श्रीगणेशाय नमः ।
जय पांडुरंगा रुक्मिणीवरा । अचळ अढळ निर्विकारा ।
लीलाविग्रही करुणाकरा । सर्वेश्वरा आदिपुरुषा ॥१॥
मी अनाथ होवोनि सर्वोपरी । सद्भावें शरण आलों श्रीहरी ।
कृपाकटाक्षें भवसागरीं । पैलतीरीं उतरावें ॥२॥
नेणें वेदशास्त्र पठण । जपतपकळा अनुष्ठान ।
नेणे संस्कृत निर्वाण । अध्यात्मज्ञान तें नाहीं ॥३॥
ऎसे असता रुक्मिणीपति । चित्तीं धिवसा उपजली प्रीतीं ।
कीं तुझ्या दासांची वर्णावी कीर्तीं । तरी मनोरथ पुरती तें करी ॥४॥
नव्हे चतुर कवि कुशळ । नाहीं विशाळ बुध्दीचे बळ ।
सर्व प्रकारें असें पांगुळ । हें तूं घननीळ जाणसी ॥५॥
दातयाच्या आश्रये साचार । याचक कंठिती संसार ।
कीं डोळसाचा धरोनि कर । आंधळे सत्वर चालती ॥६॥
तैशाचपरी पंढरीनाथा । सर्व भार तुझिया माथा ।
मज अभय देऊनियां अनाथा । वदवी भक्तकथा निरुपण ॥७॥
तुझ्या दासांची अद्भुत कीर्ती । भागवतधर्मीं वैष्णव गाती ।
तें भक्तलीलामृत मज हातीं । रुक्मिणीपति वदवी तूं ॥८॥
प्रभंजन वाजे आकाश मेळें । तरुवर डोलती त्यच्या बळें ।
तेवीं बुध्दीचा दाता तूं घननीळ । स्वतंत्र बळ मज नाहीं ॥९॥
आतां चित्त देवोनि श्रोतीं । सादर असिजे श्रवणार्थीं ।
तुकारामाची सप्रेम भक्ती । वैकुंठपति वश्य केला ॥१०॥
त्याची आदि सविस्तर । सादर ऎका भक्त चतुर ।
जो जगद्गुरु वैष्णववीर । अवतरे साचार भूमंडळीं ॥११॥
शुद्र यातीमाजी निश्चित । जन्मला तुकाराम वैष्णवभक्त ।
जो जगद्गुरु मूर्तिमंत । विश्वोध्दारार्थ अवतरला ॥१२॥
त्याच्या वंशी कुळदैवत । पूर्वापर पंढरीनाथ ।
मूर्ति आली साक्षात । प्रेम अद्भुत देखोनियां ॥१३॥
तंव श्रोते आशंकित होवोनिया । आदरें प्रश्न करिती वक्तया ।
म्हणती तुकयाचें वडिली पंढरीराया । कोणे आणिलें सांग पां ॥१४॥
ऎकोनि श्रोतयाचें प्रश्नोत्तर । वक्तयासि उल्हास जाहला थोर ।
म्हणे तुम्ही जे पुसिलें साचार । तरी तेंहीं चरित्र अवधारा ॥१५॥
विश्वंभरबावा भक्तराज । होता तुकयाचा पूर्वज ।
ज्याच्या भक्तिस्तव गरुडध्वज । आले सहज निजप्रीतीं ॥१६॥
त्या विश्वंभरे कैसी भक्ती । करूनि आराधिला रुक्मिणीपती ।
तें सविस्तर यथास्थिती । सादर संतीं परिसिजे ॥१७॥
उत्तम व्यवहार करितां जाण । असत्य कदापि न बोले वचन ।
प्रारब्धें मिळेल धनधान्य । सत्कर्मीं पूर्ण तें वेंची ॥१८॥
साधुसंत वैष्णव भक्त । तीर्थवासी ब्राह्मण अतीत ।
देखोनि आदरे गृहास नेत । सप्रेम पूजित त्यालागुनि ॥१९॥
संसार धंदा करितां जाण । मुखें करितसे नामस्मरण ।
रात्रीं मेळवूनी भाविक जन । आनंदें कीर्तन करितसे ॥२०॥
टाळविणा मृदंग घोष । नादब्रह्माचि आलें मुसें ।
रामकृष्ण चरित्रें विशेष । गावोनि जनासी ऎकावी ॥२१॥
सर्वाभूती दया पूर्ण । परोपकारी वेचितसे प्राण ।
ऎशा रीतीं करितां भजना । वृत्ति संपूर्ण मुराल्या ॥२२॥
विश्वंभराची माता जाण । पुत्रासि देतसे आठवण ।
आता पंढरीस जावयाकारणें । सिध्द होणें सत्वर ॥२३॥
तुझ्या वडिलावडिलीं निर्धारी । चालविली पंढरीची वारी ।
त्यासि सर्वथा अंतर न करीं । तरीच संसारीं सुफळ ॥२४॥
आधींच विश्वंभर प्रेमळ दास । त्यावरी मातेचा उपदेश ।
जेवीं सत्कर्मी ब्राह्मण विश्वास । श्रुतिवाक्यास प्रतिपादी ॥२५॥
कां त्रितापें साधक पोळला अंगे । तयासि लाधला सत्संग वेगें ।
तें सिध्दांत वचन अमोघ । ऎकोनि मग निवतसे ॥२६॥
कां आधींच सच्छिष्य भाविक जाणा । आणि सद्गुरूनें सांगितली उपासना ।
मग गातां ऎकतां श्रीहरिगुणां । आनंद मना तयाच्या ॥२७॥
कीं मदालसेनें निज पुत्रासी । स्वमुखें अध्यात्म सांगतां त्यांसी ।
तत्काळ वैराग्य उपजलें मानसीं । विश्वंभरासी तेविं झालें ॥२८॥
मग मातेप्रती बोले वचन । बरी मज दीधली शिकवण ।
जननीसि करूनि साष्टांग नमन । केले गमन यात्रेसी ॥२९॥
मार्गीं लागतां ते अवसरीं । दृष्टीसीं देखिले वारकरी ।
भजन करीत सत्वरी । क्षेत्रपंढरी पावला ॥३०॥
अनुतापयुक्त करोनी मन । केलें चंद्रभागेसि स्नान ।
घेऊनि पुंडलिक दर्शन । सद्भावें पूजन पै केलें ॥३१॥
क्षेत्र प्रदक्षिणा करोनि सत्वरी । ध्यानासि आणिली सर्व पंढरी ।
मग लोटांगण घालीत ते अवसरी । महाद्वारीं येतसे ॥३२॥
गरुड मारुतीसि नमन । केलें तेव्हां निजप्रीती करून ।
तेथें वैष्णव करिती कीर्तन । ऎकोनि मन संतोषले ॥३३॥
जें परब्रह्म सनातन । निजभक्ताचें हृदयरत्न ।
नासिकाग्री ठेविलें ध्यान । देखतांचि मन तन्मय ॥३४॥
ते सोहळा देखोनि दृष्टी । परमसंतोष वाटला पोटीं ।
तो विटेवरी उभा जगजेठी । करद्वय कटीं ठेवूनियां ॥३५॥
सर्वांगीं बुका उधळिला । कंठी कोमळ तुलसीच्या माळा ।
विश्वंभरें देखोनो घनसांवळा । आनंद जाहला मानसीं ॥३६॥
जो कां भक्त करुणाकर । योगियांचा तात सुंदर ।
दृष्टीसीं पाहतां विश्वंभर । आलिंगन सत्वर देत तया ॥३७॥
देव भक्तांच्या ऎक्यपणा । वर्णितां नये चतुरानना ।
तेथें प्राकृत मतीनें शाहणा । व्यर्थ वल्गना कां करूं ॥३८॥
सगुणरूप देखोनि दृष्टीं । तेचि ठेविलें हृदय संपुटीं ।
ब्रह्मानंद सोहळा सृष्टीं । देखोनी पोटीं संतोष ॥३९॥
एवं पंचरात्रीं क्रमोनि तेथ । नामसंकीर्तनी जाहला तृप्त ।
देवासि आज्ञा मागोनि त्वरित । परतोनि येत निजग्रामा ॥४०॥
विठ्ठलपायीं ठेवोनि मन । विश्वंभर पातला सदन ।
घरासि येऊनि निजप्रीतीनें । केलें नमन मातेसी ॥४१॥
समीप बैसोनि निवांत । मातेसि सांगितला वृत्तांत ।
म्हणे क्षेत्र महिमा अद्भुत । देखोनि चित्त वेधलें ॥४२॥
विश्वंभर राहिला घरीं । परी क्षणाक्षणां आठवी पंढरी ।
पांडुरंग उभा विटेवरी । भिमातिरीं दिगंबर ॥४३॥
म्हणे धन्यधन्य क्षेत्र पंढरपूर । वेणुनादी मुरलीधर ।
पद्मतीर्थाचा महिमा थोर । वारंवार आठवी ॥४४॥
चंद्रभागा माझी भगिनी । सखा बंधु पुंडलिक मुनी ।
राई सत्यभामा जननी । माता रुक्मिणी आठवित ॥४५॥
चित्ती म्हणे विश्वंभर । कधी भेटेल रुक्मिणीवर ।
नेत्रीं वाहतीं अश्रुधार । कंठ गहिवरे तयाचा ॥४६॥
भक्तराज भाविक प्रेमळ । ज्यासवें खेळतो तो घननीळ ।
धन्य ते जीवजंतु सकळ । सर्वकाळ आठवी ॥४७॥
जैसी अबळा सासरीं राहे । परी चित्तीं सर्वदा आठवी माये ।
कीं वत्सासि दावें लाविलें आहे । तें जाऊं पाहे जननी पैं ॥४८॥
कीं बाजारांत हिंडे कृपण । भूमीमाजी पुरलें धन ।
तयापासी जीवप्राण । सर्वदा मन तें ठायीं ॥४९॥
तैसें विश्वंभराचें चित्त । विठ्ठलचरणीं जाहले रत ।
म्हणे पांडुरंगें कृपावंते । वाटत खंत मज तुझी ॥५०॥
एके दिवसीं नवमी तिथ । प्रातःकाळी उठोनि त्वरित ।
पंढरपुरी वैष्णवभक्त । निघे निश्चित लगबगें ॥५१॥
अहोरात्र क्रमितां पंथ । पांडुरंग क्षेत्र पावला तेंथ ।
स्नान करूनि चंद्रभागेंत । दर्शना जाती विठोबाच्या ॥५२॥
समचरण विटे कटीं कर । ठाण साजिरें सुकुमार ।
ऎसें ध्यान दिगंबर । पाहतांचि विसर देहभान ॥५३॥
आलिंगन देवोनि बाही । सप्रेम मिठी घातली पायीं ।
तेणें त्रिताप निरसोनि सर्वही । जाहला विदेही विश्वंभर ॥५४॥
दशमी व्रत एक भुक्त साचार । एकादशी उपोषण हरिजागर ।
रात्री ऎकोनि कीर्तन गजर । सप्रेम अंतर तयांचे ॥५५॥
पंक्तीसि घेऊनि वैष्णव भक्त । द्वादशीस पारणें केलें त्वरित ।
संतापाशीं जगन्नाथ । सर्वदा वसत प्रीतीनें ॥५६॥
संत समागम सर्वकाळ । त्याकडे पाहूं न शके काळ ।
पद्मनाभ तिष्ठे त्याजवळ । सप्रेम कळवळ देखोनि ॥५७॥
देव भक्तांचे संगती । त्रिरात्र क्षेत्रीं केली वस्ती ।
मग विश्वंभर पांडुरंगाप्रती । आज्ञा मागती जावया ॥५८॥
निरोप देतां जगज्जीवन । आश्रुपातें भरलें लोचन ।
म्हणे तुझा वियोग जाण । मजकारणें न साहे ॥५९॥
सद्गद होवोनि ते वेळे । अश्रुपातें सरले डोळे ।
म्हणे तुझ्या पायां वेगळे । वाटे तळमळ विठ्ठला ॥६०॥
ऎकोनि विश्वंभराचें वचन । काय बोले जगज्जीवन ।
रिते स्थळ मज वांचोन । अणुमात्र जाण असेना ॥६१॥
आकाश जेव्हडे आहे थोर । त्यामाजी व्यापक समीर ।
तैसाचि मी शारंगधर । चराचर व्यापक असें ॥६२॥
कीं उर्वीचे ठायी सहज । प्रकाशे बासरणमणींचे तेज ।
तैसाचि मी अधोक्षज । चित्तीं समज आपुल्या ॥६३॥
जैसे नाना अलंकार ठसे । परी ते सोनें एकचि असे ।
तेवीं आज्ञानासि जग भासे । परी हें मीच असें विश्वंभरा ॥६४॥
ते अलंकार आटिल्या पाहें । तरी तें सोनें एकचि असे ।
तैसा प्रळयांतीं मींच असे । अविनाश अक्षय सर्वदा ॥६५॥
हा माझा ऎश्वर्य योग जाण । वेदांतीं केलें विवरण ।
ह्या उपपत्ती चित्तीं धरून । देहूस जाणें सत्वर ॥६६॥
विश्वंभर म्हणे हृषिकेशी । हें ज्ञान असोंदे आपणापासीं ।
माझी प्रीती सगुण रूपासी । निश्चियेसी जडली असे ॥६७॥
निराकार जें विराट देख । तेथें वेदांचा न चले तर्क ।
मग मी काय करूं मशक । सगुण सुख कोठें पाहूं ॥६८॥
ऎश्वर्य सांगसी निर्गुण । तेथें कैसे तुझे गाउं गुण ।
समपदी साजिरे ठाण । देउं आलिंगन मग कोणा ॥६९॥
ज्या रूपासी नाहीं आर्ती । मग कैसी करूं तुझी भक्ती ।
कैशी श्रवणीं गुणकीर्ती । ऎकू श्रीपती मज सांग ॥७०॥
ऎकोनि विश्वंभराचें वचन । हासों लागले जगज्जीवन ।
म्हणे तुझ्या गुणांवरून । लिंब लोण करावें ॥७१॥
मग भक्तवत्सल दीननाथ । त्याच्या मस्तकीं ठेविला हात ।
म्हणे माझें नाम जपसी जेथ । मी निश्चित तें ठायीं ॥७२॥
ऎसें म्हणोनि रुक्मिणीवर । हरिनाम मंत्र उपदेशी सत्वर ।
देहूसि पाठविला विश्वंभर । परी सगुणा तत्पर प्रीति ज्याची ॥७३॥
मग पंधरा दिवसा एकादशी । जात असें पंढरीसी ।
नेमे वारी धरिली ऎसी । अनुपम सुखासी साकला तो ॥७४॥
कार्तिकमासा पासोनि जाणे । ज्येष्ठमासपर्यंत येणें ।
सोळा वेरझारा करून । रूप सगुण पाहिलें ॥७५॥
ऎसी विश्वंभराची स्थिती । देखोनि जन विस्मित होती ।
त्रिविध लोक नाना रीती । काय बोलती ते ऎका ॥७६॥
याणें टाकोनि संसार भान । लाविले विठोबासी ध्यान ।
पंधरा दिवसां येणे जाणें । वेरझारा करोन शिणतो कां ॥७७॥
जरी त्रासला असता संसारासी । तरी सुखें राहती पंढरीसी ।
दोहीं ठायीं प्रीति त्यासी । म्हणोनि घरासी येतसे ॥७८॥
एक म्हणती भाग्यवंत । वायां कां निंदा करितां व्यर्थ ।
त्याज ऎसा निष्ठावंत । नाही दिसत तये काळीं ॥७९॥
असो या परी त्रिविध जन । नानापरीची बोलती वचनें ।
परी विश्वंभरासि समसमान । मानापमान सारिखे ॥८०॥
विश्वंभर प्रेमळ भक्त । सगुणीं जडले त्याचें चित्त ।
तो नवल वर्तले अद्भुत । ऎका निज भक्त भाविक हो ॥८१॥
पंधरा दिवसां पंढरीसि जात । आठ मास लोटले त्वरित ।
सेवा ऋणी वैकुंठनाथ । जाहला निश्चित तेधवां ॥८२॥
नववे मासी अष्टमीचे रात्रीं । विश्वंभर निद्रित असती ।
तंव स्वप्नीं येऊनी रुक्मिणीपती । तयासि बोलतीं काय तेव्हां ॥८३॥
म्हणेरे विश्वंभर सखया । मज त्वां केलें सेवाऋणिया ।
मी आतां आलों गांवा तुझिया । पंढरीसि यावया आज्ञा नाहीं ॥८४॥
तुझे उपकार जाहले बहुत । तें मज फिटतीच सत्य ।
आतां राहवयासि आलो येथ । तुझी प्रीत देखोनियां ॥८५॥
ऎसें बोलोनियां चक्रपाणी । गेले आंबियाचें वनीं ।
निद्रित जाहले तये स्थनीं । इतुकें स्वप्नीं देखिलें ॥८६॥
विश्वंभर होऊनी जागृती । हरिस्मर्ण करितसे प्रीतीं ।
म्हणे दैवाचि विचित्रगती । रुक्मिणीपती भेटले ॥८७॥
मजसी भेटोनि पंढरीनाथ । गेले आंबियाचे वनांत ।
निद्रा केली असे तेथ । पाहावें त्वरित जावोनिया ॥८८॥
ग्रामांत होते वैष्णवजन । तयांसि सांगे जीवींची खुण ।
ऎशा रीतीं देखिले स्वप्न । पंढरीहून देव आले ॥८९॥
तरी आपण सत्वर जावोनि आतां । गावांत आणू रुक्मिणीकांता ।
ऎसी ऎकोनियां वार्ता । आश्चर्य चित्तां तें करिती ॥९०॥
आणिक लोक ग्रामवासी । समागमें घेतलें त्यांसी ।
अभक्त विकल्पी जे मानसी । सत्य तयांसी न भासे ॥९१॥
म्हणती विश्वंभरासि लागलें ध्यान । तेंचि देखिलें असेल स्वप्न ।
साक्षात मूर्ति दिलेल सगुण । अघटित विंदन केविं घडे ॥९२॥
एक म्हणती संशय कायसा । हातिच्या कांकणा कासया आरसा ।
याचा भाव आहे कैसा । तोही सहसा कळेल ॥९३॥
चित्तीं कल्पना आणोनि ऎसी । सवे चालिले ग्रामवासी ।
संतमेळीं विश्वंभरासी । चालत मानसी आनंद ॥९४॥
कीर्तन करीत गात नाचत । आले आंबियाचे वनांत ।
तों तेथें नाहींत पंढरीनाथ । परी सुवास अद्भुत सुटला ॥९५॥
सुवासिक पुष्पें बुका तुळसी । काहीं पडलीं त्या स्थळासी ।
हें कौतुक देखतां दृष्टीसीं । आश्चर्य सकळांसि वाटलें ॥९६॥
एक म्हणती पाहावो । साचचि स्वप्नींचा प्रस्तावो ।
परी आपुला नाहीं शुध्द भावो । म्हणवोनि देव दिसेना ॥९७॥
विश्वंभर म्हणे तये क्षणीं । भूमींत पहा उकरोंनी ।
तो आकाशी वदतसे वाणी । ऎकती कानीं सकळिक ॥९८॥
विश्वंभराचे भेटीसी । देहूसि आले वैकुंठवासी ।
तरी शस्त्र लावितां भूमीसी । उकरा तयासी निजहस्तें ॥९९॥
पुढें याचें वंशी थोर । अवतरेल वैष्ववीर ।
तयाचेनि कीर्तन गजरें ।जगद्गुध्दार होईल ॥१००॥
ऎसे ऎकोनि ते वेळीं । आनंदली भक्त मंडळी ।
हरिनामें पिटोनि टाळी । कीर्तन कल्लोळीं गर्जती ॥१०१॥
मग विश्वंभरे लावितां हात । भूमींत उकरिती वैष्णवभक्त ।
तों बुका तुळसी मृत्तिकेंत । निघती बहुत तेधवां ॥२॥
पुढें पाहतां निज दृष्टीनें । तों पांडुरंग मूर्ति सांवळी सगुण ।
वामांगीं ते माता रुक्मिण । सुकुमार ठाण साजिरें ॥३॥
कासेसि दिव्य पीतांबर । गळां तुळसी मंजुर्याचे हार ।
ऎसी मूर्ति देखोनि सुंदर । जयजयकार मग करिती ॥४॥
विश्वंभरें उचलोनि मूर्ती । गांवा समीप चालिले प्रीतीं ।
विठ्ठलनामें लोक गर्जती । कीर्तनी नाचती भक्त जन ॥५॥
क्षेत्रा सन्निध येउनी । मुर्ति स्थापिली तये स्थानीं ।
समीप वाहे इंद्रायणी । जीच्या दर्शनीं मुक्ति जीवां ॥६॥
सर्व साहित्य उपचार । बोलोवोनि वैदिक विप्र ।
अभिषेकें पूजिला रुक्मिणीवर । वेदोक्त मंत्र म्हणोनियां ॥७॥
पयदधि आणि घृत । मधु शर्करा गुड संयुक्त ।
मुर्ति न्हाणोनियां पंचामृतें । अभिषेक करिती मग तेव्हां ॥८॥
अंगवस्त्रे पुसोनि देवा । पीतांबर धारण केला बरवा ।
कुंडले मुगुट घालोनि तेव्हां । अळंकार केशवा लेवविले ॥९॥
पुष्पें तुळसी एकारती । निरांजन धॄप दाखविला प्रीतीं ।
पक्वान्न नैवेद्य समर्पिती । विप्र बोलती मंत्र घोष ॥११०॥
यथाशक्ती ब्राह्मण भोजन । वैष्णव करिती हरि कीर्तन ।
सकळ ग्रामवासी जन । करिती भजन अहर्निशीं ॥११॥
तंव रजनी माजी एकांती । विश्वंभरे मांडिली स्तुती ।
जय जय करुणासागरा रुक्मिणीपती । व्यापक त्रिजगतीं तूं एक ॥१२॥
आखंडला दुर्लभ तुझी भेटी । ध्यानांत आणी धूर्जटी ।
तो इंद्रायणीचें तटीं । आलासि मजसाठीं विठ्ठला ॥१३॥
मी सेवाहीन भक्तिहीन ।अर्चन पूजा करूंच नेणें ।
परी तुं अनाथ बंधू करुणाघन । हें अनुभवें पूर्ण मज कळलें ॥१४॥
ऎकोनि विश्वंभराची स्तुती । काय म्हणतसे रुक्मिणीपती ।
काय कामना असेल चित्तीं । ते मजप्रती निवेदीं ॥१५॥
ऎकोनि म्हणे प्रेमळ भक्त । तुझ्या भजनीं असावी प्रीत ।
घडावी साधूंची संगत । जाणसी मनोरथ विठ्ठला ॥१६॥
पुढें वंशपरंपरा होती । तयासि असावी तुझी भक्ती ।
हेंचि मागणें रुक्मिणीपती । मनोरथ पुरती तें करी ॥१७॥
येथें राहोनि कल्पवर । जड जीव तारावे दर्शनमात्रें ।
देहु ग्राम पुण्य क्षेत्र । राजीव नेत्रें वसवावें ॥१८॥
ऎसें बोलतां प्रेमळ भक्त । हांसोनि बोले अनाथनाथ ।
तुवां जे धरिले मनोरथ । ते मी अनंत पुरविता ॥१९॥
ऎसी भाक देतां ते समयीं । विश्वंभर लागल पायीं ।
क्षेत्रवासी लोक तेही । भजनीं सर्वही लागले ॥१२०॥
दिवस लोटतां सप्रेम मेळ । तों पातला प्रयाणकाळ ।
वैकुंठहुनि ते वेळे । पुष्पक जवळीं पैं आलें ॥२१॥
विष्णुदूत म्हणती त्यासी । आतां चलावें वैकुंठासी ।
विश्वंभरे वार्ता ऎकोनि ऎसी । पांडुरंगासी विनवित ॥२२॥
दोघे पुत्र कांता निर्धारीं । तुझे वोसंगी आहेत श्रीहरी ।
मी तरी जातों वैकुंठपुरीं । निज निर्धारीं विठ्ठला॥२३॥
ऎसें बोलोनि तयेंक्षणीं । हरीस्मरणें गर्जे वाणी ।
प्राण सोडिलें देहांतुनीं । दिव्य विमानीं बैसला ॥२४॥
नामघोषें सप्रेम गजतें । गंधर्व गाती मंजुळ स्वरें ।
ऎशीरीतीं विश्वंभर । वैकुंठपुर पावला ॥२५॥
निज सुकृताचें लाघव । विष्णु सन्निध लाधला ठाव ।
सायुज्य मुक्ति अपूर्व । भक्त वैष्णव भोगीतसे ॥२६॥
असो विश्वंभर पावला निजधामास । मागें चरित्र वर्तलें कैसें ।
तें अनुसंधान अतिसुरस । सज्जनीं सावकाश ऎकिजे ॥२७॥
विश्वंभराची स्त्री पाहीं । तिचें नाम अमाबायी ।
भक्ति भावें करोनि तिनेंही । शेषयायी आराधिला ॥२८॥
दोघे पुत्र असती जाण । हरि मुकुंद नामाभिधान ।
परी अमाई संसार उदास मनें । सप्रेम भजन करितसे ॥२९॥
सर्वांभूतीं सारिखी दया । आपपर न विचारी माया ।
भक्तिभावें आठवोनि पायां । पंढरीराया वश्य केलें ॥१३०॥
सप्रेम भजनाची हातवटी । साक्षात्कार देत जगजेठी ।
स्वप्नीं येउनि उठाउठी । अमाईसीं गोष्टी बोलत ॥३१॥
तुझी भक्ति देखोनि सहज । मी प्रसन्न जाहलों गरुडध्वज ।
कांहीं इच्छित असेल काज । तरी तें मज सांगावें ॥३२॥
ऎसे पुसतां शारंगधर । अमाई देवासि दे प्रतिउत्तर ।
तुजवीण मज आणिक प्रकार । नावडे साचार श्रीहरी ॥३३॥
नलगे भुक्ति नलगे मुक्ति । नलगे कांहीं धन संपत्ती ।
तुझे भजनीं मागतें आर्तीं । स्वरूपीं वृत्ती मुरो माझी ॥३४॥
यावीण इच्छा असेल किंचित । तरी मजला माय व्याली व्यर्थ ।
ऎसे बोलतां अमाईतें । रुक्मिणीकांत हांसले ॥३५॥
म्हणे धन्य माते तुझी बुध्दी । ऎसीच असो हे त्रिशुध्दी ।
मी तुष्टलों कृपानिधी । चरणारविंदी ठेवीन ॥३६॥
अमाई बोले प्रेमसुखें । बुध्दिचा चाळक तूंचि एक ।
श्रुति शास्त्रें वर्णिती देख । कवि अनेक वदले कीं ॥३७॥
ऎसें बोलोनि ते समयीं । लोटांगण घालीत अमाई ।
मग संतोषोने शेषशायी । उचलोनि हृदयीं धरियेली ॥३८॥
इतुकें स्वप्न देखोनि जाण । जागृत जाहली न लगता क्षण ।
मग करोनियां हरिस्मरण । विस्मित मन होतसे ॥३९॥
अमाई निष्काम चित्तीं । न मागे धनसंपत्ती ।
परी ऋणी जाहला लक्ष्मीपती । म्हणोनि वोळंगती सर्व सिध्दी ॥१४०॥
प्रपंच हातवटी न करितां कांही । सर्व पदार्थ अनुकूल गृहीं ।
जें जें इच्छि तें समयीं । प्राप्त सर्वही होतसे ॥४१॥
जेथें अनुकूळ जाहली सिध्दी । तरी साधकाची तत्काळ भ्रंशे बुध्दी ।
वाडतां प्रपंच उपाधी । देव त्रिशुध्दी अंतरे ॥४२॥
जेथें विषयाचा आरोप । तरी चित्तासि न ये अनुताप ।
अनुताप नसे तेथें पाप । आपोआप संचरे ॥४३॥
जैसा रात्रिचा समय येतांचि जाण । पिशाच उठली स्मशानांतुन ।
कीं पुरुष देखोनि प्राक्तनहीन । दुःख दैन्य तेथेचि ये ॥४४॥
नातरी कुटिल नर येतां सभेसी । निंदा प्रगटे अपैसी ।
तेवीं विषयासक्त होतां मानसीं । दुरितें अनायासीं वोळंगती ॥४५॥
म्हणोनियां साधु-संत । उपाधिरहित होऊनि असत ।
एकांती जावोनि अरण्यांत । भजन करित श्रीहरींचे ॥४६॥
असोत आतां भाषणें ऎसीं । सर्वसिध्दि वोळंगती मंदिरासी ।
अमाईच्या निज पुत्रांसी । विसर मानसी हरीचा ॥४७॥
एकांती बैसोनि दोघेजण । विचार करिती नीज प्रीतीनें ।
सेना तुरंग शिबिका आभरण । आपणा कारणें असावी तरी ॥४८॥
भेटोनियां राजयाप्रती । त्याची सेवा करावी निश्चितीं ।
चालवोनियां क्षत्र वृत्ती । सर्व संपत्ती भोगणें ॥४९॥
उभयतां नमस्कारोनि मातेतें । सांगती चित्तींचें मनोगत ।
आम्हीं जावोनि राजदर्शनातें । क्षत्रवृत्तीतें चालवूं ॥१५०॥
अमाई म्हणे ते समयीं । काय उणें तुम्हांस गृहीं ।
योगक्षेम विठाबायी । चालवील सर्वही आपुला ॥५१॥
ऎसी जननी वदतां मात । परी ते नावडे पुत्रांतें ।
जाणोनि तयांचे मनोगत । आज्ञा देत पुत्रांसी ॥५२॥
हरिमुकुंद दोघेजण । मातेसि करूनि साष्टांग नमन ।
उभयतां सत्वर निघोन । राजदर्शन घेतलें ॥५३॥
शूरत्वीं दक्ष उभयतां । पाहोनि रायें दीधलीं संपदा ।
कुटुंबाद्सहित आणावी माता । विचार चित्ता त्यांहीं केला ॥५४॥
अमाईस लेहोनि पत्र । अश्व मनुष्य पाठविलें सत्वर ।
माता देखोनि चिंतातुर । म्हणे विठोबा दूर राहिला ॥५५॥
पांडुरंग मूर्तीसि करोनि नमन । अश्रुपातें भरले लोचन ।
म्हणे देवा तुझे चरण । मजकारणें अंतरले ॥५६॥
ऎसें म्हणोनि अमाबायी । सद्गदित जाहली ते समयीं ।
वस्तभाव घेवोनि सर्वही । मार्ग लवलाही क्रमित ॥५७॥
दोघी सुना घेऊनि जाण । निज पुत्रासि भेटे येऊन ।
परी देवापासी पंचप्राण । वेधलें मन निजप्रीतीं ॥५८॥
जैसा कृपण हिंडे बाजारासी । परी चित्त लागे ठेवण्यापासी ।
कीं वत्स बांधले दोरीसी । परी जननीपासीं मन त्यांचें ॥५९॥
कां देहीं असोनि चकोर । सर्वदा लक्षिती रोहिणीवर ।
तैसें अमाईचें अंतर । रुक्मिणीवरें वेधिलें ॥१६०॥
दैव प्रारब्धें करोनि निश्चित । पुत्रांसि आली भाग्य संपत ।
तेणें मोहे रमलें चित्त । अनाथनाथ हें जाणें ॥६१॥
कांहीं काळ लोटतां पाहीं । निद्रित असतां अमाबायी ।
स्वप्न अवस्थेंत ते समयीं । विठाबायी प्रगटली ॥६२॥
घवघवीत सांवळी मूर्ती । पितांबर प्रभा पडली दीप्ती ।
दिव्य कुंडले कानीं तळपती । मकराकृती सुढाळे ॥६३॥
ऎसें रूप प्रगटोनि स्वप्नीं । अमाईस म्हणे चक्रपाणी ।
तूं पुत्र मोहें गुंतोनी । मजला टाकोनी दीधलें ॥६४॥
विश्वंभरे देवोनि भाक । देहु क्षेत्रीं बैसविले देख ।
ते तूं विसरोनि सकळिक । संसार सुख पाहसी ॥६५॥
टाकोनि लोभ धन-संपत । देहु क्षेत्रासि चाल त्वरित ।
ऎसें बोलता पंढरीनाथ । जागृत अवस्था पातली ॥६६॥
अमायी विस्मित चित्तांत । हरी मुकुंदा बोलावी त्वरित ।
सांगितला स्वप्नींचा वृत्तांत । सद्गदित होऊनियां ॥६७॥
म्हणे बा तुमच्या वडिलांनी । भाकेसि गोंविला चक्रपाणी ।
मूर्ति स्थापोनि तये स्थानीं । वैकुंठ भुवनीं तो गेला ॥६८॥
आजि स्वप्नीं येवोनी जगजेठी । मजला साक्षात बोलिला गोष्टी ।
कीं देहु-इंद्रायणीचे तटीं । उठाउठी चाल तेथें ॥६९॥
ऎकोनि मातेची वचनोक्ति । पुत्र हांसोनि उत्तर देती ।
स्वप्नींची साच प्रतीती । केशा रीतीं मानावी ॥१७०॥
आम्हीं स्वामींचे सेवेसि आहों तत्पर । तेणें संतोषे रुक्मिणीवर ।
आपुले धर्मी जो सादर । तयासि ईश्वर नुपेक्षी ॥७१॥
वचन ऎकोनि ते समयीं । निवांत राहिली अमाबायी ।
मोह ममता न सुटेचि पाहीं । नचले कांहीं त्यांपुढें ॥७२॥
चार दिवसा लोटतां निश्चित । विनोदें पुत्र पुसती मातेतें ।
आजि काय बोलिले पंढरीनाथ । तरी तें आम्हांतें निवेदीं ॥७३॥
अमामाई म्हणे तें वेळे । आणिक दोन दृष्टांत जाहले ।
संतती संपत्ति सांडोनि सकळ । देहूसि तत्काळ चाल आतां ॥७४॥
ऎकोनि मातेची वचनोक्ती । सत्य न वाटे तयांप्रती ।
होणाराची विचित्र गती । भ्रंशली मती यास्तव ॥७५॥
ऎसियासि दिवस लोटतां चार । परम क्षोभला रुक्मिणीवर ।
अमाईस दृष्टांत दाखविला थोर । ऎका सादर भाविक हो ॥७६॥
स्वप्नीं येऊनि पंढरीनाथ । म्हणे तूं माझें नायकसी सत्य ।
तरी आजि दोप्रहरां होईल घात । ऎक ते मात निजकर्णी ॥७७॥
वाताहत संपत्ति धन । तुझे पुत्र जातील मरोन ।
ऎसें बोलतां जगज्जीवन । अमाई रुदन करीतसे ॥७८॥
पुत्र मरतील म्हण्तोसि जाण । तरी मज सद्गतीसि लावील कोण ।
हरि म्हणे ग्यां तुझे घेतलें ऋण । तें होईन उत्तीर्ण निश्चित ॥७९॥
स्वप्न अवस्था देखोनि ऎसी । अमाई आली जागृतीसी ।
पुत्र येवोनि पुसती तिसीं । रुदन करिसी कां माते ॥१८०॥
म्हणे म्यां मागें सांगितलें स्वप्न । तें असत्य मानलें तुम्हांकारणें ।
आजिचें दृष्टांतीं जगज्जीवन । कोपायमान जाहलें ॥८१॥
म्हणे आजि दोनप्रहर येतां दिन । तुझे पुत्र मरतील जाण ।
वाताहत संपत्ति धन । न लगतां क्षण होईल ॥८२॥
ऎसे सांगतां अमाबायी । पुत्रांसि सत्य न वाटे काहीं ।
जेवीं संजयें भविष्य कथिलें सर्वही । परी धृतराष्ट्रासि नाहीं विश्वास ॥८३॥
कीं मंदोदरीच्या धर्मनीती । दशानना असत्य भासती ।
होणाराची विचित्र गती । काय संचितीं कळेना ॥८४॥
हरी मुकुंद उभयतां । म्हणती वार्धकदशा आली आतां ।
म्हणोनियां जाण माता । अशुभ वार्ता वदतसे ॥८५॥
पुत्र म्हणती वो जननी । आम्ही तरी मरतों आजिचे दिनीं ।
आतां आपुल्यां हातें करुनीं । बैसवावें भोजनीं सत्वर ॥८६॥
सुनेसी आज्ञा करितां जाण । ताटें वाढोनि आणिली दोन ।
भोजनासि बैसले दोघेजण । पोट भरोनि जेविले ॥८७॥
तांबुल घेतां बोलती काय । भूत भविष्य कळती माय ।
तों वार्तिक येवोनि सांगती काय । तुम्हांसी रायें पाचारिलें ॥८८॥
परचक्र आलें असे थोर । तुम्हीं जावें तयावर ।
देखोनि स्वामींचे आज्ञापत्र । अति सत्वर निघाले ॥८९॥
सेना सत्य करोनि त्यांणीं । निघाले मातेसी पुसोनी ।
घाव घातला निशाणीं । त्वरें करोनि चालिले ॥१९०॥
तों परचक्र आडवें येतां सत्वर । युध्द झालें घोरांदर ।
रणीं उभयतां पाडिले शूर । हाहाकार जाहला ॥९१॥
पराजय होतांचि ते क्षणीं । जय वाद्यें वाजविलीं त्यांणीं ।
सेना संपत्ति तुटूनी । तेच क्षणीं घेतलीं ॥९२॥
हरि मुकुंद पडतां विकळ । अनुताफ जाहला ते वेळे ।
म्हणती मातेचें वचन न ऎकलें । म्हणवोनि जाहलें ऎसें ॥९३॥
पश्चात्ताप होतांची तेव्हा । पांडुरंगाचा करिती धांवा ।
म्हण्ती पतितपावना देवाधिदेवा । भेटे केशवा लवलाहीं ॥९४॥
देवें करुणा ऎकोनि ऎसी । तत्काळ दर्शन दीधलें त्यांसी ।
पुष्पकीं बैसवोनि दोघांसी । वैकुंठासी पैं नेलें ॥९५॥
कुळ तारावें सकळिक । विश्वंभरें घेतली भाक ।
त्या वचनास्तव देख । वैकंठनायक भेटले ॥९६॥
असो रणीं पडिले दोघे कुमर । अमाईस कळला समाचार ।
तेव्हां उसळला शोकसमुद्र । तों ग्रंथीं कोठवर ल्याहावा ॥९७॥
जैसा कुळक्षय ऎकोनि गांधारी । मूर्च्छित पडे अवसरीं ।
आंग टाकी धरणीवरी । अमाईस परी ते जाहली ॥९८॥
हें दुःख देखोनि नयनीं । धाकुट्या मुकुंदाची राणी ।
तत्काळ अग्नि प्रदीप्त करोनि । सहगमनीं निघाली ॥९९॥
देवें अंती देवोनि भेटी । तीस पोहोंचविलें वैकुंठीं ।
निज भ्रतार पडतां दृष्टीं । गुजगोष्टी बोलत ॥२००॥
असो इकडे अनुसंधान । अमाईची ज्येष्ठ सून ।
ते गरोदर होती पूर्ण । राहिली म्हणोन यासाठीं ॥२०१॥
वस्त्रें भूषणें संपत्ती-धन । परचक्री घेतले लुटून ।
अमाई सुनेसि घेऊन । चालिली पळोन तेधवां ॥२॥
हरिस्मरण करितां ध्यानीं । पातली देहु पुण्य धरणीं ।
देउळीं जातां तये क्षणीं । कैवल्यदानी देखिला ॥३॥
सद्गदित होऊनि कंठीं । मूर्ति धरिली हृदय संपुटीं ।
मन पायीं घालोनि दृढ मिठी । काय गोष्टी बोलतसे ॥४॥
म्हणे रे संसार विटंबण्या । बरें द्वंद्व साधिलें धण्या ।
रणीं पाडिलें बाळकां तान्हया । अरे घरघेण्या श्रीहरी ॥५॥
तुझें भजनी लागले दास । त्यांचा ऎसाचि मांडिसी नास ।
आपणां वेगळें तयांस । करिसी वोस दशदिशा ॥६॥
तुझें भजन करितो धूर्जटी । तो नेऊनि बसविला मसणवटीं ।
वैराग्य दिधलें त्यांचे पोटीं । विषय दृष्टी नावडे त्या ॥७॥
सनकादिक तुझें ध्यानीं । त्यांची गोष्टी ऎकिली श्रवणीं ।
ते देहींच विदेही करोनी । वैकुंठ भुवनी बैसविलें ॥८॥
नारद वैष्णव जगजेठीं । त्याच्या विषयांसि मांडिली तुटी ।
ढुंगासि लावोनि लंगोटी । त्रैलोक्य सृष्टी हिंडवि त्या ॥९॥
रुक्मांगदासि निर्धारीं । हरिजागर एकादशी करी ।
वोस करोनि त्याची नगरी । वैकंठपुरीं बैसविलें ॥२१०॥
तुझा निजभक्त विभीषण । त्याचा बंधु मारिला रावण ।
मग त्यादि देऊनि लंकादान । उदारपण दाखविसी ॥११॥
तुझें नाम स्मरता जगजेठी । प्रल्हाद भक्त जाहला कष्टी ।
त्याचा बाप मारिला शेवटीं । अनुचित गोष्टी हे तुझी ॥१२॥
असो दुसर्याची काय वार्ता । अनुभवें बोलतें मी आतां ।
माझे पुत्र मारिले अनंता । देखत देखतां ये समयीं ॥१३॥
चक्र चालक वनमाळी । करोनि संसाराची धुळी ।
तान्हें बुडवोनियां समूळीं । आपणा जवळीं आणिलें त्वां ॥१४॥
आतां माझी सेवा गत । कोण करील सांग त्वरित ।
ऎकोनि अमाईची मात । काय बोलत जगदात्मा ॥१५॥
तिसी धरोनि हृदय संपुटी । म्हणे होणार तें झालें शेवटीं ।
आतां सर्वथा न व्हावें कष्टी । मी जगजेठी तुजपासीं ॥१६॥
नानाप्रकारें करुणाकारें । समजाविली बोलूनि उत्तरें ।
पुढें काय वर्तले चरित्र । तें सादर ऎका भाविक हो ॥१७॥
संसारासि पाहिजे धन धान्य । प्रतिपाळ कर्ता नसे कोण ।
गरोदर अमाईची सून । माहेरासि जाण पाठविली ॥१८॥
आपण केला असे क्षेत्रवास । परी चैन न पडे चित्तास ।
तेणें अपकार जाहला नेत्रास । दृष्टीसी न दिसे सर्वथा ॥१९॥
दारीं शेवग्याचा तरुवर । त्या शोकें वाळला साचार ।
मग सगुण रुपें सारंगधर । अमाईस उत्तर काय बोले ॥२२०॥
पांडुरंग म्हणे वो जननी । मी सन्निध असतां तुजलागुनी ।
कासया शोक करिसी मनीं । किती म्हणवोनी सांगावें ॥२१॥
मी कृष्ण अवतारीं साचार । गुरूसि भेटविला मृत पुत्र ।
तैसेचि तुझे आणीन कुमर । सांगसी तरी ये समयीं ॥२२॥
आणि दिव्य नेत्र करितों पुढतीं । ऎसे वदतां रुक्मिणीपती ।
अमाई तयासि उत्तर देती । नलगे मजप्रती नाशवंत ॥२३॥
म्यां मागे प्रतिज्ञा केली हरी । ते कां विसरलासि ये अवसरीं ।
कीं तुजवीण इच्छा आन न करीं । तो आठव अंतरी असोंदे ॥२४॥
न मागता देशील अकस्मात । तरी मी तें सर्वथा नघेचि सत्य ।
ऎसें ऎकोनि रुक्मिणीकांत । काय बोलत तेधवां ॥२५॥
आतां मीच तुझा निजपुत्र जाण । रुक्मिणी आहे आवडती सून ।
सेवा करील निजप्रीतीनें । किंचित उणें पडों नेदी ॥२६॥
ऎसें बोलतां सारंगधर । अमाई देत प्रत्युत्तर ।
तूं विश्वपिता जगदुध्दार । कैसा कुमर होसी माझा ॥२७॥
यावरी म्हणे घननीळ । सप्रेम भक्तीचेनि बळें ।
मी यशोदेचा जाहलो बाळ । तुज काय नकळे सर्वथा ॥२८॥
ऎसें बोलतां चक्रपाणी । अमाई येतसे लोटांगणीं ।
म्हणे भक्तवत्सला कैवल्यदानी । तुझी करणी अघटित ॥२९॥
सप्रेम भक्तीस्तव श्रीहरी । तिच्या पुत्राचें रूप धरी ।
तीस धरोनियां करी । देऊळा भीतरी नेतसे ॥२३०॥
पुजेचें सर्व साहित्य । निजांगे देतसे जगन्नाथ ।
ताहान भूक सांभाळी नित्य । उणें किंचित पडेना ॥३१॥
धन्य अमाईची भक्ती । बौध्द रूप असता श्रीपती ।
रूप नटोनि सहज स्थिती । सांभाळ करिती सर्वदा ॥३२॥
जो सनकादिकांचे ध्येय ध्यान । नीलग्रीवाचे देवतार्चन ।
तो निजदासाचें फेडावया ऋण । रूप सगुण धरितसे ॥३३॥
आदिमाया माता रुक्मिण । ते अमाईची जाहलीं सून ।
घरचा धंदा सारीतसे जाण । किंचित उणे पडेना ॥३४॥
जो परमात्मा शुध्द चैतन्य । मायातीत आनंदघन ।
तो अमाई सन्निध बैसोन । करवी भोजन निजप्रींतीं ॥३५॥
अमाई तयासि वचन बोलत । विठो तूं जेवीं मज सांगातें ।
अवश्य म्हणोनि पंढरीनाथ । ग्रास घेतसें प्रीतींनें ॥३६॥
महर्षि याग करिती जाण । तेथें नघेचि जो अवदान ।
तो सप्रेम भक्तांचें उच्छिष्ट अन्न । अति प्रीतींनें जेवितसे ॥३७॥
भक्तिभावे भुलला हरी । याति कुळ न विचारी ।
जैसा ज्याचा भाव अंतरीं । तैसा मुरारी होतसे ॥३८॥
असो यापरी जाहलें भोजन । करशुध्दि देत जगज्जीवन ।
आपुल्या हातीं विडा करून । तिज कारण देतसे ॥३९॥
अमाईसि हातीं धरोनि सहज । हळुच चाले गरुडध्वज ।
रुक्मिणीनें घातली बाज । तये शेजे निजविली ॥२४०॥
भक्ताच्या तनु त्यागीं निश्चित । परिचर्या करीं मीं अनंत ।
अष्टमाध्यायी बोलीलें गीतेंत । तैसाच करीत जगदात्मा ॥४१॥
सांडोनि महत्त्वाची थोरी । पांयत्याकडे बैसे श्रीहरी ।
स्वहस्तें तिचे चरण चुरी । नवल अंतरीं मज वाटे ॥४२॥
रुक्मिणी स्वहस्तें घालोनि न्हाण । वेणीफणी करी आपण ।
पाठ रगडीत निजप्रीतींनें । इतुकेंचि कारण भक्तीचें ॥४३॥
ऎसे जाहले बहुत दिवस । परी गांवांत न कळे कोणास ।
म्हणती सेजारी कोणी असे । तो अमाई प्रतिपाळी ॥४४॥
हरीची लीला अघटित जाण । कोणासि रुक्मिणी दिसे सून ।
कोणासि भासे शेजारीण । एकही ठिकाण कळों नेदी ॥४५॥
ऎसा लोटतां कांहीं काळ । तो अंत समय आला जवळ ।
दिव्य विमान ते वेळ । आणवी घननीळ तेधवां ॥४६॥
श्रावण शुध्द हरिदिनीं साचार । दिवस आला प्रथम प्रहर ।
उसा मांडी देवोनि सत्वर । सारंगधर काय करी ॥४७॥
अमाईचे आकर्षोनि प्राण । दिव्य देही केली न लगतां क्षण ।
विमानारूढ करोनि जाण । वैकुंठ भुवन पावली ॥४८॥
तिच्या पुत्रांचे रूप धरोनि । आप्त ग्रामवासी मेळवूनी ।
अग्नि संस्कार देवोनी । पाजीतसे पाणी जगदात्मा ॥४९॥
उत्तर कार्य यथास्थित । स्वयें करी अनाथ नाथ ।
तेरावे दिवशीं स्वयात । भोजन त्यातें घातलें ॥२५०॥
तो नव्लाख्याच्या उंबर्यांत निश्चिती । अमाईची सून होती ।
वृत्तांत कळता तिजप्रती । खेद चित्तीं करितसे ॥५१॥
आधींच होती गरोदर । तो पुत्र जाहला असे थोर ।
तयासि घेवोनि बरोबर । देहूस सत्वर ते आली ॥५२॥
लोकासि सखेद बोले मात । आमुचे लागले नाहींत हात ।
ते म्हणती तुम्हीच येथ । क्रिया समस्त केली कीं ॥५३॥
ऎसी ऎकोनियां वार्ता । विस्मित जाहली पुत्र माता ।
पुढिले अध्यायी रसाळ कथा । अवधान श्रोतीं मज द्यावें ॥५४॥
जो अनाथ बंधु करुणाकर । भीमातीरवासी रुक्मिणीवर ।
तो महीपतीचें बसवोनि अंतर । लेहवीत अक्षर ग्रंथार्थी ॥५५॥
स्वतिश्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।
प्रेमळ परिसोत भाविकभक्त । पंचविसावा अध्याय रसाळ हा ॥२५६॥ ॥अ० २५॥ ओ० २५६॥