मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ३४

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ।

मी अनाथ निराश्रय संसारीं । अपंगही असें सर्वापरी ।

परी तुझा म्हणवितो श्रीहरी । अभिमान अंतरीं तुज असो ॥१॥

भक्तिहीन ज्ञानहीन । शक्तीहीन वैराग्य नेणें ।

ऐसा जड मी अज्ञान । कोण तुजविण अपंगिता ॥२॥

जैसें अमंगळ मोरींतील नीर । तें कूपामाजी संचरलें जर ।

तरी अडाचेंहीं नासेल साचार । त्यासि पवित्र न सेविती ॥३॥

ना तेंच अमंगळ पाणी । गंगेसि मिळे जये दिनीं ।

तरी पवित्र होय तेच क्षणीं । वंदिती मुनी सिद्धऋषी ॥४॥

तैसा सर्वाविषयीं पतित । आणि तुज भलत्या भावें शरण येत ।

तयासि अपंगी वैकुंठनाथ । गुणदोष किंचित न पाहतां ॥५॥

वेदीं निंदिलें अत्यंज याती । ते जरी सद्भावें तुज भजती ।

तरी तेही उंचासि वंद्य होती । नाम श्रीपती जपतां तुझें ॥६॥

ऐसा तूं पतितपावन खरा । जगद्गुरु होशील चराचरा ।

ऐसें जाणोनि निज अंतरा । रुक्मिणीवरा तुज शरण ॥७॥

आतां तूं आपुल्या निज उचितें । करीं घात अथवा हित ।

बिरुदावळी जगविख्यात । ते नव्हे असत्य सर्वथा ॥८॥

अनंत भक्त तारिले श्रीपती । पुराण प्रसिद्ध त्यांची कीर्ती ।

त्यांमाजी एक मी मूढमती । अपंगी महीपती आपुला ॥९॥

मागिले अध्यायीं कथा ऐसी । स्वप्नीं अनुग्रह तुकयासी ।

मग येऊनि जागृतीसी । आश्चर्य मानसी करितसे ॥१०॥

एके दिवसीं प्रेमळभक्त । जाऊनि बैसे अरण्यांत ।

म्हणे कर्कशेची पडली संगत । जाहली जनांत फजीती ॥११॥

गृहस्थाश्रम यास्तव राखावा । कीं अतीत अभ्यागतांची घडावी सेवा ।

हें तों नावडे तिच्या जीवा । चालवी दावा परमार्थी ॥१२॥

स्वप्नीं तेही मधुर वचन । सर्वथा न बोले मजकारणें ।

बरें देवें तोडिलें बंधन । न गुंतेचि मन कोठेंही ॥१३॥

ऐसें म्हणवोनि वैष्णव भक्त । भजन करीत प्रेमयुक्त ।

चार घटिका लोटतां रात । मग देउळी येत कीर्तनास ॥१४॥

नानापरीचे करुणारस । आळवोनि करीत कीर्तन घोष ।

श्रवणासि येती श्रोते बहुवस । प्रेमळ उदास भाविक जे ॥१५॥

चारी प्रहर करोनि कीर्तन । मग इंद्रायणीसी करीतसे स्नान ।

पांडुरंगाचें करोनि पूजन । अरण्यांत जाऊन बैसावें ॥१६॥

कोणी भाकर आणूनि देत । तरी स्वल्प आहार सेवितसे तेथ।

परी घरासि न जाय वैष्णवभक्त । कर्कशा संगत म्हणवोनि ॥१७॥

ऐसे दोन मास गेले लोटोनी । तुका सर्वथा न जाय सदनीं ।

कांता देतसे गार्‍हाणीं । शेजारिणी मेळवोनियां ॥१८॥

म्हणे पिसा गांवीं असोनि जाण । मजकडे न पाहे परतोन ।

माजी वाट केली कोण । त्याकारणें पुसावा ॥१९॥

भजन करीत बैसतो रानीं । खावयासि आणूनि देती कोणी ।

रात्रीं देउळासि येऊनी । टाळ कुटोनि नाचतसे ॥२०॥

तंव एके दिवसीं वैष्णवभक्त । स्नान करोनि देउळासि जात ।

अवली उदक घेऊनि येत । तों गांठ अवचित पडियेली ॥२१॥

मग धरोनि तुकयाचा पदर । उभा केला वाटेवर ।

मग काय बोले कठोणोत्तर । चावोनि अधर तेधवां ॥२२॥

तुकयासि म्हणे अवसरा । तूं दोन महिने न येसी घरां ।

तरी मी कोणासी होऊं दारा । या संसारा चालवूं ॥२३॥

यावरी बोलतसे काय । विठोबा रखुमाई बापमाय ।

यांचे पाय आठवीत जाय । तरी आपदा न होय संसारीं ॥२४॥

अवली म्हणतसे त्या अवसरा । तुम्हीं आतां चलावें घरां ।

येरु म्हणे ऐकसी विचारा । तरी भाक सत्वर मज देयी ॥२५॥

कांतेनें वचन देऊनि त्यासी । मग घरासि नेलें तुकयासी ।

द्वारीं वृंदावनीं होती तुळसीं । तया स्थळासी बैसले ॥२६॥

ते दिवसीं होती हरिदिनी । श्रवण करावयासि येती कोणी ।

अवली तयासि देखोनि नयनीं । वसवसोनी पाठिं लागे ॥२७॥

तुका म्हणतसे त्या अवसरा । कोण येत कोणाच्या घरा ।

भूषण नावडेचि तुझियां अंतरा । दांत करकरां कां खासी ॥२८॥

देवासाठी जाण साचार । ब्रह्मांड जाहलें आमुचें सोयरें ।

त्यांसी कोवळें बोलतां उत्तर । जातो पदर काय तुझा ॥२९॥

आपुला धंदा टाकू जाण । माझ्या घरासि येती जन ।

हेंचि मानूनि न घेसी भूषण । आणि वसवसोन धांवसीं ॥३०॥

ऐसें बोलतां वैष्णवभक्त । अवली राहिली मग निवांत ।

परी लोक न येती वाडियांत । भय बहुत वागविती ॥३१॥

तुका बैसोनि वृंदावनीं । कांतेसि म्हणे तये क्षणीं ।

आतां एकाग्र होऊनि मनीं । कीर्तन श्रवणीं बैसावें ॥३२॥

अवली म्हणे नायकावें जरी । तरी वचन देऊनि आणिला घरीं ।

यास्तव बैसोनि शेजारी । श्रवण करी तेधवां ॥३३॥

एकांत देखोनि वैष्णवभक्त । निज कांतेसि उपदेश करित ।

म्हणे देहु क्षेत्र जाण येथें । धरिलें उक्ते पैं आम्हीं ॥३४॥

ऐशीं टक्के दिवाणधारा । देणें लागतो याचा सारा ।

नाहीं तरी काळोजी हुलदार । दाखवी दरारा बहुसाल ॥३५॥

ऐशीं टक्के म्हणसील काय । हा चित्तीं वाटेल संदेह ।

तरी ऐंशीं तत्त्वें करोनि देह । वेष्टित होय उभारा ॥३६॥

इंद्रियें दमितां दिवसरात । दहा टक्के झाडले यांत ।

पंचविषयांची नाही आर्त । संतोष चित्त सर्वदा ॥३७॥

आणिक कर्म इंद्रियें पांच म्हणती जनीं । ती हीं लाविलीं देवाकारणीं ।

मी कर्ता नाठवे मनीं । तरी गेलीं झडोनि सहजची ॥३८॥

दहा टक्के तों ऐशा रीतीं । झडोनि गेले सहजस्थिती ।

सत्तर तत्वें देहीं असती । त्यांची झडती न देववे ॥३९॥

पांडुरंग चौधरी जाण येथिंचा । म्हणे झाडा करीं सकळ बाकीचा ।

हंडा भांडीं गुरें साचा । ऐवज घरचा मागतसे ॥४०॥

म्यां पूर्वीच कुळवाडी केली नसती । तरी कां सांपडतों याचे हातीं ।

तरी तूं उदास होऊनि चित्तीं । सोडवी मजप्रती निजकांते ॥४१॥

उदयीक द्वादशी सोमवार । स्नान करोनि येई सत्वर ।

मग पाचारोनि द्विजवर । लुटवी घर त्यां हातीं ॥४२॥

अन्नवस्त्र यांची चिंता । मनांत नको करुं सर्वथा ।

पांडुरंग बाप शिरीं असतां । तो उणें तत्वतां पडों नेदि ॥४३॥

माझें ऐकशील जरी उत्तर । तरी जगीं कीर्ती वाढेल थोर ।

म्हणावें भांडी नेलीं चोरें । मेली गुरें चार्‍याविण ॥४४॥

आसनि रसोनियां जाण । वज्रा ऐसें करावें मन ।

लेंकुरें जाहलीं नाहींत म्हणोन । करी सोडवण आपुली ॥४५॥

बळक्ट घालोनियां कांस । सांडी नाशवंताची आस ।

देवद्विज अतीत यांस । पूजी मंदिरास आणोनि ॥४६॥

वैष्णवाची दासी होऊनि भावें । संतासि अनन्य शरण जावें ।

विठोबाचें नांव घ्यावें । प्रेमभावें करोनियां ॥४७॥

अकरा अभंग ऐशारीतीं । कांतेसि उपदेश केला प्रीतीं ।

पूर्ण बोध ग्रंथ त्यासि म्हणती । ऐकतां विरक्‍ती होय जीवा ॥४८॥

तीं तुकयाचीं अनुपम वचनें । साधकीं करितां नित्य पठण ।

भक्‍ति ज्ञान वैराग्यपूर्ण । होईल तेणें निश्चयेंसी ॥४९॥

तीं येथें संकळित बोलिलों उत्तरें । नाहीं वाढविला विस्तार ।

मग तुका करीत हरिजागर । नाना चरित्रें गावोनियां ॥५०॥

उदयासि येतांचि गभस्ती । मग उजळिली मंगळारती ।

कांतेसि क्षणभर बाणली विरक्ती । बैसतां संगतीं तुकयाच्या ॥५१॥

मग प्रातःकाळीं करोनि स्नान । जिजाबाई पाचारी ब्राह्मण ।

तेव्हां गुरें वासरें धनधान्य । भांडीं संपूर्ण लुटविलीं ॥५२॥

तों चुलींत राख होती निश्चिती । तेही संन्यासी घेऊनि जाती ।

म्हणती आंगासि लावुं विभूती । उदास वृत्ती बैसोनी ॥५३॥

कणगी उखळ मुसळ जातें । रितीं मडकींही नेली समस्तें ।

जीर्ण वस्त्र कांतेंसि होतें । तें वाळूं परसांत घातलें ॥५४॥

तों महारिणीच्या रुपें तत्त्वतां । तुकयासि म्हणे रुक्मिणी माता ।

कांहीं वस्त्र असेल आतां । तरी द्यावें समर्था मजलागीं ॥५५॥

तुका विचारी मनांत । म्हणे हे प्रहारीण विन्मुख जात ।

मग वाडया मागें होऊनि त्वरित । वस्त्र हातें वोढितसे ॥५६॥

महारिणीसि वस्त्र देऊनि जाण । खुणावोनि सांगे तिजकारणें ।

म्हणे सत्वर जाय वो येथून । कोणासी वचन न बोलतां ॥५७॥

हें गांविंचीं मुलें देखोनि नयनी । अवलीसि सांगती ते क्षणीं ।

म्हणती वस्त्र मागतां महारिणी । दीधलें वोढोनी तिजलागीं ॥५८॥

ऐकोनि तयांची वचनोक्ती । प्रपंचाकडे मुरडली वृत्ती ।

म्हणे घरासि समजावोनि आणितां पती । म्हणोनि विपत्ती हे झाली ॥५९॥

म्यां दळणकांड करोनि घरीं । संसार केला आजवरी ।

त्याचें तों बाहेर परभारी । भिकेवरी चालतें ॥६०॥

ऐशा प्रकारें चालतां योग । मज तों कोठें आठवला भोग ।

वचन देऊनि आणिता मग । सर्व त्याग करविला ॥६१॥

काळ्याचे पाय आठवीत जाय । तोचि अन्न वस्त्र पुरवील पाहे ।

त्याचा विश्वास धरुनि माय । घर लवलाहें लुटविलें ॥६२॥

एके रात्रींतूनि निश्चिती । दोन वेळां आठविले पाय चित्तीं ।

त्याची तों तत्काळ आली प्रतीती । होती संपत्ती ते गेली ॥६३॥

मग पाषाण घेऊनि मस्तकावर । अवली देवळासि चालिली सत्वर ।

म्हणे काळ्याचे पाय करीन चूर । केलासे निकर मानसीं ॥६४॥

ऐसा निश्चय करोनि चित्तीं । देउळासि चालिली सत्वरगती ।

तों थरथरां कांपे पाडुरंगमूर्ती । म्हणे कैसी गती करावी ॥६५॥

देउळा माजी येतां पाहे । तो रुक्मिणी म्हणे करितीस काय ।

येरी म्हणे फोडितें पाय । घातकी आहे वर तुझा ॥६६॥

माझ्या भ्रतारानें रातीं । उपदेश केला नानारीतीं ।

एकदा पाय आठविले चित्तीं । तो दरिद्र मजप्रती आलें कीं ॥६७॥

धनधान्य गुरें समग्र । तें घेऊनि गेले द्विजवर ।

एक आड जुनें होतें वस्त्र । वोढोनि सत्वर तें दिधलें ॥६८॥

वस्त्र अन्न नसेचि कांहीं । भ्रतार तो केला विदेही ।

यास्तव संताप वाटतो जीवीं । ऐकोनि रखुमायी बोलतसे ॥६९॥

योगक्षेमाची चिंता पाहीं । सर्वथा न करीं आपुले जीवीं ।

मग मूठभर होत ते समयीं । देत लवलाहीं आदिमाया ॥७०॥

आणि साडी चोळी एक पाहीं । स्वहस्तें देतसे रखुमायी ।

ती नसोनि लवलाही । बाहेर जिजायी येतसे ॥७१॥

तें तुकयानें देखोनि निश्चित । म्हणे उतावेळ केलें इनें चित्त ।

देवें होन दीधले होते । ते बोलावूनि द्विजाते वांटिले ॥७२॥

निराश होऊनि प्रेमळभक्त । भजन करीत प्रेमयुक्त ।

देशोदेशी प्रगटली कीर्त । दर्शनासि येत लोक तेव्हां ॥७३॥

चमत्कार देखोनि नानारीतीं । लोक परस्परें बोलती ।

कीं साक्षात येऊनि पांडुरंगमूर्ती । नित्य जेविती तुकयासवें ॥७४॥

हेंचि चवडी देवांसि जाहलें श्रुत । ऐकोनि विस्मित तयांचें चित्त ।

म्हणती तुकयासि पाचारोनि येथ । कांहों प्रचीत पाहावी ॥७५॥

मग चिंतामणि देवांनी ते समयीं । तुकयासि निरोप पाठविला पाहीं ।

कीं येथवर येऊनि ये समयीं । भेटूनि लवलाहीं मज जावें ॥७६॥

जाणोनि तयांचे मनोगत । चित्तीं विचारी प्रेमळभक्‍त ।

म्हणे देवांनी केला आपुला हेत । तरी जावें त्वरित भेटावया ॥७७॥

ऐसें म्हणवोनि ते अवसरीं । तेथूनि गमन केलें सत्वरी ।

तो मार्गी चालतां वाटेवरी । भजन करी निजप्रेमें ॥७८॥

अर्ध पंथ क्रमितां त्वरित । तो मनुष्य वाटेसि निरोप सांगत ।

कीं देवांनी तुमचा धरोनि हेत । भेटिसी निश्चित पाचारिलें ॥७९॥

अवश्य म्हणे वैष्णव भक्त । आमुचेंही हेंचि मनोगत ।

मग चिंचवडासी येऊनि त्वरित । गजवदनातें नमस्कारी ॥८०॥

चिंतामणी देव ते समयीं । स्नान संध्येसि बैसले पाही ।

परी तुकाराम पातले गृहीं । हे विदित नाही तयांसी ॥८१॥

देवगृही एकांती बैसोन । मानसपूजा करिती जाण ।

तों नावरेचि चंचळ मन । कैशा रीतीं ते ऐका ॥८२॥

उपवनामाजी देखा । लाविली होती पुष्प वाटिका ।

त्याचा आठव उपासका । जाहला निका ते समयीं ॥८३॥

म्हणे झाडांची आबाळ झाली बहूत । केरकचरा पडला आंत ।

तरी वनकरासी बोलावूनि येथ । शिक्षा निश्चित करावी ॥८४॥

ऐसी कल्पना येतांचि जाण । सवेंचि एकाग्र केलें मन ।

गजवदनाचें करोनि ध्यान । सर्वोपचारे पूजीतसे ॥८५॥

मानसपूजा करोनि त्वरित । चिंतामणि देव बाहेर येत ।

त्यासि देखोनि वैष्णवभक्त । घातलें दंडवत साष्टांग ॥८६॥

चित्तीं विकल्प वाटला देवा । म्हणे शूद्रासि नमस्कार न करावा ।

मग स्वमुखें म्हणे लाभ हा बरवा । आलेत केव्हां हें सांगा ॥८७॥

ऐकोनि म्हणे प्रेमळ भक्‍त । तुम्ही मानसपूजा करितां निश्चित ।

मग गेलांत पुष्पवटिकेंत । मी आलों त्वरित ते समयीं ॥८८॥

ऐकोनि तुकयाची वचनोक्‍ती । देवांसि आश्चर्य वाटलें चित्तीं ।

म्हणे परचित परीक्षक निश्चितीं । हे सत्यचि बोलती जनवर्ता ॥८९॥

आतां एक संशय वाटतो जीवें । कीं विष्णुमूर्ति जेविती याच्यासवें ।

ऐसें जन बोलती सर्व । तरी तें पुसावें भोजनांतीं ॥९०॥

याची प्रशंसा वाढली फार । ब्राह्मणही करिती नमस्कार ।

कांहीं चमत्कार दाविला जर । तरी सन्मान आदर आम्हीं करुं ॥९१॥

भाविक असेल वरचावर । तरी शिक्षा करावयासि नाहीं उशीर ।

तरी भोजन जाहलिया सत्वर । मग तुकयासि विचार पुसावा ॥९२॥

आतां वैश्वदेव समयीं आला अतीत । तरी विष्णुसमान मानिजे त्यातें ।

पात्र वाहाडविलें तुकयातें । विप्रपंक्तींत तें समयीं ॥९३॥

ब्राह्मणांपासोनी हात चार । पात्र मांडविलें इतुक्या अंतरें ।

तुकयानें आणिक दोन पात्रें । वाढविलीं साचार त्यां हातीं ॥९४॥

देव पुसती तये क्षणीं । पात्रें वाढविली कोणा लागुनी ।

आणिक जेवणार असती कोणी । त्यांजलागोनी पाचारा ॥९५॥

ऐकोनि म्हणे वैष्णवभक्त । एके पात्रीं रुक्मिणीकांत ।

दुसरें वाढिलें गजवदनातें । बोलावा तयाते स्वामिया ॥९६॥

गायत्रीमंत्रें प्रोक्षोनि पात्रें । ध्यानांत आणिला लंबोदर ।

नैवेद्य दाखवि झांकोनि नेत्र । मग तुका उत्तर काय बोले ॥९७॥

समुद्रामाजी करितां स्नान । एक भक्‍त बुडतां जाण ।

त्यानें गजवदनाचें केलें चिंतन । करीं धांवणें म्हणवोनि ॥९८॥

तयासि काढावया निश्चित । समुद्रांत गेला गौरीसुत ।

हा वृत्तांत जाहला माते श्रुत । तुम्ही नैवेद्य कोणातें दाखवितां ॥९९॥

याचा संशय वाटेल चित्तीं । तरी क्षण एक बैसोनि पाहावी प्रतीती ।

ऐकोनि देव आश्चर्य करिति । म्हणती याची स्थिती अनुपम ॥१००॥

एक अर्धघटिका लोटतां जाण । तो तत्काळ आले गजवदन ।

पीतांबर पिळोनि पाहतां जाण । तों क्षार जीवन लागतसे ॥१॥

मग तुका विनंति करितसे त्यांसी । आतां बोलावा गणपतीसी ।

साक्षात जेववावें त्यासी । चित्त संतोषी तैं होय ॥२॥

ऐकोनि देव म्हणती त्यासी । प्रत्यक्ष मूर्ति जेवील कैसी ।

नैवेद्य दाखवितां देवासी । सुवास तयासी जातसे ॥३॥

यावरी म्हणे वैष्णवभक्‍त । प्रत्यक्ष गणपती जेवावया येत ।

तेणेंचि समाधान पाविजे चित्त । नाहींतरी व्यर्थ उपासना ॥४॥

जैसें क्षेत्र पेरिले गोमटें । त्यासि कणसें आली घनदाट ।

परी त्यावरी कण न फुटे । तरी व्यर्थचि कष्ट गेले कीं ॥५॥

कां गगनीं अभ्र दाटलें फार फार । परी वर्षाव न होय आणुमात्र ।

तेवी दैवत न देतां साक्षात्कार । उपासना मंत्र ते वायां ॥६॥

फळावांचोनि वृक्षलता । कां जळा वांचुनि भ्यासुर सरिता ।

संतानेंवीण सुंदर कांता । शोभाहीन तत्त्वता ते दिसे ॥७॥

भ्रतारावीण अलंकार । कां प्राणावांचोनि जैसें शरीर ।

नातरी दृष्टीवाचूनि विशाळ नेत्र । व्यर्थचि साचार दीसती ॥८॥

तेवीं साक्षात्कार नेदितांचि दैवत । भजन पूजन तें गेलें व्यर्थ ।

ऐकोनि तुकयाचा वचनार्थ । आश्चर्य करित चिंतामणी ॥९॥

मग काय म्हणतसे तयाप्रती । आम्ही उपासिला श्रीगणपती ।

परी साक्षात येऊनि जेवील मूर्ती । हें सामर्थ्य निश्चितीं असेना ॥११०॥

तुम्हीं म्हणवितां वैष्णववीर । स्वाधीन केला रुक्मिणीवर ।

तैसाचि आणूनि लंबोदर । जेववा सत्वर ये समयीं ॥११॥

साक्षात न येतां गजवदन । तरी आम्हीं सर्वथा न करुं भोजन ।

देखोनि देवांचें निर्वाण । काय म्हणे विष्णुदास ॥१२॥

मी तुमच्या कृपें करुनि निश्चिती । प्रत्यक्ष जेववीत गणपती ।

मग दोन अभंगे केली स्तुती । सप्रेम गती करोनियां ॥१३॥

जयजयाजी लंबोदरा । चौदा विद्या गुणसागरा ।

सकळ सिद्धींच्या दातारा । परशुधरा गजवदना ॥१४॥

तूं घागर्‍या बांधूनि पायीं । नृत्य करिती जे समयीं ।

नारद तुंबर तटस्थ सर्वही । तुझी नवायी देखोनी ॥१५॥

तूं जयासि पाहसी कृपादृष्टीं । विघ्नें पळती बारावाटीं ।

भक्तासि रक्षिसी महासंकटीं । भवबंध फांसाटी तोडोनियां ॥१६॥

ऐशा प्रकारें केली स्तुती । परी सर्वथा नयेचि तेथें गणपती ।

तुका विनवितसे मागुतीं । संकोच चित्तीं न धरावा ॥१७॥

तुवां चिंतामणीच्या भक्तीस्तव पाहीं । येथें दोहविल्या वांझ्यागायी ।

ऐसें मी तों मागत नाहीं । आइतेंच जेवीं अन्न आतां ॥१८॥

ऐकोनि तुकयाचें करुणा उत्तर । संतुष्ट जाहले गौरीकुमर ।

मग सगुणरुपें लंबोदर । पात्रावर बैसले ॥१९॥

चिंतामणि देव आराध्यमूर्ती । देखोनि संतुष्ट जाहले चित्तीं ।

साष्टांग नमस्कार घातला प्रीतीं । सप्रेम गती करोनियां ॥१२०॥

मग तुकयाप्रती म्हणतसे तेव्हां । आतां विठोबासि बोलावा ।

तेणेंचि आनंद आमुच्या जीवा । तेथें जेववा साक्षात ॥२१॥

तुकयानें झांकोनि नेत्रपातीं । हृदयीं चिंतिली पांडुरंगमूर्ती ।

देखोनि याची सप्रेम भक्‍ती । रुक्मिणीपती पातले ॥२२॥

सांवळा सुकुमार श्रीपती । शंख चक्र आयुधें हातीं ।

मुगुटीं रत्‍न किरळा फांकती । तेणें गभस्ती लोपला ॥२३॥

दिव्य कुंडलें मकराकार । कांसेसि झळके पीतांबर ।

श्रीमुख साजिरें मनोहर । चरणीं तोडर मिरवतसे ॥२४॥

ऐसी मूर्ति भव्य वाणी । देखतसे देव चिंतामणी ।

साष्टांग नमस्कार घातला धरणीं । आनंद मनीं न समाय ॥२५॥

एके पात्रीं लंबोदर । चतुर्भुजमूर्ति सुंदर ।

एकदंत दिसे शुभ्र । सर्वांगीं सिंदूर चर्चिला ॥२६॥

निजभक्‍त तुका वैष्णव जाण । आणिक देव चिंतामण ।

उभयतांसि साक्षात दर्शन । मग इतरांकारणें न दिसती ॥२७॥

पात्रीं अन्नें वाढिलीं प्रीतीं । तीं निजकरें जेविती दोन्हीं मूर्ती ।

सरतां अन्न ते ब्राह्मण देखती । विस्मित चित्तीं मग झाले ॥२८॥

देव भक्‍ताचिये पंक्‍तीं । ब्राह्मण जेविती यथानिगुती ।

जें जयासि रुचे तें सेविती । जाहली तृप्ती सकळांसि ॥२९॥

श्रीपांडुरंगमूर्ति आणि मोरया । तयांसि करशुद्धि घालीत तुकया ।

मग मुखशुद्धि विडे देऊनियां । लागतसे पायां निजप्रेमें ॥१३०॥

मग निजभक्‍तांसि पुसोनि निश्चिती । अंतर्धान पावल्या दोन्ही मूर्ती ।

देवें तुकयासि आलिंगूनि प्रीतीं । दंडवत घालिती तेधवां ॥३१॥

तुकयानें देखोनि लवलाहें । निजकरें उठवी धरोनि बाहे ।

म्हणे आम्हांसि पूज्य तुमचे पाय । अनुचित काय हें स्वामी ॥३२॥

माझा स्वामी पंढरीनाथ । भृगूची हृदयीं वागवितो सात ।

तीर्थेही तुमच्या चरणीं समस्त । तेथें मी हीनयात काय आहें ॥३३॥

ऐकोनि तुकयाची वचनोक्‍ती । चिंतामणी देव उत्तर देती ।

विष्णुभक्‍त म्हणूं नये हीन यातीं । ऐसें भागवतीं बोलिलें ॥३४॥

पर्वतमाजी कनकाद्रि थोर । कीं धनुर्धरात श्रीजानकीवर ।

कीं योगियामाजी श्रेष्ठ शंकर । वैष्णववीर तूं तैसा ॥३५॥

भागीरथी श्रेष्ठ तीर्थांत । कीं नामधारकांत नारदभक्त ।

कीं सिद्धांमाजी अनसूया सुत । तैसाचि भागवत तुकया तूं ॥३६॥

श्रीहरिकीर्तन करोनियां । पुढें ब्रह्मरुप करिशील काया ।

ऐसेंचि येतसे माझिया प्रत्यया । तुझी सत्‌क्रिया देखोनी ॥३७॥

देवें स्वमुखें ऐशा रीतीं । स्तविलें तेव्हां तुकयाप्रती ।

म्हणे तुमच्या प्रसादें निश्चित । आजि देखिले श्रीपती साक्षात ॥३८॥

यावरी म्हणे प्रेमळभक्त। हा आपुल्या कृपेचा महिमा निश्चित ।

मग आज्ञा मागुनि तयातें । देहुग्रामें पातले ॥३९॥

तुकयाची निरपेक्ष स्थिती । द्रव्य देतां न घेचि हातीं ।

ऐकोनि श्रोते आशंकित होती । वक्‍तयासी पुसती तेधवां ॥१४०॥

गृहस्थाश्रमी वैष्णवभक्‍त । मुलें लेंकुरें होती निश्चित ।

तरी उजविली कोणत्या पंथें । हें आम्हांतें परिसवी ॥४१॥

ऐसा प्रश्न करितां श्रोतयां । वक्‍ता उत्तर देतसे तयां ।

तिघी कन्या होत्या तुकया । उजविल्या तया कोणे रीतीं ॥४२॥

वडिलीचें नांव काशीबाई । दुसरी भागीरथी पाही ।

धाकुटीनें नांव गंगुबाई । सत्कुळाठायी जन्मल्या ॥४३॥

उपवर होत्या तिघी जणी । अवली चिंताक्रांत मनीं ।

म्हणे मुली उजवाव्या कैसेनी । तुकया लागोनि पुसतसे ॥४४॥

ऐकोनि कांतेची वचनोक्ती । माहेर जातसे सत्वरगती ।

स्वययातीचीं मुलें खेळत होतीं । ती घराप्रती आणिली ॥४५॥

ते दिवसी होती लग्नतिथ । मग विप्र बोलावूनि वैष्णवभक्त ।

हळदी लावोनि वधू वरातें । लग्न त्वरित लाविलें ॥४६॥

दुध भात करोनि घरांस । जेवूं घातलें पंचामृत ।

दुसरे दिवशीं वरबापातें । वर्तमान श्रुत झालें कीं ॥४७॥

मग वर्‍हाड घेऊनि तिघे सोइरे भले । देहू गांवासी मागूनि आले ।

तेव्हां भाविकांनीं साहित्य केलें । सोहळे जाहले चार दिवस ॥४८॥

ज्याने सखा केला श्रीहरी । तरी विश्व त्यावरी कृपा करी ।

निज दासासी वैकुंठविहारी । भवसागरीं बुडो नेदी ॥४९॥

मोसगाडे जांबुळकर । हे सोईरे करी वैष्णव वीर ।

परी प्रपंचीं न गुंते आणुमात्र । पडिला विसर देहाचा ॥५०॥

विश्व तारावयासि देखा । कलीमाजी अवतरला तुका ।

महिमा न कळे अज्ञान लोकां । परी तो विश्वसखा जगद्‌गुरु ॥५१॥

ज्यानें कीर्तन करोनि वैकुंठी सहज । देहासहित लाविला ध्वज ।

तो वैष्णवभक्त महाराज । उपदेशी मज निजकृपें ॥५२॥

तुकयाची सप्रेम कळा । आळंदीस जाय वेळोवेळां ।

पंढरीची वाट पहात डोळा । सद्गदित गळा होतसे ॥५३॥

आणिक चरित्र वर्तलें गहन । तें सादर ऐका भाविकजन ।

बीड परगण्याचा देशपांडिया ब्राह्मण । पंढरीस धरणें बैसला ॥५४॥

तामस अनुष्ठान मांडिलें त्यानें । उपवास करी न सेवी अन्न ।

पुराण व्युत्पत्ति मज कारण । व्हावी म्हणोन इच्छितसे ॥५५॥

दहा दिवस बैसतां तेथ । स्वप्नीं सांगती पंढरीनाथ ।

तुवां सत्वर जानोनि आळंदीत । ज्ञानेश्वरातें आराधी ॥५६॥

ते सांगती जैसी युक्ती । ऐकतां मनोरथ पूर्ण होती ।

ऐसें सांगतां रुक्मिणीपती । आला जागृतीं ब्राह्मण ॥५७॥

स्वप्नींचा दृष्टांत आठवोनि चित्तीं । मग तो पातला अळंकावती ।

म्हणे मज व्हावी भुक्तिमुक्ती । आणि पुराण व्युत्पत्ती तत्काळ ॥५८॥

ऐसी कामना धरोनि मनें । ज्ञानदेवीं बैसला धरणें ।

सर्वथा न सेवीच अन्न । तेणे शरीर क्षीण जाहलें ॥५९॥

बारा दिवस लोटतां सत्वर । संकटीं पडले ज्ञानेश्वर ।

म्हणती प्राक्तनहीन हा द्विजवर । वायांच शरीर दंडितसे ॥१६०॥

मग म्हणे तूं देहू गांवी जावें त्वरित । तेथें तुकाराम वैष्णवभक्त ।

जो नामयाचा अवतार साक्षात । जगदुद्धारार्थ अवतरला ॥६१॥

ते जो अनुग्रह करितील तुज । तेथें विश्वास धरितां होईल काज ।

ऐसें सांगतां ज्ञानराज । तों आला द्विज जागृतीसीं ॥६२॥

स्वप्नींचा वृत्तांत आठवितां मनीं । तो विकल्प पातला अंतःकरणीं ।

म्हणे तुका तो शूद्र जातीचा वाणीं । ऐकतों कानीं परस्परें ॥६३॥

त्याजपाशीं जातां पाहे । कैसेनि मनोरथ पूर्ण होये ।

ऐसा विकल्प आणूनि पाहे । देहूसि लवलाहे चालिला ॥६४॥

मग येऊनि तुकयाजवळ । वृत्तांत सांगितला सकळ ।

ऐकोनि विस्मित भक्‍तप्रेमळ । भविष्य कळलें सर्वही ॥६५॥

म्हणे ज्याच्या वरदहस्तें निश्चिती । रेडा स्वमुखें वदला श्रुती ।

चांगदेव प्रचीत पहावयासी येती । मग चालविली भिंती प्रतापें ॥६६॥

भुक्ति मुक्‍ति त्याचें द्वारीं । सदा तिष्ठती कामारी ।

सोन्याचा पिंपळ असे द्वारीं । तो काय एक न करी स्वामी माझा ॥६७॥

ऐसें असतां ज्ञानेश्वरी । येथें पाठविला धरणेकरी ।

काय उणें त्याचें घरी । तुका अंतरीं विस्मित ॥६८॥

मी तरी दास नव्हे खरा । परी जनांत केला डांगोरा ।

कां हे उपाधि पाठविली घरा । ज्ञानेश्वरा दीनबंधु ॥६९॥

मी तुमचा लडिबाळ जनीं । अक्षर जोडोनि सांगतां कानीं ।

जैसी माता बाळका लागोनी । मंथोनि लोणी चारितसे ॥१७०॥

तैसे तुम्ही दीधलें उचित । ती आयती वचनें बोले जनांत ।

समर्थापासी उणें होतें । म्हणोनि धरणें येथें पाठविलें ॥७१॥

यापरी विस्मित होउनि मन । मग अकरा अभंग लिहिले जाण ।

त्या ग्रंथासि उत्तम ज्ञान । म्हणती सज्ञान अनुभवी ॥७२॥

धरणेंकरी बैसला जवळ । त्यापासीं देत भक्‍त प्रेमळ ।

आणि प्रसाद दीधलें महाफळ । तें ब्राह्मणें तत्काळ टाकिलें ॥७३॥

म्हणे मी पुराण व्युत्पत्ति इच्छितों मनीं । आणि प्राकृतज त्या दीधल्या लेहोनि ।

तरी व्यर्थचि आलों ये ठिकाणीं । ऐसें म्हणवोनी चालिला ॥७४॥

मग अळंकावतीस जाऊन । ज्ञानदेवी बैसला धरणें ।

म्हणे माझें मनोरथ करी पूर्ण । यास्तव निर्वाण करितसे ॥७५॥

मग तेरा अभंग सत्वर । ज्ञानेश्वरासि लिहिलें पत्र ।

तुम्ही जाणोनि त्याचें जन्मांतर । मग येथें द्विजवर पाठविला ॥७६॥

इच्छिली वस्तु नाही संचित्तीं । ऐसें जाणोनि आपुले चित्तीं ।

अपेश दीलें मजप्रती । केली युक्‍ती हे कळली ॥७७॥

जैसी लटकियाची गाही । ते निवडिजे दुसरे ठायीं ।

मी तो सेवा समर्पोनि पायीं । जाहलों उतरायी ज्ञानदेवा ॥७८॥

तुमची आज्ञा नुल्लंघवे मजसी । मग एकादश अभंग दीधले त्यासी ।

एक महा फळ प्रसादासी । देऊनि तयासी गौरविलें ॥७९॥

परी त्याचे दैवींच नसे निश्चित । त्यागोनि गेला येथील येथें ।

यापरी तुका ज्ञानदेवातें । पत्र त्वरित पाठविल ॥१८०॥

मग ज्ञानराजें ते अवसरीं । पिटोनि लाविला धरणेकरी ।

निज कर्मासी ऐसी परी । विकल्प अंतरीं उद्भवला ॥८१॥

जेवीं कल्पतरुच्या तळवटीं । बैसोनि झोळीसि देताति गांठी ।

परी भोंगणें लागे तेंच सृष्टीं । होतें अदृष्टीं तें झाले ॥८२॥

सुधा रसाचा घट जाण । अकस्मात लाधला आयुष्यहीन ।

तें तया भासलें क्षारजीवन । यास्तव लवंडोन सांडिलें ॥८३॥

निधान सिद्धि देखिलीं डोळां । दैवहीन गेला त्या जवळा ।

तयासि भासती अग्नि ज्वाळा । काय कपाळा करावें ॥८४॥

नातरी दैवहीन करंटा । तयासि परीस लाधला गोमटा ।

चित्तीं भासला पाषाण गोटा । भिरकावूनि चोहटा देतसे ॥८५॥

तेवीं तुकयानें अभंग दीधले उचित । जे कां श्रुतिशास्त्रांचें मथित ।

परी धरणे करीयासि भासले प्राकृत । कर्म विपरीत म्हणोनी ॥८६॥

आणि महाफळाचा त्याग करोनी । अळंदीसि गेला परतोनी ।

मग ज्ञानदेवें लविला पिटोनी । हे कथा सज्जनीं परिसिलीं ॥८७॥

इकडे देहूसि तुका वैष्णवजन । अभंग पत्रावरील पाहोन ।

म्हणे हे निर्मिले कोणाकारणें । हें मी नेणें सर्वथा ॥८८॥

तों एक कोंडोबा नामाभिधान । धष्टपुष्ट टोणपा होता ब्राह्मण ।

सहज मार्गी चालतां त्याणें । घेतलें दर्शन तुकयाचें ॥८९॥

अक्षर पढला नव्हता कांहीं । यास्तव अभिमान नसेचि जीवीं ।

सद्भावें नमस्कार ते समयीं । घालीत लवलाहीं तुकयासी ॥१९०॥

देखोनि तयाचा भावार्थ । प्रसन्न जाहला वैष्णवभक्‍त ।

अकरा अभंग लिहिले होते । ते कोंडेबातें दीधले ॥९१॥

आणि धरणेकरीयानें टाकिलें फळ । तोही दिधला नारळ ।

त्यानें फोडिला तत्काळ । तों आंत सुढाळ मुक्ताफळें ॥९२॥

अमदाबादेंत सावकार । त्यानें नवसिला होता ज्ञानेश्वर ।

कीं लक्ष रुपयाचें जवाहिर । समाधीवर वाहीन मी ॥९३॥

नवस पुरतांचि सत्वर । दर्शनासि आला सावकार ।

मग दृष्टांतीं सांगे ज्ञानेश्वर । तुकयासमोर हे ठेवी ॥९४॥

मग नारळ कोरोनि ते अवसरीं । ठेविले तुकयाचे समोरी ।

ते दिनींच आला धारणेकरी । तयासि सत्वरी दीधले ॥९५॥

मग दैवीं नसतां टाकिलें त्यानें । तें कोंडोबासि दीधलें धन ।

आणि अभंग वाचितां निज प्रीतीनें । भाषा गीर्वाण कळों येत ॥९६॥

शिवाजीराजापासीं पंडित जाण । नित्य सांगतसे पुराण ।

कोंडोबा तयाचा ब्राह्मण जन । तो आला शरण तुकयासी ॥९७॥

सहज कृपा केली संतीं । यास्तव लाधला भुक्ति मुक्ती ।

तत्काळ जाहली पुराण व्युत्पत्ती । अर्थ भागवतीं प्रवीण ॥९८॥

रायासि कळतां वर्तमान । कोंडोबासि दीधलीं वस्त्रें भूषणें ।

मग चित्तीं विचारी नृपनंदन । घ्यावें दर्शन तुकयाचें ॥९९॥

दिवसंदिवस अधिकोत्तर । जगीं प्रशंसा वाढली फार ।

भाविक करिती सन्मान आदर । कीर्तन गजर ऐकोनी ॥२००॥

एकदा आळंदीसि वैष्णवभक्‍त । महाद्वारीं कीर्तन करित ।

तेथें लोहगांवकर आले समस्त । सज्ञान विरक्त भाविक जे ॥१॥

म्हणती तुकयासी विनीत होऊनि पायीं । एक वेळ न्यावें आपुलें गांवीं ।

ऐसी निश्चय करोनि जीवीं । सद्भावें पायीं लागले ॥२॥

म्हणती स्वामी येऊनि तेथवर । आश्रम करावा पवित्र ।

देखोनि त्यांचा भावार्थ थोर । वैष्णव वीर अवश्य म्हणे ॥३॥

मग लोहगांवास दुसरे दिनीं । तुकोबासि नेलें बहुता प्रयत्‍नीं ।

दिव्य पक्वानें स्वयंपाक करोनि । ब्राह्मण भोजनीं तृप्त केले ॥४॥

मंडप कनाता देऊनि फार । स्थळ विस्तीर्ण केलें थोर ।

रात्रीं तुका वैष्णववीर । कीर्तन गजर करीतसे ॥५॥

टाळविणें मृदंग घोष । नादब्रह्मचि आलें मुसें ।

कीर्तनीं वोळला प्रेमरस । ब्रह्मादिकांस दुर्लभ जो ॥६॥

प्रसादिक तुकयाची वाणी । भाविक लोक ऐकती श्रवणीं ।

प्रेम अश्रु वाहती लोचनीं । तटस्थ होऊनी राहिले ॥७॥

सप्रेम सेवितां कथारस । कोणासि निद्र न ये आळस ।

मग भास्कर येतां उदयास । पंढरीनिवास ओवाळिला ॥८॥

पुढिले अध्यायीं कथा अद्भुत । वदविता श्रीरुक्मिणीकांत ।

महीपती त्याचा मुद्रांकित । पवाडे वर्णित संतांचे ॥९॥

स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविकभक्‍त । चवतिसावा अध्याय रसाळ हा ॥२१०॥अध्याय॥३४॥ओव्या॥२१०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP