मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
स्तवन

श्रीनारदभक्तिसूत्रें - स्तवन

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


ॐ नमो सद्गुरु नारदा । सच्चिदानंदा अभयपदा । भक्तिमार्ग रक्षणीं सदा । दक्ष तूंचि सर्वकाळ ॥१॥
पूर्वकल्पीं पुण्य घडलें । संत उच्छिष्ट सेविलें । ईश्वरानें आराधिलें । मनोभावें बाळपणीं ॥२॥
मातेसी आलें मरण । तेचि मानिला शुभ शकुन । एकांतवास पत्करून । निर्जन वन सिविलें ॥३॥
वृक्षाचे ढोलीत सर्वकाळ । ध्यानीं बैसलासी अचळ । व्याघ्र वृश्चिक सर्प व्याळ । सभोवतीं वावरती ॥४॥
वयसा तरी येतुलें वरी । परी कवणाचें भय न धरी । अढळ विश्वास अंतरीं । मानिला हरीकृपेचा ॥५॥
ध्यान करितां वाढलें बळ । मन उन्मनीं झालें निश्चळ । ईश्वरकृपा सर्वकाळ । अनुभवा येऊं लागली ॥६॥
परी प्रत्यक्ष दर्शन घडेना । जीवींची हौस फिटेना । करितांही उपाय नाना । व्याकुळता अंतरीं ॥७॥
प्रत्यक्षता झालियावीण । काय करावें वांचून । संतप्त झालें मन निर्वाण । करावया उद्यत ॥८॥
तंव ऐकिली आकाशवाणी । इये जन्मीं अशुध्द योनीं । जन्म झाला याकरणीं । प्रत्यक्ष दर्शन अशक्य ॥९॥
परी विश्वास काहीं पटेना । कोण बोलतें कळेना । तीच वाणीं पुन:पुन्हां । तैसेंचि सांगों लागली ॥१०॥
मग निश्चय जाहला पाही । मरणावांचुनि सुटका नाहीं । मरण तेंही लवलाही । केव्हां येईल कळेना ॥११॥
मरणाची वाट पहातां । मरण कोणासी नये सर्वथा । आपण गाफीलपणे राहतां । येऊनि गांठी तात्काळ ॥१२॥
जन्ममरण ईश्वराधीन । उपजे नियमा अनुसरून । कोणाही न चुके या कारण । इच्छा केली न केली सारखी ॥१३॥
असो दैवगत्या देहपतन । आकस्मिक झालें जाण । मग ब्रम्हयाचे उदरीं जाऊन । बैसलासी जन्म घ्यावया ॥१४॥
पुढलिये कल्पीं जन्मलासीं । नासिकाद्वारे उपजलासी । मानस पुत्र झालासी । स्वयें ब्रम्हदेवाचा ॥१५॥
चतुर्दश पुत्र ब्रह्मयाचे । नऊ जण प्रवृत्तिमार्गाचें । पांच जण निवृत्तीचे । जगा जाहले उपदेशी ॥१६॥
सनक सनंदन चौघेजण । सनत्कुमार सनातन । पांचवा तूं नारद जाण । उपजत ज्ञानी झालासी ॥१७॥
चिरंजीव पद पावलासी । तिन्हीं लोकीं गमन तुजसी । निवृत्तिमार्ग सकल जनांसी । जगीं झालासी दाविता ॥१८॥
हातीं चिपुळिया खांदीं विणा । सदा तत्पर ईश्वरभजना । ध्रुव प्रल्हाद व्यासासी जाणा । भक्तिमार्गा लाविलें ॥१९॥
ध्रुवाचें वय न पाहिलें । प्रल्हादासी गर्भीं उपदेशिले । ब्रम्हनिष्ठ व्यास भले । भीड न धरिलीं तयांची ॥२०॥
भगवदभक्ती वांचून । जन्मांचे सार्थक नव्हे जाण । ऐसें समस्तांसी जाणवून । तुवां दिधलें निश्चयें ॥२१॥
नि:संग नि:स्पृह ह बाणा । स्वयें धरिला आचरणा । देवा दैत्या घरीं जाणा । तुझा मान सारिखाची ॥२२॥
ऐसा वंद्य तूं सकळांसी । जगदुध्दारार्थ अवतरलासी । भक्तिमार्ग स्थापावयासी । सदा उद्यत देवराया ॥२३॥
देवषिं म्हणती तुजलागीं । देवत्व पावोनि विरागी । स्वच्छंदे डोलतां निजरंगी । कळवळा मनीं जगाचा ॥२४॥
कामक्रोधादि षडवर्ग । नाकळती तुझें अंग । भजनकीर्तना माजी दंग । सदा रत स्वस्वरुपीं ॥२५॥
जडजीवांचे उध्दारार्थ । अवतार धरिला निश्चित । तेवींचि लोकोपकारार्थ । भक्तिसूत्रें निवेदलीं ॥२६॥
त्या सूत्रांचे विवरण । महाराष्ट्र भाषेंकरून । रचावें हा हेतू धरून । पायापाशीं पातलों ॥२७॥
वर्‍हांडातील सुप्रसिध्द संत । गुलाबराव नामें विख्यात । तिहीं या सूत्रींची एक प्रत । प्रेमपूर्वक मज दिधली ॥२८॥
तेविचिं मज सांगितलें । यांसी न विसंबितां भले । यांवरि श्रध्दां ठेवितां वहिलें । कल्याण तुमचें करतील ॥२९॥
मजवरि श्रध्दां नसो परती । परि या ग्रंथावरी ठेवा निश्चिती । जें पाहिजें तें तुम्हांप्रती ।हा ग्रंथ निश्चये दावील ॥३०॥
गुलाबराव संत थोर । अलोट बुध्दीचे सागर । तिहीं पसरोनि कृपाकर । ग्रंथ दाविला मजलागीं ॥३१॥
तेथोनिया आजवरी । ग्रंथ सेवा परोपरीं । पठण प्रवचन करोनि अंतरीं । समाधान पावलों ॥३२॥
भक्तिमार्गानें विवेचन । करिताती सर्वही जण । परी सांगोपांग विवरण । ऐसें  नाहीं देखिलें ॥३३॥
शांडिल्यसूत्रेहीं आहाती । परी मज कठिण भासती । ज्ञानाविषय प्रतिपादिती । भाषाही कठिण तयांची ॥३४॥
नारदसूत्रें अति मधुर । जैसा अमृताचा निर्झर । श्रवणपठणें प्रीति फार । उपजविती अंतरीं ॥३५॥
भाषा तरी अति सुलभ । सहज होय अर्थबोध । लहाना थोरां लागी वेध । श्रवणमात्रें लाविती ॥३६॥
मग टीकेचें काय प्रयोजन । ऐसें पुसाल विद्वजन । तरी माझिया मनिंचे समाधान । व्हावया काहीं लिहितसें ॥३७॥
आत्मनिवेदनार्थ लेखन । नव्हे पांडित्य प्रदर्शन । किंवा उपदेश करावयालागून । नाहीं पांडित्य जगाशीं ॥३८॥
मजचि माझा उपदेश । व्हावयालागीं सायास । लेखनप्रवचनीं हव्यास । याचिलागीं करीतसें ॥३९॥
लेखनीं प्रवचनीं एकाग्रता । मन पावे साम्यावस्था । गूढ अभिप्रायांची स्पष्टता । होऊं लागे आपसया ॥४०॥
यालागीं प्रार्थितों । संतचरणा विनवितों । दीनपणें करुणा भाकितों । करा कृपा लवलाही ॥४१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 15, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP