श्रीगणेशाय नमः ॥
जय जय सच्चिदानंदा करुणामूर्ती । ब्रह्मांडीं तूझी न समाये किर्ती ।
तो तूं प्रेमळाची धरितोसी आर्ती । रुक्मिणीपती विठ्ठला ॥१॥
हटयोगी ब्रह्मज्ञान्यांसी । अवघड योग सांगितला त्यांसी ।
भाळ्या भोळ्या निज भक्तासी । धर्म सांगसी भागवत ॥२॥
सनकादिकांचा प्रश्न अपूर्व । ऎकोनि कूंठित कमळोद्भव ।
मग त्याणें केला तूझा स्तव । सप्रेम भाव धरोनियां ॥३॥
ऎकोनि विधात्याची स्तूत । मग हंसरूपें आलासी तेथ ।
तेव्हां चतूःश्लोकी भागवत । सांगसी त्यातें निजकृपें ॥४॥
तूझीं ऎकोनि वचनामृतें । ब्रह्मा झाला स्वानंदभरित ।
मग त्याणें दशलक्षण भागवत । नारदातें सांगीतलें ॥५॥
तो प्रेमभरित होऊनि मानसीं । कीर्तनीं नाचे अहर्निशीं ।
तेव्हां द्वैपायन भेटोनि नारदासी । सद्भावेंसी पूसत ॥६॥
म्हणे स्वामी ऎका वचन । म्यां केलीं अठरा पुराणें ।
आणिक शास्त्रें इतिहास गहन । वदलों संपूर्ण हे कथा ॥७॥
परी मन स्थिर होवोनि पाहीं । चित्त संतोष होत नाहीं ।
यासि उपाय सांगावा कांहीं । व्यास पायीं लागला ॥८॥
ऎकोनि सच्छिष्याचा प्रश्न । चित्तीं संतोषे ब्रह्मानंदन ।
मग शत श्लोक भागवत करून । व्यासासि तेणें सांगितलें ॥९॥
सद्गुरु म्हणती पराशर सुता । हेंचि विस्तारूनि वदें आतां ।
तेणें चित्ताची होईल स्थिरता । आत्म-स्वहिता पावसी ॥१०॥
मग द्वैपायन प्रेमभरित । विस्तारें वदे श्रीभागवत ।
आठरा सहस्त्र जाहला ग्रंथ । उपनिषदर्थ केवळ जो ॥११॥
मग शुकयोगींद्रें पाहोनि प्रीती । त्याणें बोधिला परीक्षिती ।
आणिकही साधक तरले किती । त्यांची गणती नोहे कोणा ॥१२॥
ऎशापरी वैकुंठनायका । तूं प्रेमळाचा प्रियोत्तम सखा ।
भागवत धर्म निर्मूनि नौका । भवपार लोकां करिसी तूं ॥१३॥
त्या भागवताचा अर्थ निश्चिती । कलियुगीं न कळे सर्वांप्रती ।
यास्तव अवतार घेतला संतीं । प्राकृत मती वदावया ॥१४॥
त्या संतांचीं नाना चरित्रें । तूंचि वदसी राजीवनेत्र ।
तरी पुढें निमित्तमात्र । बुध्दि स्वतंत्र असेना ॥१५॥
शिकविले बोल रांवा बोलतां । त्याचा नवलाव तो कोणता ।
तेवीं मंदबुध्दीचा प्रकाशिता । नसे अनंता तूजविण ॥१६॥
मागिले अध्यायाचे शेवटीं कथा । भांबनाथ पर्वती तुका असतां ।
कान्हया बंधु तेथें येतां । रुक्मिणीकांता देखिलें ॥१७॥
निजभक्तासि देखोनि जाण । देव पावले अंतर्धान ।
जेथें लागलें देवाचें चरण । अद्यापि ते स्थान असेकीं ॥१८॥
ते स्थळीं खिळा रचोनि देखा । कान्हयानें मांडिल्या पादुका ।
मन नमस्कारोनि बंधु तुका । सप्रेम सुखी पावला तो ॥१९॥
उभयतां भाऊ ते समयी । सत्वर चालिले देहू गांवी ।
मग येऊनि इंद्रायणीच्या डोही । तुका ते ठायीं बैसला ॥२०॥
साता दिसाचे निर्वाण । उभयतांसि होते जाण ।
सूर्योदयीं करूनि स्नान । सोडिले पारण ते स्थलीं ॥२१॥
मग कान्हयापासोनि वैष्णव भक्ते । मंदिरींहूनि आणाविलीं खतें ।
लोकांवरी वडिलांचें द्रव्य होतें । तेव्हां बोलत कान्हयासी ॥२२॥
अनुभव नसतांचि जाण । व्यर्थचि पुस्तकींचें ज्ञान ।
तैसेंचि परहस्तींचें धन । दुश्चित मन सर्वदा ॥२३॥
आमुचें देईल किंवा नाहीं । ऎसी दुराशा आठवे जीवी ।
यास्तव इंद्रयणीच्या डोहीं । खतें ये समयीं बुडवितों ॥२४॥
ऎसें पुसतां भक्त प्रेमळे । कान्हया बोले ते वेळ ।
तुम्हीं ते विरक्त जाहलां केवळ । प्रपंच सकळ मजमागें ॥२५॥
आम्हींही वडिलांसि सांगू नये । पुढें लेंकरें करितील काय ।
जाणोनि कान्हयाचा मनोदय । योजिली सोय तुकयाने ॥२६॥
दोन विभाग करूनि निश्चित । कागद बुडविलें उदकांत ।
अर्ध विभाग कान्हयातें । देऊनि बोलत काय तया ॥२७॥
आजपासोनि आम्हांकारणें । कंथा शीत निवारणे ।
भिक्षा मागोनि सेविजे अन्न । निर्विघ्न येणें योग चाले ॥२८॥
आणि तुम्हांसि उदमी हातवटी । कारणें लागेल प्रपंच राहटी ।
दोंहींची कैसी पडेल गांठी । ऎका ते गोष्टी सांगतों ॥२९॥
भिक्षा आणि व्यवसाय । याचा काला करूं नये ।
ऎसा ऋषी मुखें पाहें । झाला आहे निवाडा ॥३०॥
ऎसें ऎकोनि ते अवसरी । कान्हया वेगळा संसार धरी ।
आतां निर्वाणत्याग तुकया करी । कैशा परी तें ऎका ॥३१॥
लज्जा लौकिक टाकोनि मानसी । चित्त लाविलें चिंतनासी ।
विरक्तीचेनि बळे फांसीं । इंद्रियें नेमेंसी आकळिली ॥३२॥
अल्प आहार सेविता जाण । तेणें इंद्रियें जाहली क्षीण ।
निद्रा आळस नयेचि त्यानें । अनुतापें भजन करीतसे ॥३३॥
स्नान करूनि प्रातःकाळीं । जाय पांडुरंगाचें देवळी ।
पूजाअर्चन करूनि सकळी । मग वनस्थळीं जातसे ॥३४॥
देहूपासूनि पश्चिमेस । भांडार-पर्वत तीन कोस ।
तुका जाऊनि त्या स्थळास । एकांत बैसे निश्चिती ॥३५॥
तंव श्रोते आशंकित होऊनि चित्तीं । वक्त्या प्रश्न करिती ।
कीं तुकयासि भेटला रुक्मिणीपती । सगुणमूर्ती साक्षात ॥३६॥
देवाची भेट जाहली असतां । तरी इंद्रियांसि नेम कासया वृथा ।
ऎसा सज्जनीं प्रश्न करितां । तरी तेंचि आतां परिसिजे ॥३७॥
वासरमणी उगवतां पाहे । सकळ जीवांसि दर्शन होय ।
परी तो कोणाच्या स्वाधीन नोहे । उभा न राहे क्षणभरी ॥३८॥
तेवीं दैवयोगें करूनि साचार । एकदां भेटला इंदिरावर ।
तो जवळीं असावा निरंतर । ऎसें अंतर तुकयाचें ॥३९॥
भक्तांसि जाहलिया भगवत्प्राप्ती । तरी ते सप्रेम भजन करिती ।
गंगेसि भेटला अपांपती । परी मागुती धांवे चपळत्वें ॥४०॥
प्रभंजन ब्रह्मांडीं भेदला पाहे । सर्वाठायीं व्यापक आहे ।
परी तो चंचळपण सांडितो काय । निश्चळ न राहे क्षणभरी ॥४१॥
तैशाच रीतीं भगवज्जन । स्वरूपीं मिळाले अभिन्नपणें ।
परी एकाचे विभाग दोन करून । करिती भजन अहर्निशीं ॥४२॥
चक्षुःश्रव्याच्या आंगावरी जाण । पहुडला लक्ष्मीनारायण ।
उभयतांचा एकांतपूर्ण । त्याजकारणें विदित ॥४३॥
शेजारती झालिया निश्चित । आपापुल्या स्थानीं जातीं भक्त ।
परी शेषासीं वियोग नाही किंचित । परी सप्रेम भजत श्रीहरीतें ॥४४॥
तैसाच तुका वैष्णववीर । अविट आवडी त्याची थोर ।
एकांत जावोनि पर्वतावर । भजन साचार करीतसे ॥४५॥
अहंता टाकोनि सर्वस्वें । जनविजन समान भासे ।
मीपणाचें नांव कैसें । तेही स्वप्नास न ये कीं ॥४६॥
मुळींहूनि अहंता त्यागितां पाहे । तरी सहजचि निरसलें संसारभय ।
तैसा निमोनि गेला देह । मग रोग होय कोणासी ॥४७॥
तैशाच रीतीं तुकयानें तत्वतां । संसार मूळ त्यजिली अहंता ।
मग नित्य जावोनि एकांतां । रुक्मिणीकांता आठवी ॥४८॥
नामस्मरणावीण जाण । आणिक सर्वथा नाहीं साधन ।
ऎसा निश्चिय केला पूर्ण । करीत भजन अहर्निशीं ॥४९॥
ध्यानासि आणोनि पांडुरंगमूर्ती । लाविलीं दोन्हीं नेत्रपातीं ।
म्हणे तुझ्या नामावीण श्रीपती । आणिक विश्रांती मज नाहीं ॥५०॥
नाम हेंचि माझे उग्रतप । नाम हेंचि माझा मंत्र-जप ।
नाम हेंचि माझें व्रत अमुप । नामेंचि निष्पाप होईन मी ॥५१॥
नाम हेंचि माझा कुळाचार । नाम हेंचि कुळधर्म थोर ।
नामावीण नाहीं आधार । हाचि निर्धार श्रीहरी ॥५२॥
नामावीण धनवित्त कांहीं । आणिक सांगावयासि येत नाहीं ।
आतां भवसागर विठोबायी । उतरोनि नेयी पैलतीरा ॥५३॥
ऎशाच रीतीं नित्य नित्य । एकांतीं तुका करुणा भाकित ।
सायंकाळीं गावांत येत । आनंदें नाचर देउळीं ॥५४॥
देखोनि लोक म्हणती त्यास । तुकयासि लागलें असे पिसें ।
नाम गातसे रात्रंदिवस । संसार आस सांडिली ॥५५॥
एक म्हणती व्यापार खोटा । उदीम करितां आला तोटा ।
म्हणवूनि मुखीं भरला फांटा । बडबडी चोहटा भलतेंची ॥५६॥
एक म्हणती इंद्रायणींत । तुकयानें अवघीं बुडविलीं खतें ।
प्रपंच टाकोनि निश्चित । धरिला परमार्थ तैंहुनी ॥५७॥
एक म्हणती विशेष पाहे । प्रपंच टाकितां लाभ काय ।
पोट कोणासि सुटले आहे । न चलेचि देह अन्नाविण ॥५८॥
टाकूनियां मुलें लेंकुरें । जाऊनि बैसतो पर्वतावर ।
परी भिक्षा मागें घरोघर । क्षुधातुर होतांची ॥५९॥
एक म्हणती टाकोनि आपला धंदा । व्यर्थ कां करितां त्याची निंदा ।
संसारीं बहुतांची झाली आपदा । काय गोविंदा भजताती ॥६०॥
ऎशाच रीती त्रिविध जन । नानापरीचीं बोलती वचनें ।
परी तुका आनंदयुक्त मनें । नाहीं देहभान सर्वथा ॥६१॥
राजबिदीं तूं निवारण । चालतां उदंड भुंकती श्वानें ।
परी त्यांचें भय न धरोनि मनें । स्थिर गमनें चालत असे ॥६२॥
ऎकोनि सागराची गर्जना । अगस्त्य भय न धरीच मना ।
तेवीं लोक दुरुक्ति बोलती नाना । परी विक्षेप मना न वाटे ॥६३॥
जन निंदेचे येतां लोट । शांति उदरीं भरितसे घोंट ।
काम-क्रोधांची मोडली वाट । करणी आचाट निरुपम ॥६४॥
आशा-तृष्णा मोह-माया । काम-क्रोधांच्या मोडिलें ठाया ।
पुढें ब्रह्मचि करील काया । वैष्णव तुकया हेंचि साचा ॥६५॥
सप्रेम भाव धरोनि चित्तीं । नित्य पूजित पांडुरंग मूर्ती ।
दिवसां अरण्यांत एकांतीं । भजन प्रीतीं करितसे ॥६६॥
एक इंद्रायणीच्या तीरीं निश्चित । करंजाया मावल्या असती तेथ ।
तये स्थळीं वैष्णवभक्त । भजन करीत बैसला ॥६७॥
तया समीप कृषियानें । शेत पेरिलें होतें जाण ।
तें पिकासि आलें असे सघन । उमटले कण तयावरी ॥६८॥
शेत पाहुनि चहूंफेर । कृषीवळ निघाला सत्वर ।
येऊनि तुकया समोर । काय उत्तर बोलिला ॥६९॥
म्हणे तुकाशेट ऎका वचन । माझ्या शेतीं बैसा राखण ।
आदमण दाणे तुम्हांसि देईन । कुटुंब रक्षण करावया ॥७०॥
सहज रिकामें बैसला घरीं । संसार चालेल कैशापरी ।
तरी शेतीं बैसोनि निरंतरीं । येथेंचि हरि हरि भजावा ॥७१॥
ऎकोनो तयाचें उत्तर । अवश्य म्हणे वैष्णव वीर ।
तेथूनि उठिला सत्वर । जात बरोबर तयाच्या ॥७२॥
तुकयाची ऎशी स्थित । जों जें म्हणे ते ऎके मात ।
आग्रह न करीच किंचित । परोपकारार्थ जाणोनी ॥७३॥
तान्ह्या बाळाची जैसी स्थिती । बरें वाईट देतांचि हातीं ।
मुखीं घालीत सत्वर गती । अनमान चित्तीं न करितां ॥७४॥
नातरीं कां जैसें तोय । साकर घालितां गुळचट होय ।
नातरी लवण मेळवितां पाहे । क्षारत्व लाहे तत्काळ ॥७५॥
तैशी तुकयाची स्थिती पाही । कवणें विशीं आग्रह नाहीं ।
जो जें म्हणेल जे समयीं । तेंचि सर्वही करितसे ॥७६॥
मग कृषियानें ते अवसरी । तुकयास नेले बरोबरी ।
गोफण दिधली त्याचे करीं । म्हणे माळ्यावरी बैसे आतां ॥७७॥
तुझ्या स्वाधीन केले क्षेत्र । राखीत जाय दिवस रात्र ।
सवंगणीस येईल जोंवर । तोंवर करार असावा ॥७८॥
आदमण दाणे केले करार । ते मी देईन राशीवर ।
ऎसें बोलूनियां उत्तर । कुणबी सत्वर तो गेला ॥७९॥
स्वहस्त धारण जये देशीं । गेला खेप आणावयासी ।
शेतीं बैसविलें तुकयासी । घरीं मनुष्यांसी सांगितलें ॥८०॥
इकडे तुका वैष्णव भक्त । माळ्यावरी जावोनि त्वरित ।
भोंवतें विलोकूनि पाहत । तों पक्षी बैसत शेतावरी ॥८१॥
म्हणे हे ईश्वराचे जीव । क्षुधातुर असती सर्व ।
आपण म्हणवितों भक्त वैष्णव । तरी न उडवावे सर्वथा ॥८२॥
मागें दुष्काळ बहुत होता । विश्वभाग्यें पिकलें आतां ।
आपण यासि उडवितां । तरी व्हावें दुरिता अधिकारी ॥८३॥
ऎसें म्हणोनि प्रेमळ भक्त । माळ्यावरी उगाचि बैसत ।
जैसें बुजावणें मनुष्य दिसत । परी जीव किंचित त्या नाहीं ॥८४॥
दोन प्रहर येतांचि दिनकर । पक्षियांसी बोले मधुरोत्तरें ।
आतां पोट भरले असेल जर । तरी जावें सत्वर उदकासी ॥८५॥
ऎसें बोलोनि त्यांजकारणें । निवांत बैसे करीत भजन ।
हरीनामाची उमटे धुन । ऎकती दुरोन गांवकरी ॥८६॥
घरीं वाट पहातसे राणी । म्हणे घरासि नये आझुनी ।
कोठें बैसलासे जावोनी । कोणतें वनीं पहावें ॥८७॥
लज्जा अहंकार टाकोनी । उगाचि फिरतो जनीं वनीं ।
सोडिलें संसारासि पाणी । काय साजणी करूं आतां ॥८८॥
कन्येसि म्हणे बाहेर जाय । पिसा कोठें बैसला पाहे ।
मजला क्षुधा लागली आहे । जेविता न ये त्याजविण ॥८९॥
वडील कन्या काशीबाई । धांवत गेली लवलाही ।
तुकयास म्हणे ते समयीं । चाल गृहीं जेवावया ॥९०॥
तिजला देतसे प्रति वचन । आम्हीं शेतीं बैसलों राखण ।
त्याणें देऊं केलें धान्य । घरीं जाऊन सांग आतां ॥९१॥
कन्या परतोनि आली त्वरित । मातेसि सांगितला वृत्तांत ।
अवली अन्न पाठवी तेथ । मग आपण जेवित तेधवां ॥९२॥
तुका भाकर खावोनि तेथ । विचार करितसे मनांत ।
म्हणे रात्रंदिवस रहावें येथ । वेर झार व्यर्थ कासया ॥९३॥
प्रातःस्नान करोनि निश्चिती । देउळीं पूजीत पांडुरंग मूर्ती ।
मग सत्वर येऊनियां शेती । भजन एकांतीं करितसे ॥९४॥
सायंकाळ होता एक वेळ । पक्षियांसि म्हणे उठा सकळ ।
बहुत पडतां अंधकार सबळ । मार्ग साचार न दिसे तुम्हां ॥९५॥
ऎसें म्हणवोनी वैष्णवभक्त । एकदा पक्षियांसि उडवित ।
म्हणे प्रातःकाळ होतांचि समस्त । यावें त्वरित या ठायां ॥९६॥
देखोनि पक्षियांची रीती । तुका विस्मित होय चित्तीं ।
म्हणे चार दाणे येथेंचि खाती । घरासि न नेती कांहींच ॥९७॥
यांज सारिखे माझिया जीवा । कधीं करिशील देवाधिदेवा ।
तुज वांचूनी आमुचा हेवा । कोण केशवा पुरवील ॥९८॥
माझें लपो असतेंपण । नामरूपासि पडो खंडण ।
आत्मवत देख अवघे जन । नसो देहभान किंचित ॥९९॥
सोइरे सज्जन संबंधी पाहे । यांणीं न धरावी माझी सोय ।
जीत कां मेला माझा देह । प्रत्यया नये तें करीं ॥१००॥
प्रभंजने उडे गळित पान । तैसें व्हावें माझें चालणें ।
स्वमुखें तुझें वर्णीन गुण । तें उचित दान मज देयीं ॥१०१॥
पक्षी श्वापदें तरुवर जाण । ब्रह्मादि पिपीलिका आदिकरून ।
सर्वत्र व्यापक एक चैतन्य । लेखीं समान तें करीं ॥२॥
सोनें आणि दगड माती । माझ्या दृष्टीं सारखीं दिसती ।
दुराशा कदा नुपजो चित्तीं । ऎसें श्रीपती करावें ॥३॥
अपशब्द बोल कानीं पडती । अथवा केली कोणी स्तुती ।
तें समान वाटे मजप्रती । ऎसी स्थिती करी माझी ॥४॥
ऎशाच रीतीं तुका नित्य । चित्तीं कल्पीत मनोरथ ।
हृदयीं भरला पंढरीनाथ । स्वानंद भरित सर्वदा ॥५॥
गोवर घालोनि तये ठायीं । हुताशन चेतवीत पाहीं ।
किंचित निद्रा येताचि देहीं । जागृत लवलाहीं होतसे ॥६॥
सकळ गांवींचे पक्षी निश्चित । तेथेंचि येत नित्य नित्य ।
कण खातांचि वैष्णव भक्त । संतोष पावत कैशा रीती ॥७॥
जैसा कनवाळु दाता निश्चिती । स्वग्रहीं जेववीत द्विजपंक्ती ।
तुकयासि संतोष तैशाच रीतीं । पुरवीत आर्ती क्षुधितांची ॥८॥
एक मास लोटतां ऎशापरी । तों खेप करोनि आला शेतकरी ।
म्हणे धान्य पिकलें कैसें तरी । ये अवसरीं पाहावें ॥९॥
ऎसें म्हणोनि लवलाहीं । शेतासि आला ते समयीं ।
तों काळीं कणसें पिशा सर्वही । कण एकही दिसेना ॥११०॥
परम संताप वाटला तेव्हां । अधर खावोनि चावितसे जिव्हा ।
म्हणे तुकयानें साधिला दावा । न्याय सांगावा कवणासी ॥११॥
ऎसें म्हणवोनि चित्तांत । चार्ही कोपर हिंडोनि पाहात ।
त्याच्या भयें करोनि निश्चित । पक्षी समस्त उडाले ॥१२॥
जैसें भोजन होतांचि पाहें । तयामाजी अंत्यज जाय ।
मग ब्राह्मण उठती लवलाहें । जेवितां ठाय टाकोनी ॥१३॥
असो आतां शेतकरियानें । दशदिशा पाहिल्या हिंडोन ।
तों शेत भक्षीलें पक्षीयानें । एकही कण दिसेना ॥१४॥
तों माळ्यावर बैसोनि । निश्चित प्रेमळ तुका भजन करित ।
नाना अपशब्द बोलत बोलत । कुणबी येत लवलाहीं ॥१५॥
सक्रोध तुकयासि बोलत उत्तर । कैसें बुडविलें माझें घर ।
तूं सा पायल्यांचा चाकर । एक मासभर ठेविला म्यां ॥१६॥
तुजवरी विश्वास ठेवुनियां । मी गेलों खेप आणावया ।
तुवां शेत चारिलें पक्षीयां । द्वंद्व तुकया साधिलें ॥१७॥
ऎसें म्हणवोनि क्रोधदृष्टी । धरोनि वोढिला मणगटीं ।
म्हणे खपाट्यासी पडली गांठी । आतां नव्हेचि सुटी सर्वथा ॥१८॥
एक दुर्जन एक संत । एक विषकंद एक अमृत ।
दैवयोगें गांठी पडत । तैसेंचि निश्चित हें झालें ॥१९॥
कीं एक समुद्र एक अगस्ती । एक रहु एक निशापती ।
मिळणी होय प्रारब्धगती । तैसीच गती हे झालें ॥१२०॥
की राजहंस आणि ससाणा एक । कीं एक श्रोत्रिय एक हिंसक ।
कीं जारिणी आणि पतिव्रतेसि देखा । गांठी नावेक पडियेली ॥२१॥
कीं एक निंदक खळ कुटिलं । एक वैष्णवभक्त प्रेमळ ।
एक शुचिर्भुत एक अमंगळ । मिळणी मिळे अवचिता ॥२२॥
तैशाच रीतीं तुकयाकारणें । वाढोनि चालविलें कुणबियानें ।
पाटील कुळकर्णी बैसले जाण । आला घेऊनि त्या ठायां ॥२३॥
पिटीत तोंड वक्षस्थळ । आबावें मांडिलें तये वेळ ।
देवदत्त कुणबी मत न कळे । अहाणा सकळ बोलती ॥२४॥
ऎसें देखुनि लवलाहें । ग्रामस्थ पुसती झाले काय ।
मग आद्यंत वृत्तांत सांगताहे । करावें काय म्यां आतां ॥२५॥
तुकयासि पुसती ते वेळे । मग सत्य सांगे भक्त प्रेमळ ।
ज्याच्या वाचेसि असत्य मळ । अनुमात्र विटाळ स्पर्शेना ॥२६॥
म्हणे हा मज बोलिला वचन । धान्य देईन आदमण ।
माझ्या शेतीं राखण । तें म्यां मान्य केलें ॥२७॥
मजसीं इतुकें बोलिला उत्तर । माळ्यावर बैसोनि राखीं पांखरें ।
तीं म्यां उडविलीं असतीं जर । तरी मरतीं साचार अवचितां ॥२८॥
पक्षी मिळोनियां समस्त । चार चार दाणे खाती नित्य ।
घरासि नव्हते कांहीं नेत । मग म्यां निश्चित कां वर्जावें ॥२९॥
पक्षी रक्षावें हें वचन । म्हणोनि केलें त्याचें पाळण ।
ऎकोनि तुकयाचें बोलणें । सकळ जन हांसती ॥१३०॥
ऎसी ऎकोनियां वार्ता । संताप शेतकरियाच्या चित्ता ।
म्हणे पाटी बांधोनि जातो आतां । आपुल्या शेता सांभाळा ॥३१॥
ग्रामस्थ म्हणती त्या अवसरा । देणें लागतो दिवाण सारा ।
कुणबी पळोनि गेलिया खरा । विचार बरा मग नाहीं ॥३२॥
शेतकरियासि पुसती सहज । धान्य कितीक होतसे तुज ।
तें यथार्थचि सांग आज । सत्य उमज धरोनियां ॥३३॥
कुणबी सांगे तये दिवसीं । दोन खंड्या धान्य होतसे मजसीं ।
सत्य सांगतों तुम्हांपासीं । साक्षी गोष्टीसी उदंड ॥३४॥
ग्रामस्थ तुकयासि बोलत । तुम्हीं स्वमुखें सांगतां खादलें शेत ।
घरीं तों ऎवज नाहीं दिसत । तरी द्यावे खत लेहुनियां ॥३५॥
नायकाल जरी आमुचें वचन । तरी आतांचि जाईल पळोन ।
असामी याची भरील कोण । मग दंडील दिवाण आम्हांसि ॥३६॥
या लागीं सांगतों तूम्हांसी । रोखा लेहून द्यावा यासी ।
शेती पिशा राहिल्या त्यांसी । आपुल्या घरासी तुम्हीं न्या ॥३७॥
अवश्य म्हणतां वैष्णवभक्त । गाहीसुध्दां लिहिलें खत ।
कुणबियाच्या हातीं देत । संतोषयुक्त तो झाला ॥३८॥
पाहोनि कागदींचें धन । मूर्खासि जाहलें समाधान ।
निजस्वहितासि नाडला तेणें । विष्णु महिमा न कळेना ॥३९॥
ग्रामस्थीं करोनि पंचाइती । कब्जा तोडिला ऎशा रीतीं ।
म्हणती शेत खादलें तें सत्वरगती । पाहावें निश्चित जावोनियां ॥१४०॥
गांवाच्या पांड्या समवेत । पाहावया चालिले शेत ।
तों कौतुक करी पंढरीनाथ । तें ऎका निजभक्त भाविकहो ॥४१॥
पहिल्या परीस दशगुणें विशेष । कण दाटोनि भरलीं कणसें ।
आणिक कथा बहुत असे । ग्रामस्थ दृष्टीस पाहती ॥४२॥
पक्षीयांचा दंश पाही । कोठे न दिसें एके ठायी ।
देखोनि विस्मित जाहले ते सवेही । म्हणती नवायी अगाध हे ॥४३॥
मागें सांगत होता कजिया । तो शेतकरी म्हणतसे तया ।
खत फिरोनि द्यावें तुकया । शेत माझिया स्वाधीन करावें ॥४४॥
ग्रामस्थ म्हणती तये क्षणीं । पंचाईत फिरेल कैसेनी ।
आम्हांसी शब्द ठेवील कोणी । ऎसी करणी न करावी ॥४५॥
पिशाच कणसें जाहली साचीं । हे तो करणी विठोबाची ।
देवासि चिंता तुकयाची । प्रचीत त्याची आली कीं ॥४६॥
तूजला लेहोनि दीधलें याणें । तोचि सकरार न टळे जाण ।
राशीवर देईल तूझें धान्य । उरेल तें घेऊन जाईल ॥४७॥
ग्रामस्थ म्हणती तुकयाकारणें । आपल्या शेतीं बै राखण ।
ऎकोनि म्हणे वैष्णव जन । हें नये होऊन सर्वथा ॥४८॥
आम्हीं कांहीं घेतलें नसतां । तों येव्हडा अभिशाप आला होता ।
म्यां सगळें शेत अंगीकरितां । पुढें दंड कोणता कळेना ॥४९॥
ऎसे म्हणवोनि वैष्णवभक्त । सप्रेमभावें भजन करित ।
मग एक मोलकरी करोनि ग्रामस्थ । राखण तेथें बैसविती ॥१५०॥
मजूर लावोनि वेटाळिलें शेत । रास झालिया मोजूनि पहात ।
तों सतरा खंड्यांची आली गणित । विस्मित चित्त सकळांचें ॥५१॥
म्हणती इतकें पीक जाणा । गावांत जाहलें नाहीं कवणा ।
अघटित ईश्वराची रचना । कौतुकें नाना दाखवी ॥५२॥
एक म्हणती तुकयाचें घरीं । दुष्काळ उपवास पडले भारी ।
ते पारणें व्हावयासि सत्वरी । त्यासि श्रीहरी पावला ॥५३॥
एक म्हणती असत्य उत्तर । त्या कुणबियाचें दैव थोर ।
तुकशेट वाणी दिवाळखोर । दाणे जन्मवर न देता ॥५४॥
एक म्हणती पक्षियांनी खादले कण । त्याचें बहुत जाहलें पुण्य ।
त्याचें फळ देखिलें पूर्ण । पीक सधन आलें कीं ॥५५॥
असो त्रिविध जन नानारीतीं । आपुल्या कल्पना बोलती ।
वैष्णवी मायेची अनिवार भ्रांती । सर्वा मतीं अनावर ॥५६॥
मग दोन खंड्या धान्य । त्यातूनि पहिल्या शेतकरियासि दीधलें मण ।
खत दिधले होतें लेहून । तेंही मागून घेतलें ॥५७॥
तुकयासी म्हणती गांवकरी । हें धान्य नेऊनि सांठवी घरीं ।
तूं तरी उदास अंतरीं । यास्तव श्रीहरी पावला ॥५८॥
ऎसी ग्रामस्थ सांगती मात । परी ते न ऎकेचि प्रेमळभक्त ।
दुराशा नयेचि मनांत । औदास्ययुक्त सर्वदा ॥५९॥
निरपेक्ष मुख्य वैराग्यलक्षण । निरपेक्षासीच म्हणावे सज्ञान ।
निरपेक्ष साधक त्यासींच पूर्ण । भक्ति सगुण ठसावें ॥१६०॥
निरपेक्ष तेथें वसे शांती । निरपेक्ष त्यासीच बाणे विरक्ती ।
निरपेक्षापासीच उपरती । संतोष चित्तीं सर्वदा ॥६१॥
निरपेक्षाचा साचा विवेक । निरपेक्ष त्यासीचा मानिती लोक ।
निरपेक्षापासी सकळिक । सिध्दि अनेक तिष्ठती ॥६२॥
इतर स्थितीची कायसी गोष्टी । निरपेक्ष भक्ति निवडे शेवटीं ।
तयासीच पावे जगजेठी । इतर गोष्टी दांभिक ॥६३॥
ऎशा स्थितीचीं सकळ लक्षणें । तुकयाचे आंगीं बाणलीं चिन्हें ।
यास्तव नाना चमत्कारपूर्ण । रुक्मिणीरमण दाखवी ॥६४॥
असो मागील गोष्ट ऎका । धान्य देतांचि न घे तुका ।
संकट पडलें गांवींच्या लोकां । विचार निका सुचेना ॥६५॥
तेथील पांड्या भाविक पूर्ण । महादाजीपंत नामाभिधान ।
त्यांणें आपलें घरीं जाण । धान्य नेऊन सांठविलें ॥६६॥
म्हणे देवाच्या इच्छेनें पिकलें जाण । तें सत्कर्मी चालावें पूर्ण ।
पुढिले अध्यायी निरूपण । ऎकतां सज्जन संतोषती ॥६७॥
अहो भक्तलीलामृत ग्रंथ । निश्चित हेचि जाणावें परमामृत ।
वैष्णवजन जे भाग्यवंत । तेचि सेविती निजप्रीती ॥६८॥
जे षडवैरी जिंतोनि निश्चित । जनीं वर्तती द्वेषरहित ।
त्यांसीच आवडी लागेल येथ । अधिकार इतरातें असेना ॥६९॥
ज्यासि भगवत्प्राप्तीची चाड । श्रवणी भक्ति लागे गोड ।
त्यांसिच हें चरित्र आवडे । इतरांसि गोड लागेना ॥१७०॥
यास्तव तुम्हां संतांसी जाण । सलगीं करूनि धीटपणें ।
आर्ष नम्र बोलें वचन । नेणतपणे उध्दट ॥७१॥
श्रीमंताने आपुले बोटी । घातली पितळेचि आंगोंठी ।
तयासि लोक देखोनि दृष्टीं । कांचन दृष्टीं भावितील ॥७२॥
तैशाच परी तुम्ही संतीं । अवधान देतां मजप्रती ।
तरी महीपतीचा विशामती । प्रख्यात म्हणती जनलोक ॥७३॥
स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।
प्रेमळ परिसोत भाविक भक्त । एकुणतिसावा अध्याय रसाळ हा ॥१७४॥ अध्याय ॥२९॥ ओव्या ॥१७४॥ ६ ॥