श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १२
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
साधकस्थितीत असतां । शास्त्राज्ञा पालन निरसता । असेल तरीच परमार्था । लाग लागे निश्चयें ॥१७६॥
जैसा नूतन वृक्ष लाविला । जलसिंचनें संवर्धिला । तरी तो पाहिजे रक्षिला । शेळ्यामेढ्यांपासोनि ॥१७७॥
तयांसी अवश्य कुंपण । घातिलें पाहिजे जाण । तैसें परमार्थसाधनीं शास्त्राचरण । नियमन पाहिजे जाण ॥१७८॥
इंद्रियांचा निग्रह होईल । तरिच मन निश्चलता पावेल । बुध्दि स्थिर होऊनि करील । निश्चय आत्मतत्वाचा ॥१७९॥
आत्मनिश्चय झालियावरी । सिध्दावस्था बाणे अंतरीं । इंद्रियांची धांव बाहेरी । खुंटुनि राहे सहज ॥१८०॥
ऐसि स्थिती झालिया । व्यवहार सर्व जाय लया । परि देहाकारें राहाटावया । लागे देह पडे तो ॥१८१॥
पूर्वावस्थेंतील वर्तन । तैसेचि देहा पडलें वळण । सर्व इद्रिंये स्वाधीन । शस्त्राधारें राहाटती ॥१८२॥
क्वचित उन्मार्ग वर्तन । सिध्दांचिये ठायीं जाण । दिसों आलें न्यून पूर्ण । तरी ते अवघे मायिक ॥१८३॥
सिध्दांसीं नाही अहंकार । वृत्तिरहित सर्वव्यापार । व्यापारी असून निर्व्यापार । बोळवण कर्माकर्माची ॥१८४॥
तरीही सिध्दावस्थेमाजी । शास्त्राचार सहजासहजीं । दिसों यावा लौकिकामाजी । लोकसंग्रहकार्यार्थ ॥१८५॥
सिध्दचि वर्तो लागती स्वैर । तरी साधकासी उघड बाजार । निर्लज्जपणें व्यवहार । करितां कोण वारील ॥१८६॥
यालागी सिध्दासीही विनवणी । वर्तावें नेत्र उघडोनी । गाफिलपणें वागतां जनीं । बाधक होईल उभयतां ॥१८७॥
मार्गाधारें वर्तावें । ऐसें कथिलें ज्ञानदेवें । आपण आचरोनि आचरवावें समस्त जनां करवीं ॥१८८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 15, 2015
TOP