श्रीगणेशाय नमः ।
आजि अनंत जन्मींचें दैव साचें । उदयासि आलें श्रोतयांचें ।
म्हणोनि उद्गार येती वाचे । चरित्र संतांचें वर्णावया ॥१॥
प्रजेच्या भाग्यें करोनि निश्चिती । अंबुधर अपार वर्षे क्षिती ।
विबुधांच्या दैवयोग रीतीं । रत्नें निघती सागरांत ॥२॥
की राजहंसाचें थोर कपाळ । यास्तव निपजती मुक्ताफळें ।
कीं सुंदरासि व्हावया अलंकार तत्काळ । निपजे सोज्जळ कांचन ॥३॥
कीं प्रकाशमान व्हावया क्षिती । नभमंडळीं प्रगटे गभस्ती ।
कीं शोभयमान दिसावया राती । रोहिणीपती अवतरला ॥४॥
नातरी सगुण मूर्तीचें व्हावया पूजन । विधींनें निर्मिली दिव्य सुमनें ।
तैसीं संतचरित्रें जाहलीं निर्माण । श्रवणासि भूषणें श्रोत्यांच्या ॥५॥
श्रवण झालिया मनन होय । पुढें निदिध्यास लागता हे ।
मग साधकासि साक्षात्कार होय । अनुभवें प्रत्यय पाहावा ॥६॥
मागिलें अध्यायीं कथा निश्चित । पक्षियां खादलें शेत ।
कौतुक केलें पंढरीनाथें । पीक अद्भुत आलें कीं ॥७॥
ते तुकयानें धान्य टाकूनि सकळ । भजन करी सर्वकाळ ।
सांडूनि प्रपंच तळमळ । करि निश्चळ हरिभजन ॥८॥
घरीं कांता हळहळ करीत । म्हणे आलें धान्य न घेचि सत्य ।
संसार घातला पाण्यांत । खतेंही समस्त बुडविलीं ॥९॥
लोक म्हणती पीक आलें । घरीं तों उपवासी मरती मुलें ।
दैवें दीधलें कर्मे नेलें । तैसेंचि झालें आम्हांसी ॥१०॥
असो कांता ऐशापरी । नित्य हळहळ करीतसे घरीं ।
तुका आनंदयुक्त अंतरीं । विचार करीत तेधवां ॥११॥
पांडुरंगाचें देवालय जाण । भंगले होतें पुरातन ।
तें नीट करावें उकलोन । होईल जागरण हरिकथा ॥१२॥
श्रवण झालिया होय मनन । मननपाठीं निदिध्यासन ।
मग साक्षात्कारासि येऊनि आपण । होय विज्ञान साधका ॥१३॥
ऐसा संकल्प करोनि मनीं । देवालय उकलिलें तये क्षणीं ।
आपुल्या हातीं कुदळीं घेउनी । चिखलपाणी करीतसे ॥१४॥
एकला एकटा करील काय । कैसें होईल देवालय ।
ऐसें जाणूनि पंढरीराय । होतसे साह्य कवणें रीतीं ॥१५॥
महादाजी पंतासि दाखविलें स्वप्न । धान्य ठेविलें त्वां सांठवून ।
तें देवालयाच्या कामासि लावणें । अवंचकपणें सर्वथा ॥१६॥
तेचि आज्ञा वंदोनि शिरीं । मग ग्रामस्थांसी विचार करी ।
म्यां स्वप्न देखिलें ऐशापरी। समाचार सत्वरी घेऊ आतां ॥१७॥
आश्चर्य करोनि आपुलें चित्तीं । देवालयासि पाहावया येती ।
तों तुका उकरीतसे भिंती । कुदळी हातीं घेऊनियां ॥१८॥
म्हणती दृष्टांत जाहला साच । आतां साह्य करावें याचें ।
मग मजूर माणसें ठेविलीं पांच । कारेगर त्याचे आणविले ॥१९॥
विटी दुदांडया घेऊनि विकत । विष्णु आलियासि काम लावित ।
देऊळ सिद्ध जाहलें त्वरित । धान्य समस्त वेचलें ॥२०॥
पुढें उद्यापन राहिलें पाहीं । ब्राह्मण भोजनासि धान्य नाहीं ।
यासि उपाय करावा कायी । तुका देहीं चिंतातुर ॥२१॥
ऐसें जाणूनी रुक्मिणीपती । कौतुक केलें कैशा रीतीं ।
महादाजीपंतासि एकांतीं । दृष्टांत रात्रीं दाखविला ॥२२॥
म्हणे तुम्ही ग्रामवासी समस्त । पंच महापातकी दिसत ।
कैसी केली पंचाईत । न्याय ध्यानांत न आणितां ॥२३॥
शेतकरीयासी पीक भरुन । तुकयापासूनि देवविलें जाण ।
आणि राखणावळीचा आदमण । तो का ठेवोन घेतला ॥२४॥
आतां तरी सावधपणें । तयासि चावडीये बोलावणें ।
वाढीसुद्धां धान्य घेणें । तरीच कल्याण सर्वांसी ॥२५॥
ऐसा दृष्टांत होतांचि पाहे । महादाजीपंत विस्मित होय ।
सकाळी चावडीस जाऊनि पाहे । स्वप्न लवलाहें सांगितले ॥२६॥
ग्रामस्थ आश्चर्य करिती थोर । म्हणती यथार्थचि पडिलें अंतर ।
वेहरण आलें आम्हांवर । रुक्मिणीवर क्षोभविला ॥२७॥
मग त्या कुणब्यासि बोलावून । ग्रामस्थ बोलती अवघे जण ।
पीक घेतलें त्वां भरोन । दाणे आदमण ठेविले कां ॥२८॥
मग तो बोले तयांप्रती। म्यां दृष्टांत देखिला रातीं ।
नेदींच तरी पांडुरंगमूर्ती । क्षोभेल मजप्रती निश्चित ॥२९॥
वाढीसुद्धां धान्य ते अवसरीं । त्याणें आणूनि दीधलें सत्वरी ।
आणिकही साहित्य जाहलें बहुतापरी । चमत्कार भारी देखोनियां ॥३०॥
कोणी कणीक कोणी तांदुळ । कोणी घृत कोणी गूळ ।
कोणी शाखा आणि डाळ । साहित्य सकळ हें झालें ॥३१॥
सुदिन पाहोनि एके दिनीं । मूर्ति स्थापिली सिंहासनीं ।
मंत्रोक्त पंचामृतें करोनि । चक्रपाणी न्हाणिला ॥३२॥
ब्राह्मण वैदिक स्वहस्तें देख । देवासि करिती अभिषेक ।
वस्त्रें लेववोनियां सुरेख । उपचार अनेक ते केले ॥३३॥
गंधाक्षता सुमनमाळा । तुळसी बुका त्यावरी शोभला ।
धूपदीप नैवेद्य अर्पिला । नमस्कार घातला साष्टांग ॥३४॥
प्रेम भरित होऊनि साचें । तुका सभामंडपीं नाचे ।
अद्भुत प्रेम त्या समयींचें । नये वाचे वर्णितां ॥३५॥
ऐशा रीतीं उपचार जाणा । देवासि केल्या प्रदक्षिणा ।
मग ब्राह्मण बैसले भोजना । विडे दक्षिणा त्यासि दिलीं ॥३६॥
देऊळ उद्यापन ऐशा रीतीं । होतां तुकयासि संतोष चित्तीं ।
नित्य पूजितो सगुण-मूर्ती । आवडी चित्तीं नित्य नवी ॥३७॥
निजांगें करावें कीर्तन । ऐसी इच्छा धरिली मनें ।
संत बोलिले पुरातन । त्यांचीं वचनें पाठ केली ॥३८॥
पहिला अभ्यास कांहीं नव्हता । आवडी आतां उपजली चित्तां ।
प्राकृत अभंग शतकोटि कर्ता । नामदेव वार्ता बोलिले कीं ॥३९॥
त्या नामयाचे अबंग निश्चित । पाठ करोनि गात नाचत ।
हरिदिनीसी उपास करित । संतां समवेत जागरण ॥४०॥
द्वादशी साधूनि करी पारणें । यथाशक्ति ब्राह्मणांसि देत अन्न ।
दिंडी पताका मिरवणें । वैष्णव चिन्हें बाणलीं ॥४१॥
आणिक संतांचे पाहिले ग्रंथ । कबीर भक्त यवन विख्यात ।
तयांचीं जीं वचनामृतें । तीं पाठ करित प्रीतीनें ॥४२॥
आणिक अध्यात्म ग्रंथ थोर । स्वमुखें वदले ज्ञानेश्वर ।
त्यांचीं शुद्ध प्रती साचार । वैष्णव वीरें मिळविली ॥४३॥
श्री विष्णु अवतार एकनाथ देखा । त्यांणीं भागवतावरी केली टिका ।
त्याचा प्रयत्न करोनि निका । ग्रंथ नेटका मिळविला ॥४४॥
त्या ग्रंथांचें करावया मनन । एकांत स्थळ योजिलें कोण ।
रमणीय भांडार पर्वत जाण । ते स्थळीं जाऊन बैसतसे ॥४५॥
ग्रंथांचें पारायण करोनि । अर्थ अन्वय ध्यानासि आणी ।
पूर्वाभ्यासी जो शिरोमणी । कैवल्यदानीं साह्य जया ॥४६॥
ग्रंथ व्हावया पाठांतर । तुकयासि श्रम न लागती फार ।
मनन करितां अहोरात्र । मुखीं अक्षरें बैसती ॥४७॥
प्रासादिक एकनाथाचीं वचनें । जें कां भावार्थ रामायण ।
त्याचेंही पाठांतर पूर्ण । निजप्रीतीनें करितसे ॥४८॥
श्री भागवतीच्या कथा सुरस । स्वमुखें वदले महापुरुष ।
त्याही पाहिल्या सायासें । लीला विशेष श्रीहरीची ॥४९॥
योगवसिष्ठ अमृतानुभव पूर्ण । श्रीज्ञानेश्वर बोलिले वचन ।
त्याही ग्रंथाचें करोनि मनन । अर्थ शोधून ठेविला ॥५०॥
आणिक पुराणें ऐकती फार । परी मनन करिती साचार ।
तेणेंचि त्यांचा पडे विसर । संसार घोर वागविती ॥५१॥
चित्त शुद्धि नसली जाणा । आणि एकांतीं बैसला देवार्चना ।
तरी पुढें आठवे मनकामना । ते रानोराना हिंडवी ॥५२॥
तैसी तुकयाची नव्हे बुध्दी । आधीं करोनि चित्त शुद्धी ।
मग जाऊनि एकांत संधी । अर्थ शोधी ग्रंथाचा ॥५३॥
भांडार पर्वतीं बैसे जाऊन । परी तेथें सर्वथा नसे जीवन ।
हेंही जाहलें असे निर्माण । निमित्त कारण तें ऐका ॥५४॥
तुकयाची कांता होती कठीण । ऐसें बोलती सर्वत्र जन ।
परी तिचें स्वामीकाजीं मन । त्याजविण अन्न न सेवी ॥५५॥
भाकर पाणी घेऊनि नित्य । पर्वतावरी नेऊनि देत ।
दीड योजन वेरझार नित्य । करितां बहुत निर्बुजली ॥५६॥
पंच प्राण भ्रतारापासी । परी विरोध चालवी देवासी ।
दर्शना न जाय देउळासी । म्हणे काळा दृष्टींसी न पडावा ॥५७॥
म्हणे आमुचा पूर्वज विश्वंभर । त्यानेंच आणिला दावेदार ।
कुळीं संबंध लागला थोर । माझा भ्रतार वेडा केला ॥५८॥
मुलें लेंकुरें कुटुंब फार । यांसि मिळेना अन्न वस्त्र ।
मजवरी टाकूनि संसार । पर्वतावर बैसला ॥५९॥
चार घटिका लोटतां रात । हाळूच येतो देउळांत ।
काळ्या पुढें नृत्य करीत । आगड धुत मेळवूनियां ॥६०॥
प्रातःकाळीं करोनि स्नान । त्या मेल्याचें करितो पूजन ।
कोणते जन्मीं घेतलें ऋण । तेंचि उसनें फेडितो ॥६१॥
जवळ गावांत राहतां जरी । वोली कोरडीं देतें भाकरी ।
वेरझारा करुं कितीतरी । हें निर्धारीं उमजेना ॥६२॥
ऐसी तुकयाची कांता । आपुल्या घरीं करीतसे चिंता ।
मग करुणा आली पंढरीनाथा । अनाथनाथा विठोबासी ॥६३॥
म्हणे तुका जावोनि बैसे डोंगरीं । हे मज गांजिती नानापरी ।
आतां इची वेरझार होईल दूरी । तें चरित्र निर्धारीं दाखवूं ॥६४॥
ऐसें म्हणवोनि चक्रपाणी । कौतुक केलें तये दिनीं ।
एक भाकर भोंपळाभर पाणी । अवली घेऊनी जात होती ॥६५॥
उष्ण तीव्र जाहलें थोर । दिवस आला दोन प्रहर ।
तों कौतुक केलें सारंगधरें । तें ऐका सादर भाविक हो ॥६६॥
पंथ क्रमितां साचार । अवलीची दृष्टीं डोंगरावर ।
म्हणे आतां कितीक उरलें दूर । उष्ण तीव्र लागतसे ॥६७॥
पायी पायतन नसेचि पाहीं । खडे रुतती ते समयीं ।
तेणें कासावीस होतसे जीवीं । तो विघ्न आणिकही ओडवले ॥६८॥
करवंदीचा कांटा थोर । मध्येंच होता वाटेवर ।
पाय पडतांचि तयावर । फुटोनि साचार वर आला ॥६९॥
तेणें कासावीस होवोनि मनीं । मूर्छा येऊनि पडली धरणीं ।
भोंपळाभर होतें पाणी । तें उलंडोनी सांडलें ॥७०॥
नेत्र उघडोनि पाहातसे पाय । तों त्यांतूनि रुधिर वाहत आहे ।
म्हणे म्यां आतां करावें काय । म्हणोनि धाय मोकलित ॥७१॥
जन्मांतरीचें होते वैर । तेंचि साधिलें साचार ।
पाठीं बैसला दावेदार । जाहलीं मरमर संसारी ॥७२॥
माझ्या कंठीं बांधूनि मणी । फुकटची झाला असे धनी ।
दूर बैसतो जाऊनी । एकांत स्थानीं पर्वतीं ॥७३॥
ऐशा रीतीं करुनि रुदन । कांटा पाहातसे उपटोन ।
परी तो सर्वथा न निघेची जाण । म्हणे उपाय कोण करुं आतां ॥७४॥
माझ्या प्राक्तनाची विचित्र गती । विधिनें लिहिलें संचिती ।
तें न चुकेचि कल्पांतीं । म्हणोनि विपत्ती भोगीतसे ॥७५॥
बहुत खर्चोनियां धन । पितयानें केलें थोर लग्न ।
पिशाचे पदरीं बांधिले जाण । शेवटीं प्राक्तन निवडलें ॥७६॥
आणि कोणेरी बंधूनें सहज । महायात्रेसी नेलें मज ।
तें पुण्य उभे न ठाके आज । गेली लाज संसारी ॥७७॥
बहुत द्रव्य खर्चोनि जाण । माझीही तुळा केली त्याणें ।
तेथें पोटभरी न मिळेची अन्न । गेलें पुण्य ते वायां ॥७८॥
ऐशा रीतीं ते राणीं । अवली शोक करीतसे मनीं ।
परी देवा म्हणवोनि न बोले वदनीं । म्हणे वैरी धांवोनि येईल तो ॥७९॥
माझा द्वंद्वी रुक्मिणीवर । त्यासि न कळो हा समाचार ।
येथें अकस्मात आला जर । तरी हांसेल साचार मजलागीं ॥८०॥
म्हणे शिव्या देत रात्रंदिवस । म्हणवोनि कांटा मोडला असे ।
मग संतोष वाटेल तयास । तरीन हो ऐसें ये काळी ॥८१॥
विषम काळें घेतली धांव । तें दुःख सोसि जे आपुल्या जीवें ।
परी वैरिवासि तें न सांगावें । तरीच जन्मावें संसारीं ॥८२॥
जीवीं विषय वाटे गोमटा । परी निंदा करिती लोक चोहटा ।
तरी मायबापांचिया पोटा । व्यर्थ करंटा तो आला ॥८३॥
वर्म सांपडलें वैरिया हातीं । तयासि न यावें काकुळती ।
प्राणांत वोढवल्या निश्चिती । शरण त्या प्रती न जावें ॥८४॥
ऐसा निश्चय करोनि मनें । अवली हळूच करी रुदन ।
कांटा न निवेचि प्रयत्नें । उपाय कोण करावा ॥८५॥
हें जाणोनि वैकुंठविहारी । म्हणे तुका बैसला उपवासी डोंगरीं ।
इची तों ऐशी जाहली परी । यास्तव श्रीहरी पावला ॥८६॥
सांवळा सुकुमार राजीवनयन । दिव्य पीतांबर नेसला जाण ।
मुगुटीं झळकती नाना रत्नें । भास्करासि उणें आणिती ॥८७॥
दिव्य कुंडलें कानीं तळपती। गळा कौस्तुभ वैजयंती ।
पायीं नेपुरें वांक्या वाजती । दृष्टीं अवचितीं देखिला ॥८८॥
अवली म्हणतसे ते वेळा । हा कां येथें पातला मेला ।
भ्रतार माझा वेडा केला । संसारीं अवकळा याचेनी ॥८९॥
माझी अवस्था विपरीत । देखोनि हांसें येईल यातें ।
म्हणवोनि मुखचंद्र पश्चिमेस । केला त्वरित ते समयीं ॥९०॥
तों लीलानाटकी जगदीश । तिकडेही तैसाचि सन्मुख दिसे ।
अष्टदिशा भोंवतें चुकवीतसे । परी न्यून नसे कोठेंही ॥९१॥
तों श्रोते आशंकित होऊनि चित्तीं । वक्त्यालागीं प्रश्न करिती ।
अवलीची नसतां सप्रेम भक्ती । द्वेषें निंदिती सर्वदा ॥९२॥
ऐसें असतां तिजकारणें । देव कां देतो बळेंच दर्शन ।
हाचि संशय वाटतो पूर्ण । तरी तो निरसन करीं कां ॥९३॥
ऐसा सज्जनीं प्रश्न करितां । उल्हासें उत्तर देतसे वक्ता ।
द्वेषें करुनि देव भेटला बहुतां । हें तो वार्ता पुराणीं ॥९४॥
भक्तिभावें पाहतां साचार । ध्यानासि नयेचि रामचंद्र ।
द्वेष भावें लंका नगर । रावणासि सर्वत्र राम भासे ॥९५॥
तैसाचि कंस द्वेष करी । म्हणे कृष्ण केवळ माझा वैरी ।
याच्या दृष्टीपासूनि दुरी । न होय श्रीहरी सर्वथा ॥९६॥
तैसीच तुकयाची कांता । म्हणे दृष्टीसि काळा न पाहे आतां ।
म्हणोनि आयास न करितां । तिच्या भोंवता फिरतसे ॥९७॥
जैसीं भिंगाचिया सदनीं । विष्णुमूर्ति स्थापिली कोणी ।
जिकडे पाहे तिकडे नयनीं । चक्रपाणी दिसतसे ॥९८॥
हाही दृष्टांत न सरेचि येथ । अवलीचें कंटाळलें चित ।
मग नेत्र झांकोनि निवांत राहात । तों आंतही दिसे जगदात्मा ॥९९॥
म्हणे कांहीं इच्छा न धरितां पोटीं । वैरी कां उगाच पडतो दृष्टीं ।
कशास्तव घेतली माझी पाठी । यास्तव पोटीं जल्पतसे ॥१००॥
ऐसी देखोनि तिची स्थिती । काय म्हणतसे वैकुंठपतीं ।
जेणें आम्हांसि लावीली प्रीती । तेचि युक्ति करुं आतां ॥१॥
मग प्रगट होऊनि पंढरीनाथ । अवलीस निजकरें आश्वासित ।
म्हणे कन्या माझी तूं निश्चित । चित्तीं द्वैत न धरावें ॥२॥
तूं मज म्हणसीं दावेदार । तरी म्यां कोणते साधिलें वैर ।
विदेही केला माझा भ्रतार । हे व्यर्थचि उत्तर बोलसी ॥३॥
मुळींच फळ देठीं सुटलें । मग वारा लागतां खालीं पडलें ।
तेवी तुकयाचें निमित्त भलें । तैसें आले मजवरी ॥४॥
नामरुपी लावूनि चित्त । जाऊनि बैसती अरण्यांत ।
तुजचि ऐसें जाहलें मातें । हिंडततें नित्य त्या मागें ॥५॥
तुम्हांसि खावया नाहीं अन्न । यास्तव पीक आणिलें सधन ।
परी तुका सर्वथ न घेचि धान्य । अन्याय यात कोण माझा ॥६॥
ऐसें म्हणोनि पंढरीरायें । मांडीवर घेतला तिचा पाय ।
कांटा काढोनि टाकिला पाहे । दुःख नोहे अणुमात्र ॥७॥
कृपादृष्टीं पाहतांचि देव । मागीला क्लेश विसरली सर्व ।
तो माया लाघवी देवाधिदेव । न कळे भाव ब्रह्मांदिकां ॥८॥
अवली म्हणत ते अवसरी । मजला उशीर लागला भारी ।
पिसा बैसला असे डोंगरीं । जावें सत्वरी त्या ठायीं ॥९॥
ऐसें बोलोनियां उत्तर । कुरकुली घातली डोईवर ।
जिजाई चालिलीं सत्वर । सारंगधर तिज मागें ॥१०॥
पर्वतीं येतांचि लवलाहें । तुका नेत्र उघडोनि पाहे ।
परमचित्तीं विस्मित होय । म्हणे अपूर्व आहे हे गोष्टीं ॥११॥
आणि रजनी आणि गभस्ती । एके ठायी धरिली वस्ती ।
कीं समुद्र आणि आगस्ती । ऐक्यसि येती नवल हें ॥१२॥
पंडित आणि अजापाळक । सख्यपणें जाहले एक ।
विष अमृत मिळाले देख । हेंचि कौतुक वाटतें ॥१३॥
कां ससाणा आणि राजहंस पाहीं । सख्यत्त्वे मिळाले एकेठायीं ।
तेवीं अवली सहित शेषशायी । हेचि नवाई अगाध ॥१४॥
ऐसें म्हणवोनि वैष्णव । वीर चित्तीं संतोष मानिला थोर ।
म्हणे उभयताचें होते वैर तें । झालें दूर ये समयीं ॥१५॥
घरकलह वाईट जाणा । विक्षेप वाटे क्षण क्षणा ।
अवलीस भेटे वैकुंठराणा । तरी आमुचा मना संतोष ॥१६॥
ऐशा रीती भक्त प्रेमळ । हर्षे वोसंडे तये वेळ ।
तों अवली आणि घननीळ । आली जवळ उभयतां ॥१७॥
तुका उठोनि लवलाहें । श्रीहरीचे धरिले पाय ।
मग अष्टमायें धरुनि पाहे । सद्गदित होय तेधवां ॥१८॥
तुका अवली जगज्जीवन । स्वस्थ बैसलीं तिघेजण ।
मग प्रेमळ भक्त कांतेसि म्हणे । विठोबासि भोजन घालीं कां ॥१९॥
ऐसि ऐकतांची मात । अवली लज्जीत चित्तांत ।
म्हणे एक भाकर आहे आंत । कैसी दोघांतें पुरेल हे ॥१२०॥
मनांत परम होतसे कष्टी । म्हणे येथेंही काळ्यानें घेतली पाठी ।
धष्टपुष्ट दिसतो माझें दृष्टी । कैसी गोष्टीं करुं आतां ॥२१॥
ऐसें मनांत बोलोनि उत्तर । देवाच्या पात्रीं वाढिली भाकर ।
वंचिलें नाहीं अणुमात्र । मग सारंगधर तुष्टला ॥२२॥
अवंचक भक्ति देखोनि हरी । अन्नें निर्मिली नानापरी ।
कुरकुलें भरोनि आलेंवरी । वस्त्र त्यावरी झांकिलें ॥२३॥
मागें क्षुधित होतां श्रीकृष्ण । मग द्रौपदीनें दीधलें भाजीपान ।
कांहींच वंचिलें नसतां जाण । मग निर्मिलीं अन्नें नानापरी ॥२४॥
तैसा अवलीचा भक्तिभाव नाहीं । परी विरोधेंचि तुष्टले शेषशायी ।
मग अवलीसी म्हणे ते समयीं । तुकयासि लवलाहीं वाढीं कां ॥२५॥
ऐसें बोलत रुक्मिणीकांत । जिजाई लज्जित मनांत ।
वस्त्र काढोनि जंव पाहत । तों भरलीं तयांत पक्वानें ॥२६॥
परम विस्मित जाहली मनीं । म्हणे मज पावली कुळस्वामिणी ।
भैरव खंडेराव कीं भवानी । त्याही येऊनि रक्षिलें ॥२७॥
कोणाचें कर्तृत्व हे नेणावे जाण । ज्याणें रक्षिला माझा मान ।
तयासि मी सर्वभावें शरण । जीवें प्राणें असें कीं ॥२८॥
जाणोनि अवलीचें मनोगत । काय बोलत रुक्मिणीकांत ।
तूं जयासि शरण निश्चित । तोचि मी अनंत नोळखसी ॥२९॥
अन्नें निर्मिलीं देखत देखत । हें माझेंचि कर्तृत्व जाण सत्य ।
ऐसें सांगतां वैकुंठनाथ । परी असत्य वाटत तिजलागीं ॥३०॥
म्हणे इतुकें सामर्थ्य असतें तयां । तरी विदुराच्या कण्या खाता कासया ।
द्रौपदीस हात वोडवोनियां । देंठ लवलाह्या भक्षीतसे ॥३१॥
बहुत वराडियाचें लक्षण । कीर्तनीं लोक ऐकती गाणें ।
भिल्लनीचीं खाय उच्छिष्ट बोरें जाण । चित्तीं अनमान न करितां ॥३२॥
इतुकें सामर्थ्य असतें यया । तरी महाराचें घर निघता कासया ।
चोख्याचीं ढोरें वोढोनियां । तयासि खावया मागतसे ॥३३॥
ऐशा कल्पना नानारीती । अवली आणितसे चित्तीं ।
अन्न घेउनि आपुल्या हातीं । दोघांप्रती वाढिलें ॥३४॥
जेव्हां कांटा मोडला पायीं । भोंपळा लवंडला तये ठायीं ।
पर्वतावरी जीवन पाही । जवळ नाहीं सर्वथा ॥३५॥
अवलीस संकट जाहलें फार । म्हणे कैसा करावा विचार ।
जाणूनि तिचें निज अंतर । सारंगधर काय म्हणे ॥३६॥
पैलते खोंगळी माजीं साचा । जिव्हाळा दिसतसे पाणियाचा ।
तेथें झरा लागेल उदकाचा । सत्य त्रिवाचा हे माझी ॥३७॥
अवलीस सत्य वाटेचि मात । मग चीप उचलोनि पाहे हातें ।
तों निर्मळ झरा आंतूनि येत । आश्चर्य वाटत तिजलागीं ॥३८॥
म्हणे निर्जळ वनीं लाविलें पाणी । हे तों अघटित याची करणी ।
अन्नें निर्मिता ये ठिकाणीं । याजवीण कोणीं असेना ॥३९॥
नाना साबरी मंत्र शिकोन । कपटविद्येंत जाहला निपुण ।
माझ्या भ्रतारासि घालोनि मोहन । वेडा करोन बैसविला ॥१४०॥
ऐशा कल्पना आणूनि फार । भोंपळा भरोनि घेतलें नीर ।
आपुल्या हातें वाढीत पात्रें । मग रुक्मिणीवर जेवितसे ॥४१॥
विबुध बैसोनि विमानांत । कौतुक पहावयासि आले तेथ ।
म्हणती धन्य भक्तमहिमा अद्भुत । पुष्पें वर्षत ते वेळीं ॥४२॥
तुकयासि म्हणे जगज्जीवन । माझा प्रसाद जेवी प्रीतीनें ।
कांहीं उद्वेग न करीं मनें । मी सिद्धी नेईन योग तुझा ॥४३॥
ऐसें म्हणवोनि भगवंतें । ग्रास घालीत आपुल्या हातें ।
अवली सहित जेविले तेथें । न धरीत द्वैत जगदात्मा ॥४४॥
तो ब्रह्मरस सेवितां प्रीतीं । तुकयासि जाहली सुखप्राप्ती ।
मग करशुद्धि देऊनि प्रीतीं । बोले श्रीपती काय तेव्हां ॥४५॥
म्हणे रे तुकया ऐक वचन । मी जनीं जनार्दन भरलों जाण ।
चराचर मद्रुप पाहणें । जैसें सुवर्ण अलंकारीं ॥४६॥
कीं पट पाहतां विचारुन । तरी काय त्यांत तंतुवाचोन ।
तेवीं विश्व नाहीं मजवीण । अनुभवें करुन तूं पाहे ॥४७॥
तरी आजपासोनि या पर्वतीं । नित्य न यावें एकांतीं ।
अवलीसि कष्ट बहु होती । ऐक वचनोक्ती हे माझी ॥४८॥
ऐसें सांगतां दीनदयाळ । तुका तत्काळ चरणीं लोळे ।
म्हणे मी तुमचा लडिवाळ । यास्तव कळवळ करितसां ॥४९॥
नेणें जपतप शास्त्र पठण । नेणें अष्टांग योगसाधन ।
न कळे अध्यात्म ब्रह्मज्ञान । पतित संपूर्ण सर्वांगीं ॥१५०॥
तुम्ही दीनबंधु अनाथनाथ । हे बिरुदावळी जगविख्यात ।
कीर्तनीं गाती प्रेमळभक्त । ते केली सत्य पांडुरंगा ॥५१॥
ऐकोनि तुकयाचें सप्रेम वचन । राहे म्हणतसे करुणाघन ।
माता बाळकाचें करि रक्षण । हा स्वाभाविक गुण तिचा कीं ॥५२॥
तेंवीं तूं माझें निपटणें । वृद्धपणींचें आहेसि तान्हे ।
ऐसेम बोलोनि मधुसूदनें । दीधलें आलिंगन तुकयासी ॥५३॥
आपुल्या हृदयींची सुखविश्रांती । ज्ञानियांसि न सांगतां गुप्त होती ।
ते तुकयासि देतसे श्रीपती । सप्रेम भक्ती देखोनियां ॥५४॥
तये अवस्थे माजी देख । देवभक्त जाहले एक ।
कोण कोणासि नाहीं आर्तिक । मग वैकुंठनायक उमजले ॥५५॥
म्हणे तुका मिळाला ऐक्यासनीं । द्वैतभावासि घातलें पाणी ।
जैसें दुग्धांत मिळे धारवणी । तें न दिसे परतोनी सर्वथा ॥५६॥
शरीरांत सुरवाडला प्राण । कीं आकाशीं संचला पव्न ।
कीं सुवर्ण कळिकेंत मकरंद पूर्ण । राहे लपोन ज्या रीतीं ॥५७॥
घंटेमाजी लोपला नाद । कीं शर्करेमाजी जैसा स्वाद ।
तैसा तुकया जाहलिया अभेद । मग सप्रेम बोध खुंटला ॥५८॥
आश्चर्य कांहीं वाटलें पोटीं । ते कोणासीं बोलूं गुजगोष्टी ।
कोणासि आलिंगूनि धरुं कंठीं । म्हणोनि जगजेठी चिंतावला ॥५९॥
तुका ऐक्यासि आला जाण । तरी माझा धांवा करील कोण ।
मग मी कोणाचें करुं धावणें । वर्णील कोण गुण माझे ॥१६०॥
ऐसें जाणुनि दीनदयाळ । तुकयासि म्हणे तये वेळ ।
तूं कीर्तनीं नाचतोसि जे वेळ । तेथें मी घननीळ तिष्ठतसे ॥६१॥
ऐसें बोलतसे भक्त सखा । नेत्र उघडोनि पाहे तुका ।
प्रश्नांचें मीस करोनि देखा । देवभक्ति सुखा प्रतिपादी ॥६२॥
ऐसीं देवभक्तांचीं उत्तरें । विमानीं बैसूनि ऐकसी सुर ।
म्हणती तुका वैष्णववीर । करी उद्धार बहुतांचा ॥६३॥
इंद्रपद घेऊं निश्चिती । आम्हीं ठकलों बहुतारीतीं ।
प्रेमसुख लुटोनि भक्तीं । केला श्रीपती स्वाधीन ॥६४॥
धन्य धन्य हा मृत्युलोक । याचा महीमा दिसतो अधिक ।
येथेंचि सामग्री असतां देख । स्वर्गपदीं सुख भोगिती ॥६५॥
धन्य धन्य हा भांडार पर्वतजाण । यासि पांडुरंगाचे लागले चरण ।
धन्य देहू पुण्यक्षेत्र पूर्ण । जेथें वैष्णवजन अवतरला ॥६६॥
धन्य पंचक्रोशी साचार । धन्य हे पाषाण मृतिकासार ।
या स्थळीं हिंडला इंदिरावर । महिमा अपार न वदवे ॥६७॥
वासवें करोनि ऐशी स्तुति । स्वर्गासि तेव्हां विबुध जाती ।
मग तुकयासि पुसोनि निजप्रीतीं । अंतर्धान श्रीपती पावले ॥६८॥
मजला ऐसें भासतसें जाण । तुकयाचें हृदयकमळ पूर्ण ।
त्यांत श्रीहरी मिलिंद होऊन । निजप्रीतींनें राहिला ॥६९॥
कीं भक्तांचें हृदयसागर । त्यांत मत्स्य तळपे इंदिरावर ।
अहंभाव हाचि शंखासुर । निवटिला साचार निजहस्तें ॥१७०॥
प्रसादिक वाक्य निश्चिती । तुका बोलिला सप्रेम भक्ती ।
त्याच जाणाव्या निघाल्या श्रुती । अन्यथा मती हे नव्हे ॥७१॥
तेंचि विश्वासें गाति आदरें । हेच महर्षि जाणावे थोर ।
त्या वचनाचा धरोनि आधार । संप्रदाय थोर वाढविती ॥७२॥
असो तयाचा अपार महिमा । निरुपमासि नसेचि उपमा ।
अद्भुत घालोनि भक्तिप्रेम । पुरुषोत्तमा वश्य केलें ॥७३॥
कलियुगीं बौद्ध अवतार जाण । हें तों पुराणप्रसिद्ध वचन ।
परी तुकयाचा मनोरथ व्हावया पूर्ण । देव सगुण होतसे ॥७४॥
जैसें कामधेनूचें तान्हें जाण । सांज वेळ न होतां चोंखीं स्तन ।
ते पान्हा घालीत निजप्रीतीनें । काळ वेळ न म्हणे सर्वथा ॥७५॥
का कल्पतरुखालीं साचार । अघटित कामना धरिली थोर ।
तो न विचारतांचि जन्मांतर । मनोरथ साचार पुरवीतसे ॥७६॥
तैशाच रीतीं दिनदयाळ । अवतार घ्यावयाची नसतां वेळ ।
सगुणरुप धरोनि निर्मळ । भक्तासी तत्काळ भेटत ॥७७॥
असो हे दृष्टांत जाहले फार । उबग मानितील श्रोते चतुर ।
तुकयासि भेटोनि सारंगधर । वैकुंठपुर पावले ॥७८॥
मग अवलीच्या समागमें देखा । गांवांत आला वैष्णव तुका ।
पुढिले अध्यायीं रसाळ ऐका । वदवील सखा प्रेमळाचा ॥७९॥
प्रभंजनाच्या योगें करुन । डोले तृणाचे बुजावणें ।
परी लोकांसि भासतसे जाण । बैसला राखण शेतकरी ॥८०॥
तेंवीं ह्याच दृष्टीनें पाहतां सर्व । तयासि भासे कवीचें लाघव ।
सुज्ञान म्हणती तैसें नव्हें । पंढरीराव वदविता ॥८१॥
किंगरी वाजे नाना लीळा । ऐकूं येतसे लोकां सकळां ।
परी वाजविणारा असे वेगळा । सज्ञान त्याजला पाहती ॥८२॥
तैसा पांडुरंग मायालाघवी । तों भक्त चरित्रें स्वयें वदवी ।
महीपती हें निमित्त दावी । पोसणा कवी संतांचा ॥८३॥
स्वस्ति श्रीभक्तिलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।
प्रेमळ परिसोत भाविकभक्त । तिसावा अध्याय गोड हा ॥१८४॥ ॥अ० ३०॥