मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ३७

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ।

नभीं नीळिमा दिसती जया रीतीं । तैसी श्रीहरी तुझी सुंदर कांती ।

मुक्त रत्‍नें मुगुटी झळकती । जैसे बाळ गभस्ती उगवले ॥१॥

शोधीं वसुधारसाचे कवळ । ओतिलें मंडित मुखकमळ ।

अजिनी पत्रां ऐसें निर्मळ । नेत्र विशाळ तळपती ॥२॥

माणिकें बैसोनि हेम कोंदणीं । त्यांचीं कुंडलें वळिलीं दोन्हीं ।

मकराकार तळपती कर्णी । स्थिर गमनीं डोल देती ॥३॥

जैसी महा रत्‍नें बैसविलीं पंक्ती । तैसें दंत वदनी झळकती ।

कौस्तुभाची सतेज दीप्ती । जेवीं कां निशापती उगवला ॥४॥

श्याम तनु घनाकृती । चंदन पातळ चर्चिला निगुती ।

विद्युल्लता चमके जैशा रीतीं । पीतांबर दीप्ती तेविं दिसे ॥५॥

मनगटीं वीरकंकणें घातलीं । उदरीं सुंदर शोभे त्रिवळी ।

भ्रमर पडला रोमावळी । श्रीवत्स नव्हाळी तेचि पै ॥६॥

ठाण साजिरें सुकुमार । कंठीं कोमळ तुळसीचे हार ।

जघनीं ठेविले दोन्ही कर । आणि पाउलें सुकुमार विटेवरी ॥७॥

जें योगियांचें निजध्यान । नीलग्रीवाचें देवतार्चन ।

तो तूं निज भक्‍तांचा रक्षावयासि मान । साकार सगुण पैं होसी ॥८॥

हृदयीं रुप आठवलें सुंदर । तेंचि पत्रीं लिहिलीं अक्षरें ।

आतां मज देऊनि अभयवर । वदवीं चरित्रें संतांचीं ॥९॥

मागिले अध्यायीं कथा गोमटी । तुकयाची सत्कीर्ति ऐकोनि मोठी ।

शिवाजी राजा घेऊनि भेटी । संतोष पोटीं पावला ॥१०॥

चार मास लोटतां तये ठायीं । मागुती आले देहुगावीं ।

चरित्र वर्तलें तेथें कांहीं । तेचि नवायी अवधारा ॥११॥

भीमा शंकरासि जावें पाहीं । पुण्याची यात्रा घेऊनि कांहीं ।

चिंतामणि देव देहुगांवीं । एके समयीं पातले ॥१२॥

तयांसि देखोनि वैष्णवभक्त । सद्भावें घालीत दंडवत ।

परस्परे भेटतां निश्चित । संतोष होत मानसी ॥१३॥

यात्रेकरी बाहेर आले । यास्तव वाणियांनी दीधलीं पालें ।

सर्व साहित्य घेऊनि बैसले । तेव्हां तुकयासि बोले चिंतामणी ॥१४॥

तूं प्रेमळ वैष्णवभक्त । कांहीं प्रसाद द्यावा येथें ।

जरी साहित्य द्याल आम्हांपुरतें । तरी मनोरथ पूर्ण होती ॥१५॥

ऐसी ऐकोनियां वाणी । तुकयासि संतोष झाला मनीं ।

मग सत्वर जावोनि आपुलें सदनीं । साहित्य घेऊनी पातले ॥१६॥

कणीक डाळ तांदुळ घृत । तुकयानें आणिलें एकापुरतें ।

तों सकळ यात्रा येऊनि तेथें । म्हणे प्रसाद आम्हांते कांहीं द्या ॥१७॥

ऐसी देखोनि त्यांची आस्था । संकट पडिलें प्रेमळ भक्‍ता ।

म्हणे देवाधिदेवा रुक्मिणीकांता । साहित्य समस्ता पुरवावें ॥१८॥

ऐसें चिंतिता वैष्णवभक्‍त । गुप्तरुपें येत पंढरीनाथ ।

एकाचें साहित्य पदरीं होतें । तें वाटितां पुरे सकळांसी ॥१९॥

ऐसी देखोनि अघटित करणी । चिंतामणी देव विस्मित मनीं ।

म्हणे सिद्धि न येतां ये ठिकाणीं । कैसी पुरवणी हे झाली ॥२०॥

ऐसें म्हणोनि आपुलें चित्तीं । तुकयासि आलिंगन दीधलें प्रीतीं ।

मग स्वयंपाक करोनि यथास्थिती । तुकयासि पंक्‍तीं बैसविलें ॥२१॥

एक राहोनि जाण । तुकयाचें कीर्तन करी श्रवण ।

अरुणोदय होतांचि पूर्ण । यात्रा येथून चालिली ॥२२॥

तों आणिक एक दुसरा ब्राह्मण । ज्ञानदेवीं जावोनि घेतलें धरणें ।

देखोनि तयाचें निर्वाण । दाखवी स्वप्न सद्‌गुरु ॥२३॥

तुकयाजवळ जावोनि पाहीं । जें देईल तें घेऊनि येयी ।

दृष्टांत होतांचि ते समयीं । मग देहुगांवीं तो आला ॥२४॥

स्वप्नींचा सांगतांचि वृत्तांत । तुकयाचें कंटाळलें चित्त ।

म्हणे हे उपाधि पंढरीनाथें । कासया जनांत वाढविली ॥२५॥

मी तरी अनाथ दुबळा । नेणें सिद्धीची दाखवूं कळा ।

धरणें येतसे वेळोवेळां । त्यांची लीला जाणती ते ॥२६॥

मग धरणेकरियासि म्हणती पाहीं । तूं लोहगांवासि सत्वर जायी ।

शिवजी कांसार तये ठायीं । तो देईल तें घेयी उगाची ॥२७॥

अवश्य म्हणवोनि तो द्विजवर । लोहगांवासि गेला सत्वर ।

वृत्तांत ऐकोनि तो कांसार । विस्मित अंतर तयाचें ॥२८॥

शिवाजी कांसाराचें सदनीं । समाराधना तये दिनीं ।

विडे दक्षिणा देऊनी । सकळां लागोनी तृप्त केलें ॥२९॥

भोजन जाहलिया सत्वर । घरांत नेला तो द्विजवर ।

मग लोहाच्या पासा उचलोनि चार । डोईवर दे तयाच्या ॥३०॥

म्हणे देहूसि जावोनि लवलाहीं । तुकयाच्या दृष्टीसि दाखवीं ।

ब्राह्मण चिंतातुर जीवीं । म्हणे करावें कायी याजला ॥३१॥

दरिद्र विच्छिन्न व्हावया पाहीं । अनुष्ठान केलें ज्ञानदेवीं ।

परी संपत्ति माझे प्राक्तनीं नाहीं । करितील कायी त्याजला ॥३२॥

मस्तकीं वोझें घेतलें जाण । यास्तव दुखोनि आली मान ।

मग कन्हेरे पर्वत दोन । तेथें पासा तीन टाकिल्या ॥३३॥

एक घेऊनि मस्तकावर । देहूसि आला तो द्विजवर ।

एकांतीं तुका वैष्णव वीर । तया समोर उभा ठाके ॥३४॥

प्रेमळभक्‍त पुसतसे पाहीं । तुम्हांसि दीधली दक्षिणा कांहीं ।

पास दाखवितां लवलाहीं । तों कांचन सर्वही तें झालें ॥३५॥

मग तुकाराम बोलती वाचे । हें तुज देणे ज्ञानदेवाचें ।

कोणासि न सांगतां सांचें । संसाराचें कार्य साधी ॥३६॥

ऐसें बोलतां वैष्णववीर । घेऊनि चालिला तो द्विजवर ।

तीन पासा टाकिल्या मार्गावर । जाऊनि सत्वर पाहे तेथें ॥३७॥

जेथें मनुष्यांचें आगमन नाहीं । ठेविल्या होत्या तये ठायीं ।

पाहूं जातां कांहींच नाहीं । मग विस्मित जीवीं होय तो ॥३८॥

मग म्हणे आपुलें प्राक्‍तनीं । होते तेचि आलें घडोनी ।

ऐसें समजोनि आपुलें मनीं । गेला सदनीं ब्राह्मण तो ॥३९॥

आणिक चरित्र रसाळ गहन । मुळाभिंवरा संगमीं जाण ।

तये तीर्थी करावया स्नान । देहूग्रामींहून चालिले ॥४०॥

तों मार्गी ओसाड अरण्य पाहीं । मेंढयांचे खिल्लार होतें तये ठायीं ।

श्वान माजला नावरे कोणाही । मारीत लवलाहीं मनुष्यां ॥४१॥

वाटेसि मनुष्य आले जर । नरडी फोडोनी पीतसे रुधिर ।

त्याचा बोभाट जाहला फार । परी श्वान नावरे कोणातें ॥४२॥

तुकयासि लागतां तेचि वाट । तों श्वान धांवोनि आला नीट ।

परी चिंता भय कांहीं न वाटे । तंव कुतरा निकट पातला ॥४३॥

नरडी धरितां लवलाहीं । तो प्रेमळभक्‍त बोले ते समयीं ।

आम्हांपासीं गुरगुर नाहीं । तूं आपुले देहीं धरिसी कां ॥४४॥

ऐसें बोलतां तुका त्याप्रती । श्वानासि तत्काळ आली शांती ।

उगाच निचिंत पडिला क्षितीं । तों मेंदकेही येती तये ठायीं ॥४५॥

पाहती तों कुतरा धरणीवर । दिसे जैसा पाळीव मांजर ।

सर्वथा न भुंके कोणावर । नवल थोर वाटले त्यां ॥४६॥

मग तुकाराम ते अवसरीं । भजन करीत सप्रेम गजरीं ।

मार्ग क्रमोनियां सत्वरी । भीमातीरीं स्नान केलें ॥४७॥

शिवालयीं बेटावर । एकांतीं बैसले वैष्णववीर ।

ध्यानांत आणोनि रुक्मिणीवर । सगुण चरित्र गातसे ॥४८॥

मध्यान्ह समय होतांचि पाहीं । भिक्षेसि गेले रांजणगांवी ।

तो एका ब्राह्मणचें गृहीं । वैश्वदेव समयीं पातले ॥४९॥

विष्णुभक्तासि देखोनि नयनी । चित्ती संतोषे घरधनी ।

तुकयासि भोजन घालोनि । विनित वचनीं काय बोले ॥५०॥

म्हणे हा पुत्र आठ वर्षाचा । परी अझूनि मुका न बोले वाचा ।

म्हणोनि व्रतबंध राहिला याचा । गायत्री मंत्राचा शब्द न ये ॥५१॥

मग समीप मूल आणूनि त्याचा । म्हणे विठ्ठल विठ्ठल म्हणे कीं वाचा ।

अनुग्रह होतांचि संताचा । पुत्र ब्राह्मणाचा बोलतसे ॥५२॥

मग तुकयासि राहवोनि त्यांनीं । व्रतबंध केला दुसरे दिनीं ।

म्हणती अघटित संताची करणी । मुक्यास वदनीं बोलवितसे ॥५३॥

परतोनि मार्गीं येतां जाण । तों मेंडके बोलती तुक्या कारणे ।

कुतरा गेला कामांतून । यासि घेऊनि ना वेगीं ॥५४॥

पुढें चालतां लागला श्वान । एकादशीस न खाय अन्न ।

ऐके कीर्तन सर्वदा ॥५५॥

यावरी येलवडकर जांवयी । तुकयासि पुसे ऐके समयी ।

मज नित्य नेम सांगा कांहीं । म्हणोनि पायी लागला ॥५६॥

भावार्थ देखोनि तत्त्वतां । मग वाचावयासि दीधली गीता ।

नित्य नेम पारायणकरितां । तें पंढरीनाथा आवडलें ॥५७॥

त्याचें घरीं खेडकर जोशी । आकस्मात आला एके दिवशी ।

म्हणे तूं अशुद्ध गीता वाचितोसी । परी नरकासी जाशी निश्चित ॥५८॥

मालजी गाडयास मानलें वचन । म्हणे मी न वाचीं आजपासुन ।

ऐसा विकल्प घालोनि पूर्ण । मग गेला ब्राह्मण तो घरां ॥५९॥

तंव स्वप्नी येऊनि पंढरीनाथ । जोसियासी शिक्षा काय करित ।

आमुचें चित्त रंजत होतें तेथ । आणि विकल्प व्यर्थ घातला त्वां ॥६०॥

तरी आतां जावोनि त्याच्या घरासी । लावीं गीता वाचावयासी ।

तरीच कल्याण होईल तुजसी । मग शब्द आम्हांसी असेना ॥६१॥

ऐसा दृष्टांत देखोन । परम भय पावला तो ब्राह्मण ।

सकाळीं येलवाडीस जाऊन । म्हणे पारायण करीत जा ॥६२॥

मालजी तयासि उत्तर देत । मी अबद्ध न वाचीं निश्चित ।

मग चार महिने राहोनि तेथ । घोकूं सांगत तयासी ॥६३॥

भावाचा भुकेला रुक्मिणीपती । शहाणपणें शिणल्या श्रुती ।

भाविक अबद्ध वांकुडें म्हणती । त्यांची प्रीती बहु देवा ॥६४॥

यावरी बाळक्रीडेंत शब्दरत्‍नें जाण । श्रीकृष्णाचें मुख मलिन ।

कडिये घेतला यशोदेनें । ऐसें वचन तुकयाचें ॥६५॥

हें देखोनि रामेश्वरभटीं । आपुल्या हातें अक्षरें पालटी ।

मुख म्लान जगजेठी । गीर्वाण गोष्टी मोडली ॥६६॥

मग स्वप्नीं येऊनि पंढरीनाथ । रामेश्वरभटासि काय बोलत ।

तुवां तुकयांचें वचन मोडोनि निश्चित । आपलें मत स्थापिलें ॥६७॥

तरी म्लानमुख व्हावयासि तत्वतां । आम्हासि कायसी होती चिंता ।

बाळपणीं माती खादली असतां । यास्तव मलिनता सहजची ॥६८॥

अवतारा अवतारींच निश्चिती । तुका जिवलग सांगाती ।

जैसें पाहिलें आम्हींप्रती । तैशाच रीतीं वदला तो ॥६९॥

इतुका चमत्कार दाखवून । मग देव पावले अंतर्धान ।

रामेश्वर जागृतीस येऊन । विस्मित मन होय तेव्हां ॥७०॥

जैसी तुकयाची वचनोक्‍ती । तैसें स्वहते करी पुढती ।

कीर्तनीं बैसल्या संतमूर्ती । साकल्य त्यांप्रती सांगीतलें ॥७१॥

यावरी एकदां चैत्रमासीं । तुकाराम चालिले यात्रेसी ।

शंभुचें शिखर पाहावयासी । हेत मानसीं धरियेला ॥७२॥

सवें सोबती दोघेजण । गंगाजी मवाळ ब्राह्मण ।

दुसरा संताजी तेली जाण । वैष्णव जन घेतले ॥७३॥

पंथ क्रमितां भजन करित । रात्रीं मुकामीं कीर्तन होत ।

सातवे मजलीस शिखर दिसत । मग सद्भावें दंडवत घालिती ॥७४॥

कोथळेश्वर पर्वत थोर । त्यावरी वसे पार्वतीवरं ।

तळवटीं क्षेत्र सिंगणापुर । तेथें सरोवर एक असे ॥७५॥

पर्वती उदक नसेचि जाण । यास्तव तळयांत केलीं स्नानें ।

सोबती म्हणती तुकया कारणें । आतां घ्यावें दर्शन शंभूचें ॥७६॥

यावरी म्हणे वैष्णवजन । आधीं शंभूसि घालोनि भोजन ।

मग धाल्या पोटीं घेऊं दर्शन । गुंताकरणें ये ठायीं ॥७७॥

जाणोनि तुकयाचें मनोगत । चौघांचा स्वयंपाक केला तेथ ।

तों नग्न दिगंबराच्या रुपें तेथ । कैलासनाथ पातले ॥७८॥

जटा मुगुट मस्तकीं शोभत । सर्वांगासि चर्चिली विभूत ।

आंगावरी तेज नसे मात । तुंबा हातांत एक असे ॥७९॥

तुकयाप्रती बोले वचन । आम्हांसि येथें घाली भोजन ।

बहुत दिवस क्षुधित जाण । तुझें दर्शन इच्छितसें ॥८०॥

ऐसें बोलतां तो अतीत । अवश्य म्हणे वैष्णव भक्त ।

बैसावयासि देऊनि त्वरित । सद्भावें दंडवत घातलें ॥८१॥

पाकसिद्ध होताचि जाण । चार पात्रें मांडिलीं गंगाजीनें ।

आधीं अतीताचें होऊंद्या भोजन । जेवूं मागून आपण तिघे ॥८२॥

चौघांचें रांधिलें अन्न । तितुकेंही भक्षिलें अतीतानें ।

मग ढेंकर दीधला जाण । आशीर्वचन बोलतसे ॥८४॥

भोंपळाभर पिवोनि जीवन । करशुद्धि घेतली त्यानें ।

मुखशुद्धि विडा भक्षून । म्हणे होईल कल्याण तुकया तुझें ॥८५॥

ऐसें वचन बोलोनि निश्चित । कोथळ पर्वतीं गेला अतीत ।

गंगाजी मवाळ विस्मित होत । तुकयासि बोलत काय तेव्हां ॥८६॥

तुम्हीं बरी सांगितली युक्‍ती । नाहींतरीं क्षुधित राहता अतिथी ।

सामग्री आणावयासि सत्वरगती । संताजीस धाडिती गांवांत ॥८७॥

माशा वोंगती भांडयावर । म्हणोनि वस्त्र झांकिलें तयांवर ।

गांवांतून साहित्य आणिलें सत्वर । तों अद्भुत चरित्र वर्तलें ॥८८॥

स्वयंपाक करावा लवलाहें । गंगाजी भांडीं उघडोनि पाहे ।

तों अन्न तयांत भरलें आहे । अवघेचि ठाय परिपूर्ण ॥८९॥

मग उभयतांसि खूण बाणली चित्तीं । कीं अतीतरुपें जेविला कैलासपती ।

साक्षात दर्शन निश्चिती । धरितां संगती संताची ॥९०॥

मग तो प्रसाद पात्रीं वाढुन । तिघे जेविले निजप्रीतीनें ।

तेव्हां पर्वतावर सत्वर जाऊन । घेतलें दर्शन शंभूचें ॥९१॥

प्रेमभरित ते अवसरीं । कीर्तन केलें महाद्वारीं ।

कावडीचे अभंग सप्रेमभरीं । नानापरी बोलिले ॥९२॥

पंचरात्री क्रमोनि पाहीं । परतोनि गेले देहुगांवीं ।

देहींच तुका जो विदेही । हेचि नवायी अगाध ॥९३॥

एके दिवसीं वैष्णवभक्‍त । अभंग बोलिला कीर्तनांत ।

कीं नामस्मरणें क्रमितां पंथ । त्यासि यज्ञ घडत पदोपदीं ॥९४॥

तों कीर्तनामाजी भाविक पूर्ण । लोहगांवकर होता ब्राह्मण ।

त्यानें चित्तीं विश्वास धरोन । म्हणे अन्यथा वचन हें नव्हे ॥९५॥

एक पाऊल टाकितां निश्चित । सुतळीस स्वहस्तें गांठी देत ।

एक संवत्सर लोटतां यातें । तों चरित्र अद्भुत वर्तलें ॥९६॥

एक गृहस्थ नामांकित असे । परी ब्राह्मण समंध लागला त्यांस ।

मग जावोनि हरीहरेश्वरास । सेवा विशेष पैं केली ॥९७॥

मग समंध सांगे आंगासि येऊन । म्हणे एका यज्ञाचें देशील पुण्य ।

तेव्हां सोडीन तुजकारण । मुक्‍त होईन तत्काळ ॥९८॥

ऐसा निवाडा ऐकोनि कानीं । ब्राह्मण चिंताक्रांत मनीं ।

म्हणे यज्ञ करावया लागोनी । सामर्थ्य ये क्षणीं असेना ॥९९॥

मग देशोदेशीं फिरे द्विजवर । स्वमुखें लोकांसि बोले उत्तर ।

यज्ञ घडला असेल जर । ते सुकृत सत्वर मज द्यावें ॥१००॥

थोर थोर क्षेत्रें पाहिलीं बहुत । परी कोठें न साधे कार्यार्थ ।

तों लोहगांवास अकस्मात । फिरत फिरत पावला ॥१॥

एका यज्ञाचें सुकृत । घडलें असेल जरी कोणातें ।

तरी तें सत्वर द्यावें मातें । परोपकारार्थ ये समयीं ॥२॥

नाम घेऊनि क्रमितां पंथ । पाउला पाउलीं यज्ञ होत ।

गांठीं दीधल्या असती बहुत । त्यानें हे मात ऐकिली ॥३॥

मग समंध्यासी घरीं बोलावून । एक गांठ कापिली त्यानें ।

तें पाणियांत धुवोनि जाण । त्याजकारणें पाजित ॥४॥

नामप्रताप अद्भुत भला । समंधें सोडोनि दीधलें त्याला ।

मग ब्राह्मण अचेतन पडिला । प्रेतवत झाला एक प्रहर ॥५॥

सकळ ग्रामवासी जन । कौतुक पाहती निज दृष्टीनें ।

म्हणती तुकयाचें यथार्थ वचन । दृष्टीनें देखिलें ॥६॥

समंधें पीडिलें ज्यासि थोर । तो सुख पावला द्विजवर ।

बहुतांनीं देखिला चमत्कार । द्रवलें अंतर तयांचें ॥७॥

तुकयाची ऐसी स्थिती । ज्ञान वैराग्य सात्विक वृत्ती ।

त्याहीवरी सप्रेम भक्‍ती । भजन एकांतीं करीतसे ॥८॥

आषाढी कार्तिकी पंढरीसी । नेम न टळेचि यात्रेसी ।

तों अकस्मात एकेचि दिवशीं । व्यथा शरीरासी उद्भवली ॥९॥

शीत ज्वरें करोनि जाण । देह परम जाहला क्षीण ।

म्हणे यात्रेसि आलें महाविघ्न । उपाय कोणता करावा ॥११०॥

गाय देखतां वत्स हुंबरे । कां चंद्रावीण तळमळी चकोर ।

चातक न देखतां जळधर । तेवीं चित्तीं झुरे सर्वदा ॥११॥

मत्स्य तळमळी जळाविण । कीं माते वांचोनि आक्रंदे तान्हें ।

कां कृपणाचें हरपतां धन । न पडे चैन तयासी ॥१२॥

तैसी पंढरीची अंतरता वारी । तुकयासि खेद वाटे अंतरीं ।

मार्गीं चले पाउल भरी । यास्तव अंतरीं झुरतसे ॥१३॥

तुकयाचें सप्रेम कीर्तन । ऐकोनि भक्‍तीसि लागले जन ।

ते चौदाशें पताका घेऊन । पंढरीस जाण चालिले ॥१४॥

तुकया समागमें जावया पाहीं । वारकरी आले देहु गांवीं ।

मग चोवीस अभंग लवलाहीं । पत्र ते समयीं पाठविलें ॥१५॥

यात्रेकर्‍यांसि बोळवावया देखा । बाहेर येतसे प्रेमळ तुका ।

मग कंठ सद्गदित होऊनि देखा । लिहितसे पत्रिका ते समयीं ॥१६॥

तुज विनवावें विठाबाई । ऐसें सामर्थ्य नसेचि देहीं ।

परी धीट होऊनि लवलाहीं । सलगी पायीं करीतसें ॥१७॥

वेदशास्त्रांसि न कळे पार । पुराणीं वदले महर्षि थोर ।

परी तुझ्या चरित्राचा नेणती निर्धार । तेथें मी पामर काय वाणूं ॥१८॥

जैसीं तैसीं अरुष उत्तरें । अंगीकारावीं रुक्मिणीवरें ।

विटेवरी पाउलें सुकुमार । मस्तक त्याजवर ठेविला ॥१९॥

अनंत जडजीव शक्‍तिहीन । पांडुरंगा तूं तयांचें जीवन ।

आणि माझा विसर तुजकारणें । कवण्या गुणें पडियेला ॥१२०॥

कशास्तव पाठविसी मूळ । म्हणवोनि वाटतसे तळमळ ।

चित्तीं झुरतों सर्वकाळ । दीनदयाळ विठाबायी ॥२१॥

येव्हडें संकोची तुझें अंतर । तरी मग कशास व्यालासि पोर ।

ज्याचा जार त्यासीच भार । आणिकासि जो जार तान्हयाचा ॥२२॥

हरिणी दृष्टीसि न पडे पाडसा । तें टुकटुकां पाहे दाहीदिशा ।

मजही तैशीच जाहली दशा । पंढरीशा तुज ठावें ॥२३॥

चातकासि मेघ ओळखतां देख । तृषेनें न पुरे त्याचा शोक ।

मजही तैसें वाटे दुःख । प्रकार अनेक काय सांगों ॥२४॥

कां मातेनें टाकोनि दीधलें तान्हें । तें जनांत दिसे केविलवाणें ।

तैशीच दशा मज कारणें । रुक्मिणीरमण जाणसी तूं ॥२५॥

कां कृपणाचें धन हरपतां सकळ । त्यासि रात्रंदिवस लागतो चळ ।

तैसा तळमळीं सर्वकाळ । हें तूं घननीळ जाणसी ॥२६॥

मत्स्य तळमळी तुटतां जीवन । प्राणांत वोडवे त्याजमागून ।

तैसी दशा मजकारणें । संत सज्जन सांगती तुज ॥२७॥

पायाखालील पायरी । उठूं नेणे चित्तांतरीं ।

तैसें दंडवत श्रीहरी । ये अवसरीं तुज पावो ॥२८॥

नातरी दंडकाठी देतां सोडुनी । निचेष्ठितपणें पडतसे धरणीं ।

तैसें दंडवत चक्रपाणी । तुझिये चरणीं करीतसें ॥२९॥

कां माता न पुरवितां आळ । बाळक धरणीं गडबडां लोळे ।

तैसें दंडवत तुझिया जवळ । सांगती सकळ वारकरी ॥१३०॥

संतांसि सांगे लवलाह्या । तुम्हीं विनवा पंढरीराया ।

काय अन्याय आचरला तुकया । म्हणोनि पायां अंतरला ॥३१॥

कृपा करील रुक्मिणीरमण । तरी मी येईन धांवोन ।

भेटतील संतसज्जन । हर्षे नाचेन कीर्तनीं ॥३२॥

ऐशा रीतीं लेहोनि ग्लांत । संतांसि घातलें दंडवत ।

कंठ जाहला सद्गदित । नेत्रीं अश्रुपात वाहती ॥३३॥

एकमेकांसि नमस्कार । घालिती तेव्हां वैष्णववीर ।

विठ्ठलनामें करोनि गजर । यात्रा सत्वर चालिली ॥३४॥

चौदाशें पताका घेऊनि करीं । पंढरीसि चालिले वारकरी ।

परी तुकयाचा वियोग अंतरीं । म्हणोनि सत्वरी न चालवे ॥३५॥

तुका प्रेमळ अंतरंग । हळुहळू येत मागें मागें ।

म्हणे माझाचि कां आला उबग । श्रीपांडुरंगा तुजलागीं ॥३६॥

ऐसें बोलतां तें अवसरीं । सद्गदित जाहले वारकरी ।

मग तुकयासि पुसोनि सत्वरी । क्षेत्र पंढरी पावले ॥३७॥

टाळ विणे मृदंग घोष । नादब्रह्मचि आलें मुसे ।

कीर्तनीं नाचती विष्णुदास । सप्रेमरसें करोनियां ॥३८॥

दृष्टीसीं देखतां पंढरपुर । चित्तीं संतोष जाहला फार ।

एकमेकांसि नमस्कार । वैष्णववीर करिताती ॥३९॥

एकमेकांसि आलिंगून । मग ओवाळिला रुक्मिणीरमण ।

करोनि चंद्रभागेसि स्नान । पुंडलीकदर्शन मग घेती ॥१४०॥

प्रेमभरित नाचत । क्षेत्र प्रदक्षिणा केली समस्त ।

मग महाद्वारीं जावोनि त्वरित । सद्भावें दंडवत घालिती ॥४१॥

चोवीस अभंग तुकयानें । पत्र दीधलें होतें लेहून ।

ते गरुडपारीं करितां कीर्तन । देवासि वाचून दाखविती ॥४२॥

आधींच तुकयाचीं सप्रेम उत्तरें । आदरें गाताति वैष्णववीर ।

भाविक ऐकोनि श्रवणद्वारें । नेत्रीं नीर वाहे त्यांच्या ॥४३॥

कीर्तन करोनि ऐशा रीतीं । मग ओवाळिला रुक्मिणीपती ।

लोटांगणें घालोनि प्रीती । दर्शना जाती विठोबाच्या ॥४४॥

पत्र घेऊनि आले कोण । परिसा त्यांचीं नामाभिधानें ।

रामेश्वरभट्ट थोर ब्राह्मण । जो अन्याय शरण तुकयासी ॥४५॥

गंगाधर मवाळ कडुसकर । आणि संतातेली वैष्णववीर ।

आणिक वारकरी असती फार । ते ग्रंथीं कोठवर ल्याहावे ॥४६॥

तुकयाचें पत्र घेऊनि हातीं । अंतर गाभारा प्रवेशती ।

तों विटेवरी देखिला रुक्मिणीपती । जघनीं शोभती करकमळें ॥४७॥

जे का परब्रह्ममूर्ति सगुण । पाहतांचि देती आलिंगन ।

चरणावरी मस्तक ठेवून । मागुतीं वदन विलोकिती ॥४८॥

पुढें पत्र ठेवोनि सत्वरी । निरोप सांगती ते अवसरीं ।

तुकयासि अवकाश नाहीं श्रीहरी । म्हणोनि येथवरी न चालावे ॥४९॥

भक्‍तवत्सला करुणामूर्तीं । पत्र लिहिलें तुजप्रती ।

अंतरसाक्ष तूं चैतन्यमूर्ती । सांगणें तुजप्रती नलगेची ॥१५०॥

ऐसा निरोप ऐकोनि कानीं । सद्गदित जाहले चक्रपाणी ।

जवळ बोलावूनि रुक्मिणी । कैवल्यदानी काय म्हणे ॥५१॥

तुका माझा निजभक्‍त जाण । अवकाश नाहीं त्याजकारणें ।

यास्तव पंढरीस न होय येणें । पत्र लेहोन पाठविलें ॥५२॥

आतां आपण निजांगें तेथवर । जावोनि घ्यावा समाचार ।

ऐसें पुसतां सारंगधर । रुक्मिणी उत्तर काय बोले ॥५३॥

तुम्हांसि पाहावया जगजेठी । भाविक भक्त पातले भेटी ।

सगुणरुप न पडतां दृष्टीं । होतील कष्टी भक्तराज ॥५४॥

तरी गरुडासि पाठवूनिया अवसरीं । तुका आणावा येथवरीं ।

ऐसें ऐकोनि श्रीहरी । मग आज्ञा करी खगेंद्रा ॥५५॥

विनतासुतासि सारंगधर । म्हणे आतां देहूसि जाय सत्वर ।

तुकयासि बैसवूनि पाठीवर । आणि येथवर भेटावया ॥५६॥

ऐसें सांगतांचि श्रीहरी । गरुडें आज्ञा वंदिली शिरीं ।

नमस्कार करोनि सत्वरी । मग फडत्कारीं चालिला ॥५७॥

निमिष न लोटतांचि सत्वर । खगेंद्र पातला देहु क्षेत्र ।

तों तुका प्रेमळ वैष्णववीर । गांवा बाहेर उभा असें ॥५८॥

वारकरियांसि बोळविलें जेथें । तेथेंचि उभा वैष्णवभक्त ।

देहभान तों नाहीं किंचित । वाट पहात पंढरीची ॥५९॥

सप्रेम आठवितां पंढरीराया । ब्रह्मरुपची जाहली काया ।

तरी अद्वैत बोध नावडेचि तया । प्रेमळ तुकया भक्तराज ॥१६०॥

जैसा वृक्षाचा खुंट साचार । न चाले न हाले आणुमात्र ।

तैसें तुकयाचें शरीर । मार्गावर दिसतसे ॥६१॥

हें खगपतीनें देखोनि नयनीं । मग विस्मित होय अंतःकरणीं ।

मग हळूच उतरोनि मेदिनीं । मधुर वचनीं बोलतसे ॥६२॥

सावध करोनि तुकया याप्रती । देवाचें पत्र दीधलें हातीं ।

म्हणे तुझ्या वियोगें रुक्मिणीपती । करीतसे खंती मनांत ॥६३॥

तुझें शरीर शक्तिहीन । म्हणोनि पंढरीसि न झालें येणें ।

मज आज्ञा केली रुक्मिणीरमणें । तुजकारणें आणावया ॥६४॥

ऐसें बोलतां विनतासुत । तों तुकया जाहला सद्गदित ।

देवाचें पत्र वाचोनि पाहत । तें ऐका निजभक्‍त भाविकहो ॥६५॥

वैकुंठ कैलास आहे जोंवरी । चिरंजीव तुका असे तोवरी ।

आणि माझें ऐश्वर्य चराचरीं । तूंचि अधिकारी तयाचा ॥६६॥

माझा वियोग न साहे तुज । तैसेंच येथें जाहलें मज ।

म्हणोनि येथें आणावया तुज । गरुडासि आज पाठविले ॥६७॥

तरी बैसोनि याच्या पाठीवरी । दृष्टींसी पाहे क्षेत्र पंढरी ।

तेणें सर्वथा होय अंतरीं । अनमान न करीं संतोष ॥६८॥

पत्र वाचोनि वैष्णवभक्त । नेत्रीं वाहती अश्रुपात ।

मग गरुडासि काय बोलत । हें मी अनुचित केविं करुं ॥६९॥

तूं तरी स्वामीचें वहान थोर । मी तरी सेवक पादुकाधर ।

सोन्याचा पोल्हारा जाहला जर । तो मस्तकावर घेऊं नये ॥१७०॥

माझी अवस्था सांगूनि तया । येथें आणावें पंढरीराया ।

म्हणोनि गरुडाचिये पायां । प्रेमळ तुकया लागतसे ॥७१॥

निजभक्‍ताचें जाणोनि अंतर । तेथूनि निघाला खगेश्वर ।

मग पंढरीसि येऊनि सत्वर । केला नमस्कार देवासी ॥७२॥

सकळ वृत्तांत सांगितला हरी । तुका न बैसे मजवरी ।

परी तुमची वाट पाहतसे बरी । उभा बाहेरी तिष्ठत ॥७३॥

ऐसेम ऐकोनि जगजेठी । सद्गदित जाहले कंठी ।

तेव्हां रुक्मिणीसीं बोले गोष्टी । आतां जावें भेटी तुकयाच्या ॥७४॥

असो चार दिवस लोटलियावरि । वैष्णव गेले गोपाळपुरीं ।

काला करोनि सप्रेम गजरीं । स्वानंद भरीं डुल्लती ॥७५॥

ऐसा महोत्सव जाहलिया पाहे । फुटला यात्रेचा समुदाय ।

देवासि पुसोनि लवलाहें । बोलती काय वारकरी ॥७६॥

देवाधिदेवा रुक्मिणीवरा । जावें तुकयाच्या समाचारा ।

ऐसें म्हणवोनि त्या अवसरा । आपुल्या घरा चालिले ॥७७॥

पंथ क्रमितां नित्य नित्य । देहूसि वारकरी आले समस्त ।

तों तुका बोळवीत आला पंथ । उभाचि तेथें असे कीं ॥७८॥

निढळावरी ठेवूनि कर । वाट पाहत निरंतर ।

देखोनि विस्मित वैष्णववीर । म्हणती ऐसा निर्धार नव्हे कोणा ॥७९॥

श्रीहरी कीर्तन करितां स्वयमेव । काया ब्रह्मचि जाहली सर्व ।

तरी न सोडीच सप्रेमभाव । ऐसा वैष्णव कोण असे ॥८०॥

राजा घालोनि लोटांगण । गांवा मोकासे घ्याजी म्हणे ।

परी घेतले नाहीं तुकयानें । निष्काम मनें सर्वदा ॥८१॥

लोहपासा पाहतां नयनीं । कांचन जाहलें तत्‌क्षणीं ।

परी कांतेवरी नाहीं फुटका मणी । विटाळ मानि सोनियाचा ॥८२॥

चालता पाऊल पडे जेथें । अष्टसिद्धि ओळंगती तेथें ।

परी एका दिवसाचें धान्य किंचित । घरीं निश्चित न ठेवीं ॥८३॥

असो आतां पंढरीहून । वारकरी आले परतून ।

तें तुकयानें दृष्टीसीं देखोन । लोटांगण घाली तयां ॥८४॥

रामेश्वरा ऐसा ब्राह्मण पाहीं । म्हणवी तुकयाचा संप्रदायी ।

त्यासि लोटांगण घालितसे विदेही । महती नाहीं किंचित ॥८५॥

आपुला शिष्य देखोनि । तयासि देवासमान मानी ।

तोचि जगद्‌गुरु पूर्ण ज्ञानी । अद्वैत भजनीं निघाला ॥८६॥

जैसें अंमळ मिळतां पाणी । तें समुद्र आपुल्या समान मानी ।

कां हिंगण चंदन काष्ठें दोन्हीं । पडतां कृशानीं सारिखीं त्या ॥८७॥

तैसा तुकयाचा सप्रेम भाव । अपूज्य पूज्य नाठवे सर्व ।

सेवक म्हणविती जीवें भावें । तेही देवचि भासती ॥८८॥

असो तयाचा भक्‍ति प्रेमा । निरुपमासि कैंची उपमा ।

ज्याणें वाढवोनि भक्‍ति महिमा । पुरुषोत्तमा वश्य केलें ॥८९॥

वारकरी आलिया परतोन । तयांसि घाली लोटांगण ।

परस्परें देती आलिंगन । निजप्रीतीनें तेधवां ॥१९०॥

प्रसाद देती वारकरी । तो आवडीनें सेवित ते अवसरीं ।

म्हणे सुखी आहेत कीं श्रीहरी । टाकिलें दुरी मज येथें ॥९१॥

उत्साह जाहला कैशा रीतीं । तो साकल्य वृत्तांत भक्त सांगती ।

तुम्हांसि भेटावया रुक्मिणीपती । सत्वरची येती आज येथें ॥९२॥

इतुका निरोप कर्ण संपुटीं । ऐकतां बांधिली शकुन गांठी ।

भेटीचें आर्त बहुत पोटीं । म्हणे चाल जगजेठी सत्वर ॥९३॥

ऐसें म्हणवोनि वैष्णववीर । निढळावरी ठेविला कर ।

वाट पाहे धरोनि धीर । करुणा स्वरें आळवोनी ॥९४॥

तुकयाचा निश्चय देखोनि अंतरीं । मग गांवांत प्रवेशले यात्रेकरी ।

जावोनियां आपुल्या घरीं । प्रपंच व्यापारीं गुंतलें ॥९५॥

पत्र पाठवितां पंढरीस । तुका तेथेंच उभा असे ।

मागें अभंग एकुणवीस । वैष्णवदास बोलिला ॥९६॥

त्याचा प्रयत्‍न करोनि समस्तीं । वचन ध्यानासि आणिजे संतीं ।

पुढेंही वाट पहातसे प्रीतीं । म्हणे रुक्मिणीपती कां न ये ॥९७॥

कोणत्या निजभक्‍ताची पूजा । घेत बैसलासि गरुडध्वजा ।

तेथेंचि प्रेमा गुंतला तुझा । आणि विसर माझा पडिला कीं ॥९८॥

का आणिक संकट घातले कोणी । तेथें गुंतलासे चक्रपाणी ।

आणि माझा विसर पडिला मनीं । टाकिलें वनीं एकटें ॥९९॥

ऐशा रीतीं प्रेमळ तुका । चित्तीं आठवी वैकुंठनायका ।

तों गगनीं झळके गरुडटका । निजभक्‍त सखा येतसे ॥२००॥

खग वहनीं वैकुंठपती । अकस्मात उतरले क्षितीं ।

पीतांबराची झळके दीप्ती । तेणें गभस्ती लोपला ॥१॥

ठाण साजिरें सुकुमार । जवनीं शोभती दोन्ही कर ।

दिव्य कुंडलें मकराकार । श्रीमुख मनोहर हरीचें ॥२॥

दिव्य कौस्तुभ वैजयंती । मयूर पिच्छे शिरीं असती ।

तुळसी हार गळा मिरविती । देखितां विश्रांती होय जीवा ॥३॥

रुक्मिणीसहित सारंगधर । उभा तुकयाचे समोर ।

चहूं भुजीं करुणाकर । आलिंगन सत्वर दे तान्हयाकारणें ।

हृदयीं धरीत निजप्रीतीनें । तैशाच रीतीं जगज्जीवन ।

तुकया कारणें संबोखी ॥६॥

पुढिले अध्यायीं रसोत्पत्ती । वदविता श्रीरुक्मिणीपती ।

श्रोतयांसि विनवी महीपती । श्रवनीं सद्भक्‍ती असों द्या ॥७॥

स्वस्ति श्रीभक्‍तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविकभक्‍त । सदतिसावा अध्याय गोड हा ॥२०८॥अध्याय ३७॥ओव्या॥२०८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP