श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ३५
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
भक्तिचें प्रथम साधन । निषिध्द विषयांचेनिर्मूलन । विहितांचे विधिने सेवन । आसक्तिरहित मानसें ॥३३६॥
विषयांचें प्रकार दोन । विहित आणि निषिध्द जाण । विहित ते शास्त्रप्रमाण । निषिध्द तद्विरहित ॥३३७॥
विषय प्राणीमात्रांचे ठायीं । जडोनि ठेलें देहिच्यादेहीं । भोगिल्यावीण सुटका नाहीं । अदृष्ट कर्मानुबंधें ॥३३८॥
देह उपजातांचि प्राणि । आपआपणासी विसरोनि । जाती बहिर्मुख होऊनि । पंचविषय कवळाया ॥३३९॥
श्रोत्रांसी श्रवणसुख । लोचनासि रूपसन्मुख । जिव्हेसी भोजनसुख । सहजपणें आतुडलें ॥३४०॥
घ्राणासी गंधावरी प्रीति । त्वचेंसी मृदुस्पर्शाची ज्ञप्ति । सहज उपजोनि आसक्ति । जडों लागे तयाची ॥३४१॥
ऐसें हें जरी स्वाभाविक । तरी करणें लागे विवेक । इंद्रिया जरी वाटलें सुख । तरी परिणाम लागे विचारावा ॥३४२॥
विहित आणि निषिध्द । हा शास्त्रानें दाविला भेद । मनुष्य प्राण्यां केल्या बोध । शाश्वत सुखाकारणें ॥३४३॥
पशुपक्ष्याचे ठायीं । अह भेदचि नसे कांही । आपपर भाव नाहीं । बुध्दिहीन स्वभावें ॥३४४॥
मनुष्यासी बुध्दि विशेष । बंधन घालावें लागे त्यास । स्वार्थ लोभ उपजोनि त्यास दु:ख लागे भोगावें ॥३४५ ॥
अधोगति उत्तमगति । मनुष्यासीच प्राप्त होती । कर्मानुसार वासना उपजती । भोग भोगविती अपुला ॥३४६॥
विषय वासना स्वाभाविक । परी लोलुप्यता होय बाधक । म्हणोनि वासनेसि नियामक शास्त्रसिध्दांत प्रतिपादी ॥३४७॥
विषयांहूनही मारक । विषयध्यान जाणोनि सम्यक । तन्निषेधार्थ व्यवस्थासूचक । शास्त्र आज्ञा जाणोन करी ॥३४८॥
जीव परमार्थत: ब्रह्मरूप । परि वृत्तिसंगें झाले देहरूप । वृत्ति नि:शेष होतां अरूप । आपुले रूपें राहती ॥३४९॥
विहित विषयाचें सेवितां । वृत्तिलय पावती स्वभावतां । निषिध्दाचे सेवनीं रमतां । फोफावति अधिकाधिक ॥३५०॥
वासना जंव जंव वाढती । तंव तंव समीप अधोगति । वासना जरी निर्मूल होती । तरी उत्तम गति लाभे तया ॥३५१॥
म्हणोनि वासनावृत्ति निर्मूलन । ते आत्मश्रेयासी कारण । जेणें घडे तेंचि साधन । सांगती नारद महर्षी ॥३५२॥
निषिध्द विषय समूळ त्यागावे । विहिताचे नादीं न लागावें । देहरक्षणार्थ सेवावे । आवश्यक वाटती तेतुले ॥३५३॥
विषय तरी सेवावे । परी तयांचें ध्यान लागों न द्यावें । ये विषयीं नियम लाववे । लागती शास्त्रां सत्पुरुषां ॥३५४॥
म्हणोनि विषयत्याग जो बोलिला । तो निषिध्दाचा जाण वहिला । संग त्याग जो प्रतिपादला ।
तो निश्चयें जाण बिहिताचा ॥३५५॥
निषिध्द अजिबात टाकावें । तरीच आत्मसहित साधावें । विहित भोगोनि रहावें । अनासक्तपणें ॥३५६॥
ऐसा या सूत्राचा सारांश । आतां अनासक्ति साधावयास । अखंड व्हावा आत्माभ्यास ।तो पुढीलिये सूत्रीं बोलिला॥३५७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 18, 2015
TOP