नारदभक्तिसूत्र विवरण
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
नारदभक्तिसूत्र विवरण । जाहलें येथ संपूर्ण । परि सदुगुरु ज्ञानेश्वर वंदन । करावयाचें राहिले ॥१॥
समग्र पात्र वाढिलें पूर्ण । परि घृताची धार पडल्यावीण । जेंवि शुध्द नव्हे अन्न । तैसेचि मज गमों आलें ॥२॥
ज्ञानराज अंतरात्मा । अलंकापुरी देहनामा । तीर्थ इंद्रायणी भक्तिप्रेमा । सदा जल वाहातसे ॥३॥
त्यांसी करावया वंदन । माझें सरसावले मन । परि वंद्य वंदकत्वें मीपण । दोहों ठायीं हारपले ॥४॥
आतां वंदन कैसें करावें । केलियावीण न राहावें । सहजीं सहजत्वें वावरावें । अद्वयपणें आपुल्या ॥५॥
ज्ञानेशी अखंड ऐक्यपण । हेचिं माझें नित्य वंदन । परि गुरुशिष्यभौव द्वैत रक्षण । अवश्य केलें पाहिजे ॥६॥
सगुण विग्रहीं ज्ञानराज । जाहले साधावया भक्तिकाज । अद्वैताची दाविति वोज । आश्रय करोनि द्वैताचा ॥७॥
अद्वयपण न सांडोनि । केली द्वैताची उभारणी । द्वैत अद्वैत एकपणीं । समरसता साधिली ॥८॥
अद्वैत साधावया कारण । नलगे द्वैत निराकरण । द्वैत अद्वैताचें ठाण । एके ठायीं मांडिले ॥९॥
सुवर्णसिध्द करावया । अलंकार न लगती मोडावया । मृत्तिकेचा ठरवावया । नलगे घट भंगावा ॥१०॥
अलंकारीं सुवर्णता । मृत्तिकारूपें घटाकारता । तैसी अद्वैतपणे द्वैतसत्ता । खरी करोनि दाविली ॥११॥
पार्थिवरूपें अवतरून । जाहले बोधिते निजात्मज्ञान । तेंचि आपण स्वयें असोन । जगासी होऊनि दाविलें ॥१२॥
ऐसा थोर उपकार केला । तो वाणीनें न ये वर्णिला । सद्गुरुमहिमा सीगे आला । चरित्र दाविलें विचित्र ॥१३॥
त्या श्रीगुरु माउलीसी । नमन माझें अहर्निशी । अनन्यभावें सेवकपणेंसी । पायीं त्यांच्या विनटलों ॥१४॥
त्यांची संपूर्ण कृपा मजवर । ऐसा मनीं दृढ निर्धार । दास बनूनि आजवर । एकनिष्ठपणें राहिलों ॥१५॥
जे जे मनीं धरिली आळी । ते मायबापें पुरविली । अंत:करणी उखा उजळली । स्वयंप्रकाशज्ञानाची ॥१६॥
प्रपंचीं कष्ट अपरंपार । भोगितों दु:खाचें डोंगर । उतरोनि नेले पैलवार । संसारसागर शोषविला ॥१७॥
नित्यनूतन चिंता मनीं । गेलों होतों पूर्ण गांजोनि । परि नित्य बोधामृत पाजोनि । हलकें केलें दु:ख माझें ॥१८॥
पूर्वसुकृत कांही होते । म्हणोनि लागलों या मार्गाते । नाहीं तरी गोते । अनिवार जन्ममृत्युचे ॥१९॥
जोगमहाराजांची संगति । मज लाभली अवचिती । कथा कीर्तन ऐकतां भक्ति । लांचावली मति माझी ॥२०॥
पंढरी आळंदीची उपासना । सहज आवडली मना । सांप्रदयिक निरूपणा । प्रवचनावरी आदर ॥२१॥
आळंदी पंढरीची वारी । पत्करिली नेम निर्धारी । गळां माळ आपुल्या करीं । घालून बनलों वारकरी ॥२२॥
संतवाङगमयाचे अध्ययन । केलें स्वसंतोषाकारण । तेणें मन निवालें पूर्ण । समाधान पावलों ॥२३॥
उज्वल संतपरंपरा । अपरिमित ग्रंथभांडारा । पाहोनि न्यायनीतिविचारा । संदेहरहित जाहलों ॥२४॥
वारकर्याचें मुख्य दैवत । पंढरीसी रुक्मिणीकांत । ज्ञानराज गुरु निश्चित । ऐसा भाव दृढ झाला ॥२५॥
दत्त आत्रेय गुरुमूर्ति । बालपणापासोनि आवडती । विष्णुरूपें ऐक्या येती । श्रीविठठल ज्ञानदेव स्वरूपें ॥२६॥
ऐसी ही द्विविध उपासना । परि भेद नये माझे मना । ऐक्यभावें आणोनि ध्याना । नित्य सेवा करीतसे ॥२७॥
परि एक इच्छा प्रबल मनीं । अपरोक्ष साक्षात्कारालागोनि । कोण येऊनि पुरवील धणी । ऐसी तळमळ निरंतर ॥२८॥
प्रत्यक्ष दर्शन झालियावीण । मना नव्हे समाधान । परि अनधिकारित्वाची अडचण । आडफाटा करीतसे ॥२९॥
परि उभारोनिया कर । गर्जोनि सांगति ज्ञानेश्वर । खाणींत न सांपडे अधिकार । तळमळी तो अधिकारी ॥३०॥
खरी तळमळ असती । तरी पूर्वीच कृपा होऊनि जाती । तेतुली नाही अधिकारस्थिती ।म्हणोनि पडिला अंतराय ॥३१॥
तेतुली जरी नाहीं । तरी किंचित वसे यांत शंका नाही । ज्ञानेश्वर सुत म्हणवितों पाहीं । हाचि माझा अधिकार ॥३२॥
संपूर्ण अधिकार जरी नाहीं । तरी जो असे काहीं बाही । त्यासी पूर्णता आणितील तेही । कृपाबळें आपुल्या ॥३३॥
त्यांची कृपा व्हावया । अनन्य शरण त्यांचें पायां । मज जाऊं नेदितील वायां । ऐसा पूर्ण भरवसा ॥३४॥
त्याचें वचनीं विश्वास । अक्षरांचा नित्य हव्यास । माझे मनासी उपरति खास । कोणे काळीं तरी होईल ॥३५॥
त्याचें वचन मी पाळीन । सांगितल्याप्रमाणे वागेन । इंद्रियाचा संयम करून । करीन अखंड नामस्मरण ॥३६॥
नामस्मरणें धन्य झालों । सकलसिध्दिसी पावलों । सकल संशय निर्मुक्त झालों । तात सांगति निश्चयें ॥३७॥
तोचि कित्ता पुढें ठेवून । अक्षराखाली अक्षर काढून । वडिलांचा हात धरून । पाउलें टाकीत जाईन ॥३८॥
हेंचि माझें औपासन । नित्य करीन त्यांसी वंदन । त्याची आज्ञा प्रमाण मानून । पात्रताही संपादीन ॥३९॥
असो यापरी वंदन करून । सूत्रव्याख्या केली संपूर्ण । नारद मुनीश्वरातें नमून । आजि धन्य जाहलों ॥४०॥
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर । जप करितां निरंतर । माथां ठेवतील कृपाकर । गुलाबराव महाराज बोलिले ॥४१॥
ज्ञानरायासी सख्य व्हावें । ऐसें मनीं धरिलें भावें । परी रोम रोम ज्ञानेश्वर म्हणावे । तैचिं ते फावेल ॥४२॥
ऐसें बोलोनि गेले सहज । तेंचि मनीं परिलें बीज । शाखांकुरन्यायें सहज । फलपुष्पबहारें विस्तारलें ॥४३॥
माझे ह्रदयीं ज्ञानेश्वर । मुखीं सतत तोचिं उच्चार । ह्स्तपादादिकांचें व्यवहार । नव्हति ज्ञानेश्वरांविरहित ॥४४॥
जागृति स्वप्नसुषुप्ति । अखंड ज्ञानेश्वरी रति । ज्ञानेश्वरांवाचूनि मति । अनाठायीं रमेना ॥४५॥
सकल विश्व ज्ञानेश्वर । ज्ञानेश्वरें खचिलें अंबर । अखिल ब्रह्मांडासी आधार । ज्ञानेश्वर सदुगुरु ॥४६॥
ज्ञानेश्वर कृपा थोर । ज्ञानेश्वरी पूर्ण निर्धार । म्हणतां मुखें ज्ञानेश्वर । प्रकट होतील अंतरीं ॥४७॥
असो आतां लेखन पुरे । लेखनासी विषय नुरे । सबाह्यभ्यंतरी भरोनि उरे । तो स्वामी सदगुरु ज्ञानेश्वर ॥४८॥
त्यांसी सद्भावें वंदन । करोनि ग्रंथ केला पूर्ण । जयाचें तयासी अर्पून । कृतकृत्य झालों ऋणमुक्त ॥४९॥
तेंही ऋणशेष फेडावया । डोई ठेविली त्यांचे पायां । सनाथ करोत अर्भका या । दावूनियां निजरूप ॥५०॥
शके अठराशें एकसष्ट । चैत्रमास झाला प्रगट । शुध्द द्वितीया तिथि स्पष्ट । गुरुवार शुभ दिवस ॥५१॥
ते दिवशीं लेखन समाप्त । होऊनि झालों स्वस्थचित्त । केशवाचा पुरला हेत । सद्गुरु स्वामीप्रसादें ॥५२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2015
TOP