श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ८४
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
ऐसें हें नारदमुनि विरचित । सकल भक्तिशास्त्राचें मथित । श्रध्दापूर्वक जें अनुष्ठित । तें निश्चयें तरतील ॥११९१॥
नारद भक्त्याचार्य थोर । करावया जगदुध्दार । भक्तिमार्गाचें सकल सार । उघड करोनि सांगति ॥११९२॥
भक्तिमार्ग वाटे सुलभत । वर्म न कळतां अत्यंत दुर्लभ । ज्ञानवैराग्याचा लाभ । सहज न होय सकळांसी ॥११९३॥
भक्ति करिती सकलजन । परि ते दांभिक लक्षण । विषयभोगीं गुंतलें मन । समाधान नव्हे तेणें ॥११९४॥
देव देवता योजिती । सकाम अनुष्ठानें करिती । लंपट होऊनि विषय भोगिती । म्हणति आम्ही भक्तिर्मागी ॥११९५॥
हा तों केवळ व्यापार । तेथें भक्ति नाहीं साचार । निवळ देवघेवीचा व्यवहार । समाधान नव्हे तेणें ॥११९६॥
भक्ति तेची म्हणिजे साची । जे ईश्वरासाठीं ईश्वराची । वासना बाह्य भोगाची । नसावी तेथें अणुमात्र ॥११९७॥
भोगार्थ जे भक्ति केली । ते ईश्वराची नव्हे भली । विषयभक्तिचि ते बोलिली । ईश्वर केवळ साधनपात्र ॥११९८॥
हा गौण भक्ति प्रकार । प्ररोचनार्थ वर्णिला थोर । अनेक ग्रंथी आधार । त्यासी पाहतां आढळति ॥११९९॥
परि तें नव्हे शुध्द मत । ईश्वराकडे वळावें चित्त । यालागीं जाणोनि हेत । क्वचित करिती प्रतिपादन ॥१२००॥
म्हणोनि ईश्वरासाठीं ईश्वरभक्ति । हाचि सिध्दांत धरा चितीं । तैसेचिं ईश्वर सर्वांभूती । हेही मनीं दृढ करा ॥१२०१॥
मृतिकेवांचूनि घट नाहीं । कनकावांचूनि कटक नाहीं । तैसें ईश्वरावांचूनि कांही नाहीं ।तोचि अधिष्ठान जगताचें॥१२०२॥
सर्व जगामाजी जो भरला । अंतर्यामी नित्य संचला । ऐसें जाणोनिया त्याला । नित्य आठवा सप्रेम ॥१२०३॥
आठवणही न धरितां । त्यावीण शक्य नोहे वर्ततां । स्मरण विस्मरणाची वार्ता । बुडोनि जाय आघवी ॥१२०४॥
तेथें नाही ज्ञानाज्ञान । सर्वत्र तोचि समसमान । तेथें नाहीं गुणावगुण । सर्वत्र तोचि सर्वरूप ॥१२०५॥
ऐसें जाणोनि तयासी । सर्वांभूतीं भजावें भावेंसी । सर्वत्र पाहावें सर्वदेशी । भेद कांहीं न राखावा ॥१२०६॥
जें जें कांही होतें जातें । ते सकळही त्याचेनि मतें । घडतें मोडतें रूपा येतें । किंवा होतें अरूप ॥१२०७॥
सर्व कर्ता जगदीश्वर । ऐसा धरूनियां निर्धार । त्याचें वचनीं राह स्थिर । स्मरणीं असोन सादर ॥१२०८॥
सर्व समर्पावें तयासी । भार न घ्यावा कवणेविषीं । समाधान चित्तें अहर्निशीं । तयासीच रमावे ॥१२०९॥
कांहीही प्रसंग घडो येतां । न करावी शोकभय चिंता । त्याचा आश्रय करोनि निवांता । सुखानदीं वर्तावें ॥१२१०॥
असावें शास्त्रशुध्द आचरण । मानावें संतवचन प्रमाण । सकलधर्माचें निधान । ईश्वरस्मरण सर्वकाळ ॥१२११॥
नारदमुनि वचनींचा संकेत । हाचि उमजला मज हेत । तोचि जाणोनियां यथार्थ । जें जन अनुष्ठान करितील ॥१२१२॥
श्रध्दा पूर्ण ठेवितील । विश्वासें वागों लागतील । तयांचें परमकल्याण होईल । ऐसा जाणा भरंवसा ॥१२१३॥
भक्ति नसेल ज्याचें हृदयीं । तेथेंही ते उपजेल ठायीं । भक्ति उपजावया पाहीं । उपाय भक्ति सूत्राभ्यास ॥१२१४॥
आणिकही जें अत्यंत इष्ट । ऐहिक पारत्रिक हित श्रेष्ठ । तें साधेल न करितां कष्ट । नारदमुनि प्रसादें ॥१२१५॥
ऐसें द्विवार बोलून । निश्चायत्मक आश्वासून । ग्रंथ संपविला वर देऊन । परम कल्याणकारक ॥१२१६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2015
TOP