श्रीगणेशाय नमः ।
अगाध लीला तुझी श्रीहरी । चरित्रें दाखविलीं नानापरी ।
भक्तांच्या अभयकर ठेऊनि शिरीं । भवसागरीं तारिलें त्यां ॥१॥
सप्रेम भक्तीचें देखोनि बळ । सदा तिष्टसी तयां जवळ ।
न विचारिसी याती कुळ । दीन दयाळ म्हणोनी ॥२॥
नामा जन्मला शिंपीयाचे पोटीं । त्याची भक्ती देखोनि गोमटी ।
तो त्वां आलिंगूनि धरिला पोटीं । मग जेविलासी ताटीं सांगातें ॥३॥
चोखामेळा जातीचा माहार । त्याचा अडणगुण होतांचि फार ।
तूं मागें खोवूनि पीतांबर । वोढिलीं ढोरें विठोबा ॥४॥
दामाजीपंत ब्राह्मण भोळा । धान्य लुटविलें जये वेळां ।
तूं विठों नाक् झालासी ते वेळां । चरित्रें गोपाळा हीं तुझीं ॥५॥
मिराबाईसी नृपवरें । विष पाजितां अति दुर्धर ।
तें तूं प्यालासि शार्ङगधर । तेणें हिरवें समग्र अंग झालें ॥६॥
कान्होपात्रा स्वरुपें गोमटी । तिसीं अविंध राजा छळितां कपटी ।
मग तुझा धांवा करितां संकटीं । उठाउठीं पावलासी ॥७॥
तिचें चैतन्य काढोनि त्वरित । तुवा मेळविलें आपणांत ।
देहाचा तरटि वृक्ष होत । अद्यापि देखत जनयात्रा ॥८॥
कबीर अविंध वैष्णवभक्त । तो श्रीराम भजनीं झाला रत ।
त्याचे शेले विणिसी हाते । ऐसी निजप्रीत भक्तांची ॥९॥
ज्ञानदेव सोपान निवृत्ती । मुक्ताबाई आदिशक्ती ।
यांचीं जनता वाढवावया कीर्ती । चालविली भिंती कवतुकें ॥१०॥
ऐसा तूं भक्ताभिमानी केवळ । अनाथ बंधु दीनदयाळ ।
मज अभय देऊनि ये वेळ । वदवी रसाळ निरुपण ॥११॥
मागिले अध्यायीं कथा गोमटी । ज्ञानदेव चांगयांसी जाहली भेटी ।
मग विश्रांत वटाच्या तळवटीं । बोलत गोष्टी बैसले ॥१२॥
निवृत्ती ज्ञानदेव सोपान । मुक्ताबाई सांगती खूण ।
आतां चागयासि उपदेश करुन । आत्मज्ञान सांगावें ॥१३॥
चौदाशें वर्षाचें पत्र । अद्यापि राहिलें असे कोरें ।
आतां त्यावरी लिहावें अक्षर । करिती विचार एकमेकां ॥१४॥
त्या उभयतांचा संवाद निश्चिती । जाहला असे सहज स्थिति ।
ते साक्षात अभंग लिहितों ग्रंथीं । तरी सादर संतीं परिसिजे ॥१५॥
संतमुखींचीं असतां अक्षरें । मग कांसया पाहिजे टीकाकार ।
साक्षात् असतां अवतार । मग भिंती वरील चित्र कां करुं ॥१६॥
गगनीं दिसतां वासरमणी । मग प्रतिबिंब कां पहावें नयनीं ।
भागीरथी संन्निध असोनी । मग चंबूंत पाणी कां ठेवूं ॥१७॥
मुखीं असोनि प्रसाद उत्तर । मग कासया करावें पाठांतर ।
राहावया असतां दिव्य मंदिर । मग कोंपट थोर बांधूं नये ॥१८॥
सन्निध असतां अमृतसिद्धी । तरी कां मेळवावी औषधी ।
म्हणोनि चांगयाचा अभंग त्रिशुद्धी । लिहितो पदसंधी यास्तव ॥१९॥
अभंग ॥ विश्रांत तळवटीं चांगदेवा भेटीं । परस्परें कसवटी अनुभवाची ॥१॥
निवृत्ती ज्ञानेश्वर म्हणती तुम्ही थोर । सर्वज्ञ उदार आम्हालागीं ॥२॥
भेदून षट्चकें साधिलें योगासीं । ऋद्धिसिद्धि दासी स्वयें केल्या ॥३॥
ऐकोनि उत्तर जोडी दोन्हीं कर । केला नमस्कार दीर्घदंडें ॥४॥
संतांच्या दर्शनें शुद्ध झालें मन । गेला अभिमान विरोनियां ॥५॥
काळवंचनेनें वांचविलें शरीर । पाहावे योगीश्वर तुम्हां ऐसे ॥६॥
वटेश्वर चांगा करीत विनंती । तोडा माझी गुंती संसाराची ॥७॥
ओव्या ॥ विश्रांत वटाखालीं जाण । निवृत्ती ज्ञानदेव सोपान ।
मुक्ताबाई गुणनिधान । चांगया कारणें भेटती ॥२०॥
मग परस्परें कसवटी । अनुभवसिद्ध बोलती गोष्टी ।
तेणें ब्रह्मानंद समाय पोटीं । होत सुखवृष्टी अनिवार ॥२१॥
निवृत्ती आणि ज्ञानेश्वर । चांगयासि म्हणती तुम्ही थोर ।
आम्हांलागी व्हावया उद्धार । मरुद्गण अवतार या लागीं ॥२२॥
षटचक्रें भेदूनि ऐसीं । सिद्धीस नेलें महा योगासीं ।
ऋद्धिसिद्धि करोनि दासी । कौतुक जनांसी दाखविलें ॥२३॥
ऐसी स्तुति ऐकोनि कानीं । दीर्घ दंडवत घातलें धरणीं ।
मग दोन्ही कर जोडोनी । अमृत वचनीं विनवित ॥२४॥
म्हणे धन्य आजिचा सुदिन । जाहलें संताचें दर्शन ।
विरोनि गेला अभिमान। शुद्ध मन पूर्ण झालें ॥२५॥
काळवंचना करुनि फार । यास्तव रक्षिलें शरीर ।
जें तुम्हां ऐसें योगेश्वर । दृष्टीसीं साचार पहावे ॥२६॥
ते मनोरथ फळले निश्चितीं । दृष्टीसीं देखिल्या संतमूर्ती ।
चांगा वटेश्वर करीतसे विनंती । संसार गुंती उगवावी ॥२७॥
ऐसें ऐकोनियां स्तवन । निवृत्ती ज्ञानदेव सोपान ।
मुक्ताबाई सांगती खूण । उपदेश करणें चांगयासी ॥२८॥
आधींच कनकाचें शुद्ध पात्र जाण । वरी प्रक्षाळिलें वैराग्य जीवन ।
तरी ज्ञानामृत सांठवून । ठेवितां जतन होय येथें ॥२९॥
कां उत्तम भूमि असतां सहज । त्यावरी वर्षला मेघराज ।
तरी तेथें स्वहस्तें पेरितां बीज । तेणेंचि साधिलें काज बहुतांचे ॥३०॥
जो अनिंदक अवंचक मती । अत्यंत भावें लावी प्रीती ।
ऐसा मित्र जोडिल्या निश्चितीं । तरी गोप्य त्याप्रती सांगिजे ॥३१॥
नातरी सुपुत्र सुलक्षणिक । विद्या वयें आगळा देख ।
त्यासि गुप्त ठेवणें सकळिक । पिता कवतुकें सांगतसे ॥३२॥
याज कारणें मुक्ताबायी । ऐसें ऐकूनी ते समयी ।
चांगयासि गुज सांगा कांहीं । बोलतसे कायीं आदिमाया ॥३३॥
अभंग ॥ हे मी हे मी प्रचित पाही । अनुभव आलिया भेदचि नाहीं ॥१॥
सोहंकार मनन संडी साच । मीपण नाहीं तेथें तूंपण कैचें ॥२॥
अहं ते मी सोहं ते गुज । मुक्ता म्हणे चांगया बुझ ॥३॥
ओव्या ॥ मुक्ताई म्हणे चांगया प्रती । मी कोण ऐसें वोळखे चित्तीं ।
आपण आपली सोडूनि भ्रांती । स्वरुपीं स्थिती समरसें ॥३४॥
ज्ञान वैराग्य सकळिक । त्रिगुणात्मक असे देख ।
त्वा विरहित निष्कलंक । पाहे सुख आपुलें तूं ॥३५॥
मुक्ताबाई म्हणे चांगया । सावध हो तूं लवलाह्या ।
आत्मबोधाची सकळ क्रिया । ते तुज सखया निरोपूं ॥३६॥
तूं जें जें देखसील दृष्टीं । तें आत्मवत मानी सकळसृष्टी ।
अनुभवें खूण येतां पोटीं । मग भेददृष्टी दिसेना ॥३७॥
सोहंकार मन सर्व करी । मीपण चित्तीं न ठेवी उरीं ।
तेव्हां तूंपणही होईल दुरी । न राहे उरी दोघांची ॥३८॥
अहंभाव तो मीपण जाण । सोहंतेची निजगुज पूर्ण ।
मुक्ताबाई चांगयासिं म्हणे । खूण समजणें अंतरीं ॥३९॥
ऐसीं ऐकूनि वचनामृतें । चांगदेव घाली दंडवतें ।
म्हणे चौदाशें वर्षेपर्यंत । भूमिगत धन होतें ॥४०॥
दंभधर्म दाखवावया जनीं । बैसलों व्याघ्राचे वहनीं ।
सर्पाचा चाबूक करोनी । भेटीं लागोनी पातलों ॥४१॥
जैसे आसुरी संपत्तीचे कुजन । तैसेचि होतें माझें मन ।
ऋद्धिसिद्धि वश करुन । मानीं थोरपण आपणासीं ॥४२॥
आतां तुमचें दर्शन होतां सांग । त्याचा मनांतून केला त्याग ।
तुम्हीं महेशा समान चौघे । तरी निववा निजांगें मज आतां ॥४३॥
ऐशा रीतीं चांगयानें । ग्लानी केली निरभिमानें ।
मग ज्ञानदेव बोलती वचनें । निजकृपेनें आपुल्या ॥४४॥
तुझी तुज लागतां शुद्धी । तेणें अखंड घडे समाधी ।
दंभधर्म उगी उपाधी । ही तो मंदबुद्धी सांडिजे राया ॥४५॥
तुझी माझी झाली भेटी । हे कर्पूर अग्नी पडली गांठी ।
क्षण एक लोटतां शेवटीं । दोन्ही दृष्टी न पडती ॥४६॥
सिद्धीचा अभिमान आंगीं धरीसी । तेणें सर्वस्वें नाडलासी ।
भ्रम लोभें लौकिकासीं । कासया भुललासी वाउगा ॥४७॥
ज्ञानदेव म्हणे वटेश्वरा । आतांच लपां निजघरा ।
तेणें सुख होय तुझ्या अंतरा । आणिक वेरझारा चुकतील ॥४८॥
योगसाधन परम कठिण । साधितां ऋद्धिसिद्धि करिती विघ्न ।
आत्मसुख न पाविजे तेणें । नाशवंत जाण अशाश्वत ॥४९॥
याचिलागीं सुगम सांगतों तुज । परिस माझ्या अंतरींचें गुज ।
इंद्रियें मन आंवरितां सहज । ब्रह्मज्ञान आज लाधसी तूं ॥५०॥
जेथें मन धांवोनि जाये । तरी तेथें तूं आपणासीच पाहे ।
ज्ञानदेव म्हणे चांगया हे । आत्मपद होय निर्गुण जे ॥५१॥
रजोगुण तूं सांडी सकळ । तमाचेंही खांडावें मूळ ।
शुद्ध सत्व मांडोनि केवळ । पाहे निश्चळ आपणा तें ॥५२॥
तूं काळाचा चोरटा संसारी । शरीर रक्षिलें आजिवरी ।
परी आत्मज्ञान न कळे अंतरीं । ठेविली उरी अहंतेची ॥५३॥
परी हें तों कर्म निश्चित दिसे । योगियांची खूण वेगळी असे ।
आम्हीं तेव्हांच संत म्हणें तुम्हांस । तमो गुणाचा नाश होय जेव्हां ॥५४॥
शब्दज्ञानाचे चाळे । उदंड करिताती कुचाळे ।
परी परब्रह्म तें असे वेगळें । बोलतां न कळे कोणासी ॥५५॥
सहा शास्त्रें अठरा पुराणे । चारी वेद आणि व्याकरण ।
मुखोद्गत केलिया संपूर्ण । परी ते निज खूण वेगळीच ॥५६॥
निराळीं म्हणों तरी त्यांतच असे । समजावें आप आपणास ।
मग जाहलिया आत्मप्रकाश । उरी मीपणास असेना ॥५७॥
ऐसें वटवृक्षाचें छायेसीं । ज्ञानदेव चांगयांतें उपदेशी ।
येरु निवाला निज मानसीं । सद्भावें चरणासीं लागत ॥५८॥
इतका संवाद तये क्षणीं । होतां मध्यान्हासि आला तरणी ।
मग ज्ञानदेव म्हणे निवृत्ति लागुनी । आश्रमासि घेऊनि यासि जावें ॥५९॥
ऐसें ऐकोनियां वचन । मंडळी सहित अवघे जग ।
आळंदी क्षेत्रीं प्रवेशोन । मठाश्रमा पातले ॥६०॥
तृणासनें मांडूनि ते समयीं । चांगयासि बैसविती ते ठायीं ।
ज्ञानदेव म्हणे मुक्ताबायी। पाकसिद्धि कांहीं करावी ॥६१॥
ऐसें सांगतां ज्ञानराया । अवश्य म्हणे आदिमाया ।
मग मृत्तिकापात्र घेवोनियां । गेली लवलाह्या परसांत ॥६२॥
तो लघुशंका करावयांसि पाहीं । चांगदेव आले तये ठायीं ।
नग्न देखोनि मुक्ताबायी । नेत्र लवलाही झांकिलें ॥६३॥
माघारें फिरतांचि त्वरेंसी । तंव मुक्ताबाई म्हणे त्यासीं ।
मेल्या निगुर्या परतोनि जासी । संदेह तुजसीं किमर्थ ॥६४॥
विषयवासना असे तुजसीं । आत्मज्ञानीं दक्ष नव्हेसी ।
स्त्री-पुरुष हा भास पाहसी । म्हणोनि जासी माघारा ॥६५॥
आत्मा आहे तुज आंत । आत्मा माझ्या शरीरांत ।
ऐसाचि भास पडिला तूतें । विकार चित्तांत मग आला ॥६६॥
वरी सोडूनि देहाचें कवच । आत्मरुप एक पाहे साच ।
अलंकार नानाप्रकारचे । एकच कनकाचे जेविं होती ॥६७॥
कापबाळ्या बुगडया जाण । हीं स्त्री पुरुष नामें दोन ।
सूक्ष्म दृष्टीं पाहतांचि पूर्ण । तंव कांचन एकची ॥६८॥
कां एक मृत्तिकेचे जाण । केले घागरी रांजण ।
परी ते मृत्तिका नव्हेचि भिन्न । आत्मवत तैसें जाण जग हें ॥६९॥
कां एक्याचि तंतूची पूर्ण । साडी शेला विणिला भिन्न ।
ती ही स्त्री-पुरुष नामें दोन । परी सूत तें जाण एकची ॥७०॥
तैसें स्त्री-पुरुष देह दिसतें वरी । परी आत्मा एक चराचरी ।
त्यासीच ओळखतां अंतरीं । तरी विषयविकारीं मन नये ॥७१॥
आपणचि व्यापक त्रिजगतीं । ऐसी जरी बाणली स्थिती ।
तरी कोणे ठायीं नव्हेचि आर्ती । सहज वृत्ति परिपूर्ण ॥७२॥
कुतरी मांजरी आणि गाय । हे वस्त्र नेसत असती काय ।
त्या पशु ऐसीच मीहीं आहें । तुज कां न ये प्रत्यय ॥७३॥
ऐसें मुक्ताबाईचें वचन । ऐकोनि चांगदेव कुंठित मन ।
म्हणे याचे तों अबाधित ज्ञान । म्हणोनि चरण धरितसे ॥७४॥
मग सत्वर मठांत येऊनि । स्वस्थ बैसले तृणासनीं ।
तों आणिक कौतुक दाखविलें नयनीं । तें सज्जनीं परिसावें ॥७५॥
एक शिष्य येऊनि लवलाहें । चांगदेवा म्हणे काय ।
स्वामी क्षुधा लागली आहे । काय उपाय करावा ॥७६॥
मग जोंधळे आणोनिया त्वरित । ग्रंथि का वस्त्रांत बांधित ।
त्याच्या मस्तकीं आपुल्या हातें । चांगदेव ठेवित तेधवां ॥७७॥
तों अघटित दिसोन येतसे चर्यां । तडतडा फुटती त्याच्या लाह्या ।
जैसा भुजारी भटी पेटवूनियां । भाजोनि लवलाह्या देतसे ॥७८॥
मग निवृत्ति आणि सोपानेश्वरा । ज्ञानदेव म्हणती त्या अवसरा ।
अझून सिद्धिच्या वागवीत घोरा । विरक्ति अंतरायासि नाहीं ॥७९॥
तंव निवृत्तिदेव म्हणती तेव्हां । आतां संतसंग जोडला बरवा ।
अनुग्रह होतांचि चांगदेवा । होईल विसांवा जिवासी ॥८०॥
पंचाग्नि चेतवावयाची पाहीं । आपुल्या पासीं हातवटी नाहीं ।
ऐसें भासलें याचे जीवीं । ते कळा दाखवी यासाठीं ॥८१॥
तरी कांहीं दाखवूनि चमत्कार । करावा गर्वाचा परिहार ।
ऐसें ऐकूनि ज्ञानेश्वर । मुक्ताबाईस उत्तर बोलती ॥८२॥
आजि तों चांगा वटेश्वर । आपुल्या आश्रमीं आले सत्वर ।
यांसि करावा पाहुणेर । सार्थक बरें तरीच ॥८३॥
ऐकूनि मुक्ता बोले सहज । खापर आणोनि द्यावें मज ।
यावरी म्हणे ज्ञानराज । करील काज सोपान हें ॥८४॥
मग साहित्य आणोनि सत्वर । मांडे लाटिले अरुवार ।
चुलींत सर्वथा न निघे धूर । पाहुणे बाहेर भुकेले ॥८५॥
ज्ञानदेव म्हणे करा स्नान । चांगदेव पाहे विलोकून ।
तों चुलीमाजीं नसेची अग्न । आश्चर्य मनीं करीतसे ॥८६॥
मंडळीसहित करोनि स्नान । पात्रावरी बैसले येऊन ।
तों ज्वाळा निघती मुखांतून । सोपानें पंचाग्न चेतविला ॥८७॥
जैसे तप्त कांचन लखलखीत । तैसी पाटी झाली आरक्त ।
त्यावरी मुक्ताबाई मांडे करीत । चांगदेव पाहात दृष्टीसीं ॥८८॥
म्हणे हा तों यांचा अघटित खेळ । केवळ परब्रह्मीचे पुतळे ।
योगाभ्यास जे बोलिले । ते सर्व जाहले यांपासुनी ॥८९॥
स्वात्मबोधाचिया ताटीं । त्यांत नवरस पक्क्वानें वाढिली गोमटीं ।
भूत कृपेची साकर मोठी । चवी गोमटी तिचेनीं ॥९०॥
सद्गुरुकृपेचे आज्य सत्वर । वाढीत मुक्ताबाई आपुल्या करें ।
ऐसीं वाढितां संपूर्ण पात्रें । नामघोष गजरें डुल्लती ॥९१॥
सर्व भूतीं भोक्ता श्रीहरी । संकल्प सोडिला ते अवसरीं ।
आपोशण करोनि सत्वरीं । ग्रास निजकरीं मग घेती ॥९२॥
जें जें जयासि रुचे जैसें । पात्रीं आणूनि वाढिती तैसें ।
तृप्ति जाहलिया सर्वांस । कर शुद्धीस मग घेती ॥९३॥
मुखशुद्धीस तुळसी पानें । सोपान देतसे सकळांकारणें ।
ऐशा रीतीं झालीं भोजनें । मग स्वस्थ मनें बैसले ॥९४॥
तंव ज्ञानदेव बोलत वाचा । धन्य दिवस सुदिन आजिचा ।
समागम जोडला संतांचा । लाभ दर्शनाचा दीधला ॥९५॥
तों प्रसाद घेऊनि लवलाहीं । बाहेर आली मुक्ताबाई ।
सप्रेम भाव धरोनि जीवीं । लागतसे पायीं निवृत्तीच्या ॥९६॥
ऐशा रीतीं संतपूजन । झाली सकळांची भोजनें ।
तंव चांगदेव सन्निध येऊन । मुक्ताबाई नमन करीतसे ॥९७॥
हात जोडूनि ते वेळे । उभा राहिला चौघां जवळ ।
म्हणे पत्रिकेचा अर्थ नकळे। तो मज सकळ सांगावा ॥९८॥
सकळ साधनांमाजी श्रेष्ठ । संत समागम दिसे वरिष्ठ ।
ऐसें मुनि वदले स्पष्ट । ते आजि गोष्ट मज फावली ॥९९॥
ऐसें पुसतां योगेश्वर । काय म्हणती ज्ञानेश्वर ।
बळी द्यावया पत्रिकेवर । एक शिष्य सत्वर तुम्हीं द्यावा ॥१००॥
तेव्हांचि अर्थ पत्रिकेचा । तुमचें चित्तीं बिंबेल साचा ।
शब्द ऐकूनि ज्ञानदेवाचा । अवश्य इंद्राचा गण म्हणे ॥१॥
चौदाशें शिष्य मंडळी । त्यांतून एक देऊं बळी ।
विचार करुन रात्री काळीं । मग सकाळीं सांगूं तुम्हां ॥२॥
ऐकून सद्गुरुचें उत्तर । तों शिष्य जाहले चिंतातुर ।
म्हणती कोणाच्या जीवावर । झाले उदार कळेना ॥३॥
ऐसें बोलोनि ते समयीं । मग कुस्मुसिती आपुले जीवीं ।
चैन न पडे कोणासही । देह लोभ पाहीं अनिवार ॥४॥
ऐसा विचार करिती एका । ऊठ बैस करिती देखा ।
वर्षा येवढी लोटे घटिका । करिती टीका मागें पुढें ॥५॥
पंक्तिसि जेवलों आजवर । भोगिले नाना उपचार ।
त्याचें वोढें निघालें सत्वर । ऐसें परस्पर बोलती ॥६॥
स्वामींनीं अभय ठेविला शिरीं । संतती संपत्ती आली घरीं ।
त्याचेंच वोढें निघाले त्वरीं । उत्तम परी दिसेना ॥७॥
एक म्हणती संचिती जैसें । तें घडोनि आलें अनायासें ।
स्वामींनीं फुकट घेतला वेश । मोहनी सर्वांस घालूनी ॥८॥
नानापरीचे साबरी मंत्र । शिकवूनि बुडविलें आमचें घर ।
आतां गोष्ट आली जिवावर । उत्तम विचार दिसेना ॥९॥
चौदाशें शिष्य ऐशा रीतीं । नानापरीच्या कल्पना करिती ।
तों अस्तमानासि गेला गभस्ती । मग संध्या करिती चांगदेव ॥११०॥
नित्य नेम हरिकीर्तन । करिती ज्ञानदेव सोपान ।
निवृत्ति चांगदेव बैसोनि । ऐकती गुण श्रीहरीचे ॥११॥
नामा येवढे साधन आणिक । कलियुगीं सर्वथा नाहीं देख ।
ऐसें भागवतीं बोलले शुक । विश्वोद्धारक जगद्गुरु ॥१२॥
कर्मारंभीं उच्चारण । म्हणती केशव नारायण ।
शेवटीं करिती विष्णुस्मरण । न्यून ते पूर्ण होय नामे ॥१३॥
अजामिळ वृषलीसीं रत । तेणें पातक जाहलें अद्भुत ।
तों पुत्र मिसें नाम जपत । मग वैकुंठनाथ पावला ॥१४॥
विमानी बैसवूनि अवचिता । मुक्ति दीधली सायुज्यता ।
आणि शुकमिसें राघव म्हणतां । कुंटिणी सर्वथा उद्धरली ॥१५॥
योग मार्ग बहुत कठिण । विरळा साधी लक्षांतून ।
भाळ्याभोळ्यां सकळां कारणें । नामचि पावन करीतसे ॥१६॥
हरिहर सर्वदा म्हणती पाहीं । चारी मुक्ती लागती पायीं ।
महादोषासि ठाव नाहीं । त्रैलोक्य सर्वही उद्धरे ॥१७॥
व्हावया जडमूढ उद्धार । पुंडलीकें केला उपकार ।
साक्षात परब्रह्म विटेवर । दर्शनेंच उद्धार सकळांसी ॥१८॥
श्रीज्ञानदेवें ऐशा रीतीं । कीर्तनीं स्थापिली सगुणमूर्ती ।
मग उजळूनि मंगळ आरती । रुक्मिणी पती वोवाळिला ॥१९॥
खिरापती वांटूनि सकळां कारणें । मग निवृत्ति देवासिं केलें नमन ।
घालूनियां तृणासन । निद्रेसि मान ते देती ॥१२०॥
चांगदेव जावोनि एकांतीं । शयन करीत मध्यरात्रीं ।
शिष्य संप्रदायीं जवळ येती । सेवा करिती निज हस्तें ॥२१॥
तयांसि एकांतीं योगेश्वर । स्वमुखें पुसतसे विचार ।
ज्ञानदेवें आम्हांसि लिहिलें पत्र । परी सखोल फार अर्थ त्याचा ॥२२॥
तो विचारुनि घ्यावया प्रांजळ । एका पुरुषाची पाहिजे बळ ।
तरी तुम्हीं विचार करुनि सकळ । पुरवा तत्काळ आर्त माझें ॥२३॥
ऐसें पुसतां सद्गुरु मूर्ती । शिष्य तयासि उत्तर देती ।
शरीर अर्पिलें तुम्हांप्रती । आतां कळेल युक्ती ते करावी ॥२४॥
देहाचा लोभ धरुनि चित्तीं । वरदळ वैराग्य दाविती ।
तयांस ऐहिक परत्र निश्चितीं । नाहीं गतीं सर्वथा ॥२५॥
जैसें कडू वृंदावन देख । दिसे जैसें मोहरवाळुक ।
चिरोनि पहाता अंतरीं विख । तैसे मायिक शिष्य त्याचे ॥२६॥
नातरीं मुलामियाची मोहर । साजिरी दिसतसे वरवर ।
सुलाखोनि पाहतां साचार । तों पोटीं ताम्र भरीयेलें ॥२७॥
कां फांसा घालावया निश्चित । वैष्णव वेष मैंद घेत ।
बाह्याकारें भाव दावित । जळो संगत तयाची ॥२८॥
तैसी कामनिकांची भक्ती । चित्तीं इच्छिती धनसंपत्ती ।
पूर्ण होतां आपुली आर्ती । मग उपेक्षिती सद्गुरुतें ॥२९॥
तैसे चांगयाचे शिष्य निश्चित । वरिवरि लटिलाचि भाव दावित ।
मग स्वामीस निद्रा लागतां बहुत । विचार करिती एकमेकां ॥१३०॥
आपण राहिलों या जवळीं । यास्तव मनुष्याचा मागती बळी ।
दिवस उगवतां सकळीं । मरण तत्काळीं पातलें ॥३१॥
स्वामीस शिष्य बहुत देख । परी ज्याचा जीव तयासिं एक ।
आतां विचार करोनि सकळीक । निघा सत्वर येथूनियां ॥३२॥
स्वामी तों शिष्य करितील आणिक । परी आपुल्या बायकोस आपण एक ।
गोमीचा पाय मोडला देख । तरी असती आणिक तिजलागीं ॥३३॥
गुरु रुढ मिथ्या विचारु । आम्हांसि आवडे संसारु ।
ऐसें बोलोनि परस्परु । पळाले सत्वरु अवघेची ॥३४॥
चौदाशतें संप्रदायी । परी एकही त्यांतून राहिला नाही ।
हे ज्ञानदेवें युक्ति केली पाहीं । पाश सर्वही तोडिले ॥३५॥
गृहस्थाश्रमा परीस जाण । मठाश्रम परम कठिण ।
त्याचा त्याग कोणा कारणें । नव्हेचि जाण सर्वथा ॥३६॥
जरी कृपा करील श्रीहरी । तरीच महंती होईल दुरी ।
नाहीं तरी माझे अंतरी । उत्तम परी दिसेना ॥३७॥
असो ज्ञानदेव करुनियां युक्त । शिष्य पळोनि गेले समस्त ।
तों चांगदेव जाहले जागृत । हाक मारित शिष्यांतें ॥३८॥
परी सन्निध न दिसे एकही नयनीं । जाबही परतोनि न देच कोणी ।
जैसा नृप पडतां रणीं । देह लोभी पळोनी जाती ॥३९॥
चांगयाचे शिष्य चौदा शतें । परी एकही राहिला नाहीं त्यांत ।
मग आपुल्या हातें उदक घेत । आचमन करित निजहस्तें ॥१४०॥
प्रातःस्मरण कांकड आरती । चांगदेव म्हणतसे निजप्रीतीं ।
तों ज्ञानदेव दर्शनास येती । नमस्कार करिती परस्परें ॥४१॥
चांगयाप्रती बोलती वचन । आजि उत्तम मुहूर्त असे सुदिन ।
पत्रार्थ व्हावया श्रवण । बळिदानास कोण शिष्य देतां ॥४२॥
हाक मारितां लवलाही । परी कोणीच उत्तर न देती पाहीं ।
पळाले जाणोनि ते समयीं । पश्चात्ताप जीवीं वाटला ॥४३॥
म्हणे सिद्धाईचा घालूनि प्रसर । उगाचि श्रमलों आजवर ।
अंतीं अवघेचि गेले दूर । जीवावर गोष्ट येतां ॥४४॥
बहुत संप्रदायीं करुन । कोणीच प्रसंगीं नाहीं जाण ।
जेव्हां ऐसें तें महंतपण । नाशवंत जाण सर्वस्वें ॥४५॥
चौदा विद्या चौसष्टीकळा । अभ्यासून म्यां श्रम केला ।
सिद्धींचा सोहाळा जनासिं दाखविला । योग साधिला अष्टांग ॥४६॥
इतुका श्रम केला बरवा । परी जीवासि नाहीं विसांवा ।
आतां राहूनि संताच्या गांवा । करावी सेवा निरंतर ॥४७॥
ऐसा अनुताप धरोनि मनीं । ज्ञानदेवासि म्हणे तये क्षणीं ।
आतां माजा देह बळि देऊनी । अर्थ कानीं सांगावा ॥४८॥
जीवाचें भय धरुनि मनीं । शिष्य गेले असती पळोनी ।
एकला उरलों ये ठिकाणीं । आतां कळेल करणी तैसी करा ॥४९॥
तनुमन आणि सिद्धीचें धन । यांसहित आलों शरण ।
असत्य असेल हें वचन । तरी अंतःकरण जाणतसां ॥१५०॥
ऐसी चांगयाची वचनोक्ती । ऐकोनि ज्ञानदेव संतोषले चित्तीं ।
मग निवृत्तीसीं वृत्तांत सांगती । चांगयाची गुंती उगवली ॥५१॥
दांभिक उपाधि होती जवळ । ते शिष्य पळोनि गेले रातीं ।
ऐसें बोलतां श्रीनिवृत्ती । मुक्ताई हांसती गदगदां ॥५३॥
मग निवृत्ति ज्ञानदेव सोपान । मुक्ताबाई सांगती खुण ।
चांगदेवासिं उपदेश देणें । निजकृपेनें आपुल्या ॥५४॥
आधींच शुद्धपात्र देखूनि भलें । त्यावरी वैराग्य ठसवले ।
स्नान करोनि नित्य नेम सरिले । सन्निध बैसविलें चांगयासीं ॥५५॥
मग स्वमुखें एक अभंग पाही । उपदेश करीत मुक्ताबायी ।
तो ग्रंथीं लिहितों ये समयीं । ऐका सर्वही भाविकहो ॥५६॥
अभंग ॥ मी कोण हें वोळखावें ।
आपण आपणा पाहावें । स्वरुपीं समरसावें रात्रंदिवस ॥१॥
त्रिगुणावरुतें ज्ञान पैं निश्चित । तथा पैं निरुतें घेई बापा ॥२॥
मुक्ताबाई म्हणे होई तूं सावध । सांगीतल्या बोध पुढील तो ॥३॥
ओव्या ॥ ऐशा रीतीं ते समयीं । अनुग्रह करीत मुक्ताबायी ।
पूर्ण बोध ठसावला देहीं । मग चांगया पायीं लागला ॥५७॥
दृष्टीसि दिसतें चराचर । तो अवघाचि भासे विश्वंभर ।
आपणासहित त्यामाजीं विरे । द्वैत अणुमात्र असेना ॥५८॥
चौदाविद्या चौसष्टी कळांचा । अभिमान गळाला सिद्धीचा ।
बोध होतांचि मुक्ताईचा । विसर देहाचा पडियेला ॥५९॥
चराचर जें जें दिसे । तो अवघा पांडुरंग एक भासे ।
जागृती स्वप्नीं तोचि दिसे । गेलें काळ घसें अविद्येचें ॥१६०॥
ब्रह्मरुप अवघे जन । सर्वत्र चैतन्य व्यापक पूर्ण ।
सद्गुरु कृपें जाहलें ज्ञान । नाहीं खंडण तयासी ॥६१॥
सद्गुरु कृपेवीण कांहीं । आत्मज्ञान सर्वथा होणेचि नाहीं ।
ऐसें श्रुतिवाक्य असे पाहीं । सिद्धांत ग्वाही याचि रीती ॥६२॥
ज्ञानदेवाचे संगतीस । रात्रीं ऐकती कीर्तन घोष ।
श्रवण मनन रात्रंदिवस । ऐसा एकमास लोटला ॥६३॥
संत संगें श्रवण मनन । अनुभवें निदिध्यास लागला पूर्ण ।
तेणें साक्षात्कारासि येऊन । वृत्ति संपूर्ण मुराली ॥६४॥
तंव ज्ञानराज म्हणे चांगयाप्रती । एक मास लोटला आमुचे संगती ।
पत्राचा अर्थ बाणला चित्तीं । हें मजप्रती सांगावे ॥६५॥
ऐसें पुसतांचि उत्तर । सद्भावें लोटत चरणावर ।
मग चांगदेव बोलिले अभंग सत्वर । तो ऐका सादर निजकर्णीं ॥६६॥
अभंग ॥ वळेनावरसेंवरव पूर आला । तेथें जन बुडाला बाईयानों ।
बुडाला बुडाला परी म्हणती । बुडाल्याची शुद्धी कोणी न घेती ॥२॥
ऐल बुडाला पैल बुडाला । कोरडयाच डोही जन बुडाला ॥३॥
ज्ञानदेव सांगडी मुक्ताबाई तारु । चांगा पैल पारु पावविला ॥४॥
ओव्या । ऐसे म्हणोनि ते अवसरीं । चौघा जणांसि नमस्कारी ।
म्हणे तुमचे कृपेनें सत्वर । बोध अंतरीं ठसावला ॥६७॥
पत्राचें उत्तर ऐकोनि कानीं । ज्ञानदेव संतोषले मनीं ।
म्हणे तुम्हीं जन्मास येउनी । आपणालागीं रक्षिलें ॥६८॥
तंव मुक्ताबाई बोले उत्तर । चौदाशे वर्षाचें शरीर ।
जाहलें असे तुझे अमर । आतां सांगेन विचार तो ऐका ॥६९॥
हा देह सांडूनि पाही । दुसरा जन्म सत्वरी घेयी ।
मग विष्णु उपासना धरोनि जीवीं । सप्रेम भावी अर्चिजे ॥१७०॥
श्रीपांडुरंगाच्या भक्तीविण । सर्वथा नव्हे सात्त्विक गुण ।
सगुण मूर्तीचें उपासन । निज प्रीतीनें करावें ॥७१॥
श्रीरामकृष्णादि चरित्रें थोर । कीर्तनीं गावीं परमादर ।
तेणेंचि होईल जगदुद्धार । पुण्यासि पार असेना ॥७२॥
कीर्तनाहूनि आणिक साधन । कलियुगीं वरिष्ठ नसेचि जाण ।
तरी आतां पंढरीस जाऊन । रुक्मिणीरमण वोळखावा ॥७३॥
ऐसें सांगतां सद्गुरुमाय । मग चांगदेवें धरिलें पाय ।
म्हणे तुमची आज्ञा प्रमाण होय । नुलंधीं पाहे अणुमात्र ॥७४॥
ऐसें म्हणोनि ते अवसरीं । चौघाजणांसि नमस्कारी ।
साष्टांग नमस्कार धरणीवरी । चांगदेव करी तेधवां ॥७५॥
सद्गुरुपूजा करीन आतां । ऐसें आर्त धरितसे चित्तां ।
जेणें भवपार पावविलें आतां । त्यासि उत्तीर्णता कैसेनी ॥७६॥
मग यथा विधी वेदोक्त मंत्रें । पूजा केली षोडशोपचारें ।
चंदन पुष्पें उपचार । तुळसी हार समर्पिले ॥७७॥
धूप दीप पंचारती । वोवाळीली सद्गुरुमूर्ती ।
नैवेद्य दक्षिणा अर्पूनि प्रीतीं । खिरापती वांटिल्या ॥७८॥
श्रीविठ्ठल नामाचा करुनि गजर । घालीत साष्टांग नमस्कार ।
म्हणे धन्य निवृत्ति योगेश्वर । अवतरला शंकर भूमंडळीं ॥७९॥
धन्य ज्ञानदेव सद्गुरुमूर्ती । विष्णु अवतार जन्मला क्षितीं ।
याच्या दर्शनमात्रें निश्चिती । जीव उद्धरती असंख्य ॥१८०॥
सोपानेश्वर हा प्रजापती । मुक्ताबाई आदिशक्ति ।
हे नाममात्रें जगासि तारिती । केली स्तुती चांगदेवें ॥८१॥
पुष्पांजळी मंत्र घोषें । भावें नमस्कार घालीतसे ।
चांगदेव आज्ञा मागतसे । वटेश्वरास जावया ॥८२॥
चांगदेवाचा तये वेळां । सद्गदित दाटलासे गळा ।
आनंदाश्रु वाहती डोळां । म्हणे धन्य सोहळा देखिला ॥८३॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान । मुक्ताबाई गुणनिधान ।
बोळवीत चालिले चौघेजण । निजप्रीतीनें आपुल्या ॥८४॥
चांगदेवें त्यांचे वंदोनि पाय । मग निघता झाला लवलाहें ।
क्षणक्षणा मागें परतोनि पाहें । प्रेम न समाये अंतरीं ॥८५॥
बोलवूनि चांगदेवा कारणें । मठासिं आलें चौघेजण ।
ध्यानींमनीं जगज्जीवन । आणिक कारण असेना ॥८६॥
जागृतीं स्वप्नीं सुषुप्तीं । चित्तीं भरली पांडुरंगमूर्ती ।
कीर्तन घोष रात्रीं करिती । श्रवणीं ऐकती क्षेत्रवासी ॥८७॥
दिवसां वेदांत ज्ञानेश्वरी । नित्य वाचिती सहपरिवारीं ।
धन्य क्षेत्र अळंकापुरी । जैसी पंढरी वैकुंठ ॥८८॥
धन्य धन्य ते पंचक्रोशी । ज्ञानदेव सन्निध त्यासी ।
धन्य वैष्णव क्षेत्रवासी । सान्निध्य त्यासी देवाचें ॥८९॥
धन्य तें इंद्रायणी तीर । जें सकळ तीर्थांचें माहेर ।
मध्यान्हीं सकळ सुरवर । येती सत्वर स्नानासीं ॥१९०॥
तिहीं लोकींचीं तीर्थें पाहीं । सदा वसती संतांचे गांवीं ।
मग पुनीत होऊन लवलाहीं । जन सर्वही उद्धरती ॥९१॥
जेथें अवतरलें वैष्णव वीर । तें गांव साक्षात वैकुंठपुर ।
तेथें सर्वदा होय कीर्तन गजर । यम किंकर पळताती ॥९२॥
संत वसती जे गांवीं । तेथें कळिकाळासी रीध नाहीं ।
चतुर्भुज लोक होती सर्वही । हेचि नवायी अगाध ॥९३॥
अहो भक्तलीलामृत ग्रंथसार । हेचि पंढरी पावन क्षेत्र ।
सद्भाव पुंडलीक वैष्णव वीर । तेथें निरंतर राहिला ॥९४॥
मुक्ती वरील चौथी भक्ती । तेचि चंद्रभागा भीमरथी ।
जिच्या दर्शनमात्रें निश्चितीं । जीव उद्धरती असंख्य ॥९५॥
पूर्ण सुखाचा ब्रह्मांनंद । तोचि जाणावा वेणुनाद ।
तेथें मुरली वाजवीत नानाछंदें । उभा गोविंद राहिला ॥९६॥
करद्वय ठेवूनि कटीं । विटेवरी उभा जगजेठी ।
भाविक भक्तांसि देऊनि भेटी । हृदय संपुटीं धरीतसे ॥९७॥
तो हा सांवळा जगज्जीवन । नासाग्री ठेवितसे ध्यान ।
महीपति त्याचीं पाउलें सेवून । निजप्रीतीनें आठवी ॥९८॥
स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।
सदा परिसोत भाविकभक्त । पंचमाध्याय रसाळ हा ॥१९९॥
अभंग व ओंव्या मिळून संख्या ॥२०२॥अ० ॥५॥