असी किरे प्रित वाढल किर्त जनात न होय हासी ॥
सख्या रे अपुली पत अपुल्या पशी ॥ध्रु०॥
माय बापाचा लौकिक राहिल असे काही साधन करा ।
पुढील धूर्त वाजरी काही धरा ॥
पर नारीशी भाषण करिता विचार नाही बरा ॥
आधिच आहे तुमची छबेली तर्हा ॥
स्वरूप तुझे चांगले फिरू लागतिल तेव्हा गरगरा ॥
झोंबतिल बळं तुमचा पदरा ॥
आबरूस बट्टा होइल थट्टा पडशिल दांत घसी ॥१॥
भाउबंद सोइरे गणगोतांत असावा ठसा ॥
उगवला सुर्य गगनी जसा ॥
दुपारची सावली नाही धन दौलतिचा भरवसा ॥
काळ कंठावा चालेल तसा ॥
आली दुनिया उफराटी फार तुम्ही सावधगीरिने असा ॥
चांगला ठिकाण पाहुन बसा ॥
ह्या रांडा घरघाल्या सख्या तू पडशी दात घशी ॥२॥
मोत्यासारखे तेज आपली आबरू दवडू नका ॥
भरम चौघामधी फोडू नका ॥
वाणी उदमी सावकार दुकानदारी तुम्ही मोडू नका ॥
कुणाचे कर्ज तुम्हि काढू नका ॥
श्रीमंताचे दरबारी येणे जाणे सोडू नका ॥
जोडला आश्रय तोडू नका ॥
सत्य बोलावे वचन लागु नये खोट्याचे संगतीशी ॥३॥
पत गेल्यावर लक्षाधिश सावकार असला जरी ॥
कोणा इत बार याचा घरी ॥
ऐसे समजून चित्ती उमजून शोध करा अंतरी ॥
पुढला विचार पहावा तरी ॥
बाळा राघु म्हणे खरे त्वां सांगितले सुंदरी ॥
गोष्ट ही ठसली ह्रदयांतरी ॥
सगन भाऊ म्हणे बसु नये सिंदिचे छायेसी ॥
सख्या रे अपुली पत अपुल्या पशी ॥४॥