श्रीगणेशाय नमः ।
बहुत साधनें ऐकीलीं श्रवणीं । परी तीं न होती मजलागुनी ।
मग संतांचिये निजस्तवनीं । रंगली वाणी सद्भावें ॥१॥
एक योगयाग करिती पाठ । व्रतें आचरती कोणी श्रेष्ठ ।
मी विष्णुभक्तांचा होऊनि भाट । सत्कीर्ति उत्कृष्ट गातसें ॥२॥
ते आपुले कृपेनें निश्चित । चरित्रें लिहविती मज हातीं ।
येर्हवीं मी अज्ञान मंदमती । हें लोक जाणती सर्वत्र ॥३॥
जो देवाधिदेव रुक्मिणीवर । त्याचें हातीं असे सूत्र ।
तो आपुल्या दासांचीं चरित्रें । राजीवनेत्र वदवीतसे ॥४॥
कळा हीन चातुर्य हीन । अक्षर वटिका मेळवूंच नेणें ।
बुद्धीचा चालक जगज्जीवन । त्याचें कारण तोचि जाणें ॥५॥
मागिलें अध्यायीं कथा सुंदर । श्रीतुकाराम वैष्णव वीर ।
त्याचें चरित्र सविस्तर । ऐकिलें साचार सज्जनीं ॥६॥
आतां विजापूरामाजी साचार । केशव स्वामी भक्त थोर ।
जो भक्तिज्ञानांसि आगर । वैराग्य भरतो अंगीं ॥७॥
श्रीपांडुरंगाचें उपासन । यथाविधि करिती अर्चन ।
आणि सर्वकाळ नामस्मरण । सगुण ध्यान अहर्निशी ॥८॥
आत्मज्ञान असोनि अंतरीं । जो साकार मूर्तीसी प्रेम धरी ।
ऐसें दुर्लभ चराचरीं । धुंडितां धरिगीं नाढळती ॥९॥
स्वरुपें सुंदर लावण्यासरिता । त्याहीवरी पतिव्रता ।
विरळा दृष्टींसी धूंडोनि पाहतां । नसती बहुता या रीती ॥१०॥
भक्तिज्ञान वैराग्यपूर्ण । हें केशव स्वमीचे अंगीं भूषण ।
कवित्व बोलती प्रसाद वचन । ऐकतांचि श्रवण सुखावती ॥११॥
दया परिपूर्ण सर्वांभूतीं । आत्मवत् विश्व आली प्रचीती ।
त्या अनुभवाचे उद्गार येती । कीर्तनीं बोलती तेंचि वचन ॥१२॥
आषाढी आणि कार्तिकमासीं । येत असती पंढरीसी ।
नेमें वारी चालविती ऐसी । सप्रेम मानसीं सर्वदा ॥१३॥
कीर्तन करिता वैष्णव वीर । तेथें रंग येतसे फार ।
जनांत प्रतिष्ठा वाढली थोर । मानिती सर्वत्र तयासी ॥१४॥
कृपेनें पाहतां जगज्जीवन । तयासि मानिती सर्वत्र जन ।
विश्वोद्धार करावया पूर्ण । अवतार सगुण धरियेला ॥१५॥
जनांत प्रशंसा वाढली बहुत । तेणेंचि कंटाळलें चित्त ।
मग कोणासि पुसतां निश्चित । अर्ध रात्रीं निघत तेथोनियां ॥१६॥
चित्तीं हेत धरिला पूर्ण । आतां श्रीकृष्णातीरीं करावें स्नान ।
ऐसें म्हणवोनि वैष्णव जन । करितसे गमन तेधवां ॥१७॥
मार्गीं चालतां अति त्वरित । भजन करित प्रेमयुक्त ।
तों बाळकरुपें पंढरीनाथ । खांद्यावर बैसत तयाच्या ॥१८॥
नानापरीचीं पदांतरें । विष्णुभक्त गातसे चरित्रें ।
देव बैसोनि खांद्यावर । सप्रेमभरें ऐकती ॥१९॥
मार्गीं चालतां साचार । तों शेतकरी बैसला माळ्यावर ।
त्याणें देखिलें बाळक सुंदर । खांद्यावर बैसलें ॥२०॥
सगुण रुप पाहतांचि जाण । त्याचें तत्काळ वेधलें मन ।
रुपीं गुंतले असती लोचन । ते स्वामी निघोन दूर गेले ॥२१॥
जीवीं चटपट लागली पाहीं । म्हणे ऐसें बाळक देखिलें नाहीं ।
उचलोनि धरीलें असतें हृदयीं । तरी संतोष जीवीं वाटता ॥२२॥
कुणबियासी दर्शन झालें रोकडें । तें रुप आठवी दृष्टीपुढें ।
अन्न उदक न लगेचि गोड । निज निवाडें लक्षीतसे ॥२३॥
इकडे केशवभक्त ते अवसरीं । सत्वर गेले कृष्णातीरीं ।
अनुताप धरोनि निजांतरीं । स्नान करीतसे ते ठायीं ॥२४॥
तीन रात्री क्रमोनि तेथ । परतोनि येतसे विष्णुभक्त ।
तों कुणबी मार्गीं वाट पाहत । वेधलें चित्त तयाचें ॥२५॥
केशवभक्तासि देखोनि नयनीं । नमस्कार केला जोडोनि पाणी ।
मग हात जोडोनि तये क्षणी । अमृतवचनीं बोलत ॥२६॥
म्हणे स्वामी गेलेति याचि पंथे । तेव्हां खांद्यावर बाळक होतें ।
तें स्वरुपें सुंदर असे बहुत । वेधलें चित्त देखता ॥२७॥
तें कोठें टाकूनि आलेति आतां । नेत्र शीणले वाट पाहतां ।
ऐकोनि कुणबियाची वार्ता । विस्मित चित्तांत मग होती ॥२८॥
म्हणती आम्हीं खांदीं बाळक पाहीं । कोणाचें कधीं घेतलें नाहीं ।
कृषीवळ सांगतसे कायी । विस्मित जीवीं जाहले ॥२९॥
पुढें अरण्यांत जाऊनि सत्वर । एकांतीबैसे वैष्णववीर ।
मग एकाग्र मन करोनि स्थिर । झांकिले नेत्र तयानें ॥३०॥
म्हणे पंढरीनाथा देवाधिदेवा । मी निरंतर करितों तुझी सेवा ।
ऐसें असतां कमळाधवा । दर्शन केव्हां न देसी ॥३१॥
आणि बाळक रुप धरुनि साकार । बैसलासि माझ्या खांद्यावर ।
रानवट कुणबी माळ्यावर । भेटलासि साचार त्यालागीं ॥३२॥
तुजसी भाव धरितां श्रीहरी । तया पासोनि पळतोसि दुरी ।
आणि अभक्त द्वेषी जे अंतरीं । तयां समोरी तिष्ठसी तूं ॥३३॥
रांगतां काच बद्धभूमीवर । यशोदेसि न दिससी राजीव नेत्र ।
आणि कंस द्वेषी दुराचार । तयाच्या समोर सर्वदा ॥३४॥
ऐसा तुझा स्वाभाविक गुण । आर्तवंताच्या पुढें लपणें ।
आता टाकोनि निर्गुणपण । देयीं दर्शन मज देखा ॥३५॥
जरी तूं न येशील आतां । तरी मी प्राण त्यागीन सर्वथा ।
ऐसा सप्रेम धांवा करितां । हें रुक्मिणीकांता जाणवलें ॥३६॥
मग सगुणरुपें साक्षात श्रीहरी । प्रगट झाले ते अवसरीं ।
केशव पाहे उघडोनि नेत्रीं । तों वैकुंठ विहारी देखिला ॥३७॥
सांवळा सुकुमार रुक्मिणीरमण । कानीं कुंडलें दैदीप्यमान ।
दिव्य पीतांबर झळके पूर्ण । त्या तेजें नयन झांकती ॥३८॥
जें योगियाचें निज ध्यान । नीलग्रीवाचें देवतार्चन ।
तो केशव स्वामिसि हृदयीं धरोन । अमृत वचन बोलतसे ॥३९॥
म्हणे तूं कृष्णातीरासि जात असतां सत्वरी । तेव्हां मीच बैसलों खांद्यावरी ।
परी तुज देहभान नाहीं अंतरीं । यास्तव नेत्रीं न पाहिलें ॥४०॥
आतां विजापुरासि येऊन सत्वर । कीर्तन करावें निरंतर ।
तीच माझी पूजा साचार । आन विचार करुं नको ॥४१॥
इतुकें तयासि बोलोनि वचन । देव पावलें अंतर्धान ।
कीं निजभक्ताचें हृदयभुवन । वस्तिस्थान तें केलें ॥४२॥
श्रीहरीच्या वचनानि देऊनि मान । विजापुरासि आले परतोन ।
भाविक प्रेमळ तेथीचे जन । संतोष मनें त्यांसि झाला ॥४३॥
तों चरित्र वर्तलें एक अघटित । तें श्रवण करावें देऊनि चित्त ।
एक सावकार होतां नगरांत । तो असे धनवंत सदा सुखी ॥४४॥
रौप्य मुद्रा पन्नास सहस्त्र । खर्चोनि त्याणें बांधिलें मंदिर ।
ग्रह शांति करोनि सत्वर । दानें द्विजवर तोषविले ॥४५॥
परी त्या हवेलीमाजी जाण । ब्रह्मराक्षस शिरले दोन ।
घरधनी निद्रित होतांचि पूर्ण । त्यासि बाहेर उचलोन टाकिती ॥४६॥
पिशाचाचें भय फार । सावकारें त्यजिलें तें घर ।
पूर्वस्थळीं राहिला सत्वर । मुलें लेंकरें घेऊनी ॥४७॥
ब्रह्मराक्षस निघावया कारणे । करविलीं तीव्र अनुष्ठानें ।
परी कांहींच उपाय न चले जाण । मंत्रज्ञ ब्राह्मण पीडिती ॥४८॥
पंचाक्षरी घेऊनि विभूती । द्वारा बाहेरुनि फुंकिती ।
सदनीं प्रवशतां तयांप्रती । बांधोनि टाकिती राक्षस ॥४९॥
ऐसे उपाय केले फार । परी अवघ्यांचे बौद्ध जाहले मंत्र ।
तंव कोणी जाऊनि भाविक नर । सांगती विचार सावकारा ॥५०॥
म्हणती केशवस्वामी वैष्णव पूर्ण । त्यासि विनवावें कर जोडून ।
हवेलींत करावे कीर्तन । तेणें पिशाच पळोनि जातील ॥५१॥
ऐसी सांगतां विवेक नीती । सावकारासि मानली वचनोक्ती ।
मग केशवस्वामीसि करोनि विनंती । कीर्तनासि आणिती ते ठायीं ॥५२॥
समुदायेंसी वैष्णव वीर । ते स्थळीं चालिले सत्वर ।
टाळ मृदंग वाजती सुस्वर । नादें अंबर कोंदलें ॥५३॥
दिंडया पताका बहुवस । करील चालिले कीर्तन घोष ।
नादब्रह्मचि आलें मुसें । नामघोषें गर्जती ॥५४॥
रामकृष्ण हरी गोविंदा । अच्युता अनंता आनंदकंदा ।
परमपुरुषा सच्चिदानंदा । श्रीमुकुंदा जगद्गुरु ॥५५॥
ऐसीं नामें बहुवस । प्रेमें गातसे केशवदास ।
मंदिरीं प्रवेशतांचि त्यास । तों ब्रह्मराक्षस पुढें आले ॥५६॥
हात जोडोनि मधुरोत्तर । बोलते जाहले पिशाचनर ।
तुझ्या दर्शनमात्रें साचार । जाहला उद्धार आमुचा ॥५७॥
ऐशा रीतीं बोलोनि वचन । मग पावते झाले अंतर्धान ।
आश्चर्य करिती सकळ जन । कौतुक दृष्टींसीं देखोनी ॥५८॥
हें सकळ क्षेत्रांत जाहलें श्रुत । कीर्तनासि आले लोक बहुत ।
मनुष्य न माय वाडियांत । दाटी बहुत जाहली ॥५९॥
केशव स्वामीचीं प्रसाद वचनें । श्रवण करिती सभाग्य जन ।
नाम रुपीं जडलें मन । तन्मय होऊन राहिले ॥६०॥
श्रीरामकृष्ण चरित्र जाण । हेंचि लाविलें अनुसंधान ।
श्रोतयांसि नाहीं देहभान । तटस्थ मन सकळांचें ॥६१॥
कीर्तन झालें चारी प्रहर । तों उदयासि पातला दिनकर ।
मग पंचारती उचळोनि सत्वर । श्रीरुक्मिणीवर ओवाळिला ॥६२॥
सावकारें निपजवोनि मिष्टान्नें । मंदिरीं घातलीं सहस्त्र भोजनें ।
मग मुलांलेंकरासहित जाण । त्या घरीं येवोन राहिला ॥६३॥
आणिक चरित्र ऐका भाविक । बाजीद पठाण होता एक ।
तो पादशाई सुभा असे देख । सेनानायक रायाचा ॥६४॥
पंचवीस सहस्त्र सैन्य निश्चिती । त्याच्या स्वाधीन होती संपत्ती ।
सदा यशस्वी पूण्यमुर्ती । समोर न ठाकती शत्रु त्याच्या ॥६५॥
हिंदुस्थान देशांत जाऊनि त्याणें । बहुत मेळविले संपत्तिधन ।
सवें पंचवीस सहस्त्र सैन्य । आला परतोन स्वदेशा ॥६६॥
विजापुरासि येतां साचार तों । मार्गी वर्तलें एक चरित्र ।
खजिना घातला उंटावर । झालासे भार बहु त्यासी ॥६७॥
उरी फुटोनियां जाण । उंट जाहला गतप्राण ।
त्याजवरील द्रव्य काढोन । रक्षीत सारवान बैसला ॥६८॥
तों खाशी स्वारी मागून येत । हत्ती घोडे शिबिका रथ ।
बाजीद पठाण देखोनि त्यातें । सारवानातें काय म्हणे ॥६९॥
मार्गावर कां तुम्ही बैसलां । मग ते म्हणती उंट मेला ।
सरदार म्हणे आहे बैसला । उठवा त्याजला सत्वर ॥७०॥
सकळ गात्रें दिसती पाहे । यांत मरोनि गेलें काय ।
स्वामीचें चित्तीं वागवोनि भय । मग त्यांणीं उपाय केला ॥७१॥
चार मेडी रोऊनि तेथें । आडोळ्यावरी बैसविलें प्रेत ।
द्रव्य उचलोनि तया वरुतें । सारवान ठेवित ते समया ॥७२॥
मनुष्य मृत्यु पावते कैसें । हें बाजीदास विदित नसे ।
घरचें कुटुंब सर्व असे । कानीं म्रुत्यूस न ऐकिले ॥७३॥
आजा आजी माता पिता । बंधु पुत्र आणि कांता ।
अवघींच होतीं तयादेखतां । मरणाचीं वार्ता तो नेणें ॥७४॥
आणिकांचे दुःख ऐकोनि कानीं । हेंही नावडे त्याचें मनीं ।
यास्तव दैन्य दुःख स्वप्नीं । नाहींच त्याणी देखिलें ॥७५॥
मृत्युलोकीं जीवासि मरण असे । हे तों तयासि विदित नसे ।
पूर्व पुण्याचेनि लेशें । विषयींच असे निमग्न तो ॥७६॥
यास्तव सारवानासि म्हणे । उंट हाक चला त्वरेनें ।
ते म्हणती चालवितें चैतन्य। तें गेलें निघोन सत्वर ॥७७॥
तुमचें भय वागवोनि फार । खजिना घातला प्रेतावर ।
परी निघोनि गेला चालविणार । यासि विचार कोणता ॥७८॥
चौर्याशीं लक्ष देह निश्चिती । तितुक्यांचीही ऐशीच गती ।
बाजीद ऐकोनि वचनोक्ती । अनुताप चित्तीं जाहला ॥७९॥
म्हणे नाशवंत हा देह निश्चिती । शेवटीं आपुल्यासही ऐसीच गती ।
सात्विक वैराग्य ठसलें चित्तीं । मग काय युक्ती करितसे ॥८०॥
स्वार शिपायी होते जवळ । त्यांची तलब वारिली सकळ ।
उरलें धन तें तत्काळ । वांटीत ते वेळ याचकां ॥८१॥
वस्त्रें अळंकार भूषणें । तींहीं दीधलीं द्विजांकारणें ।
शुद्ध सात्विक वैराग्य लक्षण । निस्पृह होऊन राहिला ॥८२॥
मग यवन भाषेनें निश्चित । साक्या बोलिले पंचाशत ।
त्यांतील दोन साक्या लिहितों येथ । पाहिजे संमत सज्जनीं ॥८३॥
साकी ॥ भज मन तों रामकें बैठता कामो । दिनो चारका रंग मिलेगा खाकमो ॥१॥
गले तुलसीकी माल सुमरन शामको । एकहि बरे भोजन आपके हातकों ॥२॥
ओव्या । ऐसा विवेक करोनि मनीं । निस्पृह झाला तये क्षणीं ।
षड्वैरियांसि जिंतोनि । शुद्ध सत्वगुणी तो झाला ॥८४॥
मग विजापुरांत जावोनि आपण । केशव स्वामीसि गेला शरन ।
त्याचा अनुग्रह संपादून । श्रीराम भजन करीतसे ॥८५॥
सद्गुरु कृपा होतांचि निश्चिती । तत्काळ जाहली कवित्व स्फूर्ती ।
कीर्तन करीत सप्रेम युक्ती । ऐकतां विश्रांती श्रोतयां ॥८६॥
पद पदांतरें रचिलीं फार । परी स्वामीचा अभंग घातला वर ।
जनांत प्रशंसा वाढली फार । साक्षात्कार जाहला ॥८७॥
आणिक संतचरित्रें अद्भुत । सादर ऐका भाविक भक्त ।
संतोबा पवार जगविख्यात । रांजणगांवांत राहतसे ॥८८॥
त्याजसारिखी आणिकांसी पाहीं । सद्गुरु सेवा घडली नाहीं ।
कैशा रीतीं वाटेल जीवीं । चरित्र तेंही ऐकावें ॥८९॥
शिवाजी पुण्यवंत नृपवर । जयापासील हा सरदार ।
दोन शतें वागवित स्वार । वेतन जाहगीर गांव असती ॥९०॥
सांडसाचें रांजण गांव । तेथें मुलें माणसें असती सर्व ।
मान मान्यता वैभव । परी संतती नसे पोटीं ॥९१॥
त्याची पत्नी सुलक्षण । येसूबायी नामाभिधान ।
स्त्रीपुरुष दोघेजण । निजप्रतीनें ते असती ॥९२॥
मग कांता म्हणे त्या अवसरा । दुसरें लग्न आपुलें करा ।
तेणें वंश वाढेल बरा । माझिया अंतरा हें आलें ॥९३॥
ऐसें सांगतां येसूबायी । संतोबा उत्तर देतसे कायी ।
आतां तुझी प्रीति जीवीं । मग विक्षेप दोहींत होईल ॥९४॥
बंधूसि दोन असती कुमर । परी ते जाणावे आपुलेच पुत्र ।
वस्त्रें अलंकार मुलांवर । लोभ अपार करीतसे ॥९५॥
साता पांचा वर्षांत जाण । बंधुचे पुत्र जाहले दोन ।
संतोबा पंतोजीसि बोले वचन । लिहूं शिकवणें कुमारांसी ॥९६॥
रौप्यमुद्रा एक शत । वेतन नेमोनि दीधलें त्यातें ।
मग पंत राहवोनि वाडियांत । लिहूं शिकवित त्या दोघां ॥९७॥
तों मुलांचा समाचार घ्यावयासी । संतोबा येत पंतोजीपासीं ।
तों स्नान करोनि त्या समयासी । मानस पूजेसी बैसला ॥९८॥
धाबळीचा घुंगुट घेऊन । जप करीत निजप्रीतीनें ।
संतोबा तयासि बोलती वचन । काय गुणगुण करितसां ॥९९॥
तो म्हणे सद्गुरुनें सांगितलें कांहीं । तें जपत बैसलों ये समयीं ।
संतोबा त्याच्या लागतसे पायीं । म्हणे तो मंत्र लवलाहीं मज द्यावा ॥१००॥
तो म्हणे आपणा योग्य पाहोनि समर्थ । त्याचा अनुग्रह घ्यावा निश्चित ।
मी तरी तुमचा चाकर सत्य । उदर निमित्तार्थे राहिलों ॥१॥
ऐकोनि म्हणे सद्गुरुभक्त । माझा आतांचि उपजला हेत ।
क्षणक्षणां पालटेल चित्त । आणि अशाश्वत शरीर हें ॥२॥
ऐसें म्हणवोनि ते समयीं । पूजेचें साहित्य आणविलें पाहीं ।
सद्गुरुचे लागूनि पायीं । अनुग्रह तिहीं संपादिला ॥३॥
मुलांसि लिहूं सांगावया देख । दुसरा पंतोजी ठेविला आणिक ।
सद्गुरु सेवा करितसे हरिखें । साहित्य आणिक कांहीं दिलें ॥४॥
वस्त्रें भूषणें अलंकार । पूजा केली सर्वोपचारें ।
ब्राह्मण जेवूं घातले सहस्त्र । कीर्तन गजर करविला ॥५॥
मग नूतन मंदिर बांधोन । ते स्थळीं राहविलें स्वामीकारणें ।
पाक निष्पत्तीसि ब्राह्मण । तोही नेमून ठेविला ॥६॥
सद्गुरुचे खिजमतीसी । दीधले दास आणि दासी ।
सहस्त्र मुद्रा खर्चावयासी । दिवाणासी सांगीतलें ॥७॥
मग कांतेप्रती बोलती उत्तर । आम्हीं सैन्यांत जातों दूर ।
स्वामिसेवेसी पडेल अंतर । समाचार घेत जावा ॥८॥
ऐसें सांगतां ते समयीं । अवश्य म्हणे येसूबायी ।
मस्तक ठेवूनि सद्गुरुपायीं । सैन्यांत लवलाही मग गेले ॥९॥
सेना संपत्ती घेऊनि समग्र । संतोबा पवार गेले दूर ।
त्याच्या आज्ञेनें साचार । होती उपचार सद्गुरुचे ॥११०॥
वस्त्रें अलंकार भूषणें । भोजन मिळतसे मिष्टान्न ।
कुटुंब नसे त्याजकारणें । उद्विग्न मन सर्वदा ॥११॥
आधींच तरुण होतें शरीर । आणि होऊं लागले उपचार ।
तेणें विकारें साचार । विषयांवर मन धांवे ॥१२॥
सेवेसी दीधली होती दासी । संभोग करुं लागले तिसीं ।
कानोकानीं गोष्ट ऐसी । कारभारियासी श्रुत झाली ॥१३॥
ते आधींच कुटिळ होते जाण । याहीवरी क्षुद्र सांपडलें उणें ।
जैसें मर्कटासि मदिरापान । तैसेंचि दिसोन आलें कीं ॥१४॥
मागें पुढें बोलती एक । संतोबा केवळ भोळा भाविक ।
सद्गुरु पाहिला असता आणिक । तेणें लौकिक थोर होता ॥१५॥
पंतोजीचें लागत होतें ऋण । तें या जन्मीं फेडित उसणें ।
आतां रक्षा राखिली त्याणें । विषयीं निमग्न जाहला ॥१६॥
संतोबाची निज कांता । येसूबायी पतिव्रता ।
तिजपासी सांगती वार्ता । धीर सर्वथा त्यांसि नाहीं ॥१७॥
म्हणती सैन्यांत गेलिया सुभेदार । गुरुनें मांडिला अनाचार ।
दासीचे मस्तकीं ठेवूनि कर । निरंतर भोगित ॥१८॥
येसूबाई उत्तर देत । त्याची निंदा करितां व्यर्थ ।
घरधणी गांवास आलिया निश्चित । मग व्हाल फजीत यायोगें ॥१९॥
गोष्टी ऐकोनि ते वेळे । उगेचि राहिले निंदक खळ ।
आपुल्या चित्तीं करिती तळमळ । परी कांहींच बळ चालेना ॥१२०॥
येसूबाई वारंवार । घेत सद्गुरुचा समाचार ।
सेवेंत कांहीं न पडे अंतर । सद्भावें नमस्कार करी तया ॥२१॥
ऐसें एक वर्ष लोटलियावरी । संतोबा परतोनि आले घरीं ।
सामोरे जाऊनि कारभारी । निज मंदिरीं आणिताती ॥२२॥
आधीं सद्गुरुचे जावोनि सदनीं । साष्टांग नमस्कार घातला धरणीं ।
आलिंगन देतां प्रीती करोनि । विश्रांति मनीं पावले ॥२३॥
दुसरे दिवसीं सद्गुरुभक्त । महापूजेचें साहित्य करीत ।
तों कुटिळ येऊनियां दुर्मत । कानीं सांगत तयाच्या ॥२४॥
म्हणती तुम्हीं करुं इच्छितां पूजन । परी दासीसी रतलें त्याचें मन ।
संतोबा करोनि हास्यवदन । अमृत वचन बोलत ॥१५॥
म्हणे संसारीं आलिया तत्त्वतां । आम्हीं सद्गुरु जोडला पिता ।
परी पूजावयासि नव्हती माता । तरी उत्तम आतां घडलें कीं ॥२६॥
ऐसा सद्भाव धरोनि अंतरीं । आनंदें उत्सव मांडिला घरीं ।
मंगळ तुरे लावोनि गजरीं । पूजन करी तयांचें ॥२७॥
वस्त्रें अलंकार भूषणें । सद्गुरुसि अर्पीत निजप्रीतीनें ।
धूप दीप निरांजनें । यथाविधीनें करीतसे ॥२८॥
आपुले कांतेचे अलंकार जैसे । गुरुपत्नीसि दीधले तैसे ।
नमस्कार घालोनि उभयतांस । म्हणे धन्य सुदिन हा ॥२९॥
यापरी जाहलें सद्गुरु पूजन । मग केलें ब्राह्मण संतर्पण ।
कोणी क्षुद्र न बोलती वचन । भयें करुन तयाच्या ॥१३०॥
निंदा करीत होते दुर्मत । ते लज्जित झाले आंताच्या आंत ।
जैसा दिनकर उदयासि येत । मग तमाचाच होत प्रकाश पैं ॥३१॥
आपुलें चित्त शुद्ध होतां जाण । शत्रु ते होती मित्रासमान ।
तेवीं सद्भाव धरितां संतोबानें । दुरिताचें पुण्य थोर झालें ॥३२॥
ऐसी त्याची निःसीम भक्ती । सद्गुरुसेवेसी पूर्ण आर्ती ।
देखोनि विश्वात्मा वैकुंठपती । संतोष चित्तीं मानीतसे ॥३३॥
म्हणोनि संतोबा भक्त थोर । सद्गुरु सेवेसि न पडे अंतर ।
दिवसें दिवस अधिकोत्तर । सद्भाव थोर वाढला ॥३४॥
म्हणे सद्गुरु रुप हें मीच निश्चिती । याणें पूजिलें यथस्थिती ।
तरी वैराग्ययुक्त निःसीम भक्ती । उचित याप्रती अर्पावी ॥३५॥
ऐसें इच्छितां जगज्जीवन । तों झालें निमित्तासि कारण ।
तुकोबाचे अभंग ऐकिले दोन । हरिकीर्तन होतांची ॥३६॥
तेणेंचि अनुताप जाहला चित्ता । म्हणे संसारत्याग करावा आतां ।
सांडूनि देह गेह ममता । पंढरीनाथा भजावें ॥३७॥
मग वस्त्रें भूषणें अलंकार । वांटोनि तोषविले द्विजवर ।
फाटकें नेसोनि अंगवस्त्र । बेटावर बैसले ॥३८॥
कांताही परम पतिव्रता । धुंडित गेली प्राणनाथा ।
म्हणे कासया येथें आली आतां । प्रपंच ममता टाकोनी ॥३९॥
ते म्हणे जैसी शरीरच्छाया । कां ब्रह्मीं संलग्न असे माया ।
तेवीं मी जडलें तुमच्या पायां । ठाव जावया नसेची ॥१४०॥
अंतरसाक्ष संतोबा पूर्ण । जाणे भक्ति वैराग्य लक्षण ।
म्हणे झाड पाला खावोनि राहणें । आम्ही न सेवूं अन्न सर्वथा ॥४१॥
ऐसें ऐकोनि ती सुजाण । त्यागिलीं वस्त्रें आणि भूषणें ।
तीन दिवस करितां उपोषण । मग दर्शन सगुण त्यांसि जाहलें ॥४२॥
साक्षात येऊनि पांडुरंग मूर्ती । क्षेम आलिंग्न देतसे प्रीतीं ।
म्हणे मी तुमच्या हृदयीं असें श्रीपती । वियोगें खंती न करावी ॥४३॥
आतां भिक्षा मागोनि सेविजे अन्न । प्रेमें करावें माझें भजन ।
ऐसें सांगोनि रुक्मिणीरमण । अंतर्धान पावले ॥४४॥
संतोबाची अनुपम स्थिती । देहींच जाहली विदेह स्थिती ।
सद्गुरुची निःसीम भक्ती । यास्तव श्रीपतीं तुष्टले ॥४५॥
आणिक ही चरित्रें नाना रीतीं । चमत्कार दाविले लोकांप्रती ।
बहुतां जनांसि लाविली भक्ती । निष्काम स्थिती धरोनियां ॥४६॥
आतां मालोपंत प्रेमळ भक्त । तयासि पावले पंढरीनाथ ।
त्याचें चरित्र अति अद्भुत । तें ऐका निजभक्त भाविक हो ॥४७॥
वराड देशामाजी निश्चिती । तयासि होती पूर्व वस्ती ।
परम सुशीळ पुण्यमूर्ती । करीतसे भक्ती विठोबाची ॥४८॥
गृहस्थ व्यापारी नामांकित भला । कर्नाटकांत रोजगार केला ।
कुटुंबासहित तेथें राहिला । चित्तीं विठ्ठला आठवोनी ॥४९॥
तयासि पुत्र सुलक्षणिक । नरहरी नाम तयासि देख ।
पुत्र पिता बहु सात्विक । चित्तीं विवेक सर्वदा ॥१५०॥
आत्मवत मानी विश्वजन । सर्वभूतीं दया पूर्ण ।
दीन अतिथी यांजकारणें । अन्न दान करीतसे ॥५१॥
विष्णु अर्चन निरंतर । श्रीहरि कीर्तनीं प्रीति फार ।
संत सेवेसि असे सादर । असत्य उत्तर न बोले ॥५२॥
कांहीं एक दिवस लोटतां । तों निवर्तली तयाची कांता ।
तेणेंचि दुःख झालें चित्ता । म्हणती कैसे आतां करावें ॥५३॥
पुढती विवेक करोनि अंतरा । म्हणती भव पाश तुटला बरा ।
चित्तीं आठवोनि रुक्मिणीवरा । तोडिला थारा अविद्येचा ॥५४॥
परी लोकीं आग्रह करोनि देख । हेडीची नोवरी पाहिली एक ।
लग्न लाविलें तत्काळिक । पुढें दुःखदायक तें झालें ॥५५॥
कांहीं दिवस लोटतां । तों पातला नोवरीचा पिता ।
तो तरी जातीचा अनामिक होता । त्याणें दुहिता ओळखिली ॥५६॥
मग मालोपंतापासीं जावोनि त्याणें । सांगीतलें आद्यंत वर्तमान ।
गांव नांव ठावठिकाण । अंत्यज म्हणे यातीचा मी ॥५७॥
माझी कन्या तस्करीं । उचलोनि आणिली अर्धरात्रीं ।
तीच तुम्हीं केली नोवरी । अनाचार निर्धारीं हा दिसे ॥५८॥
ऐसी ऐकोनि वचनोक्ती । परम अनुताप जाहला चित्तीं ।
म्हणे त्राहे त्राहे वैकुंठपती । पतित त्रिजगतीं मी एक ॥५९॥
सकळ दुरितें करोनि गोळा । त्याचा मी निर्माण जाहलों पुतळा ।
पतितपावना दीनदयाळा । निवेदन तुला असों दे ॥१६०॥
मग कांतेसि बोलावूनि तत्त्वतां । म्हणे तुवां ओळखिला आपुला पिता ।
तीही समजोनि आपुल्या चित्ता । न बोले वार्ता तयासी ॥६१॥
अनामिकासि मालोपंत म्हणे । आपुले कन्येसि घेऊनि जाणें ।
मग आम्हांसि जैसें सांगती ब्राह्मण । तें कारण विचारुं ॥६२॥
अनामिक तयासि म्हणताहे । विटाळलें भांडें नेऊनि काय ।
स्वयात ठेवील प्रत्यवाय । मग म्यां काय करावें ॥६३॥
ऐसें तयासि वदोनि पाही । अनामिका गेला आपुले गांवीं ।
जघन्य जाहलें सर्वाठायीं । भ्रष्टविलें इहीं लोक म्हणती ॥६४॥
हेडीची नोवरी दीधली ज्याणें। तो तरी रात्रीं गेला पळोन ।
मुलांलेंकरासमवेत जाण । केला दुर्जनें देशत्याग ॥६५॥
मालोपंत संसारीं होते सधन । यास्तव घरीं मिळाले पिशुन ।
अरिष्ट येतांचि महादारुण । देही टाकोन पळाले ॥६६॥
नरहरि पुत्र सुलक्षणिक । तो एक जवळ राहिला देख ।
भोजनभाऊ सकळिक । तात्काळिक ते गेले ॥६७॥
द्विजीं वाळीत घातलें जाण । आप्तवर्ग गेले टाकोन ।
आणि पश्चात्तापें करुन । दुरित संपूर्ण नासलें ॥६८॥
मग विप्र बोलावूनि ते वेळे । धन संपत्ति लुटविली सकळ ।
श्रीहरि भजन सर्वकाळ । भक्त प्रेमळ करीतसे ॥६९॥
मग ब्रह्मसभा करोनि थोर । घातले साष्टांग नमस्कार ।
मालोपंतीं जोडोनि कर । म्हणे प्रायश्चित सत्वर मज सांगा ॥१७०॥
ग्रंथ भाष्य पाहती ब्राह्मण । वैदिक पंडित शास्त्री निपुण ।
तों देहांत प्रायश्चित्त निघालें जाण । उपाय आण असेना ॥७१॥
ऐकोनि द्विजांची वचनोक्ती । मालोपंत उत्तर देती ।
हेंचि वाटतें माझे चित्तीं । तरी कोणती युक्ती ते सांगा ॥७२॥
यावरी सांगती धरामर । चिंचेचें ढोल पहावें थोर ।
त्यामाजी घालोनि आपुलें शरीर । आंत गोवर भरावा ॥७३॥
आपुल्या हातें घेऊनि अग्नें । तयासि द्यावें चेतवून ।
हें देहांत प्रायश्चित्त घेतां जाण । दुरित नासोन जाईल ॥७४॥
ऐसें ऐकोनि विप्रवचन । मालोपंत अवश्य म्हणे ।
जें जें कर्तृत्व तैसें भोगणें । न चुकेचि जाण सर्वथा ॥७५॥
आपण ढोलांत बैसोनि प्रीतीं । गोंवर घालोनि अग्नि लाविती।
हृदयीं चित्तीं पांडुरंग मूर्ती । धांवा करी अट्टहास्यें ॥७६॥
म्हणे पंढरपुरनिवासिनी । विठाबायी कुळस्वामिणी ।
आतां सत्वर तुवां येउनी । कर्मापासोनी सोडवावें ॥७७॥
संपत्तीचे सखे निश्चित । तें म्यां मानिले जिवलग आप्त ।
अंतःकाळ येतांचि त्वरित । टाकोनि समस्त ते गेले ॥७८॥
लोक प्रतिष्ठा मानापमान । पुत्र कांता संपत्ति धन ।
निर्धूत झालों सर्वापासून । आतां देहाचें बंधन तूं तोडीं ॥७९॥
याहूनि संकट नानापरी । आकाश तुटोनि पडो देहावरी ।
परी तुझा आठव असोंदे अंतरीं । हेंचि श्रीहरी मागतसें ॥१८०॥
ऐसा निश्चय करोनि चित्तीं । लाविलीं दोन्ही नेत्रपातीं ।
हृदयीं चिंतिली विठ्ठलमूर्ती । जे सुख विश्रांती योगियां ॥८१॥
हृदयीं एकाग्र करोनि ध्यान । मुखें करीत नामस्मरण ।
केशव नारायण मधुसूदन । पतितपावन करुणाब्धीं ॥८२॥
अच्युतानंद गोविंदा । परमपुरुषा सच्चिदानंदा ।
जगदुद्धारा आनंदकंदा । श्रीमुकुंदा जगद्गुरु ॥८३॥
श्रीराम रघुपति रावणांतका । निशाचरमर्दना धर्मस्थापका ।
महा प्रतापें जगन्नायका । वृंदारकां सोडविलें ॥८४॥
कृष्ण विष्णु मेघश्यामा । भक्तरक्षका पुरुषोत्तमा ।
तुच हेंचि मागतो आत्मारामा । भजनीं प्रेमा असों दे ॥८५॥
मालोपंत ऐशा रीती । भजन करीत सप्रेम युक्ती ।
प्रेमे नेत्रीं अश्रु वाहती । तों वैकुंठपती पावला ॥८६॥
अग्निप्रदीप्त तये वेळे । जाहला असे प्रभंजन प्रबल ।
परी कृशानु शरीरासि लागे शीतळ । आंग न पोळे सर्वथा ॥८७॥
एकमेकासी बोलती ब्राह्मण । नामप्रताप अद्भुत गहन ।
त्यासि जाळूं न शकेचि अग्न । जगज्जीवन रक्षिता ॥८८॥
मागें हिरण्यकशिपें प्रल्हादभक्त । अग्नीत जाळितां न जळेचि सत्य ।
तैसेंचि जाहलें यातें । विप्र बोलती एकमेकां ॥८९॥
ढोल जळोनि तये वेळे । खालीं पडिले विझोनि विंगळ ।
दिव्य उतरोनि भक्त प्रेमळ । बाहेर तात्काळ ये तेव्हां ॥१९०॥
सकळ लोक आश्चर्य करिती । म्हणती धन्य याची सप्रेम भक्ती ।
संकटीं पावला लक्ष्मीपती । अघटित ख्याती हे झाली ॥९१॥
मालोपंतासि ब्राह्मण म्हणत । तूंचि पवित्र पुण्यवंत ।
संकटीं पावला पंढरीनाथ । दोष किंचित तुज नाहीं ॥९२॥
रोजगार धंदा सर्व टाकून । मालोपंत करीत हरिकीर्तन ।
करुणारसें त्याचें बोलणें । प्रासादिक वचनें संतांचीं ॥९३॥
अनामिकाची कन्या निश्चिती । न कळत तयानें पर्णिली होती ।
तिसी लाधली सत्संगती । अनुताप चित्तीं जाहला ॥९४॥
मालोपंतासि म्हणे ते समयीं । मज तरणोपाय सांगा कांहीं ।
जैसें जन्मांतर होतें पाहीं । तरी घडोनि सर्वही तें आलें ॥९५॥
ऐकोनि म्हणे वैष्णवभक्त । तुझा अन्याय नसे किंचित ।
पिता टाकोनि गेला सत्य । आतां अन्नवस्त्र तूतें आम्हीं देऊं ॥९६॥
तरणोपाय पुसतेस जरी । तरी सांगीतली गोष्टीं जिवीं धरीं ।
सर्वदा श्रीहरीचें स्मरण करीं । गोष्ट दुसरी बोलों नये ॥९७॥
अवश्य म्हणवोनि ते भामिनी । नमस्कार करीतसे दुरुनी ।
दूर कोपट दीधलें बांधोनी । राहे जाउनी ते स्थळीं ॥९८॥
वस्त्रें पात्रें शुचिर्भूत । स्नान करीतसे नित्य नित्य ।
नामस्मरणीं लागली प्रीत । सर्वदा चित्त फांकेना ॥९९॥
पात्रीं अन्न वाढोनि निश्चिती । मनुष्या हातीं तिसीं पाठविती ।
तितुकें मात्र भक्षूनि सती । स्मरणीं निजप्रीती लावितसे ॥२००॥
सत्समागमाचेनि गुणें । तिसीं आलें सात्विक लक्षणे ।
साक्षात्कार देतसे नारायण । निज कृपादानें आपुल्या ॥१॥
कांहीं दिवस लोटतां निश्चित । तिचें आयुष्य सरलें समस्त ।
विष्णुदूत प्राण आकर्षित । वैकुंठाप्रत ते नेली ॥२॥
मालोपंतासि कळलें वर्तमान । ती तों देहांत पावली मरण ।
प्रेतासि सद्गतीस लावील कोण । ऐसें वचन बोलती ॥३॥
अंत्यज अथवा शूद्र याती । हे कोणीच स्पर्श न करिती ।
मालोपंत विचार करिती । तरी आपण सद्गती तिची करुं ॥४॥
आम्हांनिमित्त साचार । तिची दुर्दशा जाहली फार ।
आतां ती तों पावली परत्र । तरी प्रेत संस्कार करावा ॥५॥
ऐसा चित्तीं विचार करुन । कोपटांत प्रवेशती आपण ।
प्रेत पाहतां उघडोन । तों झालीं सुमनें तयाचीं ॥६॥
म्हणे विष्णुभजनाचा महिमा थोर । जनासि दाविला साक्षात्कार ।
आपुल्या दासाची सारंगधर । सत्कीर्ति साचार वाढवी ॥७॥
मालोपंतासि तै पासून । मानूं लागले सर्वत्र जन ।
म्हणती यासि साह्य रुक्मिणीरमण । महाविघ्नांतें निरसिती ॥८॥
मालोपंत तै पासुनी । करुणारसें गाय कीर्तनीं ।
भाविक श्रोते ऐकोनि श्रवणीं । सद्गदित मनीं ते होती ॥९॥
कीर्तनामाजी नवरस । गाती ऐकती विष्णुदास ।
परी भगवत्प्रातीचें कारण असे । करुणारस श्रेष्ठ तो ॥२१०॥
भवसिंधु पैलपार व्हावा । ऐसा चित्तीं उपजला हेवा ।
तरी करुणारसें आळवावें देवा । होईल जीवा सोडवण ॥११॥
देव भेटवा आपणास । ऐसें वाटलें निज भक्तास ।
परी जावोनियां वनास । करुणा देवास भाकावी ॥१२॥
धांवा ऐकोनि वैकुंठपती । तेथें येतसे सत्वरगती ।
ऐसें त्याचे स्वभाव असती । वर्णिली सत्कीर्ती श्रीव्यासे ॥१३॥
एकांतींही न बैसवेल जर । तरी सुखें करावा संसार ।
मग स्वस्थ बैसोनि एक प्रहर । संत चरित्रें ऐकावीं ॥१४॥
नवविध श्रीहरीची भक्ति होय । त्यामाजी श्रवण वरिष्ठ आहे ।
येणें तरला परीक्षिती राय । आला प्रत्यय बहुतांसी ॥१५॥
पुढिले अध्यायीं कथा सुंदर । वदविता श्रीरुक्मिणीवर ।
महीपति त्याच्या अभयवरें । प्रसाद उत्तरें बोलतसे ॥१६॥
स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।
परिसोत प्रेमळ संतभक्त । एकेचाळिसावा अध्याय रसाळ हा ॥२१७॥अध्याय ४१॥ओव्या २१७॥