मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
मुषाफर

सगनभाऊ - मुषाफर

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


आम्हि मुशाफर लोक प्रित करू पाहातो साजणी ।

दिपकळीचा रंग पाहुनी पतंग झुरतो मनी ॥ध्रु०॥

का प्रवासी आम्ही जाहलो सांगतो आहोत घरच सुखी ॥

घोर जिवाला लाउन गेली परम जिवाची सखी ॥

जिवंत अथवा मृत्यु पावली आम्हास केले दुःखी ॥

कारण काय तुम्हा सांगावे जाहला असा घातकी ॥

चळण वळण पाहण्यात बरी दिसतिस रत्नपारखी ॥

प्रितपरीक्षा करू न का हाडसी दुसरी जाग चुकी ॥चाल॥

या कर्माने जर जर साजणी ॥

नाही येत पुण्याची सर गे साजणी ॥

पाहिले गडे गंगा तीर साजणी ॥

पाथ उतारा आलो शरीर घेऊन उभा आंगणी ॥

लोटुन देऊ नको फिरून आम्ही जाऊ कोणत्या वनी ॥१॥

आहे मुशाफर बरे बोलता कर ठेवुनिया कटी ॥

कासावीस झाल्याविण कोण करी शितळ अशा संकटी ॥

या कर्माने निसुर बैसले घरामधे एकटी ॥

प्रीतीच्या मंत्राची नाही दिधलि मातेने घुटी ॥

काळेसावळे स्वरूप माझे राख घेऊन भर मुठी ॥

नित्यकाळी आंगास लाविते काय होईल शेवटी ॥चाल॥

होईल ते होऊ कसे साजणा ॥

नाही करीत कोणाची आस साजणा ॥

औषधास वेडा ऊस साजणा ॥

गोड निघे ना रस कडूपण काढिले वीरळा सूती ॥

ही गोष्ट मोठी कठिण पाहा घर दुसरी जागा निश्चिती ॥२॥

उत्तरास प्रतिउत्तर दिधले मनि आमच्या मानिले ॥

चित्तातिल वर्म कर्म आवघे प्रत्यक्ष जाणिले ॥

गोड कडू निवडिता कशाने स्नेहउदकि नाहले ॥

एक दुःख उभयता असावे कल्प दोष छाणले ॥

गावीच्या मजा गाव राहिल्या त्यांतुन गुण आणिले ॥

पहिल्या पासुन केले निवेदन इष्काने तान्हले ॥चाल॥

तू बहुत योग्य चांगलि साजणी ॥

तुझ्यापासी वृत्ति रंगली साजणी ॥

विसरावि गोष्ट मागली साजणी ॥

या जर वेडा डागिली जिव्हे देही मात्रा बहुगुणी ॥

जीवंत तोपर्यंत नाही जाणार तुला टाकुनी ॥३॥

धन्य चतुर सामर्थ्यवान सन्मान करिते अता ॥

एक वचन राहिले बसा सेजारी राव ऐकता ॥

पार्थविराच्या रथी सारथी श्रीपती रणांत स्वता ॥

कौरवासहित नागिवली जगी मान मान्यता ॥

कृपा करून भगवान जाने मुखपाठ शिकविली गिता ॥

मग का अर्जुन पुन्हा चालिला अभिमन्युकरता ॥चाल॥

अक्षर धरावे चित्ती साजणा ॥

या कलियुगाच्या प्रीति साजणा ॥

मागिली कीर्ति आठविती साजणा ॥

धरून मुशाफर हाति सखे दे इष्काची सरबती ॥

सगनभाऊ म्हणे विघ्न निवारी रुक्मिणीचा पती ॥

तुम्ही मुशाफर लोक प्रीत करू पाहता कोणत्या रिती ॥

प्रीतीचा आवभाव काय तो सांगावा मजप्रती ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP