मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ७७

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ७७

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


काल अनंत अपार । गणना न करवे ऐसा थोर । अंगावरी चराचर । सृष्टि चालवी आपुल्या ॥९१६॥
भूतें सचेतन अचेतन । जन्मा घालोनि स्वयें आपण । स्थितिकालीं संरक्षण । करोनि संहार तोचि करी ॥९१७॥
तोचि ईश्वर कां न म्हणावा । सकळांसी असे ठावा । सकल घटना ज्याचीया मावा । घडों येति प्रत्यक्ष ॥९१८॥
सकल सिध्दता जरी केली । तरी पाहावी लागे वेळ आली । वेळ न येतां व्यर्थ गेली । केली सर्व तयारी ॥९१९॥
चंद्रहासासी मृत्यु यावा । म्हणोनि केला सर्व उठावा । परि मृत्युऐवजीं राज्यवैभवा । पावला प्रिय समागम ॥९२०॥
हें कैसेनि घडों आलें । विचारूनि पाहतां भलें । देवें नव्हतें अनुवादिलें । म्हणोनि झालें उलट ॥९२१॥
ईश्वरेच्छा तैसी नव्हती । म्हणोनि चंद्रहासा आयुष्यप्राप्ति । मृत्युची वेळ आली नव्हती । कारण नसे यापरतें ॥९२२॥
म्हणोनि काल तोचि परमेश्वर । इच्छा तेचि गति सत्वर । संकल्पमात्रें संसारचक्र । राहिला नित्य फिरवोनि ॥९२३॥
ईश्वरेच्छा कळेना । कालचक्र थांबवेना । जें जें होईल तें तें मना । संपादून घ्यावें लागे ॥९२४॥
ईश्वरेच्छा तेचि कालसत्ता । दिसों आली स्वभावता । तरी कासया शिणावें आतां । कर्तृत्वाभिमान धरोनि ॥९२५॥
सर्व कर्ता परमेश्वर । त्याची कालशक्ति धुरंधर । घडवीतसे अपंरपार । घटना सकल ब्रह्मांडाची ॥९२६॥
त्या कालरूपी परमेश्वराची । सदैव आठवण ठेवण्याची । कर्तव्यता ओळखून साची । खबरदार असावें ॥९२७॥
कालाचा अल्पविभाग । आयुष्येंरूपे लाभला चांग । तो ईश्वरस्मरणें यथासांग । सार्थकी लाविला पाहिजे ॥९२८॥
क्षणोक्षणीं चिंतन स्मरण । ईश्वराचें करावें आपण । काल तोचि ईश्वर जाणून । सदैव त्यासी भजावें ॥९२९॥
केवळ स्मरणं राखो जाता । ईश्वरत्व ये हातां । यालागीं सावधानता । सर्वकाळ असावी ॥९३०॥
परी या संसारव्यवहारीं । प्राणी गुंतुन पडले आहारीं । वासनाचें भरोवरी । गाफील होऊनि राहिले ॥९३१॥
मनानें जें मानिलें सुख । ते पाप्त व्हावया देख । करित राहिले प्रयत्न अनेक । तेणें वेचलें आयुष्य ॥९३२॥
तें लवकरी न ये हाता । आलें तरी नव्हे तृप्तता । नित्यनूतन आशा वाढतां । भोगी दु:ख सुखाशें ॥९३३॥
दु:ख टाळावयासाठी । करितां नित्य खटपटी । तेंचि भोगावें लागे शेवटी । टाळों जातां टळेना ॥९३४॥
सुख दु:ख प्रारब्धादीन । हें नेणोनि सर्वहीजन । आयुष्य वेचिति निष्कारण । पुढें पडे ठाऊके ॥९३५॥
न प्रार्थितां दु:ख । होतें प्राप्त स्वाभाविक । तरी काय नव्हेल सुख । त्याची आस करितां ॥९३६॥
परी जीवासी न धरवे धीर । भोगाकारणें मन आतुर । व्यापार करवी निरंतर । सुख आणि दु:खाचा ॥९३७॥
आयुष्य वेचिलें जन्मवरी । समाधान नाही अंतरी । ऐशा लगबगीं माझारीं । काळ ग्रासी अवचिता ॥९३८॥
म्हणति अकाळीं मृत्यु आला । मनोरथ नाहीं पुरला । अनुभव हाचि घ्यावा लागला । प्रपंची मूढ जनांसी ॥९३९॥
ऐसी सुखार्थ विवंचना । करितां जन्म गेला जाणा । तैसेंचि दु:खे भोगितां नाना । तळमळ करिती सुटकेची ॥९४०॥
दु:ख संपविता संपेना । भोग भोगितां चुकेना । आशा कांहीं केल्या सुटेना । तीच मूळ दु:खाचें ॥९४१॥
आशा वाढली हृदयांत । तेंचि निरंतर दु:ख भोगवीत । प्रयत्न करितांही अनंत । आशा कांही सुटेना ॥९४२॥
आजचा दिवस जाईल । उद्यांचा भला उगवेल । ऐसे मनोरथ करितां वेळ । जाय सरोनि अकल्पित ॥९४३॥
दिवस जाती मास जाती । नूतन संवत्सरें पालटती । मरण येतां मुखीं माती । सुखदु:खाची बोळवण ॥९४४॥
परी इच्छा राहिली मनांत । ते पुन: जन्मासी घालीत । अनेक जन्मांतरें भोगवीत । इच्छा मूलक संसृति ॥९४५॥
अहंतेपोटी जन्मलीं । द्वेषाची अर्धांगी बनली । कामाचे तारुण्या आली । स्वयें प्रसवली जगडंबर ॥९४६॥
सर्व उद्योगासी मूळ । इच्छा वाढली प्रबळ । ते पसरवी आपुला वेल । गुरुफटी सकळांसी ॥९४७॥
तेणें व्यर्थ जातो काळ । अतृप्तता माजली प्रबळ । पाठी आयुष्याची वेळा । भरतां झाली अवकळा ॥९४८॥
इच्छेच्या पोटीं लाभ हानी । जीवासी लावी अनुसंधानीं । तेणें वायां गेले प्राणी । झाले मरणा आधीन ॥९४९॥
मरण चुकवितां चुकेना । अवचित घाला घालोनि जाणा । अंतकाळीं जे वासना । तदनुरूप जन्मघेववी ॥९५०॥
अंतकाळीं ईश्वरस्मरण । झालिया चुके जन्ममरण ईश्वरस्वरूप होय आपण । ऐसें सर्वत्र बोलती ॥९५१॥
मरणकाल अकस्मात । पावोनि जीवा करी घात । मृत्यु टपोनि राहिला स्वस्थ । वेळ येतां कवटाळी ॥९५२॥
म्हणोनि असावें सावधान । सर्वकाल ईश्वरस्मरण । हृदयीं राखावें संपूर्ण । मृत्यु येवो केव्हांही ॥९५३॥
नारदमुनि ऐसें सांगति । सर्वकाळ राखावी भगवदस्मृति । तेणेंचि पावोनि उत्तमगति । जन्म मरण चुकेल ॥९५४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP