मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
अर्ज विनंती ऐका लोभ हा सा...

सगनभाऊ - अर्ज विनंती ऐका लोभ हा सा...

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


अर्ज विनंती ऐका लोभ हा साळू सासर्‍याला जाते

सख्या मला मूळ आहे नाहि तरि एकमास आणखी रहाते

मुळारंभीची कथा सांगते ऐकुनि घ्यावी गुणवंता

सहज आले यात्रेस गाठ अवचित पडली लक्ष्मीकांता

नेत्र भरून न्याहाळिले तुम्हाला आनंदले चंद्र पाहता

त्या संगे प्रीत घडो असा कधी पावशिल पंढरीनाथा ?

नाभीकमळापासुन इच्छिले जेव्हा तुम्हि मजकडे पाहता

खुशि झालो एकमेकावरती गाठ कशि पडेल एकांता?

मरयादा सोडुन विचारिले नगरामधे तुमच्या राहते

प्रीतीची लक्षणे जाणता प्रीत करिशि वाटते ॥१॥

आज्ञा वंदुनी आले प्रियकरा चालत अनवाणी पाई

फोड आले तळपायाला सुखलक्ष आहे तुमचा ठाई

दिपवेळी दिपसमयी शहरामधे उतरले गुणग्राही

वरतमान लिहुन पाठविले सांगा सख्याला लवलाही

ऐकताच राजश्री उठले आनंद ह्रदयी न माई

दृष्टभेट होता आधिच फुरफुरली डावी बाही.

पहिले दिवशी रात्रौ समयी एकांत निर्भीड जेथे

प्रसन्नता मर्जि उभयता इष्की सागरा आले भरते ॥२॥

इतके असुन साजणी युक्त पढली सांग कशी

प्रितिचे उत्तर काही सुचेना वेधले या शरिराशी

ऐकुन घ्यावे राजपुत्रा मिच बोलते आपणाशी

वचन उगवले तुमचि कल्पना पुढे कशाची गुणराशी

हर प्रयत्ने पडेल प्रियकरा रंग माहालि सुख सेजेशी

विडा कोणाचे हातचा घ्यावा दुर केले घरले स्त्रियेसी

तु लग्नाचा जोडा जैसा निर्मळ गंगाजळ वाहते

आम्हासारख्या उदंड मिळतिल भवताले खाते गोते ॥३॥

गौरविले स्वामीला घेतला निरोप विषय आवरेना

पाकषनेहा मधे अंतर नाही साक्ष पंढरीराणा

तुमचा शहरामधे नांदतो परदेसि नाही सजणा

जेव्हा जिवाला वाटेल तुमचा आता पाहिजे गुणगहिना

तेव्हा स्वार अश्वावर होऊन दरकुच गेले निजभुवना

बोलवित चालले राज बनसीच्या तुर मोती दाणा

ज्याच्या आंगी इष्क बिंबला तो समजेल वर्म पुते

सगन भाऊ म्हणे इतर पुरुष रसभोगी सूज्ञ ज्ञाते ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP