मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ४

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ४

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


ईश्वरानं जग निर्मिलें । असंख्य प्राणी जन्मासि आले । संसारयात्रा करूं लागले । परी मनुष्यदेह निरुपम ॥७८॥
नाना जीव नाना खाणीं । अपीरिमित जन्मा येऊनि । आसन शयन खानपानीं । निमग्न होऊनि राहिले ॥७९॥
पुढील काहीं सुचेना । मागील समजों येईना वर्तमानकालाची गणना । करीत राहिले सकळ ॥८०॥
इंद्रियांसी भोग घडती । तेथ लाघावली चित्तवृत्ति । मागिला पुढिला जन्मांची स्मृती । कधीं नव्हे कोणासी ॥८१॥
पुढें काय कळेंना । मागील संबंध सुटेना । भोगितांही आपदा नाना । संसारव्यथा न चुकेचि ॥८२॥
ऐसे जीव आतुडती । मायाजाळीं सांपडती । बाहेरी निघों विसरती । झाले सर्व विषयाधीन ॥८३॥
इतर जन्म भोगाधीन । मनुष्यप्राणी कर्माधीन । कर्माचरणें बेडी तोडून । कृतकृत्यता पावती ॥८४॥
ज्ञानाधिकार मनुष्यांसी । तो नव्हे इतरांसी । भक्तीच साधन ज्ञानासी । तेणे सिध्दि पावती ॥८५॥
यालागीं सिध्दो भवति । म्हणोनि भक्तिसामर्थ्य वर्णिती । तैसेचिं अमरत्व पावती । हेंही खरें तितुकेचिं ॥८६॥
आत्मज्ञानें अमरत्व । ऐसेचि सांगती समस्त । आत्मा अमर हें निश्चित । श्रुतिशास्त्रीं संमत ॥८७॥
देह तव नाशिवंत । हें जाणताति समस्त । परी मरण नसावें हा हेत । सकलांचे अंतरी ॥८८॥
मरण ते कधी चुकेना । देह शाश्वत कधीं टिकेना । यालागीं उपाय नाना । करूं पाहती सकळिक ॥८९॥
देव देवता आराधिती । मृत्युंजयाचा जप करिती । टाणेटोणे करोनि पाहती । परी मरण कांही चुकेना ॥९०॥
मरणासी कारण जन्म । जन्मासि कारण आपुलें मन । तें होवोनि विषयाधीन । देहाभिमान वाढवी ॥९१॥
मनेंचि जन्म मानिला । मनें मृत्यु साच केला । सुख दु:खे भोगी वहिला । प्राणी मना आधीन ॥९२॥
मनचि दरिद्रि संपन्न । मनें मानिलें ज्ञानअज्ञान । मन सकळा कारण । तृप्ति आणि अतृप्तिसी ॥९३॥
होऊनिया देहाधिष्ठीत । नित्य विषयीं सेवनीं रत । यालागीं सदा अतृप्त । स्वभावचि तयाचा ॥९४॥
मृगजळाच्या पानीं । किंवा छाया आलिंगनी । अभ्रछायेचिया सदनीं । कोण सुख पावेल ॥९५॥
विषयांचें सुख । तें तो अवघें मायिक । भोग घडलिया क्षणैक । थोरथोरासि नागवी ॥९६॥
आरंभीं अति मधुर । परि परिणामीं केवळ विखार । हिंडवोनि दारोदार । घोर यातना भोगवीं ॥९७॥
जोंवरी विषयासक्ति । तोंवरी कदा नोहे तृप्ती । निर्विषय झालिया निश्चितीं । स्वभावें तृप्ति साधका ॥९८॥
निर्विषय व्हावया कारण । करावें ईश्वराधन । तेणेचिं सकळ काम पूर्ण । समाधान पाववी ॥९९॥
यालागीं ईश्वरभक्ति । करोनि पावले परमतृप्ति । भक्त्याचार्य नारद बोधिती । सूत्रामिषें सकळांसी ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : November 15, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP