मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
राग आणि त्यांचे सांत्वन

सगनभाऊ - राग आणि त्यांचे सांत्वन

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


नट नाटक तू खेल छबिला अतवाला अलबेली तर्‍हा ।

गजा आगजाळ्या भवताल्या फिरतिल बागातुन येता घरा ॥ध्रु०॥

तुमचि आमची प्रीत रसलि माहित नाही तिसर्‍याला ।

आपण उभयता एक विचारे नानापरि रंग उडविला ॥

कोण आवडती मी नावडती माहित नाही चित्ताला ।

आपुण कानाडोळा केला का हो मुलुख कान्हा जाहला ॥

आजवरा म्या चिन्ह पाहिले हारतुरा कोणी पाठविला ।

माझ्या गळ्याची आण शपथ घे नाव नको चोरू मजला ॥

छेल बटाऊसाठी मोहना राणीचा जाहला मारा ।

मी रक्ताचे सिंपण करीन मग बसल्या सिग्या फेरा ॥१॥

परस्परे वनभोजन करिता किम्चत सई होईना माझी ।

जाई जुईच्या वेला खाली नित्य उडविता रंग बाजी ॥

लाहन खुर्‍या ठेंगण्या देखण्या त्या का होईना त्या राजी ।

पंचामृत जेवायास मिळते पात्रावर पोळी ताजी ॥

उंच जरीचा शालू नेसून रंगी बेरंगी प्याजी ।

गळा पडून मुखी विडा घालती चहूंकडून म्हणती वाहवा जी ॥

तुमचे तुम्हा आवडले परंतु डोम जाहला शरिरा ।

या रांडाला शिक्षा करिन नाहीतर जाईन देशांतरा ॥२॥

परद्वारि मन रमले तुमचे अलावाला गा धाउन घेसी ।

आडपडद्याने बोलत होते पण आपला सिद्धीस नेसी ॥

तोंडावर बुरखा घेऊन भोजन करता करता जासी ।

प्रहराचा करणा फुंकल्यावर अकरावी भरता येसी ॥

हातापायाच्या डाहाळ्या सोडुन कोमेजुन मजकडे पाहासी ।

मोठा धुरंधर पंत चालला घाबरून पाणी पीसि ॥

आटके करता नको म्हणता पदराने घालिन वारा ।

कोण हत्तिला वढ्याळ म्हणते हे माहित पुणे शहरा ॥३॥

असो याजहुन नाही खोळंबा शपथ आम्ही गंगेची करू ।

तुझ्या विचारे जे करणे ते स्वस्थ बैस नको रागे भरू ॥

तु रूप सुंदर कोमल कांती नयन तुझे कमचे मारू ।

तुझी प्रीत चालु दे सखी फार पाहिले फिरफिरू ॥

द्रव्य खर्चुन मूळ पाह्याचे कोण कसे हे दिसती हेरू ।

कोण दिसेना प्राण प्रियकरे चल रंगमहाली रमज करू ॥

सगनभाउ म्हणे इष्कवाजहो या प्रीतिला जीविधरा ।

संतांची पायधूळ होउन जन्माचे सार्थक करा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP