मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ४९

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

अनंत अपार घनसावळां । असंख्यात असती त्याच्या लीला ।

ज्याच्या रोमरंघ्रीं सकळा । ब्रह्मांड माळा सांठती ॥१॥

चंद्र आणि रविमंडळ । हें जयाचें नेत्र युगुळ ।

एकवीस स्वर्ग सप्त पाताळ । यांहोनि विशाळ जगदात्मा ॥२॥

वेदत्रयांचा घोर जाण । विधाता बाळक निपजलें सान ।

चराचर अवघेंचि निर्मिलें त्याणें । परीपार नेणें श्रीहरीचा ॥३॥

हें विराटस्वरूप आणितां ध्यानीं । तरी निजभक्तासि नकळेचि मनीं ।

मग पंढरीसि सगुणरूप धरोनी । कैवल्यदानी उभा असे ॥४॥

ठाण साजिरें सुकुमार । समपद ठेविले विटेवर ।

जघनीं शोभती दोन्हीकर । श्रीमुख मनोहर जयाचें ॥५॥

भाविक प्रेमळ देखोनी दृष्टीं । तयांसि तत्काळ देतसे भेटी ।

तुळसी माळा शोभती कंठीं । नासाग्रीं दृष्टी धरियेली ॥६॥

हा पुंडलीकें थोर उपकार केला । भूतळामाजी देव आणिला ।

विठ्ठल नाम ठेविलें त्याला । विश्वोध्दार जाहला यास्तव ॥७॥

मागिले अध्यायीं कथा सुंदर । परमभक्त विठ्ठल पुरंदर ।

देवें त्यासि घेवोनि खांद्यावर । पंढरपुर दाखविलें ॥८॥

आतां नरसिंह सरस्वती महासंत । तो दत्तात्रेय अंश मूर्तिमंत ।

विश्वोध्दार करावया सत्य । अवतरे निश्चित नररूपें ॥९॥

साक्षर एक होता ब्राह्मण । तयासि नव्हतें पुत्रसंतान ।

त्याच्या पोटीं अत्रिनंदन । पूर्वपुण्यें अवतरले ॥१०॥

पुत्रसुख पाहतां नयनी । विप्रसंतोष पावला मनीं ।

स्वरूपें सुंदर सुलक्षणीं । देखोनि जननी सुखावे ॥११॥

बारा दिवस लोटतां जाण । नरसिंह ठेविलें नामाभिधान ।

पांचवे वर्षी व्रतबंध करून । तयासि अध्ययन सांगती ॥१२॥

एकदा ग्रंथ विलोकित । तो तयासि होय मुखोद्गत ।

देखोनि ब्राह्मण आश्चर्य करित । विशाळ म्हणत बुध्दि याची ॥१३॥

एक म्हणती अंगिरानंदन । लीलावतारी जाहला सगुण ।

एक म्हणती द्वैपायन । आम्हां कारणें भासत ॥१४॥

त्याच्या साम्यतेसि निश्चितीं । दुसरा ब्राह्मण न दिसेचि क्षितीं ।

जिव्हाग्रीं बैसली सरस्वती । नांव ठेविती तेंचि मग ॥१५॥

नरसिंह सरस्वती म्हणवोनी । नामाभिधान बोलती जनीं ।

पितयासि संतोष वाटे मनीं । प्रज्ञा देखोनी पुत्राची ॥१६॥

आठा वरुषांत येतांचि जाण । वेदवेदांतीं दिसे निपुण ।

मुखोद्गत सकळ पुराणें । जैसा अपसूर्य ब्राह्मण दिसतसे ॥१७॥

मातापितयांचि नधरीच आर्ती । सर्वकाळ विदेहस्थिती ।

भजन करी एकांतीं । अरण्यपंथीं जावोनियां ॥१८॥

हास्यविनोद कोणाप्रती । मुखें न बोले वचनोक्ती ।

क्षुधातृषेची करी न आर्ती । निर्विषय मती तयाची ॥१९॥

ऎसीं चिन्हें त्याचीं उमटतां । चिंतातुर मातापिता ।

म्हणती पुत्र जाहला नवस करितां । परी विदेही अवस्था तयाची ॥२०॥

अरण्यांत जावोनि एकांतीं । बैसत असे अहोरात्रीं ।

लग्न करावें कैशा रीतीं । विपरीत स्थिती दिसतसे ॥२१॥

नवस सायास करितां फार । देवें आपणासि दीधला पुत्र ।

त्याचें विपरीत दिसे चरित्र । कैसा विचार करावा ॥२२॥

तंव कोणें एके दिवसीं जाण । स्वमुखें पितापुत्रासि म्हणे ।

तूं एकांतीं बैसतोसि जाऊन । न घालिसी मन संसारीं ॥२३॥

तों पुत्र उत्तर देतसे देखा । संसार शब्द हाचि लटिका ।

जेवीं वाझेचिया लेकां । जन्मपत्रिका तें कैंची ॥२४॥

का मृगजळाचा दिसे समुद्र । तयावरुते जहाज फिरे ।

स्वप्नींचें धन साचार । सांठविलें त्यामाजी ॥२५॥

तेवीं संसारशब्द मित्थामय । याची क्षीत मानितोसि काय ।

तुं आत्मस्वरूप विचारूनि पाहे । तेणें सार्थक होय जन्माचें ॥२६॥

ऎसी नरसिंहसरस्वती । पितयासि बोले वचनोक्ती ।

परी तें नये त्याच्या चित्तीं । पडिली भ्रांती देहलोभें ॥२७॥

आंधळ्यासि आरसा दाखवितां देख । तयासि न दिसे आपुलें मुख ।

कां बधिरासि गायनाचें सुख । वाटेल नावेक कैसेनी ॥२८॥

तेवीं योगमायेचें पडळ जाण । जयाच्या नेत्रासि बैसलें ढांपण ।

तयासि नावडे आत्मसाधन । प्रपंचीं निमग्न सर्वदा ॥२९॥

याची स्थिती देखोनी ऎसी । मग पुत्र म्हणतसे पितयासी ।

आतां आज्ञा द्यावी मजसी । वाराणसीसी जावया ॥३०॥

ऎकोनी पुत्राचें उदास वचन । अश्रुपातें भरले लोचन ।

म्हणे आम्हांसि नसतां संतान । जातेसि टाकोन कैशारीतीं ॥३१॥

दुसरा पुत्र असता जर । तरी तुज आज्ञा देतों सत्वर ।

वार्धकदशा आली फार । कंठूं संसार कैशा रीतीं ॥३२॥

ऎकोनि पितयाचें उत्तर । काय बोले योगेश्वर ।

तुम्हांसि दोन होतील पुत्र । चिंता अनुमात्र करू नका ॥३३॥

आणिक एक कन्या सुलक्षणी थोर । सुशीळ आणि परमपवित्र ।

करील वंशाचा उध्दार । सत्य उत्तर हें माझें ॥३४॥

ऎसा वर वदोनि त्यांसी । नमस्कारी मातापितयासी ।

मग तो जावोनि वाराणसीं । झाला संन्यासी श्रीपाद ॥३५॥

सांडोनि दंडकमंडलूस । तत्काळ जाहला परमहंस ।

क्षेत्रवासी मान्य करिती त्यास । प्रज्ञा विशेष देखोनी ॥३६॥

त्याचें दर्शन होतांचि देख । भक्तीसि लागती संसारिक ।

दैवी संपत्तीनें वर्तती लोक । गुण सात्विक होय त्यांचा ॥३७॥

आणिक वैराग्यशीळ ज्ञानी विरक्त । शिष्य जाहले तीन शत ।

एक संवत्सर राहिले तेथ । प्रतिष्ठा बहुत वाढली ॥३८॥

यास्तव उदास होऊनि मनें । मग स्वदेशासि येती परतोन ।

जो अनन्यभावें येतसे शरण । तरी अनुग्रह देणें तयासीं ॥३९॥

ऎसे संप्रदायी जाहले बहुत । गणती पाहतां शतें सात ।

सवें घेवोनि तितुकियांत । स्वदेशांत मग आले ॥४०॥

थोर बंड माजलें निश्चिती । दर्शनासि लोक दुरून येती ।

बहुतांजनांसि लाविली भक्ती । पुण्यमूर्ती ते झाले ॥४१॥

अष्टसिध्दि सकळ दासी । इच्छिले पदार्थ अनुकूळ त्यासी ।

परी दुर्वळें पाचारिता भिक्षेसी । त्याच्या आर्तीसी पुरवितसे ॥४२॥

ऎशा रीतीं क्रमितां पंथ । गाणगापुरासि आले त्वरित ।

मग सकळ शिष्यांसमवेत । वास्तव्य तेथें पैं केलें ॥४३॥

तेथें अमरजा गंगा वाहे जाण । तिच्या तीरीं करिती स्नान ।

दर्शनासि दुरूनि येती जन । अद्भुत महिमान वाढलें ॥४४॥

तंव क्षेत्रवासी धरामर । महापंडित वैदिक विप्र ।

स्वामीचा महिमा ऎकोनि थोर । वारंवार निंदिती ॥४५॥

म्हणती गृहस्थाश्रम केलियाविण । त्यानें घेतलें संन्यासग्रहण ।

आणि दंड बहिर्वासही टाकून । जनांत नग्न फिरताती ॥४६॥

सकळ धर्म त्यजिला पर । अन्न लागतें गोळाभर ।

अवघे मिळोनि धरामर । म्हणती पुसावें सत्वर तयासी ॥४७॥

स्वामींचे करावया छळण । चालिले पांचशत ब्राह्मण ।

तों देवें कौतुक मांडिलें पूर्ण । अद्भुत प्रभंजन सोडिला ॥४८॥

धुळी उडतांचि निराळीं । कोणासि शुध्दि नाहीं राहिली ।

अवघींच वस्त्रें उडोनि गेली । नग्न जाहले दिगंबर ॥४९॥

पांचशत होते ब्राह्मण । तितुकेही अवघे दिसती नग्न ।

एकाकडे एक पाहून । लज्जायमान ते होती ॥५०॥

वृध्द तरुणवय निश्चिती । आपुल्या हातें लिंगें झांकिती ।

कोणी न हांसे कोणाप्रती । एकचि गती सकळांची ॥५१॥

ऎसा चमत्कार देखोन । मग पश्चाताप जाहला सकळांकारणें ।

म्हणे स्वामींसि निंदिलें आपण । त्याचें कारण हें दिसे ॥५२॥

आतां परतोनि जातां घरासी । तरी आपुल्यास हांसती क्षेत्रवासी ।

म्हणतील कोणें नागविलें तुम्हांसी । तरी काय तयांसी सांगावें ॥५३॥

कर्माची विचित्र गति जाण । लोकांत जाहलें लाजिरवाणें ।

एक म्हणती सांडोनि अभिमान । स्वामीसि शरण जाऊं आतां ॥५४॥

जेथें नरसिंह सरस्वती । तेथें पातले सत्वर गती ।

परम सद्भाव धरोनि चित्तीं । स्वमुखें स्तुती करिताती ॥५५॥

जयजयाजी परब्रह्म मूर्ती । अवधुतरूपें अवतार क्षिती ।

तुझा महिमा वदतां निश्चितीं । कुंठित श्रुती जाहल्या ॥५६॥

मध्यान्ही थुंकतां भानुवरी । तों शिंतोडे पडती आपुलेचि शिरीं ।

तैसी आम्हासि जाहली परी । तरी क्षमा करीं अपराध ॥५७॥

ऎकोनि ब्राह्मणांची ग्लांती । स्वामींसि दया उपजली चित्तीं ।

मग सिध्दींसि आज्ञा सत्वर करिती । नूतन वस्त्रें देती तयां ॥५८॥

ऎसा चमत्कार देखोन । नमस्कार करिती सकळ ब्राह्मण ।

मग स्वामींसि आज्ञा मागोन । आपुलालें स्थान पावले ॥५९॥

तैं पासोनि ते धरामर । द्वेष न करिती अनुमात्र ।

तों आणिक एक वर्तलें चरित्र । तें ऎका सादर भाविकहो ॥६०॥

शिष्यसंप्रदायासि न कळत । स्वामी उठोनि गेले त्वरित ।

अमरजा तीरीं पाहोनि एकांत । स्नानासि जळांत प्रवेशले ॥६१॥

बुडी देतांचि साचार । लोटोनि गेल्या घटिका चार ।

हें कोळियानें देखिलें नेत्रद्वारें । विस्मित अंतर तयाचें ॥६२॥

म्हणे स्वामीसि उशीर लागला आहे । तरीं जळीं सुसरीनें गिळिलें काय ।

म्हणोनि जळीं पाहों जाय । तों नवल काय देखिलें ॥६३॥

जळांत नेत्र उघडोनि पाहत । तों सात अप्सरा असती तेथ ।

दिव्य मंदिर देखिलें तेथ । पाहतां झांकती नेत्र पातीं ॥६४॥

त्याणीं स्वामींसि नेऊनि घरीं । पूजा केली सर्वोपचारीं ।

कोळी पाहतसे नेत्रद्वारीं । उभा बाहेरी राहोनियां ॥६५॥

षोडशोपचारें झालिया पूजन । स्वामीसि घातलें मिष्टान्न भोजन ।

मुखशुध्दि विडा घेऊन । मग तयासि पुसोन चालिले ॥६६॥

मंदिराबाहेर तये वेळीं । येतां दृष्टीसि देखिला कोळी ।

वर्तमान पुसतांचि सकळी । त्याणें तात्काळीं सांगीतलें ॥६७॥

मग स्वामी कोळियासि शिकविती । कौतुक देखिलें जे निश्चिती ।

हा वृत्तांत न सांगावा कोणाप्रति । त्याणें तात्काळीं सांगीतलें ॥६८॥

एक हंडाभर मोहरा होन । दीधले तेव्हां त्याजकारण ।

मग बाहेर पातले जळांतून । हें कोणाकारणें श्रुत नाहीं ॥६९॥

धन लाधलें कोळियासि । परी गोष्ट न टिकेचि तयापासी ।

म्हणें स्वामींनी प्रसन्न होऊनि मजसीं । दरिद्र दुःखासी नाशिलें ॥७०॥

आणिक एक दुर्बळ ब्राह्मण । दरिद्रदुःखें पीडिला जाण ।

घरीं कुटुंबासि न मिळेचि अन्न । परी स्वधीर मन तयाचें ॥७१॥

तो स्वामीपासीं एकदां येऊनी । विनये मस्तक ठेविला चरणीं ।

हात जोडोनि तयेक्षणीं । अमृतवचनीं बोलत ॥७२॥

म्हणें कृपाकरोनि अनाथावरी । भिक्षेसि यावें माझे घरीं ।

अनुकुळ पडेल ते अवसरीं । प्रतिउत्तरीं बोलिले ॥७३॥

ऎसें ऎकोनि अभयवचन । ब्राह्मण घरासि आला जाण ।

मग कांतेसि सांगे वर्तमान । स्वामींनी मान्य केलें असें ॥७४॥

परी दिवस तिथी नेम कांहीं । ऎसा नेम केला नाहीं ।

एके दिवसीं वैश्वदेव समयीं । अकस्मात विदेही पातला ॥७५॥

ब्राह्मणें देखोनि तयाप्रती । परम हर्ष वाटला चित्तीं ।

सप्रेम नमस्कार करोनि प्रीती । पाट देती बैसावया ॥७६॥

चिंचवणी कण्या ते अवसरीं । पाकनिष्पत्ती जाहली घरीं ।

म्हणवोनी चिंतातुर अंतरीं । म्हणे कैसी परी करूं आतां ॥७७॥

अगोदर सूचना असती पाहीं । तरी पदार्थ मेळविला असता कांहीं ।

स्त्रीपुरुष संकोच करिती जीवीं । मग तयासि विदेही काय म्हणें ॥७८॥

दूध कण्या भक्षाव्या येथ । ऎसा चित्तीं उपजला हेत ।

तुहीं म्हैस बांधिली अंगणांत । ते दोहुनि त्वरित आणावी ॥७९॥

ब्राह्मण म्हणे त्या अवसरा । ती वंध्या म्हैस योगेश्वरा ।

वर्षे लोटोनि गेलीं बारा । परी गर्भोदरा न धरीच ॥८०॥

स्वामी म्हणती ते अवसरीं । ते आजपासोनि दुभेल घरीं ।

कधीं न अटेल जन्मवरी । निश्चय अंतरीं असों द्या ॥८१॥

ब्राह्मण दोहोनि पाहतां सत्वर । दूध निघालें आठ शेर ।

आश्चर्य करीतसे धरामर । म्हणे हा ईश्वर साक्षात ॥८२॥

बैसोनि नरसिंह सरस्वती । दूधकण्या भक्षिल्या प्रीतीं ।

मुख शुध्दि तुळसी पत्र देती । मग आज्ञा करिती स्वामी तया ॥८३॥

उदईक भिक्षेसि येऊं येथ । शिष्य घेऊनि सात शत ।

आणि क्षेत्रवासी ब्राह्मण समस्त । आमंत्रणें त्यातें देईजे ॥८४॥

आणि पंचविसां माणसांचें मिष्टान्न । तुवां सत्वर निपजवणें ।

तितुकें पुरेंल सकळांकारणें । उद्वेग मनें न करावा ॥८५॥

ऎसें सांगोनि त्याजकारणें । तेथूनि सत्वर केलें गमन ।

दुसरें दिवसीं आमंत्रणें । देत ब्राह्मण घरोघरीं ॥८६॥

ब्राह्मण आश्चर्य करिती सकळ । याच्या कुटुंबासि अन्न न मिळे ।

आजि कां मांडिले पोर खेळ । ऎसें न कळे सर्वथा ॥८७॥

असो विविध लोक नानापरी । बोलत असती ते अवसरीं ।

दोन प्रहर होतांचि सत्वरी । समुदावो घरीं मिळाला ॥८८॥

सातशें शिष्यां समवेत । स्वामी येवोनि बैसले तेथ ।

आणि गांवींचे ब्राह्मण पांचशत । अन्न सर्वांतें वाढिलें ॥८९॥

पंचविसांचें वाढिलें अन्न । तितुकेंचि पुरे सकळां कारणें ।

हें स्वामींचे कर्तुत्व म्हणवोन । सकळ ब्राह्मण बोलती ॥९०॥

पंक्ति उठतांचि ते वेळां । विडे दक्षिणा दीधली सकळां ।

म्हणती योगेश्वराची अगाध लीला । कौतुक डोळां दाखविती ॥९१॥

घरीं उरलें होतें अन्न । तें इतर यातींस वांटिलें त्यांणें ।

त्याचें दरिद्र जाहले विच्छिन्न । झालासे धन संसारी ॥९२॥

आणखी एक रजक होता तेथें । तो स्वामींच्या दर्शानासि नित्य येत ।

मूर्ति आणोनि ध्यानांत । मानसीं पूजित आपुल्या ॥९३॥

ऎसे लोटतां दिवस बहुत । तों कल्पना आली मनांत ।

विजापुरीचे राज्य निश्चित । हें आपणातें असावें ॥९४॥

ऎसी कल्पना येतांचि मनीं । तो स्वामी प्रगटले तेच क्षणीं ।

म्हणती इच्छा असेल तुजलागुनी । ते सांग ये क्षणीं लवलाहें ॥९५॥

तुझ्या मनींची कल्पना जाण । ते श्रुत जाहली मजकारणें ।

कांहीं संकोच न धरोनि मनें । मनोरथ सांगणें सत्वर ॥९६॥

रजक म्हणे ते अवसरीं । ऎसी इच्छा वाटते अंतरीं ।

राज्य करावें विजापुरीं । तरी कैशापरी प्राप्त होय ॥९७॥

मग प्रसन्न होऊनि अवधूत । म्हणती आतांच पुरवीन मनोरथ ।

रजक मागुति विनवित । जर्जर बहुत शरीर हें ॥९८॥

वार्धकदशा आली निश्चितीं । विषय भोगावें कैशा रीतीं ।

तरी दुसरे जन्मीं पुरविजे आर्ती । म्हणवोनि विनंती करीतसे ॥९९॥

स्वामी म्हणती त्या अवसरा । तुझे मनोरथ पुरतील नरा ।

आणि आमुचा आठव करितां अंतरा । दर्शन सत्वरा देऊ आम्ही ॥१००॥

ऎसें वदोनि त्याजकारणें । आपण पावले अंतर्धान ।

रजक तेथेंचि पावला मरण । देहापासोन मुक्त झाला ॥१०१॥

विजापुरींचा राजा यवन । त्याच्या उदरासि गेला आपण ।

पुत्र होताम्चि त्याजकारणें । समाधान नृपनाथा ॥२॥

सुख सोहळे निरंतर । दिवसंदिवस जाहले थोर ।

सोळावे वर्षी साचार । राज्यावर बैसला ॥३॥

परी विषयीं लंपट होऊनि निश्चिती । स्वामीचा आठव न होय चित्तीं ।

यास्तव पायांस अवचितीं । व्यथा होती निर्माण ॥४॥

आरोग्य व्हावया साचार । वैद्य वाणी केली फार ।

परी न होय रोगाचा परिहार । चिंतातुर म्हणवोनी ॥५॥

एके दिवशीं नृपवर । निद्रित असतां साचार ।

तों स्वप्नीं आठवलें जन्मांतर । सविस्तर ते समयीं ॥६॥

तेव्हां स्वामींचें होतां स्मरण । तत्काळ दीधलें दर्शन ।

म्हणती उदयीक परमहंस येईल जाण । तो रोग दारूण निरसील ॥७॥

राजा होऊनियां जागृत । प्रधानासी सांगीतला वृत्तांत ।

म्हणती उदयीक येईल जो अतीत । त्याचा सन्मान बहुत करावा ॥८॥

दुसरे दिवसीं मध्यान समयीं । स्वामी प्रगटले ते ठायीं ।

रायें मस्तक ठेवितांचि पायीं । रोग सर्वही परिहरे ॥९॥

मग अवधूत तयासि नीति सांगत । राज्यपदें न व्हावें उन्मत्त ।

दीन गरीब जे अनाथ । पीडण तयांतें न करावें ॥११०॥

गाई ब्राह्मणांचा प्रतिपाळ । करीत जावा सर्वकाळ ।

प्रतापें दंडावें दुष्ट खळ । तरीच सुफळ संसार हा ॥११॥

श्रीहरी स्मरन सप्रेमयुक्ती । करीत जावें दिवसरातीं ।

वैष्वभक्त ब्राह्मण अतिथी । शरण यांप्रती असावें ॥१२॥

ऎसें सांगतां सिध्दमूर्ती । अवश्य तयासि म्हणे भूपती ।

म्हणें आता दर्शन होईल मागुतीं । तो नियम मजप्रती करावा ॥१३॥

अवधूत म्हणती ते अवसरीं । तुवां चलावें काशीपुरीं ।

तेथें भेट देऊं सत्वरी । निश्चित अंतरीं असोंदें ॥१४॥

ऎसें वदोनि त्याजकारणें । आपण पावले अंतर्धान ।

राजा अनुताप धरोनि मनें । यात्रेसि गमन करितसे ॥१५॥

आनंदवनासि जावोनि त्याणें । भागिरथीचें केलें स्नान ।

स्वामीचें चित्तीं होतांचि स्मरण । साक्षात दर्शन ते देती ॥१६॥

मग आज्ञा करिती ते अवसरीं । चतुर्मास राहे काशीपुरीं ।

आम्ही जातों अमरजा तीरीं । दर्शना माघारीम ये तेथें ॥१७॥

माझ्या पादुका स्थापुनि येथें । त्याचें पूजन करावे नित्य ।

ऎसें सांगोनियां त्यातें । अंतर्धानातें पावलें ॥१८॥

स्वामीच्या आज्ञेनें साचार । चतुर्मास राहिला नृपवर ।

मग धुंडित आला गाणगापुर । अमरजा तीर ते ठायीं ॥१९॥

तेथें स्वामीच्या घेऊनि दर्शना । मग तो गेला आपुल्या स्थाना ।

सत्वगुणें करोनि जाणा । राज्यासना भोगीतसे ॥१२०॥

मागिले जन्मीं निजप्रीतीनें । घेतलें संतांचें दर्शन ।

इतुकें फळ लाधलें तेणें । नृपनंदन जाहला ॥२१॥

गाणगापुरीं स्वामी असती । ते सकळ शिष्यांसि काय बोलती ।

आतां दर्शन दुर्लभ तुम्हांपती । तरी सांगतों युक्ती ते ऎका ॥२२॥

येथें करोनि पादुका स्थापना । करीत जावें त्यांचें पूजन ।

ऎसें सांगोनि त्यांजकारणें । अंतर्धान पावलें ॥२३॥

कृष्णातीरीं एक ग्राम जाण । कुरुंदवाड नामाभिधान ।

ते स्थळीं प्रकट जाहले आपण । अघटित विंदान दावावया ॥२४॥

सत्पुरुष देखोनि साचार । दर्शनासि येती नारीनर ।

नवस कल्पितांचि सत्वर । तरी मनोरथ पुरे तयाचा ॥२५॥

एक वंध्या कांता होती जाण । म्हणे मज पुत्र होईल निधान ।

तरी स्वामींच्या दर्शनासि आणीन । कल्पना मनें हें केली ॥२६॥

तंव तें जाहली गरोदर । सुलक्षणिक जाहला पुत्र ।

घरीं उत्सव केला थोर । तों काय चरित्र वर्तलें ॥२७॥

षण्मास लोटतांचि जाण । लेंकरूं जाहलें गतप्राण ।

मातेनें प्रेत उचलोन । म्हणे स्वामी कारणें दाखवितें ॥२८॥

स्वामीच्या सन्मुख आणितां । तो जीवंत जाहलें तें अवचितां ।

चित्तीं आनंद पावोनि माता । मग अवधुता नमस्कारी ॥२९॥

आणिक एक सावकार होता । तो मृत्यु पावला अवचिता ।

शय्या गमनीं निघे कांता । माया ममता टाकोनि ॥१३०॥

मिरवत आली कृष्णातीरीं । तो स्वामीसि दुरोनि देखिलें नेत्रीं ।

सद्भावे येवोनि नमस्कारी । तों आशिर्वाद सत्वरीं बोलिले ॥३१॥

तों सती म्हणतसे अवधुता । शांत जाहला माझा भर्ता ।

चालिलें शय्या गमनार्था । माया ममता टाकोनि ॥३२॥

अष्टपुत्रा सौभाग्यवती । आशिर्वाद दीधला मजप्रती ।

स्वामी प्रसन्न होऊनि म्हणती । भ्रतार निश्चिती उठेल तुझा ॥३३॥

प्रेतापासीं येतांचि जाण । तों भ्रतार बसला उठोन ।

जैसें दीधलें आशीर्वचन । तैसेम आलें घडोन अनायासें ॥३४॥

कृष्णातीरींचे बहुत जन । भक्तीसि लाविले अवधुतानें ।

मग ते स्थळीं अदृश्य जाहले आपण । कोणासी दर्शन न देती ॥३५॥

करावया विश्वोध्दार । घेतला सगुण अवतार ।

ऎसा संतांचा महिमा थोर । प्राकृत नर नेणती ॥३६॥

आणीक चरित्र ऎका सादर । एक महा मुद्गल भट्टद्विजवर ।

वेदशास्त्रीं निपूण फार । परी चित्तीं अहंकार असेना ॥३७॥

महापंडित आला थोर । तरी कुंठित होय त्याच्या समोर ।

इतुकी विद्यां असताम फार । परी वाद अणुमात्र न घाली ॥३८॥

सर्वाभूतीं दया पूर्ण । आत्मवत भासे विश्वजन ।

असत्य सर्वथा न बोले वचन । वृत्ति संपूर्ण मुराल्या ॥३९॥

न करी कोणाचें उपार्जन । रावरंक समसमान ।

आशापाशी न गुंतेचि मन । नैराश्य परिपूर्ण सर्वथा ॥१४०॥

स्नानसंध्या करोनि नित्य । पंचमहायज्ञ सारित ।

समयीं आलिया अभ्यागत । तयासि पुजित सद्भावें ॥४१॥

श्रीराम सीता लक्ष्मण । भरत आणि शत्रुघ्न ।

ह्या मूर्ति घरीं पुरातन । करीतसे अर्चन सद्भावें ॥४२॥

श्रीराम मनीं श्रीराम ध्यानीं । श्रीराम दिसे जागृतीम स्वप्नीं ।

श्रीराम भरला जनीं वनीं । व्यापक त्रिभुवनीं श्रीराम ॥४३॥

पुत्रमित्र आणि भार्या । श्रीरामरुप दिसती तया ।

श्रीराम राहाटवी सकळ इंद्रियां । पूर्णस्थिती तया बाणली ॥४४॥

अयाचित वृत्ती करून। जितुकें मिळेल वस्त्रअन्न ।

तेणेंचि होय कुटुंब रक्षण । संतोष मन सर्वदा ॥४५॥

श्रीराम जयंती माझारी । महा उत्सव करिती घरीं ।

दहा दिवस अन्न शांति करी । मिष्टान्नें बरीं ब्राह्मणां ॥४६॥

मुद्गल भट्ट प्रतिष्ठित द्विजवर । साहित्य करिती भाविक नर ।

संत महंत वैष्णवीर । कीर्तन गजर ते करिती ॥४७॥

दहावे दिवसीं करोनि लळित । मग गौरविती वैष्णवभक्त ।

ऎसें लोटतां दिवस बहुत । तों चरित्र अद्भुत वर्तलें ॥४८॥

एकदाम कुटुंबासह वर्तमान । महा यात्रेसि चालिले आपण ।

एक पुत्र घरी ठेविला जाण । देवतार्जन करावया ॥४९॥

दारा पुत्र आणि सुनेसी । अश्व मनुष्य घेवोनि ऎशीं ।

मुद्गलभट्ट जावोनि काशीसी । भागींरथीसी स्नान केलें ॥१५०॥

विश्वेश्वर ज्योतिर्लिंग पूर्ण । त्याचें सद्भावें केलें पुजन ।

मग नित्य यात्रा सर्व करून । समाधान पावले ॥५१॥

रामनिवमीसि परतोनि जावें घरी । यास्तव निघाले सत्वरीं ।

गया प्रयाग अयोध्यापुरी । पाहोनि अंतरीं संतोष ॥५२॥

स्नान दान गया वर्जन । यथाविधि देवतार्चन ।

जे जे क्षेत्रीं जें आचरण । तितुकें कारण संपादिलें ॥५३॥

ऎसी यात्रा करोनि त्वरित । परतोनि येतसे विष्णुभक्त ।

तों मार्गी कोणी सज्ञान गृहस्थ । तो आदरें राहवी तयांसी ॥५४॥

म्हणती विष्णु भक्ताचें आगमन । जाहलें असें दैवें करून ।

पूजा करोनि यथाविधिनें । वस्त्रें भूषणें अर्पिती ॥५५॥

रामजयंती उत्सव सदनीं । यास्तव द्रव्य देती आणोनी ।

मुद्गलभट्ट तें अंगींकारुनीं । चालिले परतोनी सत्वर ॥५६॥

आणिकही कोणी भाविक प्रेमळ । सद्भावें अर्पिती तुळसीदळ ।

द्रव्य बहुत सांचलें जवळ । हें तस्करांसि कळलें तें समयीं ॥५७॥

गमन करितांचि मुद्गल भट्टीं । सवें चोर चालिले त्याचे पाठीं ।

म्हणती अरण्यांत पाडोनि गाठीं । द्रव्य शेवटीं हरावें ॥५८॥

ऎसी दुर्बुध्दि धरोनि थोर । मागें चालिलें ते तस्कर ।

हें सर्वथा नेणे भक्त चतुर । एक जाणे रघुवीर अंतरात्मा ॥५९॥

मुद्गलभट्टाची स्थिती ऎसी । चोर साव सारिखेचि त्यासी ।

रक्षण करावें निज द्रव्यासी । हें कल्पना मानसीं त्यास नाहीं ॥१६०॥

कोणी देती अथवा नेती । कोणी निंदिती कोणी स्तविती ।

हें समान मानूनियां प्रीतीं । चित्तीं रघुपती धरियेला ॥६१॥

निरसोनि सकळ क्रोध काम । हृदयीं सांठविला मेघश्याम ।

चित्तीं ठसावें हेंचि प्रेम । कीं सर्वत्र राम एक असे ॥६२॥

ऎसी मुद्गल भट्टाची स्थिती । परी निर्दय तस्कर महा दुर्मती ।

चित्तीं घात करूं इच्छिती । हरोनि संपत्ती न्यावया ॥६३॥

शस्त्रें घेउनि साचार । चालत असती मार्गावर ।

हें जाणोनियां श्रीरघुवीर । सगुण साकार रूप धरी ॥६४॥

भक्तासि संकट पडतांचि पाहीं । काळ वेळ न विचारी कांहीं ।

सगुण होऊनि शेषशायी । विघ्नें सर्वही निरसित ॥६५॥

श्रीराम आणि लक्ष्मण । भरत आणि शत्रुघ्न ।

धनुर्धरांचीं रूपें धरून । मार्गी त्वरें प्रगटले ॥६६॥

कुटुंबासहित प्रेमळभक्त । भजन करीत जातसे पंथ ।

चौघे धनुर्धर तयासि रक्षित । तस्करही जपत चालती ॥६७॥

धनुष्यबाण घेऊनि हातीं । भरत शत्रुघ्न पुढें जाती ।

श्रीराम लक्ष्मण मागूनि येती । भक्तासि रक्षिती प्रीतीनें ॥६८॥

हे चौघेही दिसती तस्करांकारणें । उग्ररूपें भासती जाण ।

अंतरीं होवोनि क्रोधायमान । आरक्त नयन वटारिती ॥६९॥

ऎसें स्वरूप देखतां दृष्टी । चोरांसि भय उपजलें पोटीं ।

म्हणती याणें कां पुरविली पाठी । बोलती गोष्टी परस्परें ॥१७०॥

मागें पुढें राहती दूर । मग द्रव्य हिरोनि घेऊण समग्र ।

ते न विसंबती क्षणभर । दिवस रात्र रक्षिती ॥७१॥

निद्रित होतां वैष्णववीर । जागत बैसती चारी प्रहर ।

चित्तीं आश्चर्य करिती चोर । म्हणती कैसा विचार करावा ॥७२॥

तंव एके दिवसीं साचार । धनुर्धरांसि पुसती तस्कर ।

तुम्हा जाणें कोठवर । ऎकोनि रघुवीर काय म्हणे ॥७३॥

मुद्गलभट्ट हा यात्रेकरी । आम्ही करितों याची चाकरी ।

तयासि पोंहचवूनियां घरीं । मग आयोध्यापुरीं आम्हीं जाऊं ॥७४॥

ऎसें बोलोनि श्रीरघुवीर । परी ते सर्वथा न ओळखती चोर ।

जो अंतरात्मा जगदुध्दार । म्हणवितो चाकर भक्तांचा ॥७५॥

ज्याची मूर्ति हृदयसंपुटीं । एकांतीं पूजीतो धूर्जटी ।

तो भक्ताच सेवक होय जगजेठी । हें नवल पोटीं मजवाटे ॥७६॥

आज उद्यां राहतील दूर । मग द्रव्य होरोनि घेऊं सत्वर ।

ऎसी आशा धरोनि चोर । गंगातीर पातले ॥७७॥

मुद्गलभट्ट प्रवेशले मंदिरांत । कंठाळ उतरोनि नेली आत ।

मग चौघे धनुर्धर अदृश्य होत । तस्कर विस्मित जाहले ॥७८॥

अस्तमानासि गेला दिनकर । यास्तव बाहेत उतरले चोर ।

मुद्गलभट्टाच्या भेटीसि सत्वर । भाविक नर पातले ॥७९॥

यात्रा जाहलीं कीं सुखरूप । उत्तर देती रघुवीर कृपे ।

तों तस्करांसि जाहला अनुताप । आपेआप ते समयीं ॥१८०॥

म्हणती हा विष्णुभक्त आहे । म्हणोनि देवें रक्षिलें काय ।

आपण केलें नाना उपाय । परी हातास न ये त्याचें ॥८१॥

असों मुद्गलभट्ट तें अवसरीं । सत्वर जावोनि देव घरीं ।

सद्भावें साष्टांग नमस्कारी । मूर्ति साजिरी पाहोनि ॥८२॥

उपाहार करावया सत्वर । तों द्वारापासीं देखिलें तस्कर ।

म्हणती संगतीनें आलां येथवर । वरी भाजी भाकर खा आतां ॥८३॥

ऎसें बोलोनि त्यांजकारणें । मग घरांतूनि देवविलें अन्न ।

भक्षितांचि त्याचा जाहला गुण । गेली निघोनि दुर्बुध्दि ॥८४॥

मुद्गलभट्टासि नमस्कार । करोनि स्वमुखें बोलती उत्तर ।

तुम्हीं चौघे ठेविले होते चाकर । ते कां साकार न दिसती ॥८५॥

रूपें सुंदर त्यांचीं असती । धनुष्य बाण घेवोनि हातीं ।

रात्रंदिवस तुम्हांसि रक्षिती । ते कां न दिसती ते ठायीं ॥८६॥

मुद्गलभट्ट देती उत्तर । आम्हीं ठेविलें नाहींत चाकर ।

तुम्हीं कोण अहांत साचार । तरी हें सत्वर सांगावें ॥८७॥

ते म्हणती आम्हीं सर्व चोर जाण । पाळत लावोनि आलों दुरून ।

कीं तुमचें हिरोनि घ्यावें धन । परी ते चौघेजण रक्षिती ॥८८॥

एकदां पुसिलें साचार । तुम्हांसि जाणें कोठवर ।

तें म्हणती आम्हीं याचें चाकर । अयोध्यापुर गांव आमुचें ॥८९॥

तुम्हीं वाडियांत प्रवेशतां सदनीं । आम्हीं येथवर देखिलें नयनीं ।

ऎकोनि तस्करांचीं वाणी । म्हणे कैवल्यदानी शिणविला ॥१९०॥

मग मुद्गलभट्ट ते समयीं । तस्करांच्या लागतसे पायीं ।

म्हणे तुम्हांसि भेटले शेषशायीं । अंतपार नाहीं भाग्यासि ॥९१॥

तुम्हीं केवळ वैष्णव भक्त । यास्तव भेटले रघुनाथ ।

मीतरी पतित त्रिवाचा सत्य । म्हणवोनि लपत मजपुढें ॥९२॥

द्रव्याची गांठोडीं सत्वरा । आपुल्या हातें देतसे चोरां ।

म्हणती रित्याहातें न जावें घरा । अंगींकार करा स्वामी याचा ॥९३॥

श्रीराम सखा लक्ष्मण । भरत आणि शत्रुघ्न ।

यांहीं धनुर्धरांचीं रूपें धरोन । तुम्हांसि दर्शन दीधलें ॥९४॥

ऎसी ऎकोनि वचनोक्ती । तस्करांसि अनुताप जाहला चित्तीं ।

म्हणती आम्ही पापिष्ठ दुर्मती । तुझ्या संगती उध्दरलों ॥९५॥

आणिकासि छळितां साचार । तरी भोगणें लागता नरक घोर ।

तुझें संगतीने साचार । श्रीजानकीवर देखिला ॥९६॥

द्रव्य नलगेचि आम्हांकारणें । तुझ्या संगतीं जाहलों पावन ।

मग मुद्गलभट्टें नेत्र झांकोन । मांडिलें स्तवन रामाचें ॥९७॥

जयजयाजी रघुवीरा । सायुज्यदानी अति उदारा ।

नीलग्रीव शंकराच्या प्रियकरा । येवोनि सत्वरा भेटी द्यावी ॥९८॥

धनुष्यबाण घेऊनि हातीं । नित्य भेटसी तस्करांप्रती ।

माझी विचित्र कर्मगती । जानकीपती ते सांगा ॥९९॥

करुणारसें प्रीती करोनी । गीर्वाण भाषा वदले वाणी ।

शत आर्या केल्या त्याणीं । मग कैवल्यदानी भेटले ॥२००॥

श्रीराम सिता लक्ष्मण । भरत आणि शत्रुघ्न ।

देव घरीं एकांती प्रगट होऊन । दीधलें दर्शन तयासी ॥२०१॥

सगुणरूप देखिलें दृष्टीं । तेंचि ठेविलें हृदय संपुटीं ।

निजभक्त पडतां संकटीं । पावे जगजेठी तत्काळ ॥२॥

तों श्रीरामजयंती माझारी । संत महंत पातले घरीं ।

महाउत्सव होतसे मंदिरीं । मंगळतुरीं नामघोष ॥३॥

नित्य ब्राह्मण संतर्पण । रात्रिसमयीं हरिकीर्तन ।

तों स्नेह सरोनि गेलें जाण । उपाय आन नसेचि ॥४॥

बाजारांतुनि आणावें जर । तरी दिवाणाचें भय थोर ।

रात्रीं वागतांना नारीनर । तरी घरटीकार धरी त्यांसी ॥५॥

कीर्तनासि कोणी येती जर । ते येथेंचि राहती चारी प्रहर ।

दिवस उगवतां साचार । घरोघर मग जाती ॥६॥

ऎसें असतां ये ठायीं । कीर्तनांत तेल सरलें पाही ।

संकटीं पडिले शेषशायी । मग लाघव कायी करीतसे ॥७॥

मुद्गलभट्टाचा विद्यार्थी । त्याचें रूप धरी सीतापती ।

तेलियाचें घरीं जावोनि प्रीतीं । गहाण ठेविती मुद्रिका ॥८॥

तेलणीसि सांगती ते समयीं । प्रातःकाळीं आणोनि देयीं ।

आपुलें द्रव्य घेऊनि जायीं । ऎसें ते समयीं बोलिले ॥९॥

तेल आणोनि घागरभर । पात्रांत रिचवी सारंगधर ।

ऎकत बैसले कीर्तन गजर । दीनोध्दार तेधवां ॥२१०॥

हरीदास कीर्तन उभें असती । चारी प्रहर जाहली जागृतीं ।

मग उजळोनि मंगळारती । सीतापती ओवाळिला ॥११॥

तेव्हां सकळ श्रोतयांप्रती । प्रसाद वांटिला खिरापती ।

आपुलाल्या घरासि लोक जाती । तों उदयासि गभस्ती पातला ॥१२॥

मुद्रिका घेवोनि आली तेलिण । मुद्गलभट्टासि बोले वचन ।

रात्रीं तुमच्या विद्यार्थीयाणें । ठेविलें गाहाण मजपाशीं ॥१३॥

तेल आणिलें घागरभर । माझें द्रव्य द्या सत्वर ।

ऎसें ऎकोनियां उत्तर । विस्मित अंतर तयाचे ॥१४॥

विद्यार्थियांसि पुसतां पाहीं । ते म्हणती आम्हांसि विदित नाहीं ।

तेल मात्र दिसतें गृहीं । विस्मित जीवीं तें होती ॥१५॥

मुद्गलभट्टासि समजलें मनीं । म्हणती हे श्रीरामाची करणी ।

मुद्रिका देव्हार्‍यांत ठेवोनी । प्रीती करोनी पूजित ॥१६॥

पुढिले अध्यायीं रस अद्भुत । वदविता श्रीगुरु रुक्मिणीकांत ।

महीपती त्याचा मुद्रांकित । शरणागत संतांचा ॥१७॥

स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविकभक्त । एकुणपन्नासावा अध्याय रसाळ हा ॥२१८॥ अध्याय ॥४९॥ ओव्या ॥२१८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP