नार मर्हाठमोळ्याची ॥
काय गोड बोलणे भुजवर चालणे मुरवत चौडाळ्याची ॥ध्रु०॥
उत्तम मास कार्तिक ॥
पाहिलास आरवार गुरुवार शनिवार सात्विक परमार्थिक ॥
जिवा वाटते सुख ॥
पापणीच्या बाहेर डोळे केले जाहिर छातित भरली हुक ॥
घामेजले मस्तक ॥
जहरी इंगळीचा डंक उमरिने दोन्ही पंख जाहले मी भयानक ॥
आग झाली टाळ्याची ॥१॥
काय म्हुन घातलीस आण ॥
तुम्हि कोण आम्ही का बायकोचे स्वामी उभे राहा सावधपण ॥
नाही गेले पोरपण ॥
दाढी डोई पिकली देही सारी सुकली जिव्हा चांडाळिण ॥
जगण्यांत सदगुण ॥
हाती घ्या दरपण ॥
सांगा निरोपण लोका चित्त देऊन ॥
गोळे बेरिज गोळ्याची ॥२॥
गोळे बेरिज आम्हाला ॥
कार्तिक मासी वद्य एकादशी पुन चाटका लागला ॥
पेस्तर साली तुला ॥
तान्हे बाळ कडेवर मोत्याचे लडिवर आला संतोषला ॥
दिघीवर विश्रांतिला ॥
पाहिलिच भोळवट हाती तांब्या गळवट पाणि दे प्यायाला ॥
खूणगाठ जिव्हाळ्याची ॥३॥
मन माझे मोहिले ॥
पावले ज्ञानराज फत्ते जाहले कामकाज बरे साधन साधिले ॥
व्यासाने बोधिले ते फळ प्राप्त आप्ताहुन आप्त श्रीफळ मज लाधले ॥
शिवसांभ आराधिले ॥
राहु केतु तीक्ष्ण रविराशिला ग्रहण चंद्राला लागले ॥
प्रित सावता माळ्याची ॥
सत्य सगनभाऊ निमीपुन भाग घेऊ आण राधा सावळ्याची ॥४॥
येउ द्या माझी काहि करुणा
(राग संकिर्ण)
चाल - राघुकारणे झुरे मैना ॥ अरे चल दुष्टा बैमाना
होनाजी
येउ द्या माझी काही करूणा ॥
पाव गिरिजाप्ति भगवाना ॥ध्रु०॥
पूर्व पुण्याइचे ताले ॥
म्हणून हे सुख प्राप्त झाले ॥
जन्मांतरी तप आर्चन केले ॥
रत्न वाळूमधे सापडले ॥
भाग्य या नशिबाचे ताले ॥
पतिला प्राणदान केले ॥
फुटला हा विषयाचा पान्हा ॥१॥
आज गे का ही पडली मला भ्रांत ॥
सखा नाही आला मंदिरात ॥
भोग्या भवर्यासी एकांत ।
कसी कर्मिली सारी रात ॥
कोण्या स्त्रियेसी मन शांत ॥
लुब्ध जाहला न कळे अंत ।
किती गे बाई आवरू या मना ॥२॥
आमुच्या प्रीतिमधे अंतर ॥
पडले नाही आजवर ॥
आपले गुज सांगु मी कुठवर ॥
साथ मल्हारी गिरिवर ॥
नेमधर्मामधे आंतर ॥
पडले नाही आजवर ॥
आग लागो या चांगुलपणा ॥३॥
रावळ सिधु कवी समर्थ माझा ॥
प्रसन्न ज्ञानेश्वर महाराजा ॥
नारिचा रंग गुलाबी ताजा ॥
प्रित चाळवीशी मलुराजा ॥
भाउ सगनचा आगाजा ॥
धोंडिराजास पूसा मवजा ॥
रामाचे उत्तर घ्यावे गूणा ॥
होन्या गवळ्याचा झाला चुना ॥४॥