तुसी जो स्नेहसंग करिल बुडल बुडल बुडल बुडल ॥ध्रु०॥
न जाणसी प्रिय कदर ॥
वरकांती करिसी आदर ॥
द्रव्यावर ठेउनी नदर ॥
सहा महिने द्वाड पदर ॥
लागता हे सदर ॥
कार्य नडल नडल नडल नडल ॥१॥
तव लक्षण दिसते कसे ॥
शंखिनी वधुलागी जसे ॥
त्यावर तीळ जास्त असे ॥
विधि भाळी लिहीले तसे ॥
पाहुन असे फासे ॥
हरण पडल पडल पडल पडल ॥२॥
करू पाहसी संग बळे ॥
स्त्रिचे मन कोणा कळे ॥
या कर्मी पुरुष बळे ॥
धैर्य-तेज अवघे ढळे ॥
चळ विषय पिसे ॥
त्यासी जडल जडल जडल जडल ॥३॥
परद्वारे फजीत किती ॥
रावण लंकाधिपती झाली त्याची कोण गती ॥
बहुत असे अति रती ॥
भ्रष्ट मतिरतिसि ॥
कैसी चढल चढल चढल चढल ॥४॥
सगन भाउ म्हणे प्रमाण ॥
ठेविल जो हेचि ध्यान ॥
सर्वदा निभेल छान ॥
आडेल कसा रामबाण ॥
कान्हु गुणवान मार्तंड ॥
किती दडल रडल पडल चिडल ॥५॥