नाजुक माझे आंग नवि नवती ।
आला चांगुलपणा चल बागामधि सज्जना ॥ध्रु०॥
गोड साखरेचा लाडू-तशी प्रीत आलि की रसा ।
तुम्ही या इकडे राजसा ॥
जसे गुलाबी फूल गुलबसि रंग गुलाला जसा ॥
लाल सुरेख मुखडा तसा ।
सम समान आकृती तुमचि आमचि प्राणहंसा ॥
गोड गोड द्राक्षाचा घोसा ॥
अलाबला किति घेऊ परंतू नको जाऊ आंबे बना ।
फेड चित्ताची कल्पना ॥१॥
तसूतसूची घेउनि बेतणी तक्ते बांधले सुती ।
आत झडे ना नारि ती ॥
गुलछबू गुलटोप मोतिया मोगरा शेवंती ।
नारंग्या खिरण्या तुती ॥
जाईजुई रातांजन बटमोगरा आणिक मालती ।
दौणा गुलाब केकती ॥
ज्या पुष्पाची आवड तुम्हाला शेज करिन सज्जना ।
सुख होइल अपुल्या मना ॥२॥
हिरवे काठ पैठणचे पातळ दोन्ही पदरा हात हात ।
हिरवी कंचुकी मजबुत ॥
तेजस्वी श्रृंगार करुन मी ल्याले साधी नथ ।
जणु आली चपला चमकत ॥
इष्क पुरा करणे आसल पौषाख करावा इथ ।
शांत होइल आपले चित्त ॥
सर्वस्वी मी दासी पदरची आहे तुमची गुणी जना ।
हा वक्त येइना पुन्हा ॥३॥
प्राणसखे राजसे रोज गडे तुझा मनाच्या ओढी ।
आम्ही तृप्त करू या घडी ॥
बागामधि घेऊन गेली छेलछबीला गडी ।
लाजून उभी फांकडी ॥
सुरत कशी शोभिवंत पुष्प तुरा गुंफून नवलडी ॥
खोविला शिरी तातडी ॥
सगन भाऊ म्हणे भोग पर नको विसरू मैतर जुना ॥
रामा समजेल या खुणा ॥४॥