मी पिवळी पाकळी पिवळा प्राणसखा चाफ्याची कळी ॥ध्रु०॥
पिवळे तेज कसे पिवळी कांती ॥
प्रियकर माझा पती ॥
पिवळे डागिने छब विलायती ॥
पिवळेच कंकण हाती ॥
पिवळे सूर्य तुम्ही मी प्रभा किती ॥
रायाच्या संगती ॥
पिवळी बनुन आले स्वामीजवळी ॥१॥
उतरून माडीवरून बसते मोहोर ॥
नेत्राच्या समोर ॥
उभयताच्या मनी हिरवे वस्त्र ॥
हिरवेच जंगल सारे ॥
बाग बघाया उठा हात खांद्यावर ॥
नाही कोणाचा पदर ॥
तुम्ही तारक माझे राजेंद्र कुळी ॥२॥
मला पिवळे पातळ बारीक गवती ॥
पदरावर शेवंती ॥
पिवळी काचोळी जडली मोती ॥
गोट किनार्या भोवती ॥
पिवळी पूतळी बनुन फिरते भोती ॥
रायाच्या संगती ॥
बसा असे वाटते आज्ञा पाळी ॥३॥
स्वामी पायाचे सुख भोगिते ॥
आनंदवृत्तीने राहाते ॥
सख्याच्या झोकावर छूमकत येते ॥
नोकेवर चालते ॥
शरिरामधे माझ्या गोड वाटते ॥
रोम रोम खुशी होते ॥
सगनभाऊ म्हणे आज्ञापाळी ॥
जशी राधा गोकुळी ॥४॥