प्राणसख्या प्रियकरा करा शेवट पुरता मनी धरून
बाळपणींचा मित्र तुझ्या सद्गुणास जाईन मरून ॥ध्रु०॥
रूपस्वरूप साजिरा जसा अमृतकर तारांगणा
झळकतात नव लक्ष अधिक शोभतिल ते किरणा
पूर्ण कळा सोळा भरता भर किती नक्षत्र जसा
ये भरते सागरा चतुर भेटले धांवे त्याग ना
॥ चाल ॥ तुझ्या प्रीतिची आवडी म्हुन पडले झडी
नको प्राणसख्या विसरू मजला पळघडी
ने उतरून पइले थडी लागले चडी
पाहून खोल सागर घातली उडी
धर हाति फुलाची झडी म्हुन नार ओढी
तू प्राणहंस मी कांचन काया कुडी
तू कल्पवृक्ष मी छाया तुज तळवटी
जोडिली प्रीत मुणीजना शेवटी
मि मुलतानी कमान कसुन कसवटी
मी एक बंगाली मैना अशी
नामनगरच्या राया मी भुलले तुशी
पांची प्राणापासुन जीव खुसी
बोला गुजगोष्टी हरुषे मसी
कवळी नवती माझी लुसलुशी
तारुण्य निमोनी आली रसी
भर नवतीचा बाहार रुताचा पाहा नेत्र भरून
नानापरिची पुष्पे सुकती सुवास येइना फिरुन
प्रित चालू द्या सहा कदामधे अंतर पाडू नको
जिव करिन खुरबान तुझे मन राया काढु नको
हाति धरल्याची लाज आज मज हातचे सोडू नको
जन करिती कावळा पराचा भरम फोडू नको
चाल ॥ या इथल्या रांडा मुढा लावतील चढा
गुणी सगुण बघुन दोघांत पाडतिल तडा
मी नागिण घालिन झडा तू एक केवडा
पाहुन सद्गुणी जीवी चिखली रुतला खडा
मी वावडी तू एक सडा नको मारु आढा
झडू दे इष्कि नौबद वाजिव चौघडा
मी देहे काटे तू जिवलग माझा हुडा
जाई जुई चमेली तू गेंद भरला पुडा
तुसाठी सतीचे बाण जिवाचा धडा
गुणी रे मानसा सगुण निर्मळा
माझ्या ममतेचा असु द्या लळा
येऊ दे चित्तापासुन कनवळा
नाही तर दे झरका कापा गळा
कवळून जीवलगा मी पडते गळा
पुरता ममतेचा असु द्या अळा
मी आपुले सीरकमळ कापुन उभी हस्तकी धरून
भरुन प्राण पारडे तुला मी अर्पण करिते तरून.
मज कमळणीवर पहिल्यापासुन इच्छा तुझी मधुकरा
या गोष्टीची याद असू द्या पुर्ता शेवट करा
पतंग ज्योतीवर झडा घाली मनि नाहिं त्याच्या खरखर
म्हुन तरी डामाडौल करू नये आपला प्राणप्रियकरा
चाल ॥ चळ सुटला माझ्या मना मला राहवेना
घडोघडी धावत येते तुझ्या दर्शना
माझ्या निधना धना नको धरू कुन्हा
इष्कामधे लंपट भुलले चांगुलपणा
नाही भुलले तुमच्या धना मी वाहते आणा
प्रीतिची मजला जाहली तुझी झडपणा
मज आवळ कवळ कवटाळुन नको घेउ जना
प्रियकरा सख्या मम नेत्रींच्या अंजना
गुणी प्राणविसाव्या जिवलग मनरंजना
माझा जीव प्राण लागला झुरणी
तुमच्या वोंजळिने पीते पाणी
क्षण एक पाहताना होय सुराणी
माझे सीरी छत्र मी तुमची राणी
आज्ञांकित आहे मी तुमचे मनी
सख्या रे मी झुरते मोरावाणी
मज जीवनी मासोळी उल्हाळ घेती प्रीतीकरून
मी चातक तुम्ही मेघ लक्षवर बिंदु सोडा वरून
नीत करिता यायास मला म्हणता एकांती चला
मनी विकल्प विट नाही आजवर चालत आला सला.
एकांती गुजगोष्टी करि कवटाळून धरिता मला
म्हुन काय कुरवंडी करून मी घेते आलावला
चाल ॥ रंगमहाली शेजेवरी नानापरी
आनंद भोग विलास हर्ष अंतरी
चुवा चंदन कस्तुरी हो मैलागिरी
अत्तर गुलाब रमतो सुवास सागरी
केकती मालती कर्पुरी पाहा हरोहरी
दवणा मरवा महिकती मंचकावरी
पिवळी कवळी नागवेल नट नागरी
वेळा लवंगा नित चिकण चौफुले भरी
अशी सजुन उभी शेवेत कळा कुसरी
सगनभाऊ म्हणे अशा सुजाती
इष्की इष्कामधे मरून रहाती
महादेव कविराज पुण्यामधे राहती
त्याचे छंद ऐकुन गुणीजन गाती
बदलुन अंतरीमग उलटे वाहती
तोडीमधे छानपछान करती
आभंग बदलतील कवि सोदे पाहाती ऐसे आंथरूण
भेसळ उणी वीर्याचा म्हणती मग राहती चुरमरुन.