श्रीगणेशाय नमः ॥
जय जय सच्चिदानंद परब्रह्म मूर्ती । अपरिमित तुझी सत्कीर्ती ।
महिमा वर्णिता शिणल्या श्रुती । कंठित मती शास्त्रांची ॥१॥
तुझे पवाडे देवाधिदेवा । वदतां शिणला चक्षुःश्रवा ।
ठक पडिलें कलोद्भवा । आमुचा केवा तो किती ॥२॥
बालक बोले बोबडें वचन । ऎकोनि मातेसी समाधान ।
शुध्द पुसे पडताळून । निजप्रीतीनें आपुल्या ॥३॥
तैशाच परी रुक्मिणीपती । भक्त आर्ष करितां स्तुती ।
तैं तुज वचनें गोड लागती । सप्रेम भक्तीचेनि बळें ॥४॥
शाहाणपणें वेद जाहला मुका । बांधितां गौळणी तुज भाविका ।
तयासि भिऊनि वागसी निका । विश्वोध्दारका जगद्गुरु ॥५॥
तुझा व्हावया साक्षात् कार । महर्षि यजिती थोर थोर ।
तो तूं भिल्लीणीचीं उच्छिष्ट बोरे । खातोसि आदरें नवल कीं ॥६॥
तूं ब्रह्मयाचा तात केवळ । आणि यशोदेचा म्हणविसी बाळ ।
अंकीं लोळसी सर्वकाळ । नसतीच आळ घेउनी ॥७॥
दुर्योधन सार्वभौम नृपवर । न घेसी त्याचा सन्मान आदर ।
आणि दासी पुत्र भक्त विदुर । धुंडिसी घर तयाचें ॥८॥
सप्रेम भक्तीची देखोनि चट । खासी गोपाळांचीं उच्छिष्टें ।
लोटोनि पक्वान्नाचें ताट । मागसी देंठ भाजीचा ॥९॥
तैशाच रीतीं करुणाघनें । अंगीकारावी आर्ष वचनें ।
चित्तीं देऊनि आठवण । वदवीं गुण संतांचे ॥१०॥
मागिल्या अध्यायाचे शेवटीं । तुकयासि निरधिली संसार रहाटी ।
वैश्य व्यवसाय उघडतां दृष्टीं । संतोष पोटी वडिलांतें ॥११॥
माता पिता बंधु सज्जन । घरीं उदंड धन धान्य ।
शरीरीं आरोग्य लोकांत मान्य । एकही उणें असेना ॥१२॥
ऎसें असतां तये वेळ । प्रपंचीं चित्त रमलें केवळ ।
तों पुढें विपरीत ओढवलें तत्काळ । तें ऎका प्रेमळ भाविकहो ॥१३॥
सुखापुढें येतसें दुःख । हें अनादि सिध्द भविष्य कारक ।
कीं हरिखापुढें सवेचि शोक । देखती लोक दृष्टीसीं ॥१४॥
जैसा मावळतां दिनकर । तितुकाचि पडे अहंकार ।
कीं आधीं धान्य पिके अपार । मग दुष्काळ थोर ये पुढें ॥१५॥
नातरी अत्यंत मैत्रि की जेथें । सवेचि विकल्प येतसे तेथें ।
बहुत सन्मान जाहला जेथें । तरी निंदाही तेथें उद्भवे ॥१६॥
कीं देह श्लाघ्यता मानितां भोग । तंव शरीरीं उद्भवे रोग ।
अमृत मंथूनि काढितां मागें । विषही मग प्रगटलें ॥१७॥
संसारीं सुख मानितां प्रीतीं । तैसाचि जाहलें तुकया प्रती ।
पुढें त्रिताप उद्भवे चित्तीं । कैशा रीतीं ते ऎका ॥१८॥
आयुष्य सरोनि गेलिया तत्वतां । वैकुंठासि गेलीं मातापिता ।
तेणें तुकयाच्या चित्ता । खेद सर्वथा नावरे ॥१९॥
बंधु बहीण शोक करी । तेणें अधिकचि दुःख वाटे अंतरीं ।
म्हणे संसार ओझें आपुलें शिरीं । कैसी परी होईल ॥२०॥
ऎशा रीतीं चिंता करितां । सवेंचि धीर देतसे चित्ता ।
म्हणे होणार ते झालें आतां । नोहे अन्यथा माझेनी ॥२१॥
ऎसा चित्तासि देतां धीर । तों वडिल सावजी सहोदर ।
त्याची स्त्री पावली परत्र । तेणेंही अंतर दुखवलें ॥२२॥
सावजी आधींच होता उदास । मानीं संसाराचा त्रास ।
त्यावरी कांतेचा होता पाश । तोही अनायासें निरसला ॥२३॥
परम अनुताप धरूनि मनीं । बंधु तो गेला तीर्थाटणीं ।
मुखीं अमृत संजीवनी । नामस्मरणीं सर्वदा ॥२४॥
सप्तपुर्या ज्योतिर्लिंगें बारा । दृष्टीसीं पाहिलीं त्या अवसरा ।
पुष्करादि तीर्थे करोनि सत्वरा । दुस्तरा संसारा निवटिलें ॥२५॥
कायिक वाचिक मानसिक । तपें आचरला स्वाभाविक ।
षड्वैरी जिंकोनि देख । शांति सुख पावला ॥२६॥
सर्व तीर्थे करोनि जाणा । मागुती आला आनंदवना ।
संत समागम धरोनि नाना । आत्म साधना विचारी ॥२७॥
आत्मस्थिती पावोनि पूर्ण । जाहलें स्वस्वरूपीं समाधान ।
असो इकडे अनुसंधान । ऎका सज्जन निजप्रीतीं ॥२८॥
देहुसि तुका वैष्णव । खेद करित नित्य नित्य ।
म्हणे मातापिता क्रमिलीं निश्चित । बंधूची गत हे झाली ॥२९॥
कांता जिवंत असती जरी । मग फिरोनि येता कधीं तरी ।
आधींच उदास होता अंतरीं । फावली बरी संधि आतां ॥३०॥
म्हणे रुक्मिणीवरा पंढरीनाथा । जोंवरी होतीं मातापिता ।
तोंवरी मज नव्हती एकही चिंता । तरी कैसें आतां करावें ॥३१॥
पितयाचें धन होतें बहुत । तेंही जाहलें वाताहत ।
जैसी शीत काळ येतां अभ्र समस्त । विलया जात आकाशीं ॥३२॥
कीं पृथ्वीवरी तृणांकुर असती । ते उष्णकालीं वाळोनि जाती ।
कीं अभ्रच्छायेच्या बैसतां वस्ती । ती नाहींच होतीं क्षणमात्रें ॥३३॥
कीं इंद्रधनुष्य दिसतां पाहे । परी क्षण लोटतां नाहींसें होय ।
ना तरी तरंगाचा स्वभाव काय । अक्षय आहे विचारा ॥३४॥
तैसें तुकयाचें धनधान्य समस्त । अटोनि गेलें जेथील तेथ ।
यास्तव होऊनि चिंताक्रांत । म्हणे कैसी मात करावी ॥३५॥
आपुलें द्रव्य दुसर्यावर । ते बोलो न देती साचार ।
उदीम न चले अणुमात्र । कैसा विचार करावा ॥३६॥
कुटुंबवत्सल खर्च पदरीं । म्हणोनि धांवे हटबाजारीं ।
द्रव्यासाठी नानापरी । प्रयत्न करी बहु फार ॥३७॥
येणेंही नयेचि पुरवठा । मग दुकान मांडोनि बैसे चोहटा ।
वाचेसि हरिनामाचा फांटा । व्यापार खोटा न करवे ॥३८॥
म्हणे उणेम द्यावें कोणास । तरी असत्य वर्ततां महादॊष ।
गिर्हाईक मागतसे जैसें । धारणें विशेष तें द्यावें ॥३९॥
सर्वभूतीं दयापूर्ण । असत्य सर्वथा न बोले वचन ।
वाचेसि अखंड हरिस्मरण । एकही क्षण न विसंबे ॥४०॥
ऎसी स्थिती देखोनि पाहें । देव कसवटी लाविताहे ।
याही व्यापारें पुरवठा नये । मग आणिक उपाय करितसे ॥४१॥
वैश्यव्यवसाय नानाविध करी । परी कोठेंही साह्य न होचि श्रीहरि ।
चित्तीं कष्टी होतसे भारी । आटती परी देखोनी ॥४२॥
आपण कष्टोनि रात्रंदिवस । ढोरावरी गोण्या वाहतसे ।
शीत उष्ण निद्रा आळस । कांहींच ध्यानास आणीना ॥४३॥
आणिक कर्ज घेऊनि फार । मागुती धंदा केला थोर ।
परी नफा न होय आणुमात्र । चिंतातुर यासाठीं ॥४४॥
आणिक ऋण घेऊनि पाहे । कांहीं हातवटी करूं जाय ।
तेणेंही न दिसेचि सोय । म्हणे करावें काय विठोबा ॥४५॥
बहुत कष्टी होऊनि चित्तीं । स्मरण करीत अहोरातीं ।
कांहीं ऋण घेऊनि मागुतीं । वस्तभाव होती तेही मोडिली ॥४६॥
वजन करोनि हिशोब पाहत । घरीं वाणी मिळेल समस्त ।
तंव ते अधिकचि आलें आंत । कैसी मात करावी ॥४७॥
सोयरे पिशुन ते वेळे । म्हणती याचें तें निघालें दिवाळें ।
सावकार येऊनि द्वारीं बैसले । आश्रुपातें भरले नेत्र तेव्हां ॥४८॥
म्हणे देवाधिदेव रुक्मिणीकांता । कैसी विपरीत केली वार्ता ।
काय संसारासि करूं आतां । म्हणवोनि चिंताक्रांत मनीं ॥४९॥
तेव्हां इष्टमित्र आप्तसंबंधीं । रक्षिते जाहले तये संधी ।
कोणी हवाले घेतले त्रिशुध्दी । आपणांसि उपाधी लागावया ॥५०॥
कोणी आपली दाखवूनि पत । आणि कर्ज काढोनि देत ।
तुकयासि करोनि फजीत । काय सांगत तेधवा ॥५१॥
तूं तरी जाहलासि परमार्थी । नाम जपतोसि अहोराती ।
यास्तव संसारी जाहली फजीती । तरी विठ्ठल चित्तीं न धरावा ॥५२॥
विष्णुभक्ति करितां साचार । कोणाचे नाहीं जाहलें बरें ।
सांगत गेले आमुचें पितर । अनुभवें साचार तूं पाही ॥५३॥
संसारयुक्ति मुख्य हें नकळें । आणि नाम जपतोसि सर्वकाळ ।
तरी हे साच भविष्य केवळ । भिकेचे डोहळे तुज आले ॥५४॥
हितास्तव देतो शिकवण । यास्तव अंतरीं कोपाल झणें ।
आमुचें नायकोनि कराल भजन । तरीं अधिकचि ऋण होईल ॥५५॥
ऎसें शिकवोनि त्या अवसरा । वाणी गेले आपुल्यां घरां ।
हळहळ करिती दारा । म्हणती संसारा काय करूं ॥५६॥
घरधनियास जैंपासून । विठोबाचें लागलें ध्यान ।
आम्हीं उठलों माणसांतून । खावयासि अन्न मिळेना ॥५७॥
घरीं कांता ऎशा रीती । नानापरीचे अपशब्द बोलती ।
बाहेर पिशुन सर्व हांसती । परी निश्चय चित्तीं सोडीना ॥५८॥
सप्रेमभावे तये क्षणी । जिव्हा रंगली नामस्मरणी ।
घरीं हळहळ करिती राणी । गेलो म्हणोनि उदिमासी ॥५९॥
चार ढोरें होतीं जाण । रोग होतांचि गेलीं तीन ।
कसोनि पाहे रुक्मिणीरमण । टाकितो भजन काय माझे ॥६०॥
परी अधिकोत्तर भजनांचा । सप्रेम टाहो करीत वाचा ।
सोबती म्हणती त्रास याचा । आला साचार आम्हांसी ॥६१॥
नेणेचि कांही काळवेळ । बडबड करितो सर्व काळ ।
निद्रा नयेचि आळुमाळु । आमुचें कपाळ उठविते ॥६२॥
तुकयासि चुकवोनि निश्चित । सोबती पुढे गेले समस्त ।
मग आरण्यामाजी विष्णुभक्त । भोंवतें पाहत तेधवां ॥६३॥
कोणी दुसरें नाहीं आणिक । रात्र जाहली घटिका एक ।
बैलावरील गोणी देख । खाली पडली तेधवा ॥६४॥
तेव्हां चिंता उद्भवली जाण । म्हणे आतां उचलूं लागेल कोण ।
आकाशी मेघ करी गर्जत । वळला पर्जन्य सभोंवती ॥६५॥
अद्भुत सुटला प्रभंजन । धुळीनें नेत्र झांकले जाण ।
गगनीं कडकडली सौदामिन । तुषार पर्जन्य तेव्हां ॥६६॥
भयानक वन साचार । दिसती श्वापदांचे भार ।
अद्भुत पर्जन्य वर्षतो वर । तेणें दुखवे अंतर तुकयाचें ॥६७॥
मग म्हणे आपुले पोटीं । संसार चांडाळे घेतली पाठी ।
तेणें बहुत जाहलो कष्टी । कोणासि गोष्टी सांगावी ॥६८॥
मायबापें टाकूनि दीधलें मज । बंधु वैरागी जाहला सहज ।
दिवाळें निघालें माझें । तेणें वाटती लाज संसारीं ॥६९॥
मान करीत होते पिशुन । तेचि हांसती करोनि हेळण ।
वाताहत जाहलें धन । खावयासि अन्न घरीं नाहीं ॥७०॥
सोबती गेले चुकवोनी । कोण उचलूं लागेल गोणी ।
म्हणे देवाधिदेवा चक्रपाणी । तुजवीण कॊणी असेना ॥७१॥
मातापिता बंधु चुलता । तूंचि होसी पंढरीनाथा ।
प्राण सांडी होईल आतां । ये अनंता लवकरी ॥७२॥
इष्टमित्र सखा सज्जन । तुज वांचोनि नसेचि आन ।
जैसें अज्ञान बाळक तान्हें । तरी जननीवीण कोण त्यासी ॥७३॥
माझी बळबुध्दि खुंटली जाण । म्हणवोनि करितों तुझें चिंतन ।
जरी तूं नसेसि करुणा घन । तरी हांसते पिशुन सर्वत्र ॥७४॥
ऎसें म्हणवोनि प्रेमळ भक्त । नेत्रीं वाहती अश्रुपात ।
म्हणें विठाबाई अनाथनाथे । मज दिनातें सांभाळी ॥७५॥
ऎसा सप्रेम धांवा ऎकोनि कानीं । पांथस्थाचें रूप धरोनि ।
तत्काळ पावले चक्रपाणी । तुकया लागुनी पुसती ॥७६॥
येव्हढे रात्रींमध्यें जाण । वाट रोधूनि बैससी कोण ।
ऎसे पुसतां मधुसूधन । तयासि वचन बोलतसे ॥७७॥
म्हणे मी वाणी व्यवसायी । गोणी पडिली ये ठायीं ।
उचलावयासी कोणी नाहीं । सोबती सर्वही ते गेले ॥७८॥
ऎकोनि तुकयाचें उत्तर । काय करीत सारंगधर ।
हात लावोनि बैलावर । गोणी सत्वर घातली ॥७९॥
तेणें संतोषे वैष्णव वीर । परी मार्ग न दिसे अंधकार ।
वाटसरू बोले उत्तर । ये सत्वर मज मागें ॥८०॥
निजभक्तासि पांडुरंग मूर्ती । वाट दावी सत्वर गतीं ।
परी वैष्णव मायेनें घातली भ्रांती । म्हणोनि चित्तीं समजेना ॥८१॥
असो पुढें वाट दाविता घननीळ । मागें येतसें भक्त प्रेमळ ।
आले इंद्रायणीच्या जवळ । तों पूर तुंबळ चालला ॥८२॥
तुकयासि चिंता उपजली मनीं । म्हणे कैसी उतरोनि न्यावी गोणी ।
मग म्हणे कैवल्यदानी । ठाव पाहोनि मी येतों ॥८३॥
लीला नाटकी जगज्जीवन । खालीं घातलें सुदर्शन ।
तुकयासि म्हणे मधुसूदन । गोणी उतरणें न लगेचि ॥८४॥
ऎसें म्हणवोनि रुक्मिणीवर । पुढें चालिले स्थिर स्थिर ।
गोणी तैसीच बैलावर । वैष्णव वीर उतरला ॥८५॥
तुकया विस्मित होतसे जीवीं । म्हणे आजि पांथस्थ धाडिला देवें ।
नाहींतरी नव्हतें बरवे । उतरायी व्हावे कैसेनी ॥८६॥
ऎसा विस्मित होता मनीं । तों नवल देखिलें तये क्षणीं ।
गगनीं चमके सौदामिनीं । त्या प्रकाशें करोनी पहात ॥८७॥
पांथस्थ जात होता पुढें । तेंचि चतुर्भुज जाहलें रूपडें ।
तुकयासि ब्रह्मानंद जोडे । निजनिवाडे पहातसे ॥८८॥
कांसेसी दिव्य पीतांबर । कंठीं कौस्तुभ झळके सुंदर ।
गळा वैजयंती हार । श्रीमुख मनोहर जयाचें ॥८९॥
श्याम तनु विराजमान । त्यावरी चर्चिला शोभे चंदन ।
श्रीवत्सांकित भूषणें । मुगुटीं रत्नें लखलखिती ॥९०॥
दिव्य कुंडलें कानीं तळपती । वदनीं दशन हिरे झळकती ।
पायीं तोडरवांक्या वाजती । विस्मित चित्तीं होय तुका ॥९१॥
सौदामिनीच्या तेजें सत्वर । देखिला लावण्य सुखसागर ।
हें तुकयासि दाखविलें चरित्र । परी दृष्टांत न स्फुरे ये ठायीं ॥९२॥
दीपकाच्या प्रकाशेंकरोनी । कैसा पहावा वासरमणी ।
अमृतासि चव यावया लागुनी । साकर घालोनि पहावी ॥९३॥
चक्षुःश्रवा भेटावया निश्चित । विरोळा घालिजे पुढाइत ।
कीं भूतांचि धरोनि संगत । कैलासनाथ पहावा ॥९४॥
कीं अज्ञान भ्रांतीसी प्रतिपादून । कैसे साधकासि होईल ज्ञान ।
षड्वैरियांच्या संगतीनें । शांति-सुख दिसोन नये कीं ॥९५॥
तेवीं सौदामिनीच्या तेजें निश्चिती । सर्वदा न दिसे पांडुरंग मूर्ती ।
देखोनि याची सप्रेम भक्ती । स्वयें श्रीपती प्रगटला ॥९६॥
परी तुका ओळखोनि निजनिवाडे । प्रेमें भेटे येवोनि कोडें ।
यास्तव सौदामिनी तेज करोनि पुढें । दर्शन रोकडें देत असे ॥९७॥
सवेंचि पाहे सावधपणें । तों पांथस्थ पुढें करी गमन ।
उभयतां घरासि येऊन । कोणी उतरोन ठेविली ॥९८॥
ढोराची खटपट करावयासी देखा । गुंतला तेव्हां वैष्णव तुका ।
संधी फावली वैकुंठनायका । गेला भक्तसखा तेथूनी ॥९९॥
असो प्रातःकाळ होतांचि जाण । गांवांत कळलें वर्तमान ।
कीं तुका आला वणजेहून । ढोरें मारून टाकिलीं ॥१००॥
सावकार पिशुन आणि खळ । गृहासि पातले जैसे काळ ।
जैसें क्षत लक्षूनि तात्काळ । येती कावळे टोंचावया ॥१०१॥
परमार्थ प्रपंची साचार । अखंडाकार चाल वैर ।
एक राजहंस ससाणे फार । तैसा विचार तो झाला ॥२॥
कीं बोरबनामाजी साचें । एकचि झाड कर्दळीचें ।
तैशाच परी तुकयाचें । छळण वाचें तें करिती ॥३॥
चार ढोरें होतीं निश्चित । तीन मरोनि गेलीं त्यांत ।
हे श्रीभजनाची प्रचीत । आली निश्चित तुजलागीं ॥४॥
चित्तीं धरितां रुक्मिणीवर । सांग कवणाचें जाहलें बरें ।
हरिश्चंद्र राज सत्वधीर । क्लेश थोर त्या झाले ॥५॥
नळराजा आणि दमयंती । त्यांणीं चित्तीं धरितां रुक्मिणीपती ।
संसारांत झाली विपत्ती । सांगावी किती निजमुखें ॥६॥
एक म्हणती तुकयासि पाहीं । हृदयीं धरिला शेषशायी ।
लौकिक लाज किंचित नाहीं । जाहली सर्वही वाताहत ॥७॥
आम्ही शिकवितों परी हा नायके । तेणेंचि बहुत पावतो हा दुःख ।
कर्ज घेऊनि बुडविले लोक । परी लज्जा शोक यासि नाहीं ॥८॥
ऎसें बोलोनि त्या अवसरा । पिशुन गेले आपुल्या घरा ।
चिंता उद्भवली वैष्णव वीरा । म्हणे या संसारा काय करूं ॥९॥
परमार्थी चित्त प्रपंचीं देह । दों ठायीं जीव वांटला आहे ।
कधीं सोडविसील विठ्ठामाये । करुणा नये तुज कैसी ॥११०॥
पर्जन्य गेला देशांतून । दुष्काळ आला पुढें कठिण ।
मुले माणसें खाण्यावांचुन । होती हैरण सर्वदा ॥११॥
संसार टाकावा कोणावर । तरी आणिक साह्य नसे दुसरें ।
ऎसें म्हणोनि वैष्णव वीरें । चित्तीं विचार योजिला ॥१२॥
कांहीं भांडवल उरलें होतें । त्याच्या मिरच्या तेथें ।
तीन गोण्या भरोनि निश्चित । जाय कोंकणांत तेधवां ॥१३॥
मार्गीं चालतां तये क्षणीं । विठ्ठल नामाचा उमटे ध्वनी ।
सगुण रूप आणोनि ध्यानी । सप्रेम मनीं सर्वदा ॥१४॥
संसाराचा यावा त्रास । म्हणोनि व्यवसाय करीतसे ।
मन विटवावें भलतैसें । धरिली आस यासाठी ॥१५॥
नामरूपीं जडलें चित्त । देहभाव नाहीं किंचित ।
समुद्रतीरीं वैष्णवभक्त । गांवाबाहेर उतरला ॥१६॥
तेथें शिवालय होतें थोर । पुढें वटपिंपळ तरुवर ।
तेथें गोणी लोटोनि सत्वर । स्वहस्तें डोरें बांधिलीं ॥१७॥
गोणी उसवोनियां हातीं । दुकान मांडिले तयेक्षितीं ।
चित्तीं बैसली पांडुरंगमूर्ती । देहाकृती नाठवे ॥१८॥
नरनारी येऊनि जाण । तुकया प्रती बोलती वचन ।
विकावयासि आणिलें केण । याची धारणा सांगावी ॥१९॥
ऎकोनि म्हणे वैष्णव भक्त । तुम्हांसि नाहीं काय विदित ।
लागेल तें न्यावें त्वरित । संकोच चित्त न व्हावें ॥१२०॥
तंव एकें तांदूळ आणिले शेर । ते मोजूनि घेतले सत्वर ।
त्याच्या हिशोबें वैष्णववीर । देत साचार मोजूनी ॥२१॥
वर द्या कांहीं बोलती वचन । ऎकोनि म्हणे वैष्णवजन ।
तुम्हीं आपुल्या स्वहस्तें घेणें । संकोच मनीं न धरितां ॥२२॥
भीत भीत काढा घेती पाहे । म्हणती हातास झोंबेल काय ।
तंव तो तिकडे न पाहे । देहींच विदेही म्हणोनी ॥२३॥
आणि कसा रुके घेऊनी देखा । आल्या तेथें दोघी बायका ।
तयांसि मोजूनि देतसे तुका । म्हणती आणिक दे वर कांहीं ॥२४॥
येरू म्हणे आपुल्या हातें । घेऊनि जावें लागेल तें ।
एक हात घाली भीत भीत । दुसरी बोलत तिजलागीं ॥२५॥
तुकाशेट वाणी भला फार । माप मोजूनि देतसे खरें ।
काढा घेतां दोन्हीं करें । हातासि आणुमात्र झोंबेना ॥२६॥
शब्द बोलोनि ऎशा रीतीं । दोन्हीं हातें काढा वोढितीं ।
परी कांहीं न वर्जी तयांप्रती । लोक पाहती सभोंवतें ॥२७॥
गांवांत जावोनि सांगती कोणी । बाहेत आला तुकाशेट वाणी ।
तो परम भला सुलक्षणीं । हरिभजनीं तत्पर ॥२८॥
मोजणीपरीस साचार । दुप्पट गुणें देतो वर ।
हातासि न झोंबे अणुमात्र । पहा चरित्र दृष्टीसीं ॥२९॥
गांवांत प्रगट जाहली मात । पाहावयसि लोक येत ।
म्हणती हा केवळ भोळा भक्त । कार्य त्वरित साधावें ॥१३०॥
पैका आणावयासि गेलों घरीं । तरी उडोनि जाती वरच्यावरी ।
तुकयासि म्हणती ते अवसरीं । आमुचे मंदिरीं खर्च बहू ॥३१॥
उधार द्याल जरी निश्चित । तरी पैका देऊं मागिल्या हातें ।
लागतील त्या न्या निश्चित । वैष्णव भक्त म्हणतसे ॥३२॥
मोजूनि देतो वैष्णव वीर । स्वहस्तें चौगुणे घेती वर ।
म्हणती राशीपरीस सर्वां फार । गोष्ट अपूर्व हे झाली ॥३३॥
देखोनि त्याचें भोळेपण । मागों लागलें अवघे जन ।
मग दुसरी गोणी उसवोन । स्वहस्तें घेणें म्हणतसे ॥३४॥
एकदांच मागतां सर्वत्र । एकला देऊं कोठवर ।
माझा विश्वास तुम्हांवर । आपुल्या करें घेऊनि जा ॥३५॥
ऎसें बोलतां वैष्णववीर । सर्वत्र एकदाच घालिती कर ।
जैसे उच्छिष्ट पात्रें देखोनि फार । श्वानें निकुरें भांडती ॥३६॥
प्रपंच स्वार्थ करोनि निश्चितीं । एकासी एक गुरगुरिती ।
परी पुढें कैसी होईल गती । विचार चित्तीं नाठवे ॥३७॥
कोणी होते जोरावर । त्यांणी घेतल्या मणभर ।
कोणी आदमण वोढिल्या करें । पांच शेर कोणाशी ॥३८॥
कोणी आदपाव दोन शेर । कोणासि आल्या वोटिभर ।
कोणी घेऊनि बचकभर । जाती सत्वर मंदिरां ॥३९॥
दोन गोण्या ऎशा रीती । मिरच्या लुटोनि नेल्या समस्तीं ।
तों एक महाखळ अवचित्तीं । तुकया प्रतीं बोलत ॥१४०॥
माझें घरीं खर्च थोर । मिरच्या पाहिजेत गोणीभर ।
तुम्हांसि असत्य वाटेल जर । पुसा सत्वर लोकांसी ॥४१॥
ऎकोनि म्हणे वैष्ण्वभक्त । तुमचा विश्वास आहे निश्चित ।
वचन ऎकोनियां त्वरित । नष्ट उचित गोणीतें ॥४२॥
तयासि म्हणे प्रेमळ भक्त । गोणी आणूनि द्यावी त्वरित ।
तो म्हणे साठवण निश्चित । नसे घरांत माझिया ॥४३॥
तुम्ही मागुती याल परतोनी । मग रिती करोनी देईन गोणी ।
ऎशारीती खळ बोलोनी । गेला सदनीं आपुल्या ॥४४॥
अंतरींचा कृत्रिम भाव । सर्वथा नेणे भक्त वैष्णव ।
याच विषयीं तुम्हीं सर्व । दृष्टांत अपूर्व अवधारा ॥४५॥
आज पर्जन्य वर्षेल घटिका । ऎसें जाणती पिपीलिका ।
मग आंडीं काढोनियां देखा । ठिकाणीं आणिका त्या नेती ॥४६॥
आणि लघ्वी करितां भूमीवर । त्याच मुंग्या वाहती पुरें ।
त्यांसि ब्रह्मांडींचा कळे विचार । परी मानवाचें अंतर न जाणती ॥४७॥
तैसें देवाचें मनोगत । तें जाणती प्रेमळभक्त ।
परी दुर्जनाचें कठिण चित्त । तें निश्चित कळेना ॥४८॥
कांहींन द्यावें यालागुनी । मिरच्यासहित नेली गोणी ।
परी तुकयासि त्याचा विश्वास मनीं । कपटखाणी कळेना ॥४९॥
परम संतोष जाहला अंतरा । म्हणे बरा सत्वर जाहला विकारा ।
स्नान करोनि ते अवसरा । रुक्मिणीवरा आठवीत ॥१५०॥
शेर तांदूळ स रुके सजगाणी । रोख इतुकीच जाहली बोहणी ।
तें देखोनियां नयनीं । संतोष मनीं तुकयाच्या ॥५१॥
म्हणे साहित्य तों आलें निश्चित । आतां करावी पाक निष्पत्त ।
पितळी तपेलें घेऊनि त्वरित । घातला भात शिजावया ॥५२॥
जनार्दनचि भरला जनीं । ऎसा निश्चय दृढ मनीं ।
ध्यानांत आणूनि कैवल्यदानीं । नामस्मरणीं डुल्लत ॥५३॥
ऎसी जाणूनि तयाची स्थिती । काय म्हणतसे रुक्मिणीपती ।
याची तो ऎसी उदास वृत्ती । प्रपंच भ्रांती कळेना ॥५४॥
तीन गोण्या साचार । मिरच्या घेऊनि गेले चोर ।
घरीं आडवितील सावकार । मग काय उत्तर देईल त्यां ॥५५॥
ऎसें म्हणोनि भक्तकैवारी । मनुष्यवेष घेत सत्वरी ।
गांवांत जावोनि एके घरीं । मधुरोत्तरीं बोलत ॥५६॥
म्हणे उधार द्यावाजी सत्वर । आम्हांसि जावया जाहला उशीर ।
ते म्हणती तूं कोण साचार । कशाचा उधार मागसी ॥५७॥
ऎकोनि म्हणे सारंगधर । तुकशेट वाणी देहूकर ।
मी विठोजी त्याचा चाकर । आलों उधार मागावया ॥५८॥
यावरी म्हणती स्वार्थी जन । आम्हांसि येर्हवीं दीधल्या त्यानें ।
मोजूनि घेतल्या असतील जाण । तरी मागणें साजतें ॥५९॥
यावरी म्हणे वैकुंठपीठ । तो हात तुकेंचि देतो स्पष्ट ।
यास्तव त्यासी तुकशेठ । नांव वरिष्ट बोलती ॥१६०॥
यावरी गांवीचे लोक बोलती । तरी मिरच्या आम्हीं आणिल्या किती ।
जैसें सांगती रुक्मिणीपती । तितुक्याच भरती मोजितां ॥६१॥
ऎसा देखोनि चमत्कार । पैसे आणोनि देती सत्वर ।
भक्तांसाठी सारंगधर । घरोघर फिरतसे ॥६२॥
कोणी आले थोटाईसी । तरी गाळिप्रदानें देतसे त्यासी ।
कोणी परतोनि बोलतां यांसी । उगाच सोशी जगदात्मा ॥६३॥
ज्याचे आंगीं जितुकें लावित । तितुकेंचि वजन भरत तेथ ।
म्हणती तुकाशेट हें नांव सत्य । आश्चर्य करिती जन तेव्हां ॥६४॥
भक्तिभावें भुलला हरी । आपुलें महत्त्व न विचारी ।
रंक होऊनि ते अवसरी । घरोघरीं फिरतसे ॥६५॥
स्वमुखें बोले बाजारांत । गावींचे लोक थोट बहुत ।
उधार मागतां बळासि येत । परी होतील फजीत या गुणें ॥६६॥
कोणी चमत्कार पाहोनी । द्रव्य देताति आणोनी ।
कोणी कज्जासि भिवोनी । देती आणोनी चोहाटी ॥६७॥
ऎशा रीतीं राजीवनेत्रें । उधार उकळिलां सर्वत्र ।
परीं मिरच्या नेल्या गोणीभर । तो एक साचार राहिला ॥६८॥
मनांत म्हणे जगज्जीवन । त्याचे कैसें उगवेल धन ।
दिसतो खळ सर्वांहून । उपाय कोण करावा ॥६९॥
जैसा धान्यामाजी कुचर । न भिजे न शिजे आणुमात्र ।
तैसें खळाचें अंतर । न द्रवे साचार सर्वथा ॥१७०॥
संकट जाणोनि श्रीहरी । उभे राहिले त्याचे द्वारीं ।
सक्रोध होऊनि अंतरीं । कठिणोत्तरीं बोलत ॥७१॥
तुकशेट वाणी देहूकर । मी विठोजी त्याचा चाकर ।
मिरच्या आणिल्या गोणीभर । त्याचा उधार दे आतां ॥७२॥
भला माणूस दिसतो नयनीं । आणी घरीं आणोनि ठेविली गोणी ।
वाट पाहतो माझा धनी । आतां उधरणी देईजे ॥७३॥
ऎसें बोलतां घननीळ । काय उत्तर देतसे खळ ।
चाल तुझ्या धन्या जवळ । म्हणोनि बळें वोढिला ॥७४॥
तुकशेट माझा मित्र जाण । मजवरी केलें यहसान ।
त्याणें काय दीधल्या मोजूनि । आलासि म्हणोनि या ठायां ॥७५॥
ऎसें बोलतां दुर्जनासी । काय म्हणे वैकुंठवासी ।
मी तरी न जाय तयापासी । म्हणेल अपेशी चाकर हा ॥७६॥
तो म्हणे मीं नाहीं देत । कैसा घेतोसि पाहतों येथ ।
देखोनि तयाचें कठिण चित्त । वैकुंठनाथ काय करी ॥७७॥
चर्हांट सोडोनि जगन्निवासें । आपलें कंठीं बांधिला फांस ।
म्हणे प्राण देऊनि उदास । अवघ्या गांवास बुडवीन ॥७८॥
निर्वाण देखोनि ते अवसरीं । वाडियांत मिळाल्या नरनारी ।
खळासि फजीत नानापरीं । गांवकरी करिताती ॥७९॥
गोणीभर मिरच्या कोणाकारणें । फुकट देईल ऎसा कोण ।
उगेंचि कां करितोसि भांडण । दे टाकून द्रव्य त्याचें ॥१८०॥
खळ तो म्हणे ये क्षणीं । घेऊनि जा भरली गोणी ।
मग म्हणे कैवल्यदानी । आधींच कां घेऊनी आलासी ॥८१॥
ऎसें म्हणोनि सारंगधर । स्वहस्तें खांडासि लाविला दोर ।
गरगरां फिरवितसे नेत्र । लोक सर्वत्र पाहाती ॥८२॥
जयाची मुर्ति हृदयसंपुटीं । एकांती ध्यातो धूर्जटी ।
तो तुकयाचे भक्तीसाठीं । पाश कंठी बांधित ॥८३॥
अष्टांगयोग साधिती हटी । परी कदापि न पडे त्यांच्या दृष्टीं ।
तो भक्तिपाश वागवी कंठीं । नवल पोटीं मज वाटे ॥८४॥
ज्याची प्राप्ति व्हावया कारणें । महर्षि करिती अनुष्ठानें ।
तो भक्तकार्यास्तव जाण । घेत बांधोन जगदात्मा ॥८५॥
तो कमलोद्भवाचा पिता होय । इंदिरा ज्याचे ध्यातसे पाय ।
जो नारदादिकांचे गेय । बांधला जाय भक्तीनें ॥८६॥
असो आतां अनुसंधान । सादर ऎका भाविक जन ।
गांवकरी भयभीत होऊन । खळकारणें ताडिती ॥८७॥
म्हणती यानें प्राण दीधला जर । तरी आमुचा गांव बुडेल समग्र ।
म्हणोनि लाताबुक्या वर । मारिती सर्वत्र त्यालागीं ॥८८॥
जनीं जनार्दन भरला निश्चित । नानाप्रकारें केला फजीत ।
मिरच्या मोजूनी समस्त । द्रव्य देववित गांवकरी ॥८९॥
इतुकें कार्य करोनि जाण । बंधन सोडित जगज्जीवन ।
समस्त उधार एकत्र करून । आणिक विंदान काय करी ॥१९०॥
चौधरियाच्या रूपें त्वरित । तुकयासि म्हणे वैकुंठनाथ ।
आपुलें घ्याजी द्रव्य त्वरित । येरू म्हणत कशाचें ॥९१॥
मग म्हणे सारंगधर । मिरच्या गांवांत दीधल्या उधार ।
तें द्रव्य उकळोनि समग्र । आलों सत्वर या ठायां ॥९२॥
प्रेमळ भक्त म्हणे तया । म्यां येर्हवीं दीधल्या वांटावया ।
चौधरी म्हणे कासया । पाहिजे वायां तुमचें ॥९३॥
आम्ही गृहस्थ नामांकित थोर । काय उणें ईश्वरें ।
मग द्रव्य गांठोडी समग्र । ठेविली सत्वर त्यापुढें ॥९४॥
स्वस्थानीं बैसतांचि जाण । प्रेमळ भक्त तयासि म्हणे ।
पैलते सारुके घेऊन । आणूनि देणें घृत आम्हां ॥९५॥
अवश्य म्हणोनि ते अवसरीं । तेथूनि निघाला चौधरी ।
घृत आणिलें तांब्याभरी । तुका अंतरीं विस्मित ॥९६॥
म्हणे आज्य बहु दिसताहे । ऎकोनि म्हणे पंढरीराय ।
घृत बहुत स्वस्त आहे । उणें काय या गांवीं ॥९७॥
चौधरियासि म्हणे ते अवसरीं । पाकनिष्पत्ती जाहली बरी ।
येथें भोजन कराल जरीं । संतोष अंतरीं मज होय ॥९८॥
देखोनि भक्ताचा शुध्दभाव । अवश्य म्हणे देवाधिदेव ।
तों अतीत रूप धरूनी अपूर्व । सदाशिव काय म्हणे ॥९९॥
शिवालयासमोर बैसोनि देखा । म्हणे मी अतीत बैसलों भुका ।
पंक्तीचा लाभ आम्हांसि देकां । ऎकोनि तुका संतोषे ॥२००॥
चौधरी अतीत भक्त प्रेमळ । पंक्तीसि जेविले ते वेळ ।
मुखशुध्दि तुळसीदळ । देत तत्काळ त्यांलागीं ॥२०१॥
तुकयाची भक्ती देखोनी । शिव-विष्णु जेविले दोन्ही ।
अतीत जातां त्यालागोनी । आशीर्वचनीं गौरवी ॥२॥
सनाथ करोनि प्रेमळ भक्त । चौधरी तो जाहली गुप्त ।
तों गावींचे लोक मिळाले तेथ । देखोनि बोलत तुकयासी ॥३॥
तुकशेट तुम्ही भक्त वैष्णव । वाचेसि जपतां हरीचें नांव ।
आजि बुडविला होता आमुचा गांव । काय सांगावें ये स्थिती ॥४॥
एकासी एक बोलती वचन । आधीं साधुत्व दाविलें यानें ।
येर्हवीं वांटितों म्हणवून । गेले घेऊन गांवकरी ॥५॥
जैसा बकध्यान धरी निश्चित । मत्स्य येतांचि गिळी त्यांतें ।
तैसा तुकशेट साधु दिसत । तुम्हां सर्वांते कळों द्या ॥६॥
ऎसें गांवींचे थोर लहान । परस्परें बोलती वचन ।
तुका विस्मित होऊनि मनें । एका कारणें पुसतसे ॥७॥
मग तों सांगे सविस्तर । विठोजी माणूस तुमचा चाकर ।
त्याणें फिरोनि घरोघर । भांडोनि उधार उकळिला ॥८॥
गोणीभर मिरच्या नेल्या ज्यानें । तो नेदीच कांहीं त्याजकारणें ।
मग तेथें तुमच्या चाकरानें । गळफांस जाण घेतला ॥९॥
गलबला ऎकोनि थोर । ग्रामवासी मिळाले समग्र ।
मग खळासि लाता बुक्यावर । तोंडावर हाणिती ॥२१०॥
तयासि फजीत करोनि बरवें । जाहला हिशोब देवविला सर्व ।
नाहीं तरीं तो देतां जीव । बुडतां गांव यासाठीं ॥११॥
ऎसा सांगतांचि वृत्तांत । विस्मित चित्तीं वैष्णव भक्त ।
म्हणे असत्य म्हणावी जरी मात । तरी उधार समस्त आला कीं ॥१२॥
सत्य म्हणावें जरी कांहीं । तरी म्यां माणूस ठेविलें नाहीं ।
असो हरीची माया वैष्णवी । लीला दावी ते कळेना ॥१३॥
अहो भक्तलीलामृत ग्रंथ सार । हाचि मानससरोवर ।
सभाग्य श्रोते प्रेमळ चतुर । ते महर्षि थोर ये ठायीं ॥१४॥
यांसि पुजावें कवणे रीतीं । जेणे साधु संतुष्ट होती ।
ऎसे कवीचि ये मती । विचार चित्तीं आठवे ॥१५॥
प्रांजळ ओव्या सुमनें बरीं । हार गुंफोनि नानापरी ।
महीपती होऊनि फुलारी । वैष्णव मेळीं तिष्ठत ॥१६॥
स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।
प्रेमळ परिसोत भाविक भक्त । सत्ताविसावा अध्याय रसाळ हा ॥२१७॥ ॥ अ० २७॥ ओव्या ॥ २१७॥