श्रीगणेशाय नमः ।
जो अनंत लावण्याची खाणी । सकळ सौंदर्य ज्यापासुनी ।
जो पांडुरंग कैवल्यदानी । करद्वय जघनीं ठेविलें ॥१॥
ज्याचे सत्तेनें सकळ । प्रकाशे चंद्र आदित्य मंडळ ।
तो सगुण रुप धरोनि सांवळें । उभा घननीळ पंढरीसी ॥२॥
चक्षुःश्रवा ज्याचा तल्पक । जो शेषशायी रमानायक ।
तो विटेवरी उभा राहोनि देख । सप्रेम सुख भोगीतसे ॥३॥
ज्याचें ध्यान हृदयसंपुटीं । एकांतीं करीतसे धूर्जटी ।
तो पुंडलीकाच्या भेटीसाठीं । भीमातटीं वास करितसे ॥४॥
अष्टांगयोग साधितां नाना । जो न येचि योगियांच्या ध्याना ।
ज्याच्या इच्छेनें विश्व रचना । नासोनि पुनः पुन्हाः होतसे ॥५॥
विधाता बाळ होऊनि पोटिंचा । सर्वथा पार नेणे ज्याचा ।
तो अंकित जाहला भाविकांचा । पुंडलिकाचा वरदानी ॥६॥
ज्याच्या आज्ञेनें निश्चित । भक्तलीलामृत होत ।
तो आपल्या दासाची रुक्मिणीकांत । सत्कीर्ति प्रख्यात करितसे ॥७॥
मागिले अध्यायीं कथा अद्भुत । चांगदेव जाहले समाधिस्थ ।
द्वादश वर्षे लोटतां तयातें । मागुतीं पुत्रा तें भेटले ॥८॥
आतां पंजाब देशामध्यें जाण । परमज्ञानी नानक सुजाण ।
वैराग्य होतांचि त्याजकारणें । तों आडवें विघ्न एक दिसे ॥९॥
तें म्हणाल जरी कवणे रीतीं । तरी पदरीं बहुत धन संपत्ति ।
ते खर्चेल आतांचि कवणे रीतीं । मग विचार चित्तीं करीतसे ॥१०॥
द्रव्यापासीं अति अनर्थ । द्रव्यापासीं प्राणघात ।
द्रव्य मिळतांचि विरक्त । तरी विषयासक्त तो होय ॥११॥
द्रव्य आशा धरिली जरि । तरी सुखे बंधु होती वैरी ।
द्रव्यें मित्र होतसे दुरी । विकल्प अंतरीं शिरतसे ॥१२॥
द्रव्यापासीं होतसे कुबुद्धी । द्रव्यें भ्रंशे साधकाची बुद्धी ।
द्रव्यासि चोर जपती आधीं । प्राणांत संधी ते करिती ॥१३॥
द्रव्यासि परचक्राचें भय । द्रव्यवानासि राजा नागविताहे ।
द्रव्यवान संसारिक आहे । तरी दरवडा येत यावरी ॥१४॥
द्रव्य आशा धरितां मनें । तरी विरक्तासि निंदिता जन ।
द्रव्य प्रतिग्रह घेतांचि जाण । तरी पदरींचें पुण्य तें वेंचे ॥१५॥
बहुत काय विस्तार । भाविक प्रेमळ वैष्णव वीर ।
त्यांसि द्रव्य मिळतां साचार । पडतसे विसर देवाचा ॥१६॥
द्रव्यवानासि चित्तीं तळमळ । द्रव्य जतन व्हावयाची हळहळ ।
द्रव्यवान अतृप्त सर्वकाळ । विघ्नदायक सबळ द्रव्यचि कीं ॥१७॥
ऐसें म्हणोनि नानक सधन । म्हणे कैसें खर्चेल धन ।
तेव्हां उपाधि विरहित होऊन । श्रीहरि भजन करावें ॥१८॥
ऐसें चित्तीं विचारुनी । मग देवालयासि काम लाविलें त्यांनीं ।
हे अविंध राजें देखोनि नयनीं । द्वेष त्या मनीं उपजला ॥१९॥
कळिकाळ हा दुर्धर केवळ । यवन राजा दुर्बुद्धि खळ ।
देउळें पाडुनी सकळ । न चलेचि बळ कोणाचें ॥२०॥
ब्राह्मण बैरागी विष्णुभक्त । तयांसि उपद्रव करिती बहुत ।
नानकाच्या कानासि आली मात । कीं देऊळें समस्त विध्वंसिली ॥२१॥
ऐकोनि विक्षेप पावलें मन । म्हणे यासि उपाय करावा कवण ।
नानापरीचें त्रिविध जन । प्रकृति भिन्न सकळांच्या ॥२२॥
सृष्टींत अनंत जडजीव किती । त्यांचे स्वभाव नाना रीतीं ।
मनुष्य विष्ठेची चिळस घेती । ते पशु भक्षिती प्रीतीनें ॥२३॥
बचनाग खातां जिवें मरती । हे तो सकळांस असे प्रतीती ।
तरी त्या माजीं जे किडे निपजती । ते कैसे वांचती सुरवाडे ॥२४॥
कोणाचा आहार असे पवन । कोणी प्रीतीनें सेविती अन्न ।
कोणी खावोनि वांचलें तृण । जळापासोन एक होती ॥२५॥
जीव मारोनि सायासें । तमोगुणी ते भक्षिती मांसें ।
जीव जीवाचा आहार असे । संशय नसे यांत कांहीं ॥२६॥
चैतन्य बिंबलें सर्व देहीं । हा सिद्धांतीं निर्णय केला पाहीं ।
परी प्रकृति भिन्नाकार दावी । हेचि नवायी अगाध ॥२७॥
मोहरी कांदा ऊंस सत्वर । एक्याच वाफ्यांत पेरिती नर ।
परी त्याज ऐसें होऊनि नीर । उठे अंकुर बीज ऐसा ॥२८॥
तैशाच परी चैतन्यनाथ । प्रकृति ऐसा देहीं दिसत ।
ज्याचा तया सारिखा होत । आग्रह किंचित करीना ॥२९॥
ज्याचा स्वभाव जैशा रीतीं । आपणहीं धरावी तैसीच स्थिति ।
ऐसा निश्चय करोनि चित्तीं । मग नानक पुसती लोकांतें ॥३०॥
अविंधासि देऊळ नावडे पाहे । द्वेष मनीं उपजत आहे ।
तरी त्याच्या चित्तासि आवड काये । हेंचि लवलाहें सांगावें ॥३१॥
लोक म्हणती तये संधीं । यवनासि आवडे मसीदी ।
तरी ते आपण नेईजे सिद्धि । आग्रह बुद्धी कासया ॥३२॥
हिंदूसि आवडती सगुण मूर्ती । अविंध निर्गुण मसीदी स्थापिती ।
तरी आपण कोणती करावी गती । नानक चित्तीं विचारित ॥३३॥
म्हणे देउळें रचितां मोडिती खळ । आणि मसीदी राहती चिरकाळ ।
तरी यवनाच्या मनींचा भाव केवळ । तेंचि तत्काळ करावें ॥३४॥
ऐसा विचार करुनि बरा । बोलाविलें पाथरट कारेगरां ।
म्हणे आतां मसीदी सिद्ध करा । आज्ञा सत्वरा केली असे ॥३५॥
मसीदीसि काम लाविल्यावर । यवन चित्तीं हर्षले थोर ।
म्हणे नानक द्रव्य वेंचूनि समग्र । होईल फकीर आमुचा ॥३६॥
आपुला संप्रदाय भला साचा । प्रारंभ मांडिला मसीदीचा ।
ऐसेंच खळ बोलती वाचा । भाव अंतरींचा नकळती ॥३७॥
स्वयातीचे लोक निंदिती देख । म्हणती भ्रष्टला नानक ।
देउळें मोडोनि सकळिक । मसीदी अनेक बांधितो ॥३८॥
किंकर्यासि बैसतां दोन घाय । तैसेंचि जीवासि वाटताहे ।
म्हणे आतां उभयतां बैसेल सोय । तैसाचि उपाय रचावा ॥३९॥
मग देउळें मसीदी मोडून । बहुत बांधिले सेतखाने ।
ऐसी युक्त देखोनि जनें । मग सकळ जन हांसती ॥४०॥
हिंदु मुसलमान मिळोनि पाहे । नानकासि म्हणती केलें काय ।
म्हणे उभयतांची होईल सोय । तोचि उपाय म्यां केला ॥४१॥
ज्ञानी निर्गुण लक्षिती कोडें । भक्तांसि आवडे सगुण रुपडें ।
स्वमतेम उभयतां करिती बडबड । परी सर्वथा न निवडे वाद यांचा ॥४२॥
एक म्हणती थोर शंकर । त्यासि उपासि जे निरंतर ।
एक म्हणती मिथ्या विचार । रचिलें चराचर ब्रह्मयानें ॥४३॥
विधातयाची सृष्टी आवघी । हे तों पुराणीं येतसे गाही ।
त्या ब्रह्मयासि ध्यातांचि पाहीं । मनोरथ सर्वही पूर्ण होती ॥४४॥
तंव वैष्णव म्हणती सप्रेम बळें । विधाता विष्णूच्या पोटिंचें बाळ ।
तो देवाधिदेव घननीळ । सर्वकाळ भजावा ॥४५॥
सौर म्हणती सूर्यचि थोर । प्रकाश पाडितो जगावर ।
हा नसता तरी साचार । अंधकार सर्वदा ॥४६॥
याज्ञिक म्हणती तयें क्षणीं । वासव श्रेष्ठ सर्वांहुनी ।
तयाच्या आज्ञे करोनी । मेघ धरणी निववीतसे ॥४७॥
मेघापासूनि अन्न निपजत । अन्नापासोनि निपजती भूतें ।
कर्म कांडाचेनि मतें । याज्ञिक घालिती वाद ऐसा ॥४८॥
कर्म उपासना आणि ज्ञान । विभागित वेदो नारायण ।
तीन कांडेंही महर्षी मिळोन । वेगळीं निवडोन काढिती ॥४९॥
जें कां जयाच्या मुखोद्गत । तोंचि साच तयासि भासत ।
न पाहतांचि सिद्धांत । वाद घालीत परस्परें ॥५०॥
ऐसा त्रिविध जनाचा विचार । बोलों जातां आयुष्य न पुरे ।
आतां सकळ धर्म टाकोनि सत्वर । चित्तीं ईश्वर भजावा ॥५१॥
द्रव्याची उपाधि होती पाहे । तेथेंचि गुंतोनि मन राहे ।
म्हणोनि देवालयाची रचिली सोय । परी ते मनासि न ये यवनाच्या ॥५२॥
त्याच्या मनोगतास्तव साचें । काम लाविलें मसीदीचें ।
तव चित्त क्षोभोनि स्वयातीचें । निंदिती वाचें आम्हांसी ॥५३॥
इकडे आड इकडे विहिर । मग आणिक विचार योजिला सार ।
तुम्हां उभयतांसि साचार । सेतखाने फार बांधिले ॥५४॥
तुम्हां उभयतांच्या उपयोगी पडे । तैसेंचि आम्ही पुरविलें कोडें ।
सेतखाने बांधिलें उदंड । निज निवाडे त्यांत हगा ॥५५॥
नानक बोलतां ऐशा रीतीं । हिंदु मुसलमान दोघे हांसती ।
आश्चर्य करोनियां चित्तीं । मग घरासि जाती आपुल्या ॥५६॥
शुद्ध सात्त्विक वैराग्य बळ । नानकें षड्वैरी जिंकिले सकळ ।
शांति क्षमा होवोनि अचळ । वेष तत्काळ पालटला ॥५७॥
आभरणें ऐसीं लेतसे आंगीं । नव्हे फकीर ना बैरागी ।
दोहींच्या समान मध्यभागीं । ऐसाचि जगीं वेष दावी ॥५८॥
अविनाश भक्ति जे निर्गुण । तेचि स्थापिली असे त्यानें ।
आपणचि स्वरुप होऊन । सकळ देहभान सांडिलें ॥५९॥
आठरा वर्णांचे शेष निश्चिती । सद्भावे कोणी शरण येती ।
कांहीं अनुमान न करितां चित्तीं । अनुग्रहचि देती तयासी ॥६०॥
देखोनि निंदिती जनलोक । म्हणती आपला धर्म टाकिला सकळिक ।
या वेगळा वेष आणिक । घेवोनि सुखें वर्तत असे ॥६१॥
एक म्हणती मंत्रें चळला । म्हणोनि ऐसा विदेही झाला ।
सत्कर्मीं पैका नाहीं लाविला । सेतखाने त्याला आवडती ॥६२॥
उदंड झाले भाग्यवान । हिंदु आणि मुसलमान ।
परी नगरांत सेतखाने बांधिले कोणें । यांजवांचोन सर्वथा ॥६३॥
तंव कोणी एक उत्तर देती । व्यर्थ का निंदितां तयाप्रती ।
हगावयाची अडचण होती । उत्तम युक्ति केली यानें ॥६४॥
बाया बापुडया शौचासि जाती । कोणी न उठवी तयांप्रती ।
तेव्हां नानकासि आशिर्वाद देती । ऐसें दुर्मती एक म्हणे ॥६५॥
संतांचा अघटित विचार । कोणासि न घडेचि साचार ।
ऐसें न जाणोनि पामर । मग दुरुत्तरें बोलती ॥६६॥
परी नानकासि त्याचें सुख दुःख नाहीं । अलक्षीं लक्ष सर्वदाही ।
म्हणोनि देहींच असतां विदेहीं । जनापवाद कांहीं न गणी तो ॥६७॥
वारण जातां बिदींतून । मागें पुढें भुंकती श्वान ।
परी तो तेथेंच न घाली मन । स्थिर गमन चालतसे ॥६८॥
कां आगस्त मुनीसि देखून । समुद्र अट्टाहास्यें करी गर्जन ।
परी तो चित्तीं धरोनि मौन । करीत अनुष्ठान निज निष्ठे ॥६९॥
तेवीं जननिंदेचें येती लोट । शांतिसागरीचें भरिती घोंट ।
काम क्रोंधांचीं मोडली वाट । करणी अचाट तयाची ॥७०॥
असो आतां तये वेळ । स्वयातीचे लोक सकळ ।
अविंध राजा दुष्ट खळ । गेला तत्काळ त्यापासीं ॥७१॥
म्हणती हिंदु धर्म टाकोनि देख । आणिकचि पंथ धरिला नानके ।
तरी तयासि सांगोनि तात्कालिक । स्वधर्म अनेक आचरावें ॥७२॥
ऐसें सांगतां खळ दुर्जन । क्रोधें कांपतसे तो यवन ।
मग मठासि सांगोनि पाठविलें त्यानें । स्वधर्म आपुला चालवी ॥७३॥
नानक रायाचें नायके वचन । साकी पाठविली एक लिहून ।
तेचि ऐका संत सज्जन । सिद्धांत कथन त्यामाजी ॥७४॥
साकी । एक मट्टीके भांडे । वासे कवण शुद्ध कवण पांडे ।
कब कबीरा पढो गायत्री । कब रोहिदास पुराणा ।
कवण वेदसो नामा उद्धरे । जीनो आत्माराम पच्छना ॥१॥
धनपति अवर धना जाट । सेना जातको न्हाई ।
महा पातकी अजामेळ उद्धरो । जिणें पुत्र सौहेत लगाई ॥२॥
झूटे करम करे सो झूटा । हरि सुमरे सो साचा ।
नानक सबनीच सोनीचा । हरि सुमरण सो साचा ॥३॥
ओवी ॥ एक माती पासोन जाण । घागरी वेंळण्या आणि रांजण ।
त्यांत दृष्टि पाहतां उघडोन । तों मृत्तिकेवांचोन अन्य नसे ॥७५॥
तैसे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य याती । शूद्रादिक अठरा वर्ण होती ।
नामें भिन्न परी एक चैतन्य मूर्ती । द्वैत चित्तीं न भासे ॥७६॥
मुकुट कुंडलें कर कंकण । ही वेगळाली नामाभिधानें ।
अंतर दृष्टीनें पाहतांचि जाण । तंव ते सुवर्ण एकचि ॥७७॥
कां वटबीज तो अल्प लहान । परी त्याज पासोनि शाखा पल्लव जाण ।
खोलीं व दृष्टीं विचारोनि घेणें । तरी ब्रह्मरुपपणें विश्व सर्व ॥७८॥
सर्व विष्णुमयं जगत् । हें श्रुति वाक्य असे निश्चित ।
ते मज अनुभवा आली प्रचीत । कल्पना द्वैत नसेची ॥७९॥
श्रीहरीसि रिघतां शरणागत । सकळ स्वधर्म आले त्यांत ।
नामस्मरण करोनि निश्चित । अनंत भक्त उद्धरिले ॥८०॥
कबीर तो जातीचा यवन । गायत्री मंत्र सर्वथा नेणे ।
करितां श्रीरामाचें भजन । ब्रह्मरुप पूर्ण तो जाहला ॥८१॥
रोहिदास तो चर्मक निश्चितीं । शिकला नाहीं पुराण व्युत्पती ।
करुनि श्रीकृष्ण प्राप्ती । तरला क्षिती वैष्णव तो ॥८२॥
नामा तो शिंपी जातीचा पाही । तयासि वेदाचा अधिकार नाहीं ।
हरि कीर्तनेंचि तरला तोही । माया वैष्णवी अनिवार ॥८३॥
धना जाटाचें शेत आलें । न पेरीतांचि उगवले ।
तेणें हरि स्मरणावीण साधन भलें । नाहीं केले सर्वथा ॥८४॥
सेना न्हावी जातीचा नीच । तयासि संकट पडतां साच ।
श्रीहरीनें रुप धरुनि त्याचें । दासत्व रायाचें केलें कीं ॥८५॥
महा पातकी अजामिळ । त्यांचा मांडिला अंतकाळ ।
नारायण स्मरतांचि बाळ । तोही तत्काळ उद्धरिला ॥८६॥
खोटें कर्म करितसे जनीं । तोचि लटका सर्वांहूनी ।
श्रीहरीस स्मरे निशिदिनीं । तरी श्रेष्ठ त्याहोनी अन्य नसे ॥८७॥
पत्र पाहतां यवन भूपती । परम संतोषला चित्तीं ।
परी कांहीं पहावी करामती । म्हणोनि मागुतीं क्रोधावला ॥८८॥
म्हणे मी सार्वभौम नृपनाथ । आमुचें वचन नायके सत्य ।
मग सहस्त्र पठाण पाठविलें तेथें । म्हणे तयाते धरोनि आणा ॥८९॥
ऐसी आज्ञा होतांचि सत्वरी । मग शस्त्रें अस्त्रें घेवोनि करीं ।
रायाचें सैन्य ते अवसरीं । मठा बाहेरी पातलें ॥९०॥
आंत प्रवेशावया निश्चितीं । पठाण चित्तीं विचार करिती ।
हें नानकासि समजलें चित्तीं । मग काय युक्ती करीतसे ॥९१॥
वैष्णवी मायेचें करितां चिंतन । तो अघटित जाहले विंदान ।
प्रगटलें दहा सहस्त्र सैन्य । शस्त्रें आभरणें घेवोनियां ॥९२॥
उल्हट यंत्राचे भडिमार । असंख्यात सोडिती शर ।
रायाचे आले परचक्र । तें भिऊनि सत्वर पळाले ॥९३॥
यवनापासीं पठाण समस्त । जावोनि सांगती वृत्तांत ।
दहा सहस्त्र सैन्य तेथ । अकस्मात प्रगटले ॥९४॥
नानकाच्या मठा बाहेर । येऊनि आम्हांसि दीधला मार ।
ऐसा देखोनि चमत्कार । मग आलो सत्वरा पळोनि ॥९५॥
ऐसें ऐकोनि भूपती । परम अनुतापला चित्तीं ।
म्हणे दुर्जनाची ऐकोनि कुमती । सिद्धपुरुषा प्रतीं छळिलें म्यां ॥९६॥
इतुके म्हणवोनि राजा यवन । हात बांधोनि रुमालानें ।
नानकाच्या मठासि येऊन । केलें नमन सद्भावे ॥९७॥
म्हणे मी अपराधींच पुरा । तुम्हांसि छळिले या अवसरा ।
ते क्षमा करोनि योगेश्वरा । अभय सतरा मज द्यावें ॥९८॥
तुम्ही तिसरा स्थापिला पंथ । तो सुखें करावा संप्रदाय युक्त ।
ऐसें म्हणवोनि नृपनाथा । मंदिरा त्वरित तो गेला ॥९९॥
इतुकी सिद्धाई दाखवितांचि त्यांनीं । बहुत सत्कीर्ति प्रगटली जनीं ।
सकळ वर्णयाती येऊनि । अनुग्रह कानीं संपादिती ॥१००॥
कोणी धनवंत सावकार । त्यांनीं मठ बांधोनि दीधला थोर ।
अन्न शांति होतसे फार । पदार्थ भरपूर ते ठायीं ॥१॥
शिष्य संप्रदायी बहुत जन । परीं प्रपंच्याकडे त्यांचें मन ।
त्यांमाजी निधडे निवडले दोन । नामाभिधान तें ऐका ॥२॥
एकाचें नाम असे सुत्रा । मर्दाना शिष्य तो दुसरा ।
चित्तीं अनुताप धरोनि बरा । सर्व संसारा त्यागिलें ॥३॥
तन मन आणि सकळ धन । केलें सद्गुरुसि अर्पण ।
प्रपंच्याकडे न वळेचि मन । निश्चय परिपूर्ण तयांचा ॥४॥
जाणोनि स्वामींचें मनोगत । सेवेसि तिष्ठती दिवस रात ।
इच्छिला पदार्थ आणोनि देत । कृपा बहुत संपादिली ॥५॥
कांहीं दिवस लोटतांचि जाण । नानक जाहले उदासीन ।
म्हणे थोर उपाधि वाढली गहन । तरी त्याग करणे सत्वर ॥६॥
घराश्रम परिस निश्चित । मठाश्रम दुर्घट बहुत ।
उपाधि टाकितां अधिक वाढत । फळ संचित देतसे ॥७॥
ऐसें म्हणोनि ते अवसरीं । मग तेथोनि निघाले सत्वरी ।
सुत्रासि ठेविलें मठाभीतरीं । मर्दाना बरोबरी घेतला ॥८॥
नानक म्हणतसे आपुलें चित्तीं । मक्केंत आहे श्रीविष्णुमूर्ती ।
ती यवनानें घातली पालथी । वार्ता बोलती जनलोक ॥९॥
तरी आपण जाऊनियां तेथ । दृष्टीनें पाहावा वैकुंठनाथ ।
ऐसें म्हणवोनी चित्तांत । पंथ क्रमित लवलाहें ॥११०॥
गुरु शिष्य मार्गीं चालतां । तों वाटेवर लागली एक सरिता ।
नदी तुंबळ भरोनि जातां । मर्दाना चिंताक्रांत मनी ॥११॥
अलख निरंजन बोलोनि उत्तर । नानक चालती उदकावर ।
शिष्य मागेंचि राहिला दूर । मग जोडोनि कर विनवीतसे ॥१२॥
म्हणे मज तरणोपाय कांहीं । स्वामी सांगिजे लवलाहीं ।
परम भय वाटतें जीवीं । तरेन केवी जळांत ॥१३॥
ऐकोनि सच्छिष्याची ग्लांती । सरिते माजी उभे राहती ।
म्हणे सद्गुरुस्मरण करावें चित्तीं । मग उदक निश्चितीं बुडविना ॥१४॥
ऐकोनि नानकाचे बोल । सद्गुरुस्मरण करीत चाले ।
भांडया इतुकें निर जाहलें । मध्यभागी गेले सरितेच्या ॥१५॥
अलख निरंजन म्हणवोनि । नानक बोलिले तये क्षणीं ।
तयासि घोटया इतुकें पाणी । शिष्य देखोनि विस्मित ॥१६॥
म्हणे मज साधारण मंत्र सांगोन । आणिकचि स्मरण करिती आपण ।
मग सद्गुरुचें स्मरण टाकोन । अलख निरंजन म्हणतसे ॥१७॥
तों एकाएकीं तये क्षणीं । कंठा इतुकें जाहलें पाणी ।
बुडालों बुडालों म्हणवोनि । सद्गुरुलागोनी हांक मारी ॥१८॥
नानक पाहती परतोन । म्हणती करावें सद्गुरु भजन ।
आम्हीं करुं तें तुज कारणें । नये होवोनि सर्वथा ॥१९॥
मग गुरुगुरु म्हणवोनि सत्वरा । मर्दना गेला पैलतीरा ।
स्वामीनें संकेत सांगितला खरा । विश्वोद्धारा लागोनी ॥१२०॥
सद्गुरु सांगती तें करावें । परी त्याज ऐसें आपण न करावें ।
सवेंचि फळ येतसे बरवें । जीवें भावें अनुसरतां ॥२१॥
असो आतां ते अवसरीं । गुरु शिष्य गेले पैलतीरीं ।
म्हणे स्वामींनीं सांगितली बरी । युक्ति थोरी मजलागीं ॥२२॥
समुद्र जीवनीं याच युक्तीं । बेटावरी जावोनि उभयतां बैसती ।
तों मक्केंत अविंधें विष्णूची मूर्ती । घातली पालथी कलियुगीं ॥२३॥
पुढें मसीद करोनि थोर । तेथें ठेविले मुजावर ।
तेथें गेलिया हिंदु फकीर । तरी जीव सत्वर ते घेती ॥२४॥
वेगळी करुनि यवन यात । जरी तेथें गेला विष्णुभक्त ।
तरी श्रीविष्णु मूर्ति उठेल निश्चित । जाऊं न देत यासाठीं ॥२५॥
अटके पासोनि पुढें जाण । बिकों न देती हिरवें अन्न ।
गुरांच्या अस्थि मेळवून । विहिरी बांधोन काढिल्या ॥२६॥
वोहोळ नदींच्या तीरीं पाहीं । हडकें रोवलीं ठायीं ठायीं ।
सिजल्या अन्नावीण पाही । विकत कांही मिळेना ॥२७॥
ऐसें यवनांचें प्राबल्य बहुत । तरी नानक कैसे पातले तेथ ।
हे आशंका वाटेल चित्तांत । तोहीं वृत्तांत अवधारा ॥२८॥
सिद्ध पुरुषाची अकळलीला । अदृश्य जातां न दिसती डोळां ।
यास्तव मक्केंत प्रवेश झाला । गुप्त रुपें प्रगटला ते ठायीं ॥२९॥
मसीदींत मुजावरी ठेविले यवनें । तों नानकासि देखतां आश्चर्य मन ।
म्हणती तुम्ही कोठील कवण । आम्हां कारणें सांगिजे ॥१३०॥
नानक म्हणतसे तयांप्रतीं । ज्यांपासोनि प्रळय उत्पत्ति स्थिती ।
त्या सर्वांचें कारण मीच निश्चितीं । प्रकाश ज्योती अवतरलों ॥३१॥
जो सर्व करोनि अकर्ता । त्रिगुणती तमा ये परता ।
तोचि मी जाण तत्वतां । येथें अवचिता प्रगटलों ॥३२॥
अक्षर तें व्यापक सर्वांत । अक्षर वेगळें मायातीत ।
तोचि मी लोकांच्या हितार्थ । मृत्युलोकांत अवतरलों ॥३३॥
जो निर्गुण निराकार जाण । अवतार धरि भक्ताकारणें ।
तो लीला विग्रही जगज्जीवन । अद्वैतपणें मी असें ॥३४॥
ऐकोनि म्हणती मुजावर । गोष्टी बोलतां थोर थोर ।
आम्हांसि अजमत दाखवाल जर । तरी सत्य उत्तर हें मानूं ॥३५॥
हिंदूंचें दैवतचि विष्णू मूर्ती । ये स्थळीं होती जाण निश्चितीं ।
ती यवन राये घालूनि पालथी । मसीद भिंती रचियेल्या ॥३६॥
सर्वांचें कारण म्हणतां आपण । तरी मूर्ति उलटी करुन दावणें ।
तरीच सत्य मानूं बोलणें । ऐसें तें वचन बोलिले ॥३७॥
हें नानकें ऐकोनि वचनोक्ति । मग विष्णुमूर्तीची करितसे स्तुती ।
जय क्षीराब्धिवासा श्रीलक्ष्मीपती । व्यापक त्रिजगतीं तूं एक ॥३८॥
जय जय हरिहरेश्वरा । विधिजनका दीनोद्धारा ।
तुज वांचोनि चराचरा । वस्तीस थारा नसेची ॥३९॥
रोमरंध्रीं अनंत ब्रह्मांडें । येव्हडें विराट स्वरुप गाढें ।
तो तूं निजभक्तांचे पुरवावया कोडें । सगुण रुपडें होतोसी ॥१४०॥
उत्पत्ति स्थिति निदानें । हीं होत असती तुझीया सत्तेनें ।
तो तूं कळिकाळासि देऊनि मान । लपतोसि भेणें यवनांच्या ॥४१॥
तूं अभक्तांसि देखोनि दीनोद्धारा । होत अससी पाठमोरा ।
आतां आमुची करुणा ऐकोनि सत्वरा । दीनोद्धारा भेट वेगीं ॥४२॥
ऐसी नानाकाची एकोनि स्तुती । उठोनि बैसे श्रीविष्णु मूर्ती ।
सांवळा सुकुमार श्रीपती । शंक चक्र हातीं मंडित ॥४३॥
मानस पूजनीं ते अवसरीं । सर्वोपचारि श्रीहरी ।
दर्शन घेऊनि ऐशा परी । तेथूनि सत्वर निघाले ॥४४॥
ऐसा चमत्कार देखोनियां । मुजावर नानकाच्या पडती पायां ।
म्हणती हा वृत्तांत कळतांचि राया । तरी प्राणा आमुचिया घेईल तो ॥४५॥
म्हणेल हिंदु मनुष्य आलें कोणी । यास्तव मूर्ती बैसली उठोनी ।
आमुच्या जीवासि करितील जांचणी । लागती म्हणोनी पायास ॥४६॥
तूं सर्वात्मक ईश्वर जाण । मनुष्य रुपें अवतार पूर्ण ।
हें सत्यचि भासलें आम्हां कारणें । परी विनंति परिसणें एक आतां ॥४७॥
पहिल्या सारिखी मूर्ति करावी । म्हणजे आम्हासि यातना नव्हे कांहीं ।
ऐसे म्हणवोनि ते समयीं । मुजावर पायीं लागले ॥४८॥
नानक किंचित आग्रह न करी । म्हणे ईश्वर इच्छा प्रमाण खरी ।
मग देवास म्हणे ते अवसरी । पूर्ववत सत्वरी होय आतां ॥४९॥
पुढें म्लेंछ मर्दना कारणें । कल्कि अवतार तुम्हांसि घेणें ।
करोनि धर्माचें संस्थापन । भक्तजन रक्षावे ॥१५०॥
आतां अभक्त यवनासि पाठमोरा । पूर्ववत होई दीनोद्धारा ।
नानकाच्या ऐकोनि उत्तरा । विष्णुमूर्ति सत्वरा निजतसे ॥५१॥
इतुकें चरित्र करोनि सत्वर । तेथोनि निघे योगेश्वर ।
बोट उल्लंघोनि सत्वर । समुद्र नीर उल्लंधिलें ॥५२॥
मार्गीं चालतां वाटेवर । सरितेसि आला अपार पूर ।
तेथें सैन्यासहित साचार । कोंडला नृपवर ते ठायीं ॥५३॥
नानक स्वामीसि देखोनि त्यानें । सद्भावें दृढ धरिले चरण ।
मग कागदाची नौका करुन । त्याज कारणें उतरिलें ॥५४॥
सैन्यासहित भूपती । ऐलतीरीं आला सत्वरगती ।
मग नानकासि करि विनंती । देव मजप्रती भेटवा ॥५५॥
तयासि म्हणे योगेश्वर । जो कां निर्गुण निराकार ।
त्रिगुण रहित सर्वेश्वर । पाहे साचार नृपनाथा ॥५६॥
परब्रह्म गोरें ना काळें । सांवळें ना पिवळें ।
आरक्त ना नव्हे ढवळें । सप्तरंगा वेगळें निरायम ॥५७॥
ज्याच्या सत्तेनें साचार । व्यापार करिती चरणकर ।
अचेतन चेतवी निरंतर । तोचि श्रीधर ओळखावा ॥५८॥
आत्मसत्तेनें नेत्र पाहती । आत्मसत्तेनें श्रवण ऐकती ।
तोचि ओळखे आपुल्या चित्तीं । कासया खंती करतोसी ॥५९॥
घ्राणासि ज्याचेनि सुगंध कळे । जिव्हा जाणेचि रसाळ ।
तो देवाधिदेव घननीळ । देहींच तत्काळ ओळखावा ॥१६०॥
पिंड ब्रह्मांडीं सकळ ठायीं । त्याजवीण सत्ता आणिकाचि नाहीं ।
आपआपणातें समजोनि घेयीं । उपदेश नाहीं या परता ॥६१॥
ऐकोनि नानकाची वचनोक्ती । सद्भावें नमस्कार करी भूपती ।
ह्मणती स्वामीची वचनोक्ती निश्चितीं । बिंबली मजप्रती मनांत ॥६२॥
ऐसें ह्मणवोनि त्या अवसरा । राजा गेला आपुल्या नगरा ।
नानक मर्दानासि घेउनि सत्वरा । पंथ बरा क्रमती ॥६३॥
तों योगियांचा मुगुटमणी । विष्णु अवतार बोलती जनीं ।
तो गोरक्षनाथ तये क्षणीं । अकस्मात नयनीं देखिला ॥६४॥
नानक तयासि आदेश करीत । नानकासि म्हणतसे मत्स्येंद्रसूत ।
तुम्हीं जनांत सिद्धाई दाखविली बहुत । आतां सांगतों कार्यार्थ तो करा ॥६५॥
चार लक्ष यात्रा या अवसरीं । मिळाली असें हरिद्वारीं ।
तितुकीयांसी भोजन दे सत्वरी । योगेश्वर तरी तूं साच ॥६६॥
ऐकोनि गोरक्षाची मात । नानक तयासि अवश्य म्हणत ।
पुढें जावोनि त्वरित । आमंत्रणें सकळातें द्या तुम्ही ॥६७॥
सामर्थ्य पाहावया तेथ । हरिद्वारासि गोरक्ष जात ।
तो नानकें कवतुक केलें अद्भुत । तें ऐका निजभक्त भाविकहो ॥६८॥
चार लक्ष यात्रा ते अवसरीं । मिळाली असे हरिद्वारीं ।
नानक गुप्त रुपें जावोनि सत्वरी । तृप्ती करी सकळांची ॥६९॥
सर्व सिद्धी अनुकूळ असत । इच्छा भोजन सकळांसि देत ।
तों मागुति येवोनि गोरक्षनाथ । आमंत्रण देत तयांसी ॥१७०॥
लोक म्हणती गोरक्षनाथा । नानक सिद्ध येवोनि आतां ।
इच्छाभोजन दीधलें समस्तां । गेला मागुता तीर्थासी ॥७१॥
ऐसी आयिकतांचि मात । आश्चर्य करी मत्स्येंद्रसुत ।
तों नानकही तेथें प्रगट होत । नमस्कार करित गोरक्षा ॥७२॥
परस्परें भेटोनि प्रीतीं । गोरक्ष बहुत करी स्तुती ।
म्हणे तुज ऐसा सिद्ध मूर्ती । त्रिजगतीं दिसेना ॥७३॥
स्वरुप प्राप्तीचें लक्षण । योगेश्वराची जितुकीं चिन्हें ।
तीं तुझ्या अंगीं बाणलीं लेणें । निश्चय पूर्ण कळों आला ॥७४॥
ऐसी गोरक्षें करुनि स्तुती । गगन पंथें उडोनि जाती ।
नानक शिष्यासमवेत सत्वर गती । मठासि येती आपुल्या ॥७५॥
जैसी ईश्वराची लीला । तैशाच योगियांच्या आंगीं कळा ।
दाखवोनि नाना सिद्धींचा सोहळा । दंडन खळां तिहीं केलें ॥७६॥
भक्त अथवा योगेश्वर । ज्यानें दाखविला चमत्कार ।
त्याची सत्कीर्ति वाढे थोर । संप्रदाय इतर चालविती ॥७७॥
नानक पंथी बैरागी निश्चितीं । तद्देशी अद्यापि उदंड असती ।
उपदेश देवोनि जनाप्रती । स्मरणीं लाविती जड मूढां ॥७८॥
संत चरित्र ऐकतां कांनीं । महादोषांची होतसे धुणी ।
तयासि तुष्टोनि कैवल्यदानि । वैकुंठभुवनीं ठेवितसे ॥७९॥
जो दीनदयाळ करुणाकर । अक्षय अभंग रुक्मिणीवर ।
तो महीमतीचें वसवोनि अंतर । वदवीत चरित्र संतांचें ॥१८०॥
स्वस्ति श्रीभक्तिलीलामृत ग्रंथ । श्रवणेचि पुरती मनोरथ ।
प्रेमळ परिसोत भाविकभक्त । एकादशाध्याय गोड हा ॥१८१॥
अध्याय ॥११॥ओव्या॥१८१॥