चंद्राचे चांदणे सितळ का ऊष्ण प्राणपती ॥
ते सांगा मजप्रती कल्पना डोळ्यामधि खुपती ॥ध्रु०॥
चांद रात्रीचा चंद्र पौर्णिमेचा चंद्र गोड ॥
आवड मनाची सांग साजणी नको पडू देउ कोड ॥
अत्तर अर्गजा केशर कस्तुरी आण लाड लाड ॥
खुल्या चांदण्यामधि लावा उदबत्त्याचे झाड ॥
निवांत निश्चयपणे राजसे ऐकून घे कीड ॥
शशी तेज पाहाता उभयता मग होइल फोड ॥चाल॥
पाहुन तेज कांती चला मंदिरात जाऊ ॥
करंगळ्या धरून आदरे बाहेर परतोनी येऊ ॥
खुण मिळल्यावरी अपुली मुख भरूनि विडे घेऊ ॥
शशी तेज उष्ण का समजुत पडली गुण शांती ॥१॥
आपण सितळ असल्यास प्रभा चंद्राची शीतळ दिसती ॥
आपण उभयता उष्ण कल्पना मनि वसती ॥
पर चंचळ बावरी सख्याला अति आदरे पुसती ॥
ती तांत्रिक लक्षणे प्रितीची चतुरा परि वस्ती ॥
राव बाजीचे शहर नमुना पुणे ग्राम वस्ती ॥
अहोरात्र अहो दिवस होती इष्काची कुस्ती ॥चाल॥
आर्ज विनंती पहिली मी उभी कर जोडून ॥
गुण ग्राहिक गुण पाहाता आले ब्रह्मपुरी सोडून ॥
राव सवई समशेर ठेविले चित्ती ताडून ॥
लाजून बसते भिडून जडु दे लालडीला मोती ॥२॥
समजूत माझी झाली शुभ्र पोषाग जरी जरिचा ॥
सिरपेच तुरा कंठी चौकडा झोक भिकबाळिचा ॥
हिरव्या पाचुची सैली पदक तळी लोलक निळीची ॥
रत्नजडित करी कंकण झगमगतो जडावाचा ॥
दृष्टी भरुन पाहाते छबिला शहर बडोद्याचा ॥
चटक चांदणी बनले मला घ्या शालु पैठणीचा ॥चाल॥
चमकली जसी बीजली अति गर्जना करूनी ॥
तुमचे स्वरूप आगळे उगवला सहस्त्र तरणी ॥
पेहेराव करिन आगळा निर्मळ वस्त्राभरणी ॥
लंपट स्वरूपावरून पाखरावाणी फिरेन भौती ॥३॥
चंद्र मध्यासी आला आता एक विनंती माझी ॥
ख्याली-खुशालीमधि सख्या खेळु चौसर बाजी ॥
डाव सख्याचा आला सखीवर जोबन केला जी ॥
नग्न गंगा स्नान कराया न व्हावे वाजी ॥
जशी मोहनाने बटावासंगे केली इष्कबाजी ॥
बोभाटा दक्षिणेत कळला जन म्हणती वाहवा जी पचाळ ॥
ज्योतिशी ज्योत मिळाली क्षणभर वसते जवळी ॥
तुम्ही फुल गुलाबाचे मी शेवंती पिवळी ॥
रमता सुख संतोषेहि तनु नूतन कवळी ॥
सांभाळ करा माझा सुंदर वनचाला गौती ॥
सगन भाउच्या कवनावरती फंदी लोक झुरती ॥४॥