श्रीगणेशाय नमः ।
अनंत जडजीव पांडुरंगे । भवपार उतरिले तुवां अंगें ।
मी एक राहिलों सकळां मागें । तारुं तूं होई ॥१॥
स्नान संध्या पितृतर्पण । जपतप कळा अनुष्ठान ।
यथाविधी तुझें अर्चन । नये घडोन सर्वथा ॥२॥
योगयाग न घडेचि कांहीं । शरीर जाहलें पाहीं ।
तिर्थाटण घडलें नाहीं । विठाबायी जाणसी तूं ॥३॥
सत्पात्री दानें द्यावीं जरी । तरी धनधान्य बहु नाहीं पदरीं ।
सत्त्वहीन मी बहुतांपरी । बुद्धि अगोरी असे माझी ॥४॥
सद्गुरु दास्यत्व संतसेवा । कांहीं न घडेच मज देवा ।
सर्वप्रकारें पांगुळ बरवा । असें केशवा तुज ठावें ॥५॥
सकळ दुरितें जाहली गोळा । त्याचा मीं निर्माण जाहलों पुतळा ।
अविधि विषय बहुत भोगिला । निवेदन तुजला करीतसे ॥६॥
पतित सर्वांगीं परिपूर्ण । साक्ष देतसे माझे मन ।
आतां आपुली विरुदावळी पाहोन । भवाब्धि उतरणें श्रीहरी ॥७॥
मागिले अध्यायीं कथा ऐसी । नारायण स्वरुप तुकयासी ।
देखोनि दोघे संन्यासी । सद्भावेसी नमस्कारिती ॥८॥
जाहले आद्यंत वर्तमान । शिवाजीस लिहिलें अधिकारियानें ।
मग पुणीयासी येऊनि नृपनंदनें । घेतलें दर्शन तुकयाचें ॥९॥
नाना उपचारें पूजोनि पाहीं । शिवाजी राजा लागला पायीं ।
मग कीर्तनासी प्रारंभ ते समयीं । भक्त विदेही करीतसे ॥१०॥
टाळ विणें मृदंग घोष । मागें ध्रुपदी पन्नास ।
विठ्ठल नाम घेतां सुरस । कोंदलें आकाश त्या नादें ॥११॥
आधींच हरिदिनी पर्वकाळ सुदिन । श्रवणासि सावध नृपनंदन ।
आणि प्रेमळाचे वक्तृत्व जाण । रंगासि उणें काय तेथें ॥१२॥
तों अविंध अधिकारी चाकणेंत । तयासि कळला वृत्तांत ।
मग दोनसहस्त्र पठाण धाडित । शिवाजी नृपनाथ धरावया ॥१३॥
विस्तीर्ण वाडा पुणियांत जाण । त्यांत होतसे हरिकीर्तन ।
श्रवणासि बैसला नृपनंदन । तों परचक्र दारुण पातलें ॥१४॥
रायासि कळतां हा वृत्तांत । तुकयासि जावया आज्ञा मागत ।
गजबजिले लोक समस्त । रंग अतिशयित वितुळला ॥१५॥
ऐसें अरिष्ट जाणोनि तेव्हां । मग विठोबाचा करीतसे धांवा ।
चार अभंग वदले तेव्हां । अर्थ पहावा सज्जनीं ॥१६॥
तुका देवासि भाकीतसें करुणा । भीत नाहीं मी आपुल्या मरणा ।
परी दुःख कांहीं होता जनां । हें माझ्या नयना न पाहावें ॥१७॥
भजनासि विक्षेप झाला जाण । याहूनि आम्हासि मरण तें कोण ।
तरी आपुल्या माया लाघवे करुन । निवारीं विघ्न विठोबा ॥१८॥
ऐसें ऐकोनि करुणाघन । तुकयासि देतसे आश्वासन ।
तुवां सुखें करावें कीर्तन । रक्षिता जगज्जीवन मी यासी ॥१९॥
इकडे बाहेर अविंध उन्मत्त । म्हणती शिवाजी राजा न ओळखूंच यांत ।
तरी श्रोते वक्ते मारावे समस्त । मग सहजचि नृपनाथ सांपडेल ॥२०॥
ऐसा विचार करितां दुर्भती । तों लाघव करितसे रुक्मिणीपती ।
आपण होऊनि शिवाजी नृपती । सत्त्वरगतीं पळतसे ॥२१॥
अविंधसेनेंत होते हेर । त्यांणीं ओळखिला नृपवर ।
म्हणती हाचि दावेदार । धरा लवलाहें ॥२२॥
ऐसें म्हणवोनि उठाउठीं । सकळ पठाण लागले पाठीं ।
तों मायालाघवी जगजेठी । क्षण एक दृष्टीं पडतसे ॥२३॥
आटोपितां संनिध येती पाही । धरुं जातां कांहींच नाहीं ।
म्हणतां संन्निध भासे । धरुं जातां कांहींच नसे ।
प्रहरांत जाता वीस कोस । नेलें तयांस कांटवणीं ॥२५॥
श्रीकृष्ण अवतारीं जगज्जीवन । पळाला काळयवनाचे भेणे ।
मग मुचुकुंद विवरीं जगज्जीवन । बैसे लपोन ज्यारीतीं ॥२६॥
तैशाच रीतीं चक्रपाणी । अदृश्य जाहले तये रानीं ।
तों चंद्र गेला मावळोनी । काहूर गगनीं कोंदलें ॥२७॥
अविंधासि मार्ग न दिसे कोठें । वस्त्रें फांटलीं लागतां कांटे ।
अश्वही पळोनि गेले गोमटें । जाहले करंटे भिकारी ॥२८॥
इकडे तुका प्रेमळ भक्त । श्रीहरिकीर्तनीं गात नाचत ।
श्रोते तटस्थ जाहले समस्त । रंग अद्भुत ओडवला ॥२९॥
कृष्णाविष्णु हरि गोविंदा । अच्युता आनंता आनंदकंदा ।
परमपुरुषा सच्चिदानंदा । श्रीमुकुंदा जगद्गुरु ॥३०॥
ऐसी नामें गावोनि नाना । सप्रेम रसें भाकीतसे करुणा ।
प्रेमें सद्गदित कंठ जाणा । अश्रु नयना लोटती ॥३१॥
ऐशा रीतीं सप्रेम गजरें । रात्र लोटली चार प्रहर ।
उदयासि येतां दिनकर । मग रुक्मिणीवर ओवाळिला ॥३२॥
परचक्र गेलें आपुले मतीं । म्हणवोनि विस्मित जाहला भूपती ।
म्हणे मरण चुकविलें आजिचे रात्रीं । बैसतां संगतीं संतांचे ॥३३॥
तुकयासि पुसोनि सत्वर । सिंहगडी चालिला नृपवर ।
मग प्रसाद मागतां ओंजळभर । लीद निज करें दीधली ॥३४॥
ती पदरी घेऊनि नृपनाथें । नेऊनि ठेविली दुकानांत ।
चित्ती संतोष जाहला बहुत । म्हणे भाग्य उदित पैं माझें ॥३५॥
इतुकें चरित्र पुण्यात पाही । वर्तलें असे ते समयीं ।
मग तुकयासि लोहगांवीं । घेवोनि सर्वही लोक गेले ॥३६॥
तों कोंडोबा लोहकर्या आडनांव । तुकयापासी त्याचा भाव ।
ध्रुपद धरितसे अपूर्व । जेणें वैष्णव संतोषती ॥३७॥
तो तुकयासि म्हणतसे नित्य । महायात्रेसि जावयाचा आहे हेत ।
तुमचें वचन मानिती गृहस्थ । तरी देशावर मातें करुनि द्या ॥३८॥
खर्चासि कांहीं नसे जाण । कार्य होईल तुमच्या वचनें ।
ऐसें नित्य म्हणतां ब्राह्मण । वैष्णव जन काय करी ॥३९॥
आसनाखालीं घालोनि हात । एक होन काढोनि देत ।
कोंडोबा जाहला संकोचित । म्हणे इतुक्यांत कार्यार्थ न होय ॥४०॥
मग तुकया तयासि सांगतसे कायी । हा नित्य मोडित जायी ।
त्यांतूनि एक पैसा ते समयीं । पदरीं ठेवी आपुल्या ॥४१॥
दुसरे दिवशीं परतोन । त्याचा मागुती होईल होन ।
चारदां मोडितां बिळांतून । परि पैसा जतन एक करी ॥४२॥
सत्पात्रीं वेंचूनि धन । यात्रा करावी संपूर्ण ।
मागुतीं येशील परतोन । मग देईं होन आमुचा आम्हां ॥४३॥
कोंडोबा ब्राह्मण विस्मित मनीं । चमत्कार पाहूं आजिचे दिनीं ।
होन मोडोनि तये क्षणीं । पैसा त्यांतुनी ठेविला ॥४४॥
सामग्री आणोनि तांतडी । केलें लाही पीठ गूळ पापडी ।
तूप गूळ घेतला सवडसवडी । जिव्हेसि गोडी लागावया ॥४५॥
ऐसें साहित्य करोनि फार । तुकयासि पुसावया आला विप्र ।
म्हणे होन मोडोनि सत्वर । पाहिला चमत्कार म्यां स्वामी ॥४६॥
ऐकोनि म्हणे वैष्णव भक्त । कोणासि कळों नेदी मात ।
आपुला साधूनि कार्यार्थ । मागुतीं आम्हासि दे आणून ॥४७॥
मग तीन अभंग वैष्णव वीरें । तया हातीं पाठविलें पत्र ।
त्याचा अर्थ संकळित सार । ऐका चतुर भाविकहो ॥४८॥
विश्वेश्वर जो कैलासपती । तयासि एक लिहिली विनंती ।
एक तें पत्र भागीरथी। विष्णुपदासि विनंति एक असे ॥४९॥
विश्वरचना दिसती अपूर्व । तें विराट स्वरुप तूं महादेव ।
म्हणवोनि विश्वनाथ हें नांव । भक्तगौरव तुज देती ॥५०॥
दीन रंक अनाथावरी । कृपा करावी ये अवसरीं ।
वारंवार पायांवरी । मस्तक निर्धारीं तुमच्या ॥५१॥
अल्प संतोषी माझें मन । तुम्हांपासीं तों काय उणें ।
तुका भातुकें इच्छितों मनें । तरी तें पाठवणें धूर्जटी ॥५२॥
आतां भागीरथीसि लिहिलें काय । म्हणे माझी विनंति परिसा माय ।
सकळ तीर्थांचें स्वामित्व पाहे । अंगीं तुझिये असे कीं ॥५३॥
महादोषांचें निवारण । दर्शनमात्रें करिशील जाण ।
म्हणोनि तुझें चरणीं नमन । निजप्रीतीनें करितसें ॥५४॥
सद्भावें तुझिया जळीं न्हाती । तयासि प्राप्त भुक्ति मुक्ती ।
संतांच्या पोसणा तुका म्हणती । वैष्णववीर प्रीतीं धाडितसे ॥५५॥
विष्णुपद रायेसि थोर । तयासि विनवीत वैष्णववीर ।
पिंड दीधला पदावर । आपुल्या निजकरें करोनी ॥५६॥
माझेंहीं गया वर्जन झालें । पितरांचेंही ऋण फिटलें ।
कर्मांतरही सांग घडलें । ओझें उतरले मीपणाचें ॥५७॥
एक हरिहरनाम देखा जनांत । बोंब ठोकितसे तुका ।
हे तिन्ही अभंग लिहिली पत्रिका । अनुभव सुखाचेनि बळें ॥५८॥
तें कोंडोबा लोहकर्या घेऊनि हातीं । तुकयासि नमस्कार करीतसे प्रीतीं ।
मग महायात्रेसि निश्चिती । सत्वर गतीं चालिला ॥५९॥
वाटेसि होन मोडोनि देख । पदरी पैसा बांधीतसे एक ।
खर्च करीतसे अधिक अधिक । आश्चर्य लोक ते करिती ॥६०॥
म्हणतीं पदरीं नसतां धन । खर्च करीतसे कोठून ।
जैसा वाळूंतींल विहिरा जाण । त्यांतील जीवन न सरे ॥६१॥
लहनचि दिसतो त्याचा सांठा । परी जीवन काढितां नये तोटा ।
तैसीच कोंडोबाची निष्टा । न सांगे बोभाटा कोणासी ॥६२॥
ऐशारीतीं क्रमितां पंथ । वाराणसीसि गेला त्वरित ।
स्नान केलें भागीरथींत । मग निरोप सांगत निजप्रीतीं ॥६३॥
सकळ तीर्थांची स्वामिनी मायें । तुकयानें तुज पत्र दीधलें आहे ।
ऐसें बोलतांचि लवलाहें । तों कौतुक काय वर्तलें ॥६४॥
महा पात्रांतून भागीरथी । बाहेर काढीतसे प्रीतीं ।
रत्नजडित कंकण हातीं । जैसा गभस्तीं उगवला ॥६५॥
तीरीं यात्रा बहुत होती । देखोनि लोक आश्चर्य करिती ।
म्हणती साक्षात आली भागीरथी । म्हणोनि स्नानें करिती लवलाहें ॥६६॥
एक घेऊनि मोहरहोन । हातावर ठेविती प्रीतीनें ।
कोणी तोडगर चोळी चोळखण । सौभाग्यवायन पैं देती ॥६७॥
ऐशा रीतीं पूजा करितां । परी हातीं न घेचि विश्वमाता ।
तेव्हां कोंडभटाचिया चित्ता । स्मरण अवचितां जाहलें ॥६८॥
मग तुकयाचें पत्र घेऊन त्वरित । पुढें शिरला पाण्यांत ।
तें हातीं देखताचि त्वरित । तों मूठ वळित भागीरथी ॥६९॥
ऐसें कौतुक दाखवूनि त्वरित । मग हात गेला जळांत ।
देखोनि क्षेत्रवासी समस्त । जाहले विस्मित मानसीं ॥७०॥
म्हणती तुकयाची वाक्पुष्पें येथें । भागीरथीस आवडलीं निश्चित ।
ज्याच्या वह्या उदकांत । रुक्मिणीकांतें रक्षिल्या ॥७१॥
असो कोंडभटें चार मास । आवडीनें केला काशीवास ।
तुकयाचा अभंग पाठ असे । तो विश्वेश्वरास निवेदिला ॥७२॥
शब्दरत्नांची विनवणी । ऐकोनि डोले शूलपाणी।
बेलपुष्पें पडती ते क्षणीं । लोक नयनीं पाहती ॥७३॥
भागीरथीं आणि विश्वेश्वर । दोघांनीं दाखविला चमत्कार ।
यात्रकरियांसि आश्चर्य थोर । वाटलें साचार तेधवां ॥७४॥
मग गयेसि जाऊनियां त्यानें । जाहला वडिलांचा उत्तीर्ण ।
तुकयाच्या प्रसादें करोन । वेचिलें धन सत्पात्रीं ॥७५॥
ऐसीं यात्रा करोनि निश्चित । माघारें चालिलें क्रमित पंथ ।
चित्तीं बहुत हर्षयुक्त । काय बोलत मानसीं ॥७६॥
तुकयासि मागतां देशावर । तों महासिद्धी लाधली थोर ।
औषधवल्ली पाहतां साचार । तों अमृततुषार जोडला ॥७७॥
कां इच्छितां थिल्लरींचें पाणी । तों पुढें समुद्र देखिला नयनीं ।
शेळीचें दुभतें इच्छित मनीं । तों घरीं नंदिनी आली कीं ॥७८॥
पाठांतर व्हावें मनीं धरितां । तों जिव्हेसि आली प्रसादिक कविता ।
कां उष्णकाळीं उबारा होतां । तों हिमनग अवचितां देखिला ॥७९॥
दीपकाचा प्रकाश इच्छितां थोर । तों अंधारीं प्रगटला भास्कर ।
स्वप्नीं दृष्टांत व्हावा सत्वर । तों साक्षात श्रीधर भेटला ॥८०॥
तेवीं महायात्रा व्हावया कारणें । देशावरचे इच्छिलें धन ।
तों महासिद्धी तुकयानें । निजप्रीतीनें दीधली ॥८१॥
आतां होन मागती परतोन । तरी सर्वथा देऊं नये त्याजकारण ।
ऐसा अभिलाष धरोन । घेतलें दर्शन तुकयाचें ॥८२॥
गांवाबाहेर लोहगांवीं । एकांतीं बैसे तुका विदेही ।
कोंडोबा लोहकर्या लवलाहीं । येऊनि पायीं लागला ॥८३॥
म्हणे आपुल्या प्रसादें सत्वरा । सकळ जाहली असे यात्रा ।
स्मरण जाहले वैष्णववीरा। होन माघारा मागती ॥८४॥
कोंडभट बोले प्रत्युत्तर । होन हारपला साचार ।
बरें म्हणोनि वैष्णव वीर । तयासि उत्तर बोलतसे ॥८५॥
कोंडभट घरासि लवलाहीं । जाऊनि पाही ते समयीं ।
तों ग्रंथिकेमाजी कांहींच नाहीं । विस्मित जीवीं मग होय ॥८६॥
म्हणे आज दोन प्रहरां केलें स्नान । तेव्हां पदरीं होता होन ।
ग्रंथिका तैसीच आहे जाण । गेला निघोन कैशा रीतीं ॥८७॥
जरी आतां सांगावें तुकयासी । तरी हारपला म्हणोनि वदलों त्यासी ।
माझें कपट फळलें मजसी । म्हणोनि कुसमुसती अंतरी ॥८८॥
एक सद्गुरुद्रोह पडला पाहीं । संसारीं स्वार्थ दाटला नाहीं ।
अपयश आलें दोहों ठायीं । यास्तव जीवीं झुरतसे ॥८९॥
असो आतां हा विचार । आशापाशें नाडले फार ।
एकीं हार केला वर । पंचाग्नि धूर एक घेती ॥९०॥
एक करिती दुग्धपान । एकीं सेंविलें महारण्य ।
एकीं जटा वाढवून । आत्मोद्धुलन सर्वांगीं ॥९१॥
एकीं झाडासि झोला बघून । घालिती चौर्याशीं आसना ।
एक मौनी न बोलती वचन । मग देती लिहुन पाटीवरी ॥९२॥
एकीं करोनि वेदाध्ययन । करिती गृहस्थांचें उपार्जन ।
एक पंडित होऊनि जाण । वाद घालणें पुढिलासी ॥९३॥
एक होऊनि हरिदास । ज्ञान सांगती बहुवस ।
एकीं घेतला संन्यास । एक विष्णुदास म्हणविती ॥९४॥
जंगम शेवडे आणि फकीर । कानफडे आणि दिंगबर ।
एक अघोर पंथ म्हणवितो थोर । किती विस्तार सांगावा ॥९५॥
हे पाहिले असती बहुवस । परी देखिला नाहीं निराश पुरुष ।
तैसें तुकयाचें नव्हे मानस । चित्तीं उदास सर्वस्वें ॥९६॥
सर्व सिद्धि अनुकूळ असतां । तयांसि हाणितल्या कीं लाता ।
षड्वैरी जिंतोनि तत्त्वतां । रुक्मिणीकांता भजतसे ॥९७॥
ग्लांती करितांही नृपवर । नाहीं मोकासा घेतला थोर ।
नाहीं वाडा बांधविलें घर । वस्त्रें अळंकार न घेचि ॥९८॥
अल्प आहार सेवितां जाण । ग्रासोग्रासीं हरिस्मरण ।
रात्रंदिवस हरिकीर्तन । नाहीं खंडण तयासी ॥९९॥
संसारपाश टाकोनि निश्चित । आणी चौदा वैष्णव भक्त ।
धरोनि तुकयाची संगत । धरिती ध्रुपद कीर्तनीं ॥१००॥
तयासि न पुसतां पाहीं । उठोनि जाती आणिके गांवीं ।
मग ते धुंडीत लवलाहीं । मागूनि सर्वही येताती ॥१॥
जरी कोणी पुसिलें वैष्णववीरा । कोठें जातां ये अवसरा ।
म्हणे आम्ही जातो वैकुंठपुरा । घातला धारा ऐशा रीतीं ॥२॥
कोणी उत्तर पुसिलें जाण । तरी तें न बोले अभंगावीण ।
जिव्हा रंगली नामस्मरणें करुन । काया परिपूर्ण ब्रह्म झाली ॥३॥
एके दिवसीं वैष्णवभक्त । लोहेगांवीं कीर्तन करित ।
नामरुपीं जडलें चित्त । देहभाव समस्त विसरला ॥४॥
टाळ विणे मृदंग घोष । नाद ब्रह्मचि आलें मुसे ।
विठ्ठलनामाचा होतसे घोष । तेणें आकाश कोंदलें ॥५॥
जैसी वक्तयाची स्थिति पाहीं । तैसेच श्रोते जाहले विदेही ।
जो हिलालासि तेल घालीतसे पाहीं । देहभाव नाहीं तयासी ॥६॥
तटस्थ मुद्रा सर्वांकारणें । स्नेह न घालितां विझाला अग्न ।
तों अद्भुत कौतुक वर्तलें जाण । तें ऐका सज्जन भाविक हो ॥७॥
तुकयाचा अंगाचा प्रकाश । पडिला तेव्हां बहुवस ।
माझ्या मतीनें ऐसें भासे निःशेष । दृष्टांत सुरस अवधारा ॥८॥
गर्भ असतां मातेच्या उदरीं । तें तेज उमटे अंगावरी ।
कां जैसा चाकवी अनुभव अंतरीं । तो उद्गार बाहेरी वदे वचा ॥९॥
ना तरी बिलोराच्या मंदिरांत । दीप उजळोनि ठेविला निश्चित ।
त्याचा बाहेर प्रकाश पडत । द्वारा किंचित नसतांहीं ॥११०॥
तैसें तुकयाच्या उदरीं सहज । सुरवारें बैसे गरुडध्वज ।
त्याचें बाहेर फांकले तेज । ऐसेंच मज वाटतसे ॥११॥
महाकवीची काव्य गोष्टी । कीं कोटि सूर्य विष्णूचे मुगुटीं ।
तो भक्तवत्सल जगजेठी । तुकयाचें पोटी सांठविला ॥१२॥
म्हणोनि अंगीचा प्रकाश । कीर्तनीं पडिला बहुवस ।
अनुभवेम देखिलें दृष्टीस । भाग्य विशेष पैं त्याचें ॥१३॥
असो आतां जगदुद्धार । व्हावया भक्ताचा अवतार ।
कीर्तन जाहले तीन प्रहर । मग रुक्मिणीवर ओवाळिता ॥१४॥
खालीं बैसतां वैष्णववीर । तो मागुतीं पडिला अंधकार ।
श्रोते आले देहावर । तों हिलाल समग्र लाविले ॥१५॥
स्नेह आणिलें होतें समग्र । तें वेचिलें नाहीं आणुमात्र ।
तेलाचें तैसेंच भरलें पात्र । आश्चर्य थोर लोक करिती ॥१६॥
लोहगांवींचे भाविक नर । त्यांसि तुकयाची सेवा घडली फार ।
त्यांनींच प्रेमा लुटिला समग्र । कीर्तन गजर ऐकतां ॥१७॥
जैसा कृष्ण अवतार मथुरेसि झाला । परी गोकुळीं क्रीडला घनसांवळा ।
तो व्रजवासी भोगिती सोहळा । तैसेंच मजला भासतसे ॥१८॥
जगविख्यात वैष्णव वीर । जनांत मान्यता वाढली फार ।
मग कोणासी न बोलतां उत्तर । देहुसि सत्वर पातला ॥१९॥
राउळासि जातां उठाउठी । पांडुरंग मूर्ति देखिली दृष्टीं ।
नमस्कार घाली सद्गद कंठी । जैसी दंड काठी पडतसे ॥१२०॥
जें ध्यान ठासावलें हृदयांतरी । ते सगुण मूर्ति देखिली बाहेरी ।
प्रेम न समावेचि अंतरीं । मग तें बाहेरी ओसंडे ॥२१॥
देवासि म्हणे करुण स्वरें । तुम्ही करावा अंगीकार ।
हा माझे ठायी विचार । नाहीं आन साचार विठोबा ॥२२॥
आतां दोहीं पक्षी जाण । म्यां लावोनि घेतलें लांछन ।
लाजविलें देव भक्त पण । साक्ष मन देतसे ॥२३॥
महत्वाची शृंखला पायीं । पडली असे विठोबायी ।
ममता वाढली जनाचे ठायीं । आतां मज सोडवी दयाळा ॥२४॥
नानापरीची पक्वान्नें देख । करोनि भोजन घालिती लोक ।
तेंच शरीरीं मानिलें सुख । तूं चैतन्यनायक साक्ष यासी ॥२५॥
अवगुणाचा थारा बहुवस । देहीं वाढवली निद्रा आळस ।
आतां तुज संतांची आण असे । तरी वैकुंठास मज नेयी ॥२६॥
ऐसी करुणा भाकितां चित्तीं । तों हांसोनि बोले पांडुरंग मूर्ति ।
म्हणे तुझे मनोरथ पूर्ण होती । मी श्रीपती रक्षिता ॥२७॥
तुझिया देहासि शेवटीं । काळाची पडो नेदीच दृष्टी ।
ऐसें बोलतांचि जगजेठी । सद्गदित कंठीं होय तुका ॥२८॥
यावरी आतां एके दिवशीं । तुकाराम गेले आळंदीसी ।
सभामंडपीं सद्भावेंसी । दंडवत देवासी घालितसे ॥२९॥
तों अजान वृक्षातळीं जाण । पक्षी वेंचीत होते कण ।
मग ते तुकयासि देखोन । गेले उडोन सत्वर ॥१३०॥
हें देखोनि प्रेमळ भक्त । अंग जाहलें रोमांचित ।
म्हणे माझें अभेद असतें चित्त । तरी पक्षीं उडत कासया ॥३१॥
षड्वैरी जिंतोनि साचार । शूरत्वें जाहलों वैष्णववीर ।
आत्मवत भासे जगत्र । तो व्यर्थच विचार गेला कीं ॥३२॥
शरींर जाहलें प्रेतवत । देहभाव नसेचि किंचित ।
ऐसीं जाहली माझी स्थित । ते व्यर्थचि दिसत मजलागी ॥३३॥
वैराग्याच्या शेणी शरीरा । लावोनि ब्रह्माग्नि चेतविला बरा ।
जाहलॊं संसारासि पाठमोरा । तें व्यर्थचि अंतरा मज भासे ॥३४॥
हा देह हांचि घट पाहीं । फोडिला विठोबाचे पायीं ।
वासनेचा क्षय केला जीवीं । तें व्यर्थचि सर्वही आज गेलें ॥३५॥
तिळांजळी कुळ नाम रुपांसी । ज्याचें शरीर अर्पिलें त्यासीं ।
स्थिति बाणली आहे ऐसी । तें व्यर्थचि मजसी दिसतसे ॥३६॥
आयुष्याचे न सरतां माप । रक्षा जाहली आपेआप ।
देहीच उजळला दीप । पांडुरंग बाप विश्वाचा ॥३७॥
हें आपुल्या अनुभवें वदलो स्थिति । परी माझ्या भयें पक्षी उडती ।
तरी व्यर्थचि वाणी वेचिलीं मती । म्हणवोनि चित्तीं खेद करी ॥३८॥
मग एकाग्र करोनियां चित्त । हृदयीं चिंतिला पंढरीनाथ ।
म्हणे दीनदयाळ कृपावंत । अनाथनाथ विठायी॥३९॥
डोळसाचा धरोनि हात । आंधळा क्रमीत जाय पंथ ।
परी न दिसेचि अणुमात्र । ईश्वरी भार घालोनिया ॥१४०॥
परमार्थ पंथ क्रमितां सांग । पाऊल पडलें आड मार्ग ।
दीन दयाळे पांडुरंग । तूं निजांगे सांभाळी ॥४१॥
ऐसें म्हणोनि प्रेमळ भक्त । तटस्थ उभा मग निवांत ।
सर्वथा अंग न हालवी किंचित । पात्यास पातें लागेना ॥४२॥
म्हणे माझ्या अंगावर नेऊन । पक्षी बैसतील निर्भय मनें ।
तेव्हांच होईल समाधान । नाहीं तरी जिणें व्यर्थचि हें ॥४३॥
ऐसा निश्चय करोनि थोर । तटस्थ उभा घटिका चार ।
श्वास न टाकीच अणुमात्र । हें जाणे अंतर विश्वात्मा ॥४४॥
तुकयाचा निश्चय देखोनि ऐसा । संकट पडिलें पंढरीशा ।
म्हणे याचा लळा पुरेल जैसा । ती युक्ति सहज करावी ॥४५॥
मी भक्ताची लळे पुरवीन श्रीपती । ऐसें बोलिलों श्रीभागवतीं ।
ती असत्य होईल वचनोक्ती । तुकयायी आर्ती न पुरवितां ॥४६॥
आत्मा व्यापक सर्वांभूतीं । तो हृदयस्थ जाहला करुणामूर्ती ।
तेव्हां पक्षी निर्भय होऊनि चित्तीं । अंतरावर बैसती तुकयाच्या ॥४७॥
मग अंग हालवितां प्रेमळ भक्त । तरी विहंगम पळोनि न जात ।
जैसें प्रभंजनें झाड हालत । तेणें पक्षी न भीत सर्वथा ॥४८॥
मग परमहर्ष मानूनि चित्तीं । एक अभंग रचिला प्रीतीं ।
त्याचा पहिला चरण निश्चिती । लिहितों ग्रंथीं ऐकिजे ॥४९॥
अवघींच भूतें साम्या आलीं । ही म्यां कधीं नव्हतीं देखिली ।
ती त्वां माझी आळ पुरवली । जेवीं समजवी माउली बाळकांते ॥१५०॥
ऐसें म्हणवोनि तेव्हां । सांष्टांग दंडवत ज्ञानदेवा ।
घालोनियां सप्रेम भावा । तुकयाच्या जीवा आनंद ॥५१॥
असो सिंहावलोकनें निश्चित । मागील चरित्र आठविजे श्रोतीं ।
कोणासि न पुसतां निश्चिती । अळंकावतीं पातले ॥५२॥
मागें चौदा वैष्णव भक्त । तुकयाचा शोध घेत घेत ।
धुंडीत आलें कीं समस्त । तों नवल अघटित देखिलें ॥५३॥
आजान वृक्षातळीं साचार । एकट तुका वैष्णववीर ।
पक्षी बैसती अंगावर । वारंवार ते समयीं ॥५४॥
हें कौतुक पाहोनि ते वेळे । अवघे जन पातले जवळ ।
तो पक्षी उडोनि गेले सकळ । धन्य काळ सुदिन तो ॥५५॥
असो आतां ते अवसरीं । पुण्य क्षेत्र अळंकापुरी ।
तेथें ज्ञानदेवाचें द्वारीं । तुका करी हरिकीर्तन ॥५६॥
टाळ विणे उपसाहित्य । तेंहीं मागूनि आलें समस्त ।
नाद ब्रह्म घवघवीत । श्रवणीं पडत श्रोतयांच्या ॥५७॥
कृष्णा विष्णु मेघश्यामा । अच्युता नरहरि पुरुषोत्तमा ।
भक्तकैवारी गुणधामा । भजनी प्रेमा मज देयी ॥५८॥
जोवरी देह अवसान । तोंवरी करीन हरिकीर्तन ।
एक वेळ आयुष्य करी उणें । परी गात्रें क्षीण होऊं नेदीं ॥५९॥
तुझे नामी पडे विसर । याहुनि घात कोणता थोर ।
हाळाहळें पोळला श्रीशंकर । तो नामेंचि सत्वर निवाला ॥१६०॥
गमन करितां त्रिभुवनी । नाम गातसे नारदमुनी ।
ब्रह्म विणा खांदा घेऊनि । सप्रेम मनीं सर्वदा ॥६१॥
हरि पाठाचे अभंग थोर । स्वमुखे वदले ज्ञानेश्वर ।
तेचि तुका वैष्णववीर । सप्रेमादरें गातसे ॥६२॥
टाळ्या चुटकियाची घायी । घागर्या नेपुरें वाजती पायीं ।
मृदंग विण्यांच्या स्वरांत कांहीं । भेद नाहीं अणुमात्र ॥६३॥
ऐशाच परी स्वानंदरसीं । नाद ब्रह्म कोंदलें आकाशीं ।
तेथें सुरवर येऊनि उल्हासीं । कौतुक दृष्टीसीं पाहती ॥६४॥
गुप्त रुपें करोनि देख । पुष्पें वर्षती वृंदारक ।
अवघाचि विश्वभंर भासे एक । सप्रेम सुख श्रोतयां ॥६५॥
असो वाणितां तुकयाची स्थिती । कुंठित होय कवीची मती ।
चार प्रहर लोटतां राती । मग रुक्मिणीपती ओंवाळिला ॥६६॥
द्वादशीस पारणे करोनि तेथें । देहु ग्रामासि चालिले त्वरित ।
मग ज्ञानदेवासि पुसोनि येत । देहु क्षेत्रांत मागुती ॥६७॥
तुकयाचि स्थिति ऐसी पाहे । सर्वांभूती निर्वैर होय ।
म्हणोनि पक्षीं न धरोनि भय । बैसत जाय अंगावरी ॥६८॥
हें बहुतांच्या मुखें करोनी । चिंचवडी देव ऐकती कानीं ।
म्हणती तुकयासि येथवर बोलावूनी । चमत्कार नयनीं पाहावा ॥६९॥
म्हणवोनी देहु क्षेत्रासि त्यांणीं । मनुष्य पाठविलें प्रीती करोनि ।
म्हणती तुकयासि विनीत होऊनि । येई घेऊनि येथवरी ॥१७०॥
अवश्य म्हणवोनि त्यांतें । येवोनि तुकयाचे दर्शन घेत ।
तेथें वैष्णव कीर्तन करीत । ऐकोनि विश्रांत जीवासी ॥७१॥
देवांचा निरोप सांगावा तेणें । तरी सर्वथा नाहीं देह भान ।
रात्रंदिवस ऐके कीर्तन । सप्रेम मनें सर्वदा ॥७२॥
दिवस तीन लोटतां जाण । तरी मनुष्य नयेचि परतोनि ।
देव म्हणती जावोनि आपण । घ्यावें दर्शन तुकयाचे ॥७३॥
ऐसें म्हणवोनि ते अवसरी । मग निघालें सत्वरी ।
हें तुकयासि कळतां अंतरीं । म्हणें आपण सामोरी त्यांसि जावें ॥७४॥
मग कोणासि न पुसतां सत्वर । तेथुनि निघाला वैष्णववीर ।
अर्धपंथ क्रमितां सत्वर । भेटले द्विजवर तुकयासि ॥७५॥
तुकयासि देतां आलिंगन । देवांचें संतोषित झालें मन ।
म्हणती धन्य धन्य आजिचा सुदिन । जाहलें दर्शन वैष्णवाचें ॥७६॥
मग स्वस्थ बैसोनि तेथ । म्हणती बरा फावला एकांत ।
सवें भूतें साम्यासि येत । पक्षी बैसत आंगावरी ॥७७॥
तृणाचें बुजावणें हालतां निश्चिती । तयांसि विहंगम देखोनि पळती ।
आणि तुमच्या आंगावरी निर्भय बैसती। ही अद्भुत स्थिति बाणली ॥७८॥
मनुष्याकृति दिसती आम्हां । तरी येथें सर्वथा नाहीच उपमा ।
अद्भुत बोलोनि भक्ति प्रेमा । पुरुषोत्तमा वश्य केलें ॥७९॥
तरी तुकया तूं कोण निश्चित । हें आम्हांसि सांगें सत्य ।
अनुभवें आणोनि प्रचीत । संशय निवृत्त करावा ॥१८०॥
ऐसें पुसतांचि उपासका । तयासि चमत्कार दाखवी तुका ।
मांडीचे कातडे चिरलें देखा । तों कापूस निका त्यामाजी ॥८१॥
हाड मांस रुधिर नाहीं । कापूस पिंजला दिसतसे पाहीं ।
देखोनि देव विस्मित जीवीं । म्हणती मानवी कांहीं नव्हे तुका ॥८२॥
करावया जगदुद्धार । मृत्युलोकीं जाहला अवतार ।
मनुष्याकृति दिसती वर । परी हा ईश्वर म्हणावा ॥८३॥
ऐशा रीतीं करोनि स्तवन । देवीं केलें साष्टांग नमन ।
तुका तयाचे धरितसे चरण । म्हणे अनुचित करणें हें स्वामी ॥८४॥
मी तरी शूद्र जातीचा पाहें । सकळ संतांचा सेवक आहें ।
ऐसें म्हणवोनि लवलाहें । सप्रेम पाय धरीतसे ॥८५॥
श्रीकृष्णें जैसी भक्षिता माती । विश्वरुप पद दाखविलें मातें पती ।
मग नमस्कार करी यशोदा सती । तेव्हां रडे श्रीपती बाळलीलें ॥८६॥
म्हणे मी तुझें बाळक निश्चित । माझ्या पायां कां पडसी माते ।
तैसीच तुकयाची स्थित । अमानित्व चित्ती सर्वदां ॥८७॥
चर्म चिरोनि आपुल्या हातें । कापूस दाखविला देवातें ।
तें नमस्कार करितां तयातें । म्हणे अनुचित करीतसां ॥८८॥
जैसीं विष्णु चरित्रें अघटित । तैशाच रीतीं दाविती संत ।
देव आणि निजभक्तां । भेद किंचित असेना ॥८९॥
वायु आणि चंचळपण । कां सूर्य आणि त्याचे किरण ।
समुद्र आणि कल्लोळ पूर्ण । नव्हती दोन सर्वथा ॥१९०॥
ऐशा रीतीं करोनि स्तुती । देवांनीं तुकयासि धरोनि हातीं ।
चिंचवड क्षेत्रीं नेऊनि रात्रीं । कीर्तन ऐकती निजप्रेमें ॥९१॥
चारी प्रहर कीर्तन गजर । करोनि तोषविले द्विजवर ।
मग उदयासि येतांचि दिनकर । रुक्मिणीवर ओवाळिला ॥९२॥
असो यापरी गाणपत । तुकयाचे ठायीं धरोनि प्रीत ।
तीन रात्रीं राहोनि तेथ । श्रवण करित हरिकथा ॥९३॥
पक्वानें करोनि नानारीतीं । ब्राह्मण संपतर्ण केलें प्रीतीं ।
मग तुकयासि घेऊनिया पंक्ती । भोजन करिती प्रीतीनें ॥९४॥
असो यापरी जाहलीं भोजनें । तांबूल बुका आणि सुमनें ।
पुष्पपहार गळ्यांत घालोन । विष्णुभक्त प्रीतीनें पूजिला ॥९५॥
मग देवासि पूसोनि देखा । देहुसि वैष्णव येतसे तुका ।
जो लीला विग्रहीं अवतार निका । वैकुंठनायका प्रिय जो ॥९६॥
भजन करितां सप्रेम रंग । स्वयें आपणचि जाहला पांडुरंग ।
मग त्याचे केले दोन भाग । भक्ति सुख निजांगें भोगीतसे ॥९७॥
एकचि देव असतां निश्चित । मग कोणाची धरावी आर्ती ।
फळांच्या राशी पडिल्या क्षितीं । परी सेवणारा त्यांजप्रती एक व्हावा ॥९८॥
आरसा निर्मळ असतां जाणा । परी तयासि दुसरा पाहिजे देखणा ।
कां पुष्पाचें मकरंद नाना । एक घ्राणाविण व्यर्थ ॥९९॥
तैशाच रीतीं भक्ताविण । देवाचें ऐश्वर्य जाणेल कोण ।
म्हणवोनि आपुलेंच भजन करिती आपण । विभाग दोन करुनियां ॥२००॥
मुक्तीवरील चौथी भक्ती । बोलिली असे श्रीभागवतीं ।
तें साच दाखवावया निश्चिती । तुकाराम क्षितीं अवतरला ॥१॥
ज्याणें करोनि कीर्तन गजर । कळिकाळ हा जिंतीला दुर्धर ।
म्हणवोनि काया जाहली अमर । ब्रह्मरुप समग्र अंग झालें ॥२॥
उदंड सत्पुरुष जाहले महीं । परी शरीर येथेंचि ठेविलें तिहीं ।
तुका ब्रह्मरुप असोनि देही । हेचि नवायीं अगाध ॥३॥
पुढिले अध्यायीं कथा गोमटी । जो दीन दयाळ जगजेठी ।
तो तुकयासि येऊनि उठाउठी । नेईल वैकुंठी निजलीले ॥४॥
जो अच्युतानंद आनंद कंद । लीलाविग्रही सच्चिदानंद ।
तो महीपतीसि देऊनि अभय वरद । वदवी स्वच्छंदें भक्तकथा ॥५॥
स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।
प्रेमळ परिसोत भाविक भक्त । एकोणचाळिसावा अध्याय गोड हा ॥२०६॥ ॥ओ०॥२०६॥