सवति सवतिचा कजिया लाउनी तुम्ही देता स्वामीराया ॥
लाउनी पदर मुखी आडवा हसता नाही तुम्हा तिळभर माया ॥ध्रु०॥
मी वचनाची खरी राजसा साक्ष तुझ्या चरणाजवळी ॥
उत्तरासि प्रतिउत्तर दिधले नाही तुम्हा कवणे काळी ॥
सखीला तुम्ही जवळ घेता मला ठेविता दुर महाली ॥
रोज उठोन पाहाते नित्य बसविली तुम्ही तिजवर पाळी ॥चाल॥
काय आवड आहे जिवलगा तुम्हाला तिची जी जी जी ॥
मी गोरी गोमटी आवड तुम्हा सवतिची जी जी जी ॥
मग मागुन केली तिच जाहली प्रितीची जी जी जी ॥
लाऊन कडी द्वाराची रावजी बसता गंजिफा खेळाया ॥१॥
दुसरी म्हणे ऐक राजसा गोष्ट सांगते तुजपाशी ॥
वडिल जाहले म्हणुन काय तिनदा टाकुन बोले सवत मसी ॥
हि म्हणती मी फार चांगली इचे गोरेपण इजपासी ॥
मी अमंगळ जर असेल चांगुलपण दावित नाही ही कोणासी ॥चाल॥
हि मलाच म्हणते स्वामी माझा फितविला जी जी जी ॥
सवतिने साधला वैर सुतनी सुतविला जी जी जी ॥
काय करूनि चेटक करणी मथविला जी जी जी ॥
बग गुती गुतविला लाविले मला मंदिरी झुरवाया ॥२॥
साजव म्हणे ऐक सुंदरी दोघिसारख्या तुम्हि मजला ॥
तुला उणे काय केले साजणी गडे अन्नपाण्याला ॥
वस्ता थारा एक सारख्या देतो तुम्हाला घालायला ॥
उंच मोलाची वस्त्र सारखी देतो तुम्हा नेसायला ॥चाल॥
कोण्या गोष्टीची कमी नाही आजवर जी जी जी ॥
जे मागशील ते देईन भरला अंबर जी जी जी ॥
तुम्ही आपल्यामधी का करिता किरकिर जी जी जी ॥
किरकिर करिता रोज येता कपाळ माझे उठवाया ॥३॥
सगनभाऊ म्हणे निवडिला न्याय दोघीचा हा जाणा ॥
एकमेकिची चाडाडी सांगतिल आपण आणू नये मना ॥४॥