श्रीगणेशाय नमः । श्रीपांडुरंगाय नमः ।
शोधीं वसुधा रसाचें निर्मळ । दिसे हरींचें मुखकमळ ।
सांवळी तनु अति निर्मळ । त्यावरी माळ वैजयंती ॥१॥
गुरु शुक्र नक्षत्रें गगनीं । तैसी कुंडलें तळपती कानीं ।
पीतांबर दीप्तीं न समाय गगनीं । जेवीं सौदामिनी चमकत ॥२॥
सुरेख भंवया विराजमान । कमळदळा ऐसे दिसती नयन ।
मंदस्मित जगज्जीवन । नासाग्रीं घ्यान ठेविलें ॥३॥
कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं । आजानुबाहु जगजेठी ।
वीर कंकणें मणगटीं । पाहतांचि दृष्टी निवतसे ॥४॥
सकळ ऐश्वर्याचें निधान । हृदयीं श्रीवत्सलांछन ।
त्रिवळीं पाहोनि विराजमान । भुलतसे मन इंदिरेचें ॥५॥
कटि सूत्रमाळा गांठीं । करकमळ तें शोंभतें कटीं ।
ऐसें ध्यान पाहोनि दृष्टीं । चित्तीं धूर्जटी निवाला ॥६॥
ठाण साजिरें सुकुमार । सम पदें शोभती विटेवर ।
ते स्थळीं मन निरंतर । राहे साचार निजप्रीती ॥७॥
मागिले अध्यायीं कथा साजिरी । चांगदेव गेले होते बेदरीं ।
मृत प्रेत उठवुनि सत्वरीं । पंढरपुरीं मग आले ॥८॥
क्षेत्रवासी वृत्तांत कानीं । ऐकोनि संतोषले मनीं ।
मग चांगयासि भेटती येऊनी । प्रीती करोनि तेधवां ॥९॥
म्हणती तुम्हीं वैष्णववीर । दुष्टासि दाखवुनि चमत्कार ।
भक्तिपंथासि जीर्णोद्धार । करावया साचार अवतरले ॥१०॥
बेदराहुनि आणिलें पत्र । तें ग्रामाधिकारियांसि दाखविलें सत्वर ।
मग कामासि लावूनि बेलदार । मसीद सत्वर पाडिली ॥११॥
कारेगार लावूनि सत्वरीं । देवालय मांडिलें यंत्राकारीं ।
विळभर एक्या मनुष्यास मजुरी । होन मूठभरी देतसे ॥१२॥
ऐकोनि आशंका धरली पोटीं । इतुकें द्रव्य कोठूनि वांटी ।
तरी सकळ सिद्धि तया निकटी । सन्निध तिष्ठती तयाच्या ॥१३॥
ज्याणें कळिकाळासि ठकवूनि भलें । मेलें मनुष्य जिवंत केलें ।
त्याणें इतुकें द्रव्य कोठूनि वांटिलें । हे आशंका फोल न धरावी ॥१४॥
लघु शंका करिती गोरक्षनाथ । तेव्हां सोन्याचाच जाहला पर्वत ।
त्याणें पुंगी वाजवितांचि अकस्मात । चांगदेव तेथें निपजले ॥१५॥
म्हणोनि सकळ सिद्धीचा रावो । तो हा वटेश्वर चांगदेवो ।
ज्याणें भक्ति भावें करुनि पहा हो । देवाधिदेवो वश्य केला ॥१६॥
सिद्धि लोलिंगता पाही । सर्वथा नावडे त्याचे जीवीं ।
परी देवकार्य साधावया पाहीं । अंगीकार तिहीं केला असे ॥१७॥
श्रीविष्णुसहस्त्रनामांत जाण । भयकृत आणि भयनाशन ।
श्रीहरींचे नामाभिधान । द्वैपायन ठेविलें ॥१८॥
तें सत्य करावया निश्चितीं । देऊळ मोडविलें अविंधा हातीं ।
मग चमत्कार दावूनि नानारीतीं । भक्ताप्रती यश दिधलें ॥१९॥
पुढील कार्यार्थ सर्व जाणोनी । चांगयासि भेटले कैवल्यदानी ।
मंत्र सांगितला संजीवनी । मग उठविली राणि रायाची ॥२०॥
तेणें संतोषोनि नृपवर । चांगदेवासि दीधलें पत्र ।
तेव्हां देउळासि कामाला लाविलें सत्वर । मसीद सत्वर पाडोनियां ॥२१॥
दोन सहस्त्र मनुष्यें निश्चितीं । देऊळाच्या कामासि नित्य राबती ।
मग मावळोनि गेलिया गभस्ती । होन वांटिती चांगदेव ॥२२॥
एक संवत्सर पर्यंत निर्धारीं । स्वतः राहिले पंढरपुरीं ।
देऊळ कळसासि गेलिया वरी । मुहूर्त विचारि ब्राह्मणां ॥२३॥
म्हणती सुदिन पाहोनि सत्वर । सिंहासनीं बैसवा रुक्मिणीवर ।
करील जड मूढांचा उद्धार । दर्शनमात्रें करुनियां ॥२४॥
ऐकूनि ब्राह्मण काय बोलत । आजि कार्तिक दशमी सुदिन मुहूर्त ।
मूर्ति स्थापावी देऊळांत । ऐसें मनोगत सकळांचें ॥२५॥
मग बडवे पुजारी समवेत । चांगदेव जाती तळघरांत ।
श्रीपांडुरंगमूर्ति देखोनि तेथ । साष्टांग प्रणिपात घालिती ॥२६॥
दोन वर्षेपर्यंत । अर्चन पूजा नसेचि तेथ ।
डोईस टोपी जीर्ण बहुत । धुळीनें माखत सर्वांग ॥२७॥
ठाण साजिरें सुकुमार । जघनीं ठेविले दोनी कर ।
कासेंसि वेष्टिलें एक धोतर । समपद विटेवर जगदात्मा ॥२८॥
मजला भासे ऐशा रीतीं । योगी कैसे समाधि घेती ।
तो अनुभव पहावया निश्चितीं । भुयारांत श्रीपती बैसला ॥२९॥
हें चांगदेवें देखोनि नयनीं । काय बोलिले तये क्षणीं ।
तूं देवाधिदेव कैवल्यदानी । सत्कीर्त्ति पुराणीं विख्यात ॥३०॥
ऐसें असतां पंढरीराया । तळघरीं लपोनि बैससी कासया ।
पहावया निजभक्तांची चर्या । दाविसी माया ओडंबर ॥३१॥
समुद्रजळीं होऊनि मासा । शंखासुरासि घातला फांसा ।
तो तूं तळघरांत लपलासि कैसा । पंढरीशा नवल हें ॥३२॥
कांसव होऊनि जगजेठी । तुवां मंदराचळ धरिला पृष्ठीं ।
तो तूं यवनाचें भय वागवोनि पोटीं । लपतोसि संकटीं नवल हें ॥३३॥
वराह होऊनी एके अवसरा । दांतावरी धरिली वसुंधरा ।
तो तूं भुयारांत लपालासि बरा । नवल अंतरा मज वाटे ॥३४॥
प्रल्हादें आठव करितां अंतरीं । स्तंभांत प्रगटलासि नरकेसरी ।
आतां कां लपालासि तळघरीं । नवल अंतरीं मज वाटे ॥३५॥
त्रिविक्रम होवोनि वनमाळी । बळीस घातलें पाताळीं ।
त्याहूनि बलिष्ठ दिसे कळी । नवल ये वेळीं मज वाटे ॥३६॥
तूं एकांग वीर परशुधरा । निःक्षत्रिय केली वसुंधरा ।
आतां यवनाच्या भयें लपलासि बरा । जगदुद्धारा नवल हें ॥३७॥
श्रीराम अवतार घेऊनि जाण । मारिलें रावण कुंभकर्ण ।
आतां तो प्रताप विसरोन । बैससी लपोन ये ठायीं ॥३८॥
होऊनि श्रीकृष्ण लीलावतारी । दैत्यदुष्ट मारिले भारी ।
आतां कलियुगा माझारीं । लपोनि तळघरीं बैसलासि कां ॥३९॥
तूं कळिकाळाचा शास्ता पूर्ण । हें पुराणप्रसिद्ध वचन ।
तें सामर्थ्य ठेविलें कोणा कारणें । हे जीवींची खुण सांगिजे ॥४०॥
ऐकोनि चांगयाची वचनोक्ती । हांसोनि बोले पांडुरंगमूर्ती ।
तुम्हां भक्तांची वाढवावया कीर्ती । केली असे युक्ती जाण पां ॥४१॥
पुढील भविष्य जाणोनियां । मी तुज भेटलों प्राणसखया ।
संजीवनी मंत्र सांगोनियां । केली असे छाया कृपेची ॥४२॥
मी कर्ता करविता जगन्निवास अ। हें तंव वचन साचचि असे ।
दुर्बुद्धि देऊनि यवनास । अन्याय तयास घडविला ॥४३॥
मग सर्परुप धरोनियां निर्धारीं । डंखोनि मारिली त्याची नारी ।
तेथें तूं येतांचि धन्वंतरी । यश सत्वरी दीधलें ॥४४॥
मी तें निर्गुण निराकार । निष्कर्म निरुपचार ।
परी तुमची सत्कीर्ती व्हावया थोर । लपालों साचार ये ठायीं ॥४५॥
ऐसें बोलतां करुणामूर्ती । चांगयासि अनुभवें आलीं प्रतीती ।
आनंदाश्रु नेत्री वाहती । प्रेम चित्तीं कोंदलें ॥४६॥
मग मस्तक ठेवूनि चरणकमळीं । मूर्ति उचलिली तयेवेळीं ।
जयजयकारें पिटोनि टाळी । भक्त मंडळी गर्जतसे ॥४७॥
बाहेर मूर्ति आणिली जेव्हां । क्षेत्रवासी आनंदले तेव्हां ।
दर्शनाचा धरोनि हेवा । देवाधिदेवा विलोकीती ॥४८॥
सिंहासनीं बैसतां रुक्मिणीवर । बोभाट गेला दुरिच्या दुर ।
यात्रा मिळाली असे फार । करिती गजर नामघोषें ॥४९॥
चांगदेव म्हणती ते अवसरीं । मूर्ति नेऊनि भीमातीरीं ।
देवासि स्नान घाला सत्वरी । मानलें अंतरीं सर्वांच्या ॥५०॥
सुखासनीं घालोनि मग । चंद्रभागेसि आणिला पांडुरंग ।
टाळविणे घेऊनि मृदंग । गाती अनुरागें हरिदास ॥५१॥
गरुड टके निशाण भेरी । वाद्ये वाजती मंगळतुरी ।
पताका फडकती नानापरी । नाद अंबरीं कोंदला ॥५२॥
पुंडलीकापासीं नेऊनि मूर्ती । वेदोक्त मंत्रे स्नान घालिती ।
तों तीर्थें पुनीत व्हावयासि येती । चमत्कार देखती जनलोक ॥५३॥
एकाएकींच तये क्षणीं । चढलें चंद्रभागेसि पाणी ।
सागरीं लाट जाय निघोनी । तैसेंच ते क्षणीं वर्तलें ॥५४॥
वाळवंटीं यात्रा मिळाली जाण । तयांसि जाहलें सचैल स्नान ।
म्हणती धन्य आजिचा सुदिन । दुरितें संपूर्न नासलीं ॥५५॥
देवासि स्नान घालूनि देखा । मग सव्य घेतलें पुंडलीका ।
जो प्रेमळाचा प्रियोत्तम सखा । मिरवत निका मग नेती ॥५६॥
गुप्त रुपें अमरपती । विमानारुढ होऊनि येती ।
म्हणती पुण्यपावन हे क्षिती । येथें वैकुंठपती स्वयें आला ॥५७॥
ऐसें म्हणोनि वृंदारक । पुष्प वर्षाव करिती देख ।
कीर्तन मेळीं वैष्णव लोक । सप्रेम सुख भोगिती ॥५८॥
भेरी ठोकिती वाजंतरे । तेणें नादें कोंदलें अंबर ।
तंतवितंतघन सुस्वरें । हरिदास आदरें गाताती ॥५९॥
नटवे नृत्य करितां संगीत । तयां मागें मिरवतसे रथ ।
मंडप घसणी लोकांसि होत । परब्रह्म पाहती न्याहाळुनी ॥६०॥
म्हणती बाहेर आहे मोकळा जोंवर । दृष्टी भरोन पाहों तोंवर ।
सिंहासनी बैसलियावर । प्रयत्न फार मग लागे ॥६१॥
ऐसें म्हणोनि तये क्षणीं । फेडिती डोळ्यांचीं पारणीं ।
दृष्टीसीं देखोनि कैवल्यदानी । संतोष मनीं जनलोक ॥६२॥
महाद्वारासि ऐशारीतीं । मिरवत आणिला रुक्मिणपिंती ।
मग मूर्ती उचलोनि हातोहातीं । देउळाप्रती नेली असे ॥६३॥
सिंहासनी बैसवोनि जगज्जीवन । घालिती पंचामृत स्नान ।
दधिदुग्धांच्या कावडी भरुन । उदंड जन आणिती ॥६४॥
तेणें शोभला हृषीकेशी । तरी त्याची उपमा देतसे त्यासी ।
श्रीहरि जागर पंढरीसी । कार्तिकमासीं होतसे ॥६५॥
आश्विनमासापासूनि जाण । कार्तिक दशमीपर्यंत पूर्ण ।
दुग्धें न्हाणिती जगज्जीवन । शोभायमान दिसे कैसा ॥६६॥
आकाशासि नीळिमा आंगिचा असे । त्यावरी शुभ्र चांदणें शोभतसे ।
दधि वोतितां जगन्निवास । तैसाचि दिसे मजलागीं ॥६७॥
असो आतां ते अवसरीं । अभिषेक करोनि देवावरी ।
वस्त्रें भूषणें नानापरी । लेवविती पुजारी निजांगें ॥६८॥
कांसेसि दिव्य पितांबर । रत्नखचित दिसे मुकुट सुंदर ।
कानीं कुंडलें मकराकर । शोभती हार पुष्पांचे ॥६९॥
भाळीं रेखिला केशरी टिळा । सर्वांगीं बुका उधळिला ।
गळा कमळ तुळसीच्या माळा । घनसांवळा लेतसे ॥७०॥
धूपदीप कापूर आरती । पक्वान्न नैवेद्य दाखविती ।
ब्राह्मण मंत्रघोष बोलती । पुष्पांजळी अर्पिती सद्भावें ॥७१॥
सत्यभामा राही रुक्मिण । त्यांचेंही ऐसेंच केलें पूजन ।
महाद्वारीं वैष्णव जन । आनंद कीर्तन करिताती ॥७२॥
तों गरुडापारीं सकळ ब्राह्मण । सोंवळ्यांत करोनि आले स्नान ।
मिष्टान्नें वाढिलीं त्यांजकारणें । जाहलीं भोजनें सकळांचीं ॥७३॥
विडे दक्षिणा सत्वर । चांगदेव देती आपुल्या करें ।
आणिक आपुल्या घरोघर । उत्सव थोर करिताती ॥७४॥
हळदी कुंकुमें वांटून । सुवासिनी देती वायन ।
पंचारत्या करीं घेऊन । मूर्ति सगुण वोवाळिती ॥७५॥
स्थानभ्रष्ट होतां रामचंद्र । अयोध्येसि लोक चिंतातुर ।
मग विजयी होऊनि येतां रघुवीर । आनंद थोर त्यांसि झाला ॥७६॥
तेवीं सिंहासनीं बैसतां रुक्मिणीपती । क्षेत्रवासियां आनंद चित्तीं ।
घरोघरीं गुढिया उभारिती । साकरा वांटिती निजहस्तें ॥७७॥
अमावास्या प्रतिपदा साचार । निःशेष न दिसे रोहिणीवर ।
मग द्वितीयेस निघतां किंचित कोर । त्यासि सर्वत्र लक्षिती ॥७८॥
तेवीं दोन संवत्सर पर्यंत । पांडुरंग मूर्ति होती गुप्त ।
यास्तव लोकांसि आर्त बहुत । दर्शना येती निजप्रीतीं ॥७९॥
यावरी चांगदेवें साचार । क्षेत्रांत केला जीर्णोद्धार ।
म्हणती धन्य वैष्णव वीर । जगदुद्धारक अवतरला ॥८०॥
एकदा राउळांत जाऊनियां । सद्भावें नमिलें पंढरिराया ।
म्हणे आम्हांसि समाधि घ्यावया । कोणत्या ठायीं योजिलें ॥८१॥
ऐकोनि म्हणे रुक्मिणीकांत । गोदातीर उत्तम बहुत ।
तेथें पुण्यस्तंभ क्षेत्रांत । समाधीस्थ तूं होसी ॥८२॥
आषाढ शुद्ध एकादशी । प्रतिवर्षीं येईन त्या स्थळासी ।
ऐसें स्वमुखें हृषीकेशी । वर चांगयासि देत असे ॥८३॥
आणि तुझें संप्रदायी वंशीक होती । त्यांजला ऐसीच लावीं पद्धती ।
दिंडया पातका घेऊनि हांतीं । कार्तिकीस निश्चितीं येथें यावें ॥८४॥
आणि आषाढी दशमी माझारी । तेथें यात्रेसि येती नरनारी ।
आम्ही येऊं गोदातीरी । तयांसि पंढरी घडेल ॥८५॥
ऐसा वर देतां श्रीपती । चांगया संतोषला चित्तीं ।
मग दोघे शिष्य बोलावूनि प्रीतीं । किर्तन त्यां हातीं करविलें ॥८६॥
वरद पुत्र लवंडयां प्रती । सद्गुरु स्वयें आज्ञा करिती ।
तुम्हीं कार्तिक शुद्ध एकादशीप्रती । अन्न शांती करावी ॥८७॥
सद्गुरु आज्ञा होतांचि निश्चित । अद्यापि तेंचि चालविती व्रत ।
जो गाईच्या अंबियांत निश्चित । वंशी राहत तयाचे ॥८८॥
देवालयाच्या वोवर्या सिद्ध होत । तोंवरी चांगदेव राहिले तेथ ।
तैपासूनि कार्तिकीस तेथ । यात्रा भरत बहु साल ॥८९॥
मस्तक ठेवूनि विठ्ठलचरणीं । आज्ञा मागती तये क्षणीं ।
प्रेमाश्रु वाहती लोचनीं । सद्गद होऊनी बोलत ॥९०॥
म्हणे देवाधिदेवा पंढरीनाथा । मजवर लोभ असों दे आतां ।
तुज वांचोनि रुक्मिणीकांता । मजवर ममता कोण करी ॥९१॥
पांडुरंग म्हणे ते समयीं । मी सर्वकाळ असे तुझें हृदयीं ।
परी आणिक गोष्ट सांगतों कांहीं । तरी चित्त देईं त्या बोला ॥९२॥
तुज षडक्षरी मंत्र सांगीतला बरा । तो उपदेश करी आपुल्या पुत्रा ।
चालवी वंशपरंपरा । परोपकारा कारणें ॥९३॥
संजीवनी मंत्र दीधला जाणा । तो तुजवांचून फळेचि ना कोणा ।
ऐसें सांगतां पंढरीराणा । चांगया चरणा लागतसे ॥९४॥
मग म्हणे हृषीकेशी । आषाढ शुद्ध एकादशी ।
मी येऊनि तया स्थळासी । तुझे समाधीसी पूजीन ॥९५॥
तुझे यात्रेसी येतील भक्त । पंढरीचा महिमा घडेल त्यांतें ।
हे त्रिवाचा मी भाक देत । निश्चय चित्तांत असों दे ॥९६॥
दशमीस दिंडी मिरवणें । एकदशीस हरि कीर्तन।
द्वादशीस खिरापती वाटणें । आज्ञा प्रमाण हे माझी ॥९७॥
ऐसा वर दीधला निश्चित । आतां आपुल्या स्थळासि जाय त्वरित ।
ऐसी ऐकूनिया मात । चरणीं लोळत चांगया ॥९८॥
म्हणे अनाथनाथा श्रीहरी । लोभ असों दे मजवरी ।
मग राही रुक्मिणीस सत्वरी । पुसिलें यापरी चांगयानें ॥९९॥
आज्ञा मागोनि वैकुंठ नायका । चंद्रभागेसि येतसे देखा ।
मग भेटोनियां पुंडलीका । संतां सकळिकां नमस्कारी ॥१००॥
सव्य घेऊनियां पंढरपुर । चांगदेव चालिले सत्वर ।
बोळवावयासि शार्ङगधर । येती साचार लगबगें ॥१०१॥
चंद्रभागेपर्यंत देखा । बोळविला निजभक्त सखा ।
हृदयीं धरोनी एकमेका । सप्रेम सुखा भोगिती ॥२॥
मग मस्तक ठेवूनियां चरणावरी । देवासि म्हणे ते अवसरीं ।
मज समाधि द्यावया गोदातीरीं । यावें श्रीहरी ते ठायीं ॥३॥
ऐसें विनवितां योगेश्वर । अवश्य म्हणे सर्वेश्वर ।
उतरोनि भीमा पैलतीर । पाहे सत्वर माघारें ॥४॥
जैसी कन्या सासर्या जाय । क्षण क्षणा मागें परतोनि पाहे ।
तैसेंच चांगयासि झालें आहे । वियोग न साहे मानसीं ॥५॥
बोळवूनियां निजभक्तासी । राउळीं आले हृषीकेशी ।
चांगदेव आपुले समुदायेंसी । पुण्यस्तंभासी पातले ॥६॥
क्षेत्रासमीप येतां जाण । सामोरे येती गांवींचे जन ।
योगेश्वरासि करोनि नमन । निज प्रीतीनें भेटती ॥७॥
मग निज मंदिरीं प्रवेशोन । केशव मूर्तीस केलें नमन ।
चांगयासि पुत्र दोघेजण । नामाभिधान तें ऐका ॥८॥
ज्येष्ठ पुत्र तो केशव जाण । कनिष्ठासि विठोबा नामाभिधान ।
मग वडिलासि सन्निध बोलावून । म्हणे अनुग्रह घेणें आमुचा ॥९॥
पूजा उपचार सर्व करोनि । त्याचे मस्तकीं ठेविला पाणी ।
षडक्षरी मंत्र तये क्षणीं । त्याज लागोनी सांगीतला ॥११०॥
आम्ही समाधिस्थ झालियावरी । मग तूं विठोबासि अनुग्रह करी ।
कार्तिकीसि पंढरीची वारी । निज निर्धारीं चालविजे ॥११॥
आणि केशवराजाची मूर्ति सगुण । इचें निरंतर करी पूजन ।
आषाढी दशमीस दिंडी मिरवणें । पद्धति संपूर्ण सांगीतली ॥१२॥
ऐशा रीतीं बोधोनि पुत्रास । समाधीस मुहूर्त नेमिला दिवस ।
शके बाराशें सत्तेचाळीस । आणि संवत्सर असे क्रोधन ॥१३॥
ज्येष्ठ शुद्ध सप्तमी भानुवासर । आणि सिद्धयोग पुष्य नक्षत्र ।
भानु सप्तमीचें पर्व थोर । नेमित योगेश्वर समाधी ॥१४॥
मग केशव राजाचे मूर्ती लागुन । षोडशोपचारे पूजिती प्रीतीनें ।
मग करुनियां साष्टांग नमन । देवासि पुसोन चालिला ॥१५॥
टाळ विणे मृदंग घेऊनि । कीर्तन करिती वैष्णव जन ।
पंडित वैदिक सकळ ब्राह्मण । चालिले संपूर्ण क्षेत्रवासी ॥१६॥
समाधि घेतसे योगेश्वर । ऐकोनि यात्रा मिळाली फार ।
विठ्ठल नामाचा करुनि गजर । पूजा पुरस्कार समर्पिती ॥१७॥
दिंडया पताका नानापरी । वाद्यें वाजती मंगळतुरी ।
ऐशा समारंभें ते अवसरीं । सोम तीर्थासि सत्वरी पातले ॥१८॥
गोदातीरी करोनि स्नान । मग सोमेश्वरासि केलें नमन ।
जनीं भरंला जनार्दन । निश्चय पूर्ण बाणला ॥१९॥
म्हणोनि चांगदेव सकळांकारणें । नमस्कार घालीत निज प्रीतीनें ।
म्हणती मजवर कृपा असों देणें । इतुकें वचन बोलिले ॥१२०॥
ऐसें देखोनि सकळ जन । चांगयासि घालिती लोटांगन ।
अश्रुपातें सजळ नयन । म्हणती पुन्हा दर्शन न होय कीं ॥२१॥
मग अश्वत्थाचे तळवटीं जाण । चांगदेवें घातलें पद्मासन ।
आठवितां पांडुरंगाचे चरण । तों मूर्ती सगुण प्रगटली ॥२२॥
मग मानस पूजनीं सायासीं । पूजिले तेव्हां वैकुंठवासी ।
आत्मा नेऊनि ब्रह्मांडासी । स्वदेहासी विसरले ॥२३॥
नामघोषें जयजयकारी । वैष्णव गर्जती ते अवसरीं ।
कीर्तन करोनि सप्रेम गजरीं । भावें श्रीहरी वोवाळिला ॥२४॥
मग करोनि समाधि पूजन । घरासि गेले सर्वजण ।
नित्य यात्रा येतसे दुरुन । विशेष महिमान वाढलें ॥२५॥
नित्यनित्य साचार । ते स्थळीं होय जागर ।
पुराणें सांगती विप्र । आणि आषाढीसि थोर भरे यात्रा ॥२६॥
समाधि घेतल्या निश्चितीं । बारा वर्षे लोटोन जाती ।
तों अद्भुत चरित्र वर्तलें क्षितीं । तें सादर श्रोतीं परिसिजे ॥२७॥
चांगयाच्या ज्येष्ठ पुत्रास । कनिष्ठ बंधूचा उपजला द्वेष ।
महंती असावी आपणास । ऐसें मानस तयाचें ॥२८॥
वडिलीं शिकविली धर्मनीति । कीं उपदेश देई कनिष्ठाप्रती ।
परीं तें नावडे त्याचें चित्तीं । प्रापंचिक स्थितीं तयाची ॥२९॥
द्वादश वर्षें लोटल्यावरी । विठोबा म्हणे ते अवसरीं ।
स्वामींनी आज्ञा सांगीतली बरी । तरी उपदेश सत्वरी मज द्यावा ॥१३०॥
ऐशापरी करीतसे ग्लांती । परी तो नायकेचि दुर्मती ।
होणाराची विचित्र गती । नेणों संचितीं काय असे ॥३१॥
म्हणे षडक्षरी द्यावया मंत्र । तुज सर्वथा नसेचि अधिकार ।
मी वडील बैसलों पटावर । खावोनि भाकर राहे सुखी ॥३२॥
ऐसें निर्भर्त्सोनि त्याजकारण । विठोबाचें चिंतातुर जाहलें मन ।
उपदेश नेदी मजकारणें । म्हणे उपाय काय करावा ॥३३॥
नानाप्रकारें करोनि जाण । करीतसे बंधूचें छळण ।
दृष्टींसी देखतांचि दुरुन । तरी वैरिया समान लेखीतसे ॥३४॥
घेऊनि पूजा पुरस्कार । लोकांसि बोले नम्रोत्तर ।
परी सुहृदांचा द्वेष फार । तेणें अंतर विटाळलें ॥३५॥
ऐसी देखूनि त्याची स्थिती । विठोबा उदास झाला चित्तीं ।
चांगदेव जेथें समाधिस्थ असती । जावोनि ते क्षितीं बैसला ॥३६॥
न घे फळ मूळ अथवा अन्न । मांडिलें बहुत निर्वाण ।
म्हणे स्वामी एकदा चरण । मज कारणें दाखवा ॥३७॥
ऐसे तीन दिवसपर्यंत निश्चितीं । बैसला तेथें अहोरात्री ।
तों चांगदेव येवोनी अवचितीं । दर्शन त्याजप्रती दीधलें ॥३८॥
वेतकुंचा घेऊनि करें । प्रगट दिसती योगेश्वर ।
सावध करोनि निजपुत्र । म्हणे इच्छित वर मज मागें ॥३९॥
ऐसें स्वरुप देखोनि त्याणें । मग साष्टांग घातलें लोटांगण ।
म्हणे स्वामी अनुग्रह देणें । म्हणोनि चरण धरियेले ॥१४०॥
ऐसें विनवितां निजकुमरें । अवश्य म्हणे योगेश्वर ।
तुवां न व्हावें चिंतातुर । जाय सत्वर गृहासी ॥४१॥
तुज अनुग्रह देऊनि निश्चित । सांगूनि देऊं संप्रदाय पद्धत ।
मग मागुतीं होऊं समाधिस्थ । चिंताक्रांत न व्हावें ॥४२॥
ऐसें सांगतांचि योगेश्वरा । विठोबा सत्वर पातला घरा ।
मग उदयासि येतां दिनकरा । समारंभ बरा मेळवीतसे ॥४३॥
दिंडया पताका दशमीचे दिवसीं । घेऊनि आले समाधीपासीं ।
तों चांगदेव देखिले दृष्टीसीं । आश्चर्य सकळांसी वाटलें ॥४४॥
म्हणती समाधि घेतली ज्या अवसरा । त्यासि वर्षें लोटलीं बारा ।
पुढती देखिलें योगेश्वरा । म्हणोनि अंतरां सुख वाटलें ॥४५॥
क्षेत्रांत वृत्तांत कोणी सांगती । कीं चांगदेव प्रगट जाहले पुढती ।
दर्शनासि लोक संपूर्ण येती । नमस्कार करिती सद्भावें ॥४६॥
मग दिंडी मिरवत मिरवत । विठोबा आणीतसे गांवांत ।
कीर्तन करिती विष्णुभक्त । चांगदेवही येत तयासवें ॥४७॥
मग मंदिरास येऊनि सत्वरा । क्रोधें शापिलें ज्येष्ठ कुमरा ।
म्हणे माझी आज्ञा भंगिसी पामरा । तरी निर्वंश खरा करीन मी ॥४८॥
निजकृपेनें विठोबासि पाहीं । अनुग्रह दिधला ते समयीं ।
पुढील भविष्य विचारुनि जीवीं । तेंच सर्वही सांगतीं ॥४९॥
मग म्हणतसे विठोबासी । तुझी वंशपरंपरा वाढेल ऐसी ।
भगवद्भक्त येऊनि पोटासी । आमुच्या व्रतासी चालविती ॥१५०॥
साहा पुरुषपर्यंत । येथें यात्रा मिळेल बहुत ।
महिमा वाढेल अद्भुत । निश्चय चित्तांत असों दे ॥५१॥
मग सातवे पुरुषीं हें व्रत । लोपोनि जाईल कीं निश्चित ।
ऐसें ज्ञानदृष्टींनें भासत । तोही चरितार्थ अवधारी ॥५२॥
सातवा पुरुष भक्तपूर्ण । न करील केशवाचें पूजन ।
यवनाच्या उपद्रवें करुन । समाधि छिन्नभिन्न होईल कीं ॥५३॥
लोक कनिष्ठ होवोनियां । यात्रेसि न येती या ठायां ।
मागुती पुढें जीर्णोद्धार करावया । मी अवतरेन चांगया तुझे वंशीं ॥५४॥
ऐसें भविष्य सांगोनि त्यातें । मागुती झाले समाधिस्थ ।
हें कौतुक देखोनि लोक समस्त । आश्चर्य करिती मानसीं ॥५५॥
म्हणती धन्य योगेश्वराची लीला । द्वादश वर्षां देखिलें डोळां ।
निज पुत्रासि उपदेश केला । दर्शन सकळां देउनी ॥५६॥
त्या विठोबासि पुत्र झाला असे । चांगदेव नाम ठेविलें त्यास ।
त्याणेंही वाढवोनि सत्कीर्ति घोष । महिमा विशेष वाढविला ॥५७॥
त्या चांगयाचा पुत्र पाहीं । त्याचें नांव पिलाजी गोसावी ।
वडिलांचें व्रत चालवूनि तिहीं । सत्कीर्ती बरवी पावली ॥५८॥
त्याचें पोटीं चिद्रत्न । नरहरि गोसांवी नामाभिधान ।
नरहरीचा पुत्र सगुण । जनार्दन नाम तयाचें ॥५९॥
मग जनार्दनाचिये उदरीं । सात पुत्र झाले निर्धारीं ।
पुढें वंशाची कैसी परी । तरी चतुरीं ऐकिजे ॥६०॥
तया सात पुत्रांमाजी देख । मुधोजी नाम होता एक ।
तयासि पांच पुत्र झाले आणिक । संसार सुखें ते करिती ॥६१॥
तयां पांचां माजी केवळ । ज्येष्ठ पुत्र तो गोपाळ ।
त्याचे वेळेस तत्काळ । धर्म सकळ लोपले ॥६२॥
योगेश्वरें भविष्य केलें । तेंच सर्वांच्या प्रत्यया आलें ।
मग पुन्हा चांगदेव अवतरले । कोनेरी ठेविलें नाम त्याचें ॥६३॥
आपुलें सद्वंशीं साचार । पुन्हा घेतला अवतार ।
तो शतायुषी पुण्यवंत नर । भक्तीसि जीर्णोद्धार तिहीं केला ॥६४॥
चांगया समाधि स्थापन । अश्वत्थ वृक्ष लाविले त्याणें ।
तें स्थळीं बांधोनि वृंदावन । मठ संपूर्ण सिद्ध केला ॥६५॥
आषाढ शुद्ध एकादशीप्रती । यात्रेसी पुन्हा जनलोक येती ।
गोदातीरीं स्नान करिती । कीर्तन ऐकती सकळिक ॥६६॥
मग दिंडी घेऊनि सहपरिवारीं । कार्तिकीसी जाती पंढरपुरीं ।
परब्रह्म सगुण विटेवरी । पाहोनि अंतरीं निवतसे ॥६७॥
तो भक्तिज्ञान वैराग्य पुतळा । म्यांही प्रत्यक्ष देखिलें डोळां ।
धन्य संतांची अगाधलीला । भागवत धर्माला अधिकारी ॥६८॥
कोनेर गोसावी नाम तया । परी तो प्रत्यक्ष जाण चांगया ।
जढ मूढांसि उद्धरावया । मनुश्य काया धरियेली ॥६९॥
शामजी गोसावी त्याचा पुत्र । हें चरित्र वदला सविस्तर ।
त्याचीं पदें पाहोनि साचार । आर्ष उत्तरें लिहिलीं ग्रंथीं ॥७०॥
जैसी तैसी अबद्धवाणी । संत सादर ऐकती श्रवणीं ।
जैसें दुग्धमाजी धारवणी । घर चारिणी मेळविती ॥७१॥
निरसें दुग्ध ठेविलें जर । तरीं सकळ कुटुंबासि न पुरे ।
जैसें अज्ञापित रुक्मिणीवर । तितुकींच अक्षरें लिहिलीं ग्रंथीं ॥७२॥
न सोडोनि मुळींचा आधार । दृष्टांत मात्र दीधले चार ।
तेणेंचि ग्रंथ वाढला थोर । सज्ञान चतुर जाणती ॥७३॥
याचकासि आधार दातयाचा । कीं अंधासि आश्रय डोळसाचा ।
तेवीं भक्तलीलामृत बोलतां वाचा । मज संतांचा आधार ॥७४॥
जो दीनदयाळ कैवल्यदानी । पुढें वदवील रसाळ वाणी ।
महीपति त्याचा आश्रय करोनी । सप्रेम मनीं सर्वदा ॥७५॥
स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।
प्रेमळ परिसोत भाविक भक्त । दशमाध्याय रसाळ हा ॥१७६॥अ० १०॥ओव्या १७६॥६॥