श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ६१
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
सर्व कर्म ब्रम्हार्पण । जेणें साधिलें आत्मनिवेदन । तेणें ईश्वरकृपा लाधली पूर्ण । नि:संदेह जाणिजे ॥६५६॥
लौकिक अथवा वैदिक । कर्में करितांही अचूक । स्पर्शों न शके अभिमान देख । तें ब्रह्मार्पण म्हणावें ॥६५७॥
तैसेचि आत्मनिवेदन । म्हणजे अहंकाराचें उच्चाटन । अहंममतेचें निर्मूलन । करून स्वयें राहिला ॥६५८॥
जें जें काहीं होतें जातें । तें ईश्वरच्छेनें घडते । निमित्तासी कारण होतें । कर्तृत्व मानवी प्राण्यांचे ॥६५९॥
जो या विश्वाचा निर्माणकर्ता । स्वयें धर्ता आणि प्रतिपाळिता । तोचि होय संहारकर्ता । निसर्ग नियमानुसारें ॥६६०॥
ऐसें जाणोनि निश्चित । सकल सत्ता तयाची एथ । कांही होतां हित अनह्ति । नये मांगू उद्वेग ॥६६१॥
हितानहित झालें । तरी आपुल्या कल्पनेंने ठरविलें । शाश्वत हित तो जाणे भलें । जेणें ब्रह्मांड निर्मिलें ॥६६२॥
आपणा आपुली कल्पना । भ्रांतीमाजी घाली मना । लोभ स्वार्थी संकुचितपणा । बुध्दीसी आणी आपुल्या ॥६६३॥
जीवपण एकदेशी । ईश्वर व्यापक सर्व देशीं । तेणें योजिल्या कार्यासी । काय दूषण येईल ॥६६४॥
परी आपुले बुध्दि विचारितां । जरी भासली सदोषता । तरी व्याकुळ न व्हावें सर्वथा ईश्वरेच्छा मानोनि ॥६६५॥
जें जें कांही घडों आलें । तें आपुलिया हितार्थचि भलें । ऐसें जाणोनिया वहिलें । चिंता मनीं न करावी ॥६६६॥
लौकिकदृष्टया सुखदु:खात्मक । जरी ओढवले प्रसंग अनेक । तरी निश्चळता मनाची देख । नये देऊं डळमळों ॥६६७॥
ईश्वरयोजना कल्याणत्मक । हा निश्चय राखावा निष्टंक । मनाविरुध्द कांही एक । घडलिया खंत न करावी ॥६६८॥
ईश्वराचे आधीन सकल । जाणोनि राहावें निश्चळ । बदलतां काळवेळ । सकळ नीट होईल ॥६६९॥
मनुष्याचा विचार क्षणिक । तैसेचि मानी सुखदु:ख । ईश्वरयोजना अतिव्यापक । क्षल द्यावें त्यावरी ॥६७०॥
तो दीनदयाळ कृपाघन । सर्वांचे शाश्वत कल्याण । मनीं आणूनि उपायसाधन । करीतसे निरपेक्ष ॥६७१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2015
TOP