आम्ही न बोलू आजपुन गडे फिरून तुजसंगे ॥
गुणिवंत स्त्रियाचे गुण वेगळे वर्ततात सत्संगे ॥ध्रु०॥
नव महिन्यातुन नऊ दिवस नव्वे मासी ॥
काय विषय प्रित पाहण्यात आलि विशेषी ॥
आंग सांग मित्र नको तुझा गुण राशी ॥
दिवसांतुन एक घडी द्यावी आम्हासी ॥
एक फळास नाही ठिकाण भोवते लागे ॥१॥
सत्मार्गाचे दृष्टांत ऐकून घेणे ॥
जयदेवस्वामीमहाराज तयाचे स्त्रिने ॥
मृत्यु पावली ऐकून सोडिला प्राण ॥
चोविस अष्ट पद्मा म्हणोन उठविले जाण ॥
शोधकते आणविती धन्य सौभाग्य ॥२॥
आत्मराज तेथून एक माहित सर्वाते ॥
काय वाच्छाय काय गरिब सुज्ञ ज्ञाते ॥
जिवा न जिव सारिखा शोधून पाहते ॥
उत्तर सुचेल तर बोल नको खाऊ गोते ॥
च्यार्ही वाटा मोकळ्या येईल कोण मार्गे ॥३॥
वाहिली ती गंगा खरी राहिले तीर्थ ॥
बोलणे येथुन संपले झाला नाही अर्थ ॥
या इष्काचे पाई बुडाले समर्थ ॥
वरकांतिच्या प्रितीने होईल मात ॥
म्हणे सगनभाऊ सावध व्हा असावे जागे ॥४॥