श्रीगणेशाय नमः ॥ श्रीरामकृष्णाय नमः ॥
ज्याची प्राप्ति व्हावया साचार । श्मशानीं बैसला मृडानीवर ।
तें हें परब्रह्म विटेवर । देखतांचि विरे देहभान ॥१॥
धन्य ते क्षेत्रवासी जन । पंढरीस राहिले निजप्रीतीनें ।
साक्षात परब्रह्ममूर्ति सगुण । निजप्रीतीनें पाहती ॥२॥
चंद्रभागा देखतां नयनीं । सकळ तीर्थें घडती त्यालागुनी ।
महा दुरितें जाती निरसोनी । महिमा पुराणीं बोलिला ॥३॥
जे परम आवडी धरोनि चित्तीं । पंढरीस जावें ऐसें म्हणती ।
तरी त्यांसि जन्म नाहीं पुनरावृत्ती । सायुज्यमुक्ती ये घरां ॥४॥
धन्य ते वैष्णव निर्धारीं । चालविती पंढरीची वारी ।
येथें पुंडलीकाचें द्वारीं । वैकुंठविहारी पातले ॥५॥
जैसें पंढरीचें महिमान । तैसेंचि क्षेत्र प्रतिष्ठान ।
तेथें श्रीनाथाच्या भक्तीस्तव पूर्ण । रुक्मिणीरमण पातले ॥६॥
मागिले अध्यायीं कथा सुंदर । एकनाथासि छळिती द्विजवर ।
स्वर्गींहून साक्षात आले पितर । तेव्हा चरित्र परिसिलें ॥७॥
आणिक कर्णाटकाहूनि निश्चिती । साक्षात् आली पांडुरंगमूर्ती ।
लग्नसोहळा करोनि प्रीतीं । मग परतोनि येती निजग्रामा ॥८॥
परम उल्हासें मिरवत । संभ्रमें आणिले पंढरीनाथ ।
ते दिवसीं समुहूर्त । सिंहासनीं बैसवित जगदात्मा ॥९॥
मग क्षेत्रवासी सकळ ब्राह्मण । तयांसि दीधलें आमंत्रण ।
नानापरीचें मिष्टान्न । तयांसि भोजन घातलें ॥१०॥
यावरी श्रीनाथ उद्धवाप्रती । निजगुज सांगती एकांतीं ।
आम्हीं सेवाहीन असतां निश्चितीं । पांडुरंगमूर्ती घरां येत ॥११॥
आजन्म परियंत पाहीं । अद्यापि पंढरीस गेलों नाहीं ।
सेवाचाकरी न घडतां कांहीं । शेषशायी घरी आला ॥१२॥
जैसा चातक न पसरितां वदन । मेघ आकाशीं करीत गर्जन ।
कां चकोर असावध असतां पूर्ण । रोहिणीरमण उगवे जैसा ॥१३॥
नातरी स्मरण न करितांचि कमळिणी । आकाशीं प्रगटे वासरमणी ।
कां बाळक खेळत असतां अंगणीं । सांभाळीत जननी त्या लागीं ॥१४॥
तेवीं आम्ही पंढरीसि अद्यापि न जातां । कृपा उपजली रुक्मिणीकांता ।
कर्णाटक देशांतूनि तत्त्वतां । आले अवचितां निजगृहीं ॥१५॥
आतां चित्तासि पातला उद्गार । कीं दृष्टीसीं पाहावें पंढरपुर ।
प्रत्यक्ष वैकुंठ महीवर । असे माहेर संतांचें ॥१६॥
ऐसें बोलतांचि श्रीनाथ । उद्धवें केला प्रणिपात ।
पहिली यात्रा म्हणोनि निश्चित । सुदिन मुहूर्त नेमिला ॥१७॥
दिंडया पताका भरजरी । टाळ विणें मृदंग सुस्वरी ।
श्रीनाथाच्या बरोबरी । आणिक वारकरी निघाले ॥१८॥
सत्संगाचे नियोगें देख । क्षेत्रवासी चालिले लोक ।
चितीं मानूनि परमहरिख । करिती कौतुक नामघोषें ॥१९॥
गात नाचत वैष्णव मंडळी । यात्रा निघाली तये वेळीं ।
जयजयकारें पिटोनि टाळी । नाद निराळीं कोंदला ॥२०॥
ऐशा रीतीं कीर्तन करित । श्रीनाथ तेव्हां पायीं चालत ।
नगरा बाहेर बोळवित । लोक बहुत पैं आले ॥२१॥
उद्धवासि आज्ञापित ते अवसरीं । तुम्ही अधिष्ठान आवरावें घरीं ।
अवश्य म्हणोनि निर्धारीं । चरणावरी लोटला ॥२२॥
श्रीनाथें केलिया प्रयाण । उद्धव घरीं येत फिरोन ।
ग्रामवासी सकळ जन । आले परतोन नगरांत ॥२३॥
श्रीनाथें जैसी लाविली रीत । तैसेंचि उद्धव आचरत ।
तृतीय प्रहरीं पुराण होत । कीर्तन करित निशाकाळीं ॥२४॥
विष्णुअर्चन सदावर्त । तितुकेंही मागें चालवित ।
धन्य धन्य क्षेत्रवासी म्हणत । न्युन किंचित पडेना ॥२५॥
इकडे यात्रा घेऊनि बहुत । पंढरीस चालिले एकनाथ ।
स्वाच्छेनें पंथ क्रमित । कीर्तन होत पदोपदीं ॥२६॥
श्रीनाथाच्या संगतीं करुन । कोणासि न वाटे भागंशीण ।
स्वानंदें निर्भर अवघे जन । करिती स्मरण हरीचें ॥२७॥
अशक्त अनाथ तयांप्रती । मागें पुढें सांभाळिती ।
क्षणक्षणां रुक्मिणीपती । गातसे गीतीं निजप्रेमें ॥२८॥
करावया जगदुद्धार । श्रीनाथ पांडुरंग अवतार ।
परी लोकसंग्रहार्थ साचार । मर्यादा अणुमात्र न सांडी ॥२९॥
जैसी देख दाखविती संत । तैसेंच भाविक जन वर्तत ।
तेणेंचि ते पावन होत । भवबंध तयांतें असेना ॥३०॥
दृष्टीसीं देखोनि वैष्णव वीर । तयासि करिती नमस्कार ।
अंगीं लीनता बहुत फार । महंती अणुमात्र असेना ॥३१॥
जैसा गगनीं उगवोनि दिनकर । प्रकाश पाडीतसे जगावर ।
परी चित्तीं न धरितां अहंकार । ऐश्वर्य थोर नाठवी ॥३२॥
सप्रेमभाव धरोनि बहुत । मार्गीं चालतां कीर्तन होत ।
साबडे वैष्णव गाऊं लागत । क्रमिती पंथ या रीतीं ॥३३॥
पंढरि समीप आली जेव्हां । कळस दृष्टीस देखिला तेव्हां ।
चित्तीं आनंद वाटला जीवां । सकळ देहभावा विसरले ॥३४॥
रात्रीचे समयीं पंढरीनाथ । पुजारियांसि स्वप्न दाखवित ।
कीं एकाजनार्दन अभेद भक्त । उदईक येत असे यात्रेसी ॥३५॥
तरी तुम्हीं दिंडया पताका बरोबरी । घेऊनि त्यासि जावें सामोरी ।
आणि चतुर्दशीस महाद्वारीं । कीर्तन निर्धारीं करवावें ॥३६॥
ऐसा दाखविला दृष्टांत । हें सकळ क्षेत्रांत जाहलें श्रुत ।
समारंभें लोक समस्त । आले त्वरित चंद्रभागे ॥३७॥
संत महंत वैष्णव वीर । आनंदें करिती कीर्तन गजर ।
नामघोषें कोदलें अंबर । जयजयकार करिताती ॥३८॥
इकडे श्रीनाथें देखोनि पंढरी । दंडवत घालिती क्षितीवरी ।
आनंदाश्रु वाहती नेत्रीं । भेटती सत्वरी एकमेकां ॥३९॥
म्हणती धन्य दिवस हा सार । दृष्टीसीं देखिलें पंढरपूर ।
प्रत्यक्ष वैकुंठ महीवर । जें निजमाहेर संतांचें ॥४०॥
ऐशा रीतीं वर्णूनि महिमा । मग वोवाळिलें पुरुषोत्तमा ।
अगाध गुण आत्मयारामा । कोणासि सीमा न करवे ॥४१॥
सकळ यात्रे समवेत निश्चिती । उतरोनि आले भीमरथी ।
तों संतमहंत सामोरे येती । प्रेमें भेटती एकमेकां ॥४२॥
म्हणती धन्य दिवस हा सुदिन । जाहलें नाथाचें दर्शन ।
मग चंद्रभागेसि करुनि स्नान । नित्य नेम संपूर्ण सारिला ॥४३॥
जो सकळ भक्तांचा अग्रणी । समाधिस्थ पुंडलीक मुनी ।
श्रीनाथें त्याचें दर्शन घेऊनी । प्रीती करोनी पूजिलें ॥४४॥
पुजारी म्हणती त्या अवसरा । आतां चलावें महाद्वारा ।
आधीं भेटोनि रुक्मिणीवरा । मग बिर्हाड धरा सुखरुप ॥४५॥
विप्रवाक्य तें जनार्दन । एकनाथासि विश्वास पूर्ण ।
मग दिंडया पताका सर्व घेऊन । करीत कीर्तन चालिले ॥४६॥
गरुड पारीं लोटांगण । घालिती तेव्हां निजप्रीतीनें ।
संत महंत करिती कीर्तन । त्याचे चरण वंदिले ॥४७॥
श्रीविष्णुमय पंढरी । भूवैकुंठ महीवरी ।
चतुर्भुज तेथिंच्या नरनारीं । भिन्न भेद निर्धारी असेना ॥४८॥
आणिक तीर्थे बहुत फार । उदंड आहेत पृथ्वीवर ।
ते स्थळीं आतां साचार । अहंभाव भरे अधिकची॥४९॥
तैसी नव्हे पंढरीमाता । दर्शनेंचि निरसी दुर्गुण अहंता ।
खळाच्या अनुताप आणूनि चित्ता । लावी परमार्थी तें समयीं ॥५०॥
जन्ममरणांचें मूळ साचार । तोचि हा दुष्ट अहंकार ।
यासि जो निवटी सत्वर । तोचि योगेश्वर जाणावा ॥५१॥
योगी नासाग्रीं ठेविती दृष्टी । तैसा हा दिसे जगजेठी ।
उभा राहिला भीमातटीं । करद्वय कटीं ठेविलें ॥५२॥
योगी निरसिती आपुलें मीपण । तेणेंचि परमपद पावती जाण ।
तैसा नव्हे रुक्मिणीरमण । उद्धरीत संपूर्ण जडजीवां ॥५३॥
ऐसा देवाधिदेव कैवल्यदानी । एकनाथांनीं देखिला नयनीं ।
परम उल्हास वाटला मनीं । प्रीती करोनी भेटले ॥५४॥
ठाण साजिरें सुकुमार । जघनीं विराजती दोन्ही कर ।
श्रीमुख दिसतसे मनोहर । मकराकार कुंडलें ॥५५॥
कासेसि दिव्य पीतांबर । गळां तुळशी मंजुर्यांचे हार ।
समपद ठेविले विटेवर । पाहतां विरे देहभान ॥५६॥
सप्रेमभावें करुनि देख । नाथें चरणीं ठेविला मस्तक ।
स्तुति स्तोत्रें बोलोनि मुखें । वैकुंठनायक पूजिला ॥५७॥
सगुणरुप देखिलें नयनीं । तेंचि सांठविलें हृदयभुवनीं ।
मग सत्यभामा राही रुक्मिणी । तयां लागोनि भेटले ॥५८॥
क्षेत्र प्रदक्षिणा करितां सांग । गीतीं गायिला पांडुरंग ।
बिर्हाडासि येऊनि मग । भक्त अंतरंग काय करी ॥५९॥
सकळ क्षेत्रवासी ब्राह्मण । तयांसि देऊनि आमंत्रण ।
स्वयंपाक करोनि मिष्टान्न । केलें पारणें दुसरे दिनीं ॥६०॥
मग चतुर्दशीस रुक्मिणीकांत । सकळ संतांसि आज्ञापित ।
एकनाथाचें कीर्तन निश्चित । प्रेमें आवडत मजलागीं ॥६१॥
ऐसा पुजारियांसि दृष्टांत होतां । ते आदरे म्हणती एकनाथा ।
गरुडपारीं कीर्तन आतां । स्वामी समर्था करावें ॥६२॥
श्रीपांडुरंगाचें मनोगत । मान दीधलासे तुम्हांतें ।
वरप्रसाद ऐकतां तेथें । समारंभ बहुत मांडिला ॥६३॥
माहिमोर्तबा गरुड टके । सप्तरंगी पताका अनेक ।
टाळ-विणे मृदंग देख । साहित्य सकळिक तें झालें ॥६४॥
संत-महंत सिद्ध ऋषी । वैदिक-पंडित क्षेत्रवासी ।
आदरें बैसले श्रवणासी । उल्हास मानसीं धरोनियां ॥६५॥
एकनाथाचा सत्कीर्ती गजर । ऐकिला होता परस्परें ।
त्याचें वक्तृत्व ऐकावयां बरें । आस्था फार सकळांसि ॥६६॥
कीर्तनासि वारकरी आले फार । जे निधडे प्रेमळ वैष्णव वीर ।
आणिक यात्रा नारीनर । दाटी समग्र जाहली ॥६७॥
एकनाथें उठोनि आपण । प्रथमारंभीं मंगळाचरण ।
श्रोता वक्ता श्रीजनार्दन । म्हणोनि नमन करीतसे ॥६८॥
ऐसें म्हणोनि ते वेळीं । विठ्ठलनामें पिटिली टाळी ।
कीर्तनाचेनि महा कल्लोळीं । नाद निराळीं कोंदला ॥६९॥
कृष्णाविष्णु हरिगोविंदा । अच्युतानंत आनंदकंदा ।
परमपुरुषा सच्चिदानंदा । श्रीमुकुंदा जगद्गुरु ॥७०॥
केशव नारायण माधवा । भक्तवत्सला करुणार्णवा ।
गोपिकापति देवाधिदेवा । भव भ्रम अवघा निवारिसि ॥७१॥
जडमूढ अज्ञान्यांसाठीं । उभा राहिलासि भीमातटीं ।
भाविक भक्तांसि देऊनी भेटी । कृपादृष्टी रक्षीसी त्यां ॥७२॥
ऐसें नामें प्रेमभरित । गावोनि नाचत कीर्तनांत ।
श्रोते देहभान विसरले समस्त । रंग अद्भुत वोडवला ॥७३॥
तंव कोणी प्रश्न करिती त्यांस । तुमचा पूर्वज भानुदास ।
त्याचें चरित्र अति सुरस । गावोनि आम्हांस ऐकवा ॥७४॥
ऐसा श्रोतयांचा प्रश्न ऐकोनि । श्रीनाथ संतोषले मनीं ।
म्हणती हेंचि होतें आमुचें मनीं । त्यावरी स्वामीनीं आज्ञापिलें ॥७५॥
रामराजा विद्या नगरीं । परिवारेंसी राज्य करी ।
तो एके दिवसीं करोनि स्वारी । क्षेत्रपंढरी पावला ॥७६॥
श्रीपांडुरंगमूर्ति पाहोनि सुंदर । चित्तीं आवड बैसली फार ।
म्हणे आपुलें गांव विद्यानगर । रुक्मिणीवर तेथें न्यावा ॥७७॥
ऐसी कल्पना आणोनि मानसीं । सात दिवस बैसले उपवासी ।
तंव स्वप्नीं येऊनि हृषीकेशी । आज्ञा तयासि करितसे ॥७८॥
आम्हीं पुंडलीकाची भक्ति विशेष । देखोनि पंढरीसी केला वास ।
भाक वचन देऊनि त्यास । भाविक जनांस भेटतसों ॥७९॥
ये स्थळीं चित्त रमतसे । ऐसी विश्रांति कोठें नसे ।
क्षीरसागरी आमुचा वास । वैकुंठही दिसे उणेंची ॥८०॥
येथें भाविक भक्त प्रेमळ । यात्रेसी येती सर्वकाळ ।
त्यांच्या संगतीनें मी घननीळ । सांडोनि तळमळ राहिलो ॥८१॥
ऐसें असतां रामराया । तुवां निग्रह मांडिला वायां ।
आतां विद्या नगरासि न्यावया । सांगतों उपाया त्या करीं ॥८२॥
शुचिर्भूत सोवळे होऊन । ब्राह्मणी उचलावें मज लागुन ।
मार्गावरी खालीं न ठेवणें । तरीच येईन त्या ठायां ॥८३॥
ऐसें स्वप्न देखतां रातीं । राजा परम हर्षला चित्तीं ।
मग प्रधानासि पुसे एकांती । आतां युक्ति कोणती करुं सांग ॥८४॥
मंत्री देतसे प्रतिउत्तर । आपुले देशीचे द्विजवर ।
तयांसि दक्षिणा देऊनि फार । मार्गावर आणावे ॥८५॥
हातो हातीं उचलोनि मूर्ती । नगरासि आणू सत्वरगती ।
ऐसी ऐकोनि वचनोक्ति । चित्तीं भूपंती संतोषला ॥८६॥
गांवोगांवीचे द्विजवर । तयांसि लेहूनि विनीतपत्र ।
ब्राह्मण समुदाय वाटेवर । आणवी सत्वर नृप तेव्हां ॥८७॥
उदक अन्नाची ठायीं ठायीं । स्वस्थता केली ते समयीं ।
देवकार्य म्हणोनि पाहीं । संतोष जीवीं ब्राह्मणां ॥८८॥
मग देवासि घालोनि नमस्कार । प्रार्थना करितसे नृपवर ।
आतां कृपा करोनि मजवर । चला सत्वर पांडुरंगा ॥८९॥
ऐसें विनवोनियां नृपती । मूर्ति चालवीत हातोहातीं ।
बडवे पुजारी तळमळती । परी नायके भूपती तयांचें ॥९०॥
सत्ताधारी तो भूपाळ । कोणाचेही न चले बळ ।
नरनारी पाहती सकळ । भरले डोळे अश्रुपातें ॥९१॥
मूर्ति काढितांचि नृपवर । वोस दिसतसें पंढरपूर ।
जैसे प्राणा वांचूनि शरीर । तैसा विचार तो झाला ॥९२॥
असो इकडे रामराय भूपती । मूर्ति चालवीत हातोहातीं ।
परम उल्हास मानोनि चित्तीं । नगराप्रती तो आला ॥९३॥
मेळवूनियां वैष्णववीर । कीर्तन करितसे नृपवर ।
दिंडया पताकांचे भार । मंगळ तुरे लाविले ॥९४॥
पूजा अभिषेक करोनि प्रीतीं । सिंहासनी स्थापीत पांडुरंगमूर्ती ।
महा उत्सव करीत भूपती । आनंद चित्तीं न समये ॥९५॥
वस्त्रें भूषणें देऊनि फार । राये गौरविले वैष्णवीर ।
द्रव्य दक्षिणा वाटोनि थोर । सुखी द्विजवर ते केले ॥९६॥
रत्नजडित अलंकार । अमूल्य वस्त्रें मुक्ताहार ।
लेहोनि पूजिला रुक्मिणीवर । हर्षे अंतर कोंदलें ॥९७॥
मंदिरीं निद्रिस्त होता नृपती । तंव स्वप्नीं सांगत पांडुरंगमूर्ती ।
त्वां ये स्थळीं आणिलें मजप्रती । तरी सांगतों ते ऐका ॥९८॥
विचारुनियां न्यायनीत । धर्म राज्य करावें निश्चित ।
तुझा अन्याय होतां किंचित । मग मी येथ न राहे ॥९९॥
प्रेमळ भक्त आवडती मजसी । आणि त्वां निरपराधें छळिलें त्यांसी ।
तरी मी जाईन पंढरीसी । पूर्व स्थळासी आपुल्या ॥१००॥
ऐसा दृष्टांत पंढरीनाथें । रात्रीं दाखविला असे त्यातें ।
राजा होऊनि भयभीत । असे सावचित्त सर्वदा ॥१॥
पुजारी येऊनि निजप्रीती । प्रातःकाळी अर्चन करिती ।
स्नान करोनि येतसे भूपती । पूजा आरती पहातसे ॥२॥
देवावरी अमूल्य अलंकार । यास्तव तस्कराचें भय फार ।
कवाडासि कुलुपें अष्टही प्रहर । होय सायंकाळ तोंवरी ॥३॥
राजा देउळीं असल्यावीण । नगरवासी अवघेजण ।
कोणासि न होय दर्शन । केलें संरक्षण या रीती ॥४॥
षोडशोपचारे करोनि जाण । राजा करितसे नित्य पूजन ।
घृत पाचित पक्वानें । त्रिकाळ अर्पण होतसे ॥५॥
भोवते कापूर दीपक । सर्वदा जळती सम्यक ।
पुष्पें कस्तुरी सुवासिक । उपचार अनेक वोळंगती ॥६॥
परी पंढरीच्या वियोगबाणें । चैन न पडे देवाकारणें ।
म्हणे प्राप्त जाहले बंदीखानें । कधीं सुटेन येथोनियां ॥७॥
असो इकडे आषाढमासी । यात्रा मिळाली पंढरीसी ।
संत महंत सिद्ध ऋषी । चिंता मानसीं करिताती ॥८॥
निधडे वैष्णव वारकरी निश्चित । तितुके मात्र आले तेथे ।
इतर प्रपंचीक लोक समस्त । म्हणती पंढरीनाथ दूर गेला ॥९॥
ऐसें समजोनि ते अवसरीं । राहतीं आपुलीया घरीं ।
संत महंत यानीं साजिरी । केली पंढरी तेधवां ॥११०॥
जेवीं पृथ्वीवरी मेघ वर्षतां । आड वोहळांच्या भासती सरिता ।
उष्णकाळ येताचि तत्त्वतां । बुंद आतौता न थारे ॥११॥
घणघायीं टिकतां साचार । तेचि जाणवे अमूल्य हिरे ।
इतर गारांचा होतसे चूर । परीक्षा नर आणती ॥१२॥
तावोनि काढीतां सोज्वळ दिसे । यालागी कांचन म्हणावें त्यास ।
पितळेसी कालिमा चढतसे । परीक्षा असे हे त्याची ॥१३॥
कां मोहर्यांसि गुंडाळूनि सूत । टाकूनि पाहिजे अग्नी आंत।
तंतू न जाळे तरी निश्चित । विष उतरत त्याचेनी ॥१४॥
तेवी विषमकाळ जाहलिया प्राप्त । त्रितापांचे नाना आवर्त ।
ज्याचा निश्चय न टळेचि सत्य । तरी तोचि संत म्हणावा ॥१५॥
महा संकटी न ढळेचि प्रेमा । निग्रहें चालवीत आपुल्या नेमा ।
तो भक्त आवडे पुरुषोत्तमा । जैसा जीवात्मा या रीती ॥१६॥
असोत हीं भाषणें बहुत । दृष्टांत देणें कवीचें मत ।
रामरायें नेतां पंढरीनाथ । तों पातले संत वारकरी ॥१७॥
सिंहासनीं नसतां रुक्मिणीवर । वोस दिसतसे पंढरपुर ।
जैसें प्राणा वांचूनि शरीर । खुंटे व्यापार इंद्रियांचा ॥१८॥
नृपा वांचूनि सैन्य संपत्ती । कां चंद्रावांचूनि जैसी राती ।
ईश्वरकृपेनें निश्चिती । कवित्व स्फूर्ती जेविं होय ॥१९॥
नातरीं घरधन्या वांचूनि घर । तैसें दिसे पंढरपुर ।
चिंता करिती निरंतर । परी उपाय अणुमात्र सुचेना ॥१२०॥
तंव निवृत्ति ज्ञानदेव सोपान । नामा सांवता वैष्णव जाण ।
मुक्ताबाई गुणनिधान । यात्रेसि संपूर्ण हे आले ॥२१॥
कबीर आणि रोहिदास पाहीं । गोराकुंभार गोणाबायी ।
जनीदासी नामया पाहीं । आणि राजायी भक्तराज ॥२२॥
इतुकी मंडळीं ते अवसरीं । बैसली असे गरुडपारीं ।
नामदेव तेथें कीर्तन करी । तों भानुदास सत्वरीं पातले ॥२३॥
खांद्यावरी घेतला ब्रह्मविणा । आलापें गीते गातसे नाना ।
हृदयीं चिंतोनि रुक्मिणीरमणा । नामस्मरणा करीतसे ॥२४॥
ऐशा स्थितीनें ते अवसरीं । भानुदास पातले गरुडपारीं ।
संतमहंता भेटोनि सत्वरीं । मग नमस्कार करिती सद्भावें ॥२५॥
विद्यानगरासि रुक्मिणीवर । नेला म्हणवोनि वैष्णववीर ।
अवघेचि होऊनि चिंतातुर । करिती विचार एकमेकां ॥२६॥
रामरायाचा देखोनि भाव । पंढरीहूनी गेले देवाधिदेव ।
आपण इतुकें भक्तवैभव । तरी जावोनि केशव आणावा ॥२७॥
ज्ञानराज बोलतां ऐसें । कोणीच उत्तर न देती त्यास ।
म्हणती ईश्वर इच्छेस । उपाय नसे आपुला ॥२८॥
एक बोलती अद्वैतभाव । आपुलेच देहीं असे देव ।
चराचरीं भरला असे सर्व । याजवीण ठाव रिता नाहीं ॥२९॥
एक म्हणती जातांचि तेथें । नृपवर कोपेल आम्हांतें ।
कोंडूनि ठेवील बंदिखान्यांत । मग कैसी मात करावी ॥१३०॥
हेंचि कार्य नव्हे आमुचेनें । ऐसें अधीर बोलती वचन ।
तों भानुदास साष्टांग नमन । संता कारणें करीतसे ॥३१॥
जरी आज्ञा द्याल मज आतां । तरी सत्वर आणितों पंढरीनाथा ।
तुम्ही सांडुनि सकळ चिंता । या स्थळीं तत्वता आसिजे ॥३२॥
ऐसें बोलोनि तयांस । तेथोनि निघे भानुदास ।
जेवीं मारुती जातां सीता शुद्धीस । तैसा उल्हास वाटला ॥३३॥
हृदयीं चिंतोनि पांडुरंगमूर्ती । मुखीं गातसे नामकीर्ती ।
स्मरण करितां दिवसरातीं । सप्रेम विश्रांती सर्वदा ॥३४॥
देवासि घेऊनि येईन कवतुकें । म्हणोनि चित्तीं वाटला हरिख ।
विदेह स्थिति जाहली देख । तहान भूख विसरला ॥३५॥
अयाचित वृत्ती करुन । कोणी अकस्मात दीधलें अन्न ।
स्वसंतोषें भक्षून । पुढती गमन करीतसे ॥३६॥
ऐशा रीतीं क्रमितां पंथ । विद्यानगरासि भानुदास येत ।
ये स्थळीं आणिला पंढरीनाथ । ऐसें पुसत लोकांसीं ॥३७॥
रायाच्या भयें करोनि जाण । कोणीच न बोलती वचन ।
तों एक सत्पुरुष भेटला ब्राह्मण । तो साकल्य निवेदन करीतसे ॥३८॥
म्हणे रामरायें आणूनियां पांडुरंगमूर्ती । देउळीं स्थापिली असे निश्चिती ।
परि दर्शन नव्हेचि कोणाप्रती । कुलुपें घालिती सर्वदा ॥३९॥
मग भानुदास विचारी मनांत । आपणासि पाहिजे एकांत ।
तरी शेजआरती झालिया निश्चित । जावें त्वरित त्या ठाया ॥४०॥
तये दिवसीं रात्रीं निश्चित । राउळासि आला नृपनाथ ।
शेजारती करोनि त्वरित । मग स्वस्थानासि जात आपल्या ॥४१॥
पुजारी असती बाहेर । तेही निद्रेनें व्यापिले फार ।
तेथें भानुदास वैष्णववीर । द्वारा समोर येत तेव्हां ॥४२॥
एकांत एक चार द्वारें । तितुक्यांस कुलुपें असती थोर ।
तों माव केली रुक्मिणीवरें । गळोनि सत्वर पडलीं तीं ॥४३॥
कपाटें मोकळी सर्वही । भानुदासासि आनंद वाटला जीवीं ।
म्हणे मनोरथ पुरले ये समयीं । मग आंत लवलाहीं प्रवेशला ॥४४॥
तों ठाण ठकारे जगजेठीं । समपद जोडीले विटें नेहटी ।
दोन्ही कर ठेवूनि कटी । नासाग्रीं दृष्टी धरियेली ॥४५॥
साजिरें मुख देखतांचि नयनीं । भानुदासासि उल्हास मनीं ।
मग बाह्यात्कारें राग धरोनी । देवासि ते क्षणीं भांडतसे ॥४६॥
म्हणे रुक्मिणीपति पंढरीराया । पायीं विरुद्ध बांधिले कासया ।
तुझी बोलण्यासारखी नसेच क्रीया । माझिया प्रत्यया हें आलें ॥४७॥
तुवां पुंडलीकासि दीधला वर । कीं तेथें असावे निरंतर ।
करावा जडमुढ उद्धार । तो आठव अणुमात्र तुज नाहीं ॥४८॥
राजमंदिरीं एकांत । बरा पाहोनि बैसलासि येथ ।
वस्त्रे अळंकार ल्यालासि बहुत । नैवेद्यासि मिळत पक्वान्नें ॥४९॥
यास्तव सुरवाडें राहिलासि हरी । आमुचा विसर पडिला अंतरीं ।
मग स्वमुखे अभंग केला सत्वरीं । तो सादर चतुरीं परिसावा ॥१५०॥
अभंग ॥ चंद्रभागे तीरीं उभा विटेवरी । विठो राज्याकरी पंढरीये ॥१॥
ऋद्धिसिद्धि वोळंगती परिवार । न लाहाती अवसर ब्रह्मादिकां ॥२॥
सांडुनि इतुकें येथें बीजें केलें । कवणें चाळविलें कानडीया ॥३॥
शंख भेरी मृदंग वाजती काहळा । उपवडा राउळा होत असे ॥४॥
चांपेल मार्जन सुगंध चर्चन । भिंवरा चंदन पाट वाहे ॥५॥
रंभा तिलोत्तमा उर्वशि मेनीका । कामिनी अनेका येतीं सवें ॥६॥
कनकाचे पर्येळीं रत्नाचे दीपक । सुंदर श्रीमुख वोवाळिती ॥७॥
रखुमाई आई ते जाहली उदास । पुंडलिक कैसें पडिलें मौन ॥८॥
भक्त भागवत सकळपां रुसले । निःशब्दचि ठेले तुजवीण ॥९॥
धन्य पंढरपूर विश्वाचें माहेर । धन्य भीमतीर वाळुवंट ॥१०॥
भानुदास म्हणे चाले आम्हां सवें । वाचा ऋण देवें आठवावें ॥११॥
ओवी ॥ ऐसी करुणा वदोनियां । भानुदास लागतसे पायां ।
म्हणे कोणें चाळविलासि देवराया । सांग लवलाह्यां ये समयीं ॥५१॥
ऐसी करुणा ऐकोनि कानीं । सद्गदीत जाहले चक्रपाणी ।
भानुदासासि आलिंगुनी । हृदय भुवनीं धरियेलें ॥५२॥
मग काय बोलती पंढरीनाथ । मी बंदिखान्यांत पडलों येथ ।
तुम्हींही निष्ठुर करुनि चित्त । आमुची परतन केली ॥५३॥
मजला टाकोनि प्रेमळ भक्ता । सर्वथा जाऊं नको आतां ।
तुम्हां वांचोनि मज तत्त्वता । क्षणही निरुता न कंठे ॥५४॥
ऐसें म्हणोनि करुणामूर्ती । भानुदासासि प्रसाद देती ।
तुळसी सुमनांचा हार निगुती । गळां घालिती तयाचे ॥५५॥
म्हणे उदईक येऊनि सत्वर । मज नेयी आपुल्या बरोबर ।
ऐसें सांगता रुक्मिणीवर । हर्ष थोर वाटला ॥५६॥
पुष्प माळेच्या बरोबर । आला नवरत्नांचा हार ।
भानुदास नेणती साचार । आले सत्वर बाहेरी॥५७॥
मागुतीं लाघवी जगज्जीवन । कवाड कुलुपांसि केलें बंधन ।
प्रातःकाळ होतांचि त्वरेनें । नृपनंदन पावला ॥५८॥
कांकड आरती करितां साचार । तों कंठीं न दिसे नवरत्नहार ।
म्हणती येथें कोण आला चोर । कोपे नृपवर पूजार्यांसि ॥५९॥
तस्कर पहावयासि साचार । अष्ट दिशा धांवले हेर ।
तों भानुदास वैष्णववीर । त्याणीं सत्वर देखिला ॥१६०॥
गंगातीरीं करोनि स्नान । करीत बैसला विठ्ठलस्मरण ।
कंठीं झळकती दिव्य रत्नें । सेवकजन देखती ॥६१॥
त्याणीं धरोनि वैष्णववीर । रायापासी आणिला सत्वर ।
म्हणती धरोनि आणिला चोर । रत्नहार दाखविला ॥६२॥
चित्तीं क्षोभला नृपवर । सक्रोध बोले तयासि उत्तर ।
धरोनि आणिला आहे तस्कर । तरी सुळावर त्यासि घाला ॥६३॥
विवेक नीतन विचारुन । सेवकांसि आज्ञा केली त्याणें ।
होणार भविष्य सर्वथा नेणें । माया भ्रांतीनें वेष्टिला ॥६४॥
असो भानुदास वैष्णववीर । तयासि दंड केला फार ।
सूळ देऊन खांद्यावर । माथां सेंदूर घातला ॥६५॥
भानुदास सप्रेम चित्तीं । हृदयीं चिंतिली पांडुरंगमूर्ती ।
म्हणे देवाधिदेवा रुक्मिणीपती । उत्तम युक्ती त्वां केली ॥६६॥
तुज न्यावयासि आलों साचार । यास्तव गळां घातला हार ।
आतां देववितोसि सुळावर । माया अणुमात्र तुज नाहीं ॥६७॥
आतां जैसें चित्तीं असेल जाण । तैसेंचि देहासि येईल मरण ।
परी सर्वथा न सोडी तुझें स्मरण । मग स्वमुखें वचन बोलिले ॥६८॥
अभंग ॥ आकाश कडकडोनियां पाहे । कीं ब्रह्मगोळा भंगला जय ।
वडवानळ त्रिभुवन खाय । तैं तुझी वाट पाहे विठोबा ॥१॥
सप्तही समुद्र समरस होती । लय पावेल हे क्षिती।
पंचभूतें प्रळय पावती । तैं तूं माझा सांगाती विठोबा ॥२॥
भलतैसें पडो भारी । नाम न टळों निर्धारी ।
पतिव्रता प्राणेश्वरी । भानुदास म्हणे अवधारी विठोबा ॥३॥
ओव्या ॥ ऐसा निश्चय करोन तेथें । कंठ जाहला सद्गदित ।
तों तयासि पावले पंढरीनाथ । ते ऐका निजभक्त भाविकहो ॥६९॥
सूळ रोविला होता जेथ । त्यासि पल्लवशाखा फुटल्या बहुत ।
पुष्पीं फळीं सुशोभित । आश्चर्य वाटत सकळांसी ॥१७०॥
मूळ वृक्ष झाला म्हणवून । रायासि सांगती सेवक जन ।
ऐसें ऐकतांचि वचन । नृपनंदन दचकला ॥७१॥
राजा अनुताप धरोनियां । सत्वर चालिला पाहावया ।
तों भानुदास नेत्र झांकोनियां । पंढरीराया आठवित ॥७२॥
ऐसें देखोनि नृपवर । घालीत साष्टांग नमस्कार ।
म्हणे तूं निधडा वैष्णवीर । मी नेणेंचि पामर मूढमती ॥७३॥
भानुदास पाहे उघडोनि नेत्र । तों सूळाचा वृक्ष जाहला थोर ।
म्हणे मज पावला रुक्मिणीवर । अघटित विचार हा झाला ॥७४॥
भानुदासासि धरोनि हातीं । राउळासि घेऊनी येती भूपती ।
तों म्लानमुख पांडुरंगमूर्ती । अश्रु वाहती नेत्रांतूनी ॥७५॥
ऐसें देखोनि नृपवर । घातला साष्टांग नमस्कार ।
हात जोडोनि देवासमोर । मधुरोत्तरें विनवितसे ॥७६॥
म्हणे मी अपराधी नाना । तुझ्या भक्ताची केली छळणा ।
रामरायाची ऐकूनी करुणा । पंढरीराणा काय वदे ॥७७॥
आतां माझें रुप आठवूनि अंतरीं । सुखें राहावें आपुले नगरीं ।
आम्हीं भानुदासाच्या बरोबरी । जातों पंढरीं पाहावया ॥७८॥
यावरी आग्रह करिसील जर । तरी अनर्थ येथें होईल थोर ।
ऐसें वदता शार्ङगधर । निवांत नृपवर राहिला ॥७९॥
भानुदास म्हणे रुक्मिणीकांत । कैसा उपाय करावा आतां ।
माझी तों नाहीं राजसत्ता । मी मेळवूनी बहुतां तुज नेऊं ॥१८०॥
ऐसी ऐकूनि वचनोक्ती । लाघव करीत रुक्मिणीपती ।
तत्काळ लहान जाहली मूर्ती । विस्मित चित्तीं नृपनाथ ॥८१॥
भानुदास संतोष पावूनि मना । संबळीत घातला पंढरीराणा ।
जय श्रीविठ्ठल बोलोनि वचना । रुक्मिणी रमणा उचलिलें ॥८२॥
संबळी आडोनि जगजेठी । भानुदासासी बोले गुजगोष्टी ।
आज परमानंदे भरिली सृष्टी । होतील भेटीं संतांच्या ॥८३॥
ऐशारीतीं क्रमितां पंथ । भानुदास आले पंढरीसि त्वरित ।
पद्मतीर्थीं वैष्णवभक्त । उतरे स्नानार्थ ते समयीं ॥८४॥
धोत्रें धुवोनि ते वेळीं । वाळूं घालीत सरोवरपाळी ।
संबळीत होते वनमाळी । ते थोर तत्काळीं वाढले ॥८५॥
वरील पूड मस्तकावरी । तळीचें पायीं जाहलें चुरी ।
भानुदास विस्मित अंतरीं । मग रुक्मिणीवर काय म्हणे ॥८६॥
संत-महंत गरुड पारीं । वाट पाहाती निरंतरीं ।
तयां जाऊनि सांग सत्वरीं । येतील सामोरी मज आतां ॥८७॥
ऐसें सांगतां जगज्जीवन । भानुदास संतोषला मनें ।
गरुडापारीं सत्वर येऊन । हास्यवदन बोलत ॥८८॥
पद्मतीर्थ विठ्ठलमूर्ती । घेऊनि आलों मी निश्चितीं ।
ऐसी ऐकतांचि वचनोक्ती । उल्हास चित्तीं सकळांच्या ॥८९॥
शिबिका घेउनि सत्वर । चालिले सकळ सामोरे ।
दिंडया पताकांचे भार । मंगळ तुरे वाजती ॥१९०॥
वैष्णव करिती हरिकिर्तन । गाती नाचती प्रीती करुन ।
क्षेत्रवासी सकळ जन । थोर लहान चालिले ॥९१॥
म्हणती भानुदासाचा उपकार । आम्ही फेडावा कोठवर ।
धन्य हा निधडा वैष्णववीर । सारंगधर आणिला ॥९२॥
सकळ मंडळीसहि निश्चिती । पद्मतीर्थीं चालत येती ।
दृष्टीसि देखूनि पांडुरंगमूर्ती । सप्रेम घालिती दंडवत ॥९३॥
भानुदासानें लावून हात । शिबिकेंत घातला पंढरीनाथ ।
जयजयकारे गर्जती भक्त । बुक्का उधळित निज हस्तें ॥९४॥
ऐसा मिरवत रुक्मिणीपती । चंद्रभागेसि तेव्हां आणिती ।
स्नान घालोनि सत्वरगती । देउळाप्रति मग येत ॥९५॥
सुदिन मुहूर्त तये दिनीं । मूर्ति स्थापिली सिंहासनीं ।
तंव भानुदासासि कैवल्यदानीं । वरदवाणी बोलत ॥९६॥
न फिटे तुझा उपकार । दृष्टीसि दाविलें पंढरपुर ।
मी तुझें वंशीं अवतार । घेईन साचार निश्चिती ॥९७॥
ऐसें वदतां जगदुद्धार । भक्त गर्जती जयजयकार ।
क्षेत्रवासी नारी नर । आनंद थोर त्यासि जाहला ॥९८॥
अवर्षणीं पडला जैसा घन । कां शरीरांत आला मरणीं प्राण ।
तैसा उत्सव मानोनि मनें । लोक संतर्पण करिती ॥९९॥
आपुल्या मतें नरनारी । साकरा वांटिती घरोघरीं ।
वैष्णव येऊनि गरुडपारीं । कीर्तन गजरीं डुल्लती ॥२००॥
यापरी भानुदास आख्यान । गातसे ऐका जनार्दन ।
संतमहंत ऐकोनि कीर्तन । तटस्थ होऊन राहिले ॥१॥
आपला पूर्वज भानुदास । त्याचें चरित्र गायिलें सुरस ।
नादब्रह्मचि आलें मुसें । कीर्तनीं घोष करिताती ॥२॥
मग उजळोनि मंगळ आरती । वोवाळिला श्रीरुक्मिणीपती ।
तेथें दासानुदास महिपती । खिरापती वांटितसे ॥३॥
स्वस्ति श्री भक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।
प्रेमळ परिसोत भाविक भक्त । अष्टादशाध्याय रसाळ हा ॥२०४॥अध्याय।१८।अभंग।२।ओव्या॥२०४॥