मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ५४

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ५४

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


तेथें नाहीं गुणसंबंध । सात्विक राजस तामस भेद । द्रव्यगुण कल्पनेचा बाध । सहज होऊन राहिला ॥५५३॥
भगवान स्वयें गुणरहित । हृदयामाजी नित्य नांदत । सर्वगुणांहून अलिप्त । स्वयंप्रकाश स्वरूपें ॥५५४॥
तैसेंचि त्याचे प्रेम जाणा । तद्रूप होऊन अनुभवा आणा । गुणागुणांची विवंचना । राहिली तेथें लाजोनि ॥५५५॥
म्हणोनि बोलिजे गुणरहित । गुण साक्षित्वें नित्य वर्तत । तीही ऋतुसी न स्पर्शत । आकाशापरि अलिप्त ॥५५६॥
तैसिचि तें कामना रहित । कामना मनामाजी उपजत । मनजी उन्मन झालें जेथ ।कामना कैचि त्या ठाई ॥५५७॥
कामना तरी वैषयिक । द्वंद्वंसंबंधे होय बाधक । आत्मा निरामय निर्विषयक । कामना कैसी उपजेल ॥५५८॥
आपुलिचि कामना आपणासी । उपजिवितां नये कोणासी । न उपजिवितां आत्मसिध्दिसी । नव्हे बाधक सर्वथा ॥५५९॥
जैसी सूर्याचें ठायीं । दीपसिध्दि नलगे कांहीं । अस्तमानाचें नांव नाहीं । नित्य उदित प्रकाशें ॥५६०॥
तैसें प्रेम जें भगवदरूप । तेथें कामनेचा होय लोप । सहज निष्काम आपेंआप । तेंचि स्वरूप तयाचें ॥५६१॥
त्या प्रेमाचें ऐसें लक्षण । वाढों लागे क्षणोक्षण । न तुटे कधीं न होय जीर्ण । आपुलेपण भोगवी ॥५६२॥
विषयप्रेमें विषयाकार । आत्मप्रेमें आत्माकार । स्वस्वरूपाचा सत्य निर्धार । वृत्तिरहित अवस्था ॥५६३॥
विषयप्रेम लयासि जातें । भगवदप्रेम वाढों लागतें । अविच्छिन्नपणें नांदतें । एकवार उपजलिया ॥५६४॥
तयाचा हाचि विशेष । कधीं पावों नेणें नाश । अविरतपणें सावकाश । नांदे आपुलिया ठायीं ॥५६५॥
आतां सूक्ष्मतर ऐसें म्हणणें । तेंही सांगों कवण्यागुणें । स्थूल इंद्रिया विरहितपणें । आपुले आपण जाणावीं ॥५६६॥
विषयभोगी जें प्रेम उपजत । तें स्थूलपणें अनुभवा येत । विषयसंबंध विरहित । तें सूक्ष्म ऐसें म्हणावें ॥५६७॥
निर्विषय झालिया चित्त । आपुलेपणें जें होय उदित । तेंचि सूक्ष्मतर म्हणों येते । अनुभवितां अनुभवें ॥५६८॥
अनुभव तो वर्णवेना । प्रेम तें दावितां येईना । प्रेम अनुभव एकचि जाणा । स्वसंवेद्यस्वरूपें ॥५६९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP