मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय २६

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशायनमः ॥

जयजय क्षिराब्धिवासा शेषशयना । लक्ष्मीकांता मन मोहन ।

अनाथ बंधु करुणाधना । जगज्जीवना श्रीविठ्ठला ॥१॥

तुझी होताचि कृपादृष्टी । तुटे भवबंध फांसाटी ।

जैसा लोहासि परीस झगटे शेवटीं । मग काळिमा दृष्टीसीं दिसेना ॥२॥

कां अंधाराच्या ठिकाणीं । अकस्मात प्रगटे वासरमणी ।

मग तमाचाचि प्रकाश होउनी । दिशा उजळोनी लखलखिती ॥३॥

कां अमंगल नाला तयावर । अकस्मार आला गंगेचा पूर ।

मग तेंचि पाणि होय पवित्र । अना विचार असेना ॥४॥

तेंवी तुझ्या कृपावलोकनें । तत्काळ निरसे संसार भान ।

त्यांचे दोष न राहती जाण । जे अनन्य शरण तुज आले ॥५॥

अत्यंजादिक हीन याती । स्त्रिया शुद्र नाना रीतीं ।

वेदीं निंदिलें ज्याप्रती । ते त्वां श्रीपती उध्दरले ॥६॥

गजेंद्र पशु दुर्दुर मंडूक । संकटीं बाहाती तुज कौतुकें।

तयासि पाहोनि वैकुंठ नायक । सायुज्य सुख भोगविसी ॥७॥

श्रुति शास्त्रांमाजी जे निंद्य जाण । आणि आवडीनें गाती तुझें गुण ।

उंचासि वंद्य होती जाण । ऎसें महिमान नामाचें ॥८॥

महाकवि वाल्मीक पवित्र । तेणें वर्णिलीं वानरांचीं चरित्रें ।

तुवां आपल्या कृपेनें राजीव नेत्रें । कुळ पवित्र तें केलें ॥९॥

ताक पिणार गौळी अमंगळ जाण । ते भागवतीं वर्णिलें द्वैपायनें ।

निंद्य तें होतीं वंद्य जाण । जे सद्भावें शरण तुज येती ॥१०॥

अनंत भक्त तारिले किती । त्यांची सर्वथा नव्हे गणती ।

म्हणोनियां महीपती । शरण निजप्रीतीं पातला ॥११॥

मागिले अध्यायीं कथा कैसी । अमाईस लाविले सद्गतीसी ।

सुने वार्ता ऎकोनि ऎसी । विस्मित मानसीं ते होय ॥१२॥

विठोबा तिचा निज कुमर । माते प्रती बोले उत्तर ।

आपण न येतां साचार । कैसा विचार हा झाला ॥१३॥

असत्य म्हणावें जरी कांहीं । तरी ग्रामवासी लोक सर्वही ।

जेविले खायिले ये ठायीं । ते सकळ गाही पुरतसे ॥१४॥

ऎसे पुत्राचे स्पष्टोत्तर । ऎकोनि माता देत प्रत्युत्तर ।

हा द्वंद्वी आम्हांसि साचार । रुक्मिणीवर असें कीं ॥१५॥

तुझा आजा विश्वंभर जाण । त्यानें आराधिला रुक्मिणी रमण ।

त्याचे भक्तीस्तव पूर्ण । मूर्ति सगुण आली कीं ॥१६॥

हरि मुकुंद नामाभिधान । तयासि पुत्र दोघेजण ।

तिहीं करुनि राजसेवन । संपत्ति धन मेळविलें ॥१७॥

आम्हीं जावा दोघीजणी । अमाई सासू सुलक्षणीं ।

तीघीं होतों याठिकाणीं । मग नेलें पाठवुनी मूळ आम्हां ॥१८॥

कांहीं दिवस राहतां तेथ । तंव स्वप्नीं येवोनी पंढरीनाथ ।

अमाईसी म्हणे घात । होईल निश्चित आजि तुझा ॥१९॥

तिचें नायकतीच कोणी । मग उभयतां बंधु पडिले रणीं ।

आम्हीं सासू सुना दोन्ही । आलों पळोनि या ठायां ॥२०॥

अमाईनें करूनि रुदन । पांडुरंगासी केलें भांडण ।

मग देवें आपुलें रूप धरून । फेडिलें ऋण पैं तिचें ॥२१॥

ऎकोनि मातेची वचनोक्ती । विठोबास क्रोध होऊनि चित्तीं ।

स्नान करोनि सत्वर गती । देऊळाप्रती तो गेला ॥२२॥

मग उभा राहोनियां समोर । देवाप्रती बोले उत्तर ।

तुवां आमुचा घात केला थोर । हें काय बरें विठ्ठला ॥२३॥

आजा लागला तुझे आंगीं । बापही मारविला समरंगी ।

ऎसी आपकीर्ती केली जगीं । आतां तुजसंगीं न राहे ॥२४॥

ऎसें बोलोनियां उत्तर । तत्काळ हातीं घेतलें शस्त्र ।

फाडुं पाहे आपुले उदर । तो सारंगधर हात धरीं ॥२५॥

विठोबा म्हणे सोडी हरी । मी तरी नायके ये अवसरीं ।

तुझी कीर्ती चराचरीं । ते श्रवणद्वारीं ऎकिली म्यां ॥२६॥

प्रल्हाद वैष्णव निजभक्त । प्रेमें तुझें भजन करित ।

त्याचा त्वां मारिला तात । प्रकट खांबांत होऊनियां ॥२७॥

अंगदाचा पिता वाळी भला । निरपराधें तुवां मारिला ।

मग मोहन घालोने त्यांजली । सेवक आपुला केला कीं ॥२८॥

तैसा माझा तात निश्चिती । तुवां मारिला रुक्मिणीपती ।

आतां मी न राहें निश्चिती । नाहीं खंती जीवित्वाची ॥२९॥

देखोनि त्याचें निर्वाण । दयेनें द्रवला करुणाघन ।

विठोबासि हातीं धरून । निजप्रीतीनें आलिंगीं ॥३०॥

स्वहस्तें नेत्र पुसोनियां । म्हणे वृथा श्रम करिसी कासया ।

होणार तें गेलें होऊनियां । वैष्णवी माया ओडंबर ॥३१॥

विश्वंभरें गोवूनि भाकेसी । कुळऋणी केलें असे मजसीं ।

तें फेडावया निश्चयेंसी । देहुग्रामासी राहिलों ॥३२॥

मी भक्तकैवारी सारंगधर । तुवां द्वंद्वी नाम ठेविलें बरें ।

जेंवीं सुधारसासि म्हणती जहर । तैसा विचार त्वां केला ॥३३॥

कां वासरमणी प्रगटतां पाहे । तयासि राहू म्हणावें काये ।

क्षीरसागरासि देऊं नये । उपमा थिल्लर जीवनाची ॥३४॥

अश्वत्थ विष्णूचा अंश थोर । दर्शनेंचि दुरित संसार ।

तयासि नाम ठेविलें हिंबर । तैसाच विचार करिसी तूं ॥३५॥

सकळ योगियांचा नाथ । स्मशानवासी उमाकांत ।

तयासि नाम ठेविलें भूत । अज्ञान नेणत महिमेतें ॥३६॥

तेवीं मी भक्तकैवारी । गदा चक्र वागवितों करीं ।

आणि तूं द्वंद्वी म्हणतोसि ये अवसरीं । नवल अंतरीं मज वाटे ॥३७॥

मी तुझे कुळीचा सेवाऋणी । हे भाक घे आतां मजपासोनि ।

ऎसें बोलतां चक्रपाणी । विठोबा चरणीं लागला ॥३८॥

निजकृपेनें घननीळ । नवविधा मार्ग दाविले प्रांजळ ।

माता पुत्र जाहली प्रेमळ । भजन सर्वकाळ ते करिती ॥३९॥

मागील दुःख नाठवोनि अंतरीं । चालविती पंढरीची वारी ।

योगक्षेम तो निर्धारीं । चालवी श्रीहरी तयांचा ॥४०॥

त्या विठोबाचा पुत्र जाण । पदाजी त्याचें नामाभिमान ।

त्यानेंही करोनि सप्रेम भजन । रुक्मिणीरमण आराधिला ॥४१॥

पदाजीचा पुत्र शंकर । त्यानें पूजिला रुक्मिणीवर ।

कान्हया शंकराचा कुमर । बोल्होबा पुत्र तयाचा ॥४२॥

त्या बाल्होबाचें पोटीं परम । वैष्णव भक्त तुकाराम ।

ज्याचें चरित्र अनुक्रमें । ऎका सप्रेम भाविकहो ॥४३॥

बोल्होबा सकाम होऊनि चित्तीं । पांडुरंगाची करीतसे भक्ती ।

म्हणे देवाधिदेवा रुक्मिणीपती । मनोरथ पुरती तें करी ॥४४॥

म्हणाल कैसी भक्ती केली त्याणें । साक्षात्कार कोणत्या गुणें ।

तें सविस्तर यथामतीनें । करा श्रवण भाविक हो ॥४५॥

बोल्होबा सप्रेम होऊनि अंतरीं । एकांतीं नित्य भजन करी ।

आषाढी कार्तिकीसि निर्धारीं । चालविती वारी पंढरीची ॥४६॥

क्षुधार्थितासि घालीत अन्न । तृषाक्रांतासी देत जीवन ।

साधुसंत वैष्णव जन । त्यांचें पूजन करावें ॥४७॥

प्रपंच व्यवहार कांहीं करितां । तेथें न बोले असत्य वार्ता ।

सर्व भूमीं निजात्मता । द्वैत सर्वथा न देखे ॥४८॥

हें सात्विक तप करितसे जाण । परी चित्तीं वसे मनकामना ।

म्हणे रुक्मिणीकांता जगज्जीवना । करुणाघना श्रीविठ्ठला ॥४९॥

तुवां मागें अनाथनाथें । पुरविले भक्तांचे मनोरथ ।

ते कीर्ती त्रिभुवनांत । पुराणीं गर्जत पवाडे ॥५०॥

ज्याची जैसी मनकामना । ते त्वां पुरविली जगज्जीवना ।

तुझी कीर्ती करुणाघना । माझिया मना आठवे ॥५१॥

उपमन्यु ब्राम्हण कुमर । दुग्ध मागतां वाटीभर ।

जाणोनि तयांचे निज अंतर । क्षीरसागरीं बैसविला ॥५२॥

ध्‍रुव बाळक अति अज्ञान । राज्यपद इच्छिलें त्याणें ।

देखोनि तयांचे निर्वाण । जाहलासि प्रसन्न श्रीहरी ॥५३॥

तयासि आश्वासुनि हातें । अढळपदीं बैसविलें निश्चित ।

शशीसूर्त तारागण समस्त । प्रदक्षिणा करित तयासीं ॥५४॥

तुझे उदारत्व श्रीहरि । वंदू न शके प्राकृत वैखरीं ।

साचार शीणले मापारी । परी लेखा सत्वरी नोहे त्यां ॥५५॥

ऎशा रीतीं नित्य नित्य । बोल्होबा विनवीत रुक्मिणीकांत ।

हरिजागर एकादशी व्रत । असे करित निजप्रेमें ॥५६॥

चोवीस वर्षें ते अवसरीं । केली पंढरीची वारी ।

मग प्रसन्न जाहला श्रीहरी । कैशा परी तें ऎका ॥५७॥

बोल्हाबाची निजकांता । परम भाविक पतिव्रता ।

म्हणे देवाधिदेवा रुक्मिणीकांता । आमुच्या आर्ता पुरवीं तूं ॥५८॥

ऎसीं दंपती दोघेजण । एकचित्ते असती जाण ।

तो तिन्हीं देव स्वप्नांत येऊन । दीधले दर्शन त्यांलागीं ॥५९॥

ब्रह्मा विष्णु वृषभध्वज । म्हणती प्रसन्न जाहलों तुज ।

काय कामना असेल सहज । तरी तें आज निवेदीं ॥६०॥

बोल्होबा सावध होऊनि अंतरीं । त्रिमूर्तीसि नमस्कार करी ।

म्हणे पुत्रकामना संसारीं । ये अवसरीं इच्छितसें ॥६१॥

शिव ब्रह्मा दोघे बोलती । तुझें मनोरथ पूर्ण होती ।

यावरी म्हणे वैकुंठपती । कैशा रीतीं पुत्र देऊं ॥६२॥

बोल्होबा बोले प्रतिवचन । विश्वोध्दारक वैष्णव जाण ।

कीर्तनीं गायील तुझे गुण । तें पुत्रनिधान मज देयी ॥६३॥

दामशेट गुणाबाईचा प्रेमा । पाहूनि पुत्र दीधला नामा ।

तैशाच रीतीं पुरुषोत्तमा । माझिया कामा पुरवीं तूं ॥६४॥

ऎसें बोलतां निजप्रीतीं । अवश्य म्हणे रुक्मिणीपती ।

तुझें मनोरथ पूर्ण होती । निश्चय चित्तीं असोंदे ॥६५॥

सकळ संतांचा मुगुटमणी । पुत्रमिषें देखशील नयनीं ।

मग देवासि प्रदक्षिणा करोनि । लोटांगण घातलें ॥६६॥

ऎसा दृष्टांत होतां मानसीं । बोल्होबा आले जागृतीसी ।

मग सावध करोनि कनकाईसी । वृत्तांत तिजसी सांगितला ॥६७॥

स्वल्प काळें उभयतांनीं । पुत्र सोहळा देखिला नयनीं ।

कनकाई असतां गर्भिणी । प्रसूत जाहली तेधवां ॥६८॥

वरद पुत्र दीधला शिवें । सावजी ठेविलें त्याचें नांव ।

पुढें चरित्र वर्तलें अपूर्व । तें ऎसा वैष्णव निजप्रीतीं ॥६९॥

तंव कोणे एके अवसरीं । वैकुंठीं असतां श्रीहरी ।

भोंवतीं सकळ संतमंडळी बरी । आनंद मेळीं बैसले ॥७०॥

ते जरी म्हणाल कोण कोण । तरी ऎका तयांची नामाभिधानें ।

श्रवण करितां मोहभ्रम जाण । जाय निरसोन तत्काळ ॥७१॥

सनकादिक नारद तुंबर । प्रल्हाद ध्‍रुव आणि अक्रूर ।

उध्दव अंबरीष वैष्णव वीर । शुक योगींद्र परीक्षिती ॥७२॥

भीष्म आणि रुक्मांगद जाण । पुंडलीक भक्त निधान ।

निवृत्ति ज्ञानदेव सोपान । मुक्तानिधान वैष्णवी ॥७३॥

नामा कबीर वैष्णव वीर । भानुदास चांगा वटेश्वर ।

सावता माळी नरहरी सोनार । विसोबा खेचर एकनाथ ॥७४॥

सेनान्हावी चोखामेळ । गोरा कुंभार भक्त प्रेमळ ।

ज्यांणीं भजन करोनि सर्वकाळ । वैकुंठपाळ वश केला ॥७५॥

बंका आणि बहिरा पिसा । जनक प्रेमळ भागवत परसा ।

तुळसीदास कमाल तैसा । वैकुंठाधीशा आवडती ॥७६॥

कान्हो पाठक सुरदास जाण । नामयाचे पुत्र चौघेजण ।

नरसीमेहता शिरोमण । वासरा तो खाण वैराग्याची ॥७७॥

रामदास रामानंद स्वामी यतीश्वर । जोगा रोहिदास वैष्णव वीर ।

सर्वसिध्दि नागनाथ थोर । आणि विश्वंभर भक्तराज ॥७८॥

चैतन्य राघव चैतन्य । अमाबायी गुण निधान ।

गोणायी राजायी गिराबाई पूर्ण । जनी कान्होपात्रा ते ॥७९॥

ऎसी सकळ भक्तमंडळीं । मध्यें बैसला वनमाळी ।

कैसा शोभला ते वेळीं । जैसा ग्रह मंडळीं चंद्रमा ॥८०॥

तापसिया माजी पिनाकधर । कीं पर्वतांमाजी मेरु थोर ।

सिध्दांमाजी अनसूया कुमर । वैकुंठ विहार तेविं दिसे ॥८१॥

सकळ सौंदर्याची खाणी । चराचर जाहलें ज्या पासूनी ।

तयासी उपमा देतां कोणी । कवीची वाणी कुंठित ॥८२॥

ऎसा श्रीहरी निरुपम । जो भक्तकामकल्पदुम ।

सकळ भक्तांसि आत्माराम । बोले सप्रेम तेधवां ॥८३॥

या विश्वंभराच्या वंशीं देख । बोल्होबा भक्त प्रेमळ भाविक ।

त्यासि पुत्र देऊं केला एक । विश्व तारक जगद्गुरु ॥८४॥

तो कोणता द्यावा हा विचार । भक्तांसि पुसे सारंगधर ।

ऎसें ऎकोनि वैष्णव वीर । जयजयकार करिताती ॥८५॥

तों सकळ भक्तांत शिरोमण । संमुख नामा प्रेमळ पुर्ण ।

तयासि उठवोनि जगज्जीवन । एकांति नेऊन सांगत ॥८६॥

हरि म्हणे नामया कारणें । मज युगायुगीं अवतार घेणे ।

करावें धर्माचें संस्थापन । संहारून दुष्टांसी ॥८७॥

आणि तुम्ही अवतार घेऊनि क्षितीं । सप्रेम करावी माझी भक्ती ।

दीन जन उध्दरती । तें भजन प्रीतीं सांगावे ॥८८॥

तरी ते आतां ऎकगा भक्त सखया । माझा सपेम विसांविया ।

तुवां अवतार घेऊनियां । भजन क्रिया सांगावी ॥८९॥

चहूं मुक्तीवरील भक्ती । बोलीलों गीता भागवती ।

ते करोनियां यथास्थिती । माझी कीर्ती वाखाणी ॥९०॥

तूवां मागें घातला पण । कीं शतकोटि ग्रंथ मदर्पण ।

कांहीं शेष राहिलें जाण । तें तूं करणें मम आज्ञा ॥९१॥

शब्द ब्रह्म गूढार्थ थोर । ते तूं मथूनि काढी सविस्तर ।

सप्रेम क्षुधित जेवणार । तयांसि आदरें वाढीं कां ॥९२॥

भक्तिमार्गावरी साचार । हरिनाम पोही घाली सत्वर ।

सप्रेम भक्ती हेंचि नीर । देऊनि चराचर निववी तूं ॥९३॥

तुझ्या साह्यास ये अवसरीं । मोक्ष देतो बरोबरी ।

हा होऊनि आज्ञाधारी । धाडिसी तेथें जाईल कीं ॥९४॥

आणि मुक्तिचा‍र्‍ही आंदण्या होती । तेथें ऋध्दि सिध्दि सहज येती ।

तुज तों नाहीं यांची प्रीतीं । परी उपयोगी पडती जनाच्या ॥९५॥

तरी आतां जावोनि मृत्युलोका । माझी कीर्ती ऎकवी लोकां ।

दशगुणे तुझा प्रेमा हो कां । सप्रेम सुखा पात्र जो ॥९६॥

ऎसा आशिर्वाद निजप्रीतीं । नामयासि देत लक्ष्मीपती ।

अवश्य म्हणोनि सप्रेम मूर्ती । काय वचनोक्ती बोलत ॥९७॥

म्हणे कलियुग खोटें साचार । त्यावरी तुझा बौध्द अवतार ।

आम्हांसि संकट पडलें जर । तरी कोणासि उत्तर बोलावें ॥९८॥

ऎसें नामया बोलत । काय म्हणती वैकुंठनाथ ।

तुम्हांसि संकट पडतां निश्चित । मी निजांगे अनंत निवारीं ॥९९॥

सांडोनि बौध्द अवतार पण । तत्काळ रूप धरीन सगुण ।

तुजसीं बोलेन अमृत वचन । निश्चय मन असों दे ॥१००॥

ऎसें बोलतां शेषशायीं । सप्रेम नामा लोळत पायीं ।

मग उचलोनि चहूं बाहीं । आलिंगूनि हृदयी धरियेला ॥१०१॥

देवाच्या साम्यतेसि देखा । हृदयीं निजभक्त होता तुका ।

तो नामयाचें हृदयीं देखा । घालीत भक्तसखा श्रीहरी ॥२॥

कां नामयाच्या हृदय घटीं । प्रेमामृत सांठवी जगजेठी ।

कां षड्‍ गुण ऎश्वर्य राहटी । घालितसे पोटीं जगदात्मा ॥३॥

नातरी अवतार शक्ति । उत्पत्ति प्रळय जिचेनि होती ।

कीं मोक्षावरी जे भक्ती । अर्पीत श्रीपती नामय ॥४॥

जो प्रकाशवीण प्रकाश जाण । निजभक्त तुका गुप्त ठेवण ।

विष्णूच्या हृदयीं ऎक्य होऊन । समरपणें मिसळला ॥५॥

तो आलिंगनाचे निमिषें देखा । नामयाच्या हृदयीं घातला तुका ।

म्हणे साह्य होऊनि एकमेका । सप्रेम सुखा भोगिजे ॥६॥

ऎसें बोलतां सारंगधर । नामा विनवी जोडोनि कर ।

कोठें मी घेऊं अवतार । कुळ पवित्र तें सांगा ॥७॥

विष्णूची भक्ति ज्याच्या कुळीं । अखंड वाचेनि नामावळी ।

जेथें तुझीं मूर्ती सांवळी । जन्म ते स्थळी दे देवा ॥८॥

ऎसें पुसतां नामयासी । काय म्हणे वैकुंठवासी ।

ज्याणें भक्तीभावें गोंविलें मजसी । तें स्थळी तुजसी सांगतों ॥९॥

हा माझा विश्वंभरदास । आतां वैकुंठीं केला वास ।

याणें भक्तिभावें सायास । गोविलें आम्हास नामया ॥११०॥

तें म्हणतील कैशापरी । तरी तेंही सांगतों अवधारी ।

कीर्तन करोनि सप्रेम गजरी । चालविली वारी पंढरीची ॥११॥

मग भक्तिभावें करोनि सहज । मी प्रसन्न जाहलों गरुडध्वज ।

आपुल्या गांवासि नेऊनि सहज । गोंविलें मज भाकेसी ॥१२॥

याच्या वंशी बोल्होबा भक्त । त्याणें आराधिलें माते ।

मग मी प्रसन्न जाहलों त्यातें । वर त्वरित माग म्हणें ॥१३॥

मग तो वचन बोलिला मातें । पुत्र द्यावा कीं विष्णुभक्त ।

जो जगतारक मूर्तिमंत । विश्वहेतार्थ जगद्गुरु ॥१४॥

ऎसें बोलतां भक्तराया । मग आम्हीं प्रसन्न जाहलों तया ।

तें वचन सत्य करावया । अवतरे नामया ते ठायीं ॥१५॥

अवश्य म्हणोनि वैष्णववीर । सद्भावें करूनि नमस्कार ।

मृत्युलोकीं उतरतां साचार । प्रकाशें अंबर कोंदलें ॥१६॥

देखोनि लोक आश्चर्य करिती । म्हणती नक्षत्र स्वाती ।

कनकाईचे उदरीं निश्चिती । अपांपती तोचि कीं ॥१८॥

त्या उदरशुक्तिकेंत तत्काळ । नामयाचें प्रेम पडिलें जळ ।

त्यांत तुका जन्मला मुक्ताफळ । जो हरी प्रेमळ भक्त याचे ॥१९॥

नवविध भक्ति केली सायासें । तीच पूर्ण जाहले नवमाद ।

कनकाईचे भाग्य विशेष । विष्णुभक्त उदरास आला कीं ॥१२०॥

डोहाळे होती तयाचे ऎसे । संसाराचा येतसे त्रास ।

म्हणे एकांती जावोनि करावा वास । श्रीहरि भजनास बैसावें ॥२१॥

असो दिवस भरलिया निश्चित । कनकाई एकांतीं मंदिरांत ।

तों असंभाव्य प्रभा पडत । उगवे आदित्य ज्या रीतीं ॥२२॥

कनकाई पुत्रमुख पाहत । तंव तेजोमय मूर्ति दिसत ।

तो शांतिसुखाचा कोंभ निश्चित । नातरीं मूर्तीमंत वैराग्याची ॥२३॥

कीं भक्तिनिधान प्रगटलें साचें । कीं सच्चिदानंद नामयाचें ।

कां तें भांडार प्रेमाचें । उघडलें साचे दिसताहे ॥२४॥

कनकाईचें विस्मित अंतर । तटस्थ घटिका राहिली चार ।

कांहीं न बोलवे उत्तर । तृष्णा अहंकार निरसले ॥२५॥

ते स्वानंद जळाच्या डोहीं । बुडोनि गेले ते समयीं ।

देहभावना किंचित नाहीं । हेचि नवायी अगाध ॥२६॥

पुत्र प्रगटतां विष्णुभक्त । तत्काळ जाहला शक्तिपात ।

स्वरूपी तेज समरस होत । आनंदयुक्त मानसीं ॥२७॥

बंद हृदयीं प्रगटोनि पांडुरंगमूर्ती । बाळकासि सांगे एकांती ।

म्हणे जैसी लौकिकास्थिती । तैशाच रीतीं वर्तावें ॥२८॥

प्रपंचाची हातवटी । दाखवूनियां जनाच्या दृष्टीं ।

मग विवेक वैराग्य देखसी शेवटीं । प्रेम पोटीं भक्तीच्या ॥२९॥

ऎसें सांगता घननीळ । तत्काल भासलें मायाजळ ।

कनकाई पाहे उघडोनिया डोळे । तों पुढें बाळ देखिला ॥१३०॥

मागिल अवस्था आठवी मनीं । तो स्वप्नवत भासे तये क्षणीं ।

तत्काळ आल्या शेजारिणी । म्हणती कनकाई कोनी निघाली ॥३१॥

बोल्होबासि मात । कीं पुत्र जाहला तुम्हांतें ।

येरू म्हणे पंढरीनाथें । माझा मनोरथ पुरविला ॥३२॥

असो बारा दिवस लोटतां निश्चित । कनकाई जाहली शुचिर्भूत ।

मग राउळासि जाऊनि त्वरित । रुक्मिणीकांत नमियेला ॥३३॥

बालक उचलोनि ते समयीं । पांडुरंगाच्या घातले पायीं ।

हा दास तुझा शेषशायी । म्हणोनि लावी अंगारा ॥३४॥

ऎसें ऎकोनि वैकुंठनाथ । मग रुक्मिणीसी बोले मात ।

बालक उचलोनि आपल्या हातें । घाली वोसंगांत इयेच्या ॥३५॥

रुक्मिणीनें उचलोनि बाळ । स्वहस्ती घेतला तत्काळ ।

कनकाईच्या ओटतिं बाळ । तये वेळे घातला ॥३६॥

कनकाई म्हणे ओ जननी । नांव ठेवावें आजिचे दिनीं ।

अवश्य म्हणोनि तये क्षणीं । माता रुक्मिणी चालिली ॥३७॥

बोल्होबाची सकाम भक्ती । प्रसन्न जाहले रुक्मिणीपती ।

म्हणोनि संतती आणि संपत्ती । जाहली येती आपोआप ॥३८॥

जेथें आला रुक्मिणी बाळा । तरी तेथें सर्व सिध्दि अनुकूळा ।

सुवासिनी मेळवूनि सकळा । घातलें बाळा पालखांत ॥३९॥

सुंदर स्त्रीचें रूप धरूनी । हळदीकुंकुमें लेववीत रुक्मिणी ।

मग बाळकासि तये क्षणीं । जो जो म्हणवोनी हालवित ॥१४०॥

जें का अक्षर अव्यक्त । असे नामरूपातीत ।

शब्देंवीण आनंदत । नीज तेथ निज बाळा ॥४१॥

जेथें अहंसोहं निश्चित । निमे द्वैत आणि अद्वैत ।

परादि वाचा कुंठित । नीज बाळा ॥४२॥

जेथें ज्ञेयज्ञाता ज्ञान निश्चित । ध्येय ध्यान ध्याता नाठवत ।

त्रिपुटी कारण नाहीं जेथ । नीज तेथ निज बाळा ॥४३॥

जें सिध्दांत ज्ञान बोलती संत । अहेतुक पद निश्चित ।

त्या निजसुखधामीं लावूनि प्रीत । नीज तेथ निज बाळा ॥४४॥

अव्यक्त नाकळे कोणातें । मग सगुण रूप धरी भक्तहेतें ।

त्या पांडुरंगचरणीं साक्षात । नीज नीज प्रीत लावुनी ॥४५॥

ऎशा रीतीं विश्वजननी । पाळणा गातसे तये क्षणीं ।

भोवत्या सकळ सुवासिनी । जो जो म्हणोनि हालविती ॥४६॥

कनकाईसि पुसोनि देखा । बाळकाचें नांव ठेविलें तुका ।

ज्याचेनि नांवें सकळिका । जड जीव लोकां उध्दार ॥४७॥

सकळ लोकांसि वांटोनि पानें । सुवासिनींची भरलीं वाणें।

घुगर्‍या वाटोनि निजप्रीतीनें । आली रुक्मिण राउळासी ॥४८॥

खेळत रांगत भक्त प्रेमळ । कांहींएक लोटला काळ ।

दिवसेदिवसे ते वेळ । टाकीत पाउल चालावया ॥४९॥

मग तयाचे पाठीवर । कनकाई जाहली गरोदर ।

ब्रह्मवरदें जाहला पुत्र । कान्हया साचार नांव ठेविलें ॥१५०॥

सावजी तुका आणि कान्हया । तिघे पुत्र जाहले तया ।

बोल्होबा चमत्कार पाहोनिया । पंढरीराया भजतसे ॥५१॥

म्हणे तिन्हीं देवें स्वप्नांत । मज दाविला दृष्टांत ।

ते असत्य सर्वथा नव्हे मात । घडोनि यथार्थ आलें कीं ॥५२॥

धनधान्य पुत्रसंपदा सकळ । तयासि दीधली घननीळें ।

पूर्वतपाचें उत्तम फळ । सुखसोहळे पाहती ॥५३॥

तयांचे भाग्य वर्णावे जर । तरी सर्वथा नाहीं अंतपार ।

तिन्हीं देवांनीं दीधले पुत्र । जगदुध्दार करावया ॥५४॥

असो तिघे पुत्र ऎसे । थोर जाहले दिवसेंदिवस ।

संतोष मातापित्यांस । पाहतां दृष्टीस त्यांलागीं ॥५५॥

धनसंपदा पाहोनि पुत्र । सोयरे जाहले थोर थोर ।

घटित सांगती द्विजवर । लग्न सत्वर नेमिलें ॥५६॥

द्रव्य खर्चोनिया बहुत । विवाह केला यथास्थित ।

कनकाई आपुल्या चित्तांत । आनंदयुक्त जाहली ॥५७॥

पुत्र सुना धन संपत्ती । भ्रतार युक्त सौभाग्यवती ।

पाहोनि आनंद स्त्रियांचे चित्तीं । नसे निश्चिती दूसरा॥५८॥

सर्व साहित्य अनुकूल । उदीम करितां होय सुफळ ।

उणें पडों नेंदी अनुमाळ । दीनदयाळ तयांचें ॥५९॥

संसार करोनि यथार्थ । त्याणी साधिला परमार्थ ।

मी कर्ता न स्फुरे जेथ । तोचि विरक्त म्हणावा ॥६०॥

संत लोक आणि इतर । उभयतां करिती संसार ।

परी दोहींचा अनुभव भिन्नाकार । ऎका तो विचार निजकर्णी ॥६१॥

अज्ञान म्हणती प्रारब्ध पांगुळें । प्रयत्न करितां उदीम फळे ।

आम्हीं प्रपंचीं दक्ष सर्वकाळ । म्हणवोनि तळमळ न राहे ॥६२॥

परी प्रारब्ध घडवी अनयासीं । मीपणें बध्द होतसे त्यासी ।

मग अंतरलें सायुज्य मुक्तीसी । योनी चौर्‍यांशीं हिंडती ॥६३॥

तेचि सज्ञान असती संसारीं । ते म्हणती कर्ता एक श्रीहरी ।

हालवोनि प्राचीनाची दोरी । प्रारब्ध वरी भोगवत ॥६४॥

संचितीं असे तेंचि मिळतें। होणार ते न चुके सत्य ।

ऎशा रीतींनें सज्ञान वर्तत । ते जीवन्मुक्त म्हणावे ॥६५॥

बोल्होबाची ऎशी स्थिती । मी कर्ता हे न स्फुरे चित्तीं ।

म्हणवोनि प्रपंची परमार्थ रीतीं । रुक्मिणीपती जोडला ॥६६॥

जैसें पद्मपत्र जळीं असतां । परी उदकासी लिप्त नोहे सर्वथा ।

किं वासरमणी घटीं बिंबतां । तों भिजली वृथा म्हणों नये ॥६७॥

नातरी विलासी मुख पाहतां सहसा । दर्पणी उमटे त्याचा ठसा ।

परी तो तेथींचिया आभासा । न आवडे जैसा तयातें ॥६८॥

तैशा रीतीं वैष्णवभक्त । संसारीं असोनि मायातींत ।

प्रपंच धंदा सारितां समस्त । रुक्मिणीकांत आठविती ॥६९॥

ऎशा रीती सारिता काळ । वार्धक्यदशा आली केवळ ।

मग सावजी पुत्र ते वेळ । आपणा जवळ बोलाविला ॥१७०॥

म्हणे आतां आमुचें वार्धक्यपण । तूं वडील पुत्र सुजाण ।

तरी संसारांत घालोनि मन । देणें मागणें सांभाळीं ॥७१॥

पाहोनि खडी खतावणी । ऎवज सर्व ध्यानासि आणी ।

ऎकोनिया तयाची वाणी । सावजी चरणीं लागतसे ॥७२॥

मग म्हणतसे जी ताता । मी प्रपंचीं न गुंतें सर्वथा ।

तीर्थाटणासि जावें आतां । वैराग्य चित्ता येतसे ॥७३॥

परी तुम्हीं माता पिता शिरीं । यास्तव गुंतोनि राहिलों घरीं ।

शास्त्रविरुध्द जातां दुरीं । लोकाचारी विपरीत ॥७४॥

देखोनि पुत्रीची उदास स्थिती । बोल्होबा निवांत राहिला चित्तीं ।

म्हणे होणारची विचित्र गती । नकळें संचितीं काय आहे ॥७५॥

मागील स्मरण जाहलें सत्वर । म्हणे शंकरें दीधला हा वरदपुत्र ।

जैसा स्मशानवासी पिनाकधर । तैसाचि विचार पै याचा ॥७६॥

सत्व रज तमो गुणी निश्चिती । दैव तें साधकांसि प्रसन्न होती ।

तीं आपुल्या ऎसीच फळें देती । सत्य प्रतीत हे जाणा ॥७७॥

वासरमणीसि आराधितां । तो देत आपुली तीव्र उष्णता ।

कीं चंद्रबिंब उपसितां । देत शीतळता भक्तांसी ॥७८॥

तैशाच रीतीं वृषभध्वजें । वरदपुत्र दीधला सहज ।

तेणें नोहे संसार काज । समजलें मज अंतरीं ॥७९॥

ऎसें समजोनि आपुलें चित्तीं । बोल्होबा राहे निवांत स्थिती ।

मग तुकयासि बोलवुनि प्रीतीं । संसारवृत्ती निरविली ॥१८०॥

देणें घेणें उदीम हातवटी । तोट्यानफ्यांत असावी दृष्टी ।

जेणें स्वहित होईल शेवटीं । तैसी गोष्टी करावी ॥८१॥

ऎकोनि पितयाचें वचन । तुका तयासि अवश्य म्हणे ।

वैश्य व्यवसायांत जाण । दिससी निपुण सर्वार्थी ॥८२॥

सोयरे धायरे इष्टमित्र । म्हणती बोल्होजीचा दक्षपुत्र ।

त्याज देखतां संसार । आवरिला साचार तयानें ॥८३॥

पुत्र वर्ते पितृ आज्ञेनें । आणि स्त्री पतिव्रता सगुण ।

हें पूर्व तपाचें फळ जाण । येतें दिसोन अपैसें ॥८४॥

वडील पुत्र सावजी असे । तो तरी महापुरुष ।

परी तुका दक्ष संसारिक दिसे । वयही नसे फार त्याचें ॥८५॥

ऎशा रीतीं सोयरे जन । मागें पुढें करिती स्तवन ।

ऎकोनि बोल्होबाचें मन । समाधान पावतसे ॥८६॥

जैसा प्रधानाचा ऎकोनि प्रताप । चित्तीं संतोष होय नृप ।

कीं कन्येचे सद्गुण ऎकोनि मायबाप । आनंदरूप मानसीं ॥८७॥

कीं शिष्याची मति देखोनि बरी । सद्गुरूसि संतोष होय अंतरीं ।

तेवीं तुकयाची प्रज्ञा देखिलीयावरी । बोल्होबा अंतरीं संतोषे ॥८८॥

तुकयाचें लग्न केलें असतां । परी नोवरीसी धापेची होती व्यथा ।

मग विचार करिती मातापिता । लग्न आतां करावें ॥८९॥

पुण्यांत अपाजी गुळव्या थोर । धनवंत होता सावकार ।

त्याची कन्या होती थोर । तें मागुनि दुसरें लग्न केलें ॥१९०॥

ज्येष्ठ कनिष्ठ दोघी जाया । आणि संसारही आवरी तुकया ।

ऎसी स्थिती देखोनियां । मातापितयां संतोष ॥९१॥

मातापिता बंधु सज्जन । सर्व संपत्ति आणि धन ।

मान मान्यता तुकया कारणें । एकही उणें असेना ॥९२॥

अहो भक्तलीलामृत ग्रंथ जाण । हें पंढरी क्षेत्र पुरातन ।

सद्भाव हाचि पुंडलिक पूर्ण । वसेल क्षण या ठायीं ॥९३॥

शांति विरक्ति उदास । भीमा चंद्रभागा वाहती समरस ।

संत श्रोते प्रेमळ दास । त्यांसि क्षेत्रवास ये ठायीं ॥९४॥

सप्रेम आवडी जे अवीट । ते पुंडलीकें बैसावयासि दीधली वीट ।

त्यावर जघनीं कर ठेवूनि नीट । वैकुंठ पीठ उभा असे ॥९५॥

नासाग्रीं ठेवूनि ध्यान । देतो भाविकांसि आलिंगन ।

तेथें मी मूढमति अज्ञान । घ्यावया दर्शन आलों कीं ॥९६॥

प्रांजळ ओव्या तुळसी कोमळ । हातीं घेऊनि प्रेमजळ ।

महिपति सदा तिष्ठे जवळ । चरणकमळ लक्षोनी ॥९७॥

स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविक भक्त । सव्विसावा अध्याय रसाळ हा ॥१९८॥ अध्याय ॥२६॥ ओव्या ॥१९८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP