श्रीगणेशाय नमः ॥
भगवत्प्राप्ति व्हावया कारण । ऐसें इच्छिती साधक जन ।
ऐसें श्रेष्ठ कोणतें साधन । तरी सत्संगत तेणें धरावी ॥१॥
लहान थोर सकळ तीर्थे । पुराण प्रसिद्ध नामांकित ।
तीं संतापासीं अवघीं राहत । पर्वकाळ समवेत सर्वदा ॥२॥
योग यज्ञव्रत उद्यापन । कलियुगीं न होय साधन ।
न करवे महाविष्णूचें ध्यान । चंचळ मन हें आवरेना ॥३॥
भवसिंधु तरावया स्वभावें । नामनौका करोनि ठेविली देवें ।
आणिक श्रेष्ठ नसेचि उपाय । सज्ञान वैष्णव जाणती ॥४॥
नामें करोनि परमपद प्राप्ती । ऐसें श्रीकृष्ण बोलिले भागवतीं ।
श्रुतीचें वाक्य विष्णुसूक्तीं । ऐसें निश्चितीं यापरी ॥५॥
नामीं विश्वास बैसावया कारणें । ऐसी इच्छा वाटली मनें ।
तरी सत्संगति धरावी तेणें । मग बोधतसे मन सहजची ॥६॥
साधु संगति करितां पाहे । तरी सहजची श्रवण घडता हे ।
श्रवणापासीं मनन होय । मग निदिध्यास लाहे तत्काळीं ॥७॥
मागिल अध्यायीं कथा गोमटी । एकनाथासि पाहोनि कृपादृष्टीं ।
जनार्दनें श्रीदत्ताची करोनि भेटी । हें कौतुकें दृष्टी दाखविले ॥८॥
सद्गुरु होऊनि लोभापर । एकनाथाचा धरोनि कर ।
मग पातलिया निजमंदिर । तों पुढें चरित्र काय झालें ॥९॥
स्वामीचे कृपेनें साचार । पूर्ण बोधे निवालें अंतर ।
आणि दत्तात्रेय याचा लाधिला वर । परी सेवा आणुमात्र न सांडी ॥१०॥
पहिल्या परीस वाढविती नेमा । विशेष स्वामि कार्याचा प्रेमा ।
निरसोनि सकळ मोहभ्रमा । श्री पुरुषोत्तमा भजतसे ॥११॥
जेवीं ब्रह्मांडीं व्यापला प्रभंजन । परी न सांडीच चंचळपण ।
कां गंगा समुद्रासि मिळाली आपण । परी मागील धांवणें न राहे ॥१२॥
नातरि श्रीहरीस न करितां निश्चित । तदाकारचि जाहले भक्त ।
परी मर्यादा न सांडितीच सत्य । तैसीच स्थित एकनाथाची ॥१३॥
आत्मबोधें निघालें अंतर । आणि सद्गुरुचा लाधला वर ।
परी सेवेसि तिष्टे निरंतर । आळस अणुमात्र असेना ॥१४॥
तों जनार्दन मनीं विचारित । म्हणे याज ऐसा सद्गुरुभक्त ।
त्रिभुवनीं नसे सत्यसत्य । प्रेम अद्भुत पैं याचें ॥१५॥
करावया जगदुद्धार । श्रीपांडुरंगें घेतला अवतार ।
यासि सेवेसि ठेवितां साचार । मर्यादा अणुमात्र न राहे ॥१६॥
ऐसा विचार करोनि चित्तीं । मग एकनाथासि घरांत पाहती ।
तंव तो बैसोनि एकांतीं । श्रीदत्तकीर्ती गातसे ॥१७॥
जनार्दन दृष्टीस देखोन । उठोनि सद्भावें केलें नमन ।
तेव्हां सद्गुरु स्वस्थानीं बैसोन । देतां शिकवण एकनाथा ॥१८॥
सद्गुरु कृपेनें निश्चितीं । जाहलिया आत्मज्ञान प्राप्ती ।
तरी न सांडावी सगुणभक्ती । ही आठवण चित्तीं असोदे ॥१९॥
करोनि सकळ इंद्रियदमन । विषय विसरती योगीजन ।
परी तयासि नव्हेचि सगुण दर्शन । भक्ति वांचोन सर्वथा ॥२०॥
योगबळें आसन उडविती । नाना सिद्धीचे सोहळे दाविती ।
परी तयांसि न भेटेचि श्रीपती । सप्रेम भक्ति वांचोनियां ॥२१॥
आत्मवत मानील विश्वजन । आपणही विसरेल देह भान ।
परी सगुण मूर्तीचें न होय दर्शन । हें दुर्लभ जाण एकनाथा ॥२२॥
आपुला देह असे निश्चित । तोंवरी सगुणी असावी प्रीत ।
आतां तुजला सांगतों युक्त । ते देवोनि चित्त अवधारी ॥२३॥
देवगिरि पृष्ट प्रांत निश्चित । सुलभ नांवें असे एक पर्वत ।
सूर्यकुंड तीर्थ असे तेथ । स्थळ एकांत रमणीय तें ॥२४॥
ते स्थळीं जावोनि साधक जन । करित असती अनुष्ठान ।
तयासि साक्षात्कार येतसे पूर्ण । पुण्य पावन ते भूमी ॥२५॥
तरी आतां ऐकता प्राण सखया । ते स्थळीं जाय लवलाह्या ।
सूर्यकुंडीं स्नान करोनियां । श्रीपंढरीराया आठवी ॥२६॥
एकाग्र करोनियां मन । महाविष्णूचें करावें ध्यान ।
कोणासि न बोलावें वचन । आज्ञा प्रमाण आमुची ॥२७॥
आणि अवचित मिळेल जरी कांहीं । तरी ते सुखें भक्षित जायीं ।
आमुची खंती न करावी कांहीं । सन्निध ते ठायीं मी असें ॥२८॥
तें मार्कंडेय ऋषीचें असे स्थान । ऐसें पुराण प्रसिद्ध वचन।
तरी तेथें करावें श्रीकृष्ण ध्यान । सप्रेम मनें होवोनियां ॥२९॥
कांहीं अपूर्व पडतां दृष्टी । मग परतोनि यावें आमुच्या भेटी ।
ऐकोनि सद्गुरुची गोष्टी । आनंद पोटीं वाटला ॥३०॥
आधींच सच्छिष्य प्रेमळ जाण । आणि गुरुंनी सांगीतली उपासना ।
मग परमसंतोष वाटला मना । वंदोनि चरणां निघतसे ॥३१॥
वरकड गुरु ज्ञान सांगतीं । आणि सगुणभक्तांसि उच्छेदिती ।
जनार्दनाची तैसि स्थिती । नव्हे निश्चितीं सर्वथा ॥३२॥
भक्तिवीण जें कां ज्ञान । तें बाष्कळाचें जैसें भाषण ।
याचे विषयीं ऐका सज्जन । स्वामींचें वचन एक असे ॥३३॥
अभंग ॥ भक्तीचें उदरीं जन्मलें हें ज्ञान । ज्ञानासी महिमान भक्तिचेनी ॥१॥
भक्तीनें ज्ञानासी दीधलें महिमान । भक्ति मूळज्ञान वैराग्यातें ॥२॥
भक्तिवीण गवसती गाढें । मूळचि नाही जोडे फळ कैसें ॥३॥
एका जनार्दनी भक्तीयुक्त क्रिया । ब्रह्मज्ञान पाया लागे त्याच्या ॥४॥
ओवी । याजकरिता ऐका सज्जन । भक्ति उच्छेदोनि सांगतां ज्ञान ।
जो खंडितसे देव भक्तपण । अधम त्याहून श्रेष्ठ नसे ॥३४॥
धन्य सद्गुरु जनार्दन भला । कीं जनार्दनचि सगुण जाहला ।
जगदुद्धार करावया आला । ऐसे मजला भासतसे ॥३५॥
असो गुरुभक्तांची स्थिती सांगतां । मध्येंच लागली आडकथा ।
म्हणवोनि उबग मानिजे श्रोता । नावेक दृष्टांतां बोलिलों ॥३६॥
मग सद्गुरु आज्ञा होतांचि सत्वर । एकनाथें केला नमस्कार ।
जावोनि सुलभ पर्वतावर । वैष्णव वीर काय करी ॥३७॥
तें रमणीय स्थळ विलोकून । परम विश्रांति पावलें मन ।
मग सूर्यकुंडीं करोनि स्नान । नित्यनेम तेणें सारिला ॥३८॥
पूर्वाभिमुख बैसोनि तेथ । एकाग्र मन केलें निश्चित ।
पांडुरंगमूर्ति ध्यानासि आणित । सप्रेमयुक्त होवोनी ॥३९॥
आठवण करितांचि साचार । ध्यानीं प्रगटला इंदिरावर ।
वृत्ति जाहली तदाकार । भान अणुमात्र असेना ॥४०॥
तंव तया पर्वतावर निश्चित । महाभुजंग होता राहत ।
ध्यानस्थ देखोनि श्रीनाथा। धांवला त्वरित डसावया ॥४१॥
आंगासि वेढे घालतांचि तेणें । तो दुर्बुद्धि गेली देहांतून ।
अति लोभापर होऊन । करित संरक्षण कैशापरी ॥४२॥
शीत उष्ण बाधील त्यासी । यास्तव वेष्टित सर्वांगासी ।
पुच्छ ठेवोनि नाभीसी । मस्तकी फणा उभारित ॥४३॥
टाकोनियां तामसगुण । भुजंग धरी सात्विक लक्षण ।
बुद्धीचा पालट जाहला पूर्ण । होतांचि स्पर्शन संतांचें ॥४४॥
एकनाथ येतांचि देहावर । अंग हालतसे अणुमात्र ।
तों भुजंग निघोनि जाय सत्वर । न पडे साचार दृष्टीसी ॥४५॥
नामरुपीं जडतसे चित्त । यास्तव श्रीनाथ देहातीत ।
सर्प वेष्टित हें विदित । नाहीं निश्चित तयासी ॥४६॥
तंव त्या पर्वता तळवटीं देख । कुग्राम वाडी होती एक ।
तेथें वैष्णव राहतसे देख । कृषीवळ भाविक तो असे ॥४७॥
तो पूर्वजन्मींचा योगभ्रष्ट जाण । यास्तव करीतसे शुद्ध आचरण ।
द्वारीं तुळसी वृंदावन । सडा संमार्जन नित्य होय ॥४८॥
वस्त्रें पात्रें शुचिर्भूत जाण । स्नाना वांचोनि न सेवी अन्न ।
प्रपंच धंदा सारीत आपण । नामस्मरण करीतसे ॥४९॥
कांताही परम पतिव्रता । तया ऐसीच वर्ते तत्वतां ।
जाणोनि पतीच्या मनोगता । साधुसंता भजतसे ॥५०॥
क्षुधातुरासि घालिती अन्न । तृषाकांतासि पाजी जीवन ।
परोपकारी त्याचें मन । असत्य वचन न बोलती ॥५१॥
सुलभ पर्वतीं अनुष्ठानी । कोणी तपस्वी देखिला नयनीं ।
तयासि दूध पाजीतसे नेउनी । प्रीती करोनि आपुल्या ॥५२॥
पर्वता तळवटीं समीप जाण । शेत पेरिलें असे त्याणें ।
तेथें पीक आलें सधन । यास्तव राखण बैसला ॥५३॥
श्रीनाथ जातां अनुष्टानीं । तेव्हां त्याणें देखिलें नयनीं ।
मग निरसें दूध घरीं तापवोनी । गेला घेऊनि त्या ठायां ॥५४॥
तों ध्यान विसर्जन करोनि प्रीतीं । बैसले असती सहज स्थिती ।
कृषींवळें दंडवत करोनि तयाप्रती । मग काय विनंती करितसे ॥५५॥
दूध आणिलें असे तापवून । याचें स्वामीनीं करावें सेवन ।
अंतरींचा सद्भाव देखोन । करिती मान्य तयाचें ॥५६॥
भोक्ता श्रीकृष्ण म्हणवोनी । स्वहस्तें पात्र लावीत वदनीं ।
कृषीबळ संतोष पावोनि मनीं । आपुल्या स्थानीं तो गेला ॥५६॥
कांतेसि आज्ञा केली निश्चिती । ते नित्य दूध आणीतसे शेतीं ।
तें आधीं देवोनि नाथाप्रती । मग अन्न सेविती आपण ॥५७॥
जरी पूर्व पुण्या असेल ठेवा । तरीच संताची घडेल सेवा ।
तयाचा आभार पडतसे देवा । सोडवी भवार्णवा पासोनी ॥५८॥
संत सेवा करिती प्रीतीनें । तेणें संतोषे जगज्जीवन ।
याहोनि अधिक श्रेष्ठ साधन । नसेचि जाण सर्वथा ॥५९॥
कुणबी तो सभाग्य दैवाथिला । यास्तव सद्बुद्धि उमजे त्याला ।
प्रपंच करोनि परमार्थ साधिला । त्याच्या पुण्याला पार नाहीं ॥६०॥
एके दिवशीं त्याची जाया । अर्धरात्रीं उठली दळावया ।
देवावरी गावोनि ओव्या । दळण लवलाह्या सारिलें ॥६१॥
चंद्राचा प्रकाश पडतां निश्चित । तिला वाटे जाहली प्रभात ।
म्हणोनि स्वहस्तें गाई दुहित । वेगळ्या पात्रांत दुध ठेवी ॥६२॥
समय होतां साचार । दूधही निघाले बहुत फार ।
पितळेंचे पात्रीं तावितां सुंदर । घातला गोवर त्यावरी ॥६३॥
मग सडा संमार्जन करोनि सत्वरी । शीळोदकें स्नान करी।
पाक निष्पत्ति सारिली बरी । तों उदयासि तमारी पावला ॥६४॥
म्हणे दळावयासि उठलें सत्वर । तेव्हां रात्र होती फार ।
शेती जावयासि लावला उशीर । तरी निवेल साचार अन्न आतां ॥६५॥
ऐसें म्हणवोनि ते सुंदरी । भाकरीची पाटी घेतली शिंरीं ।
स्वहस्तें दुग्धाचें पात्र धरी । मग जात सत्वरी लगबगें ॥६६॥
शेतीचे पाळीस येता कामिनी । तों निजपतीनें देखिली नयनीं ।
हातिचें पात्र सत्वर घेऊनी । मग स्नानालागोनी तो गेला ॥६७॥
नित्यनेम नामस्मरन । करोनि कांतेसि बोले वचन ।
आजि सकाळ वेळीं आणिलें अन्न । याचें कारण मज सांग ॥६८॥
क्षुधा लागली नाहीं मजसी । नाहीं पर्वकाल द्वादशी ।
अनुष्ठानीं बैसलासे तापसी । त्याजविण अन्नासि भक्षूं नये ॥६९॥
कांता म्हणे मी जाहलें जागृत । तेव्हां बहुत होती रात ।
अन्न निवोनि जाईल निश्चित । यास्तव त्वरित पातलें ॥७०॥
तरी तुम्ही जावोनि पर्वतासी । दुग्ध पाजावें ब्राह्मणासी ।
मग करावें भोजनासी । ऐसें तयासी बोलिली ॥७१॥
मग पात्र घेऊनि निजकरी । गेला तेव्हां पर्वतावरी ।
तों अद्गुत चरित्र देखिलें नेत्रीं । तें सादर चतुरीं परिसिजे ॥७२॥
स्नान संध्या करोनि समस्त । अनुष्ठानीं बैसले एकनाथ ।
श्रीकृष्ण ध्यानीं जडलें चित्त । देहभान किंचित असेना ॥७३॥
महा भुजंग येऊनि आपण । सकळ शरीर वेष्टिलें जाण ।
नाभिस्थानीं पुच्छ ठेऊन । मस्तकीं फणा धरितसे ॥७४॥
हें कुणबियानें देखोनि नयनीं । परम भय उपजलें मनीं ।
म्हणे हा ब्राह्मण अनुष्ठानी । सर्पे वेष्टुनी धरियेला ॥७५॥
धांव सत्वरी पंढरीनाथा । तूं तरी यासि वांचवीं आतां ।
माझा उपाय न चाले सर्वथा । बळ बुद्धी वृथा ते गेली ॥७६॥
तापसियचें शरीर न चळे । बहुतेक डंखिला आहे काळें ।
माझें सेवाफळ निष्फळ गेलें । म्हणोनि तळमळ बहुत करी ॥७७॥
हांका आरोळया मारिल्या फार । परी सर्प सर्वथा न जाय दूर ।
मेला मेला रे द्विजवर । ऐसें उत्तर बोलतसे॥७८॥
पर्वतावरी एकांत स्थान । नाहीं मनुष्याचें आगमन ।
याचा शब्द ऐकतो कोण । परी प्राण पोषण करीतसे ॥७९॥
निदान जाणोनि तये क्षणीं । मग स्वमुखें करितसे शंखध्वनी ।
म्हणे अनाथनाथा चक्रपाणी । त्वरे करोनि पाव आतां ॥८०॥
ऐसा गलबला बहुत करितां । शब्द जाणवे एकनाथा ।
मग शरीरासि चळण होतां । भुजंग पळतां होय वेगीं ॥८१॥
मग सावध होऊनियां भलें । स्वहस्तें नेत्रासि उदक लाविलें ।
कुणबियासि म्हणती काय जाहलें । तें सत्वर वहिलें सांग मज ॥८२॥
दृष्टीसि देखिला होता सर्प । म्हणोनि शरीरीं सुटला कंप ।
मग सावध होऊनि आपोआप । पातला समीप ते समयीं ॥८३॥
सद्भावें करोनि नमस्कार । बोलत असे प्रति उत्तर ।
म्हणे आजि महाभुजंगें साचार । वेष्टिलें शरीर तुमचें॥८४॥
तो दृष्टिसि देखोनि साचार । चित्तीं भय उपजलें फार ।
मग शंखानाद केला थोर । यास्तव विखार पळाला ॥८५॥
स्वामीचा निश्चय देवा पायीं । यास्तव वांचला तये समयीं ।
काळ आला परी वेळ नाहीं । ऐसेंचि जीवीं वाटतें ॥८६॥
ऐसें कृषीवळाचें वचन । ऐकोनि अभंग बोलिले आपण ।
तो ग्रंथीं लिहितों निजप्रीती करुन । तरी करावा श्रवण भाविक हो ॥८७॥
अभंग ॥ आम्हां डंखू आला काळ । तोचि जाहला कृपाळ ॥१॥
भली ओळखी झाली आत्तां । चित्त मीनलेसे चिंत्ता ॥२॥
देही फिटला देह भावो । तेथें काळचि झाला वावो ॥३॥
एका जनार्दनाचें पायीं । जिण्या मरणा सौरस नाहीं ॥४॥
ओव्या ॥ इतुकें वचन बोलोनि प्रीतीं । लाविलीं दोन्ही नेत्र पातीं ।
हृदयीं चिंतिली पांडुरंग मूर्ती । सप्रेम चित्तीं होऊनियां ॥८८॥
म्हणे क्षीराब्धीवासा शेषशयना । इंदिरावरा मनमोहना ।
अंतरसाक्षा चैतन्यघना । जगज्जीवना श्रीहरी ॥८९॥
जयजयाजी वैकुंठपती । अनंत अपार तुझी कीर्ती ।
महिमा वर्णितां क्षीणल्या श्रुतीं । कुंठित मती सकलांच्या ॥९०॥
तूं तरी अजअजित अव्यय । मायातीत निरामय ।
शहाणपण धरितां पाहे । तरी तुझा ठाव न पविजे ॥९१॥
ऐसा तूं देवाधिदेव । नाम जपतां निवाला शिव ।
तुवांच विश्व व्यापिलें सर्व । परी धरावयासि ठाव असेना ॥९२॥
परी निजभक्ताच्या कैवारें साचार । घेतला चतुर्भुज अवतार ।
ते देखावयालागीं सत्वर । माझे नेत्र भुकेले ॥९३॥
ऐसी ऐकोनियां स्तुती । तेथें प्रगटले रुक्मिणीपती ।
चतुर्भुज सांवळी मूर्ती । शंख चक्र हातीं मंडित ॥९४॥
श्रीमुख साजिरें मनोहर । कानीं कुंडलें मकराकार ।
कंठीं कौस्तुभ झळके सुंदर । दिव्य पीतांबर झळकतसे ॥९५॥
सोनसळा वैजयंती । हृदयीं त्रिवळी विराजती ।
क्षुद्र घंटिका डोल देती । पाहतां विश्रांती होय जीवां ॥९६॥
सर्वांगी चर्चिला चंदन । केशरी टिळक रेखिला पूर्ण ।
कोमळ तुळसी विराजमान । श्रीवत्सलांछन तें हृदयीं ॥९७॥
दिव्य तेज तये वेळें । उणे दिसतें रवि मंडळ ।
श्रीनाथ पहातां उघडोनि डोळे । तो परब्रह्म सांवळे पुढें असे ॥९८॥
सप्रेम भाव धरोनि पोटीं । चरणीं सद्भावें घातली मिठी ।
आलिंगनि देवोनि जगजेठी । नाथासि पोटीं धरियेलें ॥९९॥
मग आसनी बैसवोनि देवराया । मानसोपचारे पूजिलें तया ।
म्हणे निजकृपेची करोनि छाया । मनोरथा माझिया पुरविलें ॥१००॥
देवभक्तांच्या झाल्या भेटी । हे कृपाबळानें सांग पाहिले दृष्टीं ।
परमानंद वाटला पोटीं । म्हणे मी एक सृष्टीं दैवाचा ॥१॥
ऐसें म्हणवोनि ते अवसरी । वारंवार नमस्कार करी ।
तो एकनाथासी पुसोनी सत्वरीं । अंतर्धान श्रीहरी पावले ॥२॥
निजभक्तांचें हृदय भुवन । तेथें सुखावलें जगज्जीवन ।
ऐसें देखोनि कुणबियानें । सद्भावे नमन करितसे ॥३॥
म्हणे स्वामीच्या या संगतीनें निश्चितीं । म्यां दृष्टी देखिलें वैकुंठपती ।
येर्हवी तरि मी हीन याती । मूढमती पैं असें ॥४॥
करावया जगदुद्धार । संतीं घेतला अवतार ।
हा मज आला चमत्कार । वारंवार स्तुति करी ॥५॥
मग दुग्धाचें पात्र घेवोनि हातीं । श्रीनाथासि करीतसे ग्लांती ।
याचे सेवन सद्गुरुमूर्ती । माझी आर्ती हे असे ॥६॥
शुद्ध भावार्थ देखोनि जाण । त्याचें दुग्ध केलें प्राशन ।
नेत्र संकेतें सांगती खुण । घरासि जाणे सत्वर पैं ॥७॥
कृषीवळे प्रदक्षिणा करोनि । साष्टांग नमस्कार घातला धरणीं ।
परम लाभ मानोनि मनीं । आपुल्या स्थानीं तो गेला ॥८॥
श्रीनाथ हाचि परब्रह्म मूर्ती । ऐसा निश्चय बानला चित्तीं ।
चरित्र जाहले तो निश्चिती । कांते प्रती निवदिलें ॥९॥
इकडे दोन प्रहर आला दिनकर । यास्तव उष्ण जाहलें तीव्र ।
मग वटच्छायेसि सत्वर । घटिका चार बैसले ॥१०॥
उष्ण टाळिले ते ठिकाणीं । तो जनार्दन आज्ञा आठवली मनीं ।
कीं कांही अपूर्व देखिलें नयनीं । तरी यावें परतोनी मजपासीं ॥११॥
सद्गुरुकृपेने साचार । जाहला सगुण साक्षात्कार ।
तरी याहूनि नवल नसेचि दूसरे । लाभ थोर घडला कीं ॥१२॥
ऐसें समजोनियां चित्तीं । नमन केलें सत्वरगतीं ।
मग येऊनि देवगिरी प्रती । सद्गुरु मूर्तीप्रती भेटले ॥१३॥
करोनियां साष्टांग नमन । प्रीतीनें दीधलें आलिंगन ।
जनार्दनासि कळली खुण । म्हणे पालटलें चिन्ह दिसताहें ॥१४॥
सद्गुरु पुसता वृत्तांत । सांगितला सकळ गुह्यार्थ ।
म्हणे स्वामीकृपेनें निश्चित । अप्राप्य प्राप्त तें झालें ॥१५॥
तंव एके दिवसीं जनार्दन । एकनाथासि बोलती वचन ।
मज चित्तीं हेत उपजला पूर्ण। कीं गंगास्नान करावें ॥१७॥
सुमुहूर्त पाहोनि एके दिनीं । जनार्दन चालिले तीर्थाटणीं ।
नाथासि बैसावया अश्विनी । दिधली नेमूनी एक तेव्हां ॥१८॥
अश्व एक पडताळासी । एक वहन आपणासी ।
आचारी ब्राह्मण नेमणूक ऐसी । घेवोनि त्वरेंसी निघालें ॥१९॥
जेथें रमणीय स्थळ निश्चितीं । तये ठायीं वस्तीस राहती ।
आत्मचर्चा संतोष युक्ती । संवाद करिती परस्परें ॥२०॥
जये ठायीं साधुसंत । त्या ठायीं बहुतचि प्रीत ।
तेथें संतोषें क्रमिती रात। धन्य म्हणत सुदिन हा ॥२१॥
ऐसा पंथ क्रमिती फार । तंव एक ग्राम लागलें थोर ।
ते स्थळीं चंद्रभट द्विजवर। वैष्णव वीर पैं होता ॥२२॥
त्याची सत्कीर्ति ऐकोनि श्रवणी । गुरु शिष्य संतोषयुक्त मनीं ।
मग अस्तमानासि जातां तरणीं । उतरले सदनीं तयाचें ॥२३॥
चंद्रभटे देखोनि वैष्णववीर । केला तयाचा सन्मान आदर ।
नमन करोनि परस्पर । भेटले सत्वर तेधवां ॥२४॥
चंद्रभट नामा विरक्त ब्राह्मण । कुटुंबी असोनि निराश मन ।
अयाचित वृत्ति करोन । योग निर्विघ्न चालवी॥२५॥
कायिक वाचिक मानसिक केवळ । तपें आचरें सर्वकाळ ।
ज्याच्या वाचेसि असत्य मळ । याचा विटाळ स्पर्शेना ॥२६॥
स्नान संध्या देवतार्चन । परोपकारी वेंचितसे प्राण ।
आत्मवत मानीं अवघे जन । दया संपूर्ण सर्वांभूतीं ॥२७॥
संसार पाश तुटावया निश्चितीं । सर्वदा इच्छित सत्संगती ।
म्हणे कधी आतां उगवेल गुंती । चित्तीं विरक्ति बाणली ॥२८॥
ऐसा तो चंद्रभट ब्राह्मण । निराश उदासीन विरक्त मन ।
तयासि एकनाथ जनार्दन । निजप्रीतीनें भेटले ॥२९॥
सायंकाळ संध्या करोनि सत्वर । मग ते करिती उपहार ।
तों एकांती बैसोनि द्विजवर । पुस्तक सत्वर सोडिलें ॥३०॥
चतुःश्लोकि भागवत निर्धारीं । ब्रह्मयासि उपदेशित श्रीहरी ।
चंद्रभट त्याची व्याख्या करी । अर्थांतरीं विवरोनियां ॥३१॥
मग एकनाथ आणि जनार्दन । तया समीप बैसती येऊन ।
म्हणती धन्य आजिचा सुदिन । जाहले दर्शन संताचे ॥३२॥
प्रेमळ श्रोते सर्वज्ञ निपुण । मिळतां उल्हासे त्याचें मन ।
अर्थ सांगतसे प्रांजळ करुन । ऐकतांचि मन वेधतसे ॥३३॥
अनुभवा घ्या गोष्टी सांगत । कंठ होतसे सद्गदित ।
प्रेमे नेत्रीं अश्रु वाहत । विदेह स्थित तिघांची ॥३४॥
मजला वाटतसे साचार । कीं ब्रह्मा विष्णु महेश्वर ।
तिन्ही मिळाले एकत्र । तैसा विचार तो झाला ॥३५॥
नातरी गंगा यमुना सरस्वती । एकत्र होवोनि जैशा वाहती ।
तैसीच तिघांची जडली प्रीती । स्वानंदें रात्री क्रमितसे ॥३६॥
पुस्तक समाप्त झालीया पाहीं । मग निद्रेसि मान देती कांहीं ।
यांची संगती सर्वदा असावी । हा हत जीवीं उभयतां ॥३७॥
कर्म उपासना आणि ज्ञान । तिहीं शास्त्री असे निपुण ।
ऐसे एकनाथ जनार्दन । बोलती वचन परस्परें ॥३८॥
असो या परी क्रमीली राती । सकाळ उठोनि प्रयाण करिती ।
तो चंद्रभट येऊनि करितसे ग्लांती । म्हणे माझी विनंती अवधारा ॥३९॥
स्नान संध्या संपादून । माझा आश्रम पवित्र करणें ।
ऐसा सद्भाव देखोनि पूर्ण । मग जनार्दन अवश्य म्हणे ॥४०॥
मंदिरी करुनियां पाक निष्पत्ती । मग नित्यनेम अवघा सारिती ।
नैवेद्य वैश्वदेव करोनि प्रीतीं । भोजना प्रती बैसलें ॥४१॥
एकनाथ आणि जनार्दन । आणि चंद्रभट गृहस्वामी पूर्ण ।
एके पंक्तीस भोजन करुन । मग मनुष्यांसि अन्न देवविलें ॥४२॥
मुखशुद्धि तांबूल देऊनी । विनंति करितसे तये क्षणी ।
तुमची संगती असावी निशिदिनी । ऐसा हेत मनीं उपजला ॥४३॥
तंव जनार्दन देती प्रत्युत्तर । ऐसेंचि आमुचे चित्तांतर ।
कांहीं संकोच न करोनि अंतर । बरोबर चलावें ॥४४॥
चंद्रभटासि आनंद चित्तीं । म्हणे बरी लाधला सत्संगती ।
शांति विरक्ती समवेत ॥४५॥
भजन करीतसे प्रेमयुक्ती । स्वछेनें पंथ क्रमिती ।
चतुःश्र्लोकांचा अर्थ करिती । स्वानंद होतसे चित्तीं ॥४६॥
साधुसंत योगेश्वर । कोणी भेटती मार्गावर ।
त्यांचे ठायी प्रीत थोर । अध्यात्म उत्तर बोलती ॥४७॥
ऐशा रीतीं क्रमितां पंथ । पंचवटीस आले त्वरित ।
रामकुंडी स्नान करित । अनुताप युक्त ते समयी ॥४८॥
तीर्थविधि यथास्थिती । करोनियां बिर्हाडीं येती ।
श्रीरामचंद्राच्या दर्शना जातीं । अनन्य प्रीती करोनियां ॥४९॥
पूजा करोनि यथोपचार । स्तुतिस्तोत्रें बोलती फार ।
आन्न शांती करोनि साचार । धरामर तोषविले ॥१५०॥
तंव जनार्दन म्हणती एकनाथा । सांगतो वचन ऐक आतां ।
श्रीदत्त वरद तुझीया माथा । लाधला अवचितां निजभाग्यें ॥५१॥
चतुःलोकी जे भागवत । चंद्रभाटें आणिलेसे सांगाते ।
याजवरी टीका करी प्राकृत । प्रांजळ बहुत ये स्थानीं ॥५२॥
ऐकोनि सद्गुरुची वचनोक्ति । परमसंतोष जाहला चित्तीं ।
ते हां ग्रंथासि आरंभ करिती। सप्रेम गती करोनियां ॥५३॥
आधी श्र्लोक लिहूनि साचार । अर्थ बोलती तयावर ।
ग्रंथ सिद्धीसि गेलियावर । श्रीगुरुसि सत्वर दाखविला ॥५४॥
चंद्रभट आणि जनार्दन । आणिक क्षेत्रवासी थोर ब्राह्मण ।
ऐकोनि ग्रंथाचें पारायण । समाधान पावले ॥५५॥
ग्रंथाप्रारंभीं एकनाथ । चतुःश्लोकी जे भागवत ।
त्यावरी टीका केली प्राकृत । मग सद्गुरु बोलत काय तेव्हां ॥५६॥
श्रीएकादश स्कंधावरी जाण । तुझेनि मुखें प्राकृत लेण ।
साह्य होऊनियां श्रीकृष्ण । अर्थ संपूर्ण बोलविल॥५७॥
ऐसे वदतां जनार्दन । एकनाथ करितसे नमन ।
मग चतुःश्लोकीची टीका घेऊन । करितसे पारायण चंद्रभट ॥५८॥
कर्म उपासना आणि ज्ञान । त्याचे आंगीं असे चिन्ह ।
परी श्रीनाथें केलें प्राकृत लेण । त्याच्या नित्य नेम जाण धरियेला ॥५९॥
चंद्रभटाचा सद्भाव थोर । म्हणे हे गुरुशिष्य साचार ।
करावया जगदुद्धार । हरिशंकर अवतरले ॥१६०॥
जनार्दन हा कैलासपति । एकनाथ साक्षात् विष्णुमूर्ती ।
ऐसा सद्भाव धरोनि चित्तीं । करितसे स्तुति सर्वदा ॥६१॥
ऐकोनि क्षेत्रवासी ब्राह्मण । अवघेचि म्हणती धन्य धन्य ।
पुढें त्र्यंबकेश्वरी जाउन । केली स्नानें कुशावर्ती ॥६२॥
सव्य घालोनि ब्रह्मगिरी । मग पाहिला त्रिपुरारी ।
ऐसा तीर्थ विधि करोनि सत्वरी । ते स्थळीं त्रिरात्री राहिले ॥६३॥
इतुकी यात्रा करुनि जाण । मग देवगिरीस चालिले परतोन ।
परी चंद्रभटाचें उदास मन । गृह आशा तेणे सोडिली ॥६४॥
कांता पुत्र गृह वित्त । आधींच कंठाळलें होतें चित्त ।
म्हणवोनि न सोडी संगत । मग देवगिरीस येत समागमें ॥६५॥
जनार्दनपंत पातले सदनीं । संतर्पण केलें दुसरें दिनीं ।
जिव्हा रंगली नामस्मरणीं । सप्रेम मनीं सर्वदा ॥६६॥
चंद्रभटाच्या सद्भाव चित्तीं । म्हणे एकनाथ हा अवतार मुर्त्ती ।
वय लहान याची आकृति । परी विशाळ मती वक्तृत्वें ॥६७॥
याची संगतीं साचार । न सोडावीं जन्मवर ।
ऐसा निश्चय करोनि थोंर । राहे निरंतर तें ठायी ॥६८॥
बहुत दिवस लोटती तेथ । मग तो पावला विदेह स्थित ।
जनार्दन रुपें विश्व भासत । आपणही तयांत समावे ॥६९॥
मी माझें देह निश्चितीं । तैसी मनांत नाठवे स्फूर्ती ।
सत्कर्म राहिलें सहज स्थिती । आत्मवत जगत भासे तया ॥१७०॥
पूर्ण बोध ठसावला जाण । यास्तव पालटे नामाभिधान ।
चांद बोधला त्याजकारणें । सर्वत्र जन बोलती ॥७१॥
कांहीं दिवस लोटतां ऐसे । मग जनार्दनासि स्वमुखें पुसे ।
आता हेत उपजला असे । कीं समाधीस बैसावें ॥७२॥
त्याचे मनोगत जाणोनि पाहीं । समाधीस बैसविला विदेही ।
परी यवन उपद्रव करतील कांहीं । मग एक युक्ति तिहीं योजिली ॥७३॥
जैसें अविंधाची मदार जाण । तसैच वर रचिलें स्थान ।
हिंदु आणि ते यवन । समाधान पावले ॥७४॥
देवगिरीच्या पर्वतावर । तें स्थापन आहे अद्यापवर ।
होतसे नाना चमत्कार । देखती सर्व दृष्टीसीं ॥७५॥
तों जनार्दनपंत एके दिनीं । विचार करिती आपुलें मनीं ।
एकोबासि धाडावें तीर्थाटणीं । तेणें होईल अवनी पवित्र हे ॥७६॥
मग नाथास समीप बोलावून । एकांतीं म्हणती ऐक वचन ।
तेव्हां विनय मस्तक चरणीं ठेवून । स्वमूखें स्तवन करीतसे ॥७७॥
म्हणे जय जयाजी जनार्दना । मायातीता निष्कलंक निर्गुणा ।
मी तरी लडिवाळ तुझा तान्हा । अद्भुत महिमा काय जाणों ॥७८॥
श्रुति शास्त्रें तुज वर्णिती । तयांच्या कुंठित जाहल्या मती ।
खुंटल्या सकळ पुराण व्युत्पत्ती । परी तुझी सत्कीर्ती पूर्ण नव्हे ॥७९॥
तुझा स्तव करितां देवाधिदेवा । कुंठित जाहला चक्षुःश्रवा ।
दुखंड जाहल्या त्याच्या जिव्हा । आमुचा हेवा तो किती ॥१८०॥
ऐसा जो कां भोगि नायक । होऊनि राहे तुझा कल्पक ।
तुज अंगावरी निजवोनी कौतुक । सप्रेम सुख भोगितसे ॥८१॥
सृष्टिकर्ता जो चतुरानन । तुझा महिमा नेणोनि त्यानें ।
मग स्वयें केलें वत्सा हरण । तेव्हां अद्भुत विंदान दाविलें ॥८२॥
गाई गोपाळ वत्सें निर्धारी । तुवा निर्माण केली दुसरी ।
मग चतुर्मुखें ब्रह्मा स्तवन करी । शरण निर्धारी तुज आला ॥८३॥
तुझिया सत्तेनें निर्धारी । इंद्रियें राहाटती निज शरीरी ।
उत्तीर्ण व्हावें कैशा परी । पदार्थ पदरी एक न दिसे ॥८४॥
चराचर जे दृष्टीस भासत । मी तुजचि देखें तयात ।
इतुकेनि हे मन निश्चित । पावलें विश्रांत सर्वदा ॥८५॥
ऐसे स्तवन करोनि पाहीं । सद्भावें मस्तक ठेविला पायीं ।
म्हणे आज्ञा कराल तीये समयीं । धरीन जीवीं सर्वस्वें ॥८६॥
एकनाथाची अमृत वचनें । ऐकोनि जनार्दन संतोष मनें ।
म्हणती पृथ्वीचीं तीर्थें संपूर्ण । येई पाहोन एकदां ॥८७॥
कोठें रहावें त्रिरात्र । वचनें कोठें असावें पंचरात्र ।
दृष्टीसि देखिल्या भगवत्पर । तयांसि नमस्कार करावा ॥८८॥
तीर्थाटणाच्या मिषें करुन । होईल संतांचें दर्शन ।
तुझा योगक्षेम जाण । स्वयें श्रीकृष्ण चालवील ॥८९॥
बदरीनाथपर्यंत जाऊनी । उत्तरमानस पाहावें नयनीं ।
दक्षिणरामेश्वर विलोकुनी । येई परतोनी मजपासी ॥१९०॥
ऐकोनि सद्गुरुची वचनोक्ति । सरसी उद्भवली हर्षखंती ।
ते म्हणाल जरी कैशा रीतीं । तरी तेही रीती अवधारा ॥९१॥
होतील संतांचीं दर्शनें । यास्तव हर्ष वाटला मनें ।
परी सद्गरुची सगुण दर्शनें । अंतरली म्हणोन खंतावे ॥९२॥
मग घरीं निपजोनि पक्वान्न । एके पंक्तीस केलें भोजन ।
मुख शुद्धि विडे घेऊन । समाधान पावले ॥९३॥
श्रीनाथ जेव्हां तीर्थासि जात । जनार्दन चालिले बोळवित ।
जैसी अबला सासर्याची जात । ते होय सद्गदित ते समयीं ॥९४॥
मार्गी अरण्यांत जावोनि पाहीं । मस्तक ठेविलें सद्गुरुपायी ।
म्हणे आतां कृपा असों द्यावी । घातली डोई पोटांत ॥९५॥
कंठ जाहला सद्गदित । सप्रेम नेत्रीं अश्रु वाहत ।
सद्गुरुसि ऐसी अवस्था होत । प्रेम नावरत सर्वथा ॥९६॥
जनार्दन म्हणती ते समयीं । मी तर सर्व काळ तुझें हृदयीं ।
तुझा माझा वियोग नाहीं । हा आठव जिवीं धरावा ॥९७॥
तूं तरी माझा आत्माचि जाण । आतां सांडोनि द्वैतभान ।
वियोगें शीण न धरावा ॥९८॥
मन आपुल्या शीरींची कोचकी । घातली नाथाचे मस्तकीं ।
महाप्रसाद येतांचि कौतुकी । सप्रेम हरिखें बोसंडे ॥९९॥
मग श्रीनाथ विनंती करीत सहज । पुन्हा दर्शन द्यावें मज ।
जाणोनि अंतरीचे गुज । सद्गुरुराज अवश्य म्हणे ॥२००॥
मग जनार्दनासि प्रदक्षिणा करुन । नमस्कार घालीत प्रीतीं करुन ।
सगुण स्वरुप आठवोनि ध्यान । त्वरें करुन चालिले ॥१॥
मार्गीं चालती लवलाहें । क्षणक्षणां परतोनि पाहे ।
पुन्हां पुन्हां दंडवत घालीत आहे । दिसो राहे तों वरी ॥२॥
जयजय जनार्दन म्हणवोनी । पुढें चालिले त्वरें करुनी ।
यापरी नाथासि बोलवोनी । सद्गुरु सदनीं मग आले ॥३॥
श्रीनाथाचें सद्गुण लक्षण । घडीघडी आठवीतसे मन ।
सद्गुरुसि खंती वाटतसे पूर्ण । न पडे चैन सर्वथा ॥४॥
संत ते साक्षात पांडुरंगमूर्ती । त्याची कवणा वदवेल स्थिती ।
तेथें वल्गना करीं मी मूढमती । हा अपराध निश्चित दिसतसे ॥५॥
परी आवडीचे नियोगें साचार । वेडीं वांकुडी वदतो अक्षरें ।
याचा कर्ता श्रीरुक्मिणीवर । भीमातीर विहारी जो ॥६॥
तो पांडुरंग माया लाघवी । आपुलीं चरित्रें आपण वदवी ।
महीपतीवरी निमित्त ठेवी । नव्हेचि कवी ग्रंथकर्ता ॥७॥
स्वस्ति श्री भक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।
प्रेमळ परिसोत भाविक भक्त । चतुर्दशाध्याय रसाळ हा ॥२०८॥
अ० ॥१४॥ओ० ॥२०८॥ अभंग ॥१७॥ एकुण ओव्या ॥२२५॥ ॥६॥