला सत्वर । म्हणती प्रसन्न झाला वटेश्वर ।

चांगदेवें आपणासि दीधला वर । मी होईन पुत्र तुमचा ॥५६॥

तें आज सत्य केलें आपुलें वचन । बाळक घेई उचलोन ।

रखुमाई वोसंगा घेतां जाण । समाधान वाटलें ॥५७॥

आनंद उत्साह मांडिला घरीं । मंगळ वाद्यें वाजती गजरीं ।

सुंठोडे वांटिती घरोघरीं । नवल अंतरीं लोक करिती ॥५८॥

बाळक न्हाणोनिया जाणा । आडवा घेतला असतां तान्हा ।

तों रखुमाई स्तनीं दाटला पान्हा । अद्भुत रचना ईश्वराची ॥५९॥

बाळक सुंदर सभाग्य लक्षण । पाहतांचि डोळ्या होय पारणें ।

पुन्हा अवतरला मरुद्गण । ऐसेंचि जन बोलती ॥६०॥

गणक बोलावूनि ज्योतिषी । जातक पाहिलें तिये दिवसीं ।

दानें वाटिलीं याचकांसी । उल्हास मानसीं धरोनियां ॥६१॥

नगरवासी घरोघर । आनंद उत्सव करितीं थोर ।

म्हणती आमुचें गांवीं साचार । योगेश्वर अवतरला ॥६२॥

बारावे दिवसीं करोनि बारसें । पाळण्यांत घातलें निज पुत्रास ।

चांगदेव नाम ठेविलें त्यास । घुगर्‍या सर्वांस वांटिल्या ॥६३॥

चांगा वटेश्वरीं अनुष्ठान । करितां लाधले पुत्र ।

चालूं बोलूं शिके सत्वर । स्वरुपीं सुंदर गुणनिधी ॥६५॥

पांचवे वर्षी व्रतबंध केला । गायत्री मंत्र अनुग्रह जाहला ।

मुधोपंतासि आनंद वाटला । उत्साह केला चार दिवस ॥६६॥

भोजन दक्षिणा देऊनि फार । तृप्त केले वैदिक द्विजवर ।

मुलाची प्रज्ञा बहुत थोर । वेदाक्षर पढविती ॥६७॥

सांगतां कुळगुरुसि नलगती कष्ट । अवतार लीला योगभ्रष्ट ।

चार वेदही केले पाठ । शास्त्रें यथेष्ट घोकिलीं ॥६८॥

काव्य व्याकरणीं झाला निपुण । देखूनि आश्चर्य करिती जन ।

थोरथोर विद्वान ब्राह्मण । दर्शना लागोन ते येती ॥६९॥

म्हणती आमुची फेडावया भ्रांती । साक्षात अवतरला प्रजापती ।

मुखोद्गत केल्या सकळ श्रुती । झाला भागवतीं प्रवीण ॥७०॥

एक म्हणती द्वैपायनें । पुन्हा अवतार घेतला जाण ।

ऐसे थोरथोर पंडित येऊन । करिती स्तवन चांगयाचें ॥७१॥

जाणोनिया अवतार मूर्ती । मोहरा होन पुढें ठेविती ।

एक वस्त्रें अळंकार लेवविती । आनंद चित्तीं मायबापां ॥७२॥

मुधोपंतें वटेश्वराकारणें । बांधिलें असे सेवा करुन ।

तें फेडीत असे पुत्रपणें । संपत्तिवान तो झाला ॥७३॥

चौदा विद्या आणि कळा समस्त । पहिलाचि अभ्यास अवगत ।

एकदा अवलोकितां समस्त । मुखोद्गत ते जाहले ॥७४॥

ऐसा देखोनि सद्गुण । अमर्याद आणूनि देती धन ।

चांगयाचा बहुत सन्मान । म्हणती कन्यादान यासि करा ॥७५॥

सुवर्ण मुद्रा सहस्त्र जाणा । देऊनि गृहस्थ वरदक्षिणा ।

लग्न तिथि नेमितां जाणां । परम उल्हास मना वाटला ॥७६॥

देवक प्रतिष्ठा ब्राह्मण भोजन । केलें निर्विघ्नाचें पूजन ।

अंतरपाट धरोनियां जाण । बोलती ब्राह्मण अष्टकें ॥७७॥

ओंपुण्याह म्हणती सत्वर । लागले वाद्यांचे गजर ।

यथाविधीनें सोहळा फार । दिवस चार जाहला ॥७८॥

वधूवरें घेऊनि त्या अवसरा । मुधोपंत पातले घरां ।

बहुत आंदण दीधलें वरा । देखोनी अंतरीं उल्हास ॥७९॥

पूर्वजन्मीं सुकृत केलें थोर । पोटासीं आला योगेश्वर ।

त्याच्या योगें साचार । संपदा फार पातली ॥८०॥

त्रिकाळ स्नान संध्या निश्चित । यथाविधि नित्य करीत ।

घरीं स्मार्ताग्नि सिद्ध होता । अतिथी पूजित प्रीतीने ॥८१॥

घरीं घातले अन्नसत्र । सिद्धि राबती सर्वत्र ।

उणें न पडेचि अणुमात्र । नसे परतंत्र एकही ॥८२॥

चौवीस वर्षे पर्यंत । गृहस्थाश्रम यथास्थित ।

चांगदेव वडिलांची सेवा करित । सौख्य अद्भुत देखिलें त्यांनीं ॥८३॥

आणिक पुत्र पोटासि येती । माय बापांची छळणा करिती ।

थोर वाढतां वेगळे राहती । ऐकोनि वचनोक्‍ती कांतेची ॥८४॥

जंतु पडतो पोटांतून । कुपुत्र तेही त्यासमान ।

न घडतां वडिलांचे सेवन । ते सूकराहून नीच प्राणी ॥८५॥

पहातां पुंडलीक द्विजवर । पितृभक्तिसि जाहला तत्पर ।

त्याच्या पुण्याचा नकळे पार । हें नारदें सत्वर जाणीतलें ॥८६॥

मग दृष्टीस पाहोनि त्याची स्थिति । ब्रह्मसुत संतोषला चित्तीं ।

द्वारकेसि जाऊनि सत्वरगतीं । श्रीकृष्णाप्रती सांगितलें ॥८७॥

म्हणे रुक्मिणीकांता देवाधिदेवा । पुंडलीक करितो पितृसेवा ।

त्याचें दर्शन घेशील जेव्हां । तरी विश्रांति जीवा मग होय ॥८८॥

ऐसें ऐकूनि श्रीहरी । पातले पुंडलिकाचे द्वारीं ।

पाय जोडूनि विटेवरी । निरंतरी राहिले ॥८९॥

माय बापांची करितां सेवा । त्याचा उपकार न फिटेचि देवा ।

भुलोनि त्याच्या भक्तीभावा । द्वारीं बरवा तिष्ठतसे ॥९०॥

ठाण साजिरें सुकुमार । जघनीं ठेविलें दोन्ही कर ।

भाविक भक्त येती फार । दर्शन साचार दे तयां ॥९१॥

जयासि व्हावी भगवत्प्राप्ती । त्याणें करावी पितृभक्ती ।

त्याच्या पुण्यें करुनि निश्चितीं । भुक्तिमुक्ति प्राप्त तया ॥९२॥

स्नानसंध्या यज्ञहवन । जपतप तीर्थाटण ।

वेदशास्त्रें आणि पुराणें । पितृभक्तिवीण व्यर्थची ॥९३॥

ऐसें जाणोनि साचार । चांगदेव महा योगेश्वरें ।

वडिलांसि सौख्य दीधलें फार । आज्ञा अणुमात्र नुलंधी ॥९४॥

चोवीस वर्षें लोटतां सकळ । मुधोपंतासि आला अंतकाळ ।

सत्पुत्र चांगदेव असतां जवा । प्रायश्चित्त तत्काळ दीधलें ॥९५॥

देह सांडूनि तये क्षणीं । पिता चालिला वैकुंठ भुवनीं ।

रखुमाई उदास होऊनि मनीं । सहगमनीं निघाली ॥९६॥

उत्तर कार्य यथास्थित । झालीयावरी श्राद्ध करित ।

मग महायात्रेसि जाऊनि त्वरित । जाहले सुस्नात अनुतापें ॥९७॥

बहुत द्रव्य खर्चोनि तेणें । केलें पितयाचें गयावर्जन ।

होऊनि वडिलांचे उत्तीर्ण । आले परतोन स्वस्थानासी ॥९८॥

मग नारायण डोहासि येऊनि । चांगदेव प्रवेशले आपुलें सदनीं ।

वडिलांचें द्रव्य देखोनि नयनीं । तें ब्राह्मणा लागोनि वांटिलें ॥९९॥

सर्वस्वें उदार होऊन । मग पितृव्यासि दीधलें गांवींचें वतन ।

पूर्वानुसंधान स्मरोन । सावधपणें विचारी ॥१००॥

म्हणे मुक्ताबाई माय । तिनें आज्ञा दीधली आहे ।

कीं पंढरीस जाऊन लवलाहें । पाहावे पाय विठोबाचे ॥१॥

संतांचें माहेरघर पंढरी । भूवैकुंठ महीवरी ।

तेथें पुंडलीकाचें द्वारीं । उभा हरी राहीला ॥२॥

दर्शनमात्रें साचार । करित जडजीवांचा उद्धार ।

खळांसि तेथें सुटती पाझर । प्रेमभरें करोनियां ॥३॥

ऐसा हेतं धरोनि अंतरा । चांगदेव चालिले पंढरपुरा ।

परम उल्हास होय अंतरा । म्हणे रुक्मिणीवरां भेटावें ॥४॥

दिंडया पताका बरोबर । आणिक यात्रा मिळाली फार ।

मृदंग विणे वाजती सुस्वर । नादें अंबर दुमदुमिलें ॥५॥

चांगदेव सप्रेम गजरीं । कीर्तन करीत ते अवसरीं ।

सत्वर पावले क्षेत्रपंढरी । नामघोष गजरीं डुल्लती ॥६॥

जयजयकारें पिटोनी टाळी । आनंदली भक्त मंडळी ।

मार्ग क्रमितां तये वेळीं । पातले जवळी पंढरीच्या ॥७॥

दुरुन क्षेत्र दृष्टीस पाहत । तों चमत्कार देखिला अति अद्भुत ।

सकळांचा अभिमान झाला गलित । घालिती दंडवत एकमेकां ॥८॥

वर्णाभिमान कुळाभिमान । टाकूनि अहंता मीतूंपण ।

सकळ यातीसि लोटांगण । घालिती ब्राह्मण निजप्रेमें ॥९॥

हें चांगदेव देखोनि नयनीं । परम आश्चर्य करितसे मनीं ।

मग आपण महंती टाकोनि । लोटांगणी जातसे ॥१०॥

संत महंत वैष्णव वीर । तयांसि घालिती नमस्कार ।

मग भेटोनियां परस्पर । मार्ग सत्वर क्रमिती ॥११॥

कीर्तन करीतसे ते अवसरीं । मग पावले क्षेत्रपंढरी ।

स्नान करोनि भीमातीरीं । नित्य नेम सारी तेधवां ॥१२॥

घेऊनि पुंडलीकांचें दर्शन । षोडशोपचारें केलें पूजन ।

मग क्षेत्र प्रदक्षिणा करुन । दर्शना लागून चालिले ॥१३॥

दंडप्राय दंडवत । महाद्वारीं देवासि घालित ।

नेत्रीं आले अश्रुपात । प्रेम भरीत तेधवां ॥१४॥

म्हणे जन्मा आलियाचें सार्थक थोर । हे दृष्टीसीं देखिलें पंढरपूर ।

आजि त्रिताप समस्त झाले दूर । स्वानंद निर्भर मी झालों ॥१५॥

ऐसा आनंद मानूनि चित्तीं । मग नमितसे गरुड मारुती ।

तेव्हां सभामंडपीं सत्वर गतीं । दंडवत प्रीतीं घातलें ॥१६॥

अंतर गाभारा पाहतां जाण । तों परब्रह्मरुप दिसे सगुण ।

विटेवरी जोडिले समचरण । सुकुमार ठाण साजिरें ॥१७॥

कांसेसि दिव्य पितांबर । जघनीं ठेविले दोन्ही कर ।

श्रीमुख दिसतसे मनोहर । पाहतांचि विरे देहभान ॥१८॥

सर्वांगीं बुका उधळला । गळा कोमळ तुळसीच्या माळा ।

चांगदेव देखोनि ते वेळां । मग मिठी गळां घातली ॥१९॥

परमानंद धरोनि चित्तीं । मग चांगदेवें मांडिली स्तुती ।

जय देवाधिदेवा रुक्मिणीपती । व्यापक त्रिजगतीं तूं एक ॥२०॥

चैतन्य स्वरुप पंढरीराया । अवतरलासि भवाब्धि तारावया ।

दर्शनमात्रें करोनियां । निरसिसी माया भक्‍तांची ॥२१॥

तुझी होतांचि कृपादृष्टी । मग तुटे भवबंध फांसाटी ।

बैसोनि भक्‍ताच्या हृदयसंपुटीं । गुजगोष्टी बोलसी त्या ॥२२॥

नाम मात्रें करोनि जाण । महादोषांसि करी दहन ।

जे तुझ्या भजनीं विनटले पूर्ण । योग निर्विघ्न होय त्यांचा ॥२३॥

तुझा दासानुदास चांगया । शरण आला पंढरीराया ।

आतां कृपादृष्टी विलोकूनियां । प्रपंचमाया निरसावी ॥२४॥

ऐसें स्तवन करोनि फार । नेत्रीं चालिली अश्रुधारा ।

मग चांगदेव सप्रेम गजर । चरणावर लोटला ॥२५॥

देवाचें रुप आणोनि ध्यानीं । तेंचि सांठविलें हृदयभुवनीं ।

मग सत्यभामा राईरुक्मिणी । तयालागोनी भेटती ॥२६॥

तेव्हां महाद्वारासि येऊनि सत्वर । कीर्तनीं मांडिला सप्रेम गजर ।

भक्‍त गर्जती जयजयकार । नादें अंबरं कोंदलें ॥२७॥

कृष्णा विष्णु हरी गोविंदा । अच्युता अनंता मुकुंदा ।

परमपुरुषा सच्चिदानंदा । आनंदकंदा श्रीविठ्ठला ॥२८॥

भक्‍तवत्सला राजीवनयना । पीतांबरधारी जगज्जीवना ।

विधिजनका दानवमर्दना । भक्‍तभूषणा जगद्गुरु ॥२९॥

जड मूढ तारावया शेवटीं । आलासि पुंदलीकाचें भेटीं ।

करद्वय ठेवूनियां कटीं । भीमा तटीं उभा अससी ॥१३०॥

नानापातकी चोरी जार । ब्रह्मद्वेषी जीवहत्याकर ।

दर्शन मात्रेंचि साचार । करिसी उद्धार तयांचा ॥३१॥

ऐसी कीर्तनीं करुनि स्तुती । मग गायिली मंगळ आरती ।

वोवाळूनि श्रीरुक्मिणीपती । दंडवत घालिती साष्टांग ॥३२॥

ऐसा उत्साह थोर झाला । पौर्णिमेस पाहिला गोपाळकाला ।

चांगदेवासि आनंद वाटला । अद्भुत सोहळा देखोनि ॥३३॥

फुटतां यात्रेचा समुदाय । मग चांगदेव करिती काय ।

तीर्थमूर्ती भिंवरेंत आहे । ते कोणासि न ये प्रत्यया ॥३४॥

जो दीनदयाळ कैवल्यदानी । तो दृष्टीसीं साक्षात्‌ पाहावा नयनीं ।

ऐसीं इच्छा धरुनि मनीं । मग अनुष्ठानीं बैसले ॥३५॥

तीन दिवसपर्यंत जाण । एकाग्र करोनि बैसले मन ।

न घे फळ मूळ अथवा जीवन । तीर्थमूर्तीचें घ्यान करीतसे ॥३६॥

तंव श्रोते आशंकित होऊनि चित्तीं । वक्तयालागीं प्रश्न करिती ।

म्हणसी चंद्रभागेंत दुसरी मूर्तीं । कैंशा रीती तें सांगा ॥३७॥

तरी येचि विषयीं ऐका सुरस । पांडुरंग महात्म्यीं कथा असे ।

स्वमुखें बोलिला श्रीव्यास । तीर्थरुप पंढरीस जगदात्मा ॥३८॥

मूर्तिमंत साक्षात् विटेवर । क्षेत्ररुप तेची वैष्णव वीर ।

तीर्थस्वरुपें चंद्रभागा तीर । तेथें गुप्त श्रीधर असे कीं ॥३९॥

दिव्यदेही पुंडलीक मुनी । तया सन्निध चक्रपाणी ।

साक्षात आहेत ते ठिकाणीं । वाहतसे वरुनी भीमरथी ॥१४०॥

तें दिव्य स्वरुप पाहावया नयनीं । चांगदेव बैसले अनुष्ठानीं ।

म्हणे देवाधिदेवा कैवल्यदानी । दर्शना लागोनी भुकेलों ॥४१॥

तीन दिवसपर्यंत साचार । अनुष्ठान करिती योगेश्वर ।

देखोनि तयाचें अंतर । करुणाकर प्रगटले ॥४२॥

चांगयाची एकविधा भक्ती । हृदयीं बिंबली पांडुरंगमूर्ती ।

जैसे ध्यान वर्णिलें भक्‍तीं । योगियांसि विश्रांती ते ठायीं ॥४३॥

समचरणी विटेवर । कटीं ठेविले दोन्ही कर ।

श्रीमुख अंति सुंदर मनोहर । पाहातांचि विरे देहभान ॥४४॥

किरीट कुंडलें वैजयंती । कासेंसि पीतांबराची दीप्ती ।

श्रीवत्सकौस्तुभ विराजती । मकराकृती कुंडलें ॥४५॥

ऐसें रुप प्रगटोनि श्रीहरी । चांगयासि म्हणे ते अवसरीं ।

आतां सावध होऊनि निजअंतरीं । नेत्रद्वारें मज पाहें ॥४६॥

चांगदेव विस्मित अंतरीं । म्हणे मी एकटा भीमातीरीं ।

झाली असे कीं मध्यरात्रीं । वदे वैखरी कोण येथें ॥४७॥

मग नेत्र उघडोनी पाहातां देख । तों अद्भुत देखिलें कौतुक ।

जें ध्यान इच्छिती ब्रह्मादिक । कवि अनेक वर्णिती ॥४८॥

असंभाव्य फांकली प्रभदीप्ती । जैसे उगवले कोटि गभस्ती ।

ऐसी सुकुमार साजिरी मूर्ती । देखोनि विश्रांती पावला ॥४९॥

श्रीविष्णुमूर्ति देखोनि नयनीं । चित्त वेधलें तये क्षणीं ।

साष्टांग नमस्कारीतसे धरणीं । प्रेम मनीं न समाये ॥१५०॥

म्हणे देवा त्राहित्राही । कृपादृष्टीनें मज पाहीं ।

भवाब्धी पासूनि लवलाही । सोडी माय मजलागीं ॥५१॥

ऐसें म्हणोनियां देख । सद्भावें चरणीं ठेविला मस्तक ।

म्हणे दीनोद्धारक तूं वैकुंठ नायक । विश्वतारक जगद्गुरु ॥५२॥

मी तरी लडिवाळ देखा तुमचें । शरणागत म्हणवितों साचें ।

सार्थक होईल या देहाचें । तें वैभव कृपेचें मज देई ॥५३॥

ऐशारीतीं भाकोनि ग्लांती । मग सप्रेमभावें मांडिली स्तुती ।

जय जयाजी आत्ममूर्ती । व्यापक त्रिजगतीं तूं एक ॥५४॥

जयजयाजी पयोब्धीवासा । जयजयाजी वैकुंठधीशा ।

जयजयाजी भक्‍तपरेशा । अद्वैतवेषा पांडुरंगा ॥५५॥

जय मत्स्यरुपा शंखासुरमर्दना । जय कूर्मरुपा समुद्रमंथना ।

जय वराहवेषा दानवमर्दना । विश्वभूषणा विश्वपती ॥५६॥

जय प्रल्हादरक्षका नरहरी । तूं त्रिविक्रम रुपा बळीचे द्वारीं ।

जय परशुधरा क्षत्रियसंहारी । झालासि कैवारी ब्राह्मणांचा ॥५७॥

जय विबुध कैवारी रावणांतका । जय नंद नंदना कंसच्छेदका ।

जय भक्‍तरक्षकां पांडवसखा । धर्मस्थापका श्रीकृष्णा ॥५८॥

जय बौद्ध अवतारा जगज्जीवना । जय कल्पिरुपा म्लेंच्छमर्दना ।

दावूनि बहुत अवतार रचना । करिसी स्थापना धर्माची ॥५९॥

जय पुंडलीक वरदा रुक्मिणीपती । अनंत अपार तुझी कीर्ती ।

म्यां निजमुखें तुझी करावी स्तुती । तरी कुंठित मती शास्त्रांच्या ॥१६०॥

मी सेवाहीन भक्तीहीन । ज्ञानहीन वैराग्यहीन ।

परी शरणागत म्हणवितों दीन । कृपेचें पोषण तुमच्या ॥६१॥

ऐकूनि चांगदेवाची स्तुती । प्रसन्न जाहला रुक्मिणीपती ।

म्हणे कांहीं इच्छा असेल चित्तीं । ते सत्वरगतीं मज सांग ॥६२॥

तुझे मनींचे मनोरथ । ते मी पुरवितो जाण निश्चित ।

सांडून सर्व कल्पनाद्वैत । वदे त्वरित ये समयीं ॥६३॥

ऐसें वदतां करुणामूर्ती । चांगदेव संतोष पावले चित्तीं ।

म्हणे अनुग्रह करावा मजप्रती । जीवा विश्रांती होय जेणें ॥६४॥

जो कानीं पडतांचि मंत्र । भुक्ति मुक्ति लाधती सत्वर ।

मजही घडेल परोपकार । ऐसा वर मागतसे ॥६५॥

ऐसी ऐकूनियां मात । काय करिती पंढरीनाथ ।

चांगयाचा धरोनि हात । मग जळांत प्रवेशले ॥६६॥

बुडी देतांचि तयेक्षणीं । तो अद्भुत चोज देखिलें नयनीं ।

कांचनाचा मंडप ते ठिकाणीं । रत्‍न कोंदणीं विराजित ॥६७॥

जें कां न दिसे मानवी लोका । भूमीमाजी गुप्त असे देखा ।

चांगया वैष्णव प्रेमळ निका । दाखवीत भक्तसखा त्यालागीं ॥६८॥

तेथें पुंडलीक ऋषीश्वर । दिव्य देही असे साचार ।

देवाधिदेव रुक्मिणीवर । तया समोर तिष्ठतसे ॥६९॥

तये ठायीं अनुपम जाणा । असे वैकुंठीची रचना ।

तेथें प्राकृत मतीनें शाहाणा । करुं वल्गना कोठवरी ॥१७०॥

चांगदेवाचें भाग्य विशेष । म्हणूनि नेला त्या स्थळास ।

कृपा करोनि जगन्निवास । देती उपदेश त्यालागीं ॥७१॥

जो सनकादिकांच्या मस्तकावरी । अभयकर ठेविला शिरीं ।

षडक्षरी मंत्र सत्वरी । देतसे श्रीहरी त्याजला ॥७२॥

नाममंत्र अमृत संजीवनी । चांगयासि सांगे चक्रपाणी ।

जे साक्षात्कारासि येऊनी । प्रेतवत प्राणी जिवंत ॥७३॥

इतुकें सांगोनि रुक्मिणीपती । चांगयासि आश्वासिती निजप्रीती ।

म्हणें अभय माझें तुजप्रती । आनंद चित्तीं असो दे ॥७४॥

ऐसें म्हणोनि वत्सलें । मागुती घातलें माया जाळ ।

चांगया उघडोनि पाहात डोळे । तों पूर्ववत सकळ क्षेत्र दिसे ॥७५॥

योगमायेचें आवरण । स्वयें घालतांचि जगज्जीवन ।

चांगया निघे जाळांतून । मग आश्चर्य मन करितसे ॥७६॥

म्हणे कृपा करोनि रुक्मिणीवर । मज भेटले साक्षात्कार ।

षडक्षरी दीधला मंत्र । आठवितांचि स्मरें अंतरी ॥७७॥

परम उल्हास जाहला चित्तीं । म्हणे माझ्या भाग्यचि नाहीं मिती ।

मग क्षेत्रां जाऊनि त्वरित गतीं । पांडूरंगमूर्ती पूजितसे ॥७८॥

षोडशोपचार करुनि पूजन । वोवाळिला रुक्मिणीरमण ।

साष्टांग करोनियां नमन । हृदयीं ध्यान सांठवी ॥७९॥

म्हणे विठाबाई करुणाकर । आतां गांवासि जातों सत्वर ।

लोभ असों दे मजवर । नेत्रीं नीर वाहतसे ॥१८०॥

देवासि पुसोनि ते अवसरीं । सव्यं घातली सर्व पंढरी ।

मग पुंडलीकासि पुसोनि सत्वरी । सहपरिवारीं चालिले ॥८१॥

मार्ग क्रमितां साचार । चित्तीं आठवे पंढरपुर ।

परतोनि पाहे वारंवार । सप्रेम पाझर लोचनीं ॥८२॥

विठ्ठल नाम गातसे गीतीं । कीर्तनीं सांगतसे सत्कीर्ती ।

बहुतां जनांसि लाविलें भक्तीं । सत्संगती दुर्लभ ॥८३॥

जयांसि देवाची प्राप्ति व्हावी । ऐसी चाड असेल जीवीं ।

तिहीं सत्संगती धरावी । उपाय कांहीं आज नसे ॥८४॥

असो चांगयाचे संगतीनें । भक्‍तीस लागले बहुत जन ।

गाती ऐकती श्रीहरीचे गुण । निज प्रीतीनें आपुल्या ॥८५॥

ऐशा रीतीं वैष्णव वीर । नारायण डोहासी येत सत्वर ।

ग्रामवासी लोक समोर । येऊनी नमस्कार घालती ॥८६॥

चांगयासि भेटोनि सकळ लोक । चित्तीं पावले सप्रेमसुख ।

टाळ विणे मृदंग अनेक । लावूनि सकळिक गाताती ॥८७॥

दिंडया पताका नानारीती । मंगळ वाद्यें पुढें वाजती ।

नाना परिमळ बुका उधळिती । पुष्पहार घालिती गळ्यांत ॥८८॥

ऐशा रीतीं आनंद गजरीं । चांगदेव प्रवेशे निजमंदिरीं ।

मग पंचारती घेऊनि करीं । भावें श्रीहरी वोवाळिला ॥८९॥

दंडवत घालूनियां प्रीती । प्रसाद दीधला सकळांप्रतीं ।

धन्य आजिचा सुदिन म्हणती । लोक बोलती परस्परें ॥१९०॥

पुढले अध्यायीं रस अद्भुत । वदविता श्रीरुक्मीणीकांत ।

महीपतीसि देऊनि अभय हस्त । स्वयें यथार्थ आपण वदे ॥९१॥

स्वस्ति श्रीभक्तिलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भक्त । षष्ठाध्याय रसाळ हा ॥१९२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP