मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|सगनभाऊ|लावणी संग्रह : १|
उचलुन कडेवर का घ्याना

सगनभाऊ - उचलुन कडेवर का घ्याना

सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.


लाड लाड येते येते मनरंजना ।

उचलुन कडेवर का घ्याना ॥ध्रु०॥

दासी मी तुमची तुमची निरंतर ।

येउन बसते मांडीवर ॥

असु द्या ममता ममता मजवर ।

उभी लाजुन सन्मुख पदर ॥

तुम्ही तर माझे माझे सरदार ।

शरिर नाजुक माझे फार ॥

उष्णता भारी भारी झोप येईना ॥१॥

चमकत येते येते सरदार ।

आंगावर लखलखाट जवहार ॥

नेसली शालु उंच पैठणीचा बहार ।

पदर दीड मजली जरतार ॥

विनंती करिते करिते मी उत्तर ।

ठेउन मस्तक चरणावर ॥

तोंड गोड बोला सखि सजना ॥२॥

समजल्या आंत्री आंत्री राजबनसी ।

धरि कवटाळुनि पोटासी ॥

नको हो हात लावू लावू आंगासी ।

दिवस तिसरा मी सीवनीशी ॥

उद्या मी न्हाइन न्हाइन चवथे दिवशी ।

डाग पडला आंगवस्त्रासी ।

गोळा करू द्या करू द्या बिच्छोना ॥३॥

न्हाउन मी आले पातळ नेसुन ।

नीर्‍याचा घोळ हाती धरून ॥

गेला रंग महाली महाली आनंदान ।

उभयपक्षी करी भाषण ॥

हळु हळु म्हणते सांभाळुन ।

दुखवाल कंबर सरसरून ॥

जीवाकडे पाहाता पाहाता हैराण ।

जणो तुमची निजणे बसणे ॥

सगन म्हणे आता विडा बसुन घ्याना ।

उचलुन कडेवर घ्या ना ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP