नटुनिथटुन चालशी रोक नको मारु नयनाचे ॥
बोलणे मंजुळ मैनाचे ॥ध्रु०॥
रंभापात्रा दिसे परंतु परोपरी सजली ॥
चाले ठुमकत चमकत बिजली ॥
लाल भडक वेणी सडक आत्ति चमेली मधी भिजली ॥
कसुनि कटी पातळ दीड मजली ॥
दिव्य तनु राजेंद्र पाहुन मुखचंद्र सुरत धजली ॥
सरळ कुच कंचुकीत भिजली ॥
मृदु मृदु मंजुळ आवसन गायनाचे ॥१॥
हासते बसत चालण राजआंबीरा सिरा हस्ती ॥
आंगी भर मदनाची मस्ती ॥
नवखणी दामोदरे नित्य तिसरे ताली वस्ती ॥
सदोदीत विषयाची कुस्ती ॥
आलख पलख मारी थवपी कमाना तीर कसुनि कस्ती ॥
आचपळ प्राणाशी होय तस्ती ॥
भोगू म्हणता विषय सांगड बांधु नेमाचे ॥२॥
सर्व भूषणे करून सावरून वरून पदर सिरीचा ॥
खुलला भाळी चंद्र सिरींचा ॥
उरस्थळी करि झटपट लटपट तो हार उरीचा ॥
कंचुकी रेखीव काठ जरीचा ॥
लावण्याची सीमा मुखोटा तेज मान परीचा ॥
जणु का मणका सर्पासिरीचा ॥
कैक आर्जवी फिरता परंतु दैवी कोणाचे ॥३॥
जाई जुईची शेज फुलाची त्या मोगर्याची ॥
करवळी पाच्या रंगाची ॥
प्रधानपुत्र हस्तकी धरता घडी एक प्रेमाची ॥
पुरविली मग इच्छा त्याची ॥
रावळ सिंधु म्हणे लावणी इष्टवावी ॥
प्रसंगी कविता ही कविची ॥
सगनभाऊचे कवन अमोलिक नाथ सांप्रदाचे फोडले मडके रंगार्याचे ॥४॥