श्रीगणेशाय नमः ।
तुझ्या नामावांचोनि निश्चिती । आणिक साधन नेणें श्रीपती ।
जप तप अनुष्ठान नानारीतीं । कांहींच मजप्रती कळेना ॥१॥
व्रत करावें यथा विधीनें । तरी अन्नावांचोनि व्याकूळ प्राण ।
जरी हिंडावें तीर्थाटण । तरी शक्तिहीन शरीर कीं ॥२॥
तुझी प्राप्ति व्हावया श्रीहरी । सत्पात्रीं दानें द्यावीं जरी ।
तरी धन नाहीं बहुत पदरीं । कैशापरी हें घडें ॥३॥
चराचर जें दिसतें कांहीं । तेथें तुजसि पहावें सर्वाठायीं ।
तरी गुणदोष दिसतो सर्वही । समता नाहीं चित्तांत ॥४॥
श्रुति अभ्यास करावा तत्त्वतां । तरी बाळ बुद्धि नसेचि आतां ।
अध्याय ग्रंथ पाहूं म्हणतां । तरी तेथें आस्था न बैसे ॥५॥
तुझ्या भक्तकथेची सांगड मोठी । सप्रेमभावें बांधिली पाठी ।
आतां पाहोनि कृपादृष्टी । पाववी जगजेठी पैलतीरा ॥६॥
मागिले अध्यायीं कथासार । अवलीस कांटा मोडला थोर ।
तो काढोनिया रुक्मिणीवर । तुकयासि सत्वर भेटले ॥७॥
गांवांत येऊनि वैष्णव भक्त । संतसेवेसि जाहला रत ।
तयांसि आदर करोनि बहुत । चरण प्रक्षाळित स्वहस्तें ॥८॥
तें तीर्थ घालितांचि वदनीं । ब्रह्मरस त्याहूनि गौण मानीं ।
सकळ तीर्थे संतांच्या चरणीं । निश्चय मनीं दृढ केला ॥९॥
तुळसी माळ सुमन हार । घालोनि पूजीत वैष्णववीर ।
तैसेंचि ब्राह्मण द्विजवर । तद्भावें आदर करी त्यांचा ॥१०॥
क्षुधित वैष्णव अथवा विप्र । तुकयांसि समाचार ।
तयांसि प्रयत्न करोनि फार । भोजन आदरें घालीतसे ॥११॥
संतसेवे परतें कांहीं । आणिक साधन सर्वथा नाहीं ।
त्यांच्या वचनासि या ठायीं । विश्वास जीवीं धरियेला ॥१२॥
संत गाती कीर्तनांत । त्याच्यामागें ध्रुपद धरित ।
तेणें सहजचि श्रवण होत । मग मननहीं करीत एकांतीं ॥१३॥
तुकयासि भेटला रुक्मिणीवर । तरी करितसे परोपकार ।
खडे झाडितसे आपल्या करें । जेथें वैष्णव वीर नाचती ॥१४॥
प्रसंग पाहोनियां देखा । कीर्तनांत धरितसे दिवटी तुका ।
न धरोनि लौकिकाची शंका । हरिनामें देखा जागवितसे ॥१५॥
कीर्तनी बैसती संतजन । त्यांचे पायतन करितसे जतन ।
जाते समयी पुढें ठेवून । करितसे नमन सद्भावें ॥१६॥
कीर्तनीं ध्रुपद धरितसे जेथे । अद्भुत रंग येतसे तेथें ।
प्रेमें कंठ होय सद्गदित । नेत्रीं अश्रुपात वाहती ॥१७॥
हरिनामें गर्जोनि देखा । सप्रेमभावें सांगे लोकां ।
माया मेली उरला तुका । विठोबा सखयाचि नामें ॥१८॥
उत्तम भक्ताचें लक्षण । श्रीभागवती बोलिले जाण ।
तुकयाच्या आंगींचें चिन्ह । एकही न्यून असेना ॥१९॥
देखोनि लोक म्हणती त्यास । तुकयासि लागले प्रेमपिसे ।
भलतीच बडबड करीतसे । उसंत नसे निशिदिनीं ॥२०॥
सत्यवादी परोपकारी । भूतदया वसे अंतरी ।
काम सांगती नरनारी । तें सत्वर करी निजांगें ॥२१॥
आर्त भूत पदार्थ इच्छी मानसीं । जवळी असतां देतसे त्यासी ।
काया वाचा आणि मनेंसी । न वंची कोणासी सर्वथा ॥२२॥
स्वमुखें लोकांसि सांगे ज्ञान । अहं ब्रह्मचि परिपूर्ण ।
परी कवडीसाठीं देती प्राण । तरी व्यर्थचि बोलणें तें गेलें ॥२३॥
तैसी तुकयाची नव्हे करणी । बोलिल्यासारिखें वर्ते जनी ।
आत्मवत अवघे विश्व मानी । द्वैत स्वप्नीं दिसेना ॥२४॥
आपुलें आणि घराचे तान्हे । रडतां देखोनि निज दृष्टींनें ।
दोहींची कळवळ तत्समान । हेंचि लक्षण संताचें ॥२५॥
आपुली धन संपत्ति निश्चित । तस्करीं हरिलीं एकोनि मात ।
चित्तीं खेद न आणी किंचित । त्यासीच संत म्हणावें ॥२६॥
रायें दीधले हिरे-रत्न । आणि रंकें आणिलें भाजी-पान ।
दोहींचें वाटे तत्समान । हेंचि लक्षण संताचें ॥२७॥
कीं नानाप्रकारें केली स्तुती । कोणी दुरुत्तरें बोलती ।
परी हर्ष शोक नुपजे चित्तीं । ऐसीच स्थिती तुकयाची ॥२८॥
तंव कोणे एके दिवसीं जाण । तुकयाची कांता करीत स्नान ।
एकचि वस्त्र होतें आड जुनें । तें ठेविलें चुणोन भिंतीवरी ॥२९॥
बाहेर बैसला वैष्णववीर । भजन करीत प्रेमादरें ।
विश्वीं भरला रुक्मिणीवर । त्याजविण दुसरें आन नाहीं ॥३०॥
तों एक दुर्बळ ब्राह्मणी येऊनि तेथें । तुकयासी काकुळती येत ।
एक वस्त्र देशील मातें । तरी पुण्य अगणित होईल कीं ॥३१॥
ब्राह्मण संसार कठीण फार । दुसरें पडदणीसि नाहीं वस्त्र ।
जुनें पानें असलें जर । तरी द्यावें सत्वर मज आतां ॥३२॥
ऐसें बोलतां ते ब्राह्मणी । दया उपजली तुकयाचें मनीं ।
खुणें दाखवी तिज लागुनी । वस्त्र घेउनि जा ह्मणे ॥३३॥
अवली परसांत स्नान करी । वस्त्र ठेविलें भिंतीवरी ।
ब्राह्मणी येऊनि ते अवसरीं । ओढोनि सत्वरी तें नेलें ॥३४॥
ब्राह्मणी संतोषली चित्तीं । ह्मणे सत्वशील याची वृत्ती ।
आशीर्वाद देतसे प्रीती । म्हणे रुक्मिणीपती तुज पावो ॥३५॥
तुका खुणावीत लवलाहें । बोलूं नको सत्वर जाय ।
ऐसीं सांगोनियां सोय । आपणही जाय सत्वर ॥३६॥
मग बैसोनि इंद्रायणीचें तीरीं । भजन करीत सप्रेम गजरी ।
इकडे मंदिरीं कैसी वर्तली परी । ते सादर चतुरीं परिसिजे ॥३७॥
स्नान करोनि जिजाबायी । वस्त्र पाहतसे ते समयीं ।
तों ठेविल्या जागीं दिसत नाहीं । विस्मित जीवी ते होय ॥३८॥
म्हणे माझें कर्म विपरीत । पुढें ओढवलें बळवंत ।
वस्त्र नेलें देखत देखत । कल्पना मनांत आणितसे ॥३९॥
बुबायी दासी नाहीं घरीं । शेणी आणावयासि गेली दुरी ।
गंगा तान्ही खेळे बाहेरी । विस्मित अंतरीं होतसे ॥४०॥
महादेव स्नानासि गेला जाण । सवें विठोबासि घेऊन ।
वडिलांचें लक्षण धरिलें त्यानें । वाढ वेळ जाऊन बैसला ॥४१॥
कोढयाचें कोढीन होय निश्चिती । पांच डाग तरी आंगीं दिसती ।
म्हणोनि खाण तैसी माती । आहाणा बोलती जनांत ॥४२॥
काशी भागीरथी शाहण्या दोन्ही । सासुर्या गेल्या जैंपासुनी ।
घरीं रक्षण नसेचि कोणी । देतसे उचलोनि भलत्यासी ॥४३॥
दादुला बैसला होता सदनीं । वस्त्र मागत होती ब्राह्मणी ।
तिचा आहांच शब्दध्वनी । म्यांही श्रवणीं ऐकिला ॥४४॥
पिशानें चव सांडिली बरी । धडचि घातलें कांटयावरी ।
एकचि वस्त्र होतें घरीं । तें देऊनि त्वरीत पळाला ॥४५॥
मेला काळतोंडा साजणी । यास्तव गेला चुकवोनि ।
जैसा वृश्चिक अन्याय करोनि । बैसे लपोनि आड कोठें ॥४६॥
येर्हवीं बाहेर जातांचि देखा । काळ्याच्या नांवें मारितो हांका ।
यास्तव आज राहिला मुका । अन्याय निका आठवोनि ॥४७॥
चोरटा खाणोरी साचार । पाठीं बसोनि साधिलें वैर ।
पती नोहे हा दावेदार । पूर्वील जन्मांतर साधिलें ॥४८॥
कैंची रांड आली ब्राह्मणी । वस्त्र दीधलें तिज लागोनि ।
मजसी न बोलतां गेला रानीं । चुकवोनी बैसला ॥४९॥
माझ्या पित्या आपाजीनें । वस्त्र घेतलें होतें जाण ।
याच्या जोडीचें कधीं अन्न । खादलेंचि नेणें सर्वथा ॥५०॥
कंठीं बांधोनि काळे मणी । फुकटचि मेला जाहला धणी ।
ठाउकी आहे त्याची करणी । दिवाळें काढोनि बैसला ॥५१॥
अन्न अन्न करितां देख । दुष्काळीं बाईल मेली एक ।
त्याची लाज न धरी विवेक । जनासि मुख दाखवितो ॥५२॥
रखुमाईच्या सुकृत होतें पदरीं । गेली माझ्या अगोदरी ।
माझी विपत्ति होणार भारी । यास्तव संसारीं वांचलें ॥५३॥
आतां घरांत जावें देख । तरी समोर वागती गांवींचें लोक ।
उपाय कांहीं न सुचे आणिक । करीतसे शोक यासाठीं ॥५४॥
तों शरीरसंबंधी आणि व्याही । मिळोनि लग्नासि जाती पाहीं ।
ते बोलावावयासि आले सर्वही । म्हणती जिजायी बाहेर या ॥५५॥
ऐसें बोलोनियां वचन । घरांत प्रवेशले अवघे जन ।
अवली शिळेवरी बैसली नग्न । लज्जित मन होऊनियां ॥५६॥
म्हणे आतां दावेदार असता घरीं । तरीच डकणा मारितें मुखावरी ।
काय करावें ये अवसरीं । उपाय अंतरीं सुचेना ॥५७॥
पिशुन सन्निध पातले त्वरित । तेणें भयाग्नि पेटत ।
शोक स्नेह त्यावरी पडत । धडकला बहुत त्याचेनी ॥५८॥
प्रीतीच्या इंधनें प्रदीप्त जाहला । मोहाच्या वातें खवळला ।
लज्जेच्या आंगीं लागती ज्वाळा । चित्तीं व्याकुळ होतसे ॥५९॥
त्रितापें अग्नि जाळितसे पाहीं । अवली म्हणे मी करुं कायी ।
तों सत्वर धांवोनि विठाबायी । कौतुक कायी तें केलें ॥६०॥
मागें प्रावरणाचा पीतांबर । सत्वर टाकिला तिजवर ।
लज्जा रक्षी रुक्मिणीवर । करुणाकर दासाचा ॥६१॥
मजला भासे ऐशारीतीं । त्रितापें अवली जळत होती ।
तिजवरी मेघ रुक्मिणीपती । सत्वर गती वोळला ॥६२॥
दिव्य वस्त्र देखोनि नयनीं । विस्मित जाहली आपुलें मनीं ।
म्हणे हे काळ्याची दिसते करणी । त्याजवीण कोणी करीना ॥६३॥
दाखवितो नाना चमत्कार । तरी मज काय त्याचा उपकार ।
वेडा केला निजभ्रतार । म्हणोनि वारंवार सांभाळी ॥६४॥
दिव्य वस्त्र सत्वर नेसून । घरांत गेली नलगतां क्षण ।
मंदिरीं प्रकाश पडे तेणें । आश्चर्य पिशुन ते करिती ॥६५॥
म्हणती महावस्त्रें देखिली फार । परी ऐसें पाहिलें नाहीं अंबर ।
तुकयानें बुडवोनि कोणाचें घर । कांतेसि पीतांबर घेतला ॥६६॥
घरांत घरकूल करोनि देखा । बाहेर आबावें दाखवी लोकां ।
आतां बकध्यान धरिलें देखा । दिसतो तुका वैरागी ॥६७॥
पीतांबराची पाहतां दीप्ती । तेणें आमुचे नेत्र झांकती।
परिमळ न समाये मंदिराप्रती । विस्मित चित्तीं ते झाले ॥६८॥
एक म्हणती पेटारीत । हें वस्त्र आजवरी ठेविलें गुप्त ।
आतां नेसावया काढी त्वरित । न कळेचि अंत तुकयाचा ॥६९॥
ऐसें बोलोनि येरयेरां । जिजायीस म्हणती त्या अवसरा ।
तुमचा वृत्तांत आहे कीं बरा । लग्नासि त्वरा चलावें ॥७०॥
अवली म्हणतसे ते समयीं । आमुचा वृत्तांत विदित नाहीं ।
संसार आशा टाकूनि सर्वही । भ्रतार विदेही जाहला कीं ॥७१॥
ऐसें सांगतां जिजाबायी । पिशुन म्हणती ते समयीं ।
लग्नासि याल किंवा नाहीं । हें लवलाहीं सांगावें ॥७२॥
जाणोनि दुर्बल संसार । म्हणती हे कोठोनि आणील अहेर ।
आशाबद्ध पिशुन सर्वत्र । वरिवरी आदर करिताती ॥७३॥
जैसी अभ्रच्छाया अशाश्वत । क्षण लोटतां नाहीच होत ।
कीं उष्णता लागतां किंचित । पतंगी उडत रंग जैसा ॥७४॥
नातरी बकाचें ध्यान निश्चित । एकनिष्ठ दुरोनि दिसत ।
कीं नटाची जाया सुंदर होत । तिजसी एकांत करुं नये ॥७५॥
कीं पुंगळ वेलीचें सुमन । नेत्रासि साजिरे दुरुन ।
नाकासि लावितां दुर्गंधि घाण । कंटाळे मन ज्यारीती ॥७६॥
नातरी मुलाम्याची मोहर । आंत अवघेचि भरलें ताम्र ।
तैसा पिशुनाचा आदर । वरिच्यावर जाणावा ॥७७॥
परम अनास्था जाणोनि चित्तीं । अवली तयांसि उत्तर देती ।
अनुकूल पडलें संसार हातीं । तरी मानून निश्चिती येईन मी ॥७८॥
टाकणें टाकूनि ऐशापरी । पिशून गेलें ते अवसरीं ।
पुढें चरित्र वर्तले ते परी । सादर चतुरी परिसिजे ॥७९॥
ब्राह्मणांसि चोरोनि दिधलें वस्त्र । अवली बोले दुरुत्तर ।
यास्तव तुका वैष्णववीर । गेला सत्वर वनांत ॥८०॥
बैसोनियां सहज स्थिती । ध्यानांत आणुनि पांडुरंग मूर्ती ।
म्हणे देवाधिदेवा रुक्मिणीपती । माझी विनंती अवधारीं ॥८१॥
सकळ दुरितांचा करोनि मेळा । त्याचा निर्माण जाहलों पुतळा ।
पतित पावना दीनदयाळा । निवेदन तुजला असों दे ॥८२॥
मी सकळ पातकांची राशी । परी सेवा चोर पायांपासीं ।
परी मानखंडणा होईल जैसी । तो दंड मजसी करीं देवा ॥८३॥
मी तुमचा म्हणवितों वरवर । धूळ माती केला संसार ।
परी तुका दोहींकडे चोर । जाणसी अंतर विठोबा ॥८४॥
ऐसा अनुताप धरोनि चित्तीं । भजन करीत प्रेमगती ।
मग चार घटिका लोटतां राती । देउळाप्रती येतसे ॥८५॥
हातीं दगडाचा घेऊनि टाळ । सप्रेम नाचे तये वेळ ।
सन्निध घर होतें जवळ । अवली सकळे म्हणे आला ॥८६॥
देवें नेसविला पीतांबर । यास्तव राग केला दूर ।
मग लेंकीहातीं भाजी भाकर । तुकयासि सत्वर पाठविली ॥८७॥
तो स्वल्प आहार सेवोनि प्रीतीं । कीर्तनीं उभा सप्रेम युक्ती ।
कोणी भाविक लोक येती । गाती ऐकती हरिकथा ॥८८॥
दोन प्रहरपर्यंत जाण । तुकयानें देउळी केलें कीर्तन ।
तोंपर्यंत होते जन । मग गेले उठोन घरासी ॥८९॥
परी तुका न निजे निश्चिती । देउळीं बैसला एकांतीं ।
संतवाक्य म्हणतसे प्रीतीं । पाठांतर असती अभंग जे ॥९०॥
दिवसां सेवितसे वनांतर । रात्रीं कीर्तन दोन प्रहर ।
डुकली येतसे वारंवार । परी चोळोनि नेत्र उघडीतसे ॥९१॥
साधक टाकूनि अहंकार । पावले आत्म साक्षात्कार ।
परी देह स्वभावासि न पडे अंतर । मागिल्या भरें चालतसे ॥९२॥
जैसा कापूर जळालियावरी । मागें सुगंध राहे क्षणभरी ।
तैसा देह अहंता गेल्यावरी । इंद्रियें व्यापारीं राहाटती ॥९३॥
नातरी चक्र भवंडीत कुंभार । तो दंड काढोनि घेतल्या सत्वर ।
परी मागील आंगीं असतां वारें । तें चक्र फिरे गरगरां ॥९४॥
कींवा हटुळी राहिल्या साचार । परी क्षणभरी डोलती तरुवर ।
मेघ वोसरल्या दिवस चार । बोल थोर त्या मागें ॥९५॥
वासरमणीं मावळल्या पाहे । चार घटिका प्रकाश राहे ।
तो एकाएकींच जाईल काय । देहस्वभाव तयाचा ॥९६॥
म्हणवोनि तुकयासि साचार । निद्रा येतसे वारंवार ।
तीस जिंतावया सत्वर । वैष्णव वीर काय करी ॥९७॥
शेंडीसी बांधोनियां दोरी । आपुल्या हातें टांगी वरी ।
म्हणे मानेसि आसडा बैसल्यावरी । मग निद्रा दुरी पळेल हे ॥९८॥
चार दिवस करितां ऐसें । निद्रा जिंतिली निःशेषें ।
सर्वथा चित्तीं नये आळस । केलें तयास देशधडी ॥९९॥
न ऐकावें तें नायकती कान । न पहावें तें न देखती नयन ।
न बोलावें तें जिव्हेसि ज्ञान । स्वभाव गुण तुकयाचे ॥१००॥
शाश्वतीं स्थिर नव्हेचि मन । हातासि न मिळे विष्णुअर्चन ।
परोपकारीं धांवती चरण । अगणित पुण्य म्हणोनियां ॥१॥
परोपकारीं जो कां नर । शुद्ध असेल जन्मांतर ।
तरी पुढें अरोग होय शरीर । ते नाना उपचार भोगिती ॥२॥
तुकयाची तो निष्काम वृत्ती । प्राप्त व्हावया रुक्मिणीपती ।
परोपकारीं वेंचितसें शक्ती । कैशा रीतीं तें ऐका ॥३॥
कोणी पांथस्य वाटेवरी । अकस्मात गांठ पडली जरी ।
त्याचें ओझें घेऊनि शिरीं । विसांवा क्षणभरी त्यास द्यावा ॥४॥
पर्जन्य मार्गी लागतां सबळ । पांथस्थ गांवांत पाहती स्थळ ।
तयांसि दाखवी चावडी देऊळ । नातरीं तत्काळ ने घरां ॥५॥
पंथ क्रमितांचि लवलाहें । यात्रेकर्याचे सुजले पाय ।
मग उष्ण पाणी करोनि पाहे । रगडित देह निजांगें ॥६॥
गायी वृषभांसि निर्बळपाणी । मोकलोनि देती निर्दय धनी ।
तयांसि हातें कुरवाळोनि । चारा-पाणी घालीतसे ॥७॥
मैदा साकर आणि घृत । एके जागीं करोनि ठेवित ।
मुंगियांच्या घांवीं घालित । ईश्वर प्रीत्यर्थ नित्यकाळीं ॥८॥
अणुरेणु पर्यंत जाणा । भूतमात्रीं धरितसे करुणा ।
हिंसा घडे तें कर्म जाणा । सहसाही मना नावडे ॥९॥
परी चातां हालतां दिसे जवळी । ते रगडेल अवचित पापातळीं ।
यास्तव जीव कळवळी । जैसी मासोळी उदकावीण ॥१०॥
उष्णकाळीं झालिया उबारा । कीर्तनामाजी घालितसे वारा ।
अन्न न मिळतां क्षुधातुरा । प्रयत्ने मेळवुन दे त्यासी ॥११॥
उष्णकाळीं जीवन वाटेवर । नसतां उपाय करितसे थोर ।
घागर भरोनि सत्वर । मार्गावर नें तेथें ॥१२॥
वाचा तप हेंचि थोर । असत्य न बोले सर्वथा उत्तर ।
परोपकारीं वेंची शरीर । आळस अणुमात्र असेना ॥१३॥
पांथस्थासि व्याधी मार्गी होत । जवळीं नसतां सुहृद आप्त ।
तयासि राहवोनि देऊळांत । औषध पथ्य करवीतसे ॥१४॥
जडभरत वर्णिला भागवतीं । तैसी तुकयाची जाहली स्थिती ।
संसारिक काबाड काम सांगती । तें सत्वरगती करीतसे ॥१५॥
ममता लोभ सांडोनि त्वरित । सांगील तें सत्वर करित ।
एक इंद्रायणीच्या तटांत । भजन करित बैसला ॥१६॥
तों नवलाख्याच्या उंचबार्यांत । बाजारा व्यवसायी जात होते ।
तें विनोदें म्हणती तुकयातें । आम्हां सांगातें चाल आतां ॥१७॥
अवश्य म्हणवोनि भक्तवैष्णव । सत्वर जातसे तयांसवें ।
भजन करीत सप्रेमभावें । उगें नसावें क्षणभरी ॥१८॥
तों एक दुर्बळ म्हातारी ब्राह्मणीन । शरीर जाहलें भक्तिहीन ।
बाजारासि जातसे जाण । काठी टेंकून हळूहळू ॥१९॥
तें तुकयानें देखोनि दृष्टीसी । दया उपजली चित्तासी ।
म्हणे माते तूं बहु श्रमलीसी । तरी माझे पाठीसी बैस आतां ॥१२०॥
ऐकोनि तुकयाची वाणी । काय म्हणतसे ब्राह्मणी ।
माझें तेल देशील आणुनी । तरी परतोनि मी जातें ॥२१॥
अवश्य म्हणतां प्रेमळभक्त । संतोषलें तिचें चित्त ।
तुकया स्वाधीन पैसे करीत । पात्रही देत बरोबरी ॥२२॥
म्हातारी परतोनि गेली घरां । सुख जाहलें तिच्या अंतरा ।
तुका जातसे बाजारा । परोपकारा कारणें ॥२३॥
तेथें व्यवसायी काम सांगती । तें करुं लागे तयांप्रती ।
आणि भजन करी सप्रेम युक्ती । सात्विक युक्ती बाणली ॥२४॥
तेल घेऊनि दुसरें दिवसीं । आणूनि दीधलें ब्राह्मणीसी ।
ते म्हणे उपकार फेडावयासी । कांहींच मजपासीं असेना ॥२५॥
कांहीं दिवस लोटतां जान । मग ते स्वमुखें सांग जना ।
एक नवल वाटतें माझ्या मना । सांगावें कोणा निज मुखें ॥२६॥
आठ दिवसांचें तेल निश्चित । तुकया हातें आणविलें होतें ।
परी तें गेलें दिवस बहुत । नवल वाटतें मजलागीं ॥२७॥
ऐसे बोलतां ते ब्राह्मणी । मात फांकली कानोकानीं ।
म्हणे तुका तेल देतो आणुनी । तें बहुत दिवस जातसे ॥२८॥
एक म्हणती सदैव खरा । घरीं खावया न मिळें पोरां ।
अन्नावीण मेली दारा । परी त्याच्या अंतर लाज नाहीं ॥२९॥
कोणी चमत्कार पाहती । तुकया हातीं तेल आणविती ।
तें बहुत दिवस गेलें म्हणती । आश्चर्य चित्तीं वाटलें त्यां ॥१३०॥
आशाबद्ध जन त्या अवसरा । म्हणती तुकशेट जाउनि बाजारा ।
तेल आणोनि द्यावें घरा । तुमचा उपकारा न विसरों ॥३१॥
बरें मायबाप बोले उत्तर । नळे आणूनि दीधले फार ।
गळ्यांत पिशवी बांधिला दोर । त्यांत पैसे सर्वत्र टाकिती ॥३२॥
मार्गावरील गांव कोणी । वृत्तांत कळतां त्यालागुनी ।
पात्र पैसे देती आणोनि । परी तूकयासि मनीं संतोष ॥३३॥
कांहीं नळे घेतले हातीं । कोणी गळ्यांत आडकविती ।
परी तुकयासि उबग नये चित्तीं । विदेह स्थिती जाहला ॥३४॥
मग बाजारीं सत्वर जाऊन । तेलियाचे पाहिलें दुकान ।
नळे पैसे त्याच्या स्वाधीन । करीत संपूर्ण तेधवां ॥३५॥
तेली पुसे तुकयाप्रती । कोणते पात्रीं घालूं किती ।
तुका म्हणे हें न कळे मजप्रती । कळेल युक्ती ते करी ॥३६॥
ऐसें तयासि वचन बोलत । तो आणिक व्यवसायी हांक मारित ।
तुक्या पालें देऊं लाग त्वरित । उशीर बहुत जाहला ॥३७॥
परम हरिखें ते अवसरीं । त्यांची ओझीं वाहतसे शिरीं ।
हातीं खडे झाडितसें सत्वरी । पालें बाजारी देऊं लागे ॥३८॥
जो जें जैसें काम सांगत । तितुकें करी वैष्णवभक्त ।
चारा-पाणी आणोनि देत । पाठाळें बांधित निजांगे ॥३९॥
भूतमात्रीं पाहूनि देवा । अश्वाचीही करीत सेवा ।
तुका आवडें सर्वत्र जीवा । कोणासि न व्हावा हें नाहीं ॥१४०॥
रात्रि समय होतांचि जाण । देउळांत जाऊनि करी कीर्तन ।
भाविक सप्रेम करीत श्रवण । अनुताप मना होय त्यांच्या ॥४१॥
प्रातःकाळ होतांचि देखा । तों व्यवसायी मारिती हांका ।
तयांचा शब्द ऐकोनि निका । येतसे तुका धांवोनि ॥४२॥
सप्रेम नामस्मरण करीत । ऐको जातसे गांवांत ।
म्हणे हरिस्मरणावीण सत्य । संसार व्यर्थ दवडूं नका ॥४३॥
ओझी बांधोनि सत्वरगती । उचलूं लागे सकळांप्रती ।
काम सांगता नानारीती । उबग चित्तीं मानीना ॥४४॥
मग तेलियापासीं जातां सत्वर । तो म्हणे स्नेह घातलें बरोबर ।
आवश्य म्हणे वैष्णववीर । घेऊनि सत्वर चालिला ॥४५॥
मार्गीचें लोक जपत बैसती । आपुलाली पात्रें ओळखूनि नेती ।
परी कौतुक करितसे रुक्मिणीपती । ते सादर श्रोती परिसावें ॥४६॥
नळयांत तेल घातले समान । हें तुका सर्वथा वाटूं नेणे ।
परी जितुकें ज्याचें द्रव्यजाण । त्याच्या धारणें त्यासि दिसे ॥४७॥
जैसे अनंत प्राणी येथें मरती । त्या देहांची एकवट होय माती ।
परी पुढिले जन्मी नानारीतीं । संचितें निवडती वेगळाली ॥४८॥
त्या पृथ्वी ऐसीच समता पाहीं । बाणली तुकयाचे ठायी ।
अधिक उणेंचि न दिसे कांहीं । परी शेषशायी निवडित ॥४९॥
संताचा तों समान भाव । सारिता तयासि रंगराव ।
परी प्रारब्ध नेमूनि देवाधिदेव । दरिद्र वैभव भोगवी ॥१५०॥
आतां असो वैष्णवभक्त । प्रवेशतां देहू गांवांत ।
मग राउळासि जाऊनि । त्वरित घाली दंडवत सद्भावे ॥५१॥
सांवळा श्रीरंग पाहोनि नयनीं । परमानंद वाटे मनीं ।
जैसी तान्हयासि भेटतां जननी । उल्हास मनी तियेच्या ॥५२॥
मग लोक येऊनि सत्वरगती । आपुलाले नळे ओळखोनि नेती ।
ते अवलीने देखोनि निश्चिती । अपशब्दे काय तेव्हां ॥५३॥
म्हणे हे मेले लोक दुर्मती । वेडा जाहलासे माझा पती ।
त्या पिशाचा हातीं कोलित देती । काम सांगती आपुलें ॥५४॥
एका वृषभाचें ओझें निश्चिती । मनुष्या हातीं हे आणविती ।
मरोनि गेलिया माझा पती । संतोष पावती मग तेव्हां ॥५५॥
अवली भांडतां ऐशारीतीं । कोणी तिजला उत्तर देती ।
लोकांचें न ऐकतां तुझा पती । तरी ते सांगती कासया ॥५६॥
ज्याचा कां सद्गुण विशेष । तेणेंचि बंधन होतसे त्यास ।
वनगायीचें पुच्छ शुभ्र दिसे । यास्तव तयास तोडिती ॥५७॥
रावा शिकविलिया नायके मात । तरी पिंजरियांत बंधन कासया होतें ।
ज्याचा सद्गुण त्यास बाधित । समज चित्तांत आपुल्या ॥५८॥
दर्वेशानें सांगतां साचार । सलाम लोकांसि करी वानर ।
यास्तव बंधन पावोनि थोर । घरोघरीं हिंडविती ॥५९॥
म्हणोनि ऐके जिजाबायी । तुझा भ्रतार जाहला विदेही ।
सांगीतलें एके लवलाही । तरी लोकासि कायी बोल आतां ॥१६०॥
याच्या हातें पुरतें तेल साचार । हा बहुतांसि आला चमत्कार ।
म्हणवूनि नळे देऊनि फार । तेल वारंवार आणविती ॥३१॥
तुका विदेही दिसतो वेडा । आणि आम्हासि बोल कां येवढा ।
आपुला असतां दाम कुडा । मग पराव्यासि झगडा कासया ॥६२॥
ऐसी ऐकोनियां दृष्टांत मात । अवली राहिली मग निवांत ।
म्हणे खोटें आहे माझें संचित । जाहली जनांत फजीती ॥६३॥
तुकयाची तो ऐसी स्थिती । स्त्रीजात मानी प्रकृती ।
पुरुष ते पांडुरंग भासती । करुणा भूतीं यास्तव ॥६४॥
प्रातःकाळीं उठोनि जाण । ब्राह्मणांचे घरीं वाहे जीवन ।
आंगण ओसरी झाडून । सडासंमार्जन घालितसे ॥६५॥
हिंसक पक्षी धरिती फार । तुकयाचे दृष्टीसि पडले जर ।
तयांसि बोलोनि नम्र उत्तर । नाना प्रकारें सोडवी ॥६६॥
साधु संतांचा विक्रित दास । पायवणी प्रीतीनें घेत असे ।
त्यांच्या उच्छिष्टा पुढें दिसे । ब्रह्मरस उणाची ॥६७॥
श्रीभागवतामाजी जाण । बोलिलीं भक्तांचीं लक्षणें ।
तुकयाचे आंगीं तितुकीं चिन्हें । एकही उणें असेना ॥६८॥
अवली तों अविद्या साचार । तुका तिजपासूनि जाहला दूर ।
म्हणवोनि भांडे दिवसरात्र । कठिणोत्तरें बोलोनियां ॥६९॥
एके दिवशीं जिजाबायी निश्चित । तुकयाप्रती काय बोलत ।
आजि तुझ्या वडिलांची पुण्यतीथ । साहित्य किंचित असेना ॥१७०॥
ऐकोनि म्हणे वैष्णववीर । मी रानांत जावोनि सत्वर ।
भाजी आणोनि देतों फार । ते शिजवोनि पितर जेववी ॥७१॥
ऐसें म्हणोनि प्रेमळ तुका । विठ्ठलनामें मारितसे हांका ।
मग रानांत जाऊनियां देखा । वैकुंठनायका आठवी ॥७१॥
ध्यानांत आणोनि पांडुरंगमूर्ति । लाविलीं दोन्ही नेत्रपातीं ।
प्रेमभरित होऊनि चित्तीं । करुणा एकांतीं भाकीतसे ॥७३॥
म्हणे जयजयाजी रुक्मिणीवरा । भक्तवत्सला कृपासागरा ।
पतितपावना दीनोद्धारा । करुणाकरा श्रीविठ्ठला ॥७४॥
काया वाचा मनें निश्चित । मी तुझा जाहलों शरणागत ।
तूंचि माझा जिवलग आप्त । नाना घात चुकविती ॥७५॥
संसाराची भरोवरी । मागें केली बहुतापरी ।
तो अधिकचि दुःखांचियापरीं । नाना प्रकारीं देखिल्या ॥७६॥
नाशवंताची सांडोनि आस्था । तुज शरण मी रुक्मिणीकांता ।
सर्व भार तुझिया माथा । करिशील आतां तें करी ॥७७॥
ऐसें म्हणोनि ते वेळ । पुढें चालिला भक्त प्रेमळ ।
तों गहूं पिकला असे प्रबळ । मजूर सकळ संवंगिती ॥७८॥
ते तुकयासी विनोदें म्हणती पाहीं । गहूं उपडी कां लवलाहीं ।
ऐसें ऐकोनि ते समयीं । अवश्य विदेही म्हणतसे ॥७९॥
मजुरांच्या बरोबरी । आपण पाथ धरिली दुसरी ।
सप्रेम नामाचिया गजरीं । तुकया करी संवंगणी ॥१८०॥
वरकड कामा करिती कुचर । परी त्यांजपुढें जात वैष्णववीर ।
तुकयाचें शुद्ध अंतर । अंग अणुमात्र न राखी ॥८१॥
परी भाजी आणावयासि आलों वनीं । घरीं वाट पाहील राणी ।
हा आठव तुकया लगोनी । सर्वथा मनीं न होय ॥८२॥
नामरुपीं जडलें चित्त । म्हणोनि जाहली विदेहि स्थित ।
प्रेमाचें भोजन नित्य करित । धष्टपुष्ट दिसतसे ॥८३॥
असो इकडे ते अवसरीं । कांता शिव्या देतसे घरीं ।
म्हणे मेला चोरटा खाणोरी । गेला बाहेरीं उठोनियां ॥८४॥
मी कोणाची बाईल होऊन । घरीं पुरवूं वस्त्र अन्न ।
घरीं पितर सांगितले जाण । आपण तों वन हिंडतसे ॥८५॥
लोकांचे कष्ट करावयासी । बहुत बळ येतसे त्यासी ।
परी ऋणानुबंध नाहीं मजसी । आतां संसारासि काय करुं ॥८६॥
ऐशी तुकयाची कांता । आपुले घरीं करितसे चिंता ।
करुणा आली पंढरीनाथा । म्हणे साहित्य आतां करावें ॥८७॥
निज भक्ताचें पडतां उणें । तरीं तें आपुल्यासि अश्लाध्य वाणें ।
दासांचे दासत्व लागे करणें । जें अनन्य भावें अनुसरले ॥८८॥
ऐसें म्हणोनियां चित्तीं । तुकयाचें रुप धरी श्रीपती ।
सामग्रीची मोट मस्तकावरती । सदना प्रती येतसे ॥८९॥
जें योगियांचें निज ध्यान । नीलग्रीवाचें देवतार्चन ।
तो निज भक्ताचें पडतां उणें । नाठवी थोरपणा सर्वथा ॥१९०॥
जों कां क्षीरसागर विहारी । लक्ष्मी ज्याचे चरण चुरी ।
तो सामग्रीची मोट शिरावरी । घेत श्रीहरी निजांगें ॥९१॥
ब्रह्मादिक महर्षि थोर । जयासि ध्याती दिवस रात्र ।
तो भक्त कैवारी राजीवनेत्र । थोरपणे अणुमात्र धरीना ॥९२॥
अष्टसिद्धि सहित देखा । इंदिरा ज्याची आज्ञाधारका ।
तो निजांगें कष्ट करी अनेक । वैकुंठनायक जगद्गुरु ॥९३॥
मोट उतरोनि ते अवसरीं । अवलीस म्हणतसे श्रीहरी ।
सामग्री काढोनि घे सत्वरी । स्वयंपाक करी निजहस्तें ॥९४॥
आम्ही बाहेर जाऊनि सत्वर । भांडी मेळवोनि आणितों चार ।
ऐसें म्हणवोनि सारंगधर । उठतसे सत्वर तेधवां ॥९५॥
जिजाबाई बाहेर येत । मोट सोडोनि जंव पाहत ।
तों सर्व सामग्री आहे त्यांत । नवल वाटत तिजलागीं ॥९६॥
कणीक डाळ घृत तांदुळ । शर्करा शाखा आणि गूळ ।
जिरें सुंठ मिरें सकळ । देखे तत्काळ दृष्टीनें ॥९७॥
साहित्य घेऊनि ते समयीं । स्वयंपाकासि निघे जिजाबायी ।
तों भांडी मेळवोनि लवलाहीं । शेषशायी पातले ॥९८॥
मग गांवांत जावोनि घरोघर । आमंत्रण देत सारंगधर ।
आमुच्या घरीं आहेत पितर । यावें सत्वर भोजना ॥९९॥
ऐसें बोलतां जगज्जीवन । लोक आश्चर्य करिती जाण ।
म्हणती आज तुकयानें । घातलें मन संसारीं ॥२००॥
एक म्हणती शाश्वत कायी । घरीं साहित्य किंचित नाहीं ।
तुका अविचारी विदेही । गांव सर्वही सांगितला ।
असो यापरी त्रिविधजन । नानापरी बोलती वचन ।
म्हणती लटक्याचें आमंत्रण । जेविल्यावांचोन साच नाहीं ॥२॥
तों दिवस आला दोन प्रहर । पाकनिष्पत्ति जाहली सत्वर ।
देवें हिंडोनि घरोघर । भोजनासि सर्वत्र पाचारिलें ॥३॥
इंद्रायणी तीरी जावोंन । सर्व आले करोनि स्नान ।
देवें तयांसि देवोनि आसन । निजांगें पूजन करितसे ॥४॥
सर्व धर्म टाकोनि निश्चित । जे भक्त अनन्य शरण येत ।
त्यांची सत्कर्मे पूर्ण करित । रुक्मिणीकांत कृपाळू ॥५॥
पादपूजा बुका गंध तुळशी । निजांगें करीत हृषीकेशी ।
जिजाई वाढी तयांसी । उल्हास मानसीं धरुनियां ॥६॥
जे जे पदार्थ केले सर्वही । ते ते पात्रीं वाढिले लवलाहीं ।
घृत वाढोनि शेषशायी । संकल्प पाहीं सोडित ॥७॥
साहित्य करितां लक्ष्मीवर । तें अन्न लागे रुचिकर ।
लोक जेविती पोटभर । घ्यावया नीर ठाव नाहीं ॥९॥
लीलानाटकि जगदुद्धार । प्रार्थना करीत वारंवार ।
जें जया रुचे तें सत्वर । अन्न ग्राह्य करावें ॥९॥
करशुद्धि घेताचि त्याणीं । विडे दीधले त्रयोदश गुणी ।
लोक आश्चर्य करोनि मनी । अवली लागूनी बोलती ॥२१०॥
म्हणती जिजाबाई आजपासुन । संसार चिंता न करणें ।
तुकयानें प्रपंचांत मन । घातलें दिसोन येतसे ॥११॥
ऐसें ऐकोनि ते समयी । अवली म्हणे भरंवसा नाहीं ।
लोक घरासि गेले सर्वही। संतोष जीवीं मानोनियां ॥१२॥
आणीक अन्नार्थी लोक बहुत । महारपोरें मागावयासि येत ।
तयांसि अन्नें काढिलीं बहुत । रुक्मिणीकांतें तेधवां ॥१३॥
अवली म्हणे चित्तांत । अन्नासि बरकत आला बहुत ।
मग भांडीं गोळा करुनि समस्त । रुक्मिणीकांत काय म्हणे ॥१४॥
पात्रें आणिलीं मागून । ती ज्यांची त्यास देतों नेऊन ।
मग निश्चितपणें करुं भोजन । उतावेळ मन न व्हावें ॥१५॥
इंद्रायणीच्या जळांत । पात्रें प्रक्षाळूनि समस्त ।
ज्यांचीं त्यांस नेऊनि देत । अदृश्य होत जगदात्मा ॥१६॥
इकडे तुका वैष्णववीर । निजांगें गहू उपडला फार ।
शेतकरीयाणें कृत उपकार । पेंढया चार दीधल्या ॥१७॥
त्या घेऊनि मस्तकावरी । परतोनि येतसे घरी ।
तों मोहाळासि कुसळ लागतांवरी । त्या माशा सत्वरी ऊठल्या ॥१८॥
शरीरीं झोंबल्या समस्त । परी तुका न उडवी कोणातें ।
म्हणे हा देह नाशवंत । परोपकारार्थ वेचावा ॥१९॥
कीं आजि वडिलांची पुण्यतीथ । ते मक्षिकारुपें आले समस्त ।
म्हणवोनि वैष्णवभक्त । ब्रह्मार्पण सोडित देहाचें ॥२२०॥
ऐसा देखोनि निश्चय अंतरीं । तेथें गुप्तरुपें पातले श्रीहरी ।
माशा उडवोनि वरच्यावरी । सौख्य शरीरी दीधलें ॥२१॥
मग घरासि येऊनि प्रेमळभक्त । कांतेप्रती काय बोलत ।
याचा सांजा भरडोनि त्वरित । भोजन पितराते घाली कां ॥२२॥
अवली तुकयासि बोलताहे । म्हणे वेड लागले काय ।
तुम्हीच करविले सकळ ठाय । मग स्वयंपाक लवलाहें दाखविला ॥२३॥
सांगितलें आद्यंत वर्तमान । ऐकोनि तुकया विस्मित मन ।
अश्रुपातें भरले नयन । म्हणे जगज्जीवन कष्टविला ॥२४॥
कंठ सद्गदित होऊनि पाहीं । म्हणे कृपावंत विठाबायी ।
जरी तूं न येशील ये समयीं । तरी मी न जेवीं सर्वथा ॥२५॥
तुकयाची करुणा ऐकोनि सत्वरीं । तत्काळ आले पीतांबरधारी ।
दिव्य कुंडलें मकराकारी । शंख चक्र करीं मंडित ॥२६॥
ऐसें रुप देखोनि पाहे । मग तुकयाने धरिले पाय ।
जिजाई पात्रीं वाढोनि ठाय । आणीत लवलाहें ते समयीं ॥२७॥
मग शब्दाच्या उपचारें निश्चिती । तुकयानें पूजिला रुक्मिणीपती ।
देव आणि भक्त निजप्रीती । एके पंक्तीं जेविले ॥२८॥
भावाच्या उपचारें जाण । तृप्त जाहला रुक्मिणीरमण ।
देव पावले अंतर्धान । विस्मित मज जिजाईचें ॥२९॥
अहो भक्तलीलामृत ग्रंथ सुंदर । हाचि मानससरोवर ।
नाना चरित्रें साचार । त्या कमळणी थोर विकसती ॥२३०॥
आर्तवंत श्रोते चतुर । जे कां प्रेम आमोद ।
महीपती त्याचा लडिवाळ आप्त । बोल बोलत शिकविले ॥३२॥
स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।
प्रेमळ परिसोत संतभक्त । एकतिसावा अध्याय गोड हा ॥२३३॥ अध्याय ॥३१॥